मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२६

लिहित्या हातांचे भाग्ययोग

खरंतर कोकणच्या लाल मातीत अक्षरांचे रोपटे रुजवू पाहाणारे आम्ही एक साधे शब्दप्रवासी. मात्र "भाळी संचिताचा असा काही अनुपम सूर्योदय झाला की, नियतीने आमच्या दोन्ही हातांमागे जणू शब्दांचे वरदान उभे केले. जीवनात वडील आणि सासरे हे दोन्ही 'लिहित्या हाताचे' लाभणे, हा आमच्या ललाटी लिहिलेला एक अलौकिक भाग्ययोग ठरला. १९९७ साली, वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी जेव्हा हातांनी लेखणी धरली, तेव्हापासून वडिलांनी आम्हाला शब्दांचे संस्कार दिले. तेच आमच्या शब्द-सृष्टीचे 'आदिगुरू' ठरले. तर २००९मध्ये झालेल्या विवाहबंधनानंतर मागील १७ वर्षांच्या प्रदीर्घ सहवासात सासऱ्यांनी आमच्या नजरेला कोकणच्या मातीतील प्रश्नांचे आणि समाजकारणाचे क्षितिज दाखवून दिले. अक्षरांच्या या पाऊलखुणांवर चालताना आज आम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवतो आहे. ‘पिढ्यांच्या पाऊलखुणां’चे हे कौटुंबिक कोंदण आमच्या लिहित्या हातांचं भाग्ययोग ठरलंय.

"इतिहासाच्या पानांवर पराक्रमाचे वारसे तलवारीच्या धारेने लिहिले जातात. संस्कृतीच्या गाभाऱ्यात विचारांचे आणि संस्कारांचे वारसे हे लेखणीच्या शाईने कोरले जातात.” हे सत्य आहे. तीर्थरूप वडील मच्छिंद्रनाथ तुकाराम वाटेकर हे साहित्य, नाट्य, काव्य आणि कादंबरी आदी मराठी साहित्याच्या विस्तीर्ण प्रांतात मुशाफिरी करणारे कलंदर व्यक्तिमत्त्वाचे धनी राहिले आहेत. आमचे सासरे कै. अरुण दाजी जाधव हे सिद्धहस्त आणि एकटाकी पद्धतीने लेखन करणारे पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार म्हणून ओळखले गेलेत. १७व्या वर्षी वडिलांनी आमच्या नवशिक्या हातांना शब्दांचे बोट धरून चालवायला शिकवले. २००९पासून सासऱ्यांनी, कोकणच्या प्रश्नांकडे एका जागत्या लेखकाच्या आणि पत्रकाराच्या 'जाणत्या नजरेने' बघण्याचा दृष्टिकोन दिला. आज आम्ही जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा आमच्या लेखनात, मांडलेल्या प्रत्येक विश्लेषणात या दोन मार्गदर्शकांच्या विचारांचे प्रतिबिंब आणि त्यांच्या पाऊलखुणा लखलखताना दिसतात. आमचे वडील अक्षरांचे एक अवलिया उपासक आहेत. नाटक, कविता, कादंबरी अशा विविध प्रांतात त्यांनी जी मुशाफिरी केली, ती कोणत्याही मोहाशिवाय, केवळ साहित्यावरील निस्सीम प्रेमापोटी. त्यांची कलंदर वृत्ती म्हणजे शब्दांना लावलेली एक आगळीवेगळी लय होती. वडिलांच्या साहित्यिक जडणघडणीतील सुवर्णकाळ १९७५ ते १९७९ दरम्यानचा, जेव्हा त्यांनी मुंबईतील नामांकित 'मौज प्रिंटिंग प्रेस'मध्ये श्री. पु. भागवत यांच्या हाताखाली काम केले. 'मौज' म्हणजे मराठी साहित्यातील शुद्धतेचे, अभिरुचीचे आणि उत्कृष्टतेचे विद्यापीठ. मौज प्रेसची ती शिस्त, अक्षरांची जुळणी, मुद्रितशोधनातील ती सूक्ष्म नजर आणि साहित्याप्रती असलेली अचूकता वडिलांनी तिथे आत्मसात केली. तीच त्यांनी नकळत आमच्यावर संस्कार म्हणून बिंबवली. आमच्या आयुष्यातील या भाग्ययोगाचा दुसरा महत्त्वाचा कोन म्हणजे सासरे कै. अरुण दाजी जाधव. पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांची लेखनशैली 'एकटाकी' होती. विचार मनात आला की लेखणी थेट कागदावर उतरायची. त्यात कुठेही खाडाखोड नसायची. ही एकटाकी पद्धत त्यांच्या विचारांची स्पष्टता आणि बुद्धीची प्रगल्भता दर्शवणारी होती. पत्रकारितेतील त्यांचे स्थान एका सिद्धहस्त लेखकासारखे होते. २००९ मध्ये आमचे लग्न झाले आणि तिथून पुढे आमची एका नव्या नात्यासोबत एका नव्या वैचारिक सहवासाची सुरुवात झाली. या समृद्ध सहवासात सासऱ्यांनी आम्हाला कोकणकडे बघण्याची एक 'जाणती नजर' दिली. कोकणातील दऱ्याखोऱ्यांचे प्रश्न, येथील उपेक्षितांचे अश्रू आणि समाजाची दुःखं केवळ पाहायची नसतात, तर ती 'जाणत्या नजरेने' टिपायची असतात, हा विवेक त्यांच्यात होता. कोकण म्हणजे केवळ हिरवीगार झाडी, समुद्र किंवा निसर्ग सौंदर्य नाही ; कोकण म्हणजे तिथल्या माणसांचे प्रश्न, तिथली राजकीय-सामाजिक आव्हाने, तिथली उपेक्षा आणि तिथल्या विकासाच्या वाटा आहेत. तालुक्यातील पत्रकारितेचा पाया रचताना त्यांनी कधीही तडजोड स्वीकारली नाही. निर्भीडपणा आणि लोकहित हेच त्यांच्या पत्रकारितेचे सूत्र होते. अध्यात्मात 'ज्ञाना'ला जेव्हा 'कर्मा'ची जोड मिळते, तेव्हाच समाजकल्याण होते. सासऱ्यांत आम्हाला आंतरिक पातळीवर तो 'कर्मयोग' जाणवला. आज आम्ही जेव्हा कोकणातील प्रश्नांवर लिहितो, तिथल्या समस्यांवर बातम्या देतो तेव्हा हा धागा मागे उभा असतो.

आम्ही १७व्या वर्षी लिहायला लागलो, तेव्हा आमचे पहिले वाचक, समीक्षक आणि सर्वात कठोर मुद्रितशोधक (Proof reader) वडील होते. आमच्या लेखनातील र्हस्व-दीर्घाच्या चुका सुधारण्यापासून ते वाक्याची रचना कशी असावी, इथपर्यंतचे त्यांचे मार्गदर्शन हे एखाद्या विद्यापीठीय शिक्षणाइतके श्रेष्ठ राहिले आहे. आमच्या आजवर प्रसिद्ध झालेल्या ९ पुस्तकांचे आणि संपादित केलेल्या पन्नासेक स्मरणिकांचे ते पहिले वाचक राहिलेत. आमच्या कामाची एखादी हस्तलिखित प्रत त्यांच्या हातात जाते, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतील ती कौतुकाची आणि तितकीच साक्षेपी नजर आम्हाला अधिक समृद्ध करत आली आहे. त्यांनी आमच्या भाषेला केवळ व्याकरणशुद्ध केले नाही, तर त्यात एक जिवंतपणा आणला. आज आम्ही जे लेखन करतो, त्यातील वाक्यांची गुंफण आणि भाषेतील जिवंतपणा ही वडिलांनी दिलेली देणगी आहे. लेखनासह विचारांमधील अशुद्धता कमी करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन मौलिक ठरलेय. आजचा काळ हा डिजिटल क्रांतीचा आहे. सोशल मीडिया हे केवळ संवादाचे माध्यम नसून ते जनमताचे आणि वैचारिक मांडणीचे एक प्रभावी व्यासपीठ बनले आहे. आम्ही जेव्हा फेसबुक, ब्लॉग किंवा डिजिटल माध्यमांवर विविध विषयांवर लिहितो, तेव्हा ते लेखन केवळ तात्कालिक प्रतिक्रिया नसते, तर त्यामागे या दोघांच्या मार्गदर्शनाची शिदोरी असते. बातम्या-लेखांमध्ये वस्तुनिष्ठता आणि तळागाळातील प्रश्नांचा वेध असावा लागतो. आपल्याला बातमीमागील बातमी शोधता आली पाहिजे. ही जाणीव सासऱ्यांनी अधिक गडद केली आहे. भाषेला रूपके देणे, उपमांच्या माध्यमातून आशय गडद करणे, हे वडिलांच्या संस्कारांमुळे शक्य झाले आहे. आम्ही संपादन केलेल्या संशोधित, संग्राह्य स्मरणिका आणि पुस्तके जेव्हा कौतुकास पात्र ठरतात, तेव्हा त्या प्रत्येक अक्षरामागे वडिलांची ती चष्मा घालून मुद्रिते तपासणारी आकृती आठवते. ‘अक्षराची जागा चुकता कामा नये’, हा त्यांचा आग्रह आणि "पत्रकाराची लेखणी ही लोककल्याणासाठी चालली पाहिजे" हा सासऱ्यांचा सल्ला पाळण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत आलो आहोत.

आम्हां घरीं धन शब्दांचींच रत्नें । शब्दांचींच शस्त्रें यत्न करूं ॥ १ ॥

शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ॥ २ ॥

तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव । शब्दें चि गौरव पूजा करूं ॥ ३ ॥

असं जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी म्हटलंय. आयुष्यात तुकोबांच्या या विधानाचा प्रत्यय आम्हाला पावलोपावली येत आला आहे. जीवनाच्या प्रवासात दोन अशा व्यक्तींचे छत्र लाभणे, जे केवळ रक्ताच्या नात्याने बांधलेले नाहीत, तर ज्यांचे हात अखंड लिहित्या लेखणीशी जोडलेले होते, हा भाग्याचा सर्वोच्च बिंदू आहे. जीवनात शब्दांचे हे ऐश्वर्य एकाच वेळी दोन कुळांतून वाहून यावे, हा आम्हाला निव्वळ योगायोग नव्हे तर पूर्वजन्माचा सुकृत योग आणि ईश्वरीय संकल्प वाटतो. ‘साहित्य’ ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसते, तर ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणारी जीवनमूल्यांची शिदोरीही असू शकते, हे आम्ही इथेच शिकलो आहोत. नियतीचा नियम अत्यंत कठोर असतो. १७ सप्टेंबर २०२६ला, ऐन गणेशोत्सवात आमच्या डोक्यावरची आणि अक्षरांवरची एक सावली हरपली. सासरे अरुण दाजी जाधव यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने पोलादपूरच्या पत्रकारितेचा एक सुवर्णकाळ संपला, पण आमच्या वैचारिक विश्वात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. १७ वर्षांचा हा सहवास इतक्या घाईने संपेल असे वाटले नव्हते. ज्या हातांनी आम्हाला कोकणच्या मातीकडे अधिक सजगतेने बघायला शिकवले, ज्या हातांनी आमच्या लेखनाला नेहमीच पाठीवर थाप देऊन शाबासकी दिली, ते हात आता अनंतात विलीन झाले आहेत. परंतु, ते जरी शारीरिकदृष्ट्या आमच्यात नसले, तरी त्यांनी आमच्या लिहित्या हातांना दिलेली ऊर्जा, त्यांनी शिकवलेले शब्दसंस्कार कधीही संपणारे नाहीत. ‘पिढ्यांच्या पाऊलखुणा’ शोधताना आम्हाला जाणवले की, मिळालेला हा वारसा केवळ कौटुंबिक नसून ते एक सांस्कृतिक आणि साहित्यिक संचित आहे. यातील एकाने आम्हाला संवेदनशील बनवले, तर दुसऱ्याने सजग आणि निर्भीड बनवले.

जीवनाच्या पटावर प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, परंतु ज्यांच्या प्रवासाची सुरुवात आणि वाटचाल अक्षरांच्या उजळलेल्या प्रकाशात होते, अशांचे भाग्य थोर म्हणावे लागेल. "इतिहास साक्षी आहे की, कोणतीही संस्कृती किंवा विचार एका रात्रीत उभा राहत नाही ; त्याला पिढ्यांच्या तपस्येचे अधिष्ठान लागते. वयाच्या १७व्या वर्षापासून तीर्थरूप वडिलांचे साहित्यविषयक संस्कार आणि लग्न झाल्यापासून सासऱ्यांचे निर्भीड, एकटाकी पत्रकारितेचे संदर्भमूल्य, या दोन्ही प्रवाहांनी आमच्या अंत:करणात अक्षरांचे एक पवित्र तीर्थक्षेत्र निर्माण केले. जीवनात वडील आणि सासरे हे दोन्ही 'लिहित्या हाताचे' लाभणे हा आम्हास एक दुर्मिळ दुग्धशर्करा योग वाटतो. वडिलांनी पेरलेली वाङ्मयीन मूल्ये आणि सासऱ्यांनी गेली दीड दशक दिलेले मौलिक मार्गदर्शन आमच्या जगण्याचा वास्तववादी आणि अमूल्य असा दस्तऐवज आहे. दोघांनी अक्षरांच्या पाऊलखुणांनी आखून दिलेल्या पवित्र मार्गावर चालणारे आम्ही पांथस्थ आहोत. लिहित्या हातांचा हा वारसा जीवनभर तेवत ठेवणे, हीच पिढ्यांच्या या पाऊलखुणांना आमची कृतज्ञ वंदना राहिल.

 

धीरज वाटेकर

पूर्व प्रसिद्धी - दैनिक रामप्रहर (पनवेल) दिवाळी अंक २०२६ 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोष्ट खान्देशी ‘स्टफ्ड कोकोनट’ची

दिवाळीकारणे घरची ओढ मनाला लागलेली असताना ३१ ऑक्टोबरच्या त्या घाईगडबडीने भरलेल्या सायंकाळी इंदोरहून पुण्याच्या दिशेने निघालो. मुंबई आग्रा महा...