प्रेम ही
खरं तर दोन सजीवांमधील ‘अव्यक्त’ भावना आहे, ती तिसऱ्याजवळ व्यक्त झाली की
बिनसायला सुरुवात होते, असं आमचं ठाम मत आहे. ‘प्रेमाची व्याख्या, ते कसं होतं ?’
या प्रश्नाचे उत्तर कोणाजवळही नसावे, कारण ते काही पायथागोरसचा सिद्धांत किंवा न्यूटनचा
नियम नव्हे ! परंतु
'प्रेम' ही या पृथ्वीवरील सर्वात सुंदर अनुभूती आहे, हे मात्र नक्की !
अभ्यासकांच्या दृष्टीकोनातून त्याच्या विविध संकल्पना आहेत. 'प्रेमाची सायकॉलॉजी' हा तर स्वतंत्र अभ्यासाचाच विषय
आहे. आमच्या लग्नापूर्वी आमचे
अनेक मित्र-मैत्रिणी धडाधड प्रेमात पडलेले आम्ही उघड्या डोळ्यांनी
पाहिलेत, पुढे त्यांची
लग्नेही झाली, कालांतराने आम्हीही विवाहबद्ध झालो. कमी-अधिक सुखात सर्वच जण
संसारही करताहेत ! पण
तरीही नंतर जीवनात अचानक कधी कधी एकदम चमकल्यासारखं व्हायचं, जुन्या मित्रांना भेटताना, संवाद साधताना, त्यांना
समजून घेताना आणि हे सारं आपल्याशी ताडून पाहाताना 'कुठे तरी
काही तरी चुकतंय?’ असं जाणवायचं ! यातूनच पुढे एकाच वेळी
अनेक हृदयात ‘प्रेमज्योत’ जागविण्याचा विचार मनात आला जो आमच्या वर्तमान
जीवनपद्धतीचा मूलाधार बनून राहिला आहे.
तेव्हापासून एकाच वेळी जीवनातील सजीव-निर्जीव
अशा अनेकांवर मनस्वी प्रेम करण्याची आमची सवय अधिक सक्रीय झाली. कोणतीही गोष्ट एकदा मुरली की ती अधिकाधिक गोड होत जाते, ‘प्रेम’ ही यापैकीच
एक परंतु सर्वांत उच्च ! विश्वास, जिव्हाळा आणि प्रामाणिकपणावर प्रेमाचा डोलारा उभा असतो. एंडॉर्फिन नावाचे शरीरातील संप्रेरक प्रेम भावनेची जाणीव करून
देते. अशा व्यक्तीला सारंच जग छान वाटू लागतं. कसलाही राग येत नाही, पूर्वीच्या न आवडणाऱ्या गोष्टी अचानक आवडू
लागतात. स्वप्न पडायला लागतात. अशक्य गोष्टी शक्य वाटू लागतात, त्यामुळे प्रेमात
पडलेली व्यक्ती चारचौघात सहज ओळखता येते. प्रेमाला स्वतःची परिभाषा नसली तरी
त्याच्या नशेमुळे अख्खे जगचं कधी गुलाबी, कधी मोरपंखी दिसतं. या पार्श्वभूमीवर
विचार करता, आम्हीही कॉलेजयीन जीवनातील काही वर्षे घराबाहेर काढल्याने
मुला-मुलींचा एकत्र ग्रुप बनणे स्वाभाविकच होते. अनेकदा एकत्र वावरल्याने
एकमेकांचे स्वभावही कळत गेले, पण वावगं काहीही घडलं नाही. उलट पुढील जीवनात
कार्यरत होताना, कुठेही, केव्हाही, कोणीही आपल्यासोबत असताना सतत आनंदाचे वाटप करीत
जगण्याचे व्रत अंगीकारण्याचीच उर्जा या दरम्यान मिळाली.
शालेय पातळीवर निरीक्षण करताना किशोरवयीन
मुला-मुलींमध्ये प्रेम व आकर्षणाची समस्या जाणवते. इंटरनेट युगामुळे चौथी-पाचवीतील
मुले प्रेमाला खूप महत्त्व देताना दिसतात, व्हॅलेंटाईन डे दिवशी एकमेकांना विश
करतात, कारण त्यांना हेच खरं प्रेम आहे असं वाटत राहत. यातून कधी-कधी वर्तनाच्या समस्या निर्माण
होतात, या समस्या कौटुंबिक स्तरावर सोडवल्या जायला हव्यात. आजकालच्या तारुण्याच्या
प्रेम समस्या तर भयानकच आहेत. एखाद्या व्यक्तीबरोबर, एकमेकांनी लग्नापूर्वीच सगळं
शेअर केलेलं असतं. आणि हे सगळं म्हणजे अगदी सग्गळं असतं ! आपले विचार, मतं, भावना,
आवडीनिवडी, शरीर, बेड, चित्रविचित्र फँटसीज् इत्यादी इत्यादी ! एके दिवशी, विदेशी
स्टाईल 'आय नीड ब्रेक' म्हणत या साऱ्यापासून अचानक दूर जायची दुर्दैवी वेळ आली की
काही कळेनासंच होत. मुठीत घट्ट पकडून ठेवलेली एखादी गोष्ट केवळ गुदगुल्या केल्याने
हातातून झटकन सुटून जावी तसं घडतं. असल्या या तरुणाईला, एकमेकांत अगदी रुतून
बसलेल्या 'त्या' दोघांची विमानतळावरील ताटातूट पाहताना, तिसऱ्याला जाणवणाऱ्या त्यांच्या
प्रेमाविषयी काय सांगणार ?
आमचं प्रारंभीच्या जगण्याच सारं वय खऱ्या अर्थाने
चाळटाईप कॉलनीत गेलं. महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरलेल्या कोयना जलविद्युत
प्रकल्पाच्या उभारणी निमित्ताने निर्माण झालेल्या शाळेत, वडिलांना नोकरी मिळाली
आणि सहा महिने वयाच्या आमचा प्रवास मूळ गाव केळशी (ता. दापोली) तून चिपळूण
तालुक्यातील अलोरेत झाला, ही दोन्ही गावे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यायाने कोकणात
आहेत. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चाळटाईप कॉलनीत आम्ही वयाची चौवीस वर्षे
काढली, वडील निवृत्त झाले म्हणून ठीक ! नाहीतर अजून काही वर्षे हा मुक्काम नक्कीच
वाढला असता. सांगायचा मुद्दा असा, तेथील भाड्याचे चाळीतील ते घर सोडायच्या आदल्या
दिवशी रात्री, भिंतीला चिकटून झोपलेले आम्ही अंगावर पांघरून घेवून खूप रडलो होतो, त्या
छोट्याश्या ५०० चौ. फूट घरात आमचं अख्ख बालपण सरल होत. आज तो आनंद आम्ही स्वत:
विकत घेतलेल्या शहरातील १५०० चौ. फूट घरात आम्ही शोधत राहातो, पण तो सापडत नाही.
ते दिवसच वेगेळे होते, असं कायम वाटत. त्या वास्तूवर, भिंतींवर, दरवाजा,
खिडक्यांवर, इतकच काय तर जमिनीवरच्या लाद्यांवरही आमचं प्रेम राहिलं, कोणी कोणत्या
लादीवर जेवायला बसायचं हेही ठरलेलं असायचं. आज वाटत आम्ही तेव्हा जीवन जगत होतो,
आज नुसतेच धावतोय ! कदाचित आमच्या सध्याच्या चिपळूण शहरातील घराबाबत आणि
वातावरणाबाबत, चिरंजीवाच्या भावना अशाच असू शकतील, कारण तो त्याचं बालपण इथे जगतोय.
कदाचित आणखी काही वर्षांनंतर आम्हीही आमच्या वर्तमान वातावरणाच्या प्रेमात पडू ! प्रेम
ही भावनाच अशा प्रकारची आहे. आपण जितकं देतो त्याच्या तितक्या पटीत आपल्याला कायम मिळतच
राहाते, मग ती व्यक्ती असो वा वस्तू, सजीव असो वा निर्जीव, आपण जीव लावला की बस्स,
झालं !
प्रेमात चांदण्यांचा पाऊसही पडतो, जो मानवी
आयुष्यावर प्रेम करतो त्याला कायम प्रेम करणारी माणसंच भेटतात. आपल्या भावनांना समजून घेणाऱ्या व्यक्तीवर
आपण प्रेम करतो, आणि हे अगदी बरोबर आहे. मनातील भावना आपल्या माणसांना सांगायच्या
नाहीत तर सांगायच्या कुणाला ? यातून काहीही मिळत नाही, मिळते ते फक्त समाधान !
प्रेम इथे जन्मते, ती दैवी देणगी आहे. ही भावना अमूर्त असते, आपण त्याला दृश्य स्वरूप
देण्याची घाई केली की मग गडबड होण्याचा धोका संभवतो. प्रेम ही एक
प्रत्येकाची वैयक्तिक भावना आहे. ते दोघा मनांनी एकमेकांशी केलेले अव्यक्त चिंतन
आहे. प्रणयाने ओथंबलेला एखादा नयन कटाक्ष अनेक शब्दात पकडता न येणारे भाव व्यक्त
करतो. सौंदर्यापेक्षा सुंदर, स्वप्नाहुनी रम्य, फुलाहुनी कोमल या शब्दांचा अर्थ समजण्यासाठी
प्रेमातील 'उत्कटता' समजायला हवी. प्रेम हे नित्य नवे, ताजे आणि जीवंत असते, त्याला
भूतकाळ आणि भविष्यकाळ नसतो.
‘प्राण जाय पर वचन न जाय’ हे मानसिक एकरूपता दर्शविणारे ‘वचनप्रेम’ आम्हाला
सर्वाधिक आवडणारे सर्वात उत्कट प्रेम आहे. प्रभू श्रीराम, दानशूर कर्ण, महापिता
भीष्म आदि
अनेक उदाहरणे आहेत. प्रेम ही एक दिव्य शक्ती आहे. परंतु भौतिक प्रेम दिव्य असूच
शकत नाही, ते पुष्कळदा आंधळे असते, मोहापोटी निर्माण होऊन सारासार विचारशक्ती लोप पावून ते केलेले असते. मनुष्य
जन्मापासून मृत्युपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बालपण, तारुण्य, वृध्दत्व या
जीवनाच्या तीनही अनिवार्य अवस्था जगताना ‘प्रेम’ या भावनेला
खूपच खास आणि मोलाचं स्थान आहे. महान तपस्व्यांनाही हा मनोजय साधता येत नाही तेथे सामान्यांची काय
कथा ! वरवर पाहाता, अनेक माणसं नैतिकतेचा बुरखा पांघरून ‘प्रेम-बिम झूठ असतं’ असं काहीतरी
म्हणत असतीलही ! पण एकतर्फी का असेना, हे गुलाबी वादळ प्रत्येकाच्या जीवनात
घोंगावतचं ! फरक एवढाच की प्रत्येकाच्या जीवनातील त्याचा वेग, संख्या, फलनिष्पत्ती
वेगवेगळी असते. प्रेमाच्या प्रवासात कोणत्याही कारणाने सफल न होऊ शकलेल्या हृदयांचा,
आयुष्य संपवून घेण्याचा ‘रोमिओ-ज्यूलिएट’ प्रकार मात्र, ‘अरेरे ! यांना प्रेमाचा
खरा अर्थ कळलाच नाही !’ असं ओरडून सांगत राहतो.
आमच्या कोकणचे गणेशोत्सवावर भलतंच प्रेम !
सर्वत्र सार्वजनिक आणि घरपट स्वरूप येण्यापूर्वीपासून कोकणी माणसाच्या घरात
‘गणपती’ येतो आहे. ‘बाप्पा’ घरी येऊन गेला की पुन्हा नव्या दमाने आम्ही आमचं
प्रापंचिक रहाटगाडग हाकायला मोकळे होतो. त्याकरिता लागणारी आवश्यक ऊर्जा या
उत्सवातून मिळते, अशी पारंपारिक धारणा, आम्हाला पटते. संवेदनशील, भावनिक मानवी
मनाला जगण्यासाठी असं काहीतरी लागतंच ! आम्हा कोकणवासियांना ते बाप्पात मिळत.
म्हणूनच की काय आमच्या अनेक संकल्पनात ‘बाप्पा’ असतोच ! सन २००९ साली स्वतःच घर
आणि लग्न या दोन जीवनातील महत्वाच्या गोष्टी एका दमात पूर्ण केल्यानंतर आम्हाला
चारचाकी गाडी खुणावत होती. इतक्या लगेच शक्यही नाही, पण हवीही आहे, म्हणून आम्ही
मध्यम मार्ग स्वीकारत सन २०११ साली, बाप्पाच्या आगमनाच्या प्रारंभी आम्ही एक जुनी
टाटा इंडिका कार विकत घेतली. तेव्हा आमचा चिरंजीव एक वर्षांचा होता, गावातील दीड
दिवसाच्या गणपतीचे विसर्जन आटोपून आम्ही आमच्या सासरी, सपत्नीक पाच दिवसांच्या
गणपतीच्या दर्शनाला, केळशी ते पोलादपूर (जि. रायगड) प्रवास करीत होतो. गाडी जुनी
असली तरी आमच्यासाठी ‘सारच नवीन’ होत. नेमकं याचवेळी नियती तिकडे आम्हाला एक नवा
जीवनानुभव देण्याची तयारी करत होती. सप्टेंबरचा महिना होता, पाऊस मुसळधार कोसळत
होता. कोकणातल्या माणसाला पाऊसाची काय चिंता ! ‘तो नियमाने येतो आपले काम करतो,
आपण आपले काम करीत रहावे’ अशी आमची धारणा असल्याने आम्ही बिनधास्त होतो, त्यात
पाऊस आमचा लाडका, पाऊस म्हणूनही आणि ऋतू म्हणूनही ! नव्या जोशात वेगाने गाडी
मार्गक्रमण करीत होती. लाडक्या लेकाला सौ.ने कुशीत घेतले होते. काहीच न कळणाऱ्या
त्या जीवाला ती खिडकीतून मामाच्या गावाचा रस्ता दाखवीत होती. त्या लहानश्या
जीवाकडून तिला प्रतिसाद मिळाला की आम्हालाच काय पण त्या गाडीलाही आनंद होत असावा.
पाऊसाने जसा आपला वेग वाढविला तसा आमचा गाडीचा वेग मंदावला. रस्त्यात कशेडीच्या
घाटात दरड कोसळल्याने सारी वाहने तुळशी-विन्हेरे मार्गे वळविण्यात आल्याचे कळले,
आणि काळजाचा ठोकाच चुकला. हा रस्ता आम्हाला ड्रायव्हिंगसाठी नवीन होता, त्यात या
मुसळधार पाऊसामुळे तोही खचलेला, खड्डे पडलेलाच असणार होता. अशातून एका वर्षाच्या
लेकराला घेऊन सासरी पोहोचण्याचे दिव्य नियतीने आमच्या समोर आणून ठेवले होते. काही
वेळातच, सौ.ने आमची अवस्था ओळखली. तिने सहज मोकळे सोडलेल्या चिरंजीवाला आता आपल्या
कुशीत घट्ट पकडून धरले, तिची ती स्थिती पाहून आमची अवस्था आणखीनच बिकट बनली.
नव्याने गाडी शिकलेल्या आमची आज एका अवघड वळणावर, नियती परीक्षा घेत होती.
रस्त्यात काळजाचा ठोका चुकविणारे प्रसंग दोन-तीनदा आले, पण सुदैवाने निभावले.
आम्हा उभयतांचीच काय, त्या बारक्या जीवासोबतचीही मैत्री गाडीने निभावली होती,
आम्ही सुखरूप सासरी पोहोचलो. पुढे या जुन्या गाडीवर आमचे सर्वांचेच खूप प्रेम
जडले. सन २०१३ साली फेब्रुवारी महिन्यात एकटेच गाडीने, कामानिमित्त चिपळूणहून
कराडला जाताना आम्हाला अपघात झाला.
गाडीच्या डाव्या बाजूला भरपूर मार बसला, गाडीची अलाईन्मेंट बिघडली, आम्ही मात्र
थोडक्यात बचावलो. ‘आता ती गाडी आपण विकून टाकू या !’ म्हणत सारे कुटुंबीय आमच्या
मागे लागले, तळमळणारा गाडीचा जीव मात्र काहीतरी वेगळेच म्हणत होता. सर्वांचा विरोध
पत्करून, नुकसान सोसून आम्ही ती गाडी पुढे सन २०१५ च्या विजयादशमीपर्यंत सोबत ठेवली,
इतकेच काय तर गाडीत मन गुंतलेल्या एव्हाना, पाच वर्षांच्या चिरंजीवाला, ‘ही गाडी
आता थकलेय, आपण ही गाडी तिच्या घरी नेऊन देऊ या, आणि तेथून दुसरी नवी आणू या !’
असे समजावत त्याच्या समोरच जुनी गाडी एक्स्चेंज करून नवी टाटा इंडिका घेतली होती.
सांगायचं तात्पर्य हेच की, या साऱ्यामागे असलेली प्रेम भावना आम्ही जपत राहिलो,
सामोऱ्या आलेल्या प्रत्येक हृदयात अत्यंत जागरूकतेने आपल्याविषयी प्रेम भावना
जागविण्याचा आपला प्रयत्न आपल्याला एक वेगळेच समाधान प्राप्त करून देत असतो, याचा
आणखी एक अनुभव आम्ही घेतला होता.
संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊलींचे ‘पसायदान’ हे
विश्वकल्याणकारी प्रेमामुळे निर्माण झाले आहे. साने गुरुजींची ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम
अर्पावे’ ही काव्यपंक्ती प्रसिद्ध आहे. संत एकनाथांच्या ‘हितोपदेश’मध्ये, ‘परमेश्वर सर्व
शक्तिमान म्हणून जर आपण प्रेम करणार असू तर सर्वत्र दिसणाऱ्या मानव सृष्टीवर प्रेम
करावे तरच तो परमात्मा – परमात्मातत्त्व हे तुमचे तारक साधन बनेल’ असे वाक्य आहे. अर्थात प्रेम
हा विषय व्यापक असून विविधांगी आहे. धृतराष्ट्राने युद्धाअंती भीमाचा सूड
घेण्यासाठी प्रेमाचा आव आणला होता, अफझलखानाने शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी
मैत्रीचा आव आणला होता, पुतना राक्षसीने भगवान श्रीकृष्णाला ठार मारण्याचा कट
मायावी रूपानेच रचला होता. एवढं कशाला, ‘हिंदी चिनी भाई भाई’ म्हणत चीननेही कपटी
भ्रातृभाव दाखवलाच होताच की ! प्रेमात त्याग करावा लागतो, पुष्कळदा
हिंसाचारही होतो. त्यागी प्रेम मात्र बावनकशी सोन्यासारखे असते. अपत्य प्रेम, सद्गुरू आणि शिष्य
यांचे एकमेकांवरचे प्रेम, राष्ट्रासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या राष्ट्रभक्तांचे
प्रेम, तत्त्वासाठी, धर्मासाठी, व्रतासाठी प्राण देणाऱ्या निष्ठावंतांचे प्रेम,
मातृभाषेवरचे प्रेम आदि अत्युच्च पायरी गाठायला, षड्रिपूंच्या आहारी न जाणारी कडवी
निष्ठाच असावी लागते. असे बावनकशी प्रेम कीर्तिरूपाने इतिहासात अमर होते.
आमच्या घराजवळील गल्लीत एका कुत्रीने एकदा
चार-पाच पिल्लांना जन्म दिला, जन्मलेली पिल्ले थोडेसे हवा-पाणी मिळाल्यावर इतरत्र
विखुरली, दुर्दैवाने एक पिल्लू अगदीच अशक्त होते, त्याला स्वतःला सावरयालाही येत
नव्हते. एके सकाळी घराच्या गेटजवळ त्याच्या ओरडण्याचा केविलवाणा आवाज ऐकू आला. शोध
घेण्याचा वरवर प्रयत्न केला, पण काही दिसले नाही, सिनियर के.जी.त शिकणाऱ्या
चिरंजीवाच्या, ते पिल्लू खाली गटारात सहज न दिसणाऱ्या ठिकाणी पडलेले लक्षात आले.
तो धावत धावत ते सांगायला आला. मातीच्या गोळ्याला कुंभार एकटाच आकार देत असतो, पण
आपल्या या लहान मुलांवर संपूर्ण समूहाचा प्रभाव पडत असतो, त्यामुळे त्याची भूमिका
नाकारून त्याच्यातील तयार होत असलेली संवेदनशीलता आम्हाला मारायची नव्हती. हट्ट
करून त्याने ते गटारातील पिल्लू आम्हाला बाहेर काढायला लावले, पांढरे शुभ्र,
गुबगुबीत, पिल्लू थरथर कापत होते. त्याच्या हट्टापायी आम्ही पिल्लाला पाणी
पाजण्याचा, दूध वगैरे देण्याचा प्रयत्न केला, रस्त्यावरून गटारात पडल्याने त्याला
लागलं असावं ! एका खोक्यात उबदार कपड्यात गुंडाळून आम्ही त्याला ठेवलं, एका
मित्राने त्याची जगण्याची शक्यता कमी असल्याचेही सांगितले. पण चिरंजीवाला समजावणे
कठीण होते, तो दिवसभर त्या खोक्याजवळच घुटमळत राहिला होता, त्या पिल्लात त्याचा
अडकलेला जीव पाहाता, उद्या त्याला ते पिल्लू मेलेले बघावे लागले तर काय ? अचानक
कोठेतरी वाचलेले आठवले, एका लहान मुलाने आपल्या मेलेल्या मांजराला घट्ट छातीशी
धरून ठेवलं होतं. शुष्क डोळ्यांनी, मिटलेल्या ओठांनी तो आई-वडिलांशी झगडत होता ते
न देण्यासाठी ! आम्ही रात्रभर विचार करत राहिलो, पहाटे पिल्लाची खोक्यातली हालचाल
पूर्णत: थांबलेली दिसली. चिरंजीवाने या पिल्लासाठी काल केलेली धडपड आठवली आणि
क्षणार्धात डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या. पण आता काहीच उपयोग नव्हता. तातडीने
आम्ही घराजवळच्याच बागेत खड्डा खणून पिल्लाला दफन केले. नंतर स्वतःहून चिरंजीवाला
सांगितले, 'ते पिल्लू पहाटे चांगले झाले, म्हणून दत्त महाराज आले आणि त्याला घेवून
गेले.' चिरंजीवाच्या बालमनात पूर्वीपासूनच दत्त महाराजांविषयीही प्रेम होतेच, आणि
आता त्या पिल्लाबद्दल निर्माण झाले होते ! त्यामुळेच त्याला ते सहज पटले. इथे
निव्वळ प्रेमभावना उपयोगी पडली होती, 'प्रेमाने जग जिंकता येते' हे वाक्य आम्हाला
आठवले.
तसं पाहिलं तर आमचं
सर्वाधिक प्रेम निसर्गावर आहे. सकाळच्या
ताज्या सूर्यकिरणांनी आपल्या
परिसरातील निसर्गाचं वातावरण
शुद्ध होतं. घराच्या उघड्या दारा-खिडकीतून दिसणारं
एखादं रोपटं नव्या पालवीसकट
वाऱ्याच्या झुळूकीसोबत
नाचत असतं. एखादा सनबर्ड, एखादा खंड्या हा पहाटे उमलेल्या फुलाशी आपुलकीने हितगुज करीत असतो, रसपान करीत असतो, कोणाच्यातरी चाहुलीने तो अचानक भुर्रकन उडून जातो, ती फांदी काहीकाळ थरथरते, परत स्तब्ध होते तोच पक्षी परत येतो, काही झालेच नाही अशा पद्धतीने फांदीवर बसतो, पुन्हा
हितगुज सुरु होते. निसर्गातील ही गंमत तर आपण सारेच अनुभवतो, मात्र निसर्गाच्या
प्रेमात पडलो की मग तो आपल्याला त्याची अनेक रूपे दाखवतो, ते पाहून आपले मानवी मन
चैतन्याने, प्रेमाने भरून जाते.
पणती
तेवण्यासाठी वात तेलात बुडलेली पण वातीचे टोक तेलाच्या बाहेर असावे लागते, तरच ती
प्रकाशमान होऊ शकते. मानवी जीवनही असेच पणतीतल्या वातीसारखे आहे. आपल्याला जगात,
पण तरीही काही प्रमाणात अलिप्त राहावे लागते. विवेकाचा आणि प्रेमाचा दिवा प्रत्येक
हृदयात लावत, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रफुल्ल हास्य फुलविण्याचा संदेश
आपल्याला ‘दीपावली’सारख्या सणातून प्राप्त होत असतो. आयुष्यात जो पर्यंत आपल्यावर
प्रेमाचा अभिषेक होतो आहे, तोपर्यंत शांतपणे, त्यात बेधुंद होऊन, कर्तव्याचं भान
ठेवून, आनंदाच्या लहरींत जगायला शिकायलाच हवंय ! प्रत्येकात चांगले गुण असतातच !
काहींत संयम, काहींत उत्कट प्रेम, सामर्थ्य, उदारता, काहींत लोकांना एकत्र आणण्याची क्षमता असते. दीपावलीतील
प्रत्येक पणती ही त्याचेच प्रतिक असते. अशा अनेक पणत्या आपल्या स्वभावाने, लावत
(पेटवित), कटुता टाळून, मानवी क्षमता विकसित करत संपूर्ण जीवन समृद्ध करीत
प्रत्येक हृदयात प्रेमज्योत पेटविण्याचा संकल्प करू या !
धीरज वाटेकर