आजकाल दुर्मीळ झालेल्या नैतिकतेचा, बर्यावाईटाचा विचार करणारा, काटेकोर, पापभीरू, अत्यंत आस्थेवाईक गुरुजी अशी विलास दत्ताराम महाडिक (गुरुजी) यांच्याविषयी मागील १८-२० वर्षांतील सहसंबंधातून आमची धारणा बनलेली आहे. संभ्रमाच्या वर्तमानात कोणीही कधीही स्वच्छ मनाने साद घालावी नि अवांतर काहीही न सांगता महाडिक गुरुजींनी साथ द्यावी. गुरुजींचं हे वागणं त्यांना जवळून ओळखणाऱ्या आणि अनुभवणाऱ्या अनेकांना अंगवळणी पडलेलं आहे. ‘विश्वास’ शब्दाचा अर्थ समजावून सांगणारी फारच कमी माणसं दुनियेत शिल्लक असताना जगण्याची आस्थेवाईक समज असेलेले महाडिक गुरुजी सामाजिक आशेचे बलस्थान आहेत. सेवानिवृत्ती निमित्त गुरुजींचा आज जाहीर सत्कार होतोय. त्यांची निवृत्ती शासकीय सेवेतील असून भविष्यात ती कृतिशील पर्यावरण जनजागरणासह सकस समाज निर्मितीच्या विविध विषयांत झोकून देऊन कार्यरत होणारी ठरावी अशा आमच्या शुभेच्छा आहेत.
निवृत्त ‘ग्रामसेवक’ वडिल दत्तात्रय (आबा) आणि आई सौ. सुषमा या उभयतांचे सामाजिक भान, संयमित जीवन जगण्याची पद्धती, कुणाला फारसं न दुखावता कुटुंबाला एकत्र ठेवण्याची हातोटी गुरुजींनी जशीच्यातशी उचलली आहे. सदा हसतमुख चेहरा, समोरच्याचे पूर्ण ऐकून घेण्याची क्षमता, एखादी गोष्ट पटली नाही तरीही घाईघाईने व्यक्त न होण्याची सवय, सर्वांशी सहज जुळवून घेण्याची हातोटी या गुणांचे धनी असलेले महाडिक गुरुजी हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य उपाध्यक्ष आहेत.
५ एप्रिल १९६६ रोजी निवळी (चिपळूण) गावी महाडिक गुरुजींचा जन्म झाला. संत गाडगेबाबांच्या विचारांचे पाईक, ग्रामसेवक वडील दत्ताराम आणि आई सौ. सुषमा यांच्या मायेच्या सावलीत चिपळूण तालुक्यातील निवळी गावात त्यांचे नि छोटी बहिण स्मिता आणि भाऊ विकास यांचे बालपण गेले. गुरुजींच्या बालपणी, एकत्र कुटुंब पद्धतीतील घरची आर्थिक स्थिती मध्यम होती. त्यांचे बालपण आनंदात गेले. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा घराजवळ होती. पुढील हायस्कूल शिक्षणासाठी त्यांना तुरंबव गावाची आठ किमीची दैनंदिन पायपीट करावी लागली. दहावीनंतर पुन्हा पुढील शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. कॉलेजची सोय सावर्डे आणि चिपळूणला होती. वडीलांच्या सुचनेनुसार गुरुजींनी कॉमर्सचा पर्याय निवडला. गावातून चिपळूणला डी.बी.जे.तील कॉमर्स कॉलेजच्या वर्गांच्या वेळेनुसार जाणाऱ्या एस्.टी. बसेस उपलब्ध होत्या. दैनंदिन प्रवासासाठी लागणाऱ्या एस्.टी.च्या पासचे पैसे मिळवण्यासाठी गुरुजींनी चिपळूणला काही हॉटेलात घरातील अतिरिक्त दूध दैनंदिन पोहोचवण्याचे काम सुरु केले. यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान सावडर्याला सहयाद्री शिक्षण संस्थेने डी.एड्. कॉलेज सुरु केले होते. सावर्डे ते निवळी अंतर आठ किमी होते. आर्थिक अडचणींमुळे हॉस्टेलमध्ये राहाणे अशक्य होते. वडिलांनी गुरुजींना सायकल घेऊन दिली. रोजच्या १६ किमी. सायकल प्रवासासह गुरुजींचे डी.एड. शिक्षण सुरु झाले. या प्रवासाने त्यांना खूप थकून जायला व्हायचं. पहाटे लवकर उठून आई डबा करून द्यायची. आईनं कितीही देऊ केलं तरीही सायकलचा प्रवास आणि दिवसभराच्या कॉलेजसाठी तो अपुरा पडायचा, पण इलाज नव्हता. गुरुजींनी जिद्दीनं जुलै १९८६मध्ये डी.एड. पूर्ण केलं. त्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात खेड तालुक्यातील जि. प. शाळा शिंगरी येथून प्राथमिक शिक्षक म्हणून शिक्षकी पेशास प्रारंभ केला.
शिंगरीतील नोकरीच्या सुरुवातीच्या पहिल्या स्वतंत्र जगण्यात निवळीहून निघताना गुरुजींनी आईकडून भात बनवण्याची पद्धत विचारून लिहून घेतली होती. पण प्रत्यक्ष कृती करताना भात ढवळावा लागतो हे कृतीत न लिहिल्याने लक्षात आलं नाही आणि भातातील पाणी आटलं. भात कच्चा राहिला, थोडासा करपलाहि ! सुरुवातीच्या टप्प्यावर हा अनुभव आलेल्या गुरुजींनी जीवनात यथावकाश उत्तम शिक्षक म्हणून नावलौकिक तर मिळवलाच पण कृषी पर्यटन आणि त्या अनुषंगाने केटरिंग सर्व्हिसमध्येही स्वतःला सिद्ध केलं. तर, शिंगरीतील जेवणाचे हाल बघून वडिल आबांनी गुरुजींची बदली चिपळूणला व्हावी म्हणून धडपड सुरु केली. त्याला यश आलं. गुरुजींची पेढे पाणकरवाडीत (३१ डिसेंबर १९८६ - १३ सप्टेंबर १९९५) बदली झाली. ‘मुख्याध्यापक’ मोरेश्वर महादेव परांजपे गुरुजींसारखे मार्गदर्शक-गुरु लाभले. परांजपे गुरुजींनी महाडिक गुरुजींना स्वतःच्या मुलासारखे प्रेम देऊन सांभाळले. ‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. समाजासाठी आपण काम केले पाहिजे.’ ही शिकवण त्यांना परांजपे गुरुजींनी स्वतःच्या कृतीतून दिली. इथल्या प्रदीर्घ सेवेनंतर गोवळकोट मराठी (१४ सप्टेंबर १९९५ – १३ सप्टेंबर १९९६), उक्ताड (१४ सप्टेंबर १९९६ – ३० नोव्हेंबर २०००), गुहागर तालुक्यातील मासू, (१ डिसेंबर २००० – २३ जुलै २००२) आणि पुन्हा जिल्हा परिषद शाळा उक्ताड येथे २४ जुलै २००२ ते ६ डिसेंबर २०२३ पर्यंत गुरुजींनी काम केले. डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ निवृत्तिअखेर ते चिपळूण तालुक्यातील खेण्ड आणि शिरळ या दोन केंद्रांचे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत राहिले. दरम्यान, महाडिक यांनी जुलै १९९२मध्ये बी.ए. तर २००१साली बी.एड. हे व्यावसायिक पदवी शिक्षण पूर्ण केले होते.
महाडिक गुरुजींचे वडिल दत्ताराम‘आबा’ हे सरकारी कर्मचारी असल्याने घरात सतत सुरु असलेल्या गावातील सामाजिक कार्याच्या चर्चांचा आणि लोकांच्या सततच्या ‘ये-जा’चा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम झाला होता. त्या पायावर गुरुजींनी केलेल्या शैक्षणिक, ग्रंथचळवळ, सामाजिक आणि पर्यावरणीय कामाच्या वर्तमान वाटचालीत पत्नी सौ. नूतन यांचा सिंहाचा वाटा असल्याचे ते नमूद करतात. घरची संपूर्ण जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळल्याने ते काम करता आल्याची त्यांना जाणीव आहे. गुरुजींचे पूर्वज निवळीतील तीन गावाच्या देवस्थानचे मानकरी होते. ग्रामदेवतांचे कपडे धुण्याचा मान परंपरेने त्यांच्या कुटुंबीयांकडे असलेला. पूर्वजांनी गावात शेती सांभाळली. आजोबा मुके होते. त्यांना पाच मुलगे आणि तीन मुली. आर्थिक परिस्थिती हालाखीची. आजोबा हे पंचक्रोशीत ‘वैदू’ म्हणूनही प्रसिद्ध होते. मात्र मुके असल्याने त्यांना जवळचे ज्ञान कोणाला देता आले नाही.
