शुक्रवार, २५ मे, २०१८

साडेसात हजार कि.मी. भारतीय समुद्रकिनाऱ्यावरील पहिली ‘पुराश्मयुगकालीन गुहा’ कोकणात !


पालशेत गुहेमध्ये संशोधन
करताना डॉ. अशोक मराठे  
एकविसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला सन २००१ साली पुण्याच्या प्रसिद्ध डेक्कन पोस्ट ग्रज्युएट रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रा. डॉ. अशोक मराठे यांनी शोधलेली कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील सुसरोंडी-पालशेतची ‘पुराश्मयुगकालीन गुहा’ आजही असंख्य पर्यटक-अभ्यासकांना खुणावते आहे. किमान ९० हजार वर्षे जुनी, भारताच्या साडेसात हजार कि.मी. लांब समुद्र किनाऱ्यावरील ही पहिली गुहा आहे. ही गुहा म्हणजे, जगाच्या पुरातत्वीय पटलावर दिमाखाने मिरवू शकणारा आणि या विषयात जगात भारताची मान उंचावण्याची क्षमता असलेला अनमोल ठेवा आहे. याकडे शासनासह समाजाने ‘पर्यटन’ म्हणून सकारात्मक दृष्टीकोनातून पाहाण्याची गरज आहे.


पालशेत हे गाव गुहागर हेदवी मार्गावर गुहागरपासून १२ कि.मी. अंतरावर आहे.
पालशेत गुहा मुख  
पालशेतच्या अरबी समुद्रकिनाऱ्यापासून दोन कि.मी. आत समुद्रसपाटीपासून ८५ मी. उंचीवर सुसरोंडी भागात ‘सुंदर’ नदीच्या उगमाजवळ जांभ्या दगडात ही मानवनिर्मित गुहा
(१७° २६ एन, 73° १५ ई) आहे. या भागातील स्थानिक याला ‘वाघबीळ’ म्हणून ओळखतात. इथे पोहोचण्यासाठी डोंगर चढून किमान २० मिनिटांची पायपीट करावी लागते. येथे पोहोचण्याचा सर्वात जवळचा मार्ग गावातील पालशेत हायस्कूलचे पर्यवेक्षक मनोज जोगळेकर यांच्या आंब्याच्या बागेतून जातो. पालशेत ते पोमेन्डी मार्गावर निवोशी गावाजवळ बारभाईच्या पूर्वेस एक किलोमीटर अंतरावर ही गुहा आहे. सुंदर नदीच्या
पालशेत गुहेची पाहणी करताना
       धीरज वाटेकर आणि विलास महाडिक  
दोन्ही तीरावर, जांभ्या दगडाचे विस्तीर्ण पठार पसरलेले आहे. पावसाळ्यात या भागातून छोटे-मोठे असंख्य ओहोळ अरुंद आणि खोल घळयांतून वाहत असतात. ते दृश्य अतिशय मोहक असते. याच नदीपात्रात साधारणत साडेचार मीटर उंचीच्या धबधब्याशेजारी ही गुहा असून तिच्या जवळ जीवंत झरा आहे. या गुहेचे प्रवेशद्वार दक्षिणेला असून ते आयताकृती आहे. त्याची रुंदी दीड मीटर, उंची अडीच मीटर आहे. सन २००१ साली गुहेत आदिमानवाच्या वापरातील काही हत्यारे मिळतील  का ? यासाठी डॉ. मराठे यांनी गुहेत उत्खनन केले होते. तेव्हा त्यांना २.७ मी. खोलीवर नव्वद हजार वर्षांपूर्वीची
हात कुऱ्हाड, तोड कुऱ्हाड, फरशी, तासव्यासारखी तब्बल ५४ पुराश्मयुगीन हत्यारे सापडली होती.

यापूर्वी भारतात तामिळनाडूमध्ये मद्रासजवळील पल्लवम येथे काही दगडी हत्यारे सापडली
गुहेनजीक सुंदर नदी पात्रात पडणारा धबधबा !
होती. भारताच्या साडेसात हजार कि.मी. विस्तीर्ण समुद्र किनारपट्टीवरील नव्वद हजार वर्षे जुनी असलेली ही पहिलीच गुहा आहे. या गुहेमधील पहिला आदिमानव हा होमो इरेक्टस प्रकारचा होता. त्याच्या पाठीचा कणा ताठ होता. मात्र त्याच्या बुद्धीचा पूर्ण विकास झालेला नव्हता. जंगलातील अन्न गोळा करणे आणि दगडी हत्यारे फेकून प्राण्यांची शिकार करण्यापर्यंत त्याची प्रगती झालेली होती. भारतात  विविध २२ हून अधिक ठिकाणी पालशेतसारख्या अच्युलियन मानवाच्या गुहेतील वास्तव्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यात देशातील ७५०० कि.मी. लांबीच्या समुद्रकिनाऱ्याजवळील ही गुहा हे पहिले संशोधन आहे. डॉ. मराठे यांचे हे संशोधन 'चालू विज्ञान' या देशातील अग्रगण्य वैज्ञानिक जर्नलमध्ये जून २००६ च्या अंकात प्रकाशित झाले असून त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखल घेतली गेली आहे.  


पालशेत गाव नकाशा 
पालशेत गुहा नकाशा 
पालशेत गुहेत मिळालेली दगडी हत्यारे 
नारळ आणि सुपारीच्या बागांनी युक्त असलेल्या पालशेतला समुद्रकिनारा लाभला आहे. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात डॉ. मराठे यांनी या गावात पुराश्मयुगकालीन गुहेसह पुरातन बंदर आणि त्याच काळातील समुद्रातील बांधकामाचेही संशोधन केलेले आहे. गावात लक्ष्मीनारायण मंदिराला लागून, कुंभारआळी आणि बापटआळी भागात इ.स. २ ते इ.स. १६ पर्यंत अस्तित्वात असलेले पुरातन बंदर आहे. येथून समुद्रापर्यंतचे अंतर दोन ते अडीच कि.मी. इतके आहे. बंदराच्या बांधकामाचे अवशेषही समुद्रापर्यंत दिसून येतात. इ.स. पहिल्या शतकात एका ग्रीक खलाश्याने लिहिलेल्या ‘पेरिप्लस मॉरीस एरिग्रायर’ या प्रवासवर्णनपर पुस्तकात कोकण किनारपट्टीतील अनेक बंदरांचा समावेश असून त्यात ‘पालमपट्टई’ असा आजच्या पालशेतचा उल्लेख आहे. इ.स. तिसऱ्या शतकादरम्यान ग्रीस आणि रोमशी या बंदरातून व्यापार चालत होता. इ.स. सतराव्या शतकात सलग झालेल्या दुष्काळामुळे हे बंदर मागे पडले असावे. हे बंदर अर्धगोलाकार बुरुजाच्या आकाराचे आहे. गुहागर तालुक्यात सुरळ येथील प्राचीन शिवमंदिर आणि मानवनिर्मित सोळाशे वर्षपूर्व गुहा, वेळणेश्वरमध्ये सापडलेल्या दहाव्या शतकातील बंदराच्या खुणा, मानवी देहाचे सांगाडे, आठ हजार वर्षांपूर्वीची समुद्र भिंत आणि जगातील सर्वात जुन्या मानवी वसाहतीचे नमुने मिळाले होते. श्रीवर्धन-केळशी-आंजर्लेपासून विजयदुर्ग-सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत असलेल्या मानवनिर्मित बांधकामास पणजीच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफीने त्यास दुजोरा दिला होता. हे बांधकाम सुमारे २२५ किलोमीटर लांब आणि ३ मीटर रूंद आहे. ते दगडी असून, सलग नाही. याबाबत सलग सहा वर्षे संधोधन सुरु होते. या साऱ्यांतून हडप्पा संस्कृतीपेक्षाही प्राचीन आणि देशातील सर्वांत पुरातन "कोकण संस्कृती' अस्तित्वात असल्याचा उलगडा डॉ. मराठे यांनी केला होता. दुर्दैवाने जुलै २०११ मध्ये डॉ. मराठे यांच्या निवृत्तीनंतर हे सारे संशोधन थंडावले. त्यानंतरच्या कालखंडात इतर कोणाही संशोधकाने हे संशोधन पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला नाही.

गुहा परिसराचा विकास व्हायला हवा !

    सध्या ही पालशेतची गुहा अक्षम्य दुर्लक्षाची शिकार ठरली आहे. येथे घेऊन जाण्याची
  गुहेनजीक सुंदर नदी पात्रात पडणारा धबधबा
मानसिकता असलेल्या मनुष्यबळाचीही परिसरात सध्या वानवा आहे. या गुहेचा शोध लागल्यानंतर गावातून तिथपर्यंत जाण्यासाठीच्या मार्गावर चुन्याने रंगविलेले पांढरे दगड ठेवून रस्ता समजेल अशी व्यवस्था केली गेली होती. मात्र त्यालाही आज १७-१८ वर्षांचा काळ लोटला आहे. तेव्हा देशभरातील अनेक अभ्यासक, पर्यटक आणि चिकित्सकांची पाऊले पालशेतच्या दिशेने वळली होती. आज पर्यटकांना, अभ्यासकांना चाचपडत इथपर्यंत पोहोचावे लागते आहे. या दुर्लक्षित गुहेला भेट देण्यासाठी जात असताना साप आणि विंचू यांच्याबाबतच्यासह इतर योग्य ती सर्व खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. गुहेचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. सुंदर नदीच्या पात्राचे पाणी बांध घालून अडविले तर या ठिकाणी असलेल्या मुबलक जागेचा उपयोग करून एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आकाराला येऊ शकते. यासाठी प्रशासकीय पुढाकार आवश्यक आहे. असंख्य संशोधक आणि अभ्यासक सातत्याने कोकणात विविध ठिकाणी आपापले संशोधन-अध्ययन कार्य करीत असूनही निव्वळ तेवढ्याने पर्यटन विकास शक्य नाही. आजही दापोली तालुक्यातील पन्हाळेकाजीच्या लेणींना आपण संपूर्ण न्याय देऊ शकलेलो नाही. कोकणच्या मातीवर ‘बेगडी’ नव्हे, मनापासून प्रेम करणाऱ्या विकास पुरुषाची कमतरता कायम सतावते आहे.     

जागतिक पुरातत्त्वीय वारसा स्थळांमध्ये, नेरळ-माथेरानची नॅरो गेज’ ‘टॉय ट्रेनवगळता, हजारों वर्षांचा इतिहास असलेल्या कोकणातील एकाही स्थळाचा समावेश नाही. निवृत्त पुरातत्त्व संशोधक डॉ. अशोक मराठे संशोधित केळशी, ता. दापोली येथील निश्चित कालमापन असलेल्या त्सुनामी निर्मित जगातील एकमेव वाळूच्या टेकडीसह समुद्रातील ८ हजार वर्षांपूर्वीचे बांधकाम आणि पालशेतची पुराश्मयुगकालीन गुहा यांसारखे संशोधन ‘जागतिक पुरातत्त्वीय वारसास्थळ यादी’त समाविष्ट व्हायला हवे. कोकणचे पर्यटन जागतिक नकाशावर नेण्याचा हा खूप सामर्थ्यशाली मार्ग आहे. कोकणात एकविसाव्या शतकात झालेल्या संशोधनातून असंख्य पुरातत्त्वीय उलगडे झालेले असताना त्यास दुर्लक्षून जागतिक स्तरावर संपूर्ण कोकणचा पर्यटनात्मक विकास शक्य नाही, याची जाणीव कोकणवासियांना होईल तेव्हाच कोकणचा संपूर्ण विकास होईल.  

धीरज वाटेकर
मो.९८६०३६०९४८







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...