गुरुवार, ५ जुलै, २०१८

पुण्याच्या 'तेर पाॅलिसी सेंटर' या स्वयंसेवी संस्थेकडून 'प्रकाशाचे बेट' पुरस्काराने धीरज वाटेकर सन्मानित !

चिपळूण / पुणे : संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचे प्रमुख राजेंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत तीन वर्षे पर्यावरण आणि शिक्षण विभागात काम केल्यानंतर सन २००९ साली डाॅ. विनीता आपटे यांनी स्थापन केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पुण्याच्या 'तेर पाॅलिसी सेंटर' या स्वयंसेवी संस्थेकडून 'प्रकाशाचे बेट' हा पुरस्कार देऊन नुकताच चिपळूणचे पर्यावरणप्रेमी पत्रकार व लेखक धीरज वाटेकर यांना डाॅ. आपटे यांच्याच हस्ते सन्मानित करण्यात आले. 

धीरज वाटेकर यांनी गेली काही वर्षे सातत्याने कोकणात राबविलेल्या विविध पर्यावरण संवर्धन उपक्रमांची दखल घेऊन त्यांना संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डाॅ. विनीता आपटे यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. प्रकाशाचे बेट हा पुरस्कार त्यांना 'पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील काम आणि पर्यावरण पत्रकारिता' या करिता दिला गेला आहे. वयाच्या सतराव्या वर्षापासून आजतागायत गेली सतत एकवीस वर्षे धीरज वाटेकर हे विविध सामाजिक कामात कार्यरत आहेत. विविध अभ्यासदौरे, पर्यटन, संशोधन, अभ्यास, जंगल भ्रमण या करिता त्यांनी हिमाचल ते कन्याकुमारी-अंदमान असा भारतभर प्रवास केला असून त्या माध्यमातून देशभरातील पर्यावरण आणि पर्यटन या विषयातील हजारो छायाचित्रांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. पर्यावरण संवर्धन, बिगर मौसमी जंगल पेर अभियान, वृक्ष लागवड, बीज पेरणी अभियान, चंदन लागवड अभियान, रोपवाटिका, पर्यावरण जनजागृती यासारख्या उपक्रमात ते गेली काही वर्षे सक्रीय आहेत. त्यांनी पर्यटन आणि चरित्र लेखन या विषयावरील आठ पुस्तके लिहिली आहेत. संपूर्ण कोकणच्या संशोधित नकाशाची निर्मिती व संपादनही त्यांनी केले आहे. यापूर्वी त्यांना सन २००४ साली भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा "उत्कृष्ट जिल्हा युवा पुरस्कार", पाचव्या लिखीत "ठोसेघर पर्यटन" पुस्तकास "कोल्हापुरच्या चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘नलगे ग्रंथ पुरस्कार', सप्टेंबर २०१६ ला पुण्याच्या माय ‘अर्थ फौंडेशन’तर्फे “पर्यावरण भूषण” पुरस्कार, नोव्हेंबर २०१६ ला अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमेलनात विशेष गौरव आणि यावर्षी ‘विश्व समता कला मंच लोवले-संगमेश्वर’ तर्फे ‘राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार ही प्राप्त झाला आहे. 

हवामान बदलाचे परिणाम, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रम शहरी व ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या 'तेर पाॅलिसी सेंटर'च्या पुण्यातील एरंडवणे येथील कार्यालयात हा पुरस्कार प्रदान सोहोळा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात "अनादि काळापासून आहे, वसुंधरा ही अमुचि आई | वृक्षवल्लरी निर्झर सरिता, यांच्यासंगे बहरून जाई" या संस्थेच्या वसुंधरा गीताने करण्यात आली. हे गीत लवकरच संपूर्ण भारतातील चित्रपटगृहात दाखविले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. 'तेर' या शब्दाचा फ्रेंच भाषेतील अर्थ 'पृथ्वी' असा होतो.

यावेळी वाटेकर यांनी कोकणातील विविध उपक्रमांची माहिती दिली. निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या संस्थेचे राज्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या वाटेकर यांनी या क्षेत्रातील मार्गदर्शक व ज्येष्ठ सहकारी संस्थेचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे, चंदनतज्ञ महेंद्र घागरे, प्रमोद काकडे, विलास महाडिक यांच्याप्रति आपल्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूचा फडणीस हिने केले. यावेळी नामवंत विज्ञान लेखक म. ना. गोगटे आणि संस्थेशी जोडलेले पर्यावरण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

उत्कृष्टतेसाठी वचनबद्ध मुख्याध्यापकांची सेवानिवृत्ती

शिक्षणाची शतकोत्तर परंपरा लाभलेल्या चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विभाकर विश्वनाथ वाचास...