मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

नैसर्गिक आपत्ती युग : गांभिर्याचा घाऊक अभाव दुर्दैवी !!!


निसर्ग हे शाश्वत, संतुलित आणि चिरंतन सत्य आहे. निसर्ग दयाळू नाही. दुष्ट असावा असं वाटत नाही. या दोन्ही मनुष्य भावना आहेत. भविष्यात मानवासह प्राणी, पक्षी, झाडे, किडे आदि विविधता नष्ट झाली तरी निसर्गाला किती फरक पडेल ? तो स्वतःत सहज बदल करून घेईल, पुढे जात राहिलं. सूर्योदय आणि सूर्यास्त होतंच राहीलं. पृथ्वीवरील निसर्गाचा एखादा अंश कमी झाला म्हणून निसर्ग संपत नसतो. एखादा भाग वाढला म्हणून तो वाढतही नसतो. निसर्गाला चांगला आणि वाईट आपण बनवतो. नदीचे गटार आपण करतो. तिच्याकडे पाहून नाके मुरडतो. स्वच्छ पाण्याच्या नदीचे कौतुक करतो. वाळवंट, घनदाट जंगल ही निसर्गाचीच रूपे आहेत. त्याच्या निर्मितीमागे निश्चित कारणे आहेत. ती समजून न घेता, परिणामांचा अभ्यास न करता, पर्यायी व्यवस्था न देता गेल्या काही शतकांपासून होत असलेली निसर्गाची लयलूट स्वतःला या भूमीवरील सर्वात विद्वान म्हणविणाऱ्या मानवी मूळावर उठली आहे. निसर्गावर कुरघोडी करीत आपण विकासाचे इमले उभारतो आहोत. निसर्गात ‘ढवळाढवळ’ केल्यामुळे आपण नैसर्गिक आपत्ती युगाचा सामना करीत आहोत. त्यातही गांभीर्याचा ‘घाऊक’ अभाव असल्यामुळे बदल न घडल्यास विकासाच्या इमल्यांचा तोल ढळणार आहे. कधी ? आणि कसा ? हे विधीलिखित कुणाला ले आहे ?

आपली पृथ्वी महाकाय आहे. वाढणारी झाडे, पक्ष्यांचा किलबिलाट, त्यांचे सहजीवन आदि निसर्गातील प्रक्रियांमध्ये तालबद्धता आहे. विशाल सागर, खंड, ग्रह, तारे, ग्रहमाला, आकाशगंगा आपल्या परिघात वावरत आहेत. दिवस, रात्र, ऋतू, भ्रमण सारेकाही बिनचूक सुरू असते. या साऱ्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न मानवाने केला. वसुंधरेच्या सान्निध्यात जग विकासाच्या नावाखाली निसर्गाला ओरबाडून खाण्याची मानवाची सवय सजीवसृष्टीचा कर्दनकाळ ठरली आहे. निसर्गाचा हा ऱ्हास वेळीच रोखला नाही तर मानवी संस्कृतीचे भवितव्य संकटात येईल, असा गर्भित इशारा संयुक्त राष्ट्र अर्थात यू.एन.ने आपल्या मे २०१९ च्या अहवालातून दिला आहे. निसर्गातील हस्तक्षेपामुळे वनस्पती आणि प्राण्यांच्या १० लाख प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचेही हा अहवाल सांगतो. जगभर मानवी जीवन जगण्याची गुणवत्ता, अर्थव्यवस्था, अन्नसुरक्षा, आरोग्य यांचा पाया उद्ध्वस्त होतो आहे. अशा परिस्थितीत निसर्गाची खूप काळजी घेणे गरजेचे असून निसर्ग टिकला तरच मानव तरणार आहे. वर्तमानात पृथ्वीवरील जवळपास ८० लाख विविध प्रजाती वेगाने नामशेष होत चालल्या आहेत. गेल्या एक कोटी वर्षांच्या तुलनेत नामशेष होण्याचा हा वेग तब्बल दहा हजार पट अधिक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. निसर्ग स्वतःचे संतुलन स्वतः राखण्यास समर्थ आहे. दुर्दैवाने मानवी अहंकार आज निसर्गाला वाचवण्याची भाषा करतो आहे. अर्थात अनियंत्रित ऱ्हास हे त्यामागचे कारण आहे. आजचा मनुष्य, प्रसंगी मनुष्यालाच मारायला मागे पुढे पाहात नाही तिथे तो प्राणी, पक्षी, कीडे, मुंग्या यांना कसा सोडेल ? यंत्रविज्ञानातील प्रगतीमुळे मानवी इंद्रियांची संवेदनशक्ती क्षीण झाली आहे. अनेक पारंपारिक कौशल्यांचा ऱ्हास पावलीत. आपल्या जुन्या चालीरीतींमध्ये पर्यावरण संवर्धन आढळते. मानवी विकास हा निसर्गावर अवलंबून असतो असं मानणारी ती पिढी होती. आपल्याकडे निसर्गवाद / पर्यावरणवाद १९ व्या शतकात आला. अर्थात हा दृष्टीको प्राचीन काळातही मांडलेला आहेच. इ. स. पूर्व पाचव्या शतका हिपोक्रॅटस या शास्त्रज्ञाने मानवीजीवन नैसर्गिक घटकांवर अवलंबून आहे हे सांगितले होते. त्याने आपल्या विवेचनामध्ये आशिया व युरोपमधील मानवी जीवनांची तुलना केली होती. अशीच उदाहरणे अँरिस्टॉट्लनेही सांगितली होती. त्याने नाईल नदीचा ईजिप्तवर होणारा शास्त्रीय परिणाम अभ्यासला होता. निसर्गातील विविधता मानवाने निर्माण केलेली आहे. मानवाने पृथ्वीवर सृजनशील परिवर्तने घडवून आणली आहेत. या विधानात काही अंशी तथ्यांश असला तरी तो पुरेसा नसावा. पृथ्वीवर जैवविविधता समप्रमाणात नाही. सजीवांमधील विविधता, तापमान, पाऊस, समुद्रसपाटीपासूनची उंची, भूप्रदेशाचे गुणधर्म, इतर सजीवांचे अस्तित्व यावर अवलंबून असते. यातूनच जगात काही ठिकाणी जैवविविधतेने समृद्ध क्षेत्र (हॉटस्पॉट) तयार झाले. या ठिकाणांना हॉटस्पॉट म्हणावे ही कल्पना डॉ. सबिना विर्क यांनी सन १९८८ मध्ये प्रथम मांडली. यामागेही निसर्गाचा अतोनात ऱ्हास थांबावा हेच कारण असणार हे नक्की आहे. यातली बहुतेक समृद्धक्षेत्रे मानवी वस्त्यांजवळ आहेत. जैवविविधतेमागे किमान ३५० कोटी वर्षांचा इतिहास असावा असं शास्त्रज्ञांचे मत आहे.

वाढत्या लोकसंख्येला पोसण्यासाठी आपण जगभर वसाहती उभारतो आहोत. त्यासाठी आपल्यादृष्टीने निरुपयोगी वगैरे झाडे सहज तोडून मोकळे होतो. नव्याने तयार होणाऱ्या वसाहतीत आपल्या मनाला वाटतील ती झाडे आणून लावतो. त्यांना जगवायचा प्रयत्न करतो. खरं तर निसर्गात निरुपयोगी असं काहीही नाही. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार जगाच्या इतिहासात यापूर्वी अनेकदा गार आणि गरम युगे येऊन गेलेली आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंग निसर्गाला नवे नाही. आपल्याला नवे आहे. आज उन्ह्याळ्यात जगभरात अनेक ठिकाणी तापमापीतील ४५°से., ४६°से. असा सरकणारा पारा उंचीशी स्पर्धा करतो आहे. पावसाळ्यात कधी कुठे महापूर येईल ? कधी कुठे अतिवृष्टी होईल ? याचा अंदाज बांधणे कठीण बनले आहे. भूगर्भातील पाण्याचे साठे कमी झाल्याने गाव, वाड्या-वस्त्यांवर पाण्याचे टँकर पोहोचवावे लागत आहेत. डोक्यावर हंडे घेऊन आजही उन्हातान्हात मैलोनमैल भटकंती सुरुच आहे. बराचसा भारत पावसाबाबत नशीबवान असूनही पाणी संवर्धन प्रयत्नांबाबत आपण उदासि आहोत. आकाशातून पडणारे पावसाचे पाणी डोळ्यासमोर वाहून जाताना आपण पाहतो. उन्हाळ्यात पाण्यासाठी बोंबा मारतो. कमी पाऊस असणाऱ्या जगातील देशांनी पाण्यासाठी नियोजन केले आहे. त्यांचा वापर काळजीपूर्वक आहे. हे सारे समजत असूनही आपला निष्काळजीपणा सुरु आहे. निसर्गावर कुरघोडी करीत होणाऱ्या विकासामागे मुख्य कारणीभूत घटक आहे जगाची वाढती लोकसंख्या. वाढत्या लोकसंख्येने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केलेत. लोकसंख्येच्या वाढीचं एक प्रमुख कारण म्हणून वैद्यकीय संशोधनाकडेही बोट दाखविले जाते. पूर्वी रोगांच्या साथी येतं, लोकसंख्या नियंत्रित राहात असे. कधीकधी भूकंप, पूर आणि ओले / कोरडे दुष्काळ पडत याचाही परिमाण होई. वैद्यकीय प्रगतीमुळे या साऱ्यावर सकारात्मक परिणाम झाला. ते ठीक म्हणावं तर लोकसंख्यावाढीच्या बाबतीतील समजूतदारपणाही आम्ही दाखविला नाही. वैद्यकीय मदतीने आज निपुत्रिक जोडप्यांना अपत्यसंभव शक्य झाला आहे. या प्रगतीचं कौतुक करत असताना दुसरीकडे अनाथालयं वाढताहेत, तिथल्या मुलांना दत्तक घेऊन वाढवणे हा मार्ग असू शकतो याचंही भान आम्ही बाळगणार आहोत का ? हा प्रश्न आहे. लोकसंख्यावाढ जवळपास सर्वच प्रश्नांचे मूळ बनली आहे. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य, घरं देणं ही एक महत्त्वाची समस्या आहे. त्यावर उपाय म्हणून खाद्यान्नात सुधारणा करणे, त्यांच्या उत्पादनात वाढ होईल असे बदल केले जात आहेत. या बदलांचा माणसांवर काय परिणाम होईल ? याचा अभ्यास करणे सोपे राहिलेले नाही. त्यासाठी लागणारा कालावधी हा किमान ३ पिढ्यांचा असू शकतो. मोठ्या वसाहतींना भरपूर ऊर्जा लागते. जलविद्युत प्रकल्पांना आपल्याकडे मर्यादा आहेत. दगडी कोळशामुळे होत असलेलं प्रदूषण भयानक आहे. त्यातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळं जमिनीचे होणारे नुकसान भयानक आहे. ऊर्जेच्या अपारंपरिक पवन आणि लाटांपासून ऊर्जा यांनाही मर्यादा आहेत. शेवटचा पर्याय आण्विक ऊर्जा आहे. त्यालाही विरोध होतो आहे. एकूणात पर्यावरण संवर्धन ही प्रक्रिया फारशी सोपी राहिलेली नाही हे खरे आहे. आमच्या पूर्वजांनी सूर्य, पाऊस, वारा यांची पूजा केली होती. आम्ही ती श्रद्धा गमावली आहे. जागतिक लोकसंख्येच्या निष्कर्षानुसार सन २००८ मध्ये निम्म्याहून अधिक जग शहरी बनले. शहरे तथाकथित विकासाची इंजिने बनली. सन १९५० मध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सरासरी ३० टक्के लोकसंख्या शहरी होती. सन २०५० मध्ये शहरीकरणाची सरासरी ६६ टक्‍क्‍यांवर पोचेल असा अंदाज आहे. भविष्यात शहरी लोकसंख्येच्या या अंदाजित वाढीपैकी जवळपास ९० टक्के वाढ आशिया आणि आफ्रिका या दोनच खंडांत असणार आहे. १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणारी शहरे सन १९५१ मध्ये देशात ५ होती. सन २०११ सालच्या जनगणनेनुसार ती ५३ झाली आहेत. या शहरी लोकसंख्यावाढीचे व्यवस्थापन करणे धोरणकर्ते आणि नगरनियोजनकारांना अवघड जाणार आहे.

सन २०१९ च्या सर्वात मोठ्यादिनी २१ जून रोजी चांगले पर्जन्यमान असलेल्या भारताच्या अनेक भागात उष्णता भाजून काढत होती. ऋतू पावसाळा चालू आहे, असे वाटत नव्हते. पूर्वी जूनमधे वेळापत्रकानुसार पाऊस यायचा. ढगांचे आच्छादन, वातावरणात गारवा जाणवायचा. यावर्षी तो गारवा आम्हांला सप्टेंबरमध्ये जाणवला. ‘नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक तू जाण बाळा’ हे पिढ्यानपिढ्या गायलेले गीत आठवत निसर्गाकडे पाहाताना व्यथित व्हायला झाले. यावर्षी सुरुवातीला 'वायू' वादळ आले. पाऊस लांबला त्याला ‘एल निनोसागरी प्रवाह आणि हे कारण दिले गेले. खरंतर सागरी प्रवाह दर सहा किंवा अकरा वर्षांनी शतकानुशतके उसळत आहेत. वादळेही होतच आहेत. पण तरीही पावसाळा वेळापत्रक पाळत राहिला आहे. यावर्षी मात्र पावसाळा अनियमित पध्दतीने भयंकर विध्वंसक बनल्याचे सर्वांनी पहिले. देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण यंदा (२०१९) मेघालयातील चेरापुंजी नसून महाराष्ट्रातील चांदोली अभयारण्याच्या कोअरझोन मधील पाथरपुंज आहे. या गावात जेव्हा ७३५९ मि.मी. पावसाची नोंद झालेली असताना चेरापुंजी येथे ५९३८ मि.मी. पाऊस झाला. संपूर्ण आयुष्यात असा पाऊस न पाहिल्याचे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एवढ्या पावसानंतर सारा गाव आजारी पडला. हे कशाचे द्योतक आहे ? पृथ्वीच्या तापमानात गेल्या २५० वर्षांत वेगाने झालेली वाढ, त्यामुळे मोडलेली महासागर व वातावरणाची अभिसरण पध्दती हे त्याचे कारण अभ्यासक सांगतात. स्वयंचलित यंत्रांचा वापर, जाळण्यात येणारा कोळसा, तेल, वायू, सीमेंटसारख्या रासायनिक पदार्थांमुळे तापमानवाढ झाली. गेल्या २५० ते ३०० कोटी वर्षे वातावरणातील कार्बन कमी करत प्राणवायू वाढवणार्‍या हरितद्रव्याचा, स्वयंचलित यंत्र व वस्तुनिर्मितीमुळे नाश झाला आहे. जागतिक हवामान संघटनने सन २०१६ मध्ये ‘धोकादायक हवामान पर्व अवतरले’ म्हणत दरवर्षी ०.२०°से ची वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानात सुरू झाल्याचे जाहीर केले होते. तंत्रज्ञानाने दिलेल्या ‘सुखाची साधने’ नावाच्या सोन्याच्या पात्राने तापमानवाढीच्या भीषण सत्याचे तोंड बंद केले आहे. शतकभरापूर्वी तरूण असलेल्या, देशाच्या स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास घडवणार्‍या पिढीला ‘विकास’ म्हणत बडबडताना कुणी पाहिले नाही. ती माणसे कमी दर्जाची मुळीच नव्हती. आजचा विकास म्हणजे भौतिक गोष्टींची उपलब्धता होय. त्यात नोकरी आणि ती देणारा उद्योग येतो. पूर्वी भूमी सुपिक होती. भूजल पातळी भूपृष्ठालगत असायची. विहिरी, तळी पाण्याने भरलेली दिसायची. त्या लोकांनी नद्या अडवून जंगले बुडवणारी धरणे कधीही बांधली नाहीत. डोंगर, जंगल जीवंत ठेवले. म्हणून हवेत गारवा असायचा. नद्या भरून वाहायाच्या. पूर्वी विकास माहित नसताना देश स्वयंपूर्ण होता. गावांमधे मातीच्या व कुडाच्या घरात राहून सन १८३० पर्यंत जगाच्या उत्पादन व व्यापारात ७३ % वाटा यंत्र न वापरणाऱ्या भारत आणि चीनचा होता. तो शाश्वत विकास होता. डोंगर, भूमी, जंगल, नदी व सागरात हस्तक्षेप नव्हता. आमच्या आजोबा पणजोबांपर्यंतच्या पिढ्या लंगोटी घालून शेती, मासेमारी करायच्या. कसदार माती पौष्टिक, विषमुक्त अन्न पिकवत होती. शेतकरी आत्महत्या नव्हत्या. तलाव, नद्या, सागर नानाविध प्रजातीयुक्त माशांनी भरलेले असायचे. अगदी स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभे राहितोपर्यंत हे चित्र देशात होते. आज लंगोटी लावून शेती, मासेमारी करणे कमीपणा ठरतो. पूर्वजांजवळ मोटारबाईक, टीव्ही, काँप्युटर, मोबाईल, फ्रीज वॉशिंगमशिन, ए.सी. सीमेंट लाद्या, मार्बलची घरे, पृथ्वी काळवंडणारा वीजेचा कृत्रिम प्रकाशही नव्हता. तरीही ते जगले. आम्ही भौतिक सुखात रोज मरतोय. नष्ट होतोय. विविध रोगांनी आमचे जीवन ग्रासलेले आहे. पूर्वी उत्तर ध्रुवावर बर्फ तरंगायचे. सन १९६० पासून ते कमी होत गेले. आगामी काळात ते पूर्ण संपेल आणि तापमानवाढ नावाचे अंतिम पर्व सुरू होईल. त्यानंतरच्या काही दशकात जगातील मानवजात, जीवसृष्टी नष्ट होत जाईल असे संशोधक सांगतात. कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन प्रतिवर्ष १००० कोटी टनावरून कमी होण्याऐवजी सन २०१८ मध्ये ते ३८०० कोटी टन झाले. यामुळे देशात उष्माघाताचे बळी, उष्म्यामुळे संचारबंदी यातून मानवजातीचे मरण अधिक जवळ आले आहे. दहा हजार वर्षांचे कृषियुग जगणारा भारत देशच या गंभीर प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो हे आपण समजून घ्यायला हवे. ही भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळीचे निमंत्रक अॅड. गिरीश राऊत यांची भूमिका विचार करायला लावणारी आहे.

भारतात मानवी संस्कार आणि नदीचे जल यांचे विशेष नाते आहे. जीवनाच्या बंधनातून परमेश्वर किंवा नदी मोक्ष देवू शकते अशी आपली धारणा आहे. म्हणून जीवनदायी नदीला कृतज्ञतेतून माता म्हटले आहे. नदीमध्ये संस्कृती जन्माला घालण्याची क्षमता आहे. सर्वांचे पोषण करताना ती हातचे राखून ठेवत नाही. डोलारा पेलताना अहंभाव तिच्यात नसतो. नदी स्वायत्त संस्कृती असते. या नदीची आजची अवस्था पहिली की संवेदनाक्षम मनाला वेदना होतात. आपल्याकडे पर्यावरण विषय शिकविला जातो. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात गांभीर्यानं घेऊन त्यावर काम करण्याची गरज आहे. पृथ्वीभोवतीच्या ओझोनच्या थराला भोकं पडल्याने सूर्याची अतिनील किरणे आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. अंटार्क्टिका आणि ध्रुवीय प्रदेशातला बर्फ वितळू लागला आहे.  समुद्राची पातळी वाढते आहे. पूर आणि प्रलय हे याचेच पर्यावसान आहेत. चुकांमधून आपण काहीही शिकत नाही. तेवढ्यापुरता धडा घेतो, सुधारणा करत नाही. केरळमध्ये अलिकडे सन १९२४ नंतर आलेला मोठा प्रलय सर्वांनी पाहिला. अब्जावधींचं नुकसान, शेकडो बळी यात गेले. पूर, अतिवृष्टी, दुष्काळ, भूकंप हे दैवाला दोष देण्याचे विषय आता राहिलेले नाहीत. अंदाधुंद विकास, बेसुमार वृक्षतोड, प्लास्टिक, प्रदूषण, मोकळ्या जागा हडप करण्याची निसर्गाच्या मूळावर उठणारी प्रवृत्ती आपल्या मूळावर उठलेली आहे. यावर्षी नुकताच जुलै-ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र / कोकणला पावसाने जबरदस्त तडाखा दिला. चिपळूणात तर तिवरेचे धरण फुटले. पावसामुळे नद्यांना आलेले महापूर काही ठिकाणी डोळ्यांत पाणी आणणारे, क्षणात होत्याचे नव्हते करणारे ठरले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना पावसाने चांगला तडाखा दिला. विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. कोकणपट्टी सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस झाला आहे. वैज्ञानिक संशोधनातल्या प्रगतीची धुंदी चढल्याने मानवाने निसर्गावर निर्णायक मात करीत निसर्गाचे संतुलन बिघडल्याचा हा परिणाम आहे. पैशांच्या मागे धावणारा मानव पैशातून ए.सी. विकत घेवू शकतो, शुध्द हवा नाही. निसर्ग हाच माणसाचा खरा गुरू आहे. माणूस निसर्गाशी जेवढी जवळीक साधेल, तेवढी निसर्गाची रहस्यं त्याला उलगडत जातील. त्याला चिरंतन सुख (आत्मसुख) प्राप्त होईल.

दुर्दैवाने आपण आपत्ती युगात जगत आहोत. संयुक्‍त राष्ट्राच्या एका अहवालानुसार सन १९६३ ते ९२ पर्यंतच्या ३० वर्षांच्या कालमर्यादेत ठार झालेल्या, जखमी झालेल्या, आपत्तींमुळे विस्थापित झालेल्या लोकांची संख्या प्रतिवर्षी सरासरी ६ टक्क्यांनी वाढलेली आहे. म्हणून यु.एन.ने १९९०च्या दशकाला, ‘नैसर्गिक आपत्ती कपाताचे आंतरराष्ट्रीय दशकसंबोधले होते. नियमितता सिद्ध करणारे ऋतुबदल आम्हीही अनुभवले आहेत. आमच्या बालपणीचा पाऊस आमच्यासारखाच खुळा होता. त्या रिमझिम पावसाने आमचे बालपण अधिक सुंदर बनविले. त्यातूनच पावसाळा हा आमचा आवडता ऋतू बनला. यंदाचा पावसाळा (२०१९) मात्र पूर्वीसारखा नव्हता. आज पश्चिम घाटात फार जंगल राहिलेले नाही. अनेक ठिकाणचे जंगल दुय्यम आहे. पर्यावरण संतुलनासाठी जमिनीच्या ३३ टक्के जंगल आवश्यक असते. लहान-लहान झुडपांना वगळता आपल्याकडे नऊ ते दहा टक्के इतकेच राहिलेले आहे. पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक पाच टक्के प्रोटेक्टेड जंगल रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये नाही. सतत झाडांची कत्तल सुरू आहे. कमी जंगल असल्याने भूस्खलनासारख्या आपत्ती कायम येत राहणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या शतकोटी वृक्षलागवड योजनेबाबत अपवाद वगळता आशादायक चित्र नाही. अलिकडे अ‍ॅमेझॉनच्या पर्जन्यवनाला लागलेली आग हा संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरला. जी ७ राष्ट्रांच्या परिषदेमध्येही त्यावर गांभीर्याने चर्चा झाली. नऊ देशांमध्ये हे पर्जन्यवन विभागलेले असले तरी त्याचा सर्वाधिक भाग हा ब्राझीलमध्ये येतो. तिथली यंत्रणा विकास करते आहे. जंगले कापून जागा निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट असावे. त्यासाठीच आगी लावल्या जात असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांकडून सतत होत असतो. अ‍ॅमेझॉनचे जंगल हे खरेतर सदाहरित आणि आजूबाजूला भरपूर पाणी असलेले. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये लाकडासाठी मोठय़ा प्रमाणावर कापले गेले. महाराष्ट्रात, मुंबईमध्ये आरेच्या जंगलाचा प्रश्नही ऐरणीवर आहे. त्या जंगलात ४ लाख ८० हजार झाडे, १३ प्रकारचे उभयचर प्राणी, कोळ्यांच्या ९० तर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ४६ प्रजाती, ७७ प्रकारचे पक्षी, ३४ वन्यफुलांच्या प्रजाती, किमान १० बिबळ्यांचा अधिवास करताहेत अशी माहिती आहे. आरे आणि त्याला संलग्न जंगल हे मुंबईचे फुप्फुस आहे. दुर्दैवाने जे अ‍ॅमेझॉनच्या बाबतीत तेच आरेच्याही बाबतीत होत आहे.

यावर्षी २०१९ साली जगात भारतातील शहरे अतिप्रदूषित असून मुंबई हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचा अहवाल आला आहे. वाढते औद्योगिकरण, शहरीकरण, वायूप्रदूषण यामागे आहे. आदिवासी लोकं जंगल तोडतात असा शहरी लोकांचा ठाम समज आहे. गावातील या लोकांनी जंगल तोडले असते तर भारतात स्वातंत्र्यापूर्वी घनदाट जंगलांचे आवरण होते ते उरले नसते. थायलंडच्या एका निम शहरात सन १९९१ मध्ये जागतिक बँकेतर्फे बैठकीसाठी जगातील बँकांना बोलावून घेण्यात आले होते. बैठकीत भारतासारख्या देशांत औद्योगिकरणासाठी मानसिकता घडवणारे मुख्य आयुध असणार्‍या शिक्षणाचा वेगाने प्रसार करण्याचे ठरले. यातून 'सर्व शिक्षा अभियान' जन्माला आले. काँप्युटरने मनावर गारूड केलेलेच होते. शाळकरी मुलांचे लोंढे इंग्रजी माध्यमाकडे वळले. आपण काय करत आहोत ? यावरचे भारतीय समाजाचे नियंत्रण संपले. शाश्वततेचा अंत सुरू झाला. प्रत्येकजण पैशाच्या मागे लागला. भौतिक सुखाच्या साधनांनी माणसाला आपल्या कवेत घेतले. चुलींमुळे क्षय होतो असा चुकीचा प्रचार केला गेला. देशात क्षयाचे सर्वाधिक रूग्ण मुंबई शहरात आहेत. मुंबईत काटक्या जाळणार्‍या चुली नाहीत. उद्योगपूर्व काळात कॅन्सरचे प्रमाण १ ते १० लाखांत एक असे होते आज ते जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाप्रमाणे ५ माणसांत १ असे आहे. हे सारे कशाचे लक्षण आहे ? कॅन्सरचे मुख्य कारण मोटारयुग आहे. जगाला औद्योगिकरण थांबवून कृषियुगात परत जावे लागणार आहे, ही अभ्यासकांची भूमिका योग्य आहे. अन्यथा तापमानवाढीमुळे पृथ्वी आपली अन्न उत्पादनाची, पाण्याची क्षमता दिवसेंदिवस गमावणार आहे. जगात, देशात पावसाळ्यात अनेक शहरे बुडतात. पूर, महापूर येतो. धरणे, सागराच्या भारती-ओहोटीचे गणित हे त्यातील एक कारण असले तरीही ते पुरेसे नाही. कारण सन २००५ च्या महापुरावेळी २६ जुलै रोजी दुपारी साधारण ३.३० वाजल्यापासून पासून रात्री १०.३० वाजेपर्यंत ओहोटी होती. ‘ही ऐतिहासिक वृष्टी तापमानवाढीचा परिणाम होता’ असे नासाने आणि युनोच्या 'आयपीसीसी' अहवालात नमूद आहे. मुंबई ही सागरात केलेल्या भरावांवर उभी आहे. सन १७८४ सालात वरळी, गिरगाव ही बेटे जोडणा-या सागरातील भरावाचे पहिले काम सुरू झाले. हा विकास हीच मुळात एक दुर्घटना होती. मुंबईसारख्या शहराचा विचार करता सन १९६४ च्या विकास आराखड्यानुसार अर्धा पाऊस जमिनीत जिरायला हवा. काँक्रिटीकरणामुळे हे गृहित मोडित निघाले आहे. सन १९६४ च्या विकास आराखडय़ानुसार मुंबईत दर एक हजार माणसांमागे चार एकर जमीन, कीडांगणे, उद्यानाच्या स्वरूपात मोकळी जागा हवी होती. सन १९९१ चा अहवाल म्हणतो, मुंबईतील मोकळ्या जागेचे प्रमाण फक्त ०.०३ एकर उरले आहे. सध्याची स्थिती त्याहूनही भयावह असावी. सन १९९८-९९ सालच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार मुंबईतील बहुतांश क्षेत्राचे काँक्रिटीकरण झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी पृष्ठभागावर साठते, वाहते. जमिनीत मुरत नाही. केवळ मुंबईच नव्हे तर जगातील जवळपास आधुनिक शहरे निसर्गविरोधी विकासामुळे बुडत आहेत. सन २००५ साली २६ जुलैला मुंबई, २८ ऑगस्टला न्यू ऑर्लीन्स त्यानंतर शांघाय बुडाले होते. कोकणात रत्नागिरीत नाणार रिफायनरीच्या समर्थनार्थ अलिकडे एक मोर्चा निघाला. रिफायनरीतून प्रक्रिया झालेले सुमारे ८५ - ९०% तेल (पेट्रोल / डिझेल) मोटारी वापरतात. मोटारींच्या उत्सर्जनाचा जगातील 'कार्बन डाय ऑक्साईड' वायूच्या एकूण उत्सर्जनात सुमारे ४०% (१५२० कोटी टन - सन २०१८) वाटा आहे. जर्मनीने मोटारविरोधी धोरण राबविताना सर्वत्र उत्कृष्ट सार्वजनिक बस सेवा मोफत उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. अवकाळी पाऊस, वादळे, वणवे, घटते भूजल, अतिवृष्टी, बर्फवृष्टी, महापूर, आम्लवर्षा, शेती, जंगलांचा नाश, सागरातील प्रदूषण, मॅनग्रोव्ह व मासळीचा नाश, कॅन्सर व इतर व्याधी आदिंचा रिफायनरीशी जवळचा संबंध आहे. रिफायनरीचे दुष्परिणाम हरयाणातील पानिपत, मुंबईतल्या माहुलला समजतील. कोकणातल्या महाडची सावित्री पूल दुर्घटना तापमानवाढीमुळे सह्याद्रीच्या महाबळेश्वर परिसरात झालेल्या ढगफुटींचा परिणाम होता. ढगफुटीच्या अतिवृष्टीस व महापूरास तापमानवाढ जबाबदार होती. आपल्याकडे विदर्भ, नागपूर, मराठवाडा ऐन पावसाळ्यात भाजून निघते आहे. हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गाव ग्रामस्थांनी सलग चार वर्षे पाऊस न पडल्याने पाणी, पिक नाही म्हणून विकायला काढल्याचे वृत्त आहे. प्राचीन ऋषिंनी डोंगर, पर्वतांना पृथ्वी मातेचे स्तन म्हटले आहे. विज्ञानाच्या नावाने आम्ही कशासाठी काय करतो आहोत ? एखाद्या वारांगानेसारखी निसर्गाची अवस्था आपण करून ठेवली आहे. निसर्गाला भोगताना त्याच्या दुःखाशी, वेदनेशी, अन्यायाशी आपल्याला काहीही देणघेण राहिलेलं नाही, हे वेदनादायी आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी त्यांच्या ‘हिंद स्वराज्य’ या ग्रंथात, यंत्रामुळे युरोप उजाड झाला. भारताचेही तेच होईल’ असा इशारा सन १९०९ मध्ये दिला होता. अमेरिकेत अलिकडे एकाच आठवड्यात 'ह्यूस्टन' शहरासह पूर्व किनारपट्टीवर थैमान घालणारे ताशी सुमारे २४० कि मी वेगाचे 'हार्वे' चक्रीवादळ दोनदा आदळले. खाड्या, खाजणे, नदीमुखे भरावाखाली गाडणे, सागरी रस्ते, भुयारी रेल्वे,  यांची भयंकर किंमत अमेरिकेला मोजावी लागते आहे. तीच स्थिती मुंबई मेट्रो प्रकल्पाची असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे. बेस्टबस प्रकल्पाचा ताफा काही पटीत वाढवून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवून मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न सोडविता येऊ शकतो. या विषयातील अहवालही हेच सांगताहेत. गत कोट्यवधी वर्षांत न झालेली तापमानवाढ दर पाच वर्षात १°से अशी होते आहे. भविष्यातील वादळांची, अतिवृष्टीची तीव्रता वाढत जाणार आहेत. त्याचे परिणाम यावर्षी देशाने, महाराष्ट्राने अनुभवले आहेत. विकासाच्या नावाखाली जिकडेतिकडे डोंगर तोडले जात आहेत. सन १९९० नंतर यास खूप वेग आला आहे. ४०°से पेक्षा जास्त, असह्य उष्म्यामुळे युरोपात माणसे नग्नावस्थेत राहू इच्छिताहेत. ही स्थिती आपल्याकडे यायला वेळ लागणार नाही. मानवीवस्तीचे उत्तरेकडील शेवटचं ठिकाण, कॅनडातील उत्तर ध्रुवापासून अवघ्या ६०० मैलावर असलेलंकॅनडाज् अॅलर्ट’ येथे १४ जुलै २०१९ च्या रविवारी २१° सेंटिग्रेड एवढे उच्च तापमान नोंदले गेले. ही ध्रुवप्रदेशातली प्रलयंकारी उष्णतेची सुरुवात होय. पृथ्वीच्या इतर कुठल्याही भागापेक्षा दोन्ही ध्रुवांवरील तापमान तिप्पट वेगाने वाढत असल्याचं आर्मेल कॅस्टॅलान या कॅनडा सरकारमधल्या हवामानतज्ज्ञाचं मत आहे. 'man Vs wild' हा शब्दप्रयोग आपण सर्वानीच ऐकलेला आहे. ‘वाईल्ड' शब्दाचा अविचारी, असंस्कृत, बेताल असा अर्थ आहे. पृथ्वीवर गेल्या २५० वर्षांच्या काळात जवळपास ८५ % जीवसृष्टी नष्ट करणार्‍या, यंत्र व तंत्रज्ञानयुक्त आधुनिक माणसाला हे विशेषण योग्य आहे.

प्राचीन विचारवंतांनी, द्रष्ट्या ऋषी-मुनींनी ध्यान आणि चिंतनाच्या जोरावर निसर्गचक्र समजून घेण्याचा प्रयत्न केला. सारी सृष्टी एका शाश्वत नियमाने चाललेली आहे या मतावर ते आले. सृष्टीच्या याच नियमाने मानवी व्यवहार चालावेत या जाणीवेतून धर्म जन्मला. मानवी सद्वर्तनासाठी तत्वांचा आधार हा मूलाधार होता. त्या सुरुवातीच्या युगात हे सारे पाळले जात होते. हळूहळू मानव अवनत अवस्थेकडे झुकत गेला. त्यातून आजची परिस्थिती ओढवली. याचे मूळ मानवी स्वभावात दडलेले आहे. निसर्गाचे वर्तन अंतःस्फूर्तीने असते. मानव अंतःस्फूर्तीपेक्षा विचाराने अधिक वागतो. सतत फायद्या-तोट्याचे हिशोब करतो. हिशेबी मानसिकतेतून संभ्रम निर्माण होऊन निसर्गाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप झाला. मानव आणि निसर्ग यांच्यातली दरी रुंदावत गेली. आजची मानवी भौतिक प्रगती ही हिंसा, संघर्ष, गुन्हेगारी यांनीही त्रस्त आहे. आज साऱ्या जगाला विघातक परिणामांनी वेधले आहे. मानवी जीवनातली वैगुण्ये जेव्हा समाजाच्या नेतृत्वात उतरतात तेव्हा ती सर्व मानवी स्तरात झिरपतात. असे चित्र आहे. आजच्या वर्तमान बाजारी व्यवस्थेत मानव ग्राहक ठरला आहे. ग्राहक म्हणून असलेल्या गरजांनाच इथे प्राधान्य दिले जाते. नैसर्गिक हक्कांचा बळी दिला जातो. मूल्यांना अंधश्रध्दा म्हणून हिणवले जाते. यातून आलेल्या उपयुक्ततावादाने मूल्यांवर मात केलेली आहे. पाश्त्यात्य तत्वज्ञान मूल्यांबाबत उदासीन आहे. निर्माण झालेली वर्तमान संस्कृती बदलणे सोपे काम नाही. संक्रमणावस्थेतून जाणाऱ्या निसर्गाचा प्रारंभ पाश्चात्य असला तरी शेवट प्राचीन भारतीय संस्कृतीनुरूप झाला तर मानवतेसाठी तो हितावह ठरेल. त्यागाशिवाय भोग हा मानवी अभद्रपणा आहे. मानवी व्यवहार नियमनाने होतात तेव्हा स्पर्धा संपते. सहकार्य सुरू होते. याच तत्वावर आपली समाजव्यवस्था उभी आहे, असायला हवी. वसुधैव कुटुंबकम्‌' हा तिचाच परिपाक आहे.

आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतात नुकतीच लोकसभा निवडणूक होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा एकदा अधिक बहुमताने निवडून आले आहे. दुर्दैवाने इथेही पर्यावरण मुद्दा अडगळीत पडला आहे. निवडणूक प्रचारातही तो फारसा नव्हता. देशाचा जागतिक पर्यावरण निर्देशांक घसरला आहे. मोदी सरकारची विकासनीती, आपली प्रचंड लोकसंख्या, रोजगाराच्या आव्हानास तोंड देताना प्रदूषण, परिसंस्था, जैवविविधतेचा ह्रास वाढतो आहे. पर्यावरणविषयक समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने दूषित हवेमुळे भारतात दरवर्षी १२-१४ लाख अकाली मृत्यू होत आहेत. देशातील ८५ टक्के नद्या प्रदूषित आहेत. त्याचा परिणाम शेती, पशुपालन, सार्वजनिक आरोग्य यांवर झाला आहे. खते आणि कीटकनाशके यांच्या अतिवापरामुळे हजारो हेक्टर जमीन क्षारपड झाली आहे. भारतामध्ये दररोज तयार होणाऱ्या एकूण सांडपाण्याच्या ३० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. पर्यावरण कायदे, पर्यावरण गुन्हेगारी, हरित न्यायव्यवस्था हे मुद्दे महत्त्वाचे मानले जायला हवेत. देशाला पर्यावरण विषयात क्रांतिकारी निर्णय घेणारी राजकीय इच्छाशक्ती असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. पर्यावरण विषयात बेबंदशाही आहे. ती रोखून लोकशाही प्रस्थापित व्हायला हवी आहे. सुदैवाने मोठ्या संकटांना मोठी संधी समजणारे आणि धाडसी निर्णय घेणारे नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रूपाने भारताच्या केंद्रस्थानी आहे. त्यांच्याकडून पर्यावरण आणि विकासनीती याबाबत वेगळा संतुलित विचार होण्याची आशा आहे.

सर्व्हायव्हल ऑफ दी फिटेस्ट' हे तत्व मानणाऱ्या भोगवादी संस्कृतीने निसर्गाचे शोषण करून हा प्रश्न निर्माण केला आहे. जग नावाच्या खेड्यात आज बाजाराचा कायदा चालतो आहे. प्रत्येकाला अमर्याद उपभोगाचे वचन दिले जात आहे. ही व्यवस्था टिकाऊ नाही. पृथ्वीवर उपलब्ध असलेली साधने मर्यादित आहेत. तंत्रज्ञानाच्या साह्याने उपलब्ध नैसर्गिक साधनांच्या वापराचे प्रमाण वाढवता येते. साधने तयार करता येत नाहीत. हे समजून घेत मानवी समुदाय भानावर यायला हवा ! आपल्याला एखाद्या गटारापेक्षा स्वच्छ पाण्याची नदी आवडते. जीवसृष्टीतील कित्येक किड्यांना मात्र गटार आवडते. आपल्याला श्रीखंड वा बासुंदी आवडते म्हणून किड्याला त्यात सोडले तर तो मरेल ! विख्यात पर्यावरणशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ सरांच्या सूचनेतील ‘निसर्ग आहे तसा ठेवा’ हे अद्वैत एकदा का आपल्या लक्षात आले की पर्यावरणाचे सारे प्रश्न सुटू शकतील ! 


धीरज वाटेकर

पत्ता : विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५
जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८,           
ई-मेल - dheerajwatekar@gmail.com

सन २०१९-२० च्या या वार्षिक अंकासाठी
लिहिलेला विशेष परिसंवाद लेख !

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...