सोमवार, १० एप्रिल, २०२३

तंजावूरचे ‘ज्ञानपूजक’ सरफोजीराजे द्वितीय

        
११ एप्रिल १६७४ ! साडेतीनशे वर्षांपूर्वी आजच्या दिवशी छत्रपती श्रीशिवाजीराजे चिपळूणच्या दळवटणे (हलवर्ण) येथील लष्करी छावणीकडे गेले होते. शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपल्या वस्तूसंग्रहालयात महाराजांचा हा ‘दळवटणे सैन्यतळ’ साकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी आज (दि. ११) ज्ञानपूजकाचा वारसा सांगणाऱ्या या ‘तंजावूर’ घराण्यातील विद्यमान राजे श्रीछत्रपती शिवाजी महाराज आणि ‘सरसेनापती’ हंबीरराव मोहिते (१८ एप्रिल १६७४ला दळवटणे सैन्यतळ येथे महाराजांकडून ‘सरसेनापती’पदाची वस्त्रे बहाल) यांच्या 
वंशातील सौ. प्रतिभा सुरेश धुमाळ चिपळूणात येत आहेत.

तंजावूर हे महाराष्ट्र आणि तामिळनाडूची नाळ जोडणारा दुवा आहे. तंजावूरच्या इतिहासात, ‘राजा’ हा किताब सरफोजीराजे द्वितीय (२४ सप्टेंबर १७७७ ते १६ मार्च १८३२) यांच्याकडे असला तरी प्रत्यक्षात राज्यकारभाराची सत्ता नव्हती. अशा विपरीत परिस्थितीत सरफोजीराजे द्वितीय यांनी तंजावूरच्या सांस्कृतिक विकासासाठी दिलेले अमूल्य योगदान आजही त्यांची ‘ज्ञानपूजक’ ही ओळख सांगण्यास पुरेसे आहे. धर्म, अर्थकारण, कलासंचार, संग्रहविद्या हे सरफोजीराजे द्वितीय यांच्या आस्थेचे विषय राहिले. त्यांच्या अंत्ययात्रेस सुमारे नव्वद हजार लोक उपस्थित होते. लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने सरफोजीराजे द्वितीय यांना सन्माननीय सभासदत्व (१८२८) देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. हा मान मिळविणारे सरफोजीराजे द्वितीय हे पहिले भारतीय संस्थानिक होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिगंत किर्तीचे ज्ञानपूजकदुसरे सरफोजीराजे द्वितीय यांच्या कारकीर्दीचा आढावा घेऊया.

तंजावरचे राजे श्रीमंत श्रीशिवाजीराजे भोसले

कावेरी नदीच्या खोऱ्यात वसलेलं तंजावूर शहर एकेकाळी जगातील सर्वात उंच आणि आता युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या बृहदेश्वर मंदिसाठी प्रसिद्ध आहे. एका तामिळ दंतकथेनुसार तंजा नावाच्या दैत्याचा वध भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या नीलमेघ पेरूमल यांनी केल्यावरून या ठिकाणाचे तंजाऊर असे नाव पडले होते. तंजावूरच्या इतिहासात मराठा राजांचा कार्यकाळ जवळपास १८० वर्षांचा आहे. तंजावूरमुळे महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाला प्रतिभाशाली सांस्कृतिक वारश्याची जोड मिळाली. हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडपासून तंजावूर जवळपास १३६० किमी. आहे. इतिहासात तंजावूरचे राज्य विजयालय चोळ यांनी मुत्तरैयर वंशाच्या राजांकडून नवव्या शतकात जिंकून घेत तेथे राजधानी वसवली होती. चोळ राजवंशाने तंजावूर येथे सुमारे चारशे वर्षे राज्य केले. पुढे त्याच वंशातील राजेंद्र चोळ यांनी राजधानी गंगैकोंडचोळपुरम् येथे नेली. पांड्य वंशाची सत्ता तंजावूरवर १५४९पर्यंत होती. त्यानंतर विजयनगर राज्यातील सेनापती शिवप्पा नायक यांनी तंजावूर येथे स्वतंत्र राज्य स्थापले होते. छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी ऊर्फ एकोजी यांनी आदिलशाही अंकित तंजावूरच्या नायक राजांच्या गृहकलहात यशस्वी हस्तक्षेप करून १६७५मध्ये हे राज्य मिळवले होते. या घटनेचा उल्लेख भोसलावंसम् या संस्कृत हस्तलिखितामध्ये आढळतो. व्यंकोजी यांच्या मृत्यूनंतर (१६८४) शहाजी, पहिले सरफोजी व तुकोजी या तिघा भावांनी १७३६ पर्यंत राज्य केले. सरफोजीराजे प्रथम यांच्या काळात शिवभारत या छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित संस्कृत हस्तलिखिताचे तामिळ भाषांतर ‘शिवचरितम’ करण्यात आले होते. तुकोजीराजे यांनी हिंदुस्थानी संगीताचा परिचय प्रथमच दक्षिणेस करून दिला होता. त्यांनी संगीतावर आधारित संगीत समामृत ग्रंथाची निर्मिती केली. तुकोजी यांच्यानंतर त्यांचे पुत्र एकोजी (बाबासाहेब) गादीवर आले. ते वर्षभरात मृत्यू पावले. तुकोजी यांचे पुत्र प्रतापसिंह यांनी (१७३९-६३) इंग्रजांशी सख्यत्व जोडून सुमारे पंचवीस वर्षे राज्य केले. प्रतापसिंहराजे यांच्या काळात तंजावूरने ब्रिटिश आणि फ़्रेंच यांच्यातील सप्तवार्षिक युद्ध अनुभवलं होतं. प्रतापसिंहराजे यांचे पुत्र तुळजाजी (१७६३ ते ८७) यांनी त्यांना मुलगा नसल्यामुळे मृत्युपूर्वी भोसले घराण्यातील मालोजीराजे यांचे भाऊ विठोजी यांच्या वंशातील एक मुलगा दत्तक (२३ जानेवारी १७८७) घेऊन त्याचे नाव सरफोजी ठेवले. तेच पुढे सरफोजीराजे द्वितीय म्हणून प्रसिद्धी पावले.

Drawing of Thanjavur Brihadeshwara Temple
in a French book titled
Monuments Ancients Et Modernes De L Hindoustan
Published in 1821

सरफोजीराजे द्वितीय यांना शिक्षणासाठी डच मिशनरी सी. एफ. शॉर्झ यांच्याकडे सोपविण्यात आले होते. शॉर्झ यांनी राजपुत्रास उचित शिक्षण देत इंग्रजी, ग्रीक, फ्रेंच, जर्मन, लॅटिन, डॅनिश या पाश्चात्त्य आणि मराठी, संस्कृत, तेलुगू, कन्नड, हिंदी, उर्दू आदी भारतीय अशा एकूण तेरा भाषा शिकविल्या होत्या. तुळजाजी यांच्यानंतर अमरसिंह नावाच्या त्यांच्या सावत्र भावाने तंजावूरची सर्व सत्ता हस्तगत केल्यावर सरफोजीराजे द्वितीय यांना मातोश्रींसह मद्रासला आश्रय घ्यावा लागला होता. सरफोजीराजे द्वितीय यांचे दत्तकविधान अशास्त्र असून मीच या गादीचा खरा वारस असल्याचे त्यांनी मद्रासचे गव्हर्नर सर आर्चिबॉल्ड कँबेल यांना कळविले होते. इंग्रजांनीही विषयाची अधिक चौकशी न करता अमरसिंह यांना तंजावरच्या गादीवर बसवून त्यांच्यासोबत नवीन तह (१० एप्रिल १७८७) केला होता. मात्र सरफोजीराजे द्वितीय यांना शिक्षण देणाऱ्या शॉर्झ यांनी (१७८७ ते ९७) हे दत्तक-प्रकरण धसास लावून ईस्ट इंडिया कंपनीला, सरफोजीराजे द्वितीय हेच खरे वारस असल्याचे दाखवून दिले. अखेर ईस्ट इंडिया कंपनीने अमरसिंह यांना पदच्युत करून सरफोजीराजे (द्वितीय यांचा राज्याभिषेक (१७९८) केला. त्यांच्या अखत्यारित पाच सुभे, पाच हजारहून अधिक गावं एवढा मुलुख होता. ईस्ट इंडिया कंपनीने सरफोजीराजे द्वितीय यांच्याशी एक पंधरा कलमी करार केला होता. पुढील वर्षी गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली तंजावूर संस्थान खालसा केले. सरफोजीराजे द्वितीय यांच्याकडे खासगी मालमत्ता, तंजावूर किल्ला आणि भोवतालचा काही भाग आणि सालिना साडेतीन लाख रुपये तनखा मंजूर करण्यात आली होती.

उंचपुरे, गोरे, झुबकेदार मिशा असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे सरफोजीराजे द्वितीय ग्रंथवेडे आणि कलेचे चाहते होते. चित्रकला, बागकाम, नाणेसंग्रह, ग्रंथसंग्रह, रथांच्या शर्यती, शिकार, बैलांच्या झुंजी आदींची त्यांना आवड होती. शॉर्झ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध भाषा, इंग्रजी साहित्य आणि अद्ययावत पाश्चात्त्य ज्ञान यांचा अभ्यास केलेल्या सरफोजीराजे द्वितीय यांच्याकडे व्यासंग वाढविण्यासाठी पुरेसा पैसा आणि वेळ उपलब्ध होता. त्यांनी जाणीवपूर्वक आपले उर्वरित आयुष्य विद्याव्यासंग आणि लोककल्याणाची कामे करण्यात घालवले. राज्य खालसा झालेले असतानाही इंग्रजांनी त्यांना हिज हायनेसहा बहुमानदर्शक किताब प्रदान केला होता. राजकीय दृष्ट्या सुरूवातीच्या काळात बराच त्रास सहन करावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर सरफोजीराजे द्वितीय यांची तंजावूरमधील कारकीर्द मराठी प्रभावाच्या दृष्टीने इतिहासात अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांची कारकीर्द उल्लेखनीय नव्हे तर तंजावूर राजवटीची शान वाढवणारी ठरली. त्यांची ओळख ‘जनतेचा राजा’ म्हणूनच सांगितली जाते. त्यांनी देवनागरी लिपीतील भारतातील पहिला छापखाना १८०५मध्ये दक्षिणेत उभारला. या दगडी छापखान्याचे नाव त्यांनी ‘विद्याकलानिधी वर्ण यंत्रशाळा’ ठेवले होते. त्यात छपाईसाठी दगडी मुद्राक्षरे वापरण्यात आली होती. त्यांनी तंजावूरच्या राजवाडा परिसरात तमिळनाडूमधील पहिले प्राणिसंग्रहालय निर्माण केले. व्यापारासाठी सुविधांसाठी तंजावूरपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर गोदी बांधली. हवामान वेधशाळा उभी केली. त्यांचा स्वतःचा बंदुका निर्माण करण्याचा कारखाना होता.

सरस्वती महाल (सरफोजीराजे द्वितीय मेमोरियल म्यूजियम) हे तंजावूरच्या राजमहालातील ग्रंथालय आशिया खंडातील एक जुनी लायब्ररी असून ते जगातील सर्वात मोठ्या हस्तलिखितांचा संग्रह असणाऱ्या ग्रंथालयांपैकी एक आहे. हे ग्रंथालय नायकराजवटीत (१५३५-१६७३) उभारले गेले असले तरी सरफोजी (द्वितीय) महाराजांनी या ग्रंथालयाची वाढ करत अमूल्य ग्रंथ, नकाशे, शब्दार्थकोष, नाणी, कलाकृती यांचा संग्रह केला. येथे सुमारे ६० हजार प्राचीन, जुन्या ग्रंथांचा समावेश आहे. ४० हजार हस्तलिखिते ही तामिळ आणि संस्कृतमधील तर तीन हजारपेक्षा जास्त मराठीतील ग्रंथ आहेत. यातील बाराशे ग्रंथ मोडी लिपीत आहेत. महाराजांनी अनेक विद्वानांकडून संस्कृत ग्रंथ, काव्ये, नाटके, टीका आदी लिहून घेतल्या. प्राचीन ताम्रपट, ताडपत्रे, भूर्जपत्रे आदींचा मोठा संग्रह केला. सरफोजी (द्वितीय) यांनी अनेक प्रकाशित ग्रंथ आणि हस्तलिखिते गोळा केली होती. त्यांना पुस्तकांची इतकी आवड होती, की त्यांनी चार हजारांहून अधिक पुस्तके जगातील विविध देशांतून खरेदी करून ती सरस्वती महाल ग्रंथालयात आणली. आज या ग्रंथालयात वेदांत, व्याकरण, संगीत, नृत्य आणि नाटक, शिल्पशास्त्र, खगोलशास्त्र, वैद्यक, हत्तींचे व घोड्यांचे प्रशिक्षण अशा विविध विषयांवरील ग्रंथसंपदा आहे. दुसरे सरफोजी महाराजांनी स्वतः ग्रंथालयांतील या पुस्तकांवर इंग्रजीमध्ये सह्या केलेल्या आहेत. मराठी दरबारातील कामकाजाच्या मोडी लिपीत केलेल्या नोंदी येथे उपलब्ध आहेत. फ्रेंच व मराठी भाषांतील पत्रव्यवहार जतन करण्यात आला आहे. ‘एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाया’ या इंग्रजी विश्वकोशाने ग्रंथालयांच्या सर्वेक्षणात भारतातील सर्वात मोठे ग्रंथालय अशी सरस्वती महालची नोंद केली आहे. बर्नेल नावाच्या विद्वानाने सरफोजीराजे द्वितीय यांच्या संग्रहातील ग्रंथांची सूची तयार केली आहे. येथील शब्दार्थचिंतामणी हा संस्कृत ग्रंथ जर डावीकडून वाचला तर रामायण आणि उजवीकडून वाचला तर महाभारत आहे. तर कथात्रयी हा ग्रंथ डावीकडून वाचल्यास रामायण आणि उजवीकडून वाचल्यास महाभारत तर आहेच पण शब्दशः अर्थ लावल्यास भागवत धर्म सांगणारा आहे. श्रीशिवछत्रपतींच्या आज्ञेने कवींद्र परमानंदानी लिहिलेल्या ‘शिवभारत’ शिवचरित्राची मूळप्रत फक्त येथेच उपलब्ध आहे. येथे प्राचीन जग आणि अखंड भारत नकाशा पाहायला मिळतो. समर्थ रामदास यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना केलेल्या वेदांत उपदेश संदर्भातील हस्तलिखित येथे उपलब्ध आहे. त्यावर तामिळ भाषेत ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु श्रीसमर्थ रामदास स्वामी" असा उल्लेख असून छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या बंधूंच्या वंशजांनी श्रीसमर्थ रामदासांचे सतराव्या शतकातले चित्रही जपून ठेवले आहे.

