नव्या पिढीसाठी दस्तावेज
आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी लोकजागृती करण्यासाठी ‘दर्पण’ हे नियतकालिक सुरु केले होते. त्यांनी आपल्या पहिल्या अंकात म्हटले होते, ‘मनोरंजन करणे, चालते काळाची वर्तमाने चालविणे आणि समाजाला योग्यतेस येण्याचे मार्ग दाखविणे या गोष्टींची दर्पण छापणारास उत्कंठा आहे.’ ‘दर्पण’ सुरु झाले तो दिवस (६ जानेवारी) महाराष्ट्रात ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा होत असतो. हे औचित्य साधून साप्ताहिक ‘सत्यशोधक’ आपला शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी विशेषांक आज प्रकाशित करत आहे.
महात्मा जोतीराव फुले यांनी काही समविचारी मंडळींच्या सहकार्याने २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. महाराष्ट्रातील बहुजन पत्रकारितेचा आढावा घेणारे ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ हे डॉ. अरुण शिंदे यांनी लिहिलेले एक महत्त्वाचे पुस्तक आहे. यानुसार, कृष्णराव भालेकर यांनी १ जानेवारी १८७७ रोजी ‘दीनबंधु’ हे सत्यशोधक समाजाचे पहिले नियतकालिक सुरू केले होते. सत्यशोधक चळवळीच्या प्रचारप्रसाराच्या हेतूने १८७७ ते १९३० या काळात सुमारे साठ नियतकालिके निघाली, असं त्यांनी म्हटलंय. रत्नागिरीतून कै. हरि नारायण लिमये यांनी सुरु केलेले ‘सत्यशोधक’ साप्ताहिक ‘१८७१’ सालचे आहे. ‘प्रत्येक रविवारी सायंकाळी छापते’ असे बिरूद घेऊन रत्नागिरी येथून प्रसिद्ध होऊन समाजप्रबोधन आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या साप्ताहिकाने केले आहे.
‘आपल्या देशातील जवळपास संपादक टिळक-आगरकर यांचा वारसा सांगतात. पण मुळातच टिळक-आगरकर ही ब्रह्मकमळासारखी केव्हातरी फुलणारी फुले. शिवाय ते संपादक नव्हते. हजारो गनीम अंगावर घेऊन लढणाऱ्या सेनापतींजवळील अनेक हत्यारांपैकी वृत्तपत्र हे एक हत्यार त्यांनी वापरले. पत्रकार होण्यावाचून त्यांना पर्यायही नव्हता. हेतुपुरस्सर, आंधळ्या, बहिऱ्या आणि मुक्या झालेल्या सुखासीन देशबांधवांना उकळत्या तेलाहून दाहक असणारे त्यांचे शब्द जागे करू शकणार होते. त्यामुळे ते संपादक झाले. त्यांचे नाव घेताना किंवा त्यांची जातकुळी सांगताना दहादा विचार करायला हवा. केवळ आपल्याला उडता येते म्हणून चिलटाने गरुडाची बरोबरी करण्यात काय अर्थ आहे ?’ गणपती वासुदेव उर्फ ग. वा. बेहेरे या पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सोबत’ साप्ताहिकाच्या संस्थापक-संपादकांनी १९८० साली हे वसंत दिवाळी अंकात लिहिलं होतं. ‘बदलती पत्रकारिता’ यातून ध्यानात यावी.
