रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन ! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. भारतीय संस्कृतीत पूर्वजांनी बहिण भावाच्या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा वर्णिला आहे. भारतीय संस्कृती मानवी जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’ असे वचन आहे अर्थात ‘जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो.’ हे सारे खरे असले तरीही स्त्रीयांवरील अन्याय, अत्याचार आपल्याला नवीन नाहीत. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी आपली भारतीय संस्कृती आहे. या पार्श्वभूमीवर वर्तमानकाळात रक्षाबंधनाचा सण हा मानवी दृष्टी परिवर्तनाचा सण बनायला हवायं ! ज्यातून भारतीय संस्कृती संवर्धनाचे मूल्य बदलत्या युगातही जपले जाईल.
हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेस राखी पौर्णिमा येते. ही पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरा केला जातो. या विधीस ‘पवित्रारोपण’ असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही या मागची मंगल मनोकामना ! रक्षाबंधन एकमेकांशी जवळीक साधण्याचा, परस्परांना हमी, विश्वास देण्याचा, ‘मी तुझ्या मदतीसाठी, संरक्षणासाठी इथे आहे, मी आपल्या नाते संबंधाप्रति, मैत्रीप्रति वचनबद्ध आहे’ हा विश्वास दर्शवण्याचा सण आहे. आपल्याकडे पूर्वी सासुरवाशीण मुली सणावारांसाठी माहेरी येत. त्या वेळी माहेरचे बालपण, लाड-प्रेम व सासरचा संसार यांची मनात घालमेल होई. या मनाच्या खेळात आपला शाश्वत पाठीराखा कोणीतरी असावा, ही भावना भावाजवळ येऊन थांबे, तेव्हा ती कृष्णाचे रूप त्याच्यात बघतं. कोणत्याही क्षणी, प्रसंगी कुठेही हाक मारताच धावून येणाऱ्या भावाला रेशीमधाग्याची राखी बांधताना बहिणीच्या मनात भीतीचा लवलेश राहत नाही. दुर्बलांचे रक्षण हाच संदर्भ, संस्कार यात महत्त्वाचा आहे. ‘राखी’ ह्या शब्दातच ‘रक्षण कर’ (राख म्हणजे सांभाळ) हा संकेत आहे. रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबाबत निश्चित पुरावा नाही. एका आख्यायिकेनुसार पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे अनेकदा देवांचे काही चालत नसे. एकदा दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याला त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे म्हणतात. ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमायूँ बादशहाला राखी पाठवली व हुमायूँ बादशहाने पण आपल्या या बहिणीचे बहादुरशहाने केलेल्या आक्रमणापासून संरक्षण केले होते. बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलत असते. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी भाऊ स्वतःकडे घेत असतो. बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे बहिणीचे भावाच्या विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत यामध्ये दिसून येतो. देशाच्या काही भागात ज्या स्त्रीयांना भाऊ नाही, त्या स्त्रीया चंद्राला आपला भाऊ मानून ओवाळतात. हा पूर्वांपार चालत आलेला सण, भारतीय संस्कृतीमध्ये आजही मानाचे स्थान राखून आहे.ह्याच दिवशी आपले कोळीबांधव खवळलेल्या सागराला शांत करण्यासाठी, त्याची पूजा करून नारळ अर्पण करतात. पावसाळ्यात थांबलेल्या मासेमारीला पुन्हा सुरुवात करतात.
आज बदलत्या काळात राख्यांचे ट्रेण्डही बदललेत. सध्या बाजारात डिझायनर राख्यांची चलती आहे. बच्चे कंपनीसाठी डोरेमॉनपासून बालगणेशापर्यंत राख्यांची भरपूर व्हरायटी आज पहायला मिळते आहे. एका मोठ्या मण्यामध्ये आणि दोन्ही बाजूला एकेक किंवा अधिक छोटे मणी अशा प्रकारे बनवण्यात आलेल्या बीड्स राख्यांना आज बाजारात खूप मागणी आहे. जरदोसी धाग्यांपासून वेगवेगळ्या डिझाइनमध्ये बनलेल्या राख्या, लहान मुलांच्या भावविश्वातली मिकी माऊस, टेडी बेअर, बॅटमॅन, हॅना मॉण्टा, छोटा भीम,बालगणेश, डोरॅमॉन कार्टून्स विराजमान असलेल्या राख्या, मण्यांप्रमाणेच मोत्यांचाही वापर असलेल्या डिझायनर राख्या, विविध रंग, धागे आणि आकारात मिळणाऱ्या फॅन्सी राख्यांसह स्वस्तिक, जपमाळेतील मणी, रुदाक्ष, ओम्, कुयरी, गणपती, देवी अशी अक्षरं / चिन्हं असणाऱ्या धार्मिक, अध्यात्मिक टच देणाऱ्या राख्यांनी मार्केट काबीज केले आहे. डायमण्ड्स, मणी, वेल्वेट बॉल्स यापासून बनवण्यात आलेली ब्रेसलेट राखी, फेंगशुईतील विण्डकॉइन, ड्रॅगन, कासव, गोल्डफिश, लाफिंग बुद्धा अशी वेगवेगळी कॅरेक्टर्स असलेल्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. यावर्षीचा ‘ट्रेंड’ आहे तो ‘वीर’, ‘भाई’, ‘दादा’, ‘ब्रो’ असे लिहून धाग्यात गुंफलेल्या राख्यांचा. बदलत्या काळात नात्यातील भावना त्याच असल्या तरी परिसीमा बदलताहेत. पूर्वीपासूनचा कडक स्वभावाचा दादा आता मित्र किंवा कुल ब्रो झाला आहे. त्यामुळे राख्याही बदलल्यात. राखीपौर्णिमा साजरी करताना भावाला आकर्षकआणि ट्रेंडी राखी बांधावी याकडे तरुणींचा कल जास्त आहे, अर्थात बाजारपेठेनेही याची दाखल घेतलेली आहे. ऑनलाइन मार्केट अर्थात इन्स्टाग्राम, फ्लिपकार्ट सारख्यासाइट्सवरूनही राख्यांची विक्री होते आहे. ‘प्लॅटिनम बँड्स’ हे सुद्धा राखीचं एक महागडं नवं रूप बाजारात उपलब्ध आहे. कस्टमाइज्ड गोष्टी आवडणाऱ्यांसाठी, भावांना त्यांच्या नावाच्या आद्याक्षराची राखी बांधणं पसंत करणाऱ्या बहिणींसाठी वेगवेगळ्या फॉण्ट आणि स्टाइलमध्ये नावे कोरून अॅक्रेलिक, लाकूड, धातूवर तयार केलेल्या राख्या अनेकांनाभावताहेत. बाजारात या राख्यांचं प्रमाण फारसं नसलं तरी त्या ऑनलाइन उपलब्ध होताहेत. राखीला बंधू-भगिनी प्रेमाची झालर म्हणून चक्क भावाबहिणीचे फोटोच राखीवर पिंट्र करून घेण्याचा नवीन प्रकार रुजू पाहतो आहे, अर्थात राखीतही आता डिजिटलायझेशन येत आहे.
आमच्या लहानपणी आम्ही सोनेरी किंवा चंदेरी रंगाच्या चकतीची स्पंजवाली राखी मनगटावर आवडीने मिरवायचो. एक सोनेरी धागा, त्या धाग्याच्या मधोमध एक चांदीची चकती, त्या चकतीवर एक भला मोठा स्पंज आणि त्या स्पंजवर फुलं, मोती असलं काही तरी डिझाइन असायचं. ही राखी बांधल्यानंतर दुसऱ्या किंबहुना त्याच दिवशी पहिल्या त्या राखीच्या चकत्या गळून पडायच्या. मग स्पंज सुटा व्हायचा आणि दोन दिवसांनंतर मनगटावर फक्त धागा शिल्लक राहायचा. स्पंजचा वापर पाटी पुसायला व्हायचा. लाल, हिरव्या, पिवळ्या अशा कोणत्याही रंगात मिळणारी रेशमी गोंड्याची साधी राखी अनेकांच्या हातावर दिसायची. बालपणातली राखी म्हटलं की अजूनही हेच चित्र राखी डोळ्यांसमोर येते. त्या काळीही चंदनाचा एखादा छोटासा नारळ, एकच फुलं, रूदाक्ष अशा डिझाइनच्या आटोपशीर राख्याही होत्या. स्वस्तिकचं चिन्ह आणि त्यावर शुभ लाभ ही अक्षरं असलेली राखी अपवादाने दिसायची. राखी जेवढी मोठी, तेवढं चांगलं, अशी एक वेडी समजूत मनात कुठेतरी घट्ट रूजलेली होती. शाळेतल्या रक्षाबंधनाची मौज वेगळीच होती. तिसरी-चौथीत असताना आपल्याच हातावर अधिकाधिक राख्या असाव्यात, असं वाटायचं. नि आठवी-नववीत आल्यानंतर, आज आपला हात प्लास्टरमध्ये असता तर किती बरं झालं असतं ? असा विचार मनात येऊन जायचा, असो !
कुरियर, ई-मेल आणि सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात पोस्टानं राख्या येणं कमी झालं तरीही ग्रामीण भागात ते कायम आहे. माध्यमं बदलली असली तरी माया कायम आहे. हा सण साजरा करण्यामागचा मूळ हेतू, शास्त्र जाणून तरुण पिढीस या संस्कृतीला, परंपरेला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावे लागणार आहे. याची जाणीव करून देण्याची जबाबदारी ज्येष्ठांनी योग्य रित्या पार पाडली तर हे सण मानवी जन्माचे सार्थक घडवतील.
धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा