सत्यसेवेचे कंकण बांधून, ‘हरि कृष्ण भक्ते तुला स्थापियेले | करि
सत्य सेवा जना रंजविले ||
किती अन्य आले बहुश्रूत झाले | परि
सर्व तुझ्याच ठायी रिझाले ||’ हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून लिमये यांनी ‘सत्यशोधक’ साप्ताहिकाचा
पाया घातला होता. तर महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज म्हणजे सत्याचा शोध घेणारा
समाज होय. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे
सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य होते. महात्मा फुले यांनी सुरुवातीपासून धरलेल्या
सत्यशोधनाच्या आग्रहाचा प्रभाव कै. हरि नारायण लिमयेंवर पडला, नव्हे तर ते तसेच
असणार अशी सरांची मांडणी राहिली. फुल्यांनी सामाजिक परिवर्तनाची, सत्यशोधनाची
व्यापक चळवळ चालू केली होती. अनेक अंगाने तिचा अनेक लोकांवर, अनेक पद्धतीने परिणाम
झालेला आहे. ‘सत्यशोधनाची’ ही संकल्पना फुल्यांनी नक्कीच १८७१ पूर्वी वापरलेली
असणार! हे सरांचं म्हणणं आम्हाला पटलं होतं. फुले पुढे याच शब्दाच्या नावे चळवळ
स्थापन करण्यापर्यंत पोहोचले होते. १९७३ ला फुल्यांनी चळवळ सुरु केली म्हणजे
पहिल्यांदा तो शब्द वापरला असं होऊ शकत नाही. तसा विचार केल्यास आपण फसण्याचा संभव
अधिक आहे. सत्यशोधक चळवळीच्या स्थापनेच्या अगोदरचा काळ हा पूर्वतयारीचा भाग होता.
एखादा नाविन्यपूर्ण शब्द असा अचानक चलनात येऊन ‘कॉईन’ होत नाही. त्यासाठी
सुरुवातीला त्या शब्दाबाबत लोकांचं प्रबोधन करावं लागतं. शब्द लोकांपर्यंत
पोहोचवावा लागतो. नंतर तो ‘कॉईन’ केला जातो. सत्यशोधक चळवळ स्थापन होण्यापूर्वी
कोकणातल्या एका ब्राह्मणाने आपल्या साप्ताहिक वृत्तपत्राला ते नाव दिले याचा अर्थ
हा शब्द त्यापूर्वी कोकणात हा शब्द पोहोचला असावा का? त्या काळी या शब्दाचा प्रसार
असा सर्वदूर झाला असेल? यावेळी काहीतरी घडलं असेल? काय घडलं? अशा विविधांगी अंगाने
विचार करण्याची आवश्यकता कांबळे सर बोलून दाखवत होते. एखादा ऐतिहासिक दस्तऐवज
बनवताना तू, ‘आपण ऐतिहासिक दस्तावेज करतोय या टेंशनमधून बाहेरच पडू नकोस’ असं खूप
छान सरांनी सांगितलं. त्यांचं हे वाक्य अंतर्मनाला स्पर्शून गेलं. सत्यशोधक
साप्ताहिकातील जुन्या अंकातील ऐतिहासिक लेखनाचे विश्लेषण व्हायला हवे. कोणीतरी
यावर पी.एच.डी. करायला हवी. वेगवेगळे अॅप्रोच डोळ्यासमोर ठेवून लेखन करायला हवं. संदर्भ
गोळा करणं हे खूप मोठं काम आहे. संदर्भ गोळा करताना वेड लागायची पाळी येते. तरीही
शांतपणे काम करण्यावर भर द्यायला हवा. आमच्या संपादकीय लेखाचा दाखला देत सर पुढे
म्हणाले, ‘महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाज १८६३ ला स्थापन केला हे खरे आहे. पण ती
एक संघटनात्मक क्रिया (organize activity) होती. प्रत्यक्ष सत्यशोधक समाज स्थापन
होण्यापूर्वी महात्मा फुले यांनी सत्यशोधक हा शब्द कशा पद्धतीने कोठे कोठे वापरला
हे पाहावे लागेल’, सरांनी आम्हाला थोडा वेगळा विचार करायला प्रवृत्त केलं. महात्मा
फुले यांनी सत्यशोधक शब्दानुसार प्रबोधन केले होते. शब्दाचा प्रचार केला होता. तो
शब्द लोकांच्या मनात बिंबवला होता हे मान्य करायला हवं. कालांतराने नंतर त्याला
संघटीत आणि आंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी ‘सत्यशोधक समाज’ हे नाव पुढे आलं होतं. हे
सारं सुरु असताना सत्यशोधन निमित्ताने सामाजिक अभिसरणाची प्रक्रीया सुरु असताना कोकणातील
एक ब्राह्मण कुटुंबातील व्यक्ती वर्तमानपत्र सुरु करते आणि त्याला ‘सत्यशोधक’ हे
नाव देते ही महत्त्वाची घटना असल्याचे लक्षात आले. ‘सत्यशोधक’ (truth finding / truth seeker)
काय आहे? हा प्रबोधनाच्या लाटेतून आलेला शब्द आहे. मुळात सत्य काय आहे? असे प्रश्न
स्वतःला विचारून संशोधनाचा आनंद घेत काम करण्याची आवश्यकता आहे. विशेषांकात ‘सत्यशोधक’
शब्दाविषयी लेखन असायला हवं होतं अशी सरांची भूमिका होती, एव्हाना ती आम्हाला पटली
होती. सत्य कशाला म्हणतात? ते शोधायचं कसं? ते का शोधायचं ? त्याचा फायदा काय?
परिणाम काय? असे अनेक प्रश्न कांबळे सरांनी तासाभरात उपस्थित केले. ‘मी मनापासून
सारा अंक चाळला आहे. तू ये नाशिकला! मी देतो तुला माझ्याकडे काय असेल ते?’ असंही
बोलून गेले.
‘मीही अशाच पद्धतीने काम खूप एन्जॉय करतो. मी दरवर्षी एखादा
शब्द घेतो आणि त्यावर संशोधनात्मक दृष्टीने विचार करत राहातो’ असं कांबळे सर सांगत
होते. ‘कोरोना’ काळात कांबळे सर ‘पोतराज’ या शब्दावर दीड वर्षे काम करत होते. पोतराज
हा गावकूस नसलेला, रंगीबेरंगी चिंध्यांनी अंग झाकून (आभरान) अंगावर कोरड्याने आसूड
ओढत दारोदार फिरणारा समाज किंवा कडकलक्ष्मी. मरीआई ही कडकलक्ष्मी पोतराजाची देवता.
पोतराज हा स्त्री-वेशात पुरुष असतो. जटा वाढलेल्या, केसांचा
अंबाडा, कपाळभर हळदी-कुंकवाचा मळवट, कंबरेला
अनेक चिंध्यांपासून तयार झालेले घागरावजा वस्त्र, गळ्यात
मण्यांच्या माळा व कंबरेला सैलसर घुंघराची माळ आणि पायात खुळखुळ्या घातलेला पोतराज
मरीआईच्या नावाने दान मागताना आपल्याला भेटतो. अर्थात आता त्यांच्या भेटीचे प्रमाण
खूप कमी झाले आहे. मुळात पोतराज कशाला म्हणतात? मरिआई म्हणजे काय? ती देवी असेल तर
देवी कुणाला म्हणतात? देवीचे प्रकार किती? मरिआई हे नाव पहिल्यांदा कुणी ठेवलं? ‘आभरान’
कसं तयार करतात? आपल्या हिंदू धर्मामध्ये सत्याची कल्पना काय आहे? इतर धर्मात काय
आहे? लोकांना सत्य का आवडतं? या पार्श्वभूमीवर भगवान गौतम बुद्ध काय म्हणतात? आदी
प्रश्न स्वतःला विचारून लेखनकाम वेडयासारखं एन्जॉय करता आलं पाहिजे. एखाद्या
मिशनसारखं त्याकडे बघायचं. म्हणजे आपल्याला गुणवत्ता मिळते, असं कांबळे सर सांगत राहिले.
प्रत्यक्ष प्रकाशन समारंभातही कांबळे सरांनी, असत्यशोधनाची
मोहीम सुरु असलेल्या काळात सत्यशोधनाचे काम आवश्यक असल्याची भूमिका मांडली.
महात्मा फुल्यांची सत्यशोधक चळवळ १८७३ची आणि रत्नागिरीतील साप्ताहिक सत्यशोधक १८७१चे
यास्तव आम्हाला एकमेकांच्या संबंधांबाबत प्रश्न पडला होता. कांबळे सरांनी यावर थेट
भाष्य करताना सत्यशोधक साप्ताहिक हे फुल्यांच्या सत्यशोधक विचारांचा परिणाम
असल्याचं म्हटलं. सत्यशोधनाची चळवळ, विचार आपल्याकडे युरोपमधून आलेला आहे. मुळात ‘सत्य’
ही एक अतिशय अवघड गोष्ट आहे. सत्याला असंख्य पैलू आहेत. ‘कदाचित सत्य असं काहीच
नसतं’, असंही उत्तर मिळू शकतं. सत्याचे सारे पैलू तपासून पाहिले तरीही सत्याची
नीटशी व्याख्या करता येत नाही. प्रश्न विचारण्याच्या पद्धतीतून सत्यशोधनाची,
प्रबोधनाची चळवळ सुरु झाली. तत्पूर्वीचे
सत्यशोधन आध्यात्मिक पातळीवर होते. महात्मा फुल्यांच्या काळात जातीव्यवस्था टोकाला
पोहोचलेली होती. व्यवस्था देवा-धर्माने केलेली आहे असं सांगितलं जात होतं. मात्र
खरंच हे कोणी तयार केलेलं आहे? याचा शोध घेतल्याशिवाय विषमता संपणार नाही. यासाठी
सत्यशोधनाचा विचार महात्मा फुले यांनी मांडला होता. सार्वजनिक सत्यधर्म सुरु केला
होता. चळवळ सुरु केली होती. फुल्यांच्या विचारांतील शिक्षणाचा विचार अल्पावधीत सर्वत्र
पसरलेला दिसतो. त्याकाळी महात्मा फुल्यांचा विचार समजून घेण्यासाठी त्यांची भेट
होणं आवश्यक नव्हतं. मानवी जीवनात दु:ख का निर्माण होतं? नशीबामुळे, परंपरेमुळे की
पाप केल्यामुळे याची मीमांसा नीट होत नव्हती. भगवान गौतम बुद्धांनी पहिल्यांदा
याची मीमांसा केली. बुद्धांनी ‘तृष्णा’ तर महात्मा फुल्यांनी ‘अविद्या’ असा शब्द
योजला. यातून सत्यशोधनासाठी पर्याय पुढे आला. दु:ख हे मानव निर्मित आहे. सत्याचा
शोध घेतला पाहिजे. ही भावना प्रबळ होत गेली. त्या भावनेचा एक किरण कोकणात येऊन
पोहोचला असावा. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी हे करणं, वृत्तपत्र काढणं अवघड होतं,
वेडेपणा होता. कारण पूर्वी म्हटलं जायचं, ‘ज्याच्या मनात आत्महत्येचा विचार प्रबळ
होतो तो वर्तमानपत्र काढतो.’ आपल्या भाषणाच्या शेवटी, ‘फुल्यांचा प्रभाव होता की नव्हता?
यात फार अडकू नका’ असंही आम्हाला सांगायला सर विसरले नाहीत. दीडशे वर्षांपूर्वी
लिमये यांनी आपला रस्ता पकडला असे कांबळे सरांनी नमूद केले. कांबळे सरांनी आपल्या या
भाषणात अभ्यासक आणि पत्रकारांसाठी अत्यंत उत्तम असं मार्गदर्शन केलं. पण विविध
संघटनांच्या भाऊगर्दीत या कार्यक्रमाकडे फिरकायला असंख्य पत्रकारांना वेळ मिळाला
नाही. या कार्यक्रमाचं मर्यादित वृत्त शासकीय स्वरुपात प्रसिद्ध झालं. कांबळे
सरांच्या या मांडणीमुळे आम्ही विचार करायला प्रवृत्त झालो...
महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म १८२७ सालचा. १८४७ पर्यंत
त्यांनी शिक्षण घेतले. त्यांना इंग्रजी, मराठीशिवाय उर्दू, कानडी, मद्रासी,
गुजराती भाषा येत होत्या. संस्कृत भाषेचे शिक्षणही त्यांनी घेतले होते. त्यांचे
वाचन चौफेर, चिकित्सक आणि चोखंदळ होते. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानांचा,
संप्रदायांचा त्यांनी अभ्यास केला होता. थॉमस पेन यांच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ आणि ‘एज
ऑफ रिझन’ या ग्रंथांनी त्यांच्या मनात सर्वप्रथम खळबळ उडवून दिली होती. यातून त्यांची
दृष्टी प्रगल्भ झाली होती. १८४८ मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात या
देशातील मुलींची पहिली शाळा महात्मा जोतिबा फुले यांनी सुरु केली. यासाठी त्यांना परांजपे,
हाटे, गोवंडे आदी सहकाऱ्यांनी आर्थिक साहाय्य केले होते. वयाच्या विशी-पंचविशीत
त्यांनी सत्य शोधनाचा मार्ग स्वीकारला होता. लोकांना शक्य ती मदत करण्यापासून समाज
सुधारणेसाठी प्रशासकीय, तसेच लोकांमध्ये सक्रीय राहून, बदल
घडवणारे समाजसेवक म्हणून ते काम करू लागले होते. आपले विचार सभांमधून आणि पत्रके
काढून प्रसिद्ध करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्यांचे १८५३चे ‘निर्मिकाचा
शोध’ हे चौदा अखंडांचे वैचारिक पद्यमय पुस्तक याचे द्योतक आहे.
