सोमवार, १० सप्टेंबर, २०१८

अहमदनगरच्या 'मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन' तर्फे 'ग्लोबल लाॅरिस्टर' या बहुमानाने धीरज वाटेकर सन्मानित


चिपळूण : समाजाच्या विविध क्षेत्रात तळमळीने विधायक सामाजिक काम करणा-या राज्यातील कार्यकर्त्यांना अहमदनगरच्या 'मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन' चालविणा-या 'पिपल्स हेल्पलाईन' संस्थेच्यावतीने नुकताच 'ग्लोबल लाॅरिस्टर' हा बहुमान जाहिर करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली. यात कोकणात पर्यटन, पर्यावरणविषयक, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २१ वर्षे कार्यरत पत्रकार आणि लेखक धीरज वाटेकर यांनाही हा बहुमान देऊन मानवंदना देण्यात आली.


धीरज वाटेकर यांनी गेली काही वर्षे सातत्याने कोकणात राबविलेल्या विविध सामाजिक, पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन उपक्रमांची दखल घेऊन त्यांना पिपल्स हेल्पलाईन संस्थेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी हा बहुमान देण्यात येऊन मानवंदना देत असल्याचे नुकतेच जाहिर करून  भ्रमणध्वनीवरून त्यांचे अभिनंदनही केले. या मानवंदना सन्मानामध्ये माथाडी कामगारांच्या प्रश्नावर काम करणारे कष्टकरी हमाल पंचायतीचे प्रणेते डाॅ. बाबा आढाव, शोषित महिलांसाठी कार्य करणा-या स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी, शास्त्रीय पद्धतीने नव्या शहरांच्या उभारणीसाठी प्रयत्नशील असलेले आर्किटेक्ट अर्षद शेख, हिरवेबाजार परिवाराचे डाॅ. पोपटराव पवार यांचा समावेश आहे. 

वयाच्या सतराव्या वर्षापासून आजतागायत गेली सतत एकवीस वर्षे धीरज वाटेकर हे विविध सामाजिक कामात कार्यरत आहेत. विविध अभ्यासदौरे, पर्यटन, संशोधन, अभ्यास, जंगल भ्रमण या करिता त्यांनी हिमाचल ते कन्याकुमारी-अंदमान असा भारतभर प्रवास केला असून त्या माध्यमातून देशभरातील पर्यावरण आणि पर्यटन या विषयातील हजारो छायाचित्रांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. पर्यावरण संवर्धन, बिगर मौसमी जंगल पेर अभियान, वृक्ष लागवड, बीज पेरणी अभियान, चंदन लागवड अभियान, रोपवाटिका, पर्यावरण जनजागृती यासारख्या उपक्रमात ते गेली काही वर्षे सक्रीय आहेत. त्यांनी पर्यटन आणि चरित्र लेखन या विषयावरील आठ पुस्तके लिहिली आहेत. संपूर्ण कोकणच्या संशोधित नकाशाची निर्मिती व संपादनही त्यांनी केले आहे. यापूर्वी त्यांना सन २००४ साली भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा "उत्कृष्ट जिल्हा युवा पुरस्कार", पाचव्या लिखीत "ठोसेघर पर्यटन" पुस्तकास "कोल्हापुरच्या चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘नलगे ग्रंथ पुरस्कार', सप्टेंबर २०१६ ला पुण्याच्या माय ‘अर्थ फौंडेशन’तर्फे “पर्यावरण भूषण” पुरस्कार, नोव्हेंबर २०१६ ला अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमेलनात विशेष गौरव आणि यावर्षी ‘विश्व समता कला मंच लोवले-संगमेश्वर’ तर्फे ‘राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार ही प्राप्त झाला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचे प्रमुख राजेंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत तीन वर्षे पर्यावरण आणि शिक्षण विभागात काम केल्यानंतर सन २००९ साली डाॅ. विनीता आपटे यांनी स्थापन केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पुण्याच्या 'तेर पाॅलिसी सेंटर' या स्वयंसेवी संस्थेकडून नुकतेच त्यांना 'प्रकाशाचे बेट' हा पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले. 


ग्लोबल लाॅरिस्टर' या संकल्पनेविषयी बोलताना अॅड. कारभारी गवळी म्हणाले, महात्मा गांधींनी आपले बॅरिस्टर असणे बाजूला ठेवून उन्नत चेतनेने देश वासियांना एकत्र करून स्वातंत्र्याचा लढा जिंकला. आजही आपल्या देशासमोर पर्यावरणासह समाजातील दुबळ्या घटकांचे प्रश्न सोडवून सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायासाठी लढणा-या कार्यकर्त्यांची फळी कार्यरत असून त्यांच्या कार्याला सक्रिय पाठिंबा देण्याच्या हेतूने अहमदनगरच्या हुतात्मा स्मारकात 'ग्लोबल लाॅरिस्टर' बहुमान मानवंदना संकल्पना राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या संस्थेचे राज्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या वाटेकर यांनी या क्षेत्रातील मार्गदर्शक व ज्येष्ठ सहकारी संस्थेचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे, चंदनतज्ञ महेंद्र घागरे, विलास महाडिक यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. या मानवंदना कार्यक्रमास विठ्ठल झुरम, श्याम आसावा, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, अजित कुलकर्णी आणि संस्थेशी जोडलेले विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...