शनिवार, ८ एप्रिल, २०१७

अण्णांचे छांदोग्योपनिषद !

तब्बल नऊ ताम्रपटांचे संशोधन करून कोकणच्या इतिहासाला प्राचीनतेचे संदर्भ बहाल करणारे दाभोळचे नामवंत इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णा शिरगावकर यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी आपल्या अनुभवसमृद्ध लेखणीतून साकारलेल्या ‘वाशिष्ठीच्या तीरावरून या संग्राह्यमूल्य असलेल्या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन वाचकांच्या हस्ते येत्या रविवारी (दिनांक ९ एप्रिल रोजी) सायंकाळी ४.०० वाजता शहरातील राधाताई लाड सभागृहात संपन्न झाले. या ३०० पानी पुस्तकात एकूण २१ प्रकरणे आहेत. पुस्तकाची निर्मिती आणि त्यातील ३ प्रकरणांचे लेखन पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी केले आहे. पुस्तकात समाविष्ट असलेल्या प्रकरणांतील अण्णांच्या छंदांची माहिती देणारे हे प्रकरण देत आहोत.


अण्णांचे छांदोग्योपनिषद !

संत कबीर यांचा एक दोहा प्रसिद्ध आहे,
गोधन, गजधन, बाजिधन और रतनधन खान । जब आवो संतोषधन, सबधन धुरि समान ।।

अर्थात आपल्याकडे गाई, हत्ती आणि घोडे यांचे धन असो किंवा रत्नांची संपत्ती असो, परंतु जेव्हा आपल्याकडे समाधाननावाचं धन येतं तेव्हा, ही सारी संपत्ती आपल्याला एखाद्या धुराप्रमाणे वाटते आणि हे समाधान नावाचं धन समृद्ध आयुष्यात आपल्याला आपले छंद बहाल करतात. आपली आवड हीच आपल्या जीवनाचा मुख्य हेतू बनवली तर आपल्याला समाधानपूर्वक समृद्ध आणि सर्वार्थाने यशस्वी आयुष्य जगताउपभोगता येतं, याचंमूर्तीमंत उदाहरण म्हणजे अपरान्ताचा प्रवासी म्हणून गौरविलेले विविधांगी व्यासंगी छंदवेडे व्यक्तिमत्त्व आदरणीय अण्णासाहेब शिरगावकर होत.

आयुष्याच्या अगदी सुरूवातीला आपल्याला नक्की काय हवंय ? याचं मर्म उमजलेल्या अण्णांनी आपल्या आयुष्याचा प्राधान्यक्रम निश्चित करून टाकला. जगाने ठरवून दिलेल्या चाकोरीबद्ध मार्गावरून मार्गक्रमण करण्यापेक्षा स्वतःला आनंद देणार्‍या निरूपद्रवी छंदांसोबत आयुष्य जगण्याचं त्यांनी ठरविलं. चारचौघांसारखे अमुक एवढे पैसे मिळविलेच पाहिजेत, अमुकच प्रकारचे घर हवे, गाडी हवी, एकूणात सतत भौतिक सुखाच्या जगात पुढे जात राहिले पाहिजे ही सार्वत्रिक मानसिकता जुगारून अण्णांनी आपल्या आयुष्याला वैशिष्ट्यपूर्ण आकार दिला. यात त्यांनी जोपासलेल्या छंदांचे फार मोठे योगदान आहे. वास्तविकतः मनुष्य हा निर्मितीशील प्राणी आहे. निर्मितीची इच्छा मानवी मनात निर्माण होणे हा छंदाचा उगम असतो. सर्जनशीलता हे कलागुण निसर्गाने प्रत्येकालाच दिलेले आहेत. परंतु अनेकविध कारणांनी मनुष्यप्राणी नको त्या गोष्टींच्या मागे आयुष्यभर पळत राहात आपल्यातील ही नैसर्गिक ऊर्मी दाबून टाकत असतो. अण्णांच्या एकूण आयुष्याकडे पाहिल्यानंतर त्यांनी या ऊर्मिला तितकाच जबदरस्त न्याय दिल्याचे जाणवते.

अगदी लहानपणी साधारणतः ६-७ वर्षांचे असल्यापासून अण्णांना रंगीत दोरे, पेन्सिली, रंगीत काचांचे तुकडे, पाखरांची पिसे असे काहीना काही परंतु वेगळे जमविण्याचे वेड लागले. त्यानंतरच्या कालखंडात प्रख्यात इतिहास संशोधक व लेखक गोपाळ नीळकंठ दांडेकर यांच्या संपर्कामुळे त्यांच्या सोबतच्या फिरस्तीतून अण्णांच्या काहीना काही जमविण्याच्या छंदाला, प्राचीन इतिहासाच्या संशोधनाला लागणारी पूरक साधने जमविण्याचे  व्यापक स्वरूप प्राप्त झाले.'सुंदर ते वेचावे, सुंदर करूनी मांडावेअसा ध्यासच अण्णांना लागला. आयुष्यातील तत्कालीन सामाजिक आणि राजकीय जीवनातून उरलेल्या वेळात अण्णांनी आपला वस्तुसंग्रह वाढवत नेला.

छंद म्हणजे आपली स्वतःची लय, आपला स्वतःचा शोध, आपला छंद हीच खरेतर आपली ओळख असते. फावल्या वेळेत, रिकाम्या वेळेत करावयाचा विरंगुळा म्हणजे खरेतर छंद असू नये. छंद ही आयुष्यात करावयाची मुख्य गोष्ट आहे हे आपल्या मनावर बिंबविण्यासाठी अण्णांचं आयुष्य आवर्जून अभ्यासायला हवं. मनुष्याला पोट वगैरे भरण्यासाठी नोकरी, शिक्षण, व्यवसाय वगैरे सारं करावंच लागतं, परंतु मनुष्य म्हणून मिळणारी खरी ओळख, सापडणारा जगण्याचा खरा अर्थ आणि समाधान हे निव्वळ छंदातूनच गवसतं. अनेक प्रकारच्या छंदांनी अण्णांच्या आयुष्यातील खूप मोठी जागा व्यापली आहे. जीवन जगण्याची वास्तविक गरज असल्याप्रमाणे अण्णांच्या आयुष्यात हे सारं घडत गेलं असावं, असं वाटावं इतका निर्मितीचा आनंद यातून अण्णांनी मिळविला आहे. आपल्या छंदांमधून आपली अभिरूची, आवडीनिवडी, व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, विचारधारणा, मानसिक स्तर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सहज ध्यानी येतो. दैनंदिन कामाचे विचार डोक्यातून बाजूला सारण्यासाठी, आयुष्यातील कंटाळा कमी करण्यासाठी छंद माणसाला नेहमीच मदत करीत राहिले आहेत.घड्याळाच्या काट्याप्रमाणे कार्यरत मानवी जीवनात छंद एखाद्या औषधासारखं काम करतो’, हे अण्णांचं वाक्य म्हणूनच महत्त्वाचं वाटतं. मानवी आयुष्यातील ओळख, माणसातील माणूसपण टिकविण्याचे काम, स्वतःला व्यक्त होऊ देण्याची संधी, जगण्यावर प्रेम करायला लावणारी भावना, मन रमविण्याची कला, स्वतःच्या जीवनाचा, निसर्गाचा, मानवी मनाचा शोध घेण्याची कला आणि जगण्याची नवी दृष्टी मानवाला त्याच्या छंदातून मिळत असते. आपल्या प्राचीन कोकणातील तितकाच प्राचीनतम इतिहास विविध ऐतिहासिक साधनांच्या माध्यमातून उलगडवून दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न करणारे आणि कोकणचा इतिहास वस्तूरूपाने जीवंत करून हजारो ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करणारे अण्णा म्हणूनच  कोकणच्या सर्वांगीण विकासातील सोनेरी पान ठरले आहेत.

पुराण व इतिहास वस्तूसंग्रह

ज्या छंदामुळे अण्णांना इतिहास संशोधक म्हणून जगभरात मानसन्मान मिळाले, तो छंद पुराण व इतिहास वस्तूसंग्रहाचा होय. विविध प्रकारची नाणी, नऊ ताम्रपट, शिलालेख, सनदा, पत्रे, हस्तलिखिते, तोफा, बंदुका, पिस्तुले, भाले, परशू, चिलखत, तलवारी, कट्यार, जंबीये, ढाली, दांटपट्टे, मूर्ती, तोफगोळे, काष्टशिल्पे, मूर्ती, कुलपे, भांडी आणिगुहालेण्यांचा शोध यांचा यात समावेश होतो. या सार्‍यांचा, प्राचीन कोकणी मानवी जीवनाचे आणि समाजाचे अध्ययन करून कोकणचा इतिहास नव्याने मांडण्यात त्यांना खूप उपयोग झालेला आहे. कचर्‍यातून कलाकृती हा सुद्धा एक छंदच आहे. रिकामे बॉक्स, पॅकींग पेपर्स, रिबीन्स, यांचा उपयोग यात केला जातो. कोकणातील प्राचीन लोकांनी मागे सोडलेल्या विविध अवशेषांचा शोध घेऊन त्यांचे निरीक्षण करून त्या निरीक्षणातून मिळालेल्या माहितीचे इतिहासातील संदर्भांसह विश्लेषण करून कोकणच्या इतिहासाला कलाटणी देण्याचे जबदरस्त काम अण्णांनी केले आहे. अण्णांच्या प्रयत्नामुळे उजेडात आलेली पन्हाळेदूर्गची लेणी कोणत्याही प्रदेशाला स्वतःविषयी गर्व वाटावा इतकी महत्त्वाची आहेत. विशेष म्हणजे 29 लेण्यांच्या या समूहात वैदिक, जैन आणि बौद्ध या तीनही धर्माच्या संस्कृतींचा मिलाफ आढळतो. कोकणातील मानवज्ञातीचा इतिहास नव्याने तपासण्याची ऊर्मी संशोधकांमध्ये जागविण्याचे यशस्वी काम अण्णांच्या याच छंदाने केले आहे. अण्णांचा नाणी गोळा करण्याचा छंद हा सुद्धा मानवी जीवनात एक विस्तृत अभ्यास केले जाणारे शास्त्र म्हणून ओळखला जातो. शिल्प, वास्तू आणि चित्र या तीनही कलांचा अभ्यास मूर्तीशास्त्रामध्ये केला जातो. शिल्पकला ही याच मूर्तिशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. याचा उलगडा अण्णांनी हे सारेच छंद जोपासून वृद्धिंगत करून आपल्यासमोर करून ठेवला आहे. कोकणचा सांस्कृतिक वारसा इतिहासाच्या साधनांच्या माध्यमातून शोधून काढण्याचे फार मोठे काम यातून घडले आहे. या कामाचे स्वतःचे असे जबरदस्त मोठे आणि व्यापक महत्त्व आहे.

वास्तविक पुरातन वस्तूंचा, जुन्या नाण्यांचा संग्रह करायचा म्हणजे माणूस श्रीमंत हवा. कारण हा छंद खूप खर्चिक आणि किचकट छंद आहे. परंतु या सार्‍यावर समाजकार्याची आवड असलेल्या अण्णांनी पद्धतशीर मात केली. सन १९६२  साली अण्णा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जनसंघाच्या तिकिटावरती उभे राहिले. त्यांच्या मतदार संघात पन्हाळेकाझीनावाचे गाव होते. ते बदलून पन्हाळेदुर्गकरावे अशी स्थानिक जनतेची मागणी होती. अण्णांच्या विनंतीवरून आमदार रामभाऊ म्हाळगी यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला. परंतु तो मान्य होण्यासाठी ठोस पुराव्याची गरज होती. या प्रयत्नात असताना अण्णांना केशवराव जाधव नावाच्या इसमाच्या घरी पूजेत असलेला ताम्रपट अनेक खटपटींनंतर मिळाला. या ताम्रपटाचे वाचन केल्यानंतर,‘पन्हाळेकाझी हे गाव अकराव्या शतकातील शिलाहार राज्याची पद्मनालदुर्ग नावाची राजधानी होती. कालांतराने अपभ्रंश होऊन ते नाव पन्हाळेदुर्ग झाले. साधारणतः १५०  वर्षांपूर्वी काझी नावाच्या मुस्लिम जमीनदाराच्या नावाने गावाचे नाव बदलले गेलेही सारी माहिती उजेडात आली आणि अण्णांच्या छंदाला ऐतिहासिक वळण लागले. पन्हाळेदुर्ग लेणी अजिंठा वेरूळनंतरचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा लेणी समूह आहे. ही लेणी प्रकाशात यावी म्हणून अण्णांनी खूप परिश्रम घेतले आहेत. यानंतरच्या कालखंडात प्रा. डॉ. शोभना गोखले, गो. नी. दांडेकर, डॉ. राजगुरू यांचेसह पत्नी कै. नंदिनी काकी यांनी दिलेल्या प्रोत्साहनपर सततच्या पाठिंब्याने अण्णांचा छंद आणि संग्रह वाढत गेला. त्यांना ऐतिहासिक गोष्टींकडे पाहाण्याची दृष्टी गवसली.

नाणीसंग्रह

जगातील विविध ६० देशातील सात/आठ हजार नाणी आणि भारतातील एक/दोन हजारांवर जुन्या नाण्यांचा संग्रह अण्णांकडे झाला. परदेशात नेव्हीत कार्यरत असलेले कोकणी मुस्लिम आपल्या खिशातील जुनी नाणी आवर्जून अण्णांचे हवाली करीत. यातूनच अण्णांचा हा छंद बहरला. ब्रिटीशकाळातील गेल्या २०० वर्षातील व पंचमार्क, चालुक्य, शिलाहारकालीन नाणीही त्यांचे संग्रही आहेत. न्यू मॅसमेटिक सोसायटी ऑफ इंडिया, रघुवीर पै, ब्रह्मानंद देशपांडे आदि संस्था-अभ्यासकांना अण्णांनी आपला नाणेसंग्रह भेट दिला आहे. या नाण्यांचा व्यापार, स्मगलिंग आणि जागतिक मार्केट खूप मोठे असल्याचे त्यांना माहिती असतानाही पैशाचा मोह बाजूला सारून अण्णांनी हे दान केले आहे. अण्णांनी जमविलेल्या नाण्यांचाही मोठा इतिहास आहे. नाणी मिळविण्यासाठी अण्णांना खूप प्रकारच्या हिकमती कराव्या लागल्या. कोकणात नाणी देवघरात पूजेत असत. काहीवेळा देवाच्या पालख्या घरोघरी फिरतात तेव्हा जुनी नाणी लोक देवाला अर्पण करीत. अशातली काही नाणी अण्णांना मिळविण्यासाठी प्रसंगी देवाला कौलही लावावा लागला आहे. काही लोकांच्या पूजेत नाणी बाहेर काढायचा मुहूर्त ठरलेला असे. एका गृहस्थाच्या पूजेत असलेले नाणे पाहिल्यानंतर त्यावरील मुद्रा पाहून अण्णांनी, ‘ही औरंगजेबाची मुद्रा आहेअसे सांगताच तो गृहस्थ स्वतःवरच चिडल्याचा अनुभव अण्णांनी घेतला आहे. अण्णा वास्तव्यास असलेल्या दाभोळ गावाला सुमारे साडेचार हजार वर्षांचा इतिहास आहे. अठराशे वर्षांपूर्वीच्या टॉलेमीच्या सर्वांत जुन्या नकाशात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दाभोळ या एकाच बंदराचा उल्लेख आहे. यास्तव दाभोळ परिसरात अनेक ठिकाणच्या उत्खननातून अण्णांना नाणी संग्रह करता आला आहे.

ताम्रपट संशोधन

फारसे काही हाताशी नसताना सामान्य कुटुंबात जन्मलेल्या किमान अक्षर ओळख असलेल्या एखाद्या गृहस्थाने तब्बल ९ ताम्रपट शोधावेत हे आजतागायत संपूर्ण भारत वर्षातील वैयक्तिक कारकीर्द स्तरावरील एक आश्चर्य आहे. आणि ते आश्चर्य गेली अनेक वर्षे अण्णा जगत आहेत. कारण ताम्रपट मिळविणे हे खूपच जिकिरीचे काम असते. एखाद्या व्यक्तीकडे ताम्रपट असला तरी तो दाखवण्यासाठी लोक तयार नसतात. लोक त्याला देवाचा पत्रा असे संबोधतात. त्यावर गुप्तधन लिहिलेले आहे, असा अनेकांचा समज असतो. यास्तव जो हा ताम्रपट प्रथम वाचेल त्याला हे गुप्तधन मिळेल अशीच त्यांना भीती असते. दुसरे म्हणजे सरकार जप्त करेल ही भीती असते. म्हणून ताम्रपट मिळविण्यात नाना प्रकारच्या अडचणी येतात. तरीही अण्णांनी शिलाहार, वाकाटक, चालूक्य, आदिलशाही, निजामशाही आदि राजवंशातील ताम्रपट मिळविले.

ग्रंथसंग्रह आणि वाचनवेड

सुमारे १५०  वर्षांहून अधिक जुनी पुस्तके, संशोधनात्मक दुर्मीळ ग्रंथ, समाजसेवा, नृत्य, नाट्य, चित्रकला आदि विशेष दुर्मीळ ग्रंथ, स्मरणिका, वृत्तपत्रांचे गत १०० वर्षातील दुर्मीळ अंक असा जवळपास २० हजारांवर ग्रंथांचा संग्रह अण्णांच्या ठायी आहे. यात २ ते ५ किलो वजनाची कॉफीटेबल बुक, नाणक शास्त्रावरील सुमारे ५०, मूर्तीकला शास्त्रावरील ५ दुर्मीळ पुस्तके, कोशवाड्‌.मय, आर. के. लक्ष्मण आदि मान्यवरांचे कार्टून बुक्स्‌, एरियल फोटोग्राफी बुक्स्, विविध विनोदी अंक, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवरील सुमारे ५०, पेशव्यांवरील १०, गडकोट किल्ल्यांवरील ५० आणि देशातील विविध म्युझियम संदर्भात माहिती देणारी पुस्तकांचा समावेश आहे. अण्णांना आवर्जून भेटायला येणारे स्नेही, मान्यवर, इतिहासाचे अभ्यासक, साहित्यप्रेमी वाचक, वाचनालये तसेच विविध लग्नादि सोहळ्यातही अण्णा सर्वांनाच ग्रंथभेट अर्पण करीत आले आहेत. भेटी देण्याच्या त्यांच्या या कामातून परिसरात जवळपास १० वाचनालये स्थापन झाली आहेत.

कात्रणसंग्रह

वृत्तपत्रातून येणारे इतिहासविषयक, साहित्यविषयक, कोकणासंबंधी विविध माहितीपूर्ण लेखांची कात्रणे काढून ती त्या-त्या विषयातील अभ्यासकांना, वाचकांना पाठविणे हा सुद्धा अण्णांचा छंद असून अण्णांच्या या वयातही आमच्यासारख्या अनेक अभ्यासकांना याचा लाभ होतो आहे.  महत्त्वाच्या बातम्या अण्णांनी फाईलबंद करून ठेवल्या आहेत. आजही वृद्धापकाळात रोज सकाळी चहा आणि पेपर वाचनानंतरच त्यांचा हा छंदोपक्रम सुरू होतो.

धूम्रपान  साहित्य

देशोदेशींचे विविध माचीसचे ४५० बॉक्स, देखणे आणि तितकेच मौल्यवान १०० लायटर्स, सुमारे १५० सिगरेटची रिकामी पाकिटे हीसुद्धा अण्णांच्या संग्रहाचाच एक भाग आहेत.

काचेच्या बाटल्या

दोन हजाराहून अधिक उत्तमोत्तम सेंट आणि अत्तरच्या बाटल्या, सुमारे ५००  उंची दारूच्या बाटल्या, १ इंचापासून ते ३ फुटांपर्यंतच्या विविधोपयोगी, विविधांगी आकारमान असलेल्या सुमारे ३०० बाटल्यांचा संग्रहही अण्णांच्या संग्रहाचा भाग आहे. यातील बरेचसे साहित्य त्यांनी संग्रहालयाना भेट दिले आहे व तितकेच अजून त्यांच्याकडेही आहे.

पोस्टाची तिकिटे, किचेन्स्‌ आणि मेडल्स्‌

देशविदेशी पोस्टाची तिकिटे, फर्स्ट डे कव्हर्स यांचे सुमारे ५ अल्बम अण्णांच्या संग्रहाने भरलेले आहेत. देशोदेशीच्या सुंदर किचेन्स्‌, मेडल्स्‌चा संग्रह अण्णांच्या ठायी असून पाहाणार्‍यांसाठी हा एक आनंददायी ठेवा आहे.

पंचांग, कॅलेंडर्स, लग्नपत्रिका, निमंत्रण पत्रिका आदि

गेल्या ११० वर्षातील पंचांगाचा संच अण्णांना एके ठिकाणी उपलब्ध झाला होता. त्यांनी तो काही वर्षे आपल्या संग्रहात समाविष्ट करून घेऊन कालांतराने म्युझियमला भेट दिला. सुमारे ५ रूपयांपासून ५०० रूपये पर्यंतच्या किंमतीच्या लग्नपत्रिका, निमंत्रण पत्रिका, कॅलेंडर्स, निमंत्रण पत्रिका अण्णांकडे संग्रही आहेत.

पत्रव्यवहार

गेली ५० हून अधिक वर्षे अण्णा सरासरी रोज स्वहस्ते किमान ५ पत्रे लिहित आले असून आज वयाच्या ८७ व्या वर्षीही त्यांचा हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे. याच्या निम्मी पत्रे अण्णांना विविध माध्यमांकडून सतत येतही असतात. अण्णांचा जनसंपर्क आणि लोकसंग्रह खूपच मोठा आहे.  अण्णा कोकणातील प्राचीन पार्श्वभूमी लाभलेल्या ज्या दाभोळगावी राहातात. तेथील डाकघरात सर्वात जास्त टपाल येणारे आणि जाणारे घर अण्णांचेच आहे असे दाभोळचे पोस्टमास्तर आवर्जून नमूद करतात. अण्णांनी लिहिलेल्या पत्रांची अनेकांकडून आलेली उत्तरेही तितकीच कौतुकास्पद आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. अशी असंख्य पत्रे अण्णांनी संग्रह करून ठेवली आहेत.

विविध प्रकारचे बॉलपेन, पेनसेटचे बॉक्स, बोरू, टाक, ठोकळे, सुंदर कलमदाने, डेस्क आदि जुनी लेखनसाम्रगीही अण्णांच्या संग्रहात होती.

दीपज्योती

घरांमध्ये जुन्याकाळी वापरात असलेल्या ठकू-चिमणी पासून दिवट्या, मशाली, विविध प्रकारच्या समया, हंड्या, झुंबरे, कंदील-फणस, टेबल लॅम्प, लामण दिवे, लॅम्प, सायकल, व्हिक्टोरिया राणीच्या कालखंडातील दिेवेही अण्णांनी जमविले आहेत.

कोकणातील खनिज संपत्ती

कोकणात मिळालेली विविध प्रकारची खनिजे, विविध रंगाचे दगड, स्फटिक, सिलिका, ग्रेनाईट दगड, ऍगेट, विविध प्रकारचे जेम्स अण्णांच्या संग्रहात आहेत.

सागरसंपत्ती

कोकण, केरळ, रामेश्वर, मॉरिशस, अंदमान, ऑस्ट्रेलिया पासून, मेहनतीने जमविलेले शंखशिंपले, कवड्या, प्रवाळ अण्णांचे संग्रही आहेत.

समाजकार्याचे वेड

जिल्हा परिषदेच्या सभापती पदावरून पाय उतार झाल्यानंतर अण्णांनी अवघ्या वर्षभरातच पक्षीय राजकारणातून निवृत्ती स्वीकारत स्वतःला पूर्णवेळ समाजसेवी उपक्रमांमध्ये झोकून दिले. आपल्या कामाला योग्य दिशा मिळावी म्हणून सन १९८३ मध्ये त्यांनी सागरपुत्र विद्या विकास संस्थास्थापन केली. यामुळे परिसरातील दलित, मागासवर्गीय, खारवी, भोई, कोळी आदि मच्छिमार आणि दर्यावर्दी मुलामुलींना एस.एस.सी. पर्यंत शिक्षण घेता आले. मुलांचे वसतिगृह, बालवाड्या, वाचनालये, संगीत क्लास, टाईप रायटींग, शॉर्ट हॅन्ड क्लास, बालभवन, शेती सोसायटी, महिला सोसायटी आदि सुमारे पंचवीसएक उपक्रम असलेली ही संस्था उभी केल्यानंतर त्यांनी शेतकरी मेळावे, महिला मेळावे, फर्स्ट एडचे वर्ग, पोल्ट्री ट्रेनिंग, शिबिरे, संगीत सभा, प्रवचने, व्याख्याने आदि अनेक उपक्रम सातत्याने राबविले, राबवित आहेत. एखादी गोष्ट, अपमान खुंटीला टांगून जीव ओतून चांगलीच करायची हा त्यांचा प्रयत्न नेहमीच कार्यक्रम यशस्वी करण्याकडे नेत राहिला आहे. अपंग संस्था, घरेलु कामगार संघ, दर्यावर्दी कामगार संघ, रस्ता कामगार संघ अशा युनियन अण्णांनी त्यांच्या समाजसेवी जीवनात यशस्वी केल्या.

माणुसकीची भिंत

माणुसकीची भिंत या नावाने चालणारा एक उपक्रम अलीकडे सातत्याने वृत्तपत्रातून चर्चेत असतो. आपल्याला नको असलेल्या कपडे आदि वस्तू या भिंतीजवळ ठेवायच्या आणि ज्यांना त्यांची गरज आहे त्यांनी त्या तेथून पाहून घेऊन जायच्या अशी ही छान कल्पना आहे. या पार्श्वभूमीवर विचार करता गेली ४० वर्षे अण्णा छंद रूपाने ही सेवा करीत आले आहेत. मुंबई-पुण्यातील दानशूर व्यक्तींकडून जुने परंतु वापरावयास योग्य कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून मिळवायचे आणि गरीब गरजू, स्त्री पुरूष, लहान मुलांना वसतिगृहातील मुलांना द्यायचे असे याचे स्वरूप आहे. याद्वारे साड्या, फ्रॉक, शर्ट, पॅन्ट, रग, चादरी, टॉवेल, स्वेटर, कोट, पर्स, दफ्तरे आदि वस्तूंचा अण्णांच्या माध्यमातून हजारो गरिबांना लाभ घेता आला आहे. अण्णांची कनिष्ठ कन्या विभावरी आणि तिच्या सहकारी मावश्या यासाठी अण्णांना मदत करीत. सध्या कमी होत चाललेली गरिबी आणि शारीरिक प्रकृती यांमुळे या छंदाला तूर्त मर्यादा आलेली आहे.

वाचनवेडे अण्णा

स्वतःहून विकत घेतलेली, भेटीतून मोफत मिळालेली अशी भरपूर पुस्तके अण्णांच्या संग्रही आहेत. मुळात अल्पशिक्षित असलेल्या अण्णांना वाचनासारखे, जीवन समृद्ध करणारे वेड लागले हे फार मोठे आश्चर्य आहे. अर्थात, या वाचनाच्या वेडातूनच अण्णांच्या व्यक्तिमत्त्वाने आकार घेतला हे निश्चित आहे. अण्णांच्या ८७ वर्षाच्या प्रदीर्घ जीवन कालखंडातील जवळपास ७५ हून अधिक वर्षे वाचनात गेली आहेत. आदरणीय कै. काकी (अण्णांच्या पत्नी) नेहमी म्हणायच्या, ‘स्नान सोडून इतर सर्व वेळ अगदी झोपतानासुद्धा यांच्या छातीवर पुस्तक हे असणारच!  अण्णांनी आपल्या आयुष्यात हजारो पुस्तके वाचली, संग्रह केला, अभ्यासकांना उपलब्ध करून दिली. आपल्या छंदाना न्याय देत कार्यरत असलेल्या अण्णांना आणीबाणीच्या कालखंडात पोलिसांनी पकडले आणि तुरूंगात टाकले. वाचनाची अमर्याद आवड असलेल्या अण्णांनी सन १९७५ ते ७७ दरम्यानचा आपला तुरूंगवासही सत्कारणी लावला. एरवी आपल्या नेहमीच्या व्यापात अण्णांना मनासारखे वाचन करता येत नव्हते. ती कसर त्यांनी तुरूंगात भरून काढली. याखेरीज मोठमोठ्या नेत्यांचा प्रत्यक्ष सहवास आणि चिंतन सुरूच होते. आयुष्यात कधीही कॉलेज न पाहिलेल्या अण्णांसारख्या अडाणी माणसाला राजबंदी झाल्यानंतर नाशिक आणि येरवडा जेल म्हणजे एक विद्यापीठच वाटले होते. अण्णांनी येरवडा जेलमधील जुनी प्रचंड लायब्ररी या कालखंडात वाचून काढली होती. कर्माला हात लावून दुःख व्यक्त करीत बसण्यापेक्षा तुरूंगातही सतत कार्यरत राहून अण्णा शिकत राहिले, वाचत राहिले, आजही या वयात आजूबाजूला वाचनासाठी काही नसेल तर अण्णा बेचैन होतात, हे आम्हीसुद्धा अनुभवले आहे. पुस्तकांमुळेच विविध मोठे लेखक साहित्यिक आदिंच्या मैत्रीसाठी आणि सहवासासाठी अण्णा सतत प्रयत्नात राहिले. त्यात त्यांना यशही मिळाले. लेखकांच्या सहीने मिळालेल्या भेट पुस्तकांचा एक कोपरा अण्णांजवळ आहे. कवितेची २०० हून अधिक पुस्तके त्यांच्या संग्रही आहेत.

लेखनाचा छंद

आपण वाचलेले, अनुभवलेले, अभ्यासलेले आणि संशोधन केलेले सारे काही समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी अण्णांनी स्वतःला लेखनाच्या छंदातही गुंतविले. गेली ५० वर्षे ते विविध वृत्तपत्रांमधून स्फुटलेखन, प्रसंगानुरूप कविता लेखन करीत आले आहेत. त्याही पुढे जाऊन जवळपास १२ पुस्तके अण्णांनी लिहून प्रकाशित केली आणि कोणत्याही मातब्बर प्रकाशकाच्या मदतीशिवाय खपवलीही ! लिहिलेल्या १२ पुस्तकांमध्ये युरोप, मॉरिशस, इस्त्रायल आणि भारतभर प्रवास करून लिहिलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. अण्णांना लेखक-साहित्यिक म्हणूनही समाजाने गौरविले. कोकण मराठी साहित्य परिषद आणि तिचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्रीमधू मंगेश कर्णिक यांच्याशी अण्णांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राहिलेत. कोकण मराठी साहित्य परिषदेचा आणि कोकण इतिहास परिषदेचा जीवन गौरवपुरस्कारही अण्णांना सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला आहे.

लोकसंग्रह

अण्णांच्या आयुष्यात त्यांचा लोकसंग्रह फार मोठा राहिला आहे. जबरदस्त निष्ठा आणि हातात घेतलेले काम होणारच असा समोरच्यांच्या मनात भरावसा निर्माण करणारी त्यांची कार्यतत्परता यामुळे ख्रिश्चन, मुस्लिम आदिसंह सर्वधर्मीय त्यांचेवर शतप्रतिशत विश्वासून असतात. आणीबाणीच्या कालखंडात राजबंदी असताना अण्णांच्या लोकसंग्रहकारी वृत्तीचा त्यांना खूप उपयोग झाला. नाशिकच्या जेलमध्ये जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी, बापूसाहेब परूळेकर, समाजवादी पक्षाचे राजहंस, प्रधान, वर्दे, बागायतकर, भालेराव, भाई वैद्य, बाबा आढाव, युक्रांदचे डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. अरूण लिमये, कम्युनिष्ठ पक्षाचे कॉ. शांताराम गरूड, प्रा. ठेकेदत्त, खोपकर, नाईक, जमाते इस्लामचे सर्फराज हुसैन, सर्वोदयचे गंगाप्रसाद अग्रवाल, संघाचे  ऍड. बाळासाहेब आपटे, यशवंतराव केळकर, विश्व हिंदूचे अप्पा सोहनी, कॉंग्रेसचे खासदार रतनसिंह राजदा, मोहन धारिया, प्रभाकर गुप्ते, शिक्षणक्षेत्रातील डॉ. केणी, अर्थशास्त्रज्ञ डॉ. वागळे, डॉ. राहूलकर, पंचांगकर्ते दाते अशा अनेकांची सोबत अण्णांना लाभली. मा. बाळासाहेब देवरस यांचे रोजचे दर्शन आणि चारदोनवेळा संवाद साधण्याची संधीही याचवेळी अण्णांना मिळाली. अण्णा बांधकाम सभापती असताना त्यांच्या शासकीय गाडीतून गणपतीपुळे ते मालगूंड असा प्रवास करण्याचा योग एकदा पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांना आला. अगदी पहिल्याच भेटीत, ‘शासकीय गाडीतून एका अशासकीय पाहुण्याला नेण्यामध्ये कोठे कायदेभंग तर होत नाही ना?’ असा प्रश्न मधु मंगेश यांनी विचारल्यानंतर, ‘या रूक्ष वाहनाला आणि माझ्यासारख्या रूक्ष माणसाला साहित्यिकाची संगत लाभत असेल तर असे हजार कायदेभंग मला मान्य आहेतअण्णांच्या या पहिल्या भेटीतील उत्तराने अण्णांचे आणि मधु मंगेश यांचे सख्ख्या भावंडाइतके मैत्र पक्के झाल्याची नोंद खुद्द मधु मंगेश यांनीच अण्णांचे जीवनावरील बखर अपरान्ताच्या प्रवाशाचीया पुस्तकात केली आहे. समोरील व्यक्ती अडचणीत आहे आणि ती आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आहे या निकषावर अण्णा सहकार्याला उभे ठाकायचे. या गुणांमुळे वाढलेल्या लोकसंग्रहाच्या बळावर सुमारे दहा-वीस मानाची पदे अण्णांकडे चालून आली. यात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती पदाचाही समावेश आहे. मात्र राजकारणानंतरची, जवळपास ६० हून अधिक विविध पुरस्कार मिळवून देणारी इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहकम्हणून बहरलेली अण्णांची कारकिर्द सर्वार्थाने लोकसंग्राहक म्हटली जायला हवी.

दाभोळ : अण्णांच्या संग्रहाचे माहेरघर

सन १९४२ ला स्वातंत्र्य समराचे यज्ञकुंड पेटले होते. अण्णा दाभोळ नं. १ शाळेत दाखल झाले. इयत्ता ५ ते ७ वी अण्णा येथेच शिकले. दुसर्‍याच दिवशी शाळेसमोरून सानेगुरूजींची बैलगाडीतून निघालेली मिरवणूक अण्णांनी पाहिली. त्या वयात व्हायचे ते संस्कारही झाले. विसापूरच्या घरी पंतोजी विठ्ठल त्रिंबक भागवत हे शिक्षक अण्णांना शिकवत. पुस्तक एकच होते. इयत्ता वगैरे नव्हती. अण्णांनी मराठी सातवी होऊन शाळा सोडली. दाभोळला सहा महिने आणि गुहागर येथे वर्षभर स्पेशल इंग्लिश कोर्स करून अण्णांचे शिक्षण आटपले. त्यानंतर सन १९५८ च्या दरम्यान ओणी आणि १९६० दरम्यान अण्णांनी विसापूर येथून आपला मुक्काम दाभोळला हलवला. राजकारणाच्या जोडीने पुनम स्टोअर्सया नावाचे औषधांचे दुकान काढून व्यवसायाचा सुमारे २५ वर्षे यशस्वी प्रयत्न केला. परंतु त्यांची ओढ काही वेगळीच होती. ओढीच्या दिशेने अण्णा सतत धावत राहिले. एखाद्या छोट्याशा ओव्हळामधील माशांना नदीचा पत्ता गवसावा तसे काहीसे विसापूरहून दाभोळला आलेल्या अण्णांचे झाले. कारण दाभोळही प्राचीन नगरी दालभ्यपूरीहोती. दाभोळच्या डोंगरावरून दिसणारा बंदराचा नजराणा केवळ अनुपम ! दाभोळ धक्क्यावरील आदिलशहाच्या बिबिची अर्थात मॉं साहेबांची मशीद, अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला, तांबड्या रंगाच्या मंगलोरी कवलांची घरं, खाडीपासून समुद्रापर्यंत पसरलेले माडांचे बन हा सारा नजराणा आणि त्यातच दाभोळ बंदरातून पैलतीरी वेलदूरला जाणारे मचवे, लॉंचेस होड्या आणि डुगडुग्या या सार्‍यांचे मिळून नजरेत सामावणारे चित्र पाहाण्याचा योग दाभोळच्या त्या डोंगरावर जुळायचा. या वातावरणात अण्णांच्या संशोधन आणि संग्राहक वृत्तीला जबरदस्त खतपाणी मिळाले. दाभोळच्या खाडीला येऊन मिळालेल्या वाशिष्ठीच्या दोनही तीरावरील सांस्कृतिक, सार्वजनिक आयुष्यात हात स्वच्छ ठेवून अण्णा आयुष्यभर वावरले.

या सार्‍यांशिवायही गेली ७५ हून अधिक वर्षे अण्णा दैनंदिन डायरी लेखन करीत आहेत. याशिवाय आयुष्यातील कार्यतत्पर कालखंडात अण्णांनी नाटक, सिनेमा आणि तमाशा पाहाण्याचा छंदही जोपासला होता.  बेताची आर्थिक परिस्थिती असूनही अण्णांनी आपल्या आयुष्यात एवढे सारे छंद जोपासले, अपरान्ताच्या साधनांसाठी ५० हून अधिक वर्षे डहाणूपासून कारवारपर्यंत धावपळ केली, दुर्मीळ वस्तूंचा संग्रह केला. अक्षरशः कणकण करून अण्णांनी हे सारे मणभर गोळा केले. वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन, वागण्यातील वक्तशीरपणा हे अण्णांच्या कार्यपद्धतीतील आवर्जून दखल घेण्याजोगे गुण आहेत. सज्जनहो, ‘छंदी व्हा!हा विषय घेऊन लायन आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध शाळा, महाविद्यालयातून अण्णा महाराष्ट्रभर फिरले, जवळपास ४०० हून अधिक व्याख्याने त्यांनी या दरम्यान दिली. ज्यातून असंख्य अभ्यासकांनी प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्याला छंदांची सुगंधी किनार प्राप्त करून दिली. छंदीफंदीदिनचर्येपासून कोसो दूर राहात अनेक अभ्यासकांच्या जीवनात आनंद वाटण्याचे काम आपल्या छांदग्योपनिषदांद्वारे अण्णांना सहज साधता आले.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८                                                                               
पुस्तक हवे असल्यास संपर्क :
श्री. अंबरीश उर्फ दादा खातू मो. ९६२३८५८५८५ ! श्री. अण्णासाहेब शिरगावकर मो. ९५७५१६६८६५

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...