साऱ्या
निर्मितीला । पोकळी कारण ।। असे तिचे गुण । स्वाभाविक ।।
विषाणूचा मेंदू
। धर्माची प्रकृती ।। देवाची उत्पत्ती । तोच करी ।।
शिका शिका
तुम्ही । घ्या सत्याचा शोध ।। उत्पत्तीचा बोध । ध्यानी आणा ।।
‘निर्मिकाचा शोध’मधून महात्मा फुल्यांनी ‘सत्याचा शोध
घेण्यासाठी शिकावे’ ही भूमिका मांडलेली आपल्याला दिसते. फुल्यांनी १८५५ साली
लिहिलेल्या ‘तृतीय रत्न’ नाटकातही ‘सत्य’ हा शब्द अनेकवेळा आलेला आहे. या नाटकातील
एका प्रसंगात तर ‘सत्य बोल सर्वास आवडू लागतात’ असे वाक्य विदूषक पात्राच्या तोंडी
आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात सुशिक्षित समाजात धर्म
सुधारणेच्या विचाराचे स्वागत करणारे तीन प्रवाह महाराष्ट्रात प्रभावीपणे वाहात
होते. पहिला प्रवाह धार्मिक सुधारकांचा होता. यात २० ऑगस्ट १८२८ला राजाराम मोहनरॉय
यांनी स्थापन केलेला एकेश्वरवादी ब्राह्मो समाज आणि ३१ मार्च १८६७ साली मुंबईत केशवचंद्र
सेन यांच्या पुढाकारातून स्थापन झालेला ‘एकेश्वरी पंथ’ प्रार्थना समाज होता. दुसरा
प्रवाह हा आगरकर यांच्यासारख्या बुद्धिवादी ब्राह्मण सुधारकांचा होता. तिसरा
प्रवाह ब्राह्मण्यास विरोध करणाऱ्या बहुजन समाजाच्या महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक
चळवळीचा होता. १८५३ साली मुंबईत वेस्टर्न इंडिया असोसिएशन तर १८८५ साली इंडियन
नशनल कॉंग्रेसची स्थापना झाली होती. या संपूर्ण शतकात सार्वजनिक जीवनाला प्राधान्य
मिळू लागले होते. समाजसेवेत जवळपास पंचवीस वर्षे घालवल्यावर वयाच्या पन्नीशाच्या
आसपास फुले यांना समाजसुधारणेच्या मार्गातील अडचणींचा आणि खाचखळग्यांचा अनुभव आलेला
होता. समाजाच्या स्थापनेपूर्वी तुकाराम हनुमंत पिंजण, ज्ञानगिरी बाबा, रामशेठ
उरवणे, विठोबा गुठाळ, कुशाबा माळी, ग्यानोबा झगडे मिस्त्री, धोंडीराम गवंडी वैग्रे
आदी मंडळी सायंकाळी त्यांच्याकडे चर्चेसाठी जमायची. यावेळी संत कबीरांच्या विशेषतः
बीजक ग्रंथातील ‘विप्रमती’ भागाचं वाचन व्हायचं. ज्ञानगिरी बाबा हे वाचन करीत असत.
यावेळी घडणाऱ्या संवादातून सुशिक्षित ब्राह्मणेतरांची एक सामुदायिक संस्था स्थापन
करून तिच्यामार्फत चळवळ चालू करणं फुल्यांना अगत्याचं वाटू लागलं होतं. ‘सत्यशोधक’
समाजच्या स्थापनेची बीजं फुल्यांच्या याच विचारात असावीत. स्थापनेच्या पहिल्या, २४
सप्टेंबर १९७३च्या बैठकीत संस्थेच्या नावाविषयी सविस्तर चर्चा झाली होती. ‘सत्याचा
शोध घेणे, सार्वजनिक सत्याचा आग्रह धरणं, सत्याच्या
अनेक बाजू, अनेक पैलू, अनेक शक्यता लक्षात घेणारी ही संस्था, सत्य शोधण्याचे काम
करणारा समाज म्हणून 'सत्यसोधक समाज' हे नाव सर्वांनी संमत केलं होतं.
सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक
पुनर्रचनेची मागणी केली होती. आपल्या या चळवळीसाठी महात्मा फुल्यांनी 'सत्यशोधक' हा
शब्द का वापरला? तो कोठून आला? याबाबतची पुरेशी स्पष्टता होईल असा एकही थेट संदर्भ
उपलब्ध होत नाही. तथापि महेश जोशी यांनी आपल्या 'सत्यशोधक
समाजाचा इतिहास' ग्रंथामध्ये, ‘महात्मा फुले यांच्या तोंडी सत्यशोधक
समाज आणि मानवधर्म असे दोन शब्द वारंवार आढळतात. यापैकी सत्यशोधक हा शब्द बाबा
पद्मनजी यांच्याकडून आणि मानवधर्म हा शब्द दादोबा पांडुरंग यांच्याकडून आलेला
दिसतो’ असं म्हटलं आहे. बडोद्याच्या गायकवाड यांना उद्देशून मुंबईचा गव्हर्नर
लॉर्ड क्लेअर १८३२ साली आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर यांना लिहिलेल्या पत्रात
गायकवाड यांना उद्देशून ‘हे भारतीय लोक सत्याची फारशी पर्वा करत नाहीत’ असे
म्हटल्याने भारतीयांविषयी असा अपप्रचार होत असताना ‘सत्यशोधक’ हा शब्द समाजसुधारकांना
आकर्षक आणि प्रतिष्ठित वाटला असावा, असंही मत त्यांनी नोंदवलं आहे.
महत्वाचं म्हणजे बाबा पद्मनजी यांनी लोकांमध्ये धर्मजागृती
व्हावी म्हणून ‘सत्यशोधक सभा’ स्थापन केली होती. मात्र तिच्या कालावधीचा उल्लेख
सापडत नाही. त्यामुळे 'बाबा पद्मनजी’ यांनी तो शब्द कोठून उचलला असेल, तेही
सांगता येत नाही. फुल्यांनी १८६९ मध्ये शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला. हा
पोवाडा शुद्ध करण्यासाठी बाबा पद्मनजीयांचे सहकार्य मिळाले होते. हे दोघेही
समकालीन होते. ब्राह्मणांचे कसब या १८६९ साली जोतिबा फुले यांनी लिहिलेल्या
पुस्तकाला बाबा पदमनजी त्यांची प्रस्तावना आहे. बाबा पद्मनजी हे शालेय वयात
असताना फ्री चर्च स्कूलमध्ये जाऊ लागल्यावर त्यांच्या मनावर नव्या शिक्षणपद्धतीचा
परिणाम होऊन त्यांनी ‘सकल विश्वाचा उत्पन्नकर्ता श्री जगद्गुरू सर्वोत्तम नारायण
याच्या पवित्र चरणांते स्मरून’ २५ ऑगस्ट १८४९ रोजी एक शपथ घेतली होती. जिचा उल्लेख
अरुणोदय या त्यांच्या आत्मचरित्रात भेटतो. यात त्यांनी ‘ईश्वर मला असत्य
भाषण करण्यास बुद्धी न देवो’ असं म्हटलं आहे. बाबा पद्मनजी यांनी आपल्या याच
शाळेमधील मित्रांविषयी १८५१ मध्ये लिहिले होते, ‘मी मुंबईस सत्य शोधू लागल्यापासून
बेळगांवी जाईपर्यंत फ्री चर्च विद्यालयात जी सत्यशोधकांची टोळी झाली होती
तिच्यात ब्राह्मण, परभू, सोनार, शेणवी इ. जातींची मुले होती.’ (संदर्भ :: बाबा
पद्मनजी : काल व कर्तृत्व – डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर, १९७९, महाराष्ट्र राज्य
साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई - पान २६, पीडीएफ आवृत्ती) पुढे ३ सप्टेंबर १८५४
साली बाबा पद्मनजी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. ‘हिंदू धर्मात राहून मनातील
अज्ञान व अविद्या यांचा नाश करता येत नाही. सत्यशोधन व असत्य मुक्ती यासाठी
ऋषिप्रणित हिंदू धर्मातील वचने उपकारक ठरत नाहीत.’ यामुळे आपण ख्रिस्ती धर्म
स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. बाबा पद्मनजी यांनी १२ नोव्हेंबर १८५१
रोजी उडतरे, जि. सातारा येथून ज्ञानप्रकाश वर्तमानपत्रास प्रसिद्धीसाठी
पाठविलेल्या पत्रात ‘...सत्ययुगाचा प्रथम दिवसाचा अरुणोदय झाला आहे.’ असे लिहिले
होते. बाबा पद्मनजी यांनी १८६१ मध्ये सत्यदीपिका (धाकटी) नावाचे लहान मुलांचे
मासिक सुरु केले होते. हे मासिक १८७३ साली बंद पडल्यावर त्यांनी सत्यदीपिका
(थोरली) सुरु केले होते. ते १८७७ला बंद पडले. पुढे १८८२ मध्ये त्यांनी ‘सत्य’वादी
नावाचे पाक्षिक सुरु केले होते.
‘सत्यशोधक या नावाचे एक मराठी पत्र निघणार
आहे असे ऐकून आम्हास मोठा आनंद वाटला होता. परंतु जेव्हा त्याचा एक अंक येऊन
पोहोचला आणि आम्ही तो वाचला तेव्हा आम्हास खेद वाटला. कारण सत्यशोधक हे नाव देऊन
त्यात द्वेषाने उगीच जागा भरणे अयोग्य आहे’ असा उल्लेख १ जुलै १८५४च्या ‘ज्ञानोदय’
मध्ये असल्याची नोंद आपल्याला ‘मराठी वृत्तपत्रांचा इतिहास’ या ‘रा. का. लेले’
यांच्या ग्रंथात भेटते. अहमदनगरच्या अमेरिकन ख्रिस्ती मिशनने याच ‘ज्ञानोदय’चा पहिला अंक २० जून १८४२ रोजी प्रकाशित केला होता. या अंकाचा बाबा पद्मनजी
यांच्यावर प्रभाव राहिला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातल्या
नवशिक्षित तरुणांमधला एक मोठा वर्ग स्वधर्मापासून वैचारिकदृष्ट्या दुरावत होता.