बेहेरे पुढे म्हणतात, ‘आज अनेक संपादक आहेत. त्यापैकी बहुतेक जण शब्दांचे सौदागर आहेत. कुणाचे तरी शब्द स्वस्तात विकत आणावेत आणि कुणाच्यातरी ते गळ्यात मारावेत असा हा साधा व्यापार आहे. पुष्कळ संपादकांना शब्द प्रसन्नच नाहीत. पुष्कळजण लिहीतच नाहीत. त्यांनी लिहिले तरी फारसे कोणी वाचीतही नाहीत. एखादा संपादक लोकप्रिय होतो याचा अर्थ त्या संपादकाची कितीतरी मते अमान्य असूनही वाचक त्याच्यावर खूष असतात. कारण त्याच्या शब्दातून अस्सल असंतोषाचा बाणेदारपणा जाणवत असतो. एकदा आपल्या शब्दांच्या तावडीत वाचक सापडला की त्याला कोणत्याही लांबच्या प्रवासाला नेण्याची त्या शब्दात ताकद असते. प्रामाणिकपणाचा स्पर्शसुद्धा माणसाला मोहात टाकतो. दिवसेंदिवस प्रामाणिकपणा दुर्मीळ होत चालला आहे. अस्सल गोष्टी दिसेनाशा झाल्यात. सगळ्यात भेसळ असते. माणसांच्या विचारातही आता भेसळ होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत कुठेकुठे एकाकी लढणारे, जखमांनी विव्हळ झालेले, परंतु युद्धाची नशा चढलेले लहानमोठे संपादक दिसतात. ते महत्त्वाचे असतात. लहान पत्रकाराची लढाई सोपी असते. त्याला संपूर्ण नष्ट करणे सहसा शक्य होत नाही. त्याचे व्यवसायाचे साधन म्हणजे त्याची लेखणी होय. महापुरात लव्हाळी वाचावीत आणि वटवृक्ष उन्मळून पडावेत तसे छोट्या वृत्तपत्रकाराचे होते. तो आपल्या अंगाबरोबर जगतो, गुरगुरू शकतो, संधी पाहून आव्हाने देऊ शकतो.’ बेहेरे यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर देशातील वादळवाऱ्यात आपल्या मताचे झाड उन्मळून पडू नये एवढी काळजी घेण्याचे काम गेली दीडशे वर्षे लिमये कुटुंबीयांनी केले आहे, ते महत्त्वाचे आहे.
अलीकडे पत्रकारितेमध्ये बातमीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वैयक्तिक मतांचा भडिमार होताना दिसतो. हा एक व्यावसायिक आजार ठरावा अशी आजची स्थिती आहे. ‘वार्तांकन आणि भाष्य’ हे स्वतंत्र असायला हवं. भारतीय पत्रकारांना दिवसभर बातम्या द्यायची कधीच सवय नव्हती. डिजिटल मंचावर यशस्वी होण्यासाठी आज ती अंगी बाणवावी लागली आहे. डिजिटल मंचावर बातमी वेगाने पोहोचविण्याचा ताण अधिक आहे. आपलं लेखन लोकं चटकन वाचतात. जागा प्रचंड असते. पण वाचकाकडे वेळेची मर्यादा असते. प्रिंटमध्ये लेखाची गुणवत्ता वृद्धिंगत करणारी लांबी असू शकते. ती सहज लक्षातही येते. वाचकाला वेळेचं नियोजन करता येतं. २८० अक्षरांच्या (५० शब्द) एका ट्विटमध्ये मुद्द्याचं सारं येत असेल तर लोकांनी ६००/८०० शब्दांचे अग्रलेख का वाचायचे ? असा मुद्दा हल्ली चर्चेत असतो. पण या सर्वातून संदर्भबहुलता मागे पडण्याचा धोका संभवतो. म्हणून आपण या अंकात विषयानुरूप ‘भाष्य’ करणारे प्रदीर्घ लेख प्रसिद्ध केलेत. अंकाची तीन पानी अनुक्रमणिका पाहिली तरी हे लक्षात येईल.
भारतातील वर्तमानपत्रांची किंमत वाजवीपेक्षा आजही कमी आहे. इथे एका प्रतिपेक्षा एक कप चहा किंवा कॉफी अधिक महाग असते. डिजिटल पत्रकारितेतील आव्हाने समोर असली तरी प्रिंट माध्यमांचे महत्त्व कमी होणार नाही. आज काही दैनिकांनी त्यांचे ऑनलाईन ई-पेपर वाचण्यासाठी वर्गणी सुरु केली आहे. तरी आजही, ‘स्क्रोल’सारखे अपवाद वगळता डिजिटल माध्यमातून आर्थिक स्वावलंबन पूर्णत: यशस्वी झालेले नाही. फेसबुक आणि व्हाट्सअॅप वापरणाऱ्यांचं प्रमाण भारतात लक्षणीय आहे. ‘इन्स्टाग्राम’ही वेगाने वाढते आहे. यांनी प्रिंट मिडियापासून लोकांना दूर नेलेले आहे. म्हणून छोट्या-मोठ्या भारतीय नियतकालिकांनी दृश्यात्मक चैतन्य अधिकाधिक जपायला हवंय. प्रस्तुत अंकात आपण हा प्रयत्न केलेला आहे.
