शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६

शतकपूर्व सुसंस्कृत कोकणचे वर्तमान आणि भविष्य


सातासमुद्रापार कोठेही न आढळणारी आपली संस्कृती, पारंपारिक वैशिष्ट्ये सांभाळणारे, मनुष्य जीवनाप्रती ओतप्रोत भरलेल्या कृतज्ञतेचे तत्त्वज्ञान जपणारे कोकण जसजसे जागतिक नकाशावर ‘अग्रेसर’ होऊ पाहते आहे तसतसे कोकणाकडे पाहाण्याचा अनेकांचा दृष्टीकोन बदलतो आहे. अगदी काल-परवापर्यंत कोकण सोडून पोटार्थ मुंबईसह जगभर गेलेल्या, कोकणाच्या नावाने नाके मुरडणाऱ्या तरुण मंडळींच्या मनातही आज जागतिक नकाशावर दिमाखात मिरवणारे कोकणघर करून बसू लागले आहे. कोकणी माणसे कोकणचा प्राधान्याने विचार करू लागली आहेत, त्यात तरुणांची संख्या उल्लेखनीयरित्या वाढते आहे. हजारो वर्षांची संस्कृती-परंपरा नांदलेल्या, आपल्या शतकपूर्व सुसंस्कृत कोकणचे वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल ठरणार असल्याची ही नांदी आहे.         

कोकण किनारपट्टीला पाच हजार वर्षापूर्वीपासूनचा इतिहास असल्याचे संदर्भ अनेक ठिकाणी आढळतात. प्राचीन ग्रंथामध्ये कुंकण, कुंकुण, कोनिय-कोई, तर काही ठिकणी केरळ, सौराष्ट्र, कोकण, करनाट, करनन, बर्बर असा सप्तकोकणचा उल्लेख आढळतो. रामायण, महाभारत आदी सुप्रसिद्ध ग्रंथामध्ये या प्रदेशाचा अपरान्त असा उल्लेख आढळतो. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात अपरान्ताचे वर्णन असून या प्रदेशात विपुल प्रमाणात पाऊस पडतो, असे म्हटले आहे. तापी, वैतरणेच्या सीमेपासून तर कधी भृगु-कच्छपासून कन्याकुमारीच्या टोकापर्यंत या प्राचीन अष्टागर भूमीची व्याप्ती आहे. बृहत्कथेत व कथा सरितत्सागरातील काही श्लोकांमध्ये कोकण, अपरान्त व चिंचणी (पालघर) बंदराचे उल्लेख आढळतात. सरित्सागरनुसार चिंचणी हे गाव उत्तरेतील पाटलीपुत्र हे राजधानीचे नगर वसण्यापूर्वीचे असले पाहिजे. म्हणजेच चिचणी बंदर हे पाच हजार वर्षापूर्वीपासूनच अस्तित्वात असले पाहिजे असे कोशकार डॉ. केतकर यांनी म्हटले आहे. कोकणातील बंदरांचा इतिहास अभ्यासल्यास मोर्य काळापासून ठळकपणे या परिसराचे उल्लेख लिखित स्वरूपात आढळतात. या बंदरांच्या सोबतच येथील बाजारपेठाही विकसित झाल्या, भरभराटीला आल्या. कोकणातील अनेक बंदरांचे व बाजारपेठांमधील वैभवाचे वर्णन त्या काळातील परकीय प्रवाशांच्या प्रवास वर्णनात विपुल आढळतात. बोरिवली येथील कान्हेरीच्या लेण्यामध्ये जलवाहतुकीची व नौकांची अनेक शिल्पे आढळतात. बोरिवलीच्या एक्सर गावातील विरंगळावर आरमारी जलयुद्धाची दृश्ये कोरलेली आहेत. काही प्राचीन नाण्यांवरही एक शिडाच्या, दोन शिडाच्या जहाजांच्या प्रतिमा आढळतात. आपल्या किनारपट्टीवर आढळणा-या प्राचीन बंदरांच्या परिसरातील बाजारपेठांमध्ये निरनिराळय़ा मालाची देवाणघेवाण करणारे व्यापारी कोकणातून अनेक मार्गानी घाट चढून देशावर जात असत व नाशिक, पैठण, कोल्हापूर यासारख्या ठिकठिकाणच्या प्रसिद्ध नगरातील बाजारपेठांमध्ये व्यापार करीत असत. कोकणात सातत्याने अनेक परकीय व्यापारी व भटक्या वाटसरूंनी भेटी दिल्या होत्या. त्यांनी या देशातील पर्यटनात आलेले अद्भुत वर्णन आपापल्या प्रवास वर्णनांमध्ये विपुल प्रमाणात केलेले आढळते. या परकीय प्रवाशांच्या वर्णनात कोकणातील अनेक बंदरांची माहिती आढळते. तोगरूम (देवगड), रेडी, वेंगुर्ले, मालवण, विजयदुर्ग, जयगड, चौल, दाभोळपासून चिंचणीपर्यंतच्या अनेक कोकणातील बंदरांचा उल्लेख या परकीय प्रवासवर्णनपर ग्रंथांमधून आढळतो. प्राचीन काळी वाहतुकीच्या साधनांमध्ये जलवाहतूक हीच सर्वात प्रभावी व जलद प्रवासाची सोय होती. शुर्पारक ऊर्फ सोपारा बंदराचा इ. स. पूर्व २५०० ते इ. स. पूर्व ५०० कालखंडात इजिप्त बाबिलोन देशांबरोबर व्यापारी संबंध होता.

कोकणी माणसाचा इतिहास आणि संस्कृती तपासण्यासाठी लोकसाहित्य, साहित्य, लोकगीते, लोककला हे सर्वात मोठे माध्यम आहे. ही अभिजात कलावंतांची रंगभूमी आहे. येथील माणसांनी दशावतार, भजन, संगीत, नाटय़, बाल्या डान्स, नमन, कलगीतुरा आदि अनेक लोककला-परंपरा पूर्वांपार जपल्या आहेत. सातासमुद्रापार पोहोचविल्या आहेत. आपल्याकडे दूरचित्रवाणी वरील मालिकांत जे तंत्रज्ञ (पडद्यामागचे कलाकार) आहेत, त्यातील बहुतांशी कोकणातील आहेत. मूळ कर्नाटकातला असलेला दशावतार हा नंतर कोकणात विस्तारला, त्याचा उदोउदो झाला. दशावतारला आजही चांगला दर्जा आहे. भजन संस्कृतीतही सिंगलबारी, डबलबारी ट्वेंटी-ट्वेंटी अशा अनेक प्रकारात भजने सादर होत आहेत. केवळ मनोरंजन म्हणून न पाहाता कलाक्षेत्राची आवड जोपासणारा तरुण वर्ग कोकणातला जास्त  आहे. सिंधुदुर्ग-पिंगुळीतील ‘ठाकर कला आंगण’ हे पर्यटक-प्रेक्षकांचे आवडते ठिकाण आहे. येथील कळसूत्री बाहुल्यांचे खेळ प्रसिद्ध आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शक्तिवाले, तुरेवाले, नमन, जाखडी नृत्य  ह्या कला मोठय़ा प्रमाणात आहेत. मुंबईसह बड्या शहरात यांचेही प्रयोग होतात. ह्या सर्व कला शतकानुशतके कोकणी माणसाने घराघरात जपल्या आहेत. मोबदल्याच्या विचार ना करता, कलेला दैवत मानणाऱ्या कोकणी माणसाने ह्या कला, हा वारसा जपलाय. कमी मानधनात काम करणारे कलावंत दुनियेत फक्त कोकणात सापडतात आणि संपूर्ण कोकण विकासाची ‘दिवास्वप्न’ दाखवणाऱ्या आमच्या लोकप्रतिनिधी-समाज प्रतिनिधींना मात्र यांचे दु:ख समजत नाही ही शोकांतिका आहे. साहित्याची जाण असलेली जागतिक कीर्तीची अनेक रत्ने याच कोकणाच्या मातीत जन्माला आली, त्यांनी जगाला आपल्या लेखनातून वैचारिक सकस खाद्य पुरविले. वि. स. खांडेकर, मंगेश पाडगावकर, विं. दा. करंदीकर, आरती प्रभू, कविवर्य वसंत सावंत यांसारख्या साहित्यिक मंडळींनी कोकणची शान वाढविली आहे.

कोकणातील माणसांची श्रद्धा डोळस आहे, तेवढीच जाज्ज्वल्यही आहे. या मातीतील ग्रामीण जीवनाचा गावपाडा हा आजही न्याय, नीती, धर्म अनुष्ठान लाभलेल्या गावह्राटीला अधीन राहून चालत आहे. गावह्राटीचे शतकपूर्व मूळ स्वरूप हे सात्त्विक व सोज्वळ होते. आज कालानुरूप यात बदल घडले आहेत, तरीही अनेक गावांनी आपली पारंपारिक वैशिष्ट्ये जपलीत. कोकण प्रांत मूळ द्रविड संस्कृतीचा प्रभाग असल्याने येथे विविध देवदेवता, पूजाविधी, प्रतिके यांचा प्रभाव दिसून येतो. विविध देवता, संप्रदाय, उपासना पद्धती, श्रद्धा यातून येथील सांस्कृतिक जीवनाची जडणघडण झालेली आहे. समाजातून संस्कृती आणि संस्कृतीतून परंपरेचा उगम होत असतो. या परंपरा आजही मनुष्य जीवनाला जगण्याचा भावनिक आधार प्राप्त करून देत आहेत. दैवी कुलाचार व कुलधर्म पाळण्यासोबत कोणत्याही कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी देवाचा कौल (गावपळण, यात्रोत्सव, देवतांचे उत्सव, गावाच्या चतु:सीमेतील विशेष कार्य) घेण्याच्या प्रथेतील ‘बारा-पाचाची देवस्की’ हे इथल्या गावह्राटीचे एक खास वैशिष्टय असून, कोणी काहीही म्हटले तरी ते आजही अनेक गावांनी सांभाळले आहे. बारा इंद्रिये व पाच पंचमहाभूते  म्हणजेच बारा-पाच अशी संज्ञा आहे. ‘कौलप्रसाद’ म्हणजे देवाचे न्यायालय होय. गावाच्या चतु:सीमेत राहणारे ग्रामस्थ, प्राणीमात्र, जीवजंतू यांचे परस्पर संबंधित व्यवहार-नाते सांगणारी ‘गावह्राटी’ अतिशय व्यापक, सर्वहितकर, विविध सूक्ष्मशक्तींना कार्यरत करणारी अतिशय  प्राचीन संकल्पना आहे. तळकोकणात हिचे आजही अभिमानास्पद प्राबल्य आहे. भौतिक सुखाची अति ओढ, संकुचित वृत्ती, वैयक्तिक लालसा, प्राचीन देवस्थानांची दुरवस्था, गावातील हेवेदावे, देवस्थान इनाम जमिनींचे न्यायालयीन प्रलंबित दावे आदी कारणांमुळे परंपरा अडचणीत आहेत, अशा काहीश्या सूर्यास्ती वातावरणात अनेक गावांत पणती प्रकाशते आहे, हे विशेष !   

जमीन-अंगण सारवणे आजच्या पिढीला कदाचित माहिती नसेल पण कोकणातील अनेक कृषी पर्यटन केंद्रात हे काम ‘उपक्रम’ म्हणून राबविले जाते. गायीच्या शेणाने केलेल्या सारवणाला पुराणात मोठे स्थान आहे. कणकवलीनजिक नागवे गावातील नागेश्वराच्या मंदिरात, नागरायासमोर दरवर्षी पौष महिन्यातील प्रत्येक सोमवारी माता-भगिनी जेव्हा पोहोचतात तेव्हा तेथे सारवण करण्याच्या वैविध्यपूर्ण परंपरा पाहता येतात. येथील मंदिरात नागेश्वरासमोर सारवण करून नवस फेडण्याची परंपरा केव्हापासून सुरू झाली असावी, याची मात्र निश्चित माहिती उपलब्ध नाही. शिमगा कोकणी माणसांना अधिक जवळचा सण ! शिमग्यात गावागावात सकाळी दारात सारवण पडले, सनई, पेपेटी, बासरीचा गजर झाला की दिवसभर खेळे, सोंग, निशाणं, पालखी,  संकासुर, गोमू, नमन, राधा यांचे आगमनाची सुरु ! रांगडा कोकणी माणूस शिमग्यात निशाण घेत पालखीचा भोई झाला की, अनवाणी, शाकाहारी, निर्व्यसनी राहत भक्तिपरंपरेचा पाईक बनतो. आमच्या दारात  निशाण किंवा पालखी आली की आमचं घरदार भाविकतेने तल्लीन होऊन जातं. निसर्गाची मुक्तहस्त उधळण, सागरकिनारे, बंदरे, किल्ले, लेणी, ऐतिहासिक ठिकाणे, गरम पाण्याची कुंडे, धबधबे, मंदिरे, जत्रा, देवतांचे उत्सव, विविध जाती-प्रजातींचे पशु-पक्षी, वैविध्यतेने नटलेला हिरवागार निसर्ग असूनही  येथील लोकांची कस्तुरीमृगासारखी झालेली अवस्था आता थोडी बदलते आहे. शहरी बकालपणाला कंटाळलेला, घडयाळयाच्या काटयावर धावून दमलेला-थकलेला, शरीरावरचा, मनावरचा ताण हलका करण्यासाठी आलेल्या प्रत्येक पर्यटकाला आज कोकणातील वेगळेपणा भावतो आहे. कोकणचा कोकणीपणा, इथली संस्कृती ही कोकणची खरी पर्यटन श्रीमंती आहे. मूळपणाला धक्का न लावता ती पर्यटकांसमोर आणणे गरजेचे आहे.

चैत्राची पालवी आणि वसंत ऋतूचे आगमन सुरु होताच निसर्ग रंगपंचमी खेळायला सुरुवात करतो. गावोगावी जत्रा-उत्सव सुरु होतात. कोकणात या जत्रा आणि त्यातील प्रथा खूप प्रसिद्ध आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील सुप्रसिद्ध म्हसाची जत्रा शाकंभरी पौर्णिमेपासून पुढे सात दिवस चालते. ऐतिहासिक काळात खुष्कीच्या मार्गाने अपरांत (कोकणप्रांत) ते घाटवाटेने देशावर जाण्यासाठी जे मार्ग होते, त्यापैकी सातवाहन काळातील एक प्रमुख राजमार्ग नाणेघाट हा येथून जवळ आहे. त्या काळी दळणवळणाच्या साधनात बैलांचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असे. त्यामुळे म्हसा गाव जत्रेत बैल खरेदी-विक्रीचे अथवा घाट चढून जाणाऱ्या नव्या दमाच्या बैलांच्या अदलाबदलीचे व्यवहार होत, आजही यात्रेनिमित्त जुन्नरपासून ते मुरबाडच्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी हे जपले आहे. शाकंभरी पौर्णिमेच्या चांद्रप्रकाशात अन्न शिजवले की त्यात औषधी गुण उतरतात, असे येथे म्हटले जाते. ठाणे हा आदिवासी जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. महानगरपालिकेत समावेश झालेल्या अनेक गावपाडय़ांतून बहुसंख्य आदिवासी राहतात. आदिवासी संस्कृतीत माता किंवा शक्तीची पूजा अतिशय महत्त्वाची आहे. वणीची सप्तशृंगी’, डहाणूची महालक्ष्मी’, माहुरची रेणुका’, यवतमाळची अंबा’, चंद्रपूरची भवानी’, भिल्लांची महाभोगीकिंवा मोगरादेवी’, महादेव कोळ्यांची वरसूबाई’, इत्यादी आदिमायेची स्थाने आदिवासी भागातच असून, आदिवासी जमातीची ती आराध्यदैवते आहेत. ठाण्यातील ओवळा गावात येऊरच्या डोंगरालगत असलेल्या आदिवासी पाडय़ातील चांमुडादेवीला शक्तिदेवता महाकाली किंवा पार्वतीचे रूप मानतात. वैशाखात तिची यात्रा भरते. आदिवासी आपले घर-अंगण सारवून त्रिकोण, चौकोन, वर्तुळातील उभ्या-आडव्या रेषा काढून स्त्री-पुरुष, पशु-पक्षी, डोंगर, नदी, झाडे, पाने, फुले, चंद्र-सूर्य यातून सृष्टीदेवतेचे चित्र रेखाटतात. या चित्रातून आदिशक्ती चामुंडादेवी प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते, ही कला पाहावी अशी आहे. कोदवली-राजापूरचे ग्रामदैवत श्रीदेव शंकरेश्वरचा कावडखेळ वैशिष्टयपूर्ण परंपरा आहे. हा खेळ अवघ्या महाराष्ट्रात दुसरीकडे पहाण्यास मिळत नाही. पुराणातील श्रावणबाळाच्या कावडीचा आणि या परंपरेचा संबंध नाही. पूर्वी कावडीचा उपयोग पाणी भरण्याचं साधन म्हणून केला जात असे. सुमारे पाचशे वर्षापूर्वी सिध्देश्वर बाबा गोसावी नामक सिध्दपुरूष या कावडीचा उपयोग श्रीदेव शंकरेश्वराच्या अभिषेकाला पाणी आणण्यासाठी करत असत. पुढे ही परंपरा ग्रामस्थांच्या श्रध्देचा आणि परंपरेचा भाग बनली. शिमगोत्सवात सजवलेली कावड आणि ढोलताशाच्या तालावर नाचवत सादर केले जाणारे नृत्य विशेष असते. मातृत्वाने भारलेल्या आपल्या संस्कृतीत काही गावात आजही संक्रांतीला, कुंभार बांधवांनी बनविलेल्या सुगडाची पूजा होते. सुगड म्हणजे सुद्धा छोटा घट. सूर्य एका राशीतून दुसऱ्या  राशीत जाणे म्हणजे संक्रमण, आणि सूर्य मकर राशीमध्ये जाणे म्हणजे मकर संक्रमण ! या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत महिला वर्ग एकमेकिंन सौभाग्याचे हळदीकुंकू लावून भेटवस्तू देण्याची परंपरा सांभाळून आहेत. ही परंपरा कोकणात शाळां-शाळांमध्येही मोठय़ा उत्साहात जपली जाते आहे.


कोकणावर इसवीसनपूर्व नंदघराणे, मौर्य, कलचुरी, आंध्रभृत्य, सातवाहन, त्रकुटक, वाकाटक, चालुक्य, कदंब, शिलाहार, यादव, सावंत-भोसले, छत्रपती श्रीशिवाजी महाराज, पोर्तुगीज, डच, पेशवे, इंग्रज यांनी राज्य केले आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि भटकळ ते भडोचपर्यंत प्रचंड उलाढालीच्या बंदरातून चालणारा व्यापार, परकीयांचा राबता या सर्वामुळ कोकणला प्राचीन इतिहास आहे. कोकणच्या संस्कृतीने निसर्ग व मानव यांचे नाते जपले आहे. निसर्गाशी असलेले नाते वृक्षदेवता, जलदेवता, वरुणदेवता, नागदेवता यांच्या रूपात पूजिले आहे. यक्ष आणि नाग या आपल्या पुरातन संस्कृती व मूर्तिकलेच्या विश्वात आजही महत्त्वाचे स्थान मिळवून आहेत. कोकण संस्कृतीच्या अभ्यासार्थ अनेक नामवंत इतिहास तज्ज्ञांनी संशोधन व भटकंती करूनही या संस्कृतीचे संपूर्ण गूढ आजही उलगडलेले नाही. कोकणात दगडी बांधकामे, शिखराची मंदिरे जवळपास नाहीत. तर मग श्रीक्षेत्र कुणकेश्वर, अंबरनाथचे शिवमंदिर, कसबा-संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिर ही अतिशय देखणी कोरीव, उंच शिखरे असलेली मंदिरे कशी आली ? अर्थात याची उत्तरेही त्या-त्या राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीत मिळतात. काळाच्या ओघात नष्ट होत गेलेले लिखित वाङ्मय, कागद, काष्ठ, मृदा माध्यम, पाषाण शिल्पे, शीलालेख, वीरगळ, ताम्रपट यातून संशोधक-अभ्यासकांचे श्रम काही प्रमाणात सार्थकी लागले आहेत. पण एकूणच हा सारा विषय आजही अभ्यासाचा आहे. भूतज्ज्ञांच्या मते, पृथ्वीच्या हजारो वर्षापूर्वीच्या ज्वालामुखीतून झालेला सह्याद्री आणि त्याच्या पठारावर ऐसपैस जांभा दगड पसरलेला आहे. कोकणच्या आजच्या वास्तू संस्कृतीत जांभ्या दगडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चि-याच्या भिंती म्हणजे कोकण, अशी ओळखच आज  बनली आहे. कोकणात पूर्वी दिसणारी नळ्याची कौले युक्त घरे गायब झाली, कौलारू घरे आली. मातीच्या भिंती इतिहास जमा झाल्या, आजतर कौलारू घरे दुर्मीळ होऊ लागलीत. ८०० वर्षापूर्वीची बांधकामे असोत किंवा अलीकडच्या वास्तूत चि-याच्या पाऊलखुणा मिळतात. विजयदुर्ग किल्ला याच दगडातून साकारला गेला आहे. कोकणातल्या अनेक ऐतिहासिक वास्तू आणि मंदिराना चि-यानेच आधार दिला आहे. आजच्या काँकीटच्या जंगलातही चि-यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोकणातल्या लालमातीतील अंगण जपणा-या वास्तुसंस्कृतीत आदरातिथ्यासाठी म्हणून विशेष जागा ‘परसदार’ पहावयास मिळते. या परसदाराच्या भिंतींना पूर्वी अडुळसा, करवंद, एरंड आदि वनौषधी लगडलेल्या असायच्या. हिरवळीची भिंत आणि वनौषधीची खाण असा तो साज असायचा.

कोकणातील पूर्वीच्या ‘ठाणेजिल्ह्याचे ठाणे आणि पालघर असे ऑगस्ट २०१४ साली विभाजन झाले. मुंबईला लागून असल्यामुळे आज या भागात प्रचंड आर्थिक विषमता आहे. संपूर्ण भागालाही स्वतःचा इतिहास आणि संस्कृती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जव्हार तालुक्यात मुकणे संस्थानाने विकास घडविला. वास्तविक पालघर पेक्षा जव्हार जिल्हा करणे अधिक सयुंक्तिक झाले असते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, रामभाऊ म्हाळगी, राम नाईक यांचीही तशीच भूमिका होती. पण राजकारण केवळ बुद्धिमत्तेवर चालत नाही, कालाय तस्मै नम:! श्रीमंत युवराज गणपतराव मल्हारराव मुकणे यांनी २७ जानेवारी १९०५ पासून जव्हारचा राज्यकारभार पहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात या परिसरात आदिवासी विकास, रस्त्यावरील धूळ घालवून पक्के रस्ते, विजेची समस्या, पाण्याची तहान भागवण्यासाठी बंधारे आदि विकास कामे मार्गी लावली गेली होती. जनताभिमुख सेवेसाठी इंग्रज सरकारने त्यांना किरोनेशन मेडलदेऊन गौरविले होते. 632 वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जव्हार मधील जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीच्या आठवणी जागविणारे शिरपामाळसनसेट पॉईंट, येथील आदिवासींची संस्कृती पाहाण्यासारखे आहे. इतिहासाचे साक्षीदार असलेले अनेक प्राचीन वाडे कोकणात आहेत, हे वाडे आजच्या पिढीला प्रेरणा देत असतात. ४०० वर्षापूर्वीचा २५०० चौ. फुटांवर उभा असलेला तीन मजली २७ खोल्यांचा रहस्यमय मांडणीचा प्रशस्त, प्रसन्नता, व शीतलता देणारा सिंधुदुर्ग किल्ल्यासारखा मालवणातील  भक्कम कुशेवाडा, मालदोलीतील मराठे यांचे वास्तुवैभव, ‘रात्रीस खेळ चाले’मधील वास्तू, नेरुरच्या चौपाटीवरचा वाडा अशा अनेक वास्तू सांगता येतील. या वास्तूंचा अभ्यास आपल्याला संस्क्रृती आणि परंपरा उलगडवून सांगतो.

कोकण गूढरम्य गोष्टींचे भांडार असून हा प्रदेश भुताखेतांचा म्हणूनही विशेष प्रसिद्ध आहे. भूतही संकल्पना खरी की खोटी ? हा वेगळा विषय आहे. अनेक वैज्ञानिकांनी या प्रकारांची मानसशास्त्रीय चिकित्सा केली आहे. धर्मकल्पनेच्या उदयाबरोबर या कल्पनेचा उदय झाला असावा, असे एक मत आहे. पण तरीही त्यातील रंजकतेचा कोकणातील लोकजीवनावर पगडा आहे, हे नक्की ! हजारो वर्षापासून भुतांच्या अस्तित्वासंबंधी खात्रीची भावना पिढय़ान्-पिढय़ा येथील समुदायाने बाळगली आहे. त्यांचा उद्भव, स्वभाव, संचार, इच्छेनुरूप विविध रूपे धारण करण्याची शक्ती, पीडा देण्याचे किंवा भले करण्याचे सामर्थ्य, निवासस्थाने, शक्ती मर्यादा, प्रसन्न करून घेण्याचे; हुकमतीत ठेवण्याचे उपाय, प्रतिबंध करण्याचे उपाय, त्यांच्यावरील नियंत्रण शक्ती या साऱ्याबाबतचे समज, रूढी व परंपरा यांचे फार मोठे विश्व आजही कोकणात आहे. असे विश्व जगातील अनेक पुढारलेल्या देशात आहे, तेथील प्राचीन दन्तकथात डोकावल्यावर आपल्याला हे सहज जाणवते. बुद्धिवंतांच्या मते,  कोकणातील भूतपिशाच्च एक ऐतिहासिक वास्तव आहे. याचे संशोधन व्हायला पाहिजे, ज्यातून अंधश्रद्धेस आळा बसून मोठय़ा सामाजिक समस्येवर उपाय देता येईल.

कोकणाने अनेक राजवटी पहिल्या. तरीही येथील स्थानिक जनजीवन गावह्राटीशी सुसंगत राहिले आहे. काळाच्या आक्रमणानंतरही अखंड टिकणारी संस्कृती-परंपरा ही त्या भूमीची गरज असते. तळकोकणात एक असे गाव नाही ज्या गावात शिवभक्त नाही, शिवलिंगाचे मंदिर नाही. पूजा-अर्चा करण्याच्या परंपरा वेगळय़ा आहेत. परंतु या मुलुखाने सर्वच देवस्थानांमध्ये आजही कडवे पावित्र्य जपले आहे. आपल्या कोकणी संस्कृतीच्या प्राचीन पाऊलखुणा अवतीभवती नांदत आहेत. त्या शोधून अभ्यासायला हव्यात, जुने संदर्भ नव्याने तपासायला हवेत. त्यातून अजून बराच प्राचीन वारसा पुढे येईल, आपल्या मातीचा आपल्याला वाटणारा हेवा अधिक सुगंध पसरवेल, कोकणी मनांना प्रसन्न बनवेल, जगण्याचे नवे तत्वज्ञान सांगेल.

धीरज वाटेकर (पर्यटन अभ्यासक)

dheerajwatekar.blogspot..com

पूर्वप्रसिद्धी  :  "कोकण मिडिया"  दिवाळी  अंक   २०१६   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...