नाटक हा कलाप्रकार दक्षिणेमध्ये रुजवला तो तंजावूरच्या मराठ्यांनी. मराठी भाषेतील पहिलं नाटक हे महाराष्ट्रातील मराठी रंगभूमीवर नव्हे तर तामिळनाडूच्या तंजावूरच्या मराठी रंगभूमीवर प्रथम उभे राहिले होते. सरफोजी (द्वितीय) महाराजांनी वनस्पतीजन्य औषधनिर्मिती आणि संशोधन यासाठी धन्वंतरी महालया संशोधन संस्थेची स्थापना केली. संस्थेत आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि आधुनिक औषधे या उपचारशाखांवर संशोधन केले जात असे. संस्थेत आजारी असलेल्या व्यक्ती व प्राण्यांवर उपचार केले जात. त्यांची नोंदणीपत्रके ठेवली जात. तशी पद्धत तेव्हा भारतात रूढ नव्हती. संस्थेत वनस्पती आणि त्यांचे औषधी उपयोग यावर अठरा भागांत संशोधनपर ग्रंथ उपलब्ध आहेत. राजांकडे महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची रंगीत हस्तचित्रे होती. त्यांनी धन्वंतरी महालाच्या औषधोपचार पद्धतीचे तपशीलवार वर्णन करणारा एक कवितासंग्रह तयार केला होता. राजे हे घोडय़ाची शुभ व अशुभ चिन्हे, अश्वगती, अश्वांचे आयुष्य आदी अश्वपरीक्षेत पारंगत होते. यातून त्यांच्या गजशास्त्र प्रबंध’, ‘गजशास्त्र सारया ग्रंथांची निर्मिती झाली. त्यांनी पक्षीजगताही अभ्यास केला होता.  दुसरे सरफोजीराजे द्वितीय हे त्यांच्या बरोबर शल्यचिकित्सेची सामग्री नेहमी बाळगत. ते जेथे जेथे जात तेथे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करत. सरफोजीराजे द्वितीय यांनी केलेल्या शस्त्रक्रियांच्या नोंदी इंग्रजीत तपशीलवार सापडतात. त्यांनी ज्या रोग्याची शस्त्रक्रिया केली त्याचा पूर्वेतिहासही नोंदवून ठेवलेला आहे. हे साहित्य सरस्वती महाल ग्रंथालय संग्रहात आहे. सरफोजी (द्वितीय) महाराजांनी नव विद्याकला विधी शाळेची स्थापना केली होती. तेथे भाषा, साहित्य, कला, कौशल्य, वेद आणि शास्त्र यांचे शिक्षण दिले जात असे. ते भारतीय स्त्रियांच्या उद्धाराचे समर्थक असल्याने त्यांनी स्त्रियांची शिक्षक म्हणून नेमणूक करून शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवून आणली होती. त्यांनी तंजावूरमध्ये पाण्याचे दहा तलाव बांधले. कित्येक विहिरी खोदल्या. संपूर्ण तंजावूरसाठी जमिनीखालील मलनिस्सारण व्यवस्था अंमलात आणली होती. सरफोजी यांनी सोळा भिन्न खाती पाडून प्रत्येक खात्यावर एक दमित (प्रमुख) नेमला होता. स्वतः उत्तम कवी असल्याने त्यांनी भरतनाट्यम् व संगीतकला यांनाही प्रोत्साहन दिले. सरफोजीराजे (द्वितीय) यांचा काळ संगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. त्यांच्या दरबारात सुमारे ३६० संगीततज्ज्ञ होते. कर्नाटक संगीताला विकसित दर्जा प्राप्त करून देणारे संगीतकार त्यागराज, शामशास्त्री व मुथुस्वामी दीक्षितार हे राजांचे दरबारी गायक होते. भारतीय वैद्यकशास्त्राच्या अभ्यासाची सोय केली. चित्रकलाशिल्पकला यांचाही त्यांना व्यासंग होता. त्यांनी राजमहालातील दिवाणखाना उत्कृष्ट भित्तिचित्रांनी सुशोभित केला होता. याशिवाय मद्रास येथील संग्रहालय आणि इतर वाड्यांमधूनही त्यांनी चित्रे काढून घेतली होती. सेतुभवसत्रम् व पुदुकोट्टई येथे चुनाविटांचे दोन स्तंभ उभारण्यास प्रारंभ केला होता. शॉर्झ यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ राजांनी त्यांचा पुतळा उभारला होता. पवनचक्की, विद्युत्‌यंत्र, मनुष्याचा हस्तिदंती सांगाडा, राजमहालात उघडलेली वेधशाळा आदीतून त्यांची संशोधक आणि मर्मज्ञ दृष्टी दिसून येते.

महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने सरफोजीराजे द्वितीय यांची अत्यंत महत्त्वाची कामगिरी म्हणजे तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरात नैऋत्य दिशेच्या भिंतीवर १८०३मध्ये दगडात कोरून घेतलेला भोसले घराण्याचा इतिहास होय. भारतात एवढा मोठा दीर्घ शीलालेख कुठेही नाही. याशिवाय सरफोजीराजे द्वितीय यांनी ऐतिहासिक अरबी व फार्सी ग्रंथांची भाषांतरे करवून घेतली. त्यात इब्न बतूताचे अरबी भाषेतील ग्रंथ व शाहनामा हे फार्सी काव्य आदी महत्त्वाचे ग्रंथ आहेत. सरफोजीराजे द्वितीय यांनी आपल्या चौतीस वर्षांच्या प्रजादक्ष कारकीर्दीत तंजावूर आणि सभोवतालच्या प्रदेशात अनेक धार्मिक आणि शिक्षणविषयक सुधारणा केल्या. ते मोकळया मनाचे व अन्य धर्मपंथीय श्रद्धावंताच्या बाबतीत सहिष्णू होते. बृहदीश्वर मंदिराच्या देखभालीसाठी देणग्या देताना इतर धर्माच्या लोकांनाही समान वागणूक दिली. त्यांनी ख्रिश्चन मिशनरींनी चालवलेल्या शाळा आणि चर्चेस यांनाही देणग्या दिल्या होत्या. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तंजावूर हे विद्येचे आणि केलेचे केंद्र बनले होते. सरफोजीराजे द्वितीय यांची संपूर्ण कारकीर्द त्यांच्या अभिरूचीसंपन्न जीवनाची साक्ष देत आहे. त्यांना मुक्तंबाबाई व अहिल्याबाई या दोन पत्नी होत्या. मुक्तंबाबाई अकाली मरण पावल्या. अहिल्याबाई यांच्यापासून त्यांना तीन मुली आणि एक मुलगा झाला. मुलगा पुढे श्रीशिवाजी (१८३३ ते १८५५) म्हणून सरफोजीराजे द्वितीय यांच्या मृत्यूनंतर तंजावूरचे राजे बनले. मात्र कारभार पूर्णपणे इंग्रजांच्या हाती गेला होता. त्यातच श्रीशिवाजी हे निपुत्रिक वारल्यामुळे १८५५मध्ये इंग्रजांनी तंजावूर संस्थान खालसा केले.

राजा सरफोजी भोंसले दुसरे

तंजावूरच्या बहुतेक कलाभिज्ञ राजांनी चित्र, शिल्प, संगीत, नृत्य, नाट्य, ग्रंथनिर्मिती आदींसह विविध भाषांना मोठा आश्रय दिला होता. तंजावूरचा दरबार विद्वान आणि कलावंतांनी गजबजलेला असायचा. तंजावूरमधील मराठा दरबार हॉल, सरस्वती महाल ग्रंथालय म्हणजे तंजावूर भोसले घराण्याची मौलिक स्मारके आहेत. महाराजा सरफोजी द्वितीय यांनी स्वतः शंभरहून अधिक मराठी आणि तेलगु भाषेत गाणी लिहीली. ही गाणी नाट्यसंगीतात वापरली गेली. त्यांनी ‘सर्वेंद्र रत्नावली’ हा ७२ खंड असलेला ग्रंथ लिहिला. या संस्थानने १९६२च्या चीन युद्धाच्यावेळी दोन हजार किलो सोने, १९७१च्या पाकिस्तान युद्धात शस्त्रास्त्र भारत सरकारला दिली. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीला शंभर एकर जमीन दान दिली. तंजावूरमध्ये आजही सुमारे पाच लक्ष मराठी लोक राहतात. ते तामिळी पेहराव घालत असले तरी घरात तोडकी-मोडकी मराठी बोलतात. तंजावूरच्या मराठा राजांनी दर्जेदार १२ नाटकांसह पन्नासहून अधिक विविध ग्रंथ लिहिले. भारतातील पहिला छापखाना उभारला, भारतातील मुलींची शाळा काढली, भरतनाट्यम नृत्याला राजाश्रय दिला. मराठीमधील पाहिले नाटक लिहून रंगमंचावर आणले. जगातील सर्वात मोठा शिलालेख साकारला. जगातील सर्वात मोठे हस्तलिखित संग्रहालय उभारले. एका मराठी राज्याचं हे वैभव आणि संस्कृती तमिळ जनतेनं जतन केली, हे फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या बाहेरील दक्षिण भारतातील हे ‘मराठी’ कर्तृत्व आपण समजून घ्यायला हवं आहे.

 

धीरज वाटेकर, चिपळूण

मो. ९८६०३६०९४८


संदर्भ ::

१.    मराठी विश्वकोश

२.    थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम वेबपोर्टल

३.    ABP माझा - स्पेशल रिपोर्ट : तंजावरच्या मराठ्यांचा गौरवशाली इतिहास

४.    शिवदैनंदिनी २०२१


सोमवार, २० मार्च, २०२३

मुंबई-गोवा जागतिक ‘जैवविविधता महामार्ग’ करूया

पुढील वर्षी आपल्या देशात, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंचवार्षिक निवडणूक उत्सव होणार आहे. मागील काही वर्षात देशातील विकासकामांच्या घोडदौडीत सर्वाधिक काळ रखडलेला बहुचर्चित प्रकल्प अशी दुर्मिळ नोंद स्वत:च्या नावावर करू पाहाणारा ‘मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प’ पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपसूकच या महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कंत्राटी कामालाही वेग येणार आहे. त्यातच मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा शासन स्तरावर काजू लागवड करण्यात येणार असल्याचे प्रसूत झालेले वृत्त वाचल्यानंतर अलिकडे ऐकलेलं, ‘हा मार्ग जगातील सर्वोत्तम बोटॅनिकल कम् जैवविविधता (Biodiversity) महामार्ग होऊ शकतो हे वनस्पतीशास्त्राचा विशेष अभ्यास असलेल्या एका अस्सल कोकणी कृतिशील तज्ज्ञाचं चिंतन आठवलं आणि जागतिक वनदिनाच्या अनुषंगाने कागदावर उतरवलं, इतकंच! 

 

२०११पूर्वी मुंबई ते गोवा दरम्यानचा किमान प्रवास तेरा तासांचा होता. या रुंदीकरण प्रकल्पाने तो दहा तासांच्या आत येईल. भविष्यात हा महामार्ग मंगळुरूपर्यंत वाढेल. सरकारी जमीन उपलब्ध झाल्यास लॉजिस्टिक पार्क आणि ट्रक टर्मिनलही उभारली जातील. या महामार्ग प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सिंधुदूर्ग जिल्हा वगळता कोकणातील लोकप्रतिनिधींनी सक्षम पाठपुरावा केलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. या महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी अनेकदा उच्च न्यायालयाला, सरकारला आदेश द्यावे लागले आहेत. २०१४पासून २०२१पर्यंत जवळपास सहा वेळा सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या तारखा बदलल्यात. महामार्ग निर्मितीच्या काळात आजवर किमान पाचेक हजार प्रवाशांचे दुर्दैवी मृत्यू झालेत. मुंबई ते गोवा हा ४७१ किमी महामार्ग (NH66) २०११पासून चार पदरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा मार्ग नवी मुंबईतील पनवेलला गोव्याशी जोडतो. पुढे तो महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधून थेट कन्याकुमारी आणि तामिळनाडू येथील केप कोमोरिन येथे संपतो. आम्ही ‘कोकण ते कन्याकुमारी’ प्रवास या रस्त्याने केलेला आहे. ‘सप्तकोकण’ संकल्पना समजून घेतली तर हा सारा मार्ग आपल्याला जागतिक ‘बॉटनिकल हायवे करता येणे शक्य आहे. अर्थात आपण तूर्तास लेखन मर्यादा मानून मुंबई ते गोवा मर्यादित विचार करतो आहोत. आपल्या देशात ‘बोटॅनिकल गार्डन’ आहेत. तिथे वनस्पती ह्या संशोधन आणि शिक्षणाच्या उद्देशाने वाढवल्या जातात आणि प्रदर्शित केल्या जातात. तामिळनाडूमधील उटीचे सरकारी बोटॅनिकल गार्डन गुलाबांच्या प्रचंड संग्रहासाठी प्रसिद्ध आहे. ही भारतातील गुलाबाची सर्वात मोठी बाग मानली जाते. जगातील सर्वात मोठे वटवृक्ष सांभाळणारे आचार्य जगदीश चंद्र बोस भारतीय वनस्पति उद्यान पश्चिम बंगालमधील शिबपूर, हावडा येथे आहे. निर्दयी मानवी विकृतींनी कितीही वृक्षतोड केली तरी आजही पुरेशा पर्जन्यमानाच्या बळावर असंख्य निसर्गनवले प्रसवण्याची कोकणभूमीची क्षमता सर्वज्ञात आहे. चिपळूणचे प्रसिद्ध व्यापारी श्रीरामशेठ रेडीज यांनी त्यांच्या धामणवणे येथील फार्महाऊसवर अलिकडच्या दोनेक वर्षात ग्लोबल चिपळूण टुरिझमसंस्थेच्या मदतीने दोन एकरात ‘मियावाकीजंगल तयार केले. येथे साडेतीनशे प्रकारची झाडे पाहाता येतात. कोकणातील मातीची उगवणक्षमता यातून सिद्ध होते. तिला पाठबळ देऊन या महामार्गावर वृक्ष लागवडीस बळ देण्याची आवश्यकता आहे. आपल्या सर्वसामान्य मनात बोटॅनिकल गार्डन म्हणजे एक अशी जागा जिथे आपण प्रवेश करताच आपल्याला एकाच ठिकाणी भूतलावरचे सर्वोत्तम सौंदर्य पाहायला मिळते. बोटॅनिकल गार्डनची ही संकल्पना विचारपूर्वक मुंबई गोवा महामार्गाच्या दुतर्फा उपयोगात आणल्यास कोकणातील नष्ट होण्याच्या किंवा धोक्यात आलेल्या वनस्पतींचे संवर्धन करता येईल. कोकणचे पर्यटन अधिक हरित आणि पर्यावरण पर्यटन म्हणून बळकट होण्यास मदत होईल. हा बोटॅनिकल हायवे पाहायला जगातून पर्यटक येतील.

 

या हायवेचे वृक्ष लागवडीचे उदिष्ट कितीही आकर्षक असले तरीही प्रत्यक्षात जून २०२१मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, ‘मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या झाराप ते खारेपाटण दरम्यान वनसंज्ञेखालील संपादित करण्यात आलेल्या भूमीत दुतर्फा झाडे तात्काळ लावण्यात यावीत. अन्यथा महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्याचे काम करण्यास अनुमती दिली जाणार नाही’, अशी नोटीस सिंधुदुर्गच्या उपवनसंरक्षकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला बजावली होती. शासनाच्या एका विभागाने काम करण्यासाठी शासनाच्याच दुसऱ्या विभागाला नोटिस पाठवण्याची घटना या प्रकल्पाने अनुभवली. भविष्यात वृक्षतोडीचा परिणाम कोकणच्या पर्यावरणावर होईल, वातावरण बिघडून सह्याद्रीत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण घटेल असे पर्यावरण तज्ज्ञांकडून वारंवार सांगितले गेले आहे. हे प्रश्‍न उद्‌भवू नयेत यासाठी मुंबई-गोवा महामार्ग हरीत महामार्ग बनविण्याची घोषणा झाली होती. चौपदरीकरणासाठी तोडण्यात येणाऱ्या वृक्षांच्या तिप्पट झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. स्थानिक हवामानात वाढतील आणि भरपूर प्राणवायू सोडतील अशा झाडांची निवड करण्यात येणार होती. प्रत्यक्ष लागवडीसाठी रस्त्याजवळच्या ग्रामपंचायतींची मदत घेण्यात येणार होती. पहिल्या टप्प्यात छोट्या उंचीची, दुसऱ्या भागात मध्यम आणि तिसऱ्या टप्प्यात उंच वाढणारी झाडे अशा चढत्या क्रमाने लावल्यास ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही. पर्यावरणावर होणारे परिणाम टाळता येतील. असे सारे छान कागदोपत्री नियोजन होते. भारतीय रस्ते परिषदेच्या नियमांत महामार्गादरम्यान प्रति किलोमीटर अंतरावर ५८३ झाडे लावावीत असे नमूद आहे. त्यानुसार या महामार्गावर प्रति किलोमीटरला ५८३ झाडे (रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी सहा मीटरमध्ये छोटी, मध्यम आणि मोठी अशी तीन स्वरूपाची झाडे) म्हणजे त्यात छोट्या उंचीची ३३३, मध्यम उंचीची १६८ आणि उंच ८४ झाडे असे गणित निश्‍चित झाले होते. तर १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९० गावांतून जाणाऱ्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गादरम्यान प्रति किलोमीटर १३२६ झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे हे लक्षात घ्यायला हवे आहे. कोकणात मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू होण्यापूर्वी झाडे लावण्याचे नियोजन होणे गरजेचे असताना सध्या फक्त काजू लागवडीचा विषय पुढे येतो आहे. या महामार्ग रुंदीकरणात पहिल्या ८४ किलोमीटरच्या टप्प्यात सुमारे २५हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. तर महामार्गाच्या मध्यवर्ती चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी आणि लांजा या चार तालुक्‍यांतील सुमारे ५५ हजार ८८९ झाडे तोडली गेली आहेत. चौपदरीकरणासाठी पोलादपूर तालुक्यात ६९७ वृक्ष तोडले गेलेत. सर्वाधिक वृक्षतोड कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि सुकेळी खिंड भागात झालेली असावी. जवळपास सर्व ठिकाणच्या वृक्षतोडीला किमान आठेक वर्षांचा कालावधी लोटूनही अनेक ठिकाणी आजही वृक्षारोपण झालेले नाही. कोकण रेल्वे प्रकल्पाप्रमाणे स्वतंत्र कार्यभार म्हणून या प्रकल्पाकडे न पाहाणे आणि अधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या याचाही मोठा फटका या प्रकल्पाला बसलेला आहे. वृक्षतोडीमुळे आज मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याशेजारी थोडयाश्या विसाव्यासाठीही सावली शिल्लक राहिलेली नाही. पूर्वी हा हायवे झाडाझुडपांमुळे निसर्ग सौंदर्याने नटलेला होता. खरंतर तो तसाच ठेवून सागरी महामार्ग अधिक सक्षम करणे किंवा सध्याचा प्रस्तावित नवा कोकण मार्ग निर्माण करणे शक्य होते. मात्र वृक्षतोडीचा अतिप्रचंड हव्यास कामी आला आणि कोकण महामार्ग भकास बनला. त्यातच कोकणात वणवे, चोरटी वृक्षतोड, प्राणीहत्यांनी इथल्या निसर्गाला रक्तबंबाळ करून सोडले आहे. ‘वृक्षप्रेमी’ जनता यावर पावसाळी लागवड-जतन आणि संवर्धन उपक्रमांची मलमपट्टी तरी किती लावणार?

 

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरण प्रकल्पात दुतर्फा वृक्षारोपण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची की राज्याची? यावरूनही यापूर्वी कोर्टात चर्चा झाल्या आहेत. आज या महामार्गावरून प्रवास करताना पूर्वीच्या अनेक पाऊलखुणा पुसल्या गेल्याच्या, असंख्य संजीवांची निवासस्थाने असलेले बडे वृक्ष जमीनदोस्त झाल्याच्या आठवणी मनाला छळतात, असंख्य वेदना देतात. २०१८साली कणकवली शहरातील प्रसिद्ध पुरातन वड जमीनदोस्त झाला त्या सायंकाळी आम्ही दुर्दैवाने तिथे मुक्कामी होतो. शहरातील बसस्थानक आणि हॉटेल सह्याद्रीसमोरील या वटवृक्षाने मागील किमान शंभर वर्षात असंख्य पक्षांना आधार दिला होता. प्रवाशांना सावली दिली होती. त्या सायंकाळी अचानक जगण्याचा आधार हरविलेला पाहून दिवसभर फिरून परतलेली थकली-भागलेली पाखरं जीवाच्या आकांताने आकाशात घिरट्या घालताना पाहिली आणि त्या रात्री आमची जेवणाची इच्छाच मेली इतकी अस्वस्थता आली होती. निसर्गाविषयी विलक्षण आत्मियता बाळगणारी माणसे आपल्याकडे खूप आहेत. त्याचवेळी आपल्याकडे शहरा-शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या आडवी आलेली, वीजेच्या तारांशी सलगी करू पाहाणारी, सर्वसामान्यांनी मायेनं वाढविलेली झाडी निर्दयतेने तोंडणारे स्थानिक प्रशासन आणि वीज कंपनीचे कर्मचारीही आहेत. आपल्याकडे असंख्य शहरातील भूजलपातळी दिवसेंदिवस कमालीची खालावते आहे. आपण शहरातून वास्तव्य करताना ‘वृक्षकर’ भरूनही वृक्षसंस्कृती संपवत चाललो आहोत. रखरखत्या उन्हात आता नागोठणे जवळच्या वाकण नाक्यावरील वटवृक्षाची आठवणही सतावते. चिपळूणनजीक सावर्डे गावीही असाच पुराणवृक्ष उद्धवस्थ झाला. पूर्वीच्या कोकण महामार्गावर याच झाडांनी प्रवासी निवारा शेडची भूमिका बजावली होती. आम्ही करंटयांनी ‘गरज सरो वैद्य मरो’ अशा पद्धतीने शतकांचे साक्षीदार असलेल्या असंख्य पुराणवृक्षांचा निर्दयतेने बळी घेतला. मुंबई-गोवा जागतिक ‘बॉटनिकल हायवे या निर्दयतेचे प्रायश्चित करण्याची संधी ठरू शकते. आम्ही सर्वानी ती स्वीकारण्याची गरज आहे. अन्यथा निसर्गशक्ती आपल्यावर सूड उगवल्याशिवाय राहाणार नाही.

 

मुंबई ते गोवा हा कोकण पर्यटन महामार्ग जागतिक दर्जाचा सर्वोत्कृष्ठ बोटॅनिकल कम जैवविविधता (Biodiversity) महामार्ग’ साकारणे शक्य असल्याची संकल्पना आम्हाला ज्यांनी सांगितली त्या, आपल्या सुमारे १७ एकरच्या जंगलात २५ वर्षांच्या अविश्रांत कष्टातून जगातील विविध वनस्पतींचं जातिनिहाय वैविध्य फुलविणाऱ्या, वनस्पतीशास्त्राचे कृतिशील तज्ज्ञ आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे डोळ्यांच्या हॉस्पिटलचे नेटवर्क उभारणाऱ्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई सरांना आम्ही याबाबतचे नियोजनही विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘मुंबई गोवा महामार्गाच्या ‘कशेडी ते खारेपाटण’ या रत्नागिरी जिल्हा हद्दीतील दोनशे किमी मार्गात वृक्ष लागवडीसाठी दुतर्फा चारशे किमी अंतर उपलब्ध आहे. साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर एक प्रजाती अशा पद्धतीने विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातील उपलब्ध चारशे किमी अंतरात आपल्याला विविध चारशे प्रजाती लावता येतील. इतक्या प्रजाती विचारपूर्वक जतन केलेला महामार्ग जगात कुठेही नाही आहे. प्रजातीची निवड करताना कोकणातील डोंगराळ, सपाटीचा, उताराचा प्रदेश याचा विचार करून प्रत्येक पंचवीस किलोमीटरच्या टप्प्यात एकाच झाडाच्या विविध प्रजातींची लागवड करणे आणि त्याच पंचवीस किमीच्या पट्ट्यात एका ठिकाणी विशिष्ठ वर्तुळ करून त्याच झाडाची सर्वोत्कृष्ठ प्रजातीची लागवड करण्यासारख्या संकल्पना अमलात आणता येतील. यातून कोकण हायवे हा ‘जगातील पहिला बोटॅनिकल हायवे’ तर होईलच पण तो उत्कृष्ठ जैवविविधता (Biodiversity) महामार्गही होईल. असे झाल्यास जगातील असंख्य अभ्यासक, संशोधक हा हायवे पाहायला येतील. वृक्ष लागवडीच्या एक किमीच्या मधल्या अंतरात आपल्याला काही ठिकाणी जाळयांचे कुंपण करून दुर्मिळ वेली, वनस्पती, फुलझाडे लावता येतील. अशा पद्धतीने आपण हजारभर प्रजातींचा हा महामार्ग उभा करू शकतो. काही ठिकाणी खाड्यांच्या परिसरात आपल्याला कांदळवनांच्या प्रजातींची लागवडही करता येईल. मात्र शासनाने काजूची झाडे कोकणातील मुंबई गोवा या पर्यटन महामार्गाच्या दर्शनी ठिकाणी अजिबात लावू नयेत. काजूच्या कलमांना १५-२० वर्षांहून अधिकचे आयुष्य नाही. ही झाडे दर्शनी खूप बोजड दिसतात. त्या झाडांचा कचरा खूप पडतो. त्याच्यावर रोगही लवकर येतो. या कारणांमुळे काजूची झाडे हायवेवर लावण्यातील शासकीय गुंतवणूक वाया जाण्याचा धोका आहे. त्यामुळे कोकण पर्यटन महामार्ग साकारताना आपल्याला ‘जगातील पहिला बोटॅनिकल कम उत्कृष्ठ जैवविविधता (Biodiversity) महामार्ग’ साकारण्याची, वृक्ष संवर्धनाची खूप मोठी संधी आहे. हा विचार करून सर्वांनी एकत्र येऊन महामार्गाच्या टप्प्यातील गावातील वृक्षरक्षकांचे गट करून, मार्गावरील शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना, ग्रामपंचायती आदींना अनुदान किंवा मानधनासह जबाबदारी दिल्यास शासनाच्या वृक्ष लागवडीच्या बजेटमध्ये जागतिक दर्जाचा सर्वोत्कृष्ठ बोटॅनिकल कम जैवविविधता (Biodiversity) महामार्ग’ साकारणे शक्य आहे.’

 

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, कोकणातील राजापूर तालुक्यातील तळवडे गावी संपन्न झालेल्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनावरून परतताना आठवणीने आम्ही विशेष आग्रहावरून आवर्जून, डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई सरांना त्यांच्या भांबेड गावी जाऊन भेटलो होतो. जागतिक दर्जाची वैशिष्ट्य सांभाळणारी त्यांची बाग फिरताना बोलण्याच्या ओघात सरांनी आमच्याजवळ मुंबई गोवा हायवे हा ‘जगातील पहिला बोटॅनिकल कम उत्कृष्ठ जैवविविधता (Biodiversity) महामार्ग’ होऊ शकतो ही भूमिका बोलून दाखविली होती. कोकणभूमीत हे होणे शक्य असल्याने हा जगातील असा पहिला हायवे ठरेल असेही त्यांनी सांगितले होते. याबाबत त्यांनी कोकणातील काही लोकप्रतिनिधींशी चर्चाही केली होती. जागतिक वनदिनाच्या पार्श्वभूमीवर, कोकणातील या महत्त्वाच्या हायवेच्या दुतर्फा ‘काजू फळपिक विकास योजना’ अंतर्गत काजू लागवड केली जाणार असल्याचे वृत्त वाचनात येताच आम्हाला हे सारे लिहावेसे वाटले. करमळसारखे (एलिफंट अँपल)अनेक देशी आणि कोकणच्या मातीशी नाते सांगणारे वृक्ष आज कोकणातून गायब झालेले आहेत. अशा साऱ्या दुर्मिळ वृक्षांची जाणीवपूर्वक जोपासना करण्याचे अभियान पुढील काळात कोकण महामार्गावर उभे राहिल्यास ‘जगातील पहिला बोटॅनिकल हायवे कम् जैवविविधता (Biodiversity) महामार्ग’ अशी एक वेगळी ओळख या कोकण पर्यटन महामार्गाला मिळवून देता येणे सहज शक्य आहे. यासाठी ‘एकच लक्ष्य दुतर्फा वृक्ष’ हा भविष्यातील मुंबई-गोवा महामार्गाचा वृक्षसंवर्धन मंत्र व्हायला हवा आहे.

 

धीरज वाटेकर, चिपळूण

मो. ९८६०३६०९४८

बुधवार, १ मार्च, २०२३

डोंगर-बागांचे ‘निसर्गसौंदर्य’ काळवंडतेय!

    याहीवर्षी स्वर्गसुंदर ‘कोकण’ काळवंडायला लागलंय. गेल्यावर्षी (२०२२) महाराष्ट्रात २४ हजार ५९२ ठिकाणी वणवे लागले होते. पायाभूत सुविधा, उद्योग, खाणी, सिंचन प्रकल्प यामुळे होणारी वृक्षतोड थांबायचे नाव घेत नाही. तर जंगलांना लागणाऱ्या वार्षिक आगींमुळे वनक्षेत्रही मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. अशा स्थितीत आपल्या सर्वांचा ‘गॉडफादर’ सह्याद्री आणि तिथली वनराई कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नसताना आपल्याला बरंच काही देते आहे. या वनराईला उन्हाळ्याच्या हंगामात काळवंडलेली पाहाणं दुर्दैवी असतं. आपल्याकडे देशभरातील जंगलांना लागणाऱ्या आगींवर नियंत्रण आणि उपाययोजना करण्यासाठी डेहरादूनहून नियंत्रित होणारे सॅटेलाईट तसेच फायर ब्लोअर आणि ड्रोनने पाण्याची फवारणी करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. तरीही राज्यात पावसाळा सुरु होईपर्यंत पदोपदी वणवे पेटत राहातात. अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे यंदा (२१ फेब्रुवारी) कोकणातील रत्नागिरी नजीकच्या हातखंबा तारवेवाडी भागातील काजूच्या बागेला लागलेला वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यालाच आगीत होरपळून आपला प्राण गमवावा लागले. स्वर्गीयसौंदर्य अनुभवणाऱ्या नजरांना काळवंडलेलं कोकणपाहाताना ‘ही मानवनिर्मित वणवा प्रवृत्ती जळणार तरी कधी?’ हा प्रश्न वर्षानुवर्षे छळतो आहे.

महाराष्ट्रातील जंगले ही कोरडी पानझडी जंगले (dry deciduous forests) आहेत. जानेवारीपासून आपल्याकडे पानगळतीला सुरवात होते. ही पानगळती आणि वाढलेले गवत वनवणव्यांना पोषक ठरते. वणव्यांचा कालावधी नोव्हेंबर ते मे असला तरी शिमग्यात हे प्रकार अधिक वाढतात. संस्कृती म्हणून शिमगोत्सव आम्हाला कितीही प्रिय असला तरी होळीसाठी झाडं तोडणं पटणारं नाही. आपण बदलत्या काळात प्रतिक म्हणूनही कचऱ्याची होळी करायला हवी. आपण आपल्या घराला, इमारतीला, कंपनीला आग लागली तर किंचाळतो, विव्हळतो, हतबल होतो. मग माळरानावर, डोंगरात वणवा पेटतो तेव्हा तिथल्या सजीवांनी कसा आक्रोश करायचा? त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत का पोहोचत नसावा? वणवा लावणारी प्रवृत्ती परदेशातून येत नाही. ती आपल्यातच आहे. जंगल माफियांसह गुरांसाठी अधिक चाऱ्याची उगवण व्हावी, काटेकुटे जळून जावेत, शेतीत राख येऊन उपन्नवाढ व्हावी, ससे पकडण्यासाठी, शिकारीस मदत, सागवान तस्करी, नाईट स्टे, जमीन जाळण्याची पद्धत, कोळसा बनवणाऱ्या टोळ्या, शेतातील कचरा आणि पालापाचोळा साफ व्हावा अशा एक ना अनेक गैरसमजूती या प्रवृतीमागे असाव्यात. यामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच पण कार्बन डायऑक्साईड वातावरणात वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढते आहे. सततच्या वणव्यांना कंटाळून शेतकऱ्यांनी जमिनी विकाव्यात, शेती-बागायती बंद करावी, तो देशोधडीला लागावा, त्याने पाळीव जनावरे विकावीत, जमिनी नापिक व्हाव्यात, जेणेकरून जमिनी कमी भावात बळकावता येतील असंही षड्यंत्र यामागे असू शकतं. आपल्या समाजसुधारणांच्या सर्वच क्षेत्रात अनास्था आहे असं म्हटलं जातं. ही अनास्था काही प्रमाणात असते काही प्रमाणात नसते. ही अनास्था कमी करण्यासाठी आपण सातत्याने लोकांसमोर विविधांगाने विषयाची मांडणी करत राहाण्याची आवश्यकता आहे. आजचा काळ हा प्रत्यक्ष बघण्याचा आणि अनुभवण्याचा असूनही वणव्यासारख्या प्रवृत्ती फोफावत आहेत. या बदललेल्या समाजजीवनाचा विचार करायला हवा आहे. आपल्या समाजातील ही वणवा प्रवृत्ती नष्ट व्हावी यासाठी सतत प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. चिपळूणला नुकताच ‘लोककला महोत्सव’ झाला. लोकांनी याला उदंड प्रतिसाद दिला. आपल्याच नाही तर देशभरातील संपूर्ण लोककला या शेतकरी जीवनाशी जोडलेल्या आहेत. त्या कमी झाल्या कारण शेती करणारी मंडळी आपल्याकडे कमी होत गेलीत. वणव्याचे चक्र असेच सुरु राहिले तर भविष्यात त्याचे असेही दुष्परिणाम आपल्या समाजाला भोगावे लागणार आहेत.

यंदाच्या मोसमात रायगडच्या उरण तालुक्यातील ऐतिहासिक द्रोणागिरी डोंगराला आठ दिवसात दोनदा आग लागली. या डोंगराच्या पायथ्याशी ओ.एन.जी.सी.चा देशातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे. १० जानेवारीला आंजर्ले परिसरात वणवा लागून ३० बागा खाक झाल्या. १७ जानेवारीला खेडच्या मोरवंडे-बोरज भागात वणवा लागला. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राजापूर तालुक्यातील सागवे-गोठीवरे परीसरात सकाळी लागलेल्या आणि ५ किमी पसरलेल्या वणव्यात जवळपास ३५ शेतकऱ्यांच्या बागा जळाल्या. २० फेब्रुवारीला अंबरनाथ, बदलापूर (टाहुली डोंगर) आणि वांगणी, पालघरच्या सापणे-वरले भागात वणवे पेटले. पोलादपूर जवळच्या चरई महादेवाच्या डोंगराला आग लागून मोठी हानी झाली. अलिबाग समुद्रकिनारी सुरूच्या बनाला, मंडणगड जवळच्या वेळास जंगलाला, माणगाव तालुक्यातील वडघर डोंगरावर आग लागून जंगल संपत्तीचं नुकसान झालं. यंदा सिंहगड, कात्रज भागात वणवा लागला. कोल्हापुरातील आजरा तालुक्यातील वनौषधी पार्क, कोरीवडे, पेरणोली, हरपवडे भागातील दोनशे एकर जंगलाला वणवा लागला होता. नाशिक जिल्ह्यातील मातोरी गावाच्या गायखोऱ्यात ९ फेब्रुवारीला दुपारी वणवा लागल्याने शेकडो एकर जंगलक्षेत्र जळून खाक झाले. हा वणवा गाव शिवाराकडून लागला होता. वृक्षवल्ली फाउंडेशन, वृक्षमित्र परिवार आदींनी चार तासांच्या अथक प्रयत्नांनी वणवा विझवला. त्यामुळे अधिकच्या वनक्षेत्रात वणवा पसरला नाही. अहमदनगरच्या चांदबीबी महाल येथे (१४ फेब्रुवारी) वणवा पेटलेला असताना तरुणांनी तो विझवला. म्हसवे (२३ फेब्रुवारी) गावपठारावरील जंगलात वणवा लागला होता. ही माहिती मिळताच वर्ल्ड फॉर नेचर आणि दुर्ग शिलेदारांनी घटनास्थळी पोहोचून तो आटोक्यात आणला.

यातले काही वणवे नैसर्गिक असतात. १९७१ पासून सातत्याने उष्ण लहरींचे प्रमाण वाढत असून शीत लहरींचे प्रमाण कमी होत आहे. निसर्गातील हा असमतोल जंगलातील अपवादात्मक नैसर्गिक वणव्यांना निमित्त ठरतो आहे. बाकी मानवनिर्मित वणवे विझवायचे सरकारी आणि स्वयंसेवी प्रयत्न सुरु असतात. मीडियात ते जागाही मिळवतात. पण वणवा हा विषय इतका मोठा आहे की अख्खं गाव जरी विझवायला गेलं वणवा विझत नाही. कोणा एकाच्या विकृत डोक्यातील ही आग क्षणभरात असंख्य वन्यजीवांना सैरावैरा धावायला भाग पाडते. अभ्यासकांच्या मते २००३ पासून आपल्या देशात जंगलातील वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. वणव्याच्या प्रकोपातून होणारी पक्षी, त्यांची घरटी, सरपटणारे प्राणी, जैवविविधता यांची जीवितहानी हा मोठा चिंतेचा विषय आहे. डोंगरात वाढलेल्या गवताला विशेष किंमत मिळत नसल्याने वणवा लागू नये म्हणूनची गवतकाढणी शेतकऱ्यांना परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे. तरीही डोंगराळ भागातील गवत काढणी आणि येणारा वाहतूक खर्च विचारात घेऊन या गवतापासून कागद, पुठ्ठा, प्लायवूड आदी बनवणे शक्य आहे का? यावर अधिकचे संशोधन व्हायला हवे आहे. गवताची अधिकाची उत्पादकता सिद्ध झाल्यास ‘वणवा’ प्रवृत्ती कमी होऊ शकेल. डोंगराला लागणारा वणवा आपले अमर्याद नुकसान करू नये म्हणून गवताचा पाच सहा फूट रुंदीचा पट्टा आपल्याच देखरेखीखाली जाळण्याची पद्धत आहे. कोवळ्या झाडांना झळ पोहोचू नये म्हणून पावसाळ्यानंतर वाढलेले रस्त्याकडले गवत आपल्याकडे काढले जात नाही. म्हणून किमान आपण आपल्या खाजगी बागांमध्ये वाढलेले गवत काढणे जरुरीचे आहे. जंगल भागात वन खात्याने गस्त वाढवण्याची आवश्यकता आहे. गस्ती दरम्यान विनाकारण जंगलात फिरणाऱ्या लोकांची झडती घ्यायला हवी आहे. जंगलात लाकूडफाटा आणण्यासाठी जाणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी आहे. जंगलातील अडचणीच्या जागा मोकळ्या करण्यासाठी वणवे लावले जातात. वणवे थांबवण्यासाठी जंगलात जाण्या-येण्याच्या मार्गांवर वाटेवर असलेल्या शेवटच्या घरात राहणाऱ्या गावकऱ्यांनी रखवालदार व्हावे लागेल. ग्रामपंचायती आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीने अशा मार्गांवर शेवटच्या घरात जंगलात जाताना आणि जंगलातून बाहेर येताना नोंद करण्यासाठी नोंदवही ठेवावी. वहीतून जंगलात दर दिवशी कोण जाते? वणवा लागलेल्या काळात जंगलातून कोण परतले? याचा अंदाज अशा प्रयत्नातून बांधता येईल.

जंगलांना निसर्गाने पुर्न:निर्माणाची क्षमता दिल्याने ऋतुचक्र बदलल्यावर पुन्हा नव्याने जैवविविधता निर्माण होत राहाते हे खरे असले तरी सततच्या वणव्यांचा जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होतो का? वणव्यानंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या जंगलांचं जीवन पूर्वीसारखं होतं का? हेही तपासण्याची आवश्यकता आहे. पर्यावरणीयदृष्ट्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल घडवून आपल्याला निसर्गासोबत चांगलं जगणं शिकावं लागेल. मध्यंतरी आम्ही चिपळूणकरांनी ‘एकच देऊ नारा संपवू वणवा सारा’ म्हणत अखंड कोकण वणवा मुक्त व्हावं म्हणून ‘वणवा मुक्त कोंकण’साठी प्रयत्न केले होते. आमच्या टीमला या काळात आलेले सर्वांगीण अनुभव वणवा लागणारच नाही यासाठी समाज म्हणून आपण सर्वांनी जागरूक राहाणे आवश्यक असेच होते. अर्थात वणवा लावणाऱ्या प्रवृत्तीला कायद्याद्वारे जबरी शिक्षा मिळाल्याच्या नोंदी समाजमनात कर्णोपकर्णी होईस्तोवर आणि तंत्रज्ञानाचा वापर करून यावर ठोस उपाययोजना सापडेपर्यंत किमान सह्याद्रीच्या कडेकपारीत, डोंगरातील चढ-उतारावरील वणवे बघत काळवंडलेलं कोकणअनुभवणे संवेदनशील मनांसाठी दुर्दैवी आहे.

 

-धीरज वाटेकर, चिपळूण

मो. ९८६०३६०९४८

(धीरज वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील पर्यटन-पर्यावरणविषयातील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व चरित्र लेखनया विषयावरील आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते गेली २५ वर्षे पत्रकारम्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात कार्यरत आहेत.)

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...