आपला धर्म, परंपरा, समाजव्यवस्था यांच्यातल्या दोषांची जाणीव झाल्यामुळे ही
मंडळी ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाली होती. बाबा पदमनजींप्रमाणे काहींनी प्रत्यक्ष
ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचं धाडस केलं. या वर्गासाठी ‘ज्ञानोदय’ हे मार्गदर्शक वर्तमानपत्र होतं. “आपल्या तरुणपणी आपण ‘ज्ञानोदय’चे वाचक तर होतोच, पण स्वतःशिवाय
आणखी दहा वर्गणीदार या वर्तमानपत्राला मिळवून दिले होते”, अशी आठवण बाबा पदमनजी यांनी ‘अरुणोदय’ या आत्मचरित्रात नोंदवली आहे.
महाराष्ट्रातील बहुजन पत्रकारितेचा आढावा घेणारे ‘सत्यशोधकीय
नियतकालिके’ हे डॉ. अरुण शिंदे यांचे महत्त्वाचे पुस्तक अलिकडेच प्रकाशित
झाले आहे. त्यानुसार सत्यशोधक चळवळीच्या प्रचार-प्रसाराच्या हेतूने १८७७ ते १९३०
या काळात सुमारे साठ नियतकालिके निघालीत. ‘दीनबंधु’ (१८७७
- कृष्णराव भालेकर, नारारण मेघाजी लोखंडे, वासुदेवराव
बिर्जे, श्रीमती तानुबाई बिर्जे), ‘सत्सार’ (१८८५, म.
फुले), ‘दीनमित्र’
(१८८८ - गणपतराव पाटील), ‘राघव
भूषण’ (१८८८ - गुलाबसिंह कौशल्य), ‘अंबालहरी’ (१८८९
- कृष्णराव भालेकर), ‘शेतकऱ्यांचा कैवारी’ (१८९२
- कृष्णराव भालेकर), ‘मराठा दीनबंधु’ (१९०१ - भास्करराव
जाधव), ‘दीनमित्य’
(१९१०, मुकुंदराव
पाटील), ‘विश्वबंधू’
(१९११ - बळवंतराव पिसाळ), ‘जागरूक’ (१९१७
- वालचंद कोठारी), ‘जागृति’
(१९१७ - भगवंतराव पाळेकर), ‘डेक्कन
रयत’ (१९१८ - अण्णासाहेब लठ्ठे), ‘विजयी
मराठा’ (१९१९- श्रीपतराव शिंदे), ‘सत्यप्रकाश’ (१९१९
- नारारण रामचंद्र विभूते),
‘गरिबांचा कैवारी’ (१९२०
- बाबूराव रादव), ‘भगवा झेंडा’
(१९२० - दत्ताजीराव कुरणे), ‘तरुण
मराठा’ (१९२० - सखाराम पांडूरंग सावंत), ‘राष्ट्रवीर’ (१९२१
- शामराव भोसले), ‘प्रबोधन’
(१९२१ - के. सी. ठाकरे), ‘संजीवन’ (१९२१
- द. भि. रणदिवे), ‘सिंध मराठा’
(१९२४ - दत्तात्रेर वासुदेव
अणावकर), ‘हंटर’
(१९२५ - खंडेराव बागल), ‘मजूर’ (१९२५
- रामचंद्र लाड), ‘कर्मवीर’
(१९२५ - शि. आ. भोसले), ‘नवयुग’ (१९२६
- बाबासाहेब बोले), ‘सत्यवादी’
(१९२६ - बाळासाहेब पाटील), ‘ब्राह्मणेतर’ (१९२६
- व्यंकटराव गोडे), ‘कैवारी’
(१९२८ - दिनकरराव जवळकर) वगैरे
प्रमुख नियतकालिके सुरू झाली. मराठी भाषिकांच्या सर्व प्रदेशांपर्यंत ती पोहोचत
होती. ‘जागृति’ हे साप्ताहिक बडोद्याहून तर ‘सिंध मराठा’ हे
कराचीहून प्रसिद्ध होत होते. येवला, जि. नाशिक (राघव भूषण), तरवडी, जि.
अहमदनगर (दीनमित्र) अशा ग्रामीण भागांतून सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करत
नियतकालिके प्रसिद्ध होत होती. यात रत्नागिरीतून कै. हरि नारायण लिमये
यांनी १८७१ साली सुरु केलेल्या सत्यशोधक साप्ताहिकाचा उल्लेख नाही.
सत्य हा संस्कृत शब्द आहे. भारतीय दर्शनांमध्ये ‘सत्य’ या
संकल्पनेचा विचार प्रमाण आणि प्रामाण्य या संकल्पनांच्या संदर्भात झालेला दिसतो. महात्मा
फुले यांच्या असंख्य पत्रावर ‘सत्यमेव जयते’ असाच उल्लेख आहे. फुले यांचा संत तुकारामांच्या
अभंगांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी 'अखंड' रचले
होते. त्याची एकूण अखंड संख्या ९९९ आहे. १८८७ मध्ये प्रसिद्ध झाले. यात महात्मा
फुले म्हणतात,
सत्य सर्वाचे आदि घर । सर्व धर्माचे माहेर ॥
जगामाजी सुख सारे । खास सत्याची ती पोरे
सत्य सुखाचा आधार । बाकी सर्व अंधकार ॥
सत्य हेच अंतिम असून माणसाने नेहमी सत्यवर्तन केले पाहिजे
त्यामुळे आपणास सुख प्राप्त होईल. सर्व धर्म ही असेच सांगतात त्यामुळे सत्यवर्तन
आवश्यक आहे. महात्मा फुल्यांची अखंड रचनेत अनेकदा ‘सत्य’ शब्द वापरला आहे.
आयुष्याच्या अखेरच्या कालखंडात महात्मा फुल्यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा
सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ लिहिला होता. ‘सत्यवर्तन केल्याशिवाय मानवप्राणी
जगात सुखी होणार नाही’ अशी सुरुवात करून महात्मा फुल्यांनी लिहिलेला हा ग्रंथ त्यांच्या
मृत्युनंतर १८९१ ला प्रकाशित झाला.
तत्कालिन सरकारी परिस्थिती लोकांसमोर मांडायची एवढाच
सत्याचा मर्यादित अर्थ असल्याच्या काळात फुल्यांनी सत्यशोधनाचा आग्रह धरला होता.
आपल्याकडील केशवपनाची चाल बंद करायला समाजसुधारकांना संघर्ष करावा लागला होता.
महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहामागील भूमिका तपासताना ‘ब्रिटीश इथले नव्हेत’ हे सत्य
आपल्या लक्षात येतं. गांधीजींनी ब्रिटीशांच्या जाण्याचा आग्रह धरल्याचेही दिसते. भाषेच्या
अंगाने पाहिलं रत्नागिरीतील लिमये यांनी ‘सत्यशोधक’ शब्द पहिल्यांदा कॉईन केला असं
दिसतं. पण चळवळीच्या अंगाने पाहिलं तर तो महात्मा फुल्यांच्या जीवनात सर्वत्र आढळतो.
सत्यशोधक समाज हे दोन शब्द कदाचित एकमेकांना जोडलेले नसावेत. ‘बहिष्कृत भारत’ किंवा
‘सत्याचे प्रयोग’ प्रमाणे हे शब्द थेट वापरले गेले असण्याची शक्यता आहे.
फुल्यांच्या सत्यशोधक समाज मधील ‘समाज’ हा शब्द तत्पूर्वी अनेकांनी आपल्या
चळवळीसाठी वापरला आहे. अशा अभ्यासात शोधाच्या वाटा बंद झाल्यावर आपल्याला विषयाचा
अर्थ-अन्वयार्थ शोधावा लागतो असं उत्तम कांबळे सरांचं रास्त म्हणणं होतं. महात्मा
फुल्यांच्या संपूर्ण विचारांचे बीज आपल्याला ‘सत्य काय हे जाणून घ्यायला हवे
म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात’ याकडे झुकलेले दिसते. महात्मा फुल्यांनी
जीवनात सत्याला खूप महत्त्व दिले आहे. त्यांनी जीवनभर केलेली मीमांसा सत्याशी
निगडित आहे. त्यांनी सत्य हे तर्काला आणि वास्तवाला जोडलेलं दिसतं. तत्पूर्वीचं
सत्य आपल्याला देव, धर्म याला जोडलेलं दिसतं. महात्मा फुल्यांनी जीवनभर स्वतःला
कृतीतूनच ‘सत्यशोधक’ मानलं आहे. इतिहास हा एक आरसा आहे. जितका इतिहास जुना तितका
त्या आरश्यामागील पाराही प्रसंगी क्षीण होत जाण्याची संभवना असते. अशा प्रसंगी
नवीन पारा जोडून नीटसं पाहाणं आवश्यक बनतं. तसंच ‘सत्यशोधक समाज’ हे विशेषणात्मक
नाव १९७३ ला पुढे आलं असलं तरी महात्मा फुल्यांचं काम तत्पूर्वीपासून सुरु आहे हे स्पष्ट
आहे. कधीकधी काही शब्द नावात यायला उशीर होतो पण ते शब्द तत्पूर्वी वापरात किंवा
व्यवहारात आलेले असतात. ‘सत्यशोधक’ संदर्भात ही शक्यता अधिक वाटते. आपल्याकडे
इतिहासात कॉईन झालेले शब्द हे ज्यांच्या नावावर जमा झालेले दिसतात, त्यांच्यापूर्वी
ते कोणीतरी वापरले असावेत असे मानणारा एक प्रवाह आहे. बाबा पद्मनजी यांचे विषयी
अभ्यासताना ‘सत्यशोधक’ हा शब्द पूर्वी अस्तित्वात असावा असं वाटतं. महात्मा फुले
यांनी जीवनभर कार्य केलेल्या चळवळीचं बिरूद असलेला ‘सत्यशोधक’ शब्द रत्नागिरीच्या
लिमयेंनी कसा वापरला? त्यामागे शाब्दिक आकर्षण असावं का? की महात्मा फुल्यांच्या
प्रभावातून हा शब्द घेतला? पण तसं त्या साप्ताहिकात दिसतं नाही आणि नोंदही नाही.
