शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

देशासाठी जगण्याची प्रेरणा देणारे संघटन

‘अभाविप’च्या ५२ व्या कोकण प्रदेश अधिवेशन निमित्ताने... 

साधारणतः १६ ते २१ या वयोगटातील युवक हा शारीरिक आणि मानसिक बदलातून जात असतो. या वयात, विद्यार्थी मनात ‘असंतोष’ निर्माण झाल्यास त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व नकारात्मक प्रभावाने व्यापण्याची शक्यता असते. आज आपल्याकडे पारंपारिक कुटुंबपद्धतीही जवळपास नाहीशी झाली आहे. युवा वर्गात एक ‘प्रतिसंस्कृती’ निर्माण होऊ पाहाते आहे. साधारणतः या वयातला युवक हा शिक्षणाबरोबरच स्वतःचे अवलंबित्व संपवून, स्वायत्तता आणि जबाबदारी पेलण्यासाठी किमान वैचारिक स्तरावर धडपडत असतो. अशा अवस्थेतील युवकांनी सकारात्मक विचारांनी भारलेल्या युवा चळवळीला भावनिक प्रतिसाद देत तिच्यावर बौद्धिकश्रद्धा दाखवून आपली तारुण्यसुलभ उर्मी जगायला प्रारंभ केला की त्यातून पुढे राष्ट्राला, समाजाला काहीतरी ‘ठोस’ देण्याची क्षमता असलेलेच कार्यकर्ते घडतात. राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचे स्वप्न उराशी बाळगून गेली ७० वर्षे अशी वैशिष्ट्यपूर्ण आणि सदैव कार्यरत, देशासाठी जगण्याची प्रेरणा देणारी तरुणाई घडविणारी विद्यार्थी संघटना म्हणून जगातील आजवरच्या सर्वात मोठ्या ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ या संघटनेकडे पाहिले जाते. या संघटनेच्या कोकण प्रदेशाचे ५२ वे अधिवेशन दिनांक २७ ते २९ डिसेंबर २०१७ दरम्यान रत्नागिरीत संपन्न होते आहे, त्या निमित्ताने...!

‘दिशा भविष्याची, कौशल्यपूर्ण शिक्षणाची’ हे या अधिवेशनाचे मुख्य सूत्र आहे. आज संपूर्ण जग, सर्वाधिक तरुणाईच्या जोरावर संधीचा देश बनलेल्या भारताकडे मोठ्या आशेने बघते आहे ! देशाची ६५ टक्के लोकसंख्या तरुण आणि वय ३५ वर्षांच्या आतली आहे. कोकणातील या तरुणाईला कौशल्यपूर्ण शिक्षणाची भविष्यातील दिशा या अधिवेशनात स्पष्ट केली जाणार आहे. भूतकाळात रमणारी, सदैव घडून गेलेल्या घटनांविषयी बोलणारी आणि आठवणी सांगत बसणारी व्यक्ती आपले तारुण्य गमावून प्रौढत्व आणि वृद्धत्वाकडे झुकलेली असते. ‘अभाविप’ तरुणाईला भविष्यातल्या स्वप्नांचा वेध घेण्यासाठी सतत विविध रचनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून प्रवृत्त करत असते आणि एकदा का या वयात तरुणाच्या रक्तात ही सदैव ‘कार्यरत’ राहाण्याची शैली शिरली की मग तो तरुण उर्वरित आयुष्यातही आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेचा विचार करत, त्याचा ध्यास घेत, स्वप्नांना साकार करण्यासाठी अविश्रांत कठोर मेहनत करताना, यशस्वी होताना दिसतो. संपूर्ण देशभरात डोळसपणे पाहिल्यास राष्ट्रहिताचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य उभे करणारी, तो विचार घेऊन जगणारी अशी तरुणाई आपल्याला दिसेल. सामर्थ्यशाली युवक सामर्थ्यवान राष्ट्र निर्मिती करू शकतो. एकविसावे शतक आशियाचे शतक आहे, ते भारताचे कसे बनू शकते ? त्यासाठी युवाशक्तीला कौशल्य विकासाच्या प्रवाहात आणून विकासाची नवनवी शिखरे गाठण्यासाठी प्रवृत्त करायला हवे. आज कला-कौशल्य माध्यमातून भारत उत्पादनाचे मोठे केंद्र शकतो आहे. याचा सारासार विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने ‘कौशल्य विकास’ या विषयाला अतिशय महत्त्व दिले आहे. बुद्धीचे काम हे श्रेष्ठ, महत्वाचे आणि हाताचे, कष्टाचे काम हे कमी दर्जाचे ही मानसिकता आम्हाला बदलावी लागणार आहे. ‘आपल्यापैकी खूप कमी जणांच्या आईला बुद्धीचे काम करण्याची संधी मिळाली असेल तरीही आपण आपल्या आईचा सन्मान करतो’ असा मुद्दा खुद्द पंतप्रधानांनीच मांडून हाताच्या आणि कष्टाच्या कामाचा, श्रमाचा आपण सन्मान करायला हवा, अशी समानतेची भूमिका मांडलेली आहे, जी अतिशय योग्यच आहे. आज स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठीची ताकद ही पारंपरिक पदवी शिक्षणापेक्षा कौशल्य शिक्षणात अधिक आहे. तिला अनुसरून समाजात बदल घडायला हवा आहे, त्यासाठी तो सर्वप्रथम तरुणाईत उतरायला हवाय. त्यातून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडणे शक्य आहे. हा दूरगामी विचार या अधिवेशनात चर्चिला जाणार आहे.

आपल्याकडे आपला संकल्प पूर्ण करण्यासाठीचा आवश्यक समर्पण भाव असेल, त्यासाठी जीवन अर्पण करण्याची, दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर वय महत्वाचे ठरत नाही. लहान वयात मोठं कार्य उभे केलेल्या स्वामी विवेकानंदांना प्रेरणास्थानी मानून त्यांच्या स्वप्नातला भारत निर्माण करू पाहाणारी, दिनांक ९ जुलै १९४९ मध्ये रा. स्व. संघाच्या मोजक्या प्राध्यापकांनी स्थापन केलेली ही संघटना आज संघपरिवारम्हणून ओळख असलेल्या संघटनांपकी एक बहुचर्चित देशव्यापी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संघटना बनली आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने संगोपन झालेले, आहार, राहाणीमान, भाषा, पेहेराव वेगवेगळे असलेल्या संपूर्ण देशातील तरुणाईला, स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून सर्वांना प्रेरणादायी असलेल्या ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या मंत्रघोषाने एका धाग्यात गुंफण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आहे. या मंत्राने पूर्वी तरुणाईला भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्याची ताकद दिली, आणि आज स्वतंत्र भारताला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी, विकासाची नवनवी शिखर गाठण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी, भारतातील गावे, गरीब शेतकरी, मजूर अशा सर्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची प्रेरणा हाच मंत्र देतो आहे. सन १९६०च्या दशकात महाराष्ट्रात स्वर्गीय यशवंतराव केळकर, सुरेशराव मोडक असे प्राध्यापक-शिक्षक कार्यकत्रे, बाळ आपटे, पद्मनाभ आचार्य, अनिरुद्ध देशपांडे, अरविंद वैशंपायन, प्रभाकर देसाई   असे धडाडीचे विद्यार्थी कार्यकर्ते, मदनदास यांच्यासारखे पूर्णवेळ कार्यकत्रे झपाटल्यासारखे कार्यरत झाले होते. अखिल भारतीय विद्यापीठात प्रवास, गाठीभेटी, बैठका, प्रवास, विद्यार्थी सत्कार, संगीत, शास्त्रीय संगीत, वक्तृत्व, क्रीडा स्पर्धा, विविध स्थानिक प्रश्नांवर विद्यार्थ्यांची आंदोलने, महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, सामाजिक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलने, विविध गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी, अधिवेशन, अभ्यासवर्ग, कार्यकारिणी, प्रवास, डिपेक्स, प्रतिभासंगम आदि कार्यक्रम-उपक्रमांमुळे या सकारात्मक चळवळीवर विश्वास असलेल्या कार्यकर्त्यांच्या देशभर पिढय़ाच्यापिढय़ा निर्माण झाल्या. स्वर्गीय यशवंतराव केळकर हे विद्यार्थी परिषदेच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक होत. आमच्या पिढीने त्यांना पाहिलेलं नाही, परंतु त्यांची सार्वजनिक आयुष्यातील आपल्या उक्ती आणि कृतीत पराकोटीची एकरूपता, स्वप्नांना दृष्टी देणारे, समाजाच्या गतीचं चालण्यीचं भान बाळगणारे, अगदी निरेपक्ष, निरहंकारी साधा प्राध्यापक अशी मनावर बिंबलेली प्रतिमा आजही आम्हाला आम्हीच सन १९९८ मध्ये लिहिलेल्या ‘आज यशवंतराव हवे होते’ या एका लेखाच्या मथळ्याची आठवण करून देते. एकाच वैचारिक सूत्राने बांधलेल्या आजी-माजी कार्यकर्त्यांची देशव्यापी साखळी हे अभाविपच्या आजवरच्या यशाचे गमक मानले जाते.

सन १९६४-६५ पासून रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सदस्यता नोंदणी होऊन प्रा. मुळ्ये, प्रा. शेवडे यांच्या प्रयत्नातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सुरु झाले. प्रा. यशवंतराव केळकर यांच्यासहित सध्याचे आसाम आणि नागालँड या राज्यांचे राज्यपाल असलेले  पद्मनाभ आचार्य, सदाशिवराव देवधर, बाळासाहेब आपटे हे रत्नागिरीतील काम वाढावे म्हणून अनेकदा मुंबईतून त्याकाळी प्रवास करीत असत. केंद्रीय भटक्या-विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, ‘कृषिभूषण’ स्वर्गीय रणजितराव खानविलकर हे रत्नागिरी शाखेचे अगदी सुरुवातीचे कार्यकर्ते होत. सन १९७० ला रत्नागिरी शहर शाखा सुरु होऊन शहरमंत्री ही जबाबदारी माधव ठाकूर ह्या कार्यकर्त्याने सांभाळली होती. गुणवंत विद्यार्थी सत्कार, रक्तदान शिबीर यांसारख्या उपक्रमातून काम वाढत गेले. सन १९८० ला रत्नागिरीत ‘कोकण विभाग अधिवेशन’ संपन्न झाले होते. परिषदेचे पहिले कार्यालय गोखले नाका येथे आचरेकरांच्या माडीवर होते. त्यानंतर पासून, ते सध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आजगावकरवाडी येथे आहे. सन १९८२ साली प्रांतस्तरीय पतितपावन मंदिर (रत्नागिरी) ते काळाराम मंदिर (नाशिक) अशी ‘समता ज्योत यात्रा’ काढण्यात आली. या दरम्यान रत्नागिरीला पहिली पूर्णवेळ ‘शुभांगी पुरोहित’ यांच्या रूपाने मिळाली, त्या परिषदेच्या पहिल्या महिला पूर्णवेळ होत. तेव्हापासून रत्नागिरीत परिषदेचे संघटनात्मक काम वाढते राहिले असून आजतागायत त्यातील विद्यार्थीनी सहभाग लक्षणीय आहे. आपल्या महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी परिषदेचे काम केल्यानंतर संघटना सांगेल तेथे, सांगेल त्या स्वरूपाचे काम समर्पण भावनेने एका निश्चित कालावधीपर्यंत करणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘पूर्णवेळ कार्यकर्ते’ म्हटले जाते. अशा कार्यकर्त्यांचे मोठे योगदान रत्नागिरीतील काम वाढण्यासाठी मिळालेले आहे. सन १९८५ साली प्रा. यशवंतराव केळकर यांच्या ६१ वर्षे वयपूर्तीचा कार्यक्रम रत्नागिरीत झाला होता, त्यावेळी येथून ६१ हजार रुपयांचे निधी संकलन करण्यात आले होते. प्रांत अधिवेशन, सन १९९१ च्या काश्मीर आणि आसाम बचाव आंदोलनात सहभाग, सन १९९३ चा विराट मोर्चा, ‘स्वामी विवेकानंद संदेश यात्रा’, श्रमानुभव शिबीरे, विविध आर्थिक कार्यक्रम आणि सन १९९७ च्या ‘प्रतिभासंगम’ संमेलनाने परिषदेच्या रत्नागिरीतील कामाला नवा आकार प्राप्त करून दिला होता. राज्यातून ८०० विद्यार्थी साहित्यिकांची उपस्थिती लाभलेल्या या संमेलनात कार्यकर्ता म्हणून काम केलेल्या २५० जणांपैकी प्रत्येकजण आजही प्रतिभासंगमची आठवण निघाली की त्या संस्मरणीय आठवणीत रमतो, त्या आठवणी जगतो.   
   
परिषदेचे काम केलेले जुने कार्यकर्ते ‘पूर्व कार्यकर्ता’ म्हणूनही अत्यंत जबाबदारीने आपले योगदान देत संघटनेचे काम सतत प्रवाही कसे राहील यासाठी प्रयत्नरत असतात. या प्रामुख्याने पूर्णवेळ कार्यकर्त्यांची व्यवस्था, आर्थिक तरतूदी, निरनिराळ्या व्यवस्था आदींचा समावेश होतो. ‘परिषदेचे काम हे पवित्र काम आहे’ हा विचार एकदा का मनावर पक्का बिंबला की तो कार्यकर्ता सदैव आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आपले शक्य ते योगदान देत राहतो. देशासाठी काही क्षण जगण्याची प्रेरणा देणारा, त्याच्या अंतरंगात भिनलेला विचार कार्यकर्त्याला सदैव कार्यरत ठेवत असतो. अशा असंख्य पूर्व कार्यकर्त्यांचे पाठबळ जबाबदारीने आजही संघटनेच्या मागे उभे आहे, विशेष म्हणजे या साऱ्या भाव-भावना जपाण्यामागे एक संस्काराचा घट्ट धागा विणला गेला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी अधिवेशनासाठी कोकण प्रांतातून सुमारे एक हजार विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. सन १९८५ नंतर ३२ वर्षांनी रत्नागिरीत अधिवेशन होत आहे. कौशल्य विकासासोबत नवीन विद्यापीठ कायदा, राष्ट्रीय शिक्षण धोरण, मुंबई विद्यापीठ उपकेंद्र समस्या, महिला सुरक्षा, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आदी समस्यांवर चर्चा, अनुभवकथन, सांकृतिक कार्यक्रम, शोभायात्रा आणि नूतन कोकण प्रदेश कार्यकारिणी निवड आदि कार्यक्रम या अनुषंगाने  होणार आहेत. वर्तमान कार्यकर्त्यांसोबत ज्यांनी आपल्या तरुणपणात सामाजिक चळवळीच्या आयुष्याचा श्रीगणेशा अभाविपपासून केला असे कोकणातील अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहाणार आहेत.

तरुणांच्या सक्रीय सहभागानेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७० वर्षानंतरही  आपल्याला अजूनही जातिव्यवस्था, स्त्री-पुरुष समानता, गरिबी, अज्ञान, भ्रष्टाचार आणि कुशासन यांसारख्या विषयात अजूनही मोठे काम करावे लागणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवणे हे या सर्वांतील अगदी पहिले काम होते, त्यानंतरच्या काळात विविध प्रश्नांना भिडणारी तरुण पिढी उभी करण्याचे ‘अभाविप’चे काम, व्रत म्हणून सुरूच आहे, आपला थोडा वेळ समाजासाठी देऊ पाहाणाऱ्या वर्तमान महाविद्यालयीन तरुणाईने आपल्या कार्यक्षम जीवनातील काही काळाच्या समिधा अर्पिण्यासाठी कार्यरत व्हायला हवे. त्याची पहिली पायरी हे अधिवेशन ठरू शकते. देशहितासाठी जगण्याची प्रेरणा घेऊ पाहाणाऱ्या या पिढीच्या नवतरुण कार्यकर्ते बंधू-भगिनींना त्यांच्या पुढील कामांसाठी शुभेच्छा !   

धीरज वाटेकर (पूर्व कार्यकर्ता)







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...