शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

अखेर ‘ते’ दिवस संपले!

‘धीरज! कुठे आहात? बऱ्याच दिवसात बोलणं झालं नाही. एकदा या, वेळ काढून भेटायला? आमचे दिवस संपत आलेत!’ कामाच्या व्यस्ततेत चुकून एखाद्या आठवड्यात बोलणं झालं नाही तर मोबाईल कॉलवर हमखास ऐकू येणारा सवयीचा झालेला आणि थेट काळजाला हात घालणाऱ्या मर्मभेदक वाक्यांची अफलातून फेक असलेला ‘तो आवाज’ आता कधीच ऐकू येणार नाही. कारण धडपडणाऱ्या माणसाचे आयुष्य जगत शिक्षणाचा, वडिलोपार्जित कर्तृत्वाचा वारसा नसताना आपल्या अभ्यासू वृत्तीने जगभर पोहोचलेले नामवंत इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णा शिरगावकर यांनी ११ ऑक्टोबर (मंगळवारी) रोजी रात्री १० वाजून १० मिनिटांनी वयाच्या त्र्याण्णवव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी देहदान केल्यामुळे त्यांचे पार्थिव डेरवणच्या वालावलकर रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.

‘कोकणाला प्राचीन इतिहास नाही’ असं शासकीय प्रतिनिधींच्या तोंडून ऐकल्यावर सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीस अण्णांकरवी पन्हाळेकाजीतील २९ लेण्यांचा समूह उजेडात आला. तेव्हापासून कोकणच्या 'शास्त्रशुद्ध व वास्तववादी इतिहास' लेखनासाठी नवीन परंपरा आणि पद्धती स्वीकारावयास हवी ही जाणीव अण्णांना झाली असावी. यासाठीची आवश्यकता म्हणून त्यांनी कोकण इतिहासाची साधने जुळवायला सुरुवात केली होती. अशा असंख्य अभ्यासक आणि संशोधकांच्या सहकार्याने जीवनभर उपलब्ध झालेल्या पुराणवस्तूंचे चिकित्सापूर्ण परीक्षण करून कोकण इतिहासाचा पाया उभा करण्याचे महत्तम काम अण्णांनी केले. एखाद्या सर्वसामान्य माणसाने आपल्या वैयक्तिक हिकमतीच्या बळावर नऊ ताम्रपटांचे संशोधन केल्याचे अखिल भारतातील रेकॉर्ड अण्णांच्या नावावर आहे. कोकण इतिहासाच्या क्षेत्रातील त्यांचे हे योगदान खूप मोठे आहे. अनेकदा अनेक विशेषणे आपण सैलपणे वापरतो. पण मातृभाषेतील विविध विशेषणे नेमकी आणि समर्पकठरावीत असे अण्णांचे व्यक्तिमत्त्व होते. अभिनिवेशशून्य मांडणी हे त्यांच्या इतिहास लेखनाचे दुर्मीळ वैशिष्टय़ होते. जीवनभर इतिहास या विषयाकडे त्यांनी अतिशय जिव्हाळ्याने पाहिले. अण्णांची राहणी अत्यंत साधी होती. राहते घरही साधेच होते. मात्र या घरात असंख्य ऐतिहासिक कागदपत्रे, ताम्रपट, सनदा, पुराणकालीन वस्तू, विविध राजकीय काळातील असंख्य नाणी, मूर्ती, भांडी, नोटा, प्रचंड संदर्भमूल्य असलेली पुस्तके असा अमूल्य ऐवज आनंदाने नांदला. एका आडवाटेवरच्या खेड्यात जन्मलेल्या अण्णांनी कोकणच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या असंख्य संदर्भांचा जीवनभर शोध घेतला. पुराणवस्तू संग्राहक म्हणून अण्णांची कारकिर्द खूप मोठी आहे. आपल्या सततच्या नवनव्या प्रकाशनांनी नव्या पिढीला इतिहासाशी जोडण्याचा महत्त्वाचा प्रयत्न अण्णांनी केला. देशातील इतर प्रांतांना भूगोल आहे. आपल्या महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहासही आहे. याची जाणीव अण्णांनी आपल्यात जीवंत ठेवली होती.

इतिहास आणि वस्तू संग्रहालयाच्या आमच्या आवडीला खतपाणी घालणारे अण्णाच होते. नव्वदी पार केल्यानंतर आम्ही ‘अण्णा शतायुषी व्हा!’ असा लेख लिहिला होता. त्यावर ते तेव्हाही म्हणाले होते आणि आताही म्हणत होते, ‘जुन्या आठवणी समोर येतात, मन कासावीस होते. आता ९३ वर्ष सुरु झालं. आयुष्यातील हसू संपले. धीर संपला. तोलून मापून कामे उरकू लागलोय. रात्रभर जागरण आणि दिवसा झोप असं चक्र सुरु झालंय. नजर कमी आली आहे. बोटात लिहिण्याची ताकद उरली नाही. स्वतःचे लिहिलेले अक्षर स्वतःलाही वाचता येत नाही, अशी स्थिती आहे. जगण्याला काहीही अर्थ उरला नाही. स्वतःला काही करता येत नाही. दुसऱ्यासाठीही काही करता येत नाही, फक्त “जगा शंभर वर्षे” असे आशीर्वाद मिळताहेत.’ जणू काही आपल्या देहाची गणना ‘नसल्यातच’ होण्यापूर्वी गेलेलं बरं! असं त्यांना म्हणायचं असावं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जगप्रसिद्ध दाभोळमधील आपल्या ६० वर्षांच्या वास्तव्याला पूर्णविराम देत अण्णा नोव्हेंबर २०१८ पासून चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे आपल्या मुलीकडे वास्तव्याला होते. १ ऑक्टोबर २०२२ पासून ते चिपळूण गुहागर रोडवरील मालघर येथे मुक्कामी आलेले. तेव्हा एकदा  ‘आमचा आश्रम बघायला या!’ या सूचनेवरून आम्ही ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या सायंकाळी त्यांना भेटायला मालघरला गेलेलो. आम्हाला पाहाताच ज्या आनंदाने अण्णांनी दोन्ही हात उंचावून आपला आनंद व्यक्त केला होता, तो विसरणे अशक्य आहे. आपल्या दीर्घ आयुष्यात अखंड चौफेर वाचन आणि लेखन करण्याचे व्रत सांभाळलेल्या अण्णांकडून मागील काही महिने लिहिणे होत नव्हते. ते इथे होईल असे त्यांना सुचवायचे असावे.

‘ध्यासपर्व’ संपले!

संत कबीर यांचा एक दोहा प्रसिद्ध आहे,गोधन, गजधन, बाजिधन और रतनधन खान जब आवो संतोषधन, सबधन धुरि समान ।।’ अर्थात आपल्याकडे गाई, हत्ती आणि घोडे यांचे धन असो किंवा रत्नांची संपत्ती असो, परंतु जेव्हा आपल्याकडे समाधाननावाचं धन येतं तेव्हा, ही सारी संपत्ती आपल्याला एखाद्या धुराप्रमाणे वाटते. हे समाधान नावाचं धन समृद्ध आयुष्यात आपल्याला आपले छंद बहाल करतात. आपली आवड हीच आपल्या जीवनाचा मुख्य हेतू बनवली तर आपल्याला समाधानी, समृद्ध आणि यशस्वी आयुष्य जगता येतं. याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अण्णा होते. आयुष्याच्या अगदी सुरूवातीला आपल्याला नक्की काय हवंय ? याचं मर्म उमजलेल्या अण्णांनी आपल्या आयुष्याचा प्राधान्यक्रम निश्चित करून टाकला होता. जगाने ठरवून दिलेल्या चाकोरीबद्ध मार्गावरून मार्गक्रमण करण्यापेक्षा स्वतःला आनंद देणार्या निरूपद्रवी छंदांसोबत आयुष्य जगण्याचं त्यांनी ठरविलं. चारचौघांसारखे अमुक एवढे पैसे मिळविलेच पाहिजेत, अमुकच प्रकारचे घर हवे, गाडी हवी, एकूणात सतत भौतिक सुखाच्या जगात पुढे जात राहिले पाहिजे ही सार्वत्रिक मानसिकता जुगारून अण्णांनी आपल्या आयुष्याला वैशिष्ट्यपूर्ण आकार दिला. प्रख्यात इतिहास संशोधक लेखक गोपाळ नीळकंठ दांडेकर यांच्या संपर्कामुळे अण्णांच्या छंदांना प्राचीन इतिहासाच्या संशोधनाला लागणारी पूरक साधने जमविण्याचे व्यापक स्वरूप प्राप्त झाले होते. पुढे सामाजिक आणि राजकीय जीवनातून उरलेल्या वेळात अण्णांनी आपला वस्तुसंग्रह वाढवत नेला. घड्याळाच्या काट्याप्रमाणे कार्यरत मानवी जीवनात छंद एखाद्या औषधासारखं काम करतो’, असं अण्णा म्हणायचे.

पुराण इतिहास वस्तूसंग्रहामुळे अण्णांना इतिहास संशोधक म्हणून जगभरात मानसन्मान मिळाले. यात विविध प्रकारची नाणी, नऊ ताम्रपट, शिलालेख, सनदा, पत्रे, हस्तलिखिते, तोफा, बंदुका, पिस्तुले, भाले, परशू, चिलखत, तलवारी, कट्यार, जंबीये, ढाली, दांटपट्टे, मूर्ती, तोफगोळे, काष्टशिल्पे, मूर्ती, कुलपे, भांडी आणि गुहालेण्यांचा शोध यांचा  समावेश होतो. कोकणातील प्राचीन लोकांनी मागे सोडलेल्या विविध अवशेषांचा शोध घेऊन त्यांचे निरीक्षण करून त्या निरीक्षणातून मिळालेल्या माहितीचे इतिहासातील संदर्भांसह विश्लेषण करून कोकणच्या इतिहासाला कलाटणी देण्याचे काम अण्णांनी केले. अण्णांच्या प्रयत्नामुळे उजेडात आलेली पन्हाळेदूर्गची २९ लेणी कोणत्याही प्रदेशाला स्वतःविषयी गर्व वाटावा इतकी महत्त्वाची आहेत. वास्तविक पुरातन वस्तूंचा, जुन्या नाण्यांचा संग्रह करायचा म्हणजे माणूस श्रीमंत हवा. कारण हा छंद खूप खर्चिक आणि किचकट छंद आहे. परंतु या सार्यावर समाजकार्याची आवड असलेल्या अण्णांनी पद्धतशीर मात केली होती. जगातील विविध ६० देशातील सात/आठ हजार नाणी आणि भारतातील एक/दोन हजारांवर जुन्या नाण्यांचा संग्रह अण्णांकडे होता. नाणी मिळविण्यासाठी अण्णांना खूप प्रकारच्या हिकमती कराव्या लागल्या. कोकणात नाणी देवघरात पूजेत असतात. काहीवेळा देवाच्या पालख्या घरोघरी फिरतात तेव्हा जुनी नाणी लोक देवाला अर्पण करीत. अशातली काही नाणी अण्णांना मिळविण्यासाठी प्रसंगी देवाला कौलही लावावा लागला. काही लोकांच्या पूजेत नाणी बाहेर काढायचा मुहूर्त ठरलेला असे. एका गृहस्थाच्या पूजेत असलेले नाणे पाहिल्यानंतर त्यावरील मुद्रा पाहून अण्णांनी, ‘ही औरंगजेबाची मुद्रा आहेअसे सांगताच तो गृहस्थ स्वतःवरच चिडल्याचा अनुभव अण्णांनी घेतला होता.

फारसे काही हाताशी नसताना सामान्य कुटुंबात जन्मलेल्या किमान अक्षर ओळख असलेल्या एखाद्या गृहस्थाने तब्बल ताम्रपट शोधावेत हे आजतागायत संपूर्ण भारत वर्षातील वैयक्तिक कारकीर्द स्तरावरील एक आश्चर्य आहे. ते आश्चर्य गेली अनेक वर्षे अण्णा जगले. ताम्रपट मिळविणे हे खूपच जिकिरीचे काम असते. एखाद्या व्यक्तीकडे ताम्रपट असला तरी तो दाखवण्यासाठी लोक तयार नसतात. लोक त्याला देवाचा पत्रा असे संबोधतात. त्यावर गुप्तधन लिहिलेले आहे, असा अनेकांचा समज असतो. यास्तव जो हा ताम्रपट प्रथम वाचेल त्याला हे गुप्तधन मिळेल अशीच त्यांना भीती असते. दुसरे म्हणजे सरकार जप्त करेल ही भीती असते. म्हणून ताम्रपट मिळविण्यात नाना प्रकारच्या अडचणी येतात. तरीही अण्णांनी शिलाहार, वाकाटक, चालूक्य, आदिलशाही, निजामशाही आदि राजवंशातील ताम्रपट मिळविले होते. अण्णांचे ग्रंथसंकलन आणि वाचनप्रेम सर्वश्रुत होते. त्यांचा संग्रह अभ्यासकांसाठी पर्वणी ठरायचा. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आवर्जून भेटायला येणाऱ्या प्रत्येक स्नेही, मान्यवर, इतिहासाचे अभ्यासक, साहित्यप्रेमी वाचक, वाचनालयांना अण्णा ग्रंथभेट देत राहिले. योग्य माणसापर्यंत योग्य कात्रण पोहोचविण्याची त्यांची कला अफलातून होती. मागील सहा दशके अण्णा सरासरी रोज स्वहस्ते किमान पत्रे लिहित आले. अलिकडे यात संख्यात्मक कमी आल्याने ते व्यथित वाटायचे. तसं बोलून दाखवायचे. अण्णा कोकणातील प्राचीन पार्श्वभूमी लाभलेल्या दाभोळगावी राहायचे तेव्हा तेथील डाकघरात सर्वात जास्त टपाल येणारे आणि जाणारे घर अण्णांचेच होते.

जिल्हा परिषदेच्या सभापती पदावरून पाय उतार झाल्यानंतर अण्णांनी अवघ्या वर्षभरातच पक्षीय राजकारणातून निवृत्ती स्वीकारत स्वतःला पूर्णवेळ समाजसेवी उपक्रमांमध्ये झोकून दिले होते. आपल्या कामाला योग्य दिशा मिळावी म्हणून १९८३ मध्ये त्यांनी सागरपुत्र विद्या विकास संस्थास्थापन केली. यामुळे परिसरातील दलित, मागासवर्गीय, खारवी, भोई, कोळी आदि मच्छिमार आणि दर्यावर्दी मुलामुलींना एस.एस.सी. पर्यंत शिक्षण घेता आले. कोणतीही गोष्ट जीव ओतून चांगलीच करायची हा त्यांचा प्रयत्न नेहमीच त्यांनी आखलेले कार्यक्रम यशस्वी करत आला होता. आपण वाचलेले, अनुभवलेले, अभ्यासलेले आणि संशोधन केलेले सारे काही समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी अण्णांनी स्वतःला लेखनाच्या छंदात गुंतविले होते. जवळपास १४-१५ पुस्तके अण्णांनी लिहून प्रकाशित केली होती. अण्णांच्या आयुष्यात त्यांचा लोकसंग्रह फार मोठा राहिला आहे. जबरदस्त निष्ठा आणि हातात घेतलेले काम होणारच असा समोरच्यांच्या मनात भरावसा निर्माण करणारी त्यांची कार्यतत्परता यामुळे ख्रिश्चन, मुस्लिम आदिसंह सर्वधर्मीय त्यांचेवर शतप्रतिशत विश्वासून असत.

१९४२ ला स्वातंत्र्य समराचे यज्ञकुंड पेटले होते. अण्णा दाभोळ नं. शाळेत दाखल झाले. इयत्ता ते वी अण्णा येथेच शिकले. दुसर्याच दिवशी शाळेसमोरून सानेगुरूजींची बैलगाडीतून निघालेली मिरवणूक अण्णांनी पाहिली. त्या वयात व्हायचे ते संस्कारही झाले. विसापूरच्या घरी पंतोजी विठ्ठल त्रिंबक भागवत हे शिक्षक अण्णांना शिकवत. पुस्तक एकच होते. इयत्ता वगैरे नव्हती. अण्णांनी मराठी सातवी होऊन शाळा सोडली. दाभोळला सहा महिने आणि गुहागर येथे वर्षभर स्पेशल इंग्लिश कोर्स करून अण्णांचे शिक्षण आटपले. त्यानंतर सन १९५८ च्या दरम्यान ओणी आणि १९६० दरम्यान अण्णांनी विसापूर येथून आपला मुक्काम दाभोळला हलवला. राजकारणाच्या जोडीने पुनम स्टोअर्सया नावाचे औषधांचे दुकान काढून व्यवसायाचा सुमारे २५ वर्षे यशस्वी प्रयत्न केला. परंतु त्यांची ओढ काही वेगळीच होती. ओढीच्या दिशेने अण्णा सतत धावत राहिले. एखाद्या छोट्याशा ओव्हळामधील माशांना नदीचा पत्ता गवसावा तसे काहीसे विसापूरहून दाभोळला आलेल्या अण्णांचे झाले. दाभोळच्या वातावरणात अण्णांच्या संशोधन आणि संग्राहक वृत्तीला खतपाणी मिळाले. दाभोळच्या खाडीला येऊन मिळालेल्या वाशिष्ठीच्या ज्या दोन्ही तीरावरील सांस्कृतिक, सार्वजनिक आयुष्यात हात स्वच्छ ठेवून अण्णा आयुष्यभर वावरले. 

अण्णा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तर होतेच पण एकत्रित रत्नागिरी (सिंधुदुर्गसह) जिल्ह्यातील जनसंघाचे स्थापनेपासूनचे कार्यकर्ते-नेते होते. आणीबाणी काळात त्यांनी तुरुंगवास भोगला होता. तरीही कोकण इतिहास, संशोधन, पुराणवस्तू संग्रह आणि समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी विचारांच्या सर्वव्यापी क्षेत्रातलं आपलं मैत्र जपलं होतं. अण्णांना ग्रामीण भागाच्या दुःखाची आणि यातनांची उत्तम जाण होती. कोकण इतिहास संशोधनाचं काम करतानाच अण्णांनी ‘सागरपुत्र संस्था’ स्थापन करून सामाजिक बांधिलकी जपली. अखेरच्या कालखंडात दोनेक महिन्यांपूर्वी त्यांनी शिरगाव (तालुका चिपळूण) परिसरातील विविध स्वयंसेवी संस्थांना आपल्याकडील लाखभर रुपये दान केले होते. अण्णांचा लोकसंग्रह फार मोठा होता. जबरदस्त निष्ठा आणि हातात घेतलेले काम होणारच असा समोरच्यांच्या मनात भरावसा निर्माण करणारी अण्णांची कार्यपद्धती होती. यामुळे ख्रिश्चन, मुस्लिम आदीसंह सर्वधर्मीय त्यांचेवर विश्वासून असत. निवळ लोकसंग्रहाच्या बळावर सुमारे दहा-वीस मानाची पदे अण्णांकडे चालून आली होती. ५ सप्टेंबर १९३० ते ११ ऑक्टोबर २०२२ अशी त्र्याण्णव वर्षांची अण्णांची वाटचाल राहिली. सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय माणसाला भारभूत व्हावी अशी ही आयुर्मर्यादा आहे. पण अण्णांना हेही आयुष्य कमी पडलं असावं, इतकं उद्याचं काम त्यांच्या डोक्यात सतत सुरु होतं. अण्णांच्या निधनापूर्वी एक दिवस अगोदर आम्ही त्यांना भेटलेलो. आपल्या जुन्या शिरगावचा पत्ता असलेल्या शिल्लक चारएकशे व्हिजीटींग कार्डवरील पत्ता बदलून तो ‘मालघर’ करता येईल का? असा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला होता. नव्या पत्त्याचा छोटासा स्टीकर करून देतो असं आम्ही म्हणालोही. तो चिकटवून देण्याची जबाबदारी अण्णांच्या ‘केअरटेकर’ रुपाली घाणेकर यांनी घेतली होती. पण तत्पूर्वी नियतीने हे घडवले. आम्ही लवकरच त्रेचाळीस वर्षांचे होऊ. पण वयाच्या त्र्याण्णवव्या वर्षी आपल्या व्हिजीटींग कार्डवरील पत्ता बदलून घेत नव्या कल्पनांच्या दिशेने धावणारी, जीवनभर केलेल्या चिंतनाच्या आधारे ‘शिवकाळ आणि पेशवाई’ या विषयांवर दोन पुस्तके लिहिण्याचे विचार करणारी व्यक्ती भविष्यात कधी आमच्या पाहाण्यात, संपर्कात येईल? याचा विचार करताना आता डोळ्यांच्या पापण्या ओलावतात.

अण्णांचा आणि आमचा स्नेहबंध मागील पंधरा वर्षांचा! पहिली पाच विश्वास संपादण्यात गेलेली. मागील दहाएक वर्षांत, अण्णांच्या मनात रेंगाळणाऱ्या संदर्भमूल्य असलेल्या अनेक ऐतिहासिक विचारांना पुस्तके, ग्रंथ आणि स्मरणिकांत रूपांतरित करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत समृद्ध, व्यासंगी जीवन जगत अण्णा कोकण इतिहास संशोधक आणि अभ्यासकांच्या हृदयात प्रदीर्घ काळ विराजमान राहिले. अण्णा गेल्यावर जणू कोकणाचा इतिहास मुका झाल्यासारखं आम्हाला वाटलं. काळ जसजसा पुढे सरकेल तसतशी या ध्येयवेड्या व्यक्तिमत्त्वाची ‘कार्यबहुलता’ सुजनांना विचार करायला भाग पाडेल. वयोमानानुसार अण्णांचं जाणं सर्वांसाठी उचित असेलही! मात्र आमच्यासाठी ते धक्कादायक ठरलं. अण्णा गेले त्या रात्री शहरातील अपरांत हॉस्पिटलमध्ये अण्णांचं निधन झाल्याचं हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉ. यतीन जाधव यांनीच आम्हाला कळवलं. अण्णांनी देहदान केलं होतं. त्यांचे पार्थिव शरीर वेळेत डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात पोहोचणे आवश्यक होते. घटनेची कल्पना देताच त्याचं नियोजन भाऊ काटदरे यांनी पूर्ण केलं. अण्णांचे खेड येथील ज्येष्ठ जावई बेंडखळे, ‘नातू’ गौरव, नात कांचन, डॉ. चिनार आणि दादा खातू आदी मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत अण्णांचे पार्थिव शरीर वालावलकर रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले. मध्यरात्री पावणेदोन वाजता अण्णांचं पार्थिव आमच्या नजरेआड झालं. विषण्ण मनाने चिपळूणला परतत असताना, जीवनात सतत कार्यरत राहाण्याची प्रेरणा देणारं अण्णांचं देदीप्यमान व्यक्तिमत्त्व आमच्या मनात घर करून राहिलं होतं!

 

धीरज वाटेकर चिपळूण

मो. ९८६०३६०९४८

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...