स्वतःवरच ‘सेन्सॉरशिप’ लादून घेतलेला मनुष्य कधीही पत्रकार होऊ शकत नाही. त्यासाठी लिहिण्याचं कौशल्य आणि विस्तृत वाचन आवश्यक आहे. पत्रकारितेचं प्रशिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या तरुण पिढीने इतिहास, अर्थशास्त्र, राजकारण, समाजशास्त्र, साहित्य, विज्ञान, अभियांत्रिकी यातल्या कोणत्याही शाखेतून पदवी शिक्षण घ्यावं. त्यानंतर पत्रकारितेचा अभ्यासक्रम करावा हे अधिक योग्य होईल, असं आम्हास वाटतं. भारत हा असा देश आहे जिथे फार कमी गोष्टींचा पूर्वअंदाज बांधता येतो. म्हणून नव्या पिढीने पत्रकारितेत यशस्वी होण्यासाठी तल्लखपणा, कुतूहल आणि विषयाची भूक सदैव जीवंत ठेवायला हवी आहे. वाचकांना बारकाव्यांसह, वैविध्यपूर्ण मजकूर हवा असतो. विषयाच्या मांडणीतला दीर्घकाळ टिकणारा स्पष्ट उद्देश असलेले विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लिहिलेले एका पेक्षा एक सरस आणि दर्जेदार लेख या विशेषांकात आपल्याला वाचता येतील.
‘कोकण आणि विकास एवढे दोन शब्द दिसले की कोकणी माणसाला एवढा हर्षवायू होतो की आता कोकणाचा स्वर्ग झाला असे त्याला वाटते.’ ४० वर्षांपूर्वी ‘कोकणाचा विकास : आता अभ्यास समिती कशासाठी ?’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या एका लेखातील या ओळी आहेत. याच लेखात कोकणात येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी उतारू बंगल्यावर निवेदनांचा पाऊस पडेल त्यापेक्षा कोठे कोठे प्रत्यक्ष प्रयोगाचे लहानसे झरे असतील ते पाहावेत. विकासाची तहान भागविण्यास उपयोगी पडतील.’ असे म्हटले होते. सरकारकडे कोकण रेल्वेची पहिली रितसर मागणी १८९२ साली झाली होती. पुणे-बेळगाव-लोंढा रेल्वे अस्तित्वात आल्यावर त्या रेल्वेने कऱ्हाड-चिपळूण-पनवेल मार्गाची योजना १९०० साली तयार झाली होती. १९११ साली जी.आय.पी. रेल्वेने दिवा-दासगाव या कोकण मार्गावर योजना आखली होती. सगळ्यांप्रमाणे तीही मागे पडली. १९५० साली अ. ब. वालावलकर यांनी पुन्हा या विषयाला चालना दिली. त्यांनी मुंबई-बेळगाव-बेंगलोर ही कोकणातून दक्षिणोत्तर जाणारी योजना बनविली होती. त्या नंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. ‘सत्यशोधक’चे सुरुवातीचे अंक असते तर यावर अधिक प्रकाश पाडता आला असता, असो ! सांगायचा मुद्दा हा की, कोकणाचा विकास अशा गतीने होतो आहे. प्रस्तुत विशेषांकात याची साद्यंद चर्चा आपल्याला वाचायला मिळेल. विशेषांकात, ‘रत्नागिरी (सिंधुदूर्गसह) जिल्हा गृहोद्योग विकास समितीचा १९५१ सालचा अहवाल’ दिला आहे तोही सर्वांना उपयुक्त ठरावा.
२०२० च्या दिवाळीत, नितीन लिमये यांचा फोन येईपर्यंत साप्ताहिक ‘सत्यशोधक’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे आमचं लक्ष गेलेलं नव्हतं. २८, २९ डिसेंबर २०१९ ला चिपळूणला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे दुसरे लेखक प्रकाशक साहित्य संमेलन संपन्न झाले. या संमेलनाच्या स्मरणिकेचा संपादक म्हणून आमचा नितीनजींशी आणि पर्यायाने साप्ताहिक सत्यशोधकशी पहिल्यांदा संपर्क आला होता. फोनवरील संभाषणाप्रमाणे २९ नोव्हेंबर २०२१ला नितीनजींना, ‘पत्रकारिता : काल, आज, उद्या, कोकण विकास आणि निवडक सत्यशोधक’ असं मनात तरळलेलं अंकाचं स्वरूप व्हाट्सअॅपवर कळवलं होतं. अंकाचा १५० वर्षांचा लोगो तयार झाला तेव्हा त्यात लोकप्रतिनिधींसाठी ‘कोकण विकास : माझी भूमिका, माझे योगदान’ हा एक विषय वाढवला गेला. अंक अधिकाधिक ‘संग्राह्य’ करण्याकडे नितीन यांचा सुरुवातीपासून कल होता. त्याला अनुसरून लेखकांना विनंती पत्र पाठवण्यासाठीचे नियोजन सुरु झाले. २००२ पासून आम्ही दिवाळीला अनेकांना अंतर्देशीय पत्र पाठवीत असल्याने काही महत्त्वाचे पत्ते संग्रही होते. त्यात विषयानुसार अधिकची भर करून शंभराहून अधिक लेखकांची पत्त्यासह यादी आम्ही नितीन यांच्याकडे सोपविली. पुढचा फॉलोअप त्यांनीच केला. यादीतील सगळ्यांनी लेखन प्रतिसाद दिला असता तर कदाचित हा विशेषांक दोन भागात प्रसिद्ध करावा लागला असता. नव्या-जुन्या मान्यवर लेखकांकडून आलेल्या मजकुराचा अंदाज घेऊन हा ‘नियोजित’ अंक ‘दिवाळी २०२१’ला प्रकाशित करणे आम्हाला टाळावे लागले. ‘दिवाळी अंकांच्या नियमित प्रवाहात हा अंक नसावा’ ही त्यामागची भूमिका होती. त्याचवेळी ‘६ जानेवारी २०२२ ; मराठी पत्रकार दिन’ हा प्रकाशन दिवस ठरवण्यात आला होता. लिहिणाऱ्या लेखकांची नावं असलेली जाहिरात ‘सत्यशोधक दिवाळी २०२१’ विशेष पुरवणी अंकात प्रसिद्ध करण्यात आली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर आज हा अंक प्रसिद्ध होत आहे. ‘कोकण आणि पत्रकारिता’ या दोन विषयांना अनुसरून एक दस्तावेज तयार झाल्याचं समाधान याप्रसंगी आहे.
साप्ताहिक सत्यशोधकने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपलं योगदान
दिलेलं आहे. दीर्घकालीन यशासाठी ‘विश्वास’ हा सर्वात कळीचा मुद्दा असतो.
‘सत्यशोधक’ने तो सांभाळला आहे. हा अंक सत्यशोधकच्या वाचकांना नक्की आवडेल याची
खात्री आहे. कोकणातील नव्या अभ्यासू पिढीला, पत्रकारांना, कोकण
समजून घेण्याची इच्छा असलेल्या, कोकणासाठी काहीतरी करू पाहणाऱ्या सर्वांना यातून ठोस दिशा
सापडेल असा आमचा दावा नाही. मात्र ‘कोणत्या दिशेने जाऊ नये’ हे यातून ठळकपणे
लक्षात येईल. ग. वा. बेहेरे यांच्याच शब्दात सांगायचं तर, ‘पत्रकारिता ही
पत्रकाराच्या रक्तातून वाहायला हवी. रक्तातील या चैतन्याचं आपण गुणगान करीत नाही, ते
चैतन्य आपण क्षणोक्षणी जगत असतो.’ या अंकांच्या निर्मितीतले मागील सहाएक महिने आमच्यासाठी
असेच होते. अंकाचा ‘अतिथी संपादक’ म्हणून नितीन लिमये आणि कुटुंबीयांनी आमच्यावर
जो विश्वास दाखविला, पहिल्यापासून अंकातील विचार आणि त्याच्या निर्मितीसाठी जे ‘स्वातंत्र्य’
दिलं त्याची इथं नोंद करायला हवी. आजच्या पत्रकारितेत अधिक मोकळीक देणारा माध्यमसमूह
सापडणं कठीण असताना इथे ती मिळाली यासाठी आम्ही ‘लिमये’ यांना मनापासून धन्यवाद
देतो आणि ‘सत्यशोधक’च्या पुर्वसुरींनाही विनम्र अभिवादन करतो.
धीरज वाटेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा