मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

‘ग्रेटभेट’ : विश्वविख्यात 'तत्त्वज्ञानी शल्यचिकित्सक' डॉ. व्ही. एन्. श्रीखंडे

      जेथे अंधार आहे, तेथे दिवा लावा !
     
माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांनी राष्ट्रपतीपदाच्या काळातील आपल्या पोटाच्या शस्त्रक्रियेदरम्यान विश्वास दाखवलेले आणि संपूर्ण जगभर 'तत्त्वज्ञानी शल्यचिकित्सक' अशी ओळख असलेल्या, '...आणि दोन हात' या प्रसिद्ध आत्मचरित्राचे नायक आदरणीय डॉ. व्ही. एन्. श्रीखंडे सरांची त्यांच्या दादर येथील क्लिनिकमध्ये आम्ही नुकतीच (१८ ऑगस्ट २०१८) सदिच्छा भेट घेतली. आपल्या समाजात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी आहेत. समाजात वाईट कितीही असलं तरीही आपण आपल्या आयुष्यात काय चांगलं करू शकतो ? याचा विचार सतत केला पाहिजे. असे सांगून,  'जेथे अंधार आहे तिथे दिवा लावा !' जे काम करतायं, ते लिहूनही ठेवा. उपयोग होईल, असा सल्ला ८७ वर्षे वयाच्या आदरणीय डॉ. व्ही. एन्. श्रीखंडे सरांनी दिला.

      दिनांक २ ऑक्टोबर २०१७ रोजी, प्रसिद्ध मेडिकल सोशल वर्कर कमल श्रीकांत भावे यांचे आम्ही लिहिलेले चरित्र, आमची आठवी लेखनकृती 'कृतार्थीनी' प्रकाशित झाल्यानंतर, त्या पुस्तक लेखनाचे कौतुक करण्यासोबतच आदरणीय डॉ. श्रीखंडे सरांनी, 'मुंबईत याल तेव्हा अवश्य भेटा' अशी सूचना केली होती. आम्हालाच त्यांची प्रत्यक्ष भेट घ्यायला बराच उशीर झाला, अर्थात संपर्क होता !

      'काळोखाचा सागर किती अथांग असला,
      तरी त्यात प्रकाशाची बेटं असतातचं !’
ही कुसुमाग्रजांची कविता सरांनी आम्हाला ऐकवली. आपलं वय किती ? आणि काही कौटुंबिक प्रश्न विचारल्यानंतर, इंजिनियर असूनही पैशाच्या मागे न धावता लेखनकला जोपासून आहात. तुमच्याकडे पाहून तुमच्या मित्रमंडळींचा काय वाटते ? सद्यस्थितीत लोकं जागे होत आहेत का ? शिक्षणाचा परिणाम काही होतोय का ? कोणाचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडला ? संस्काराची शिदोरी ? असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी विचारले. विशेष म्हणजे आम्ही देत असलेल्या उत्तरातील मुद्दे, हातात कागद-पेन घेऊन आदरणीय डॉ. श्रीखंडे सर स्वतः टीपत होते. आमच्या जीवनातील हा अत्यंत विलक्षण असा अनुभव होता.

      बोलताबोलता आमची कॉलेजमध्ये असल्यापासूनची चरित्रे वाचनाची आवड आणि त्यातून 'कॅटलिस्ट' प्रमाणे कार्यरत राहाण्याची बनलेली मानसिकता त्यांनी बरोबर हेरली. आमच्या व्यक्तिगत ग्रंथालयाची, संकल्पित संग्रहालयाची माहिती, कोकणातील पर्यटन, पर्यावरण विषयक आम्ही करीत असलेल्या कामांची माहितीही त्यांनी जाणून घेतली. पुरातत्तवीय नवलांकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष, संग्रहालयाकडे आत्यंतिक आवश्यक म्हणून पाहण्याच्या आपल्याकडील वृत्तीचा अभाव आणि विदेशी लोकांची संग्रहालये विकसित करण्याची मानसिकता यावर त्यांनी भाष्य केले. भरपूर पैसा कमावणारी माणसं आज प्रचंड अस्वस्थ असल्याचे सांगून त्यांनी याच्या पुष्ठ्यर्थ वैद्यकीय जीवनातील अलिकडची उदाहरणे सांगितली.

      अटलबिहारी वाजपेयींबद्दल तुला काय वाटतं ? या त्यांच्या प्रश्नावर बोलताना, 'काही माणसांचं मोठेपण आपल्याला उशीरा समजतं. किंबहुना माणूस गेल्यावर समजतं.' हे आमचे उत्तर ऐकल्यावर या मागची कारणमीमांसा करताना ते थेट आठनऊशे वर्षे मागे गेले. इतिहासात आपली प्राचीन भारतीय संस्कृती महान आहे. संपत्ती आणि सुबत्ता यामुळे भारतावर झालेली परकीय आक्रमणे आणि पारतंत्र्यात गेली आठ-नऊशे वर्षे राहिल्याचा हा परिणाम आहे. जे देश कधी पारतंत्र्यात गेलेच नाहीत ते पाहिले की हे जाणवतं असे त्यांनी सांगितले. वेस्टर्न सायन्स येईपर्यंत जगात आयुर्वेद श्रेष्ठ सायन्स होते. आज दुर्दैवाने आपल्याकडे संशोधन कमी, थापा मारण्यात रस अधिक अशी मानसिकता जाणवत असल्याचे ते म्हणाले. चीनच्या सामान्य माणसाची कमाई आपल्याकडील माणसाच्या सहा पट अधिक आहे आणि हे गेल्या वीस वर्षांत घडलंय याकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शंभर वर्षांपूर्वी बालकामगार जगात सर्वत्र होते, आज नाहीत कारण जगं बदलत चाललंय. जातिभेद मागे पडलाय. पूर्वी माणसं मलेरिया टायफाईड न्यूमोनिया ने मरतं, आज ते ही बदललंय. आपल्याकडे भारतात कायद्याने न्याय उशीरा मिळतो आणि ते योग्यच आहे अन्यथा सर्वजण कोर्टात जात राहतील असेही त्यांनी सांगितले.

      जगातील सुंदर आहे नि अनेक चांगली माणसं चांगली कामं करताहेत. लेखणीतून माणसं तयार होऊ शकतात, माणसं बदलू शकतात. माणसांना बदलवण्यातच खरे कौशल्य आहे. स्वतःबद्दल पुस्तक लिहा, प्रकाशित कधी करायचं ते नंतर बघू पण स्वतःविषयी लिहायला सुरुवात करा. ‘जी चूक मी केली ती करू नका’, असा आपुलकीचा सल्लाही सरांनी दिला. गेली २० वर्षे आम्ही डायरी लिहितोय हे मात्र सरांना सांगायचे राहून गेले. आम्ही चिपळूणचे म्हटल्यावर, सरांनी चिपळूणचे प्रसिद्ध डॉ. रत्नाकर घाणेकर हे माझे विद्यार्थी अशी आठवण सांगून डॉ. देवधर, डॉ. पाटणकर, नामवंत इतिहास संशोधक अण्णासाहेब शिरगावकर यांचाही आवर्जून उल्लेख केला. 'या भेटीने समाधान झालेलं नाही, पुन्हा भेटायला याअशी आदरणीय डॉ. श्रीखंडे सरांची सूचना ग्रहण करून आम्ही त्यांचा निरोप घेतला.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८

https://www.facebook.com/groups/2124009321200341/permalink/2153386568262616/?__tn__=K-R


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...