शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९

नवागतांना घडविणारा व्रतस्थ पत्रकार !

साधारणत एकवीस वर्षांपूर्वीची, सन १९९८ सालची लिहिलेलं छापून यायला सुरुवात होण्यापूर्वीची घटना. ‘हा प्रवास पुण्याचा की पुण्याचा !’ अशा मथळ्याचा तीन फुलस्केप पानी लिहिलेला लेख घेऊन आम्ही दैनिक सागरच्या कार्यालयात पोहोचलो. सकाळची साधारण अकराची वेळ. कार्यालयातली लगभग नुकतीच सुरु झाली असावी. कोणाशीच ओळख, नीटशी माहिती नसलेल्या आम्ही तो लेख एका टेबलाजवळ वर्तमानपत्र वाचत उभ्या असलेल्या गृहस्थांच्या हातात नेऊन दिला. त्यांनी त्यावरून नजर फिरवली मात्र, पुढच्या काही क्षणात, काही कळायच्या आतच तो लेख आमच्या दिशेने भिरकावला गेला. आमच्यासारख्या नवागतांना घडवू पाहणाऱ्या व्रतस्थ भालचंद्र दिवाडकर साहेबांची आणि आमची ती पहिली भेट !
अखिल भारतातील तालुका (चिपळूण) स्तरावरून सर्वप्रथम प्रसिद्ध होण्याचा मान मिळविणाऱ्या दैनिक सागरचे कार्यकारी संपादक, ‘संदर्भकोष’ अशी ओळख असलेले भालचंद्र दिवाडकर साहेब गेले (१६ फेब्रुवारी) ! आणि गेली अनेक वर्षे मनात कुठलाश्या कोपऱ्यात घर करून बसलेला वरील प्रसंग अचानक आठवला. तो व्यक्त होण्यासाठी मनातल्या मनात झुंजू लागला. व्यक्त व्हावं की होऊ नये ? या विचारात आठवडा निघून गेला. गेली अनेक वर्षे निव्वळ नाना (दैनिक सागरचे संपादक, कोकणचे बुद्धिवैभव निशिकांत जोशी) आणि दिवाडकर साहेबांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनासाठी आम्ही अधाशासारखा सागर वाचत आलो आहोत. लेखन संस्कार गिरवण्यासाठी, कोकणच्या प्रश्नांची समूळ जाण होण्यासाठी ते आवश्यकच होते. आता या दोघांच्या लेखनापासून आमच्यासारखे अनेक लिहिते तरुण पोरके झाले आहेत. आम्हाला पहिली वृत्तपत्रीय प्रसिद्धी दिनांक ७ सप्टेंबर १९९८ ला दैनिक सागरनेच दिली. सागरमध्ये लिहूनही प्रत्यक्ष पत्रकारिता करण्याचा योग काही आला नाही. लेखन संस्कारासाठी मात्र सागर कायम महत्त्वाचा राहिला. ज्यांना ‘सागर’ने शब्दशः घडविले अशा पत्रकारांच्या सान्निध्यात आमच्या पत्रकारितेचा प्रारंभ झाला आहे. गेल्या एकवीस वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. नानांपाठोपाठ दिवाडकरांच्या लेखनातील अनेक मुद्दे संदर्भ म्हणून जसजसे स्वीकारत गेलो तसतशी दिवाडकर साहेबांविषयी एक निश्चित भूमिका आमच्या मनात तयार होत गेली. गेल्या आठ-दहा वर्षांच्या कालखंडातील स्वर्गीय नानांसोबतच्या आमच्या गप्पांचं दिवाडकर साहेबांना विशेष कौतुक वाटत राहिलं आहे.
दिवाडकर साहेबांच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेबाबत आम्हाला चिपळूण पर्यटन चळवळीतील आमचे ज्येष्ठ सहकारी संजीव अणेराव यांच्याकडून कळले होते. ब्रेनट्युमरच्या आजारामुळे ते त्रस्त होते. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र तेव्हा ‘ते बरे होत आहेत’ अशी माहिती होती, आणि नंतर अचानक ते गेल्याची बातमी आली. मनात कालवाकालव झाली. १७ फेब्रुवारीला सकाळी दैनिक सागरमध्ये जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. भालचंद्र दिवाडकर गेली ४५ वर्षे एकाच दैनिकात कार्यरत राहिले. ही आजघडीला अशक्यप्राय वाटणारी गोष्ट त्यांच्या आणि नानांच्या संबंधांची जाणीव करून देण्यास पुरेशी आहे. गुहागर तालुक्यातील पेवे या गावातून शिक्षणाच्या निमित्ताने ते चिपळूण शहरात आले. सन १९७४ साली नानांना भेटून, ‘मला लिहायची आवड आहे. मी सागरासाठी लिहू का ?’ असे विचारत पुढे ते सागरची ‘पडछाया’ बनले. पुरोगामी डाव्या विचारसरणीचा वारसा त्यांना त्यांचे मामा मधुकर शेट्ये यांच्याकडून मिळालेला होता. आपल्या लेखनात त्यांनी तो कसोशीने जपला. मराठीसह हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती भाषांवरचे त्यांचे प्रभुत्व, वृत्तपत्रीय जगतातील बदलांना स्वीकारून, स्वतःचे लेखन स्वतः टाईप करून देण्यातला त्यांचा साठीतला उत्साह जबरदस्त होता. त्यांच्या फिलॉसॉफीकल लेखांनी, अग्रलेखांनी काळ गाजवला. अनेक विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. ‘एनरॉनची अंधारयात्रा’ या एनरॉन प्रकल्पाविषयी परखड विश्लेषण करणाऱ्या पुस्तकासह मुलांसाठीची वैज्ञानिक विषयावरची आणि इतर अशी त्यांची एकूण सात पुस्तकं प्रसिद्ध झाली. तर्कशुद्ध विचार आणि बुद्धिनिष्ठ प्रतिपादन करणारे दिवाडकर साहेब चौफेर वाचन, व्यासंगी वृत्ती, कोकणच्या मातीशी बांधिलकी सांगणाऱ्या शैलीदार लेखनासाठी प्रसिद्ध होते. पत्नी व मुलीच्या निधनाने वैयक्तिक आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळूनसुद्धा ते जिद्दीने उभे होते. ‘कोकण विकासाची दिशा’ हा विषय तर आम्ही त्यांच्या आणि नानांच्या लेखनातूनच अभ्यासला. दहशतवाद, विविध भागातील राजकारणाचा अभ्यास शोधपत्रकारितेसाठी त्यांनी देशभर प्रवास केला. हजारो लेख लिहिले. पत्रकारितेतील अनेक आव्हाने त्यांनी लिलया पेलली.
तर, एकवीस वर्षांपूर्वीची घटना घडली तेव्हा आम्ही रत्नागिरीला शासकीय तंत्रनिकेतनात शिक्षण घेत होतो. सन १९९८ च्या सप्टेंबर महिन्यात १८ ते २० तारखांना होऊ घातलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ‘प्रतिभा संगम’ या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या नियोजन बैठकीसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा प्रमुख म्हणून आम्ही पहिल्यांदाच रत्नागिरीहून पुणे शहराचा प्रवास केला. ही घटना जुलै-ऑगस्ट १९९८ मध्ये केव्हातरी घडली. या प्रवासाचा, तिथल्या बैठकीचा, वातावरणाचा आमच्या मनावर एवढा जबरदस्त परिणाम झाला की परततनाच आम्ही या संपूर्ण संमेलनाबाबत तीन लेख लिहायचे नियोजन करूनच घरी, चिपळूणला परतलो होतो. त्यातला ‘हा प्रवास पुण्याचा की पुण्याचा !’ लिहिलेला हा पहिला लेख काही क्षणात, काही कळायच्या आतच व्रतस्थ भालचंद्र दिवाडकर साहेबांनी आमच्या दिशेने फेकला होता. तेव्हा त्यांच्या तोंडचे वाक्य होते, ‘दिवसातून तीन वेळा एस.टी. गाड्या पुण्याला जाऊन परत येतात. त्या प्रवासावर लेख काय लिहायचा ?’ अभाविकपणे कानावर आदळलेल्या त्यांच्या या वाक्याने आम्ही अक्षरशः थरथरलो होतो. आज आम्ही म्हणू त्या किंवा सुचविणारा सांगेल त्या विषयवर लेख होतो. पण तेव्हा ‘त्या’ लेखाची पाने गोळा करून आम्ही परतलो होतो. अठरा वर्षांचे होतो. अजून एकही लेख कोठेही प्रसिद्ध झालेला नव्हता. काही दिवस विचारात गेले. पुन्हा धाडस करून आम्ही त्या साहित्य संमेलनाचे महत्त्व प्रतिपादित करणारा ‘प्रतिभा संगम’ का ? व कशासाठी ?’ हा दुसरा लेख लिