गणेशोत्सवात दीड दिवसाच्या बाप्पाच्या सेवेला मूळगावी, असतानाची घटना. सुमारे ऐंशी वर्षे वयाची परिचयातील एक वृद्ध आजी काठी टेकत टेकत बाप्पाच्या दर्शनाला आली. बाप्पाच्या दर्शनाला तिचं येणं ही केवळ एक शारीरिक कृती नव्हती तर ती तिच्या काळात कोकणात वावरलेल्या संपूर्ण पिढीच्या अढळ विश्वासाची आणि संस्कृतीची जिवंत साक्ष होती. गंभीर आजारपणातून उठून, मृत्यूच्या दाढेतून परत येऊनही, तिचे बाप्पाच्या चरणी लीन होणे आणि ‘जे काय पाप झालं आसल ते नष्ट होऊ दे’ म्हणणे, आम्हाला मानवी मनातील शुद्धतेचा परमोच्च बिंदू दर्शवणारे वाटले. आजच्या काळातील पिढीच्या सार्वजनिक भावना आणि कालौघात घटत चाललेले मूल्यवैभव यांच्या अनुषंगाने विचार करताना 'त्या' आजीचं व्यक्त होणं विचारप्रवण करून गेलं.
अधिक माहिती मिळवल्यावर समजलं ज्या म्हातारीची प्रकृती गंभीर होती, गणेशोत्सवाच्या तोंडावर जवळच्या अनेकांना तिची काळजी वाटत होती ती आज बाप्पाच्या समोर उभी होती. वैद्यकीय उपचारांचे चक्रव्युह भेदून, कंबरेच्या असह्य वेदनांवर मात करत जेव्हा ती बाप्पाच्या समोर आली, तेव्हा जणू विज्ञानाचे नियम थिटे पडून श्रद्धेचा विजय झाला असावा. विशेष म्हणजे या वयात तिने उपवास पाळलेला. आम्ही जेव्हा तिला काहीतरी खाऊ घालायचा विचार केला तेव्हा हे कळलं. ‘या वयात आणि उपवास?’ हा प्रश्न आम्हाला पडला. आमच्या पिढीला स्वाभाविक शरीर सांभाळणे प्राधान्याचे वाटते. पण तिला शरीरापेक्षा आत्म्याचे आणि व्रताचे पावित्र्य राखणे अधिक महत्त्वाचे वाटले. त्यामुळे तिचा उपवास केवळ अन्नाचा त्याग नव्हता, तर तो ईश्वराशी जोडलेला एक मूक संवाद ठरला. ती आपल्या क्षीण होत चाललेल्या श्वासांनी बाप्पाच्या चरणी कृतज्ञतेची समिधा अर्पण करत होती. तिची वाकलेली कंबर आणि थरथरणारे हात पाहून ती स्वतःच जणू एक चालते-बोलते मंदिर झालेली, जिच्यात केवळ निस्सीम भक्तीचा दिवा जळत असलेला आम्ही पहिला.
तिच्या तोंडच्या त्या वाक्याने आमच्या मनात सकारात्मक भावनांचा कल्लोळ उसळला. त्या वाक्यात ईश्वरासमोरील शरणागती होती. तिने स्वतःच्या यातनांचे अवगुंठन करून, थेट बाप्पाकडे आत्मशुद्धीची मागणी केलेली. ‘माझे दुखणे बरे कर’ किंवा ‘मला अजून आयुष्य दे’ अशी याचना तिने केलेली नव्हती. नकळतपणे झालेल्या चुकांचे, पापांचे क्षालन व्हावे', अशी तिची भावना झाली होती. आपल्याला संतांनीही अभंगांतून ‘शरण्यत्व’ शिकवलेय, त्याचे रूप आम्हाला आजीच्या बोलण्यात दिसले. तिची पिढी अशाच एकात्मिक आणि निष्पाप भावनेने देवासमोर वावरली. आज कालौघात या भावना कमालीच्या घटत चालल्यात. आजची पिढी ‘दे आणि घे’ (Transactional) या संकल्पनेवर जगते आहे. आज देवाकडे जाणे म्हणजे नवस फेडणे किंवा काहीतरी मागणे एवढेच मर्यादित राहिले आहे. आजच्या गतिमान युगात ‘शरणागती’ ही संकल्पना नष्ट होत चालली आहे. अनेकांना वाटते की आपण पैशाने, विज्ञानाने निसर्गावर आणि मृत्यूवर विजय मिळवू शकतो. पण जेव्हा या आजीसारखी माणसे मरणाच्या दारातून परत येऊन बाप्पा चरणी लीन होतात, तेव्हा आपल्याला जाणीव होते की, माणसाचे अस्तित्व किती लहान आहे आणि ईश्वरी शक्ती किती अथांग आहे. दुर्दैवाने, हा ऐतिहासिक वारसा आणि ही निर्मळ सार्वजनिक भावना या जुन्या पिढीसोबत हळूहळू लोप पावते आहे, ही शोकांतिका आहे.
आजीच्या बोलण्यात आम्हाला मराठीतील बोलीचे वैभव दिसले. त्या साध्या, अशिक्षित वाटणाऱ्या बोलीत जो भाव होता, तो जगातील कोणत्याही मोठ्या विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या ग्रंथात सापडणार नाही. तिच्या शब्दांमध्ये मातीचा सुवास होता. बाप्पाप्रती असीम वात्सल्य होते. आज चैनीच्या वस्तू वाढल्यात, पण समाधानाचा दुष्काळ आहे. आजीकडे शारीरिक शक्ती नव्हती, कदाचित संपत्तीही नसेल. पण तिच्याकडे आपल्या संस्कृतीने शतकानुशतके जतन केलेले ‘श्रद्धेचे अथांग धन’ होते.
धीरज वाटेकर
२ टिप्पण्या:
'आजीच्या श्रद्धे'ची कथा हृद्य तर आहेच, पण अंतर्मुख करणारीही आहे. आपण transaction हा शब्द बरोबर योजला आहे. हल्ली देवळात जाणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं आहे. याचं कारण भक्तिभाव वाढला हे नसून सुबत्ता आणि पापाची भीती हे आहे. वाहनांची संख्या वाढली आणि भक्तांची वर्दळ वाढली. मुबलक पैसा हाती आल्याने अनाचार वाढला. अर्थातच झोप लागेनाशी झाली आणि मनाला टोचणी लागत राहिली. या भीतीपोटी देवाकडे जाणाऱ्याचं प्रमाण वाढलं. ही वस्तुस्थिती आहे. म्हातारीची गोष्ट वाचून यांना काही उपरती होईल तर बरें.
'आजीच्या श्रद्धे'ची कथा हृद्य तर आहेच, पण अंतर्मुख करणारीही आहे. आपण transaction हा शब्द बरोबर योजला आहे. हल्ली देवळात जाणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं आहे. याचं कारण भक्तिभाव वाढला हे नसून सुबत्ता आणि पापाची भीती हे आहे. वाहनांची संख्या वाढली आणि भक्तांची वर्दळ वाढली. मुबलक पैसा हाती आल्याने अनाचार वाढला. अर्थातच झोप लागेनाशी झाली आणि मनाला टोचणी लागत राहिली. या भीतीपोटी देवाकडे जाणाऱ्याचं प्रमाण वाढलं. ही वस्तुस्थिती आहे. म्हातारीची गोष्ट वाचून यांना काही उपरती होईल तर बरें.
टिप्पणी पोस्ट करा