दुर्दैवाने त्याचे सुरुवातीचे अंकही उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा लेख वाचून कोणाला
यातील मसुद्यावर कोणाला अधिक प्रकाश टाकता आला तर आम्हाला अधिक आनंद होईल.
सत्यशोधकचा दीडशे वर्ष विशेषांक निघेपर्यंत ‘रत्नागिरीतून
साप्ताहिक ‘सत्यशोधक’ प्रसिद्ध होते’ हे अनेकांना माहिती नव्हते. सत्यशोधकीय
विचारधारेतील नियतकालिकांच्या आजवरच्या यादीत रत्नागिरीतील या पत्राचा उल्लेख
नाही. ‘सत्यशोधक’ हे नाव आपल्या नियतकालिकासाठी संघटीत पद्धतीने कै. हरि नारायण
लिमये यांनी पहिल्यांदा कॉईन केले होते. यावरून आम्ही अनुमान लावलं होतं. सत्यशोधकचे
स्वातंत्र्यपूर्व जुने अंक चाळताना आम्हाला अंकात ज्योतिष विषयक मजकूर दिसला. बाबासाहेब
बोले यांच्या चळवळी संदर्भात लिहिताना चरित्रकार धनंजय कीर यांनी ‘सत्यशोधक’ मधून
खोतांची पाठराखण झाल्याची नोंद केल्याने हे महात्मा फुल्यांच्या विचारधारेशी
संबंधित नसल्याचं आमचं मत बनलं होतं. तरीही कांबळे सरांनी मांडलेला मुद्दा
महत्त्वाचा होता. सत्यशोधक अंकाच्या अतिथी संपादकीयात आम्ही पुढे लिहिलं होतं, ‘पत्रकारिता’
ही फक्त पत्रकारांनी करावी असं वाटणारा काळ मागे पडल्यालाही बराच काळ लोटलाय. आजचं
जग क्षणोक्षणी बदलतंय. पत्रकार किंवा समाजातील जबाबदार घटक म्हणून व्यक्त होत
असताना त्यात ‘संदर्भ’ डोकावायला हवेत. ‘वार्तांकन आणि भाष्य’ हे स्वतंत्र असायला
हवं. नव्या पिढीने पत्रकारितेत यशस्वी होण्यासाठी तल्लखपणा, कुतूहल आणि विषयाची
भूक सदैव जीवंत ठेवायला हवी आहे. ग. वा. बेहेरे या पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या
‘सोबत’ साप्ताहिकाच्या संस्थापक-संपादकांनी १९८० साली वसंत दिवाळी अंकात लिहिलं
होतं, ‘पत्रकारिता ही पत्रकाराच्या रक्तातून वाहायला हवी. रक्तातील या चैतन्याचं
आपण गुणगान करीत नाही, ते चैतन्य आपण क्षणोक्षणी जगत असतो.’ बेहेरेंच्या शब्दातील
हे चैतन्य आम्हाला उत्तम कांबळे मास्तरांच्या तासात अनुभवता आणि हा लेख लिहिताना
जगता आलं.
संदर्भ :-
तृतीय रत्न (नाटक) – महात्मा फुले (१८५५ :: अप्रकाशित)
प्रथम प्रकाशन – पुरोगामी सत्यशोधक
बाबा पद्मनजी : काल व कर्तृत्व – डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर
(१९७९ :: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई)
जोतिचरित्र – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (सप्टेंबर
१९९१ :: नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया)
सत्यशोधक समाजाचा इतिहास – महेश जोशी (२००२ :: महाराष्ट्र
राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई)
सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले – श्रीराम गुंदेकर (जुलै २००४
:: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई)
महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा जोतिबा फुले - श्रीराम
गुंदेकर
मराठी वृत्तपत्रांचा इतिहास – रा. का. लेले (द्वितीयावृत्ती
२००४ :: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे)
धीरज वाटेकर चिपळूण, मो.
०९८६०३६०९४८
(धीरज वाटेकर हे ‘पर्यटन आणि चरित्र लेखन’ या
विषयावरील प्रकाशित नऊ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ
चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २८ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा