गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

‘तांबट’ पक्ष्याचा फराळ !

     
      दीपावलीच्या चौथ्या दिवशीची, रविवार (१५ नोव्हेंबर २०२०) सकाळची घटना. पूर्वेकडल्या दारात बांधलेल्या किल्ल्यावर
सूर्याची कोवळी किरणपडण्याच्या तयारीत होती. किल्ल्यावर उशीरा पेरलेले धान्यही किंचितसे उगवून आलेले. किल्यावर पाणी शिंपडण्याच्या हेतूने मावळ्यांना, ‘थोडी विश्रांती घ्या म्हणत जमिनीवर उतरवलं. पत्नीला भोवताली साधीशी रांगोळी काढायला सांगितली. बहिणीने पुण्याहून मावळे पाठविल्याने गेल्यावर्षीच्या सैन्यदलात चांगलीच भर पडलेली. लेकासोबत छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना किल्यावर पुन्हा स्थानापन्न करत असताना पश्चिमेकडच्या उंबरावरची फळं जमिनीवर पडत असल्याचा आवाज आला. झाडावरून पडणाऱ्या उंबराच्या फळांच्या आवाजाचा वेग नेहमीपेक्षा जास्त असल्यानं उत्सुकता ताणली गेली. थोडं बारकाईनं पाहिलं तेव्हा डोके, छाती आणि कंठ तपकिरी रंगाचा असलेल्या तांबट पक्ष्याची (Brown Headed Barbet) जोडी पिकलेल्या उंबराच्या फळांच्या फराळाचा आस्वाद घेताना दिसली. तांबटपक्ष्याचा हा दिवाळी फराळ कार्यक्रम तीसेक मिनिटे चालला. एरव्ही कॅमेऱ्याची चाहूल लागताच उडून जाणाऱ्या ‘तांबट’ची आजची कृती मात्र पर्यावरणीय कारणे आमची दीपावली सुखद करून गेली.

दीपावलीचा पहिला दिवस अशी मान्यता असलेल्या वसुबारसेच्या सकाळी परिसरातील बालमावळ्यांनी साकारलेल्या किल्यावर शेवटचा हात फिरवून तातडीच्या प्रवासाला निघालेलो, तो परतायला धनत्रयोदशीची रात्र झाली. घरून निघताना किल्यावर धान्य पेरणी केलेली. तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान आटपल्यावर लगबगीनं किल्यावर महाराजांना आणि मावळ्यांना स्थानापन्न केलं. छानसे फोटोही घेतले. कोरोनाच्या संकटात दीपावलीचा आनंद विशेष नसला तरी काळासोबत चालायला हवं. यंदा अभ्यंगस्नानानंतर ग्रामदेवतेच्या दर्शनाला जाणं, घरचा फराळ अर्पण करणंही शक्य झालं नाही. अशात दिवस सरला. दीपावलीच्या आजच्या चौथ्या दिवशी सकाळी किल्यावर पेरलेलं धान्य उगवू लागल्याचे लक्षात आले. तिकडे लक्ष देत असताना परसदारातल्या उंबरावरच्या पिकल्या फळांच्या जमिनीवर पडताना होणाऱ्या आवाजाने लक्ष वेधून घेतले. जवळपास अर्धा डझनहून अधिक खारुताईंची टीम परसदारी आंबा, नारळ आणि उंबरावर फळं खायला कायम कार्यरत असते. निसर्ग नियमानुसार सकाळी त्यांचा खाण्याचा वेगही अधिक असतो. फळं खाताना बरीचशी जमिनीवरही पडतात. तेव्हा आवाज येतो. आता हे सवयीचं झालेलं. पण आजच्या आवाजाचा वेग कानाला अधिक जाणवला. म्हणून पाहिलं तेव्हा तांबटपक्ष्याचा जोडीनं दीपावली फराळ आनंद कार्यक्रम सुरु असल्याचं दिसलं. या जोडीला पाहाताच दुसरं काही सुचेचना. किल्यावरील मावळे चटकन स्थानापन्न करून आम्ही तांबटांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाचा आनंद घेण्यास सज्ज झालो. त्या आनंदात काही फोटोही घेतले. मात्र दोघे तांबट स्वतंत्रपणे फलाहार करण्यात मग्न होते. दारातल्या उंबराला फळं धरू लागल्यावर तांबटाचं एकट्याने येणं आम्हाला नवीन नाही. तसे विविध पक्षी येत असतात. पण आजचं दीपावलीच्या, फटाक्यांच्या आवाजी वातावरणात सकाळी सकाळी यांचं जोडीनं येणं नाही म्हटलं तरी सुखद पर्यावरणीय अनुभूती प्रदान करणारं होतं.

गेली काही दशके वर्षे फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा, त्यांच्या अतितीव्र प्रकाशाचा पशुपक्ष्यांवर परिणाम होत असल्याचे आपण वाचतो आहोत. पक्ष्यांच्या स्थलांतरणाचाही हा काळ असल्याने अनेक स्वयंसेवी संस्था, पक्षीप्रेमी, अभ्यासक, संशोधक याबाबत समाजात सतत जागरुकता निर्माण करण्याचे काम करत असतात. दीपावलीतील रॉकेट्ससारख्या फटाक्यांमुळे पक्ष्यांची झाडावरील घरटी जळण्याचा धोका असतो. फटाक्याच्या आवाजाचा सर्वाधिक परिणाम चिमण्यांवर होत असल्याचंही वाचल्याचं आठवतं. तशी मलाही यंदा दीपावलीत परसदारी चिमणी दिसली नाही. गेल्यावर्षी देशातल्या काही शहरात फटाके फोडण्याचे, पर्यायाने पशुपक्षी जखमी होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे नोंदवले गेले आहे. तामिळनाडूतल्या वेल्लोडसारख्या पक्षी अभयारण्यात शेकडो कुटुंबे पशू आणि पक्ष्यांसाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करत असल्याच्याचेही मागे वाचले होते. आमचे मात्र आजही दाट लोकवस्तीच्या शहरात फटाके वाजविणे सुरू आहे. लहानग्यांना समजावताना अडचणीचं होतं, पण मोठ्यांनी तरी हा मोह टाळायला हवा. फटाके उडविण्याची पद्धत हजारो वर्ष जुनी असली तरी वर्तमानात ती किती उपयोगात आणावयाची ? याचे तारतम्य प्रदूषित जगात आपण बाळगायला हवे. आमच्या बालपणी भुईचक्र, लवंगी फटाके, फुलबाजे, पाऊस, एखाद-दुसरा दादा बॉम्ब, एवढेच फटाके असायचे. आता त्यात खूप वाढ झाली आहे. नवनवीन प्रकार आलेत. पूर्वीची लवंगी फटाक्यांची छोटी माळ आता मोठया आकारात कित्येक मीटर लांब झाली आहे. दीपावलीसारख्या उत्सवी काळात या विषयावर सातत्याने चर्चा झडतात. रोजगाराचा सारासार विचार करून सरसकट फटाके बंदीला विरोधही केला जातो. फटाके बंदीमुळे चोरट्या विक्रीला बळ मिळू शकते असाही एक मतप्रवाह आहे. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी आणावी असा काहींचा विचार असतो. काहीजण प्रदूषणविरहित फटाक्यांना प्राधान्य देण्याचा विचार मांडतात. तरीही काही गोष्टी आम्ही आपणहून समजून कमी करायला हव्यात.

तर आजच्या फटाक्यांच्या आवाजात, जमिनीवर कमी उतरणाऱ्या वृक्षवासी तांबटला सकाळच्या सूर्यप्रकाशात उंबराच्या झाडावर बसून फराळ करताना पाहाण्यात खूप मजा आली. त्या दोघांमधला एकजण तर आपल्या चोचीत उंबराच्या फळांचा नुसता बकाणा घेत होता. त्यांच्या आजच्या वावरात भिती दिसत नव्हती. त्यांना न्याहाळताना मला ज्येष्ठ साहित्यिक स्नेही प्रल्हाददादा जाधव यांनी लिहिलेल्या ‘तांबट’ पुस्तकाची आठवण झाली. दीपावलीच्या दिवसात निमशहरी भागात सकाळ संध्याकाळी फटाके वाजविण्याच्या मुहूर्तावर परसदारी शुकशुकाट असतो. यंदा कोरोनाकारणे, फटाक्यांचे आवाज काहीसे कमी झाल्याने पक्ष्यांची हालचाल जाणवत होती. प्रस्तुतचे तांबट पक्षी उभयता म्हणूनच चटकन उडून न जाता फराळ करीत बसले असावेत ! नंतर दुपारी, भोजनसमयी एक कोकीही उंबरावर येऊन विसावलेला. पण तो मला पाहून चटकन उडाला, बहुदा त्याला आज फराळात रस नसावा. सोमवारी, दीपावलीच्या पाचव्या दिवशीही सकाळी तांबट आलेला, पण एकट्याने ! आणि मला बघताच तोही उडून गेला. जाण्यापूर्वी मात्र त्यानं २/३ वेळा ‘कुटरुक् कुटरुक् कुटरुक्’ एकसुरी आवाज ऐकवून मला मोहवून टाकलं, प्रस्तुतचा मजकूर लिहायला प्रोत्साहन दिलं.

खरंतर उंबराच्या झाडाची दारात होणारी पानगळ, फळांची पडणारी रास यांना कितीही नाही म्हटलं तरी मी कंटाळलोय. शहरी वातावरणात, मर्यादित जागेत यांचं करायचं काय ? असं गेल्या दहा-बारा वर्षात अनेकदा वाटून गेलंय. एक-दोनदा उंबराच्या काही फांद्या तोडूनही झाल्यात. आत्ताही तोडायच्यात. पण सकाळ-दुपार-संध्याकाळी झाडावर बसलेलं पक्षीवैभव न्याहाळताना फांद्या छाटण्याचा विचार आपोआप गळून पडतो आहे. गेली २/३ वर्षे हे असंच चाललंय. यंदा तर पानगळीचा आणि फळांचा त्रासही वाढला. आगामी दिवसात काही फांद्या छाटण्याचे जवळपास निश्चित केले असताना तांबटाच्या जोड्याने ऐन दीपावलीत फलाहाराच्या (फराळ) निमित्ताने दिलेले हे दर्शन मला पुन्हा माझ्या विचारापासून परावृत्त करू पाहाते आहे.

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com, ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...