आपले सामाजिक भान उत्तम राखताना महाडिक गुरुजींनी विविध सामाजिक चळवळीतही सक्रीय सहभाग नोंदवला आहे. शिक्षण विभागातर्फे ‘सर्वधर्मसमभाव’ संकल्पनेवर आधारित त्यांनी सादर केलेल्या मुकनाट्य या सांस्कृतिक कार्यक्रमाला जिल्हास्तरीय केंद्रप्रमुख संमेलन, विभागीय स्तर आणि राज्यस्तरावर क्रमांक मिळाला होता. २००२मध्ये त्यांनी शहरात जुनी नाणी, नोटा आणि ३६० देशातील विविध तिकीटांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात सक्रीय सहभाग घेतला. शहरातील हजारो लोकांनी हे प्रदर्शन पाहिले. आवड असत्यामुळे गुरुजींनी आपल्या घराजवळ नारळ, सुपारी, आंबा, काजू, फणस, शेवगा तसेच फुलझाडे गुलाब, जास्वंद, जाई, जुई, मोगरा, लिली, कृष्णकमळ, ब्रह्मकमळ, विविध तळ्यातील कमळे, बेल, शमी आणि विविध ‘शो’च्या झाडांची लागवड केली. किराणा दुकानासह रोपांची नर्सरी उभारली. यातूनच पुढे त्यांनी घराला कृषी पर्यटनाचा साज चढवला. त्यांचे घर आणि बगीचा तालुक्यातील पहिले अधिकृत कृषी पर्यटन केंद्र ठरले. बालपणीची छायाचित्रणाची आवड त्यांनी जाणीवपूर्वक व्यवसायात बदलली. हाही व्यवसाय त्यांनी इतक्या तत्परतेने केला की दैनिक तरुण भारतने आपल्या ‘ध्यास’ छायाचित्र प्रदर्शनात जिह्यातील मान्यवर छायाचित्रकारांत त्यांच्या निसर्ग चित्रांची निवड केली होती. कोणतेही काम अगदी मनापासून करण्याची त्यांची सवय जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्यांच्या पदरात काही सकस देऊन जात राहिली आहे.
महाडीक
गुरुजी हे आपल्या पर्यावरणीय जनजागरणाच्या कामामुळे महाराष्ट्रातील एक उपक्रमशील
पदवीधर प्राथमिक शिक्षक-मुख्याध्यापक-केंद्रप्रमुख म्हणून परिचित राहिले आहेत.
गुरुजींनी सुरुवातीच्या काळापासून पर्यावरण विषयाची आवड जोपासली होती. शेतीविषयक
ज्ञानजागरण, वृक्ष लागवड व संवर्धन याविषयी मार्गदर्शन, परिसरातील स्थानिक वृक्ष
प्रजातींच्या बीयांचे संकलन, शाळेच्या आणि १९९८ पासून घराच्या रोपवाटीकेत रोपांची
निर्मिती करून शाळेतील विदयार्थी व समाजामार्फत, विविध संस्था-मंडळांमार्फत
वृक्षदिंडी, वृक्षारोपण,
जागतिक
पर्यावरण दिन, कृषिदिन,
पर्यटनदिनी महिलामंडळे, तरुणमंडळे,
तंटामुक्ती
कमिटी, शिक्षक संघटना
आदींच्या सहकार्याने रस्त्यांच्या कडेला व ओसाड डोंगरावर रोपण, रोपांचे वितरण,
२००५, २०२१ मध्ये चिपळूणला आलेल्या महापूरप्रसंगी मजरेकाशीसह विविध ठिकाणच्या
पूरग्रस्त ग्रामस्थांचे स्थलांतर,
विविध शाळकरी मुलांना वह्या, दप्तरे, पुस्तके, कपडे आणि धान्यवाटप केले होते.
महिला मंडळांकडून हळद लागवड, भाजीपाला
लागवड करून त्यापासून चांगले उत्पन्न मिळते, हे पटवून दिले. निसर्गातील विविध
घटकांचे छायाचित्र प्रदर्शन भरवून स्थानिक लोक व विदयार्थ्यांमध्ये पर्यावरणाची
आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन चिपळूण पंचायत
समितीने आपल्या मासिक सभेत अभिनंदनाचा ठराव केला होता. विदयार्थ्यांमध्ये पर्यावरण
जागृती व्हावी यासाठी सातत्याने वनभोजन आणि पर्यावरण सहलींचे आपल्या कार्यकाळात गुरुजींनी
आयोजन केले. शाळेतील विद्यार्थांना पर्यावरणीय अनुभूती प्राप्त करून देण्यासाठी
आवश्यक समयोचित पर्यावरण ज्ञान आपल्याजवळ सक्षमतेने असायला हवं यासाठी त्यांनी
महाराष्ट्रातील राज्यव्यापी पर्यावरणीय उपक्रमांची वाट धरली.
शिक्षकी
पेशात कार्यरत राहताना, शाळेशी
होणारा प्रत्येक पत्रव्यवहार जबाबदारीने हाताळणाऱ्या गुरुजींना एका
पत्रव्यवहारातून ‘वृक्षमित्र’
आबासाहेब
मोरे भेटले. २००० साली ते ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांच्या संपर्कात आले.
आबासाहेब मोरे हे ‘पद्मभूषण’ अण्णासाहेब हजारे यांच्या विचारकार्याने प्रभावित
राज्यात पर्यावरण संवर्धन जनजागरणाचे काम करत होते. त्यांच्यासोबत गुरुजींच्या
पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृतीच्या कामाला अधिक गती मिळाली. इतकी की, महाडिक
गुरुजींसारखा उमदा सक्रीय सहकारी भेटल्यावर आबासाहेबांनी त्यांच्यावर निसर्ग व
सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.
महाडिक गुरुजी अधिक क्षमतेने कार्यरत झाले. पावसाळ्यात शालेय मुलांकडून
रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड ,डोंगरभागात
बीज पेरणी उपक्रम, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने
जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय पर्यावरण विषयक निबंध आणि रंगभरण स्पर्धेचे आयोजन,
बक्षिस वितरणाच्या मुख्य कार्यक्रमाचे चिपळूण येथे आयोजनात सक्रीय भूमिका बजावली
होती. राज्यभरातील पर्यावरण या विषयात काम करणारे शिक्षक,
पर्यावरणप्रेमी
कार्यकर्ते यांना वेगळा दृष्टीकोन मिळावा म्हणून राळेगणसिद्धीसह विविध ठिकाणी
मंडळाची आजवर आठ पर्यावरण संमेलने यशस्वी होण्यात महाडिक गुरुजींचे योगदान आहे.
चिपळूणच्या या पदवीधर प्राथमिक शिक्षकाने राळेगणसिद्धीच्या मातीसह सर्वदूर संपन्न
झालेल्या सात पर्यावरण संमेलनांत दिलेले योगदान त्यांच्या सहकारी शिक्षकांनी
त्या-त्या ठिकाणी स्वतः येऊन अनुभवले आहे,
त्याला
दादही दिलेली आहे.
त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे 'वणवामुक्त ग्राम अभियान' राबवण्यासाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर केला. चिपळूण येथे २०१३ साली संपन्न झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पर्यावरण विभाग व पर्यावरण दिंडीच्या कामात सहभाग घेतला. ‘वनश्री’ या पर्यावरण विशेषांकाचे संपादक म्हणून काम पाहिले. ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या मंडळाचे, राज्यातील दुसरे ‘बिगरमोसमी जंगलपेर अभियान’ चिपळूणला संपन्न झाले. त्या कार्यक्रमात चंदनतज्ज्ञ ‘वनश्री’ महेंद्र घागरे भेटले नि ‘रत्नागिरी जिल्ह्यात चंदनाचा सुगंध दरवळावा’ म्हणून आम्ही दोघांनी अभियान सुरु केले. ते ५/६ वर्षे चालवले. गुरुजी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून, जिल्हाध्यक्ष विजयराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शालेयस्तरावर ७५ लाख बीज पेरणी अभियान संपन्न झाले. आजही कोकणातील वेगवेगळ्या गावातील देवराया, नदीकिनारे, रस्त्याच्या दुतर्फा, पर्यटनस्थळी, स्मशानभूमी परिसरात आमचे वृक्षारोपण-संवर्धन उपक्रम सुरु असतात.
गुरुजींनी
शिक्षकी पेशाच्या सुरुवातीच्या दीडेक दशकात, स्थानिक वर्तमानपत्रे, स्मरणिका आणि
मासिकातून शिक्षण, पर्यावरण विषयावर विपुल लेखन केले. ग्रंथचळवळ वाढावी, समाजातील
चांगल्या लेखकांना पुस्तकरूपी व्यासपीठ उपलब्द्ध व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न
केले. कार्यक्षम अर्धांगिनी, सौ
नूतन वहिनींच्या सहकार्याने त्यांनी २००७साली चिपळूण तालुक्यातील पहिले निसर्ग
पर्यटन केंद्र सुरु केले. पर्यटन विषयात चिपळूणात कार्यरत असणाऱ्या रामशेठ रेडीज,
प्रसाद
काणे, कैसर देसाई,
मिलिंद
कापडी, समीर कोवळे, धीरज वाटेकर आदींचे सहकार्य त्यांना लाभले होते. आपल्या
राहात्या घराला नुसते ‘कृषी पर्यटन केंद्र’ करून भागणार नाही हे लक्षात येताच
पर्यटन केंद्र सर्वदूर पोहोचवण्यासाठी गुरुजींनी २००८ साली,
आमच्या
मनातील ‘चिपळूण तालुका
पर्यटन’ पुस्तकाची
कल्पना उचलून धरली. आमच्यासह सहकारी मित्र समीर कोवळे याच्या लेखनाला पहिले
पुस्तकीय कोंदण प्राप्त करून देण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे. पत्नी
सौ. नूतन यांच्या सहकार्याने सुरु केलेल्या चिपळूण तालुक्यातील पहिल्या श्री
परशुराम सान्निध्य निसर्ग पर्यटन केंद्रातर्फे धीरज वाटेकर आणि समीर कोवळे
यांच्याकडून ‘चिपळूण तालुका पर्यटन’ हे पर्यटनाची इत्यंभूत माहिती असलेले पुस्तक
लिहून घेतले आणि प्रकाशित केले. विशेष म्हणजे या पुस्तकाच्या आजवर जवळपास तीन हजार
प्रती वितरीत झाल्यात. नामवंत इतिहास संशोधक स्वर्गीय निनादराव बेडेकर,
कोकणचे
बुद्धिवैभव स्वर्गीय नानासाहेब जोशी, ज्येष्ठ
साहित्यिक आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रकाश देशपांडे,
नामवंत
लेखक प्र. के. घाणेकर, इतिहास
संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णासाहेब शिरगावकर,
प्रख्यात
इतिहास संशोधक स्व. श. गो. धोपाटे यांसारख्या नामवंतांचे मिळालेले आशीर्वाद त्या
पुस्तकाचा वेगळेपणा सांगण्यास पुरेसे आहेत.
२०१४-१५ साली पर्यावरण-पर्यटन विषयातील गुरुजींच्या अभ्यासू मनाने उचल खाल्ली. संधी मिळाली. नि आमचे त्यांच्या सहकार्याने ‘ठोसेघर पर्यटन’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी आम्ही दोघे जवळपास दीड वर्षे चिपळूण-सातारा-सज्जनगड-ठोसेघर असा निसर्गरम्य प्रवास करत होतो. या प्रवासातील अनुभव हा स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे. गुरुजींमधील निखळ आयुष्य जगणारा अवलिया म्हणजे ‘आयुष्य जगलेला गुरुजी’ आम्हाला खऱ्या अर्थाने तेव्हा पहिल्यांदा भेटला. पुढे या पुस्तकाला कोल्हापूरच्या चंद्रकुमार नलगे ग्रंथ पुरस्काराने गौरविण्यात आले. लेखन चळवळ वाढावी म्हणून ते सतत कार्यरत असतात. आमच्या सोबत अनेक विशेषांकांचे संपादन करण्यात त्यांचे योगदान आहे. आपले गुरु ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ मो. म. परांजपे गुरुजी यांची जीवनकथा प्रकाशित व्हावी म्हणून त्यांनी घेतलेले परिश्रम सर्वश्रुत आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दैनिक सागरचे संस्थापक-संपादक स्वर्गीय नानांनी, विलासरावांच्या ‘गुरुदक्षिणा’ या लेखनाबाबत म्हटले होते, ‘गुरुदक्षिणा या कृतज्ञ अक्षरपूजेत गुरुजी श्री. विलास महाडिक यांनी कर्मयोगी परांजपे गुरुजींबद्दल जे उत्कटतेने लिहिले आहे ते मनोगत सध्याच्या तरुणांनी व विशेषतः शिक्षकांनी मन:पूर्वक वाचले तर प्राथमिक शिक्षक आपल्या अत्यंत मर्यादित कार्यक्षेत्रात किती अमर्याद काम करू शकतो हे लक्षात येईल.’ अधिक काय लिहावे? कोकणचे नामवंत इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णा शिरगावकर (व्रतस्थ, शेवचिवडा, सिंहावलोकन, गेट वे ऑफ दाभोळ) आणि कोकण पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांची ८-१० पुस्तके त्यांनी आजवर प्रकाशित व वितरीत केली. महाडिक गुरुजी यांनी आपले वडिल दत्ताराम(आबा) महाडीक यांची जीवनकथा ‘ग्रामसेवक ते समाजसेवक’, शिक्षकी पेशातील ‘गुरु’ मोरेश्वर महादेव परांजपे यांची जीवनकथा ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ या नावाने लेखक धीरज वाटेकर यांच्याकडून लिहून घेतली. आम्ही लिहिलेले, कोकणातील पहिल्या ‘मेडिकल सोशल वर्कर’ कमल श्रीकांत भावे यांचे ‘कृतार्थिनी’ चरित्र प्रकाशित केले.
गुरुजींनी
आपल्या अंगभूत कलात्मक गुणांच्या बळावर प्राथमिक शिक्षकी पेशाला आकार दिला. प्रतिकूल
परिस्थितीतून जीवनाचा मार्ग शोधला. आज त्यांच्या मित्र परिवाराला त्यांच्याबद्दल
वाटणारा जिव्हाळा याचेच द्योतक आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेत प्राथमिक शिक्षण
घेण्याची प्रक्रिया आज मंदावलेली जाणवते. पण तत्पूर्वीच्या दशकभराच्या कालावधीत गुरुजींनी
आपल्या शालेयस्तरावरील जबाबदारीला सर्वस्व झोकून देत न्याय देण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थ्यांना चार भिंतींच्या बाहेर जाऊन शिक्षण देण्याची त्यांची पद्धत
अनुकरणीय आहे. प्रसंगी पदरचं खर्चून, आपल्या
विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पना समजाव्यात म्हणून ते सतत आघाडीवर राहिले. त्यांनी
जिथे जिथे काम केलं तिथे तिथे आजही त्यांच्याविषयी जे बोललं जातं ते याची साक्ष
देण्यास पुरेसं आहे. ज्यांनी आजवर कधीही विशेष म्हणावा असा प्रवास केलेला नसेल अशा
उपेक्षित-वंचित घटकातील मुलांना आपल्यासह मोजक्या सामजिक योगदानातून सातत्याने
निसर्गात घेऊन जाणारा, चिपळूणातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक भुस्कुटे
यांच्या सहकार्याने राज्याची राजधानी मुंबईचे शालेय विद्यार्थ्यांना बालवयात दर्शन
घडविणारा अवलिया म्हणजे विलास महाडिक गुरुजी! मोलमजुरी निमित्ताने कोकणात आलेल्या
बहुभाषिक पालकांच्या शाळाबाह्य लेकरांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत शाळेची गोडी
लागावी या उद्देशाने सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणारे गुरुजी म्हणूनही महाडिक
गुरुजी विद्यार्थीप्रिय आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी कार्यानुभव,
कला,
मनोरंजक
खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला,
कौशल्य
आणि कलेला वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात वारली कला,
अक्षरलेखन,
भेटकार्ड,
मातीकाम,
रंगकाम,
खाद्ययात्रा
भरविणे, उन्हाळी छंद
शिबिर, प्लास्टीकचा पुनर्वापर करून रोपकुंड्या,
टाकाऊ
पुठ्ठ्यांपासून साहित्यनिर्मिती केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचे
प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. अनेकदा सुट्टीच्या दिवशी रविवारी महाडिक गुरुजी
आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याच चारचाकीमधून कुठेनाकुठे घेऊन जात असताना आम्ही
पाहिलेत. यात विविध स्पर्धांपासून मनोरंजनाच्या सकस उपक्रमांचा समावेश आहे.
गुरुजींनी १९८९ ते १९९१ या तीन वर्षांत सलग तालुका व जिल्हा विज्ञान प्रदर्शनात आपल्या शाळेला प्रथम क्रमांक मिळवून दिला. शिक्षकांसाठीच्या शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात १९९०-९१, १९९६-९७-९८या तीन वर्षांत प्रथम क्रमांक पटकाविला. साक्षरता आंदोलनामध्ये ते मास्टर ट्रेनर, एस.एस.सी. परीक्षेसाठी सहाय्यक उपपरीक्षक म्हणून कार्यरत होते. महाडीक गुरुजी यांनी आपल्या कार्यरत शाळांच्या शैक्षणिक सोईसुविधासाठी खूप प्रयत्न केले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सलग तीन वर्षे त्यांना गोपनीय 'अतिउत्कृष्ट' शेरा देऊन गौरविण्यात आले होते. याखेरीज स्मार्ट पी.टी. प्रशिक्षणातील मूकअभिनय, पल्स पोलिओ, साक्षरता अभियान, कुटुंब कल्याण आदी कामासाठी शासनाने गौरविले. शाळेच्या चार भिंतीच्या बाहेर जात आपल्यातील क्रयशक्तीला अधिकचे सकस काहीतरी हवे आहे, याची जाणीव झालेल्या गुरुजींनी शिक्षणासोबतच आवडत्या सामाजिक, पर्यावरण आणि पर्यटन या क्षेत्रात काम केले. ‘जे जे सत्य नि चांगलं, ते ते सारं आपलं’ या न्यायाने, त्यांनी अनेकविध समाजाभिमुख उपक्रमांना आपलसं केल्याचं अनेकांनी पाहिलं आहे. शैक्षणिक कार्यकाळात त्यांची एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात अचानक बदली झाली होती. यामुळे त्यांना मनस्ताप, आर्थिक तोटा, रोजचा ११० कि.मी. दुचाकी प्रवास आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. पण शांत वृतीने त्यांनी यावर मात केली. अनेक ‘ज्येष्ठ’ शिक्षक रांगेत उभे असताना वयाच्या ३५व्या वर्षी त्यांची जि. प.च्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तालुक्यातून एकमेव निवड झाली होती. आपल्या सातत्यपूर्ण उपक्रमशील शिक्षकी वर्तनातून शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारही निवृत्तीपूर्वी सतरा वर्षे अगोदर मिळवून महाडिक गुरुजींनी जिल्हास्तरावरील पुरस्कार पटकावतानाचा शिरस्ता कायम ठेवला होता.
गुरुजींना महाराष्ट्र शासनाने जिल्हा व राज्यस्तरीय (२००६-०७) आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्याचप्रमाणे त्यांना आजवर आदर्श शिक्षक (नगरपरिषद, लायन्स क्लब व रोटरॅक्त क्लब चिपळूण), पर्यावरण मित्र (श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषि सेवा ट्रस्ट अहमदनगर), कलागौरव (मयूर आर्ट अकादमी परळी वैजनाथ), कलाश्री (कलांजली कला महोत्सव), पर्यावरण रक्षक (पर्यावरण व सामाजिक प्रदूषण निवारण महामंडळ), राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप (अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ), भाषारत्न (राष्ट्रभाषा हिंदी प्रचार परिषद सिंधुदुर्ग), राष्ट्रचेतना गौरवमूर्ती (राष्ट्रचेतना पब्लिकेशन जळगाव), अखिल भारतीय प्रतिभा सन्मान, पर्यावरण भूषण (ग्रामीण मानव विकास प्रतिष्ठान व माय अर्थ फाउंडेशन), उपक्रमशील कलाध्यापक (सानेगुरुजी प्रबोधिनी चिपळूण), श्री गणेश गौरव (सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूण) आदी पन्नासेक राज्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
निवृत्ती
आली की आयुष्याची संध्याकाळ आली असं म्हटलं जातं. मात्र ‘न्यू
इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ या
वैद्यकीय नियतकालिकाच्या मे २०२३च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार
आपण ज्या क्षेत्रात आहोत तिथे सर्वाधिक उत्तम कार्यक्षमतेचा काळ हा साठी आणि
सत्तरीत असतो असे नोंदवण्यात आले आहे. मनुष्यात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक
कार्यक्षमता वयाच्या ७० ते ८० या दशकादरम्यान असते. ५० ते ६०च्या दशकाचा क्रमांक
त्यानंतर लागतो असे नमूद आहे. निवृत्तीची अट नसलेल्या वकिली,
लेखन,
लेखपाल
अशा क्षेत्रांत कित्येक लोक ऐंशीव्या वर्षी सक्रिय व कामातली गुणवत्ता टिकवून
आहेत. सतत कार्यमग्न राहणे हाच यशस्वी जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आमचे
आणि महाडिक गुरुजींचे ‘मार्गदर्शक’ प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू
संग्राहक स्व. अण्णा शिरगावकर हेही वयाच्या ९३व्या वर्षी आगामी ग्रंथलेखनासाठीच्या
संदर्भांची जुळवाजुळव करत असलेले आम्ही पाहिलेत. प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल बदल
घडवून आणणे, समाजातील सर्व घटकांना जमेल तेवढी मदत करणे,
गरजूंना
सहकार्य करणे, आपल्यासोबतच्या सहकाऱ्यांना आपल्यासोबत पुढे घेऊन जाण्याची कला,
कोणाला विशेष विरोध न करणे, निसर्गाची आवड,
झाडांची
जोपासना, परसबाग,
फोटोग्राफी,
संग्राहकवृत्ती,
संगीताची
आवड, दुर्मीळ आणि औषधी
वनस्पतींची लागवड, शांत व नम्र स्वभावामुळे महाडिक गुरुजी सर्वदूर पोहोचले. संकटात
सापडलेल्यांना शक्यति मदत, सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभाग, टाकावूतून टिकावू
वस्तू बनविण्याचे कौशल्य, शोधकवृत्ती, समानता, स्वच्छता, टापटीप यांमुळे गुरुजींचे
व्यक्तिमत्त्व अनेकांत उठून दिसते.
स्वच्छंदी जीवन जगणारे महाडिक गुरुजी गेली दोन दशके आम्ही पाहातोय. ‘आयुष्य हे माणसाला मिळालेले एक वरदान आहे. त्याचा यथार्थ उपयोग करून घेता आला पाहिजे. आयुष्यात मी हे पाहिले नाही. मला हे माहिती नाही असे होता कामा नये. सर्व गोष्टींचा मर्यादित आनंद लुटता आला पाहिजे. सगळ्याच गोष्टीत यश नाही मिळाले तरी चालेल पण खचून न जाता प्रयत्नवाद जीवंत ठेवला पाहिजे. जीवनात सुख-दुःख, यश, अपयश या सर्वांना समर्थपणे सामोरे जाण्याची तयारी असली पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीत इप्सित साध्य करण्यासाठी अत्यंत कष्टाने व नेटाने आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती, ताकद आपल्यात असली पाहिजे.’ ही विलास महाडिक गुरुजींची जगण्याची भूमिका सर्वस्पर्शी आहे. प्रत्यक्ष मेहनतीतून, श्रमातून, ध्यासातून यशाचं फूल उमलतं. या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवल्याने आपण इथवर मजल मारू शकल्याचे गुरुजींना वाटते. ‘आपल्या यशाची बलस्थाने सांगताना ते तीर्थरूप आई-वडिल, आदरणीय गुरुवर्य महादेव मोरेश्वर परांजपे (गुरुजी), शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात वावरताना लाभलेले सहकारी मित्र, मार्गदर्शक अधिकारीवर्ग आणि कुटुंबीयांप्रति कृतज्ञता व्यक्त करतात’ जे त्यांच्यातील माणूसपण दर्शवणारे आहे. गुरुजींची आजची ‘सेवानिवृत्ती’ आगामी विविधांगी आणि ठोस सामाजिक कामासाठी पूरक ठरो, या शुभेच्छा !
धीरज वाटेकर चिपळूण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा