जुलैच्या ‘त्या’ आठवड्यात सह्याद्रीतील निसर्गाने रौद्र तितकेच देखणे रूप धारण केलेले. कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत होता. त्यादिवशी सकाळी, कोकणातील प्रसिद्ध लोककला अभ्यासक प्रा. संतोष गोनबरे आणि नामवंत कवी-भाषा अभ्यासक अरुण इंगवले यांच्या सोबतीने आम्ही चिपळूण-सुपने-तळबीड-तारळे-चिपळूण प्रवासाला निघालो. शिवकाळातील मावळ्यांच्या वंशजांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे, दुर्लक्षित पैलूंचा शोध घेणे आणि इतिहास-वर्तमानाची सांधेजोड करणे हा या प्रवासाचा मुख्य उद्देश होता. मनात केवळ प्रवास नव्हता, तर इतिहासाच्या पाऊलखुणांना स्पर्श करण्याची तीव्र आस होती. भर पावसात केलेला हा प्रवास केवळ भौगोलिक नव्हता, तर तो साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या शिवकाळात घेऊन जाणारा एक संस्मरणीय अनुभव ठरला. चिपळूण सोडताना कोकणचा ओलसर सुवास आणि सह्याद्रीच्या कड्यांवर रूंजी घालणारे धुके आमचे स्वागत करत होते. सध्याच्या जुलैच्या महिन्यात, कोकणातील त्यातल्यात्यात सुरक्षित घाट म्हणजे ‘कुंभार्ली’. डोंगरमाथ्यावरून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे, हिरवागार निसर्ग आणि जणू डोक्यावर कोसळणारे आभाळ. पावसाची संततधार आणि घाटातील धुकं यामुळे प्रवासाचा वेग काहीसा मंदावलेला. मनात शिवकालीन इतिहासाची उत्सुकता होती.
आमचे पहिले उद्दिष्ट होते कराड जवळील 'सुपने' गाव. हे
गाव स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख 'बहिर्जी नाईक'
यांचे निवासस्थान. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या
संरक्षणासाठी आणि आक्रमक मोहिमांसाठी स्वतंत्र गुप्तहेर खाते निर्माण केले होते.
त्याचे प्रमुखपद त्यांनी बहिर्जी नाईक यांच्याकडे सोपवलेले. बहिर्जी नाईक म्हणजे महाराजांचा
तिसरा डोळा. सह्याद्रीची दुर्गम भौगोलिक
परिस्थिती बहिर्जी नाईक यांच्यासाठी सर्वात मोठे शस्त्र ठरली. अफजलखान वाई प्रांतात
येण्यापूर्वीच बहिर्जींनी त्याच्या सैन्याची ताकद, छावणीची
जागा आणि खानच्या हालचालींची अचूक माहिती मिळवलेली. कारतलबखान २०,००० सैन्यासह लोणावळ्याजवळील सह्याद्रीच्या अत्यंत अरुंद उंबरखिंडीतून
चालून येत असल्याची पूर्वकल्पना बहिर्जींनीच महाराजांना दिलेली. या अचूक
माहितीमुळे महाराजांनी गनिमी काव्याने मुघल सैन्याला खिंडीत गाठून पूर्णपणे पराभूत
केले. पुण्याच्या लाल महालात ठाण मांडून बसलेल्या शाहिस्तेखानच्या छावणीची
इत्यंभूत माहिती (महालाचे गुप्त रस्ते, पहारेकऱ्यांची वेळ)
बहिर्जींनी गोळा केली होती. या माहितीच्या आधारे महाराजांनी रात्रीच्या वेळी थेट
शाहिस्तेखानवर यशस्वी छापा टाकला. बहिर्जी हे वेशांतर करण्यात कमालीचे पटाईत व्यक्तिमत्त्व. ते
फकीर,
वासुदेव, भिकारी, कोळी
किंवा संत अशी वेशांतरे करून थेट शत्रूच्या महालात जात. त्यांना भारताच्या विविध प्रांतांतील भाषा आणि
बोलीभाषा अवगत होत्या. सह्याद्रीच्या जंगलात संदेश
देण्यासाठी त्यांनी पशू-पक्ष्यांचे आवाज आणि वाऱ्याच्या रोखावर आधारित एक विशेष
सांकेतिक भाषा विकसित केली होती, जी फक्त त्यांच्या
हेरांना आणि महाराजांना समजत असे. बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर स्वरूपामुळे
त्यांच्या वंशजांची माहिती पूर्णपणे उघड झाली नाही आणि ते महाराष्ट्रात वेगवेगळ्या
ठिकाणी विखुरले गेले.
या महामानवांच्या वंशजांच्या भेटीची भावना अंगावर रोमांच
आणणारी! शिवकाळात सुपने परिसराला 'नाईक' किंवा 'जाधव'
लोकांचे वतन होते. महाराजांनी बहिर्जींच्या कामगिरीवर खूश होऊन
त्यांना सुपने परिसरात जमिनी इनाम दिल्याची नोंद आढळते. त्यांचे मूळ आडनाव
'जाधव' होते. परंतु, महाराजांनी
दिलेल्या 'नाईक' (म्हणजेच प्रमुख / लीडर)
या पदवीमुळे त्यांचे घराणे पुढे 'नाईक जाधव' म्हणून ओळखू लागले. सुपने गावात आमची भेट बहिर्जी यांचे वंशज दादाराम नाईक
जाधव आणि त्यांचे चिरंजीव आबासाहेब यांच्याशी झाली. बहिर्जी नाईक यांच्या १२व्या
आणि १३व्या पिढीतील हे वारसदार. एवढ्या मोठ्या महान योद्ध्याचे वंशज असूनही,
हे घराणे बरीच वर्षे प्रसिद्धीपासून दूर होते. एका साध्या, पण ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या घरात आमचे स्वागत झाले. दादारामजींच्या
चेहऱ्यावरील वृद्धत्वाच्या खुणांमध्ये एक वेगळीच चमक होती, जी त्यांच्या बोलण्यात जाणवली.
ती होती आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची! बहिर्जी नाईक यांच्या ऐतिहासिक स्मृती
आणि घराण्याची माहिती जतन करण्याचे काम हे कुटुंब स्वतःच्या पातळीवर करत आहे. प्रा.
गोनबरे यांनी त्यांच्याशी शाहिरी आणि मौखिक परंपरेच्या संदर्भातून संवाद सुरू
केला. अरुण इंगवले यांनी त्यांच्याकडे असलेल्या वंशावळीचे आवर्जून निरीक्षण केले.
दादारामजींनी सांगितले की, ‘इतिहास पुस्तकात जेवढा आहे,
त्यापेक्षा कितीतरी पटीने तो आमच्या दडलेल्या आठवणींमध्ये आणि
पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टींमध्ये आहे.’ आबासाहेब यांनी आजच्या तरुण पिढीला
या इतिहासाचे महत्त्व कसे पटवून द्यावे, याबद्दल भूमिका मांडली.
इतिहासकारांच्या मते, सांगली जिल्ह्यातील 'भूपाळगड' किल्ल्यावर बहिर्जी ‘नाईक’ यांना वीरमरण
आले. तिथल्या कड्यावर त्यांची समाधी आहे. २५ ऑगस्ट हा दिवस 'नरवीर
बहिर्जी नाईक शौर्य दिन' म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी
बहिर्जी नाईक यांना बाणूरगड (भूपाळगड) येथे वीरमरण आले होते. या ऐतिहासिक घटनेची
स्मृती म्हणून दरवर्षी २५ ऑगस्ट हा दिवस शिवप्रेमी, इतिहास
अभ्यासक आणि त्यांचे वंशज यांच्याकडून 'बहिर्जी नाईक शौर्य
दिन' म्हणून बाणूरगडावर साजरा केला जातो. बाणूरगड गावापासून
ते किल्ल्यावरील बहिर्जी नाईक यांच्या समाधी स्थळापर्यंत 'शौर्य
पालखी सोहळा' काढला जातो. यामध्ये ढोल-ताशांच्या गजरात आणि
भगवे ध्वज घेऊन हजारो शिवप्रेमी सहभागी होतात. गडावरील त्यांच्या मूळ समाधी
स्थळावर या दिवशी महाआरती, शस्त्रपूजन आणि पोवाड्यांचे
सादरीकरण केले जाते. यांची माहिती जाधव यांनी दिली. बहिर्जी यांचे वंशज दादाराम
नाईक जाधव आणि आबासाहेब नाईक जाधव हे या शौर्य दिनाचे मुख्य मानकरी असतात. दरवर्षी
२५ ऑगस्टला हे कुटुंबीय बाणूरगडावर जातात. बहिर्जींच्या नावाने 'गुप्तहेर संग्रहालय' सुरू करण्यासाठी ही मंडळी वंशज
प्रयत्नशील आहेत. जेणेकरून तिथे येणाऱ्या पर्यटकांना शिवकालीन सांकेतिक भाषा आणि
वेशांतराच्या पद्धती समजून घेता येतील. ज्यांच्या
अफाट बुद्धिमत्तेने, वेशांतराच्या कलेने आणि
अचूक माहितीने स्वराज्याला अनेक संकटांतून तारले, त्या
महापुरुषाच्या रक्ताच्या वारसदारांसोबतचा संवाद इतिहास जिवंत करणारा. त्यांच्या
डोळ्यांत आपल्या पूर्वजांबद्दलचा अभिमान आणि स्वराज्याप्रतीची कृतज्ञता स्पष्ट
दिसत होती. ही भेट केवळ औपचारिक न राहता, एक भावनिक संवाद
बनली. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेल्या या शौर्याला प्रत्यक्ष स्पर्श करण्याचा तो
क्षण मनाच्या कोपऱ्यात कायमचा कोरला गेला.
सुपने गावातील समृद्ध संवाद संपवून आम्ही 'तळबीड'ला आलो. तळबीड हे नाव घेताच डोळ्यांसमोर उभे राहतात स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही कालखंडात स्वराज्याचे ‘सरसेनापती’पद भूषवणारे पराक्रमी योद्धा. तळबीडला हंबीरराव मोहिते यांचे भव्य स्मारक असून, त्याचे व्यवस्थापन मोहिते कुटुंब आणि स्थानिक ग्रामस्थ पाहतात. गावात प्रवेश करतानाच एक वेगळीच ऊर्जा जाणवली. येथील ऐतिहासिक स्मारकाची पाहणी करताना अंगात वीरश्री संचारली. ज्या मोहिते घराण्याने स्वराज्यासाठी रक्ताचे पाणी केले, त्यांच्या पराक्रमाच्या कथा तळबीडच्या मातीतून आजही ऐकू येतात असे वाटत होते. स्मारकासमोर उभे राहून जेव्हा आम्ही त्या काळाचा विचार केला, तेव्हा डोळ्यांसमोर घोड्यांच्या टापांचे आवाज, तलवारींची खणखणाट आणि "हर हर महादेव"ची गर्जना घुमल्यासारखा भास झाला. तळबीडमधील प्रत्येक दगड आणि मातीचा कण स्वराज्याच्या त्या जाज्वल्य कालखंडाची साक्ष देत उभा आहे. महाराजांच्या मावळ्यांच्या साऱ्या शूर घराण्यांनी केवळ युद्धे केली नाहीत, तर संस्कृती आणि रयतेचे रक्षणही केले.
मोहिते घराण्यातील वंशज जयाजी (बाबा) मोहिते भेट घेतली. जयाजी हे मराठा साम्राज्याचा अस्सल आणि मौखिक इतिहास जपणारे इतिहासाचा अभ्यास असलेले विलक्षण व्यक्तिमत्त्वाचे तटस्थ अभ्यासक. त्यांना तळबीडच्या समाधीजवळ भेटण्याचा आणि गप्पा मारण्याचा योग आला. त्यांनी आम्हाला तळबीडच्या मूळ जहागिरीचा आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते (हंसाजी मोहिते) यांच्या लष्करी योगदानाचा इतिहास सांगितला. हंबीरराव हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती नव्हते, तर स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही अभूतपूर्व लढाया केल्या. तळबीड हा मोहिते घराण्याचा मुख्य तळ होता. आजच्या पुस्तकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये दाखवला जाणारा इतिहास आणि घडलेला खरा इतिहास यातील तफावत त्यांनी परखडपणे मांडली. ऐतिहासिक पुराव्यांचा अभाव आणि कल्पकतेचा अतिरेक यामुळे इतिहासाची मोडतोड होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या मते, वारसांनी जपलेल्या दंतकथा आणि अस्सल कागदपत्रांचा मेळ घालूनच इतिहास समजून घेतला पाहिजे. तळबीड परिसरातील किल्ले आणि त्यांची भौगोलिक रचना यावर त्यांच्याशी सखोल चर्चा झाली. आजकाल ऐतिहासिक चित्रपट, मालिका किंवा कादंबऱ्यांमधून जो काल्पनिक इतिहास दाखवला जातो, त्याला जयाजी मोहितेंचा विरोध आहे. मूळ इतिहासाची होणारी मोडतोड थांबवून भावी पिढीसमोर पुराव्यांवर आधारित खरा इतिहास जावा, यासाठी ते नेहमी आग्रही असतात आणि तळबीडला येणाऱ्या शिवप्रेमींना याबद्दल जागृत करतात, हे लक्षात आले. त्यांनी सांगितलेल्या इतिहासातील काही अप्रकाशित गोष्टींनी आमचे डोळे विस्फारले. तळबीड हे गाव स्वराज्य निर्मितीमध्ये दोन प्रमुख आहुती देणारे गाव आहे. पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि दुसऱ्या त्यांच्या कन्या रणरागिणी महाराणी ताराबाई. तळबीड येथील हंबीरराव मोहितेंच्या मूळ समाधीस्थळाची निगा राखणे, तेथे येणाऱ्या दुर्गप्रेमींना आणि इतिहास संशोधकांना अचूक माहिती देऊन त्यांचे आदरातिथ्य करणे हे काम जयाजी मोहिते तळमळीने करतात. या संवादात प्रा. गोनबरे यांनी तळबीडच्या शाहिरी परंपरेतील धाग्यांचा वेध घेतला, तर अरुण दादांनी आपल्या संदर्भांतून या भूमीच्या शौर्याला शब्दरूप दिले.
तळबीडचा निरोप घेऊन दुपारनंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. पण हा परतीचा प्रवास सरळ नव्हता, तर तो अधिक दुर्गम आणि ऐतिहासिक स्थळांना स्पर्श करणारा होता. आम्ही 'तारळे' या गावी आलो. तारळे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई राजे महाडिक यांचे ऐतिहासिक गाव. येथील महाडिकांच्या भव्य वाड्याला भेट देणे हा या प्रवासातील सर्वात मोठा भावनिक आणि ऐतिहासिक ठेवा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे पाय रोवताना अनेक बलाढ्य घराण्यांशी रोटी-बेटी व्यवहार करून त्यांना स्वराज्याच्या प्रवाहात सामील करून घेतले होते. तारळेचा वाडा इतिहासात याच कौटुंबिक आणि राजकीय संबंधांचा साक्षीदार राहिलेला आहे. तारळेला पोहोचलो तेव्हा वाड्याचे अवशेष आणि जुन्या भिंती पावसाच्या पाण्यात न्हाऊन निघत होत्या. या वाड्याच्या विटा विटांमध्ये इतिहास दडलेला आहे. न बोलणाऱ्या पण इतिहास जिवंत ठेवणाऱ्या वाड्याच्या भिंतींचे आणि वास्तुकलेचे निरीक्षण केले. काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या असल्या, तरी त्या वाड्याचे वैभव, त्याचे प्रचंड दरवाजे, खांब आणि तिथली वास्तुकला आजही त्या काळातील ऐश्वर्याची आणि राजघराण्याशी असलेल्या संदर्भांची साक्ष देत होती. त्या जुन्या वास्तूच्या आवारात फिरताना, तिथे एकेकाळी छत्रपतींच्या कन्या आणि महाडिक घराण्यातील वीरांचा वावर होता, या विचारानेच मन नतमस्तक झाले. या वाड्याकडे पाहताना जाणवले, ‘अशा अनेक वाड्यात पूर्वी पालख्या, हत्ती, घोडे आणि सैनिकांची वर्दळ असायची, तिथे आज शांतता आहे. परंतु, त्या शांततेत एक वेगळा गौरवशाली इतिहास दडलेला आहे. तो अभ्यासायला मनामनात इतिहास हवा!’
तारळेहून आमचा प्रवास 'सडा वाघापूर' मार्गे 'पाटण'च्या दिशेने सुरू झाला. हा मार्ग म्हणजे निसर्गाचा एक अद्भूत चमत्कार आहे. सडा वाघापूर हा पठारी भाग असून, पावसाळ्यात तिथे संपूर्ण धुक्याची चादर पसरलेली असते, आजही होती. सडा वाघापूरचा विस्तीर्ण पठारी प्रदेश, तिथली शांतता आणि चहुबाजूंनी पसरलेली हिरवळ पाहून मन प्रसन्न झाले. पवनचक्क्यांचे प्रचंड मोठे पंखे धुक्यातून हळूच बाहेर पडताना दिसत होते. एका बाजूला अथांग दऱ्या आणि दुसऱ्या बाजूला कोसळणारा पाऊस. त्या उंच पठारावरून दिसणारा आसमंत मनाला एका वेगळ्याच शांततेचा अनुभव देऊन गेला. इतिहासाच्या गर्दीतून निसर्गाच्या या निवांत कुशीत येणे हा मनाला सुखावणारा अनुभव होता. प्रा. गोनबरे, अरुण(दादा) आणि आमची गाडीत चाललेली चर्चा केवळ इतिहासापुरती नव्हती. शिवकाळातील मावळ्यांचे भौगोलिक ज्ञान किती अफाट असावे? यावर आम्ही विचार करत होतो. अशा दुर्गम आणि पावसाळी वातावरणात मावळे शेकडो किलोमीटरचे अंतर रात्रीतून कसे पार करत असतील? याची कल्पना करूनच आम्ही अवाक झालो. सडा वाघापूरचे पठार ओलांडून पाटणला उतरायला सुरुवात केली की दोन्ही बाजूला खोल दरी आणि उताराचा रस्ता पाहायला मिळतो. स्थानिक लोक या रस्त्याला ‘हत्तीची सोंड’ म्हणतात. या सड्यावरून खाली उतरताना पाटण तालुक्याचे विहंगम दृश्य दिसत होते. कोयना नदीचा परिसर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा पावसाळ्यातील त्या सायंकाळी अधिकच गडद हिरव्या झालेल्या होत्या. चिपळूणच्या डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरणशास्त्र शिकविणारे प्रा. अरुण जाधव आपल्या मेंढोशी गावी लावणीसाठी आलेले. त्यांनी गाडीतील आम्हा परिचितांना अचूक हेरून फोन केल्याने आमची सायंकाळ अधिक संस्मरणीय झाली. त्या थोड्याश्या वेळेतही सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले, भौगोलिक परिस्थितीमुळे आपली आव्हाने सांभाळणारे, एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण आणि डोंगराळ गाव समजून घेता आले.
चिपळूण
ते सडा वाघापूर व्हाया सुपने, तळबीड आणि तारळे हा प्रवास
एका सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक संचिताचा शोध ठरला.
बहिर्जी नाईक यांच्या चातुर्याचे स्मरण, मोहिते घराण्याच्या
तलवारीचे पाणी आणि राजे महाडिक यांच्या वाड्यातील राजेशाही वैभव या सर्वांनी मनावर
एक अमिट पाऊलखूण सोडली. या साऱ्या ऐतिहासिक वारशाचे उपेक्षितपण लक्षात आलं. पुस्तकी इतिहास वाचणं
सोपं पण ज्यांनी तो इतिहास घडवला, त्यांच्या वंशजांच्या डोळ्यांतील भाव वाचणं अधिक महत्त्वाचं! सह्याद्रीच्या
दऱ्याखोऱ्यांत आजही श्रीशिवरायांचा विचार आणि त्यांच्या मावळ्यांचा वारसा जिवंत
आहे. हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत शुद्ध स्वरूपात पोहोचायला हवा. शासनाने किंवा
समाजाने या घराण्यांची योग्य दखल घेणे अजूनही गरजेचे आहे, हे जाणवलं.
आम्ही पाटणला पोहोचलो, तेव्हा काळोख झालेला. संपूर्ण
दिवस पावसात धावपळ करून काहीसा थकवा आलेला खरा, पण मन एका वेगळ्याच समाधानाने आणि
आनंदाने भरून गेलेले. आम्ही आज इतिहासाची अनेक पाने प्रत्यक्ष जगलो होतो.
धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा