शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

कोकणातील निसर्गाची सद्यस्थिती सांगणारे पर्यावरण संमेलन

     महाराष्ट्रातील कृतिशील समाजघटकांनाशिक्षकांनापर्यावरणप्रेमींना एकत्र करून त्यांना ठिकठिकाणची पर्यावरण सद्यस्थिती अवगत करून देत जाणीव जागृतीचे काम सातत्याने पुढे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्याजेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या संस्थेचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने चौथे पर्यावरण संमेलन दिनांक १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूण शहरात संपन्न झाले. पर्यावरण संवर्धनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे संमेलन का ? व कशासाठी ? याची मांडणी करताना, कार्य करत राहाण्यातून आदर्श स्थिती आणि वस्तुस्थिती यातलं अंतर कमी होण्यास मदत होत असल्याची मांडणी करण्यात आली. पहिली तीनही संमेलने राळेगणसिद्धी येथे यशस्वी झाल्यानंतर कोकणात होणाऱ्या चौथ्या संमेलनाबाबत राज्यातील जिज्ञासू पर्यावरण प्रेमींमध्ये कमालीचा उत्साह होता. त्या उत्साहाला सर्वांगीण पातळीवर कायम उंचावित उद्घाटन सत्रापासून मार्गदर्शन सत्रे, स्थानिक पर्यावरण भेटी, कोकणी खानपान, निवास, निसर्ग आदिंमुळे चौथे संमेलन संस्मरणीय झाले. त्याचा आढावा.

समस्यांच्या भस्मासूरावर मात करायची असेल तर तर लोकजागृती प्रभावीपणे व्हायला हवी. याची पक्की जाणीव असलेले मंडळाचे अध्यक्ष ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांनी आपल्या शिक्षकी कारकीर्दीत, ४० वर्षांपूर्वी  पर्यावरणीय कामास प्रारंभ केला. निवृत्तीनंतर अधिक सक्रीय होत त्यांनी पर्यावरण संमेलन घ्यायला सुरुवात केली. पुढची पिढी घडविण्यात ‘शिक्षक’ या समाजघटकाचे असलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना वर्तमान स्थितीची अधिकाधिक सजगतेने जाणीव करून देत संवर्धन विषयक जनजागृती व्हावी या हेतूने ही संमेलने घेतली जातात. अण्णासाहेब हजारे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली तीन संमेलने राळेगणसिद्धी येथे यशस्वी झाल्यानंतर पर्यटनभूमी अशी ओळख असलेल्या कोकणात संमेलन घेताना इथले पर्यावरण, त्यात काम करणाऱ्या हातांची ओळख, पर्यावरणाची पूर्व आणि सद्यस्थिती, कोकणात, चिपळूणात होणारी वृक्षतोड, जलप्रदूषण, वायुप्रदूषण हे गंभीर बनलेले प्रश्न, चिपळूणातील जैवविविधतेचे दर्शन, चिपळूणाल्या दळवटणे भागात तत्कालिन सैन्याला उद्देशून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या पर्यावरण संदर्भातील विचार सांगणाऱ्या ऐतिहासिक पत्राची मांडणी संमेलनाच्या व्यासपीठावरून व्हावी असे उद्देश समोर ठेवून संमेलनाचे नियोजन करण्यात आले होते. या विषयात संमेलनस्थळी झालेले संवाद, मांडले गेलेले मुद्दे, पर्यावरणात काम करणाऱ्या वक्त्यांचे अनुभवकथन आदि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडसह बीड, जालना, औरंगाबाद, नांदेड, पुणे, अहमदनगर, नाशिक, सांगली, सातारा येथून आलेल्यांना भावल्या. दिनांक १ नोव्हेंबर रोजी दुपारनंतर राज्यभरातून पर्यावरणप्रेमी चिपळूणात हॉटेल आम्रबन परशुराम येथे दाखल व्हायला प्रारंभ झाला. खुद्द संमेलनाध्यक्षांच्या उपस्थितीत रात्री भोजन समयी परिचय सत्र संपन्न झाले. ‘पर्यावरणासह पर्यटन विकास’ या सूत्राने काम करणारी ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ ही संस्था संमेलनाची संयोजक राहिली. निमंत्रक धीरज वाटेकर यांनी संपूर्ण संमेलनाचे सूत्रसंचालन केले.

संमेलनाचा उद्घाटन समारंभ दिनांक २ रोजी सकाळी १०.४५ ते २.१५ दरम्यान संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. उमेश मुंडल्ये (प्रख्यात जल आणि देवराईतज्ज्ञ), उद्घाटक भाऊ काटदरे (खवले मांजर तज्ज्ञ कमिटी सदस्य, आय.यु.सी.एन. स्पेसीज सर्व्हायव्हल कमिशन आणि अध्यक्ष, सह्याद्री निसर्ग मित्र संस्था, चिपळूण) प्रमुख पाहुणे विजयकुमार ठुबे (माजी महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ), परशुराम करावडे (कार्यकारी अभियंता, एम.आय.डी.सी., रत्नागिरी), स्वागताध्यक्ष श्रीराम रेडिज (उद्योजक आणि अध्यक्ष, ग्लोबल चिपळूण टुरिझम), वृक्षमित्र आबासाहेब मोरे (अध्यक्ष, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ), विलास महाडिक (उपाध्यक्ष, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ), मंडळाचे सल्लागार अॅड. सुभाषराव डांगे होते. सुरुवातीला धीरज वाटेकर यांनी संमेलनस्थळ आणि यापूर्वीच्या तीन संमेलनांतील अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाचा आढावा घेतला. यंदाचे पर्यावरण संमेलन संपन्न होत असलेले चिपळूण शहर हे कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचे शहर आहे. परशुराम भूमी अशी ओळख असलेल्या या शहरात यापूर्वी अखिल भारतीय, जलसाहित्य, बोलीभाषा, बालकुमार, कामगार, समरसता, शतकोत्तर ग्रंथालये, लेखक-प्रकाशक अशी जवळपास पंचवीसएक प्रकारची संमेलने, कोकण पर्यटन महोत्सव संपन्न झाले आहेत. इथला श्रोता हा सजग आणि बहुश्रुत आहे. या शहराचे सामाजिक भान अतिशय उत्तम आहे. इथल्या मातीत कार्यरत असलेल्या काही मान्यवरांना संमेलनकाळात आपल्या सर्वांच्या समोर आणण्याचा आमचा मानस आहे. पर्यावरणातील कार्यक्षम विचार समजून घेण्यासाठी संमेलनात सहभागी झालेल्या आपल्या सर्वांचे स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ५०० निमंत्रित शिक्षक प्रतिनिधींचे, पर्यावरणस्नेही कृतीशील समाज घटकांना प्रेरणा देणारे दोन दिवसीय पहिले पर्यावरण संमेलन राळेगणसिद्धी येथे आदरणीय अण्णासाहेब हजारे यांच्या अध्यक्षतेखाली ११ व १२ नोव्हेंबर २०१६ मध्ये संपन्न झाले. मंडळाचे दुसरे राळेगणसिद्धी पर्यावरण संमेलन दिनांक २७, २८ ऑक्टोबर २०१७ ला, दिनांक १० ते २० नोव्हेंबर २०१८ दरम्यान तिसरे पर्यावरण संमेलन आणि राज्यातील ८० पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचा भूतान : आंतरराष्ट्रीय निसर्ग व पर्यावरण अभ्यास दौरा यशस्वीरित्या संपन्न झाल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनाचे उद्घाटक भाऊ काटदरे आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्जवलन झाल्यानंतर अण्णांच्या संदेशाचा व्हिडीओ दाखविण्यात आला.

          स्वागताध्यक्ष श्रीराम रेडिज यांनी आपली भूमिका मांडली.  ते म्हणाले, पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढीस लागलेली आहे. ही चांगली बाब आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या कोकणाला गेल्या ४/५ दशकांपासून पर्यावरणीय समस्यांनी ग्रासले आहे.सन १९८० ते २००० या काळात कोळसा तयार करण्यासाठी इथल्या जंगलांचा नाश झाला. अमर्याद तोडीमुळे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या. सन १९८४ ते १९८७ दरम्यान जंगल वाचविण्यासाठीही देवरुख येथील पुरोगामी युवक संघटनेच्या पुढाकाराने कोकणात मोठे आंदोलन उभे राहिले. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (क्रमांक २२६७/१९८७) दाखल झाली. यामुळे कोकणातील भट्ट्यांवर बंदी घातली घेतली ती आजही कायम आहे. संजीव अणेराव, दादा जाधव, कै. विलास होडे, राजीव सरफरे यांनी हे आंदोलन केले होते. सन २००१ ते २०१० काळात राजकीय आशीर्वादाने कोकणात वृक्षतोड सुरु झाली. कारखान्याच्या बॉईलरला लागणाऱ्या लाकूड व जळावू कीटा याकरिता ही वृक्षतोड झाली. याहीवेळेस सह्याद्री बचाव आंदोलन काही स्वयंसेवी संघटनांनी आवाज उठविला. मोर्चे, उपोषणे, माहितीचा अधिकार यांद्वारे प्रयत्न सुरु झाले. यात श्रीराम रेडिज, संजीव अणेराव, राजन इंदुलकर, दादा जाधव, सुनिता गांधी आदिंचा सहभाग होता. दोन वर्षे हे आंदोलन चालले. कोकणातील चारही जिल्ह्यात वृक्षतोड बंदी झाली. दिनांक १९ मार्च २०१० रोजी ही मंडळी मुंबई-गोवा महामार्गावर बेमुदत साखळी उपोषणाला बसली. विधिमंडळात यावर चर्चा झाली. त्रिसदस्यीय समिती नेमली गेली. विधिमंडळात अहवाल सादर झाला. अहवाल मात्र धूळ खात पडलेला आहे. जंगल माफियांचे हित जपण्यासाठी हे घडले. कोकणात वारेमाप होणारी जंगलतोड थांबायला हवी. जंगल राखण्याकरिता शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट द्यायला हवे. शतकोटी वृक्ष लागवडीसारखा दिखाऊ कार्यक्रम घेण्यापेक्षा वृक्षतोड थांबवावी. इथल्या रासायनिक कारखानदारीमुळे जल, वायू आणि भूपृष्ठावरील प्रदूषण वाढलेले आहे. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा ते महाड परिसरातील सावित्री, खेडची जगबुडी, चिपळूणची वाशिष्ठी अशी कितीतरी नावे सांगता येतील. हे सारे चिंताजनक आहे. प्रसिद्ध पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी आपल्या पश्चिम घाट अहवालात या नद्यांना विषनद्याम्हटले आहे. मनमोहक वाशिष्ठी प्रदूषणाची बळी आहे. लोटे एम.आय.डी.सी. परिसरातील गावे वायू-जल-भूपृष्ठ प्रदूषणाने त्रस्त आहेत. कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी खाडीत सोडल्याने मासेमारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. इथले नागरिक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळयांच्याकडे तक्रारी करतात. ते यावर कठोर कारवाई करणार का ? हा प्रश्न आहे. इथल्या सी.ई.टी.पी.च्या नियंत्रणाबाबत गंभीर तक्रारी आहेत. खाडीपट्यात फेरफटका मारून स्थानिकांशी बोलल्यास याची जाणीव होते. दाभोळ खाडीतील जैवविविधता मृतावस्थेत गेली आहे. कोकणात पर्यटनाच्या संधी वाढत आहेत. ४५ कि.मी.ची वाशिष्ठी खाडी, त्यातला निसर्ग आधारभूत मानून ग्लोबल चिपळूण टुरिझमकार्यरत आहे. वाशिष्ठी नदीत कोयनेचे स्वच्छ अवजल सोडले जाते. मात्र चिपळूणच्या चारही बाजूला असलेले डोंगर तोडले गेल्याने खाडी गाळाने भरलेली आहे. गाळ काढला जायलाच हवा आहे. मात्र पुढाऱ्यांचे फक्त गाळ काढण्याकडे लक्ष आहे. पर्यावरणाचे नुकसान होते आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्ह्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणाची समिती असावी. सह्याद्रीत जंगल माफियांनी केलेल्या रस्त्यांवर डांबर टाकले तर स्टेट हायवे होतील. हे रस्ते अडीच हजार फुटांवर आहेत. पावसाळ्यानंतर जिल्ह्यातून प्रतिदिन १०० ते १५० ट्रक लाकूड घाटावर, मुंबईत जाते. यात गुंतलेल्या सर्वांना तुडुंब पैसे मिळतात. या तोडीकरिता परजिल्ह्यातून माणसे आणली जातात. अन्नाचा तुटवडा भासल्यास ती सरसकट शिकार करतात. हा ह्रास न परवडणारा आहे. वाशिष्ठीचा गाळ काढणे, पर्यटकांना कायम बोटिंग करता यावे याकरिता खासदार हुसेन दलवाई यांचे समक्ष आत्तापर्यंत पाच वेळा पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि अधिकाऱ्यांशी बैठका होऊनही काहीही उपयोग झालेला नाही. आपापल्या गावात पर प्रांतातून, जिल्ह्यातून आलेल्या लोकांची नोंद ठेवणे हे पोलीसपाटील, तंटामुक्ती अध्यक्ष याचे काम आहे ते होत नाही. जे.सी.बी., पोकलेनसारख्या अवजारांनी सह्याद्रीचे लचके तोडेलेले आहेत. जंगल तोडीची पाहणी करण्यासाठी काही वर्षांपूर्वी आपण वन्यजीव अभ्यासक निलेश बापट यांच्यासह सह्याद्रीत गेलो असता स्थानिक लोकांनी रस्त्यात मोठे दगड टाकून रस्ता अडविला होता. लोकं आपल्याला मारायच्या तयारीने आलेली होती. पोलिसांची गाडी वेळेत आल्याने आपण बचावल्याचे रेडिज यांनी सांगितले. पर्यावरण वाचविण्यात, वाढविण्यात आपण काय करू शकतो याचे मंथन व्हावे. तुटत चाललेली जंगले, गाळाने भरलेल्या, प्रदूषणाने व्यापलेल्या नद्या या समस्यांची उकल होण्याकरिता या व्यासपीठाचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी प्रास्ताविक करताना संमेलन ठराव मांडले. कार्बन क्रेडिट, जलप्रदूषण, प्लास्टिक, वृक्षतोड बंदी, ग्लोबल वॉर्मिंग संबंधी ठराव चौथ्या पर्यावरण संमेलनात मंजूर करण्यात आले. कार्बन क्रेडिट : आपल्या महाराष्ट्रात पारंपरिक वनशेती व्यतिरिक्त स्थानीय पिकांसोबत सांगड घालून वनशेतीच्या विविध पद्धतींची म्हणजेच कृषी वनशेती पद्धतीची शिफारस अनेक विद्यापीठांनी केली आहे. वनेतर क्षेत्रावर (पडीक जमीन, शेतीक्षेत्र) वृक्ष लागवडीस प्रोत्साहन मिळावे म्हणून शेतकरी करीत असलेल्या प्रयत्नाचे क्रेडिट त्याला मिळायला हवे, हे क्रेडिट केवळ शाब्दिक स्वरूपाचे न राहता त्याला आर्थिक मोबदला मिळण्याची व्यवस्था निर्माण करून तज्ज्ञांच्या सूचनेनुसार कार्बन क्रेडिटसंकल्पना राबविण्यासाठी यशस्वी प्रयत्न व्हायला हवेत, अशी मागणी हे संमेलन करीत आहे. जलप्रदूषण : जलप्रदूषण ही सर्वात मोठी समस्या बनून राहिलेली आहे. ज्या निसर्गरम्य चिपळूण भागात हे पर्यावरण संमेलन होते आहे त्या भागातून बारमाही वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीसह राज्यभरातील सर्व प्रदूषित नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी, त्यांच्या प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी शासनाने, तज्ज्ञांच्या सल्यानुसार तातडीने आवश्यक ती पाऊले उचलावीत अशी मागणी हे संमेलन करते आहे. प्लास्टिक बंदी : मुंबईसह राज्यभरात दिवसाला अंदाजे १२०० मेट्रिक टन प्लास्टिकचा घनकचरा निर्माण होतो आहे. प्लास्टिकचं पूर्णपणे विघटन होण्यास अनेक दशकांचा कालावधी लागतो. प्लास्टिकचा राज्यासह देशभरातील सागरी जैवविविधतेवरही मोठा परिणाम होतो आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घ्यावा. भविष्याचा विचार करून या निर्णयाची कठोर अंमलबजावणी व्हावी, अशी आग्रही मागणी हे संमेलन करीत आहे. वृक्षतोड बंदी : वृक्षतोडीसाठी परवानग्या देत असताना पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या स्थानिक स्वंयसेवी संस्थांना विश्वासात घेतले जावे, अशी मागणी हे संमेलन करीत आहे. कोकणात, राज्यात आणि देशभरात आजही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते आहे. वृक्षतोड करताना फक्त झाड तोड हाच मुद्दा लक्षात न घेता त्या वृक्षाच्या सभोवतालच्या जैवविविधतेचे अवलोकन करणे गरजेचे आहे. तोडलेल्या वृक्षावर वन्यजीव, पक्षी यांचा अधिवास असल्यास, वृक्षतोडीत त्यांचा मृत्यू होणे, त्यांचा अधिवास नष्ट होणे निसर्ग नियमाला धरून नाही. राज्यातील शहरात वृक्षसंवर्धन कृती समिती स्थापन करणे, या समितीत वृक्षप्रेमींचा सहभाग घेतला जावा अशी मागणी हे संमेलन करीत आहे. ग्लोबल वॉर्मिंग : गेल्या अनेक वर्षांपासून आपण वाढते तापमान, महापूर अनुभवतो आहोत. अतिपाऊस, वादळे, उष्णलहर, शीतलहर आता हा नित्याचाच भाग बनला आहे. या विषयात काम करणाऱ्या संस्थांच्या अभ्यासानुसार, मागील शतकातील पृथ्वीच्या सरासरी तापमानापेक्षा सध्याच्या तापमानाच्या सरासरीत खूप वाढ झाली आहे. यामुळे ओझोन थर विरळ होणे, बर्फ वितळणे, समुद्रपातळी वाढणे, उष्ण हवामान होणे, जैवप्रजाती नष्ट होणे, अन्नसुरक्षेचा धोका, आरोग्याचे धोके निर्माण होत आहेत. निसर्गाच्या दूर जाणारी आपली जीवनपद्धती बदलून ती अधिकाधिक 'इको फ्रेंडली' करण्याची गरज आहे. यासाठी तज्ज्ञांच्या सूचनेनुसार समतोल कार्यवाही व्हावी, अशी मागणी हे संमेलन करीत आहे. उपाययोजना स्थळानुरूप असाव्यात : पर्यावरण संवर्धन होण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकास प्रक्रिया आणि उपाययोजना स्थळानुरूप असाव्यात, अशी मागणी हे संमेलन करीत आहे.

ठरावासंदर्भात बोलताना परिवर्तन संस्थेचे अशोक कदम यांनी दोन अधिक ठराव मांडले. ते म्हणाले, शेती, भाजीपाला, गुरेढोरे यांची उत्पादन क्षमता जवळपास ६० टक्यांनी घसरलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यातले आपले श्रम कमी केल्याचे ते म्हणाले. लवेल, दाभीळ, सातवीण, असगणी भागात रासायनिक कारखानदारीद्वारे एम.आय.डी.सी. विस्तारू पाहतेय. तिथल्या स्थानिकांनी लोट्यातील कारखानदारी आमच्याकडे नको म्हणून गेली १५ वर्षे लढा दिला आहे. लोकं रासायनिक कारखाना उभारू देणार नाहीत, हे निश्चित आहे. लोकांना पाणी विकत घ्यावे लागते आहे. येथे संशोधन झाले. सी.ई.टी.पी. उभा राहण्यामागचा लढा त्यांनी सांगितला. सी.ई.टी.पी. जसा चालायला हवा तसा चालत नाही. हे योग्य नाही असे त्यांनी सांगितले. लोटे औद्योगिक विस्तार क्षेत्र विकसित होणार आहे, त्यात स्थानीय लोकसंघटनांच्या मागण्यांप्रमाणे एकही रासायनिक कारखाना सरकारने आणू नये. प्रदूषण विरहित कारखाने आणावेत. आणि इथले स्थानिक लोक सध्या पर्यटनाकडे नवा आर्थिक स्त्रोत म्हणून पाहात आहेत. त्या पार्शभूमीवर इथला सी.ई.टी.पी. मोठा करण्याचा विचार आहे. प्रदूषित पाणी कारखान्यांनी खाडीत न सोडता त्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी कारखान्यांनी त्यांच्या बागबगीचा, झाडे-झुडूपांसाठी वापरावे. म्हणजे खाडी प्रदूषणाचा प्रश्न संपेल हे दोन ठराव त्यांनी मांडले. सर्व ठरावांना अॅड. सुभाष डांगे यांनी अनुमोदन दिले. मंडळाच्या पदाधिकारी, पर्यावरण क्षेत्रात गेली २५ वर्षे योगदान देणाऱ्या सौ. प्रियावंदा तांबोटकर (उरण-रायगड) आणि श्रीपरशुराम सानिद्ध्य निसर्ग पर्यटन केंद्राच्या संचालिका सौ. नूतन विलास महाडिक (चिपळूण) यांना पर्यावरण मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. परशुराम करावडे, विजयकुमार ठुबे, भाऊ काटदरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

यानंतर निसर्गाचा वारसा सांगणाऱ्या देवरायांचे अभ्यासक, जलतज्ज्ञ, संमेलनाध्यक्ष डॉ. उमेश मुंडल्ये यांनी सुमारे तासाभर आपली भूमिका मांडली.  नैसर्गिक स्त्रोतांसाठी आपण शासनावर अवलंबून राहाता कामा नये. महाराष्ट्रात वृक्ष लागवड करण्याऐवजी जंगलाचे छोटे छोटे पट्टे तयार केले पाहिजेत. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने आपल्या गावात ही चळवळ उभी केली पाहिजे. आपल्या पर्यावरणीय उपाययोजना या ‘स्थळानुरूप’ असाव्यात. त्यात स्थानीय लोकसहभाग, योग्य अनुभवी तंत्रज्ञान मार्गदर्शन असावे, असे मत त्यांनी मांडले.  मान्सूनचा कालावधी संपूनही वेगवेगळ्या कारणांमुळे पाऊस अजुनही अनेक ठिकाणी पडतोच आहे. त्यामुळे शेतीचं नुकसानही झालं आहे. नागरी भागातील लोकांना या विस्तारित पावसामुळे मानसिक त्रास होतो आहे. याचं खापर पडणाऱ्या पावसावर फोडून आपण राग, संताप, निराशा व्यक्त करत आहोत. मात्र सध्या वातावरणात जे बदल आपण अनुभवतोय ते एका वर्षात घडलेले नाहीत. हे बदल गेली कित्येक वर्षं हळूहळू घडतायत. त्याकडे दुर्लक्ष करणं आत्ता आपल्याला किंमत मोजायला लागल्यावर कळायला तर लागलंय. हे आपल्याच (माणसाच्या) कर्तृत्वामुळे आहे हे बहुसंख्य लोकांना माहिती नाही किंवा पटत नाही. आपल्याकडे येणारा मान्सून ही एक वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक घटना आहे. दूर समुद्रातून येणारे वारे ढग बरोबर आणतात आणि अनुकूल वातावरण मिळतं तिथे पाऊस पडतो. यात वाऱ्यांची दिशा, वेग, ताकद, कमी किंवा जास्त दाबाचे पट्टे तयार होणं, तापमानवाढीमुळे त्यावर परिणाम होणं, इत्यादि अनेक घटक कारणीभूत असतात, असे मुंडल्ये यांनी सांगितले. विकास करताना आपण यंत्रांवर आणि तंत्रज्ञानावर अतिविश्वास ठेवताना पर्यावरणातील समतोल या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलंय. इतकं, की आपल्या अभ्यासक्रमातही याबाबत काही ठोस माहिती मिळत नाही. केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून हे कसं होतं ते सांगितलं जातं. त्यावर कशामुळे बरावाईट परिणाम होऊ शकतो आणि हे का होतं ? याबद्दल काही शिकवलं जात नाही. याचा परिणाम म्हणजे सर्वसामान्य लोकांमधे त्यांच्या जगण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या विषयाबद्दल नावड तयार होते. त्याचं महत्त्व समजावून सांगितलं न गेल्याने आपण नक्की काय करायचंय ? हेच सामान्य माणसाला त्याच्या शिक्षणाच्या काळात कळत नाही. त्या वयात हे न शिकल्याने, उर्वरित आयुष्यात या सर्व गोष्टींचा माझ्या वागण्याशी काय संबंध ? हा प्रश्न मनात घेऊन खूप मोठा वर्ग जगत असतो. या विषयातील जाणीव जागृतीसाठी खरंतर माध्यमांनी पुढाकार घेऊन काम करणं अपेक्षित आहे. पण आपल्याकडे हे माध्यमे केवळ मनोरंजनाचे साधन मानली जातात. त्यामुळे अशा गंभीर नैसर्गिक बदलांकडे लोकांचं लक्ष वेधून त्यात जागरूकता आणणं हे करण्यापेक्षा राजकारण, खेळ, सिनेमा, सिरीयल्स जास्त महत्त्वपूर्ण ठरतात. त्यातही वेगळेपणा दाखवण्यासाठी काहीही करायची तयारी असणारे भरपूर झाल्याने बहुतेक गंभीर प्रसंगांचा विनोद होऊन जातो. त्यामुळे सर्वसामान्य माणूस सत्यापासून आणखी लांब जायला सुरूवात होते, असे मुंडल्ये म्हणाले. आत्ताही पडणारा पाऊस खरंतर आपल्याला, भविष्यात काय घडणार आहे त्याची सूचना देतो आहे. आपण मात्र सरकार, प्रशासन आणि सर्वात मोठा शत्रू पाऊस असल्यासारख्या प्रतिक्रिया देतो आहोत. जगातल्या सोडाच  आपल्याला आपल्या देशातील, राज्यातीलही पर्यावरणात चालू असलेल्या घडामोडीही माहिती नसतात. आपल्याला हेही माहिती नसतं की ओरिसामध्ये अनेक गावं समुद्राच्या आक्रमणामुळे पाण्याखाली गेली, अनेकदा विस्थापित करावी लागली. आज ओरिसातील साधारण ३०% किनारपट्टी या आक्रमणाच्या धोक्याखाली आहे. आपल्याला हेही कोणी सांगत नाही की कोकणात देवबाग किंवा भोगवे यासारख्या गावांमध्येही समुद्र आक्रमण करतो आहे. अगदी दादरसारख्या शहरातील किनाऱ्यावरील महापौर बंगल्याच्या भिंतीला समुद्रामुळे धोका निर्माण होतो आहे. समुद्राचं भरतीचं पाणी रस्त्यावर कचरा घेऊन येते आहे. हिमनग वितळून पूर येणं, जंगलतोडीमुळे डोंगर खचणं आणि नद्या गाळाने भरून जाणं, मानवी प्रदूषणामुळे नैसर्गिक स्त्रोत कमकुवत होणं आणि नष्ट होणं, इत्यादि मानवाच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक गोष्टी बिघडताना बघितल्या आणि त्याबद्दल असलेलं समाजामधील अज्ञान बघितलं की धडकी भरते. नळ चालू केल्यासारखा येणं आणि बंद केल्यासारखा बंद होणं हे पावसाच्या बाबतीत शक्य नाही हे लक्षात घेऊन आपण याच्या मूळ कारणांकडे लक्ष देऊन त्यावर उपाय केले तरच काही सकारात्मक बदल शक्य आहे. ही जबाबदारी केवळ सरकार आणि प्रशासनाची आहे, असं म्हणून त्यांच्यावर टीका करणं पुरेसं नाही. समस्येची मूळ कारणं दूर करण्यासाठी मी आणि आम्हीकाय करतोय ? करणार आहोत ? हे ठरवणं आणि प्रत्यक्ष करणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींसाठी प्रत्यक्ष कामात लोकसहभाग आवश्यक आहे. तरंच त्याचा दबाव सरकार, प्रशासन, उद्योग आणि समाजातील बेफिकीर लोक यांच्यावर राहील. त्याचा परिणाम पर्यावरणामधील बदलांवर दिसून येईल. विकासाचा पर्यावरणावर परिणाम होतंच असतो. कचरा करणारे, अशा कार्यक्रमांना येत नाहीत. आपल्याकडे जमीन, नैसर्गिक स्त्रोत मर्यादित आहेत. नैसर्गिक स्त्रोतांचा बेसुमार वापर होतो आहे. पाणी ही सरकारने द्यावयाची गोष्ट आहे, हे आपल्याला कळायला हवे आहे. प्रदूषणाशिवाय औद्योगिकरण शक्य नाही. शेतजमिनीची बिनशेती वाढते आहे. भारताच्या एकूण पैकी ४०% धरणे महाराष्ट्रात आहेत, तरीही इथे शेतकरी आत्महत्या करतो आहे. आपण १२८ एम.बी. वरून १२८ जी.बी.वर पोहोचलो आहोत. पण या चीप खाऊन आपण जगणार आहोत का ? हा प्रश्न त्यांनी विचारला.

उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात सह्याद्री निसर्ग मित्र संस्था, चिपळूणचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी ‘धोक्यातील वन्यजीवन आणि आपण’ या विषयावर मार्गदर्शन केले. आज सर्वत्र निसर्गसाखळी तुटल्यामुळे वन्यजीवन धोक्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या कामात स्थानिकांचे योगदान महत्वाचे आहे. आपल्या २७ वर्षांच्या कामाकडे वळून पाहताना स्थानिकांना उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत मिळवून दिल्यास पर्यावरण संवर्धन शक्य असल्याचे काटदरे म्हणाले. निसर्गसाखळी तुटल्यामुळे अनेक गोष्टी आपल्याकडे घडतात. जागतिक पातळीवर पर्यावरण विषयात काही संस्था काम करतात. ह्या संस्था दुर्मीळ झालेल्या प्राण्यांची नोंद ठेवतात. कोकणातही प्राण्यांची नोंद होत असते. सह्याद्री निसर्ग मित्र सुरुवातीला शासनाला पत्र पाठविण्याचे काम करायची. पुढे कामाचे स्वरूप व्यापक होत गेलं. समुद्र काठावर आढळणारा सागरी गरुड यावर संस्थेने पहिल्यांदा वर्षभर काम सुरु केले. तेव्हा शासन ४ म्हणत असताना तेव्हा यांना गरुड पक्षांची ६२ घरटी मिळाली. नेमकेपणाने अभ्यास केल्यास हे समोर येऊ शकते हे सिद्ध झाले. त्यासाठी मोठ्या झाडांची आवश्यकता लक्षात आली. काही लोकांना हे पटले. त्यातून पुढे १०५ घरट्यांचे संरक्षण करण्यात संस्था यशस्वी झाली. वेंगुर्ले रॉक या ठिकाणी असलेल्या स्वीफ्ट पक्षांची (भारतीय पाकोळी) तस्करी होत होती. वार्षिक ५० लाखांचा व्यापार होता. हा प्रकार संस्थेने उघडकीस आणला. यावर न थांबता ह्या पक्षांना शासनाला वर्ग १ मध्ये आणायला भाग पाडलं. सन १९९० दरम्यान गिधाडांची संख्या कमी झाली होती. संस्थेने त्यावर काम केले. इंजेक्शने टोचूनही, दुर्दैवाने मेलेल्या जनावरांना गिधाडांनी खाल्ले तर अडचणी निर्माण होत असल्याचे लक्षात आले. हे पक्षी काही ठिकाणी घरट्यात बसायचे, पण अंडी घालायचे नाहीत. संस्थेनी याचाही अभ्यास केल्याचे ते म्हणाले. कालांतराने संस्थेने या पक्षांच्या खाद्याच्या उपलब्धतेसाठी केलेल्या कामाविषयी त्यांनी सांगितले. समुद्रावर फिरताना कासवांची घरटी दिसली. त्यावर काम सुरु झाले. कॅमेरा उपयोगात आणला. अभ्यास केला. तेव्हा यांना खाद्य मिळत नाही. उपासमार होते. अंडी कोल्ह्यांनी खाल्याचे लक्षात आले. सुरुवातीला कोणाचीही मदत मिळत नव्हती. नंतर यातून ओलिव्ह रिडले कासवाचा प्रकल्प आणि नंतर कासव महोत्सव जन्माला कसा आला याची कहाणी त्यांनी सांगितली. सन २००६ साली कासव महोत्सव सुरु झाला. सुरुवातीला अंदाज घेऊन लोकांना बोलावलं. वेळास गावात तेव्हा नातेवाईक वगळता कोणी येत नव्हता. पण लोकं येऊ लागले. स्थानिकांना रोजगार मिळू लागला. कासवांची पिल्ले जगू लागली. ८०० लोकसंख्या असलेल्या त्या गावात आज ५५ घरात पर्यटकांची राहाण्याची सोय होते. सन २०१४ पासून शासन, स्थानिक ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने हे काम सुरु झाले. आज कोकणात अनेक ठिकाणी हे काम सुरु आहे. परिणामस्वरूप ६० ते ७०% कासवे वाचू लागलीत. स्थानिक माणसाला जेव्हा त्याचा फायदा, उत्पनाचे साधन दिसले, तेव्हा तो नक्की पुढे येतो. हे यातून स्पष्ट झाले. आज हे काम संपूर्ण महाराष्ट्रात काम सुरु आहे. आतापर्यंत १ लाख कासवे सोडण्यात यश मिळालेले आहे. कासवांच्या संदर्भातला एक धडा ९ वीच्या पाठ्यक्रमात आहे. दरवर्षी १६ लाख मुले याचा अभ्यास करतात. जंगल तोडू नका, हे सांगणं आणि त्याची लोकचळवळ बनविणे सोपे काम नाही. त्याचाही प्रयत्न संस्था करते आहे. कासवानंतर संस्थेने खवले मांजर याकडे लक्ष दिले. जगात सर्वात जास्त शिकार खवले मांजरची होते. याच्या खवल्याना चीनमध्ये प्रचंड मागणी आहे. त्याचा औषधात वापर होतो. त्याकाळात ४/५ जीवंत खवले मांजर विकताना पकडली गेली. खवले मांजर ही दुर्मीळ आणि धोक्यात आलेली प्रजाती असल्याचे जाहीर झाले. त्यांची शिकार आणि चोरटा व्यापार होत असल्याने संस्थेने गेली ३ वर्षे हे काम सुरु केले आहे. आय.यु.सी.एन.च्या रेड डेटा लिस्ट मध्ये हा प्राणी आहे. खावल्यांमुळे बंदुकीची गोळीही त्याला लागू शकत नाही. रत्नागिरी जिल्ह्यात संस्था या प्राण्याच्या संवर्धनाचे काम करते आहे. खवले मांजराचे पिल्लू ३ महिन्यानंतर आपल्या पिल्लाला पाठीवर घेऊन फिरते. मुंग्या, वाळवी खाऊन जगते.आज याबाबत संस्था सर्वेक्षण, जनजागृती, विद्यार्थी व युवकांसाठी विशेष जागृतीचे कार्यक्रम करते आहे. याबाबत सातवीच्या पुस्तकात याचा धडा आलेला आहे. १६ लाख मुलांपर्यंत पोहोचायला मदत झाली आहे. गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी १२ खवले मांजरांचे स्थानिकांच्या मदतीने संवर्धन झाले आहे. हे मोठे यश असल्याचे काटदरे म्हणाले. प्राण्यांचे, पक्ष्यांचे संवर्धन झाले पाहिजे, ते वाचले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली. कुठेही खवले मांजर दिसले की कळवा असे आवाहन त्यांनी केले. भारतातले कासव या विषयातले सर्वोत्तम काम आपल्याकडून झाल्याचे त्यांनी नमूद केले.

दुसऱ्या सत्रात निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी ‘सुगंध वसुंधरा रक्षणाचा’ या विषयावर भूमिका मांडली. कचऱ्याचा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे उग्र रूप धारण करतो आहे. त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली न जाणे हे त्यामागचे कारण आहे. मात्र बहुतांश प्रकारच्या कचऱ्याचा पुनर्वापर करता येतो. निवेदिता प्रतिष्ठानने हे स्वतःच्या प्रयोगांतून सिद्ध केले आहे. प्लास्टिक कचऱ्यापासून बाकडे, स्टूल, फुटपाथ, कंपाउंड वॉल, टिकाऊ विटा तयार केल्या आहेत. असे प्रतिपादन जलनायकप्रशांत परांजपे यांनी केले. आपल्याकडचे प्लास्टिक आमच्याकडे जमा करा, आम्ही ते उपयोगात आणू असे परांजपे यांनी सांगितले. डम्पिंग ग्राउंड मुक्त नगरपालिका होण्यासाठी सर्वांची एकत्र साखळी तयार व्हायला हवी. प्लास्टिक हे  ५००/१००० डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाळल्यानंतर त्यातून धूर, वास, प्रदूषण होत नाही. त्याचे लवकर विघटन होते. अशातून दापोलीत कचऱ्यावर वीजनिर्मिती होऊन बालोद्यानामध्ये असलेले दिवे पेटवलेले आहेत. हा एक आशेचा किरण दिसू लागला असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला थर्माकोल उपयोगात आणता येतो. त्यापासून उत्तम इंधन, गम तयार करता येते. हा गम २०० रुपये किलोने विकता येतो. बांधकामाला उपयोगी वीट तयार करता येते. अशा विटांचे उत्पादन पुण्यात सुरु आहे. आपले प्लास्टिक पाण्याची बाटली मुक्त व्हायला हवे. त्याला असणारे पर्याय आपण वापरायला हवेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. आजही खेडेगावातला माणूस दुकानात जाऊन ‘कोलगेट मिसवाक द्या’ असं म्हणतो. इतका जाहिरातीचा प्रभाव आहे. काम करताना आपण हे लक्षात घ्यायला हवं आहे. ते राबवित असलेल्या वृक्ष वाढदिवस संकल्पनेविषयी बोलले. गाव पातळीवर जैवविविधता समिती गठीत व्हायला हवी. प्रदूषणमुक्त, वणवामुक्त गाव व्हायला हवे. आपला विकासाला विरोध नाही. मात्र निसर्ग जपला गेला पाहिजे. यासाठी आपण वसुंधरादूत म्हणून काम करायला हवे अशी भूमिका त्यांनी मांडली. बहुतांश प्रकारच्या कचऱ्याचा पुनर्वापर करता येतो. प्लास्टिक कचऱ्यापासून बाकडे, स्टूल, फुटपाथ, कंपाउंड वॉल, टिकाऊ विटा तयार करता येतात. प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्यांपासून गिफ्ट आर्टिकल्स, थर्माकोलपासून गोंद (ग्ल्यू), फ्लेक्स-बॅनरपासून ऑफिस फोल्डर तयार होतात. अशी माहिती त्यांनी दिली. संस्थेने टाकाऊ प्लास्टिकपासून तयार केलेल्या विटांची उपयुक्तता सिद्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेने दापोलीत रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत प्लास्टिक संकलन केंद्र सुरू केले आहे. प्लास्टिकच्या पाण्याच्या आणि थंड पेयांच्या बाटल्या आणि ज्याप्रमाणे आपण इस्त्रीला कपडे देतो त्याप्रमाणे प्लास्टिकचा स्वच्छ केलेला कचरा स्वीकारला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील हे पहिलेच संकलन केंद्र असून, या केंद्राकडे स्वच्छ प्लास्टिक कचरा देऊन निसर्गरक्षणाचे एक वर्तुळ आपण पूर्ण करू शकतो असे परांजपे म्हणाले.

राज्यात प्रसिद्ध असलेल्या चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष, नामवंत इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे यांनी ‘शिवकालीन पर्यावरणीय विचार’ या विषयावर बोलताना उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. भारतीय संस्कृतीने कायमच पर्यावरणाचा विचार दिलेला आहे. चिपळूण जवळच्या दळवटणे येथील सैन्यदलाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले पत्र जगभरात भाषांतरित करून दर्शनी लावलं जायला हवं. आदर्श राज्य कसं असावं ? याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे पत्र आहे. पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणाचा विचार करणारी शिवकालीन नीती अवलंबायला हवी, असे देशपांडे म्हणाले. ते पुढे म्हणाले, अत्यंत पवित्र भूमीत संमेलन होते आहे. भगवान परशुरामांच्या दर्शनाला छत्रपती शिवाजी महाराज चिपळूणला आलेले होते. राज्याभिषेकापूर्वी एक महिना त्यांचा इथे मुक्काम होता. चिपळूणच्या रामेश्वराजवळ अंघोळ करून गांधारेश्वरचे दर्शन घेऊन ते परशुरामला आले होते. असे देशपांडे यांनी सांगितले. भारतीय परंपरेने आपल्याला पर्यावरणाचा विचार दिलेला आहे. हे आजचं नाही, आपल्या बहुसंख्य प्राथर्ना निसर्गाशी निगडित आहेत. काले वर्षतु पर्जन्य, पृथ्वी सस्यशालिनी । देशोयं क्षोभ रहितः सज्जना सन्तु निर्भया ।। अर्थात पृथ्वीवर वेळेवर पाऊस होऊ देत. पृथ्वी हिरवीगार राहू देत. आपला देश संकटांपासून दूर राहू देत. सगळे सुखाने नंदू देत. आपले सण निसर्गाशी संबंधित आहेत. सावित्री-यम संवाद हा पर्यावरणाशी संबंधित आहे. त्यात ‘अकारण वृक्ष तोडू नका. नदीमध्ये घाण करू नका’ असं म्हटलं आहे. आपल्या भारतीय नौसेनेचे बोधचिन्ह ‘शन्नो वरुण’ असे आहे. ‘ती पर्जन्य देवता आमचं रक्षण करो’, असं म्हटलेलं आहे. आपल्या जीवनाचे ४ भाग ब्रम्हचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, सन्यास. यातला वानप्रस्थ हा खरा वनप्रस्थच असायचा. याचा अर्थ जंगलात राहायचे. महाभारतात युद्ध संपल्यानंतर सगळे जंगलात राहिले होते. ईस्लामचा धर्म ध्वज हिरवा आहे. तिथे प्रचंड वाळवंट आहे. म्हणून हिरवळीचे प्रचंड आकर्षण. माणसाला जगण्यासाठी निसर्गाची गरज आहे. वन वाघाचं आणि वाघ वनाचं रक्षण करतो. असं वचन पूर्वी होतं. शिवकालीन समर्थ रामदासांनीही ‘गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनि चालली बळे | धबाबा लोटती धारा | धबाबा तोय आदळे’ असे म्हटलेले आहे. मुक्तेश्वर यांनीही, विद्युल्लतांचे कडकडाट गगनगर्जना गडगडाट गंगा सरितांचे संघात महापूर मातले ! असे वर्षाकालाचे सुंदर वर्णन केले आहे. पृथ्वी ही शिवपिंडीका, पर्वत शंख त्या शाळुंखा इंद्रे मांडिले अभिषेखा पूर्णपात्रे बहुधारा ! १७ व्या शतकात होऊन गेलेल्या वामन पंडित यांनी सुद्धा, वनी खेळती बाळ ते बल्लवांचे। तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे असं म्हटलेलं आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षिणी सुस्वरे आळविती' असं संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याचे देशपांडे म्हणाले.

मानवाचं निसर्गाशी आतुट नातं आहे. आपण मान्सूनची वाट बघत असतो. दुष्काळाची भीषण वर्णनं आपल्याला इतिहासात भेटतात. शिवाजी महाराजांनी पर्यावरणाचा बारकाईने विचार केलेला होता. याचे शिवचरित्रात उल्लेख आहेत. छत्रपतींचा जन्म १६३० सालचा ! १६३० साली प्रचंड मोठा  दुष्काळ पडला होता. धान्य महाग महाग तैसे तीही मिळेना ! कैसे होईल होईल, होईल कळेना ! अशी स्थिती होती. एका होनाला (सोन्याचे नाणे) सहा पायली धान्य मिळत होतं. माणसं माणसाला खातील अशी अवस्था आलेली होती. लोकं गावं सोडून गेलेली होती. दुष्काळी स्थिती सावरल्यावर ती परत येत. महाराजांकडे पुन्हा त्या भूभागाची, सहकार्याची मागणी करत. नुसतं दाट जंगल असेल नी माणसं नसतील तर चालणार नाही हाही विचार जुन्या काळात होता. शेतकरीवर्गाचे ‘मृगसाल’ प्रमाणित धरून शिवरायांनी आपला ‘शिवशक’ सुरू केला. त्या समयास ५ सप्टेंबर १६७६ रोजी प्रभावळीच्या सुभेदार रामाजी अनंत यास पाठविलेल्या पत्रामध्ये शिवराय सांगतात, ‘....त्या उपरी रयेतीस तवाना करावे आणि कीर्द करवावी हे गोस्टीस इलाज साहेबी (शिवरायानी) तुज येसा फर्माविला आहे की कष्ट करून गावाचा गाव फिरावे ज्या गावात जावे तेथील कुलबी (कुणबी) किती आहेती जे गोला करावे त्यात ज्याला ते सेत करावया कुवत माणुसबल आसेली त्या माफीक त्या पासी बैलदाणें संच आसीला तर बरेत जाले. त्याचा तो कीर्द करील. ज्याला सेत करावयास कुवत आहे. माणूस आहे आणि त्याला जोतास बैल नांगर पोटास दाणे नाही. त्यावीण तो आडोन निकामी जाला असेल तरी त्याला रोख पैके हाती घेऊन दोचो बैलाचे पैके द्यावे. बैल घेवावे व पोटास खंडि दोन खंडि दाणे द्यावे. जे सेत त्याच्याने करवेल तितके करवावे.’ शेतकऱ्यांचा, कामकऱ्यांचा ऐसा राजा होणे नाही, अशा या प्रसिद्ध पत्राचा संदर्भ दिला. पर्यावरण संदर्भात काही जुन्या शिवकालिन संदर्भांचा आधार मिळतो. शिवछत्रपतींच्या काळात लिहिल्या गेलेल्या लेखनात ' झाडांचे महत्व थोर आहे', असे ते म्हणाले. दुर्गम राजधानी राजधानी रायगड करण्यामागे पर्यावरणीय विचार आहे. रयतेचे भाजी देठास हातही लावू न द्यावा हा विचार करणारे राजा शिवछत्रपती होते. चिपळूण जवळच्या दळवटणे येथे महाराजांची १० हजारावर फौज होती. आजही शहरात तत्कालिन हत्तीमाळ, पागा हे शब्द वापरात आहेत. यावेळी दिलेल्या पत्रात राजांनी, ‘...कोण्ही कुणव्याचे दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करु लागले म्हण्जे जे कुणबी घर धरुन जीव मात्र घेउन राहिले आहेत, तेही जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्यास ऐसे होईल की मोगल मुलकांत आले त्याहूनही अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल.’ असे म्हटल्याचे त्यांनी नमूद केले. नंतरच्या काळातही कान्होजी आंग्रे यांनी बाणकोट ला सागवानाची लागवड केलेली होती. समुद्रातील जहाजे बनविण्याकरिता ते लाकूड लागायचे. दुर्दैवाने पुढे इंग्रजांनी ते साग ते तोडले. आजही बाणकोटला यातील काही दिसतात असे ते म्हणाले.

गेली २५ हून अधिक वर्षे सह्याद्रीत डोळस भटकंती करणारे नामवंत वन्यजीव अभ्यासक निलेश बापट यांचे सह्याद्रीतील वैविध्यता हे चौथे सत्रही संस्मरणीय ठरले. लोकांनी निसर्गातला चमत्कार बघावा, अशी जंगलात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. या भागात सह्याद्री टायगर रिझर्व्ह होतोय. हा प्रकल्प चिपळूणच्या जवळ आहे. जंगल वाचविण्याकरिता प्रयत्न व्हायला हवेत. जंगल हे चालत चालत बघायचं नसतं तर जंगल बघत बघत चालायचं असतं आणि हे जंगलात सातत्याने चालायला लागल्यावर समजतं. झाडाच्या मुळापासून शेंड्यापर्यंत घडणाऱ्या हालचाली वर्तमानपत्रासारख्या वाचता यायला हव्यात. नुसता पेपर चाळलात तर जंगलं आणि त्यातल्या गमतीजमती समजणार नाहीत. जंगल वाचायचे, वाचवायचे असेल तर जंगलाच्या जवळ राहणाऱ्या लोकांच्या सानिध्यात जायला हवे बापट म्हणाले. त्यांनी सुरुवातीला, कोकणच्या सांस्कृतिक राजधानीत आमच्या सारख्या जंगलात काम करणाऱ्या अभ्यासकांना, पर्यटक आल्यानंतर त्यांना सहज माहिती देण्यासाठी आवश्यक असलेली थिएटर सुविधा, बसायला जागा उपलब्ध नसल्याचे सांगून खंत व्यक्त केली. असे असले तरीही तरीही इथली पोरं हुशार आहेत. पदरमोड करून हे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती आणि ज्ञान यात फरक आहे. अनुभव महत्वाचा आहे. माहितीच्या आधारे आज निसर्गावर लिहिलं जातंय, प्रत्यक्षात निसर्गात काहीतरी वेगळ घडत आहे. असे सांगून, ‘निसर्गासाठी जर काही करायचे असेल तर ते मलाच केले पाहिजे’ अशी शपथ त्यांनी उपस्थितांना दिली. अशा कार्यक्रमांना वय ४०/५०च्या पुढची लोकं असतात. तरुण मुलं कमी असतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धन यशस्वी होट नाही. आजही पर्यावरणात काम करणाऱ्या मुलांची संख्या हजारी दहा इतकीच आहे. आमच्यासोबत काम केलेली मुलं आज कोळ्यांवर, मुंग्यांवर संशोधन करतात. अंदमान सारख्या भागात जाऊन जारव्हा नावाच्या मुंगीवर काम करतात. टिटवीच्या डोळ्याला झालेल्या मोतीबिंदूवर उपाययोजना करताना पाहून समाधान वाटतं असं ते म्हणाले. आम्ही टूर ऑपरेटर नाही. आम्ही जंगल, जैवविविधता समजावून सांगतो. सह्याद्रीत वैविध्यता सर्वत्र आहे. चिपळूणची स्थिती बेसिनसारखी आहे. शहराला चारही बाजूने डोंगर आहे, घाट आहेत. चिपळूण हा गुजरात ते केरळ दरम्यानचा सह्याद्रीचा तुकडा आहे. महाबळेश्वर ते आंबा घाट असे कोयना जंगल आहे. पुढे चांदोली अभयारण्य आहे. ही दोन्ही जंगले सह्याद्री टायगर रिझर्व्ह अंतर्गत आहेत. यातल्या काही भागात जायला सध्या बंदी आहे. कोयना जलाशयात खूप माश्यांच्या जाती आहेत. सह्याद्रीत पूर्वी आम्ही डॉक्टरांची टीम नेऊन लोकांची तपासणी करायचो. कारण हेच की सह्याद्रीत माणसं राहायला हवीत. तेव्हा ती लोकं प्राणी मारून खायची. त्यांना जीवनसत्व कमी पडायची. आम्ही त्यांना बीयाणे दिली. त्यांनी त्याची लागवड झाली. आता लोकं यातून चांगुलपणाने बाहेर आलीत. आपण माणसाने जंगलासाठी, बाहेर राहून काम केलं पाहिजे. उन्हाळ्यात पाणी खाली जातं, डोंगर रिकामे होतात. आपण शासनाच्या मदतीने पाणवठ्याचे काम सुरु केले. प्राणी अधिक खाली जाऊ शकत नाहीत. त्यांचे शत्रू वाढतात. प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या लिटमस पेपरच्या कार्याप्रमाणे पक्षांना निसर्गातील बदल लवकर कळतात. पक्षी बघणं आणि निरीक्षण करणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. पक्षी लिटमस पेपरसारखे अॅक्ट होतात. त्यांचा अधिवास गेल्याने अडचणी वाढतात. आपल्याकडे साफसफाई करणारे काही पक्षी आहेत. शक्यतो सुगरण पक्ष्याचे घरटे घरात ‘शो’साठी आणून लावू नका. एका पक्षाने सोडलेले घरट्याचे वेस्ट मटेरीअल हे दुसऱ्यासाठी बेस्ट मटेरीअल असते. जंगलातून फक्त आठवणी घेऊन बाहेर येत चला ! असे ते म्हणाले. यावेळी पक्षांच्या पाय, चोचींचे प्रकार त्यांनी मांडले. वळचणीच्या जागा कमी झाल्या म्हणून चिमण्या कमी झाल्या. आपण टाकलेल्या कचऱ्यामुळे पक्षांच्या पायांना रोग झालेले आहेत. पक्षांचा पंखावर विश्वास असतो. तो सकाळी पंख साफ करतो. ते दिवसातून तीन वेळा अंघोळ करतात. खेडेगावातील लोकं आपल्या ज्ञानाप्रमाणे पक्षांना नावे देतात. ‘भारद्वाज’ला विदर्भात याला ‘नपिता’ म्हणतात. आपण नावासाठी शास्त्रीय आग्रह धरायला हवा असे बापट म्हणाले. यावेळी बापट यांनी स्लाईड शो द्वारे अनेक पक्षांविषयी माहिती दिली.

संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सत्रात पर्यावरणप्रेमींनी शहरातील लोटिस्माच्या अश्मयुगकालीन आणि कोकणातील जुन्या संस्कृतीचा ठेवा असलेल्या कोकणातील एकमेव वस्तूसंग्रहालयास भेट देऊन कोकणची संस्कृती समजावून घेतली. आमच्यासोबत मित्र समीर कोवळे यांनी याबाबत उपस्थितांशी संवाद साधला. या नंतर सर्वांनी ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’च्या ५ बोटींच्या सहाय्याने मनसोक्त संचार करणाऱ्या मगरी, केरळच्या बॅकवॉटरचा कोकणात आनंद, रम्यखाडी, संथ पाणी, किनाऱ्यावरची टिपिकल किनारवर्ती गावं, किनाऱ्याला बिलगलेले डोंगर, मध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटं, त्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, विविध प्रकारच्या पक्ष्यांची ये-जा आणि तितकीच रम्य प्राचीनता अनुभवली. क्रोकोडाईल सफारीचा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा वाशिष्ठी बॅकवॉटर हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. खाडीतील नैसर्गिक वातावरणात सर्वांना मगर पाहाता आली. खाडीत पाण्याच्या ठिकाणी आढळणारे पक्षी आणि काही दुर्मीळ पक्ष्यांचं दर्शनही अनेकांना झाले. वाशिष्ठी ही कोकणातली एक महत्त्वाची नदी आहे. तिची एकूण लांबी सुमारे ७० किलोमीटर आहे. ती पूर्णपणे रत्‍नागिरी जिल्ह्यातूनच वाहते. सह्याद्रीतल्या रत्नागिरी-सातारा जिल्हा सीमा जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात, घाटमाथ्यावरील झोका दगडाला लागून असलेल्या खोल दरीत तिचा उगम, किल्ले गोविंदगड याचीही माहिती देण्यात आली. मराठी भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांची 'तुंबाडचे खोत' ही द्विखंडी कादंबरी याच खाडीच्या वातावरणात रमलेली आहे. तुंबाडच्या खोत घराण्याच्या इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश आमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतल्या अंतिम दशकात, स्वातंत्र्य प्राप्तीच्या प्रसंगी म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षाचा प्रदीर्घ कालखंड या कादंबरीचा गाभा आहे. चित्रविचित्र इतिहासांच्या मार्गक्रमणात पदोपदी असंख्य स्वभावविशेष, व्यक्तींच्या स्वाभाविक संघर्षातून निष्पन्न होणार्‍या अनेक घटना, पुन्हा एक व्यक्ती दुसरी सारखी नाही. एकूण काळ सव्वाशे वर्षाचा असला तरी स्थळ मात्र एकच - तुंबाड आणि तुंबाडचा परिसर आहे. हा परिसर वाशिष्ठी आणि खेडहून येणाऱ्या जगबुडी नदीच्या संगमावर आहे. श्री. ना. पेंडसे यांनी अजरामर केलेला तुंबाड किनारा, विविध बेटे आणि दोन्ही तीरावरील विविधता सर्वांना पाहाता आली.

संमेलनाचा समारोप सायंकाळी एसआर. जंगल रिसॉर्ट धामणवणे येथे झाला. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष श्रीराम रेडिज, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, पुण्याच्या प्रा. अल्का गव्हाणे, सिंधुदूर्गच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रणिता पाताडे, पर्यावरणप्रेमी रणजित पाताडे, अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे, उपाध्यक्ष विलास महाडिक, निवृत्त वनपाल सावंत, संमेलनाचे निमंत्रक धीरज वाटेकर उपस्थित होते. यावेळी प्रा. तारा काबरा, प्रा. अनिल लोखंडे, अॅड. सुभाष डांगे, कचरू चांभारे, गोरखनाथ शिंदे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रणिता पाताडे आणि रणजित पाताडे या दाम्पत्याचा यावेळी सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्यात मंडळाचे काम वाढविण्यासाठी जिल्ह्याध्यक्ष म्हणून आगामी काळात आपण निश्चित प्रयत्न करू, लोकजागृतीसाठी कार्यरत राहू अशा भावना यावेळी जबाबदारी देण्यात येऊन रणजित पाताडे यांचा सन्मान करण्यात आला. या संमेलनामुळे, राज्यातील पर्यावरण प्रेमींना, कोकणातील पर्यावरणाची समस्या समजून घेता आली. संमेलनातील वक्त्यांच्या उद्बोधक मार्गदर्शनामुळे पर्यावरण संवर्धन विषयात कोकणात सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती मिळाल्याच्या भावनाही व्यक्त झाल्या. स्वागताध्यक्ष श्रीराम रेडिज यांच्या उद्घाटन सत्रातील परखड भाषणाचे सर्वांनी कौतुक केले. प्रभाकर तावरे यांनी या प्रसंगी बोलताना, कचऱ्याच्या समस्येवर भाष्य केले. आगामी काळात जगबुडी ही कचऱ्याने होईल अशी स्थिती असल्याची व्यथा त्यांनी मांडली. आपल्या वापरातले प्लॅस्टिक बंद करा अशी आग्रही सूचनाही त्यांनी केली.

आबासाहेब मोरे यांनी बोलताना पर्यावरण संवर्धन विषयातील जाणीव जागृतीचा हा यज्ञ आपल्या सर्वांच्या पाठबळावर यशस्वी होत असल्याचे सांगून हे पाठबळ भविष्यात कायम राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींच्या व्यवस्थापनात मंडळाचे सचिव प्रमोद मोरे, कार्यालयीन सचिव तुकाराम अडसूळ यांनी मोलाचे योगदान दिले. ग्लोबल चिपळूणचे व्यवस्थापक विश्वास पाटील, उद्योजक जयसिंगराव जवक, अॅड. सुभाषराव डांगे, प्रा. पोपळघट, प्रा. सुभाष वाखारे, गोरखनाथ शिंदे, विलास शेडाळे, संतोष दिवे, निवृत्त वनपाल सावंत, बाळासाहेब कणके, प्राचार्य शोभा भालसिंग, प्रा. श्रीम. काब्रा यांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

धीरज वाटेकर
निमंत्रक
चौथे पर्यावरण संमेलन चिपळूण

चौथे पर्यावरण संमेलनाचे उद्घाटन करताना भाऊ काटदरे (खवले मांजर तज्ज्ञ कमिटी सदस्यआय.यु.सी.एन. स्पेसीज सर्व्हायव्हल कमिशन आणि अध्यक्षसह्याद्री निसर्ग मित्र संस्थाचिपळूण), सोबत
जल आणि देवराईतज्ज्ञ
संमेलनाध्यक्ष डॉ. उमेश मुंडल्येविजयकुमार ठुबे (माजी महाव्यवस्थापकमहाराष्ट्र राज्य वखार महामंडळ), परशुराम करावडे (कार्यकारी अभियंताएम.आय.डी.सी.रत्नागिरी)स्वागताध्यक्ष श्रीराम रेडिज
(
उद्योजक आणि अध्यक्षग्लोबल चिपळूण टुरिझम), वृक्षमित्र आबासाहेब मोरे
(
अध्यक्षनिसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ)
आणि 
विलास महाडिक
(
उपाध्यक्षनिसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ)

स्वागताध्यक्ष श्रीराम रेडिज

 मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे

ठराव मांडताना परिवर्तन संस्थेचे अशोक कदम

कार्य अहवालाचे प्रकाशन करताना मान्यवर

संमेलानाध्यक्षांचा सन्मान करताना स्वागताध्यक्ष श्रीराम रेडिज
आणि मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे

 राज्यभरातून उपस्थित पर्यावरणप्रेमी

धोक्यातील वन्यजीवन आणि आपण’ यावर बोलताना भाऊ काटदरे

 सुगंध वसुंधरा रक्षणाचा’ यावर बोलताना प्रशांत परांजपे

शिवकालीन पर्यावरणीय विचार’ यावर बोलताना प्रकाश देशपांडे

सह्याद्रीतील वैविध्यता’ यावर बोलताना निलेश बापट


मंडळाचे सदस्य सिंधुदुर्गचे पाताडे दाम्पत्याचा सन्मान
क्रोकोडाईल टुरिझम आणि वाशिष्ठीतील जलसफर

क्रोकोडाईल टुरिझम आणि वाशिष्ठीतील जलसफर

दैनिक सागर दिनांक १७ नोव्हेंबर २०१९
समारोपास उपस्थित पर्यावरणप्रेमी


                  संमेलनाचे निमंत्रक, ब्लॉग लेखक 

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...