रविवार, १५ जुलै, २०१८

‘डेस्टिनेशन चिपळूण’ स्वप्न नव्हे सत्य !



मुंबईहून गोव्याला जाताना विश्रांतीचे पारंपारिक मध्यवर्ती ठिकाण म्हणजे चिपळूण. हाच विचार करून जगप्रसिद्ध हॉटेल ताजने साधारणत सन १९८९ ते ९५ च्या दरम्यान कोकणाचा स्वामी असलेल्या भगवान परशुराम मंदिर परिसरात, महेंद्रगिरी डोंगरात, निसर्गरम्य आणि वळणावळणाच्या वाशिष्ठी नदीपात्राचे दर्शन घडणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण जागेवर थ्रीस्टार हॉटेल उभारले. नंतरच्या काळात कोकणच्या राष्ट्रीय महामार्गावर, इथेच विसावा पॉइंटजन्माला आला, तेव्हापासून चिपळूणची विश्रांतीस्थानही ओळख बदलण्याचे प्रयत्न गेल्या २०-२५ वर्षांत अनेकांनी आपापल्यापरीने केले. मात्र त्याला दखलपात्र यश मिळत नव्हते. अलीकडेच चिपळूण पर्यटनाच्या इतिहासात प्रथमच, देशभरातील पर्यटकांना पर्यटन सेवा पुरविणाऱ्या प्रसिद्ध पर्यटन कंपन्या, टूर ऑपेरेटर आदि ३५ प्रतिनिधींच्या चिपळूण दर्शनदौऱ्यातून हे दखलपात्र यश मिळण्याची आशा निर्माण झाली.गेल्या पर्यटन हंगामात अनेक पर्यटकांनी चिपळूणला पसंती दिली. वाशिष्ठी खाडीतील बोट सफारीला पर्यटकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.डेस्टिनेशन चिपळूण हे स्वप्न नसून ते एक सत्य असल्याचा विश्वास यातूनच या विषयात काम करणाऱ्या सर्वांना प्राप्त झाला आहे.गेल्या २५ वर्षांत एकही नवा उद्योग चिपळूणात आलेला नसल्याची पार्श्वभूमी लक्षात घेता डेस्टिनेशन चिपळूण अधिक दर्जेदार होण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेऊन स्वयंसेवी काम करणाऱ्या ‘ग्लोबल चिपळूण’ सारख्या असंख्य हातांना, स्वतःला ‘लोकप्रतिनिधी-प्रशासन’ वगैरे म्हणवणाऱ्या यंत्रणेचे खंबीर पाठबळ आणि स्थानिक चिपळूणकरांचे मनस्वी सहकार्य मिळायला हवे आहे.   

चिपळूण शहराचा इतिहास किमान दोन हजार वर्षे जुना आहे. त्याचा पुरावा सांगणारी बौद्धलेणी (दघोबा), शहरानजीक कोल्हेखाजण परिसरात बायपास गुहागर हायवेवर पाहाता येतात. इ.स. ७४१-४२ दरम्यानच्या पश्चिमी चालुक्य नृपती विक्रमादित्य याच्या ताम्रपटावर चिपळूणचा उल्लेख 'चिप्ररुलन' असा आहे. शिलाहार नृपति मल्लिकार्जुन याच्या इ.स. ११५१ च्या ताम्रपटात 'चित्पुलुण' असा या शहराचा उल्लेख आहे. शहराची स्थापना श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला सायंकाळी झाली आहे. शहराच्या चारही बाजूंना डोंगर, पूर्वेस सह्याद्री, शहरामधून वाहणारी शिवनदी आणि वाशिष्ठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतिहास समजून घेण्याची आवड असलेल्या पर्यटकांनी इथला 'दळवटणे' परिसर पाहायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची छावणी येथे होती. राज्याभिषेकापूर्वी महिनाभर राजांचा मुक्काम येथे होता. ८ एप्रिल १६७४ ला महाराजांनी या भागाची सर्वप्रथम पाहणी केली, ९ मे १६७४ ला महाराजांनी या लष्करी छावणीला उद्देशून 'काटकसर आणि दक्षता' याबाबतचे आज्ञापत्र दिले होते, इतिहासात ते पत्र प्रसिद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तीनदा भेट दिलेली, त्यांच्या स्मृती जोपासणारी 'राजगृह' इमारत शहरात वडनाका-गुरवआळी भागात आहे. तालुक्यात परशुराम आणि वैजी-शिरळला जोडणाऱ्या अशा दोन प्राचीन पाखाड्या आहेत, येथील नेचरट्रेल वेगळा अनुभव ठरावा.

भगवान श्रीविष्णूंच्या दहापैकी सहावा चिरंजीव अवतार म्हणजे परशुरामहोय. कोकण भूमीच्या या निर्मात्याचे महेंद्रगिरी पर्वत क्षेत्रात, ‘ब्रह्मंद्रेस्वामीयांच्या प्रयत्नाने हिंदूधर्मीय भक्तांसाठी, मुस्लिमांनी द्रव्य पुरवठा केलेले आणि ख्रिश्चन कारागिरांनी उभारलेले सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असलेले मंदिर आहे. सहाशे वर्षांपूर्वीच्या आदिलशाही वैभवाची वास्तू येथे पाहावयास मिळते. त्यामुळे मंदिराच्या स्थापत्यात मंदिर, मशीद आणि चर्च रचनेचा सुंदर संगम साधला गेला आहे. मंदिराबाहेर बाणगंगा तलाव, श्रीदेवी रेणुकामाता मंदिर आहे. जांभ्या दगडांची पाखाडी उतरताना दोन्ही बाजूंना झाडेझुडपे, जुनी परंतु प्रशस्त घरे, उजव्या बाजूला पुरातन मंदिरे आणि जलकुंडाचे दर्शन घडते. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ-काम-परशुराम अशा काळ्या पाषाणाच्या तीन सुबक मूर्ती आहेत. या तीन मूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे अवतार होय. परशुरामाचा अवतार चिरंजीव असून, त्याचे अस्तित्व या भूमीत आहे, असे मानले जाते. या मंदिराच्या मागे माता रेणुकादेवीचे मंदिर आहे. रेणुकादेवीच्या हातात गदा, डमरू, पानपात्र आणि शिर अशी आयुधे आहेत. हे शिर सहस्रार्जुन दैत्याचे आहे, असे मानतात. कर्नाटकातल्या विजयनगर-होळसर घराण्यात राजचिन्ह म्हणून वापरले जाणारे, द्विमुखी गरुडाच्या आकृतीला दिलेले मानवी रूप असे स्वरूप असलेले गंडभेरुंड शिल्प, पाच प्राण्यांच्या विविध अवयवांपासून बनलेला शुभसूचक प्राणी शरभ, शीलालेख हे रेणुकामाता मंदिराच्या खांबांवर, माथ्यावर पाहता येतात. राष्ट्रकूट राजांची कुलदेवता असलेल्या अर्धवर्तुळाकृती राजचिन्ह 'गजान्तलक्ष्मी' जुन्या काळभैरव मंदिर आवारात आहे. त्यांचा काल इ.स. ५०० ते ९०० असा सांगितला जातो. आठव्या शतकातील श्रीदेवी विंध्यवासिनी मंदिर हे विंध्याचलचे अंशपीठ, सतींच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. देवीची यादवकालीन मूर्ती ही महिषासुरमर्दिनीस्वरूप शाळीग्राम शीळेतील अष्टभूजा मूर्ती आहे. कार्तिकस्वामींची सहामुखी (षडानन), दुर्मीळ, महाराष्ट्रातील सर्वात सुबक आणि देखणी मूर्ती याच मंदिरात आहे. 'करंजी'च्या वृक्षातून प्रगट झालेल्या, आठव्या शतकातील याच श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव अखिल महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. शेरणे कार्यक्रमासाठी नवसाचा नारळ पिवळ्या कापडात, नावाची चिट्ठी आणि दक्षिणेसह गुंडाळून शिमगोत्सवाचा जागेवरील वाळूत पुरला जातो. हा नारळ शिमगोत्सवादरम्यान देवीच्या पालख्या आपल्या ढाल-काठीच्या माध्यमातून शोधून काढतात. चिपळूणात गौतमेश्वर, वीरेश्वर, गांधारेश्वर, कृष्णेश्वर, रामेश्वर ही पंचलिंगे असून पैकी गौतमेश्वर गाभाऱ्यात शिवपिंडीवर जलाभिषेक केल्यास प्रसिद्ध 'सिंहनाद' याची दुर्मीळ अनुभूती घेता येते. तालुक्यातील मोरवणे या निसर्गरम्य गावातील खालच्या वाडीत असलेल्या पूर्वाभिमुख श्रीहनुमान मंदिरातील प्रताप  मारुतीची तळ हातावर सहज मावेल एवढी अंदाजे ३ इंच रुंद, ४ इंच लांब आणि १ इंच जाडीची छोटीशी काळ्या नरम दगडातील लहान मूर्ती ही किमान चारशे वर्षपूर्व समर्थ काळातील असावी. समर्थ काळात एका श्रीरामदास सांप्रदायिक स्वामीअवलियाने आपल्या झोळीतून आणून ही प्रताप मारुतीची मूर्ती मोरवणेतील सध्याच्या जागेत आणून ठेवल्याचे सांगितले जाते. एवढ्याश्या छोट्याश्या मूर्तीबाबत स्थानिक आपल्या भावना चार शतके जपतात, हे एक आश्चर्य आहे. वाशिष्ठीची उपनदी असलेल्या तांबी (ताम्रपर्णी) नदीच्या तीरावर गोंधळे गावी पेशवेकालीन श्रीहरिहरेश्वर मंदिर असून मंदिराशेजारी असलेली चाळीस पायऱ्यांची, विशाल आकारमानाची चिरेबंद बांधकामाची विहीर आवर्जून पाहावी अशी आहे. गुढेतील श्रीदेव वामनेश्वर या हेमाडपंथी बांधणीच्या, सातशे वर्ष जुन्या मंदिरातील एक शिंग दुसऱ्यापेक्षा थोडे खाली वाकलेला नंदीवैशिष्ट्यपूर्ण आहे. कुंभार्लीतील श्रीदेवी सुकाई-वरदायिनी-महाकाली हे बाराव्या शतकातील देवस्थान आहे. मंदिरातील लाकडी कोरीव पाहाण्यासारखे आहे. किमान ५०० वर्ष जुनी, कल्पकतेने कोरलेली वीरच्या निसर्गरम्य परिसरात श्रीलक्ष्मी मल्लमर्दनची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती जमिनीपासून तीन फूट खोल गाभाऱ्यात आहे. मूर्तीच्या तळाला १०८ विष्णू लिंगे कोरलेली आहेत. वीर पासून जवळच संगमेश्वर तालुक्यात शिरंबे गावी चौदाशे वर्षांपूर्वीचे, पाण्याने चारही बाजूंनी वेढलेल्या तळ्यात श्री मल्लिकार्जुन देवस्थान आहे. कोकणात अगदी मोजक्याच ठिकाणी अशी मंदिरे आहेत. विद्येची देवता असलेल्या श्रीशारदादेवीचे संपूर्ण कोकणपट्टीतील एकमेव देवस्थान तुरंबव गावी आहे. बिवली गावी भगवान विष्णूची शाळीग्राम पाषाणात कोरलेली,एकसंघ, सव्वा दोन फूट उंच, ‘श्रीलक्ष्मीकेशवस्वरूप प्राचीन मूर्ती आहे. दादरचे संगमरवरी बांधकाम असलेले श्रीरामवरदायिनी मंदिर आणि दाक्षिणात्य, राजस्थानी कलेचा संगम असेलेले टेरवचे श्रीभवानीमाता मंदिर हे आधुनिक वास्तूशिल्पशास्त्राचा अप्रतिम अविष्कार आहे. नंदिवसेतील देवराईत, वैतरणा नदीच्या काठावर असलेले श्रीभैरवाचे प्राचीन देवस्थान नेचरट्रेल साठी अत्यंत उपयुक्त आहे.

डेरवणनजीक कुडप गावी मोठाल्या झाडाच्या खोडालाही लाजवतील अश्या वेलीनी समृद्ध ३७ एकर देवराईच्या वनात, भगवान शंकराचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण एकाच गाभार्यात तीनशाळूंखेवर सोमेश्वर, रामेश्वर, वैजनाथ ही तीन रूपे चार लिंगात स्थापित असलेले हे दुर्मीळ मंदिर आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी जांभ्या दगडातील ९२ पायर्या चढून जावे लागते.अभ्यासकांच्या अंदाजानुसार, सन १७५० ते १८०० दरम्यानची ही लिंगे स्मृती स्वरूपात स्थापन केली गेली असावीत. यातील दुहेरी लिंग हे दोन गुरूबंधू अथवा गुरू-शिष्य प्रतीकअसावे. फार पूर्वी आपल्याकडे महत्वाची व्यक्ती गेल्यानंतर लिंगस्थापन करण्याची प्रथा होती. अनेक प्राचीन वीरगळींवर आपल्याला शिवपिंडी कोरल्याचे दिसते. निसर्गरम्य लोटनशहा दर्गा हे शहरातील उंचीवरचे ठिकाण आहे. इथल्या वनराईत विविध प्रकारच्या पक्षांचे वास्तव्य आहे.

सावर्डेपासून २ कि.मी. अंतरावर, महाराष्ट्रातील पहिली श्रीशिव शिल्पसृष्टी डेरवण येथे श्रीसंत सीतारामाबुवा वालावलकर ट्रस्टने सन १९८५ साली उभारली आहे. कै. गणेश (दादा) पाटकर या शिल्पकाराने सुमारे १५ वर्षांच्या मेहनतीतून इथे शिल्पे साकारली आहेत. शिल्पाच्या माध्यमातून साकारलेले छत्रपतींच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग पर्यटकांना खिळवून ठेवतात. येथे भारतीय पोषाखातच दर्शनार्थ प्रवेश दिला जातो. वैजी गावातील प्राचीन विहीर आवर्जून पाहण्यासारखी आहे. चिपळूणच्या इतिहासात प्राचीन संदर्भ असलेल्या, ई. स. सहाव्या शतकापासूनचे पराक्रमी, कोकण प्रांताचे वतनदार घराणे अशी ओळख असलेल्या राजेशिर्केयांचे कुटरे, डेरवण आणि तळसर येथील मराठा वास्तुशैलीने युक्त चौपाखी वाडे आपला इतिहास सांभाळून आहेत. या वाड्यात दोन दशकांहून अधिक काळातील वापरातील विविध वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. त्यासोबतच मालदोली गावात साधारणत: नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कल्पनेतून उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी नवल ठरलेल्या रामचंद्र वासुदेव मराठे न्यासया हेरिटेज वास्तूला कोकण पर्यटन नकाशात स्थान मिळायला हवे. खाडीकिनारी वसलेल्या मालदोली गावातील साडेसात एकर जागेतील अंदाजे २ हजार चौ. फूट आकाराच्या या वास्तूची आजची काठीण्यपातळी, सुरेख उभारणी असलेल्या वास्तूचा शास्त्रीय वेगळेपणा वर्तमान पिढीसमोर यायला हवा. वास्तू परिसरात ८० आंब्याच्या झाडांच्या साधारणत: तीन-चार कलमांमागे एखादे बकुळ, सोनचाफा, खुरी (खूप सुंदर वास असलेले रानटी फुलाचे झाड) आहे. या फुलझाडांना फारसे व्यापारी मूल्य नाही, तरीही येथील ही अशी लागवड अभ्यासू मानवी मनाला बुचकळ्यात टाकते. शेतकऱ्याला आपल्या फळबागेतून भरघोस उत्पन्न हवे असते. त्यासाठी भरपूर पीक यायला हवे, याकरिता वनस्पती शास्त्रानुसार भरपूर परागीकरण व्हायला हवे. परागीकरण होण्याकरिता कीटक भरपूर यायला हवेत. कीटकांना सुगंध हवा आहे. स्त्रीकेसर आणि पुंकेसर एकत्र येवून भरपूर परागीकरण व्हावे, म्हणून या सुगंधी झाडांची रचना येथे आहे. हे सारे नियोजन करणारा मनुष्य हा शेतीतील प्रचंड जाणकार असावा. मात्र नव्वद वर्षांपूर्वी कोकणातल्या खाडीकिनारी वसलेल्या गावात अशा प्रकारची देखणी, भव्यदिव्य वास्तू उभारली जाणे आणि आज वयाच्या शंभरीतही ती वास्तू जशीच्या तशी उभी असलेली पाहायला मिळणे, यात अभियांत्रिकी कसब आहे.

अलीकडच्या काही वर्षांत, वाशिष्ठी बॅकवॉटर आणि क्रोकोडाईल टुरिझम विकसित झालेल्या दाभोळ ते गोवळकोट बंदरांचे अंतर ३० नॉटिकल मैल अर्थात ४४ कि.मी. आहे. चिपळूण बॅकवॉटर आणि क्रोकोडाईल सफारी दम्यान वाळूत पहुडलेल्या मगरींसोबत, आपण मराठी साहित्यात तुंबाडचे खोतया कादंबरीतून श्री.ना. पेंडसे यांनी आजार्मार केलेला तुंबाड किनारा, विविध बेटे आणि दोन्ही तीरावरील विविधता अनभवू शकतो. चिपळूणची ही वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल, २५ मैल लांब या खाडीत एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन १९५० पर्यंत गत ३०० वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवली, त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मलीही नव्हती. सन १८०८ साली अमेरिकेतील बोस्टन येथे विश्व गॅझेटिअरप्रसिद्ध झाले होते त्यातही या दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. अशा या जगप्रसिद्ध खाडीतील फेरफटका समृद्ध जीवनानुभव ठरावा.

चिपळूणचा पहारेकरी अशी नोंद असलेला, दोन एकर शेत्रात विस्तारलेला किल्ले गोविंदगड आवर्जून पाहावा असा आहे. ३४२ पायऱ्या चढून वा गाडीमार्गाने किल्ल्यावर पोहोचता येते. एकूण १२ बुरुजांपैकी ४ बुरुज सुस्थितीत आहेत. चारही बाजूंनी खाडीच्या पाण्याने वेढलेला हा किल्ला निसर्गरम्य वातावरणात आहे. किल्यावर सहा तोफांचे एकत्रित जतन करण्यात आले आहे. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केल्याचा उल्लेख पाहायला मिळतो. किल्ल्याच्या पायथ्याशी श्रीदेवी करंजेश्वरीचे प्राचीन मंदिर आहे. चिपळूणच्या याच देवीचा शिमगा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चिपळूणात, शहरानजीक दीडशे फुटावरून कोसळणारा बाह्यवक्र जलप्रपात 'सवतसडा' हा अगदी मुख्य राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने प्रवास करणाऱ्या जवळपास सर्वांच्या पावसाळी आकर्षणाचा विषय आहे. त्यासोबतच वीर-देवपाट येथे १०० फुट उंचीवरून दोन टप्यात कोसळणारा बारमाही धबधबा, अडरे धबधबा आणि कुंभार्ली घाटमाथ्यावरील धबधबा विशेष प्रसिद्ध आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात विसावा पॉइंट असून येथून वळणावळणाच्या वाशिष्ठीनदी पात्राचे विहंगम दृश्य पाहाता येते. चिपळूणचे उद्योगपती श्रीराम रेडीज यांनी धामणवणे येथील आपल्या १०० एकर जागेत एस. आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्सफार्मची उभारणी केली असून येथे जंगल सफारी, नेचरट्रेल, पक्षी अभयारण्य, शेततळे, कँप, बाल्या नृत्य, जाखडी सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची व्यवस्थाही अशा ठिकाणी  मागणीनुसार होऊ शकते. याखेरीज शहरात पेढे-परशुराम येथे तालुक्यातील पहिले श्रीपरशुराम सानिद्ध्य निसर्ग पर्यटन केंद्रअसून अशी इतर ७-८ केंद्रे कार्यरत आहेत. ४० वर्षांच्या अथक प्रयत्नातून साकारलेले डी.बी.जे.महाविद्यालयाचे जैवसंग्रहालय वैशिष्ट्यपूर्ण आहे. विविध २१ दुर्मीळ प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजातींचे जतन येथे करण्यात आले आहे. तालुक्यात ११२ देवराया असून त्यातल्या दसपटी, कुडप, वीर, गुढे, शिरंबे येथील देवरायात नेचरट्रेलची अनुभूती घेता येते.

आगामी काळात चिपळूणात परशुरामचा महेंद्रगिरी डोंगर ते वाशिष्ठी खाडीतील बेटे ते गोवळकोट किल्ला असा रोप-वे, चिपळूण पर्यटन माहिती केंद्र, सवतसडा धबधबा बारमाही प्रवाही करणे, हाऊसबोटची उपलब्धी, वाशिष्ठी खाडीच्या दोन्ही तीरावर होम स्टे, त्यातून स्थानिकांना रोजगार, तळ्यांचे शहर असलेल्या चिपळूणात नारायण आणि रामतीर्थसह इतर तलाव ऊर्जितावस्थेत आणणे, रिव्हर बँक प्रकल्पहे आगामी महत्वाचे प्रकल्प असायला हवे आहेत.शहरातील पर्यटनाशी निगडीत रिक्षावाले, चारचाकी वाहतुकवाले, छोटे खाद्यपदार्थ विक्रेते यांच्या एकत्रीकरण आणि संवादाची आवश्यकता, रिक्षांवर पर्यटन लेखन, रिक्षादर निश्चिती व्हायला हवी असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत.चिपळूणात आजमितीस एकूण ३५ हॉटेल असून त्यातील तीन हॉटेल थ्री स्टार आहेत, त्यात ७० रूम्सची उपलब्धी आहे. उच्च मध्यमवर्गीय श्रेणीतील १५ हॉटेलात १५० खोल्यांची व्यवस्था असून परिसरात होम-स्टेची ८ ठिकाणे आहेत.

पर्यटकांच्या प्रवास मार्गावर आणि मोक्याच्या ठिकाणी (विसावा पॉइंट) पर्यटन फलक, नवे पर्यटन प्रकल्प, संग्रहालय निर्मिती, किमान पर्यटन हंगामात शहर सुशोभिकरण, स्वच्छता, रेल्वेस्टेशन ते गांधारेश्वर मार्गे चिपळूण शहर या अंतर्गत रस्त्याची सुधारणा, पर्यटन डॉक्युमेंटेशन, आपल्याकडील विसावा पॉइंट सारख्या ठिकाणी संकासूर, जाकडी,कोळीनृत्य आदींसाठी लागणाऱ्या पेहेराव-पर्यटक फोटो दर्शन यावर विचार करावा लागणार आहे. आपल्या शेजारच्या कर्नाटकात आपण राज्यभर कुठेही फिरा, आपल्याला काही महत्वाच्या ठिकाणी, मुख्य मार्गावर आपण येथे आहात ; u are here’ असे सांगणारी आणि तिथून आजूबाजूला साधारणतः ५०-१०० किलोमीटरच्या परिघात किती भरगच्च पर्यटन समृद्धी आहे ? याची जाणीव करून देणारी अगदी मोठी होर्डींग्स दिसतील ! ती होर्डींग्स पाहाताना आपल्या मनात सहजच पर्यटक म्हणून अनेक विचार येऊन जातील, बरच काही पाहायचं राहून गेलं म्हणून आपले मन चुकचुकेल, आपण पुन्हा इथे आल्यावर काय-काय पाहायचं ? याचे नियोजनही करू. आज पर्यटकांना असे सारे सहज हवे आहे, अशी व्यवस्था आपण चिपळूणात करायला हवी आहे. कोकण पर्यटन समृद्धीचा राजमार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वर मध्यवर्ती असलेल्या चिपळूणनजीक एखाद्या गावात शे-पाचशे वर्षांपूर्वीचे समृद्ध प्राचीन कोकणी खेडे अगदी जसेच्या-तसे, धूळ उडविणाऱ्या मातीच्या रस्त्या-बैलगाडीसह पर्यटकांना अनुभवायला दिले तर किती मज्जा येईल ! त्या गावात, खानपान, जगण्याच्या काही सवयी, मनोरंजनाची साधनेही तेव्हाचीच असतील ! काय हरकत आहे ? अशा नव्या गोष्टींचा आगामी काळात विचार करायला लागणार आहे. चिपळूणात कोकणी खाद्यसंस्कृती हमखास जपणारी काही हॉटेल तयार व्हायला हवीत, त्यांचे मार्केटिंग व्हायला हवे.

चिपळूणात अवघ्या ६० ते १०० किमीच्या पट्यात खाडी, डोंगर, बॅकवॉटर, किल्ले, निसर्ग, जंगल, संस्कृती, लोककला, हेरीटेजअशी जगातील सारी अमर्याद पर्यटन समृद्धी एकवटली आहे. याची नीट प्रसिद्धी, जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा कृषी पर्यटन व हॉटेल उद्योगामधून निर्माण झाल्या तर आज येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत निश्चित वाढ होईल.गोव्यात मांडवीआणि झुआरीनदीवर पर्यटन उद्योगाचा डोलारा उभा आहे, मग संपूर्ण महाराष्ट्रात बारमाही वाहणाऱ्या एकमेव, चिपळूणला आपणपर्यटन समृद्ध करू शकतो आहोत. फक्त याचा नीट विचार व्हायला हवा.त्याच-त्याच पर्यटनस्थळांना भेटी देऊन कंटाळलेल्या पर्यटकांसाठी डेस्टिनेशन चिपळूणएक चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहे. अलिकडच्या काही वर्षांत क्रोकोडाईल टुरिझमसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्धी पावलेल्या चिपळूणच्या विविधांगी पर्यटन श्रीमंतीचा हा आढावा आपल्यालाही चिपळूण पर्यटनाबाबत अनुकूल बनवेल.



धीरज वाटेकर (पर्यटन अभ्यासक)
मो. ०९८६०३६०९४८



गुरुवार, ५ जुलै, २०१८

पुण्याच्या 'तेर पाॅलिसी सेंटर' या स्वयंसेवी संस्थेकडून 'प्रकाशाचे बेट' पुरस्काराने धीरज वाटेकर सन्मानित !

चिपळूण / पुणे : संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचे प्रमुख राजेंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत तीन वर्षे पर्यावरण आणि शिक्षण विभागात काम केल्यानंतर सन २००९ साली डाॅ. विनीता आपटे यांनी स्थापन केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पुण्याच्या 'तेर पाॅलिसी सेंटर' या स्वयंसेवी संस्थेकडून 'प्रकाशाचे बेट' हा पुरस्कार देऊन नुकताच चिपळूणचे पर्यावरणप्रेमी पत्रकार व लेखक धीरज वाटेकर यांना डाॅ. आपटे यांच्याच हस्ते सन्मानित करण्यात आले. 

धीरज वाटेकर यांनी गेली काही वर्षे सातत्याने कोकणात राबविलेल्या विविध पर्यावरण संवर्धन उपक्रमांची दखल घेऊन त्यांना संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डाॅ. विनीता आपटे यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. प्रकाशाचे बेट हा पुरस्कार त्यांना 'पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील काम आणि पर्यावरण पत्रकारिता' या करिता दिला गेला आहे. वयाच्या सतराव्या वर्षापासून आजतागायत गेली सतत एकवीस वर्षे धीरज वाटेकर हे विविध सामाजिक कामात कार्यरत आहेत. विविध अभ्यासदौरे, पर्यटन, संशोधन, अभ्यास, जंगल भ्रमण या करिता त्यांनी हिमाचल ते कन्याकुमारी-अंदमान असा भारतभर प्रवास केला असून त्या माध्यमातून देशभरातील पर्यावरण आणि पर्यटन या विषयातील हजारो छायाचित्रांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. पर्यावरण संवर्धन, बिगर मौसमी जंगल पेर अभियान, वृक्ष लागवड, बीज पेरणी अभियान, चंदन लागवड अभियान, रोपवाटिका, पर्यावरण जनजागृती यासारख्या उपक्रमात ते गेली काही वर्षे सक्रीय आहेत. त्यांनी पर्यटन आणि चरित्र लेखन या विषयावरील आठ पुस्तके लिहिली आहेत. संपूर्ण कोकणच्या संशोधित नकाशाची निर्मिती व संपादनही त्यांनी केले आहे. यापूर्वी त्यांना सन २००४ साली भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा "उत्कृष्ट जिल्हा युवा पुरस्कार", पाचव्या लिखीत "ठोसेघर पर्यटन" पुस्तकास "कोल्हापुरच्या चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘नलगे ग्रंथ पुरस्कार', सप्टेंबर २०१६ ला पुण्याच्या माय ‘अर्थ फौंडेशन’तर्फे “पर्यावरण भूषण” पुरस्कार, नोव्हेंबर २०१६ ला अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमेलनात विशेष गौरव आणि यावर्षी ‘विश्व समता कला मंच लोवले-संगमेश्वर’ तर्फे ‘राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार ही प्राप्त झाला आहे. 

हवामान बदलाचे परिणाम, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रम शहरी व ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या 'तेर पाॅलिसी सेंटर'च्या पुण्यातील एरंडवणे येथील कार्यालयात हा पुरस्कार प्रदान सोहोळा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात "अनादि काळापासून आहे, वसुंधरा ही अमुचि आई | वृक्षवल्लरी निर्झर सरिता, यांच्यासंगे बहरून जाई" या संस्थेच्या वसुंधरा गीताने करण्यात आली. हे गीत लवकरच संपूर्ण भारतातील चित्रपटगृहात दाखविले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. 'तेर' या शब्दाचा फ्रेंच भाषेतील अर्थ 'पृथ्वी' असा होतो.

यावेळी वाटेकर यांनी कोकणातील विविध उपक्रमांची माहिती दिली. निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या संस्थेचे राज्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या वाटेकर यांनी या क्षेत्रातील मार्गदर्शक व ज्येष्ठ सहकारी संस्थेचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे, चंदनतज्ञ महेंद्र घागरे, प्रमोद काकडे, विलास महाडिक यांच्याप्रति आपल्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूचा फडणीस हिने केले. यावेळी नामवंत विज्ञान लेखक म. ना. गोगटे आणि संस्थेशी जोडलेले पर्यावरण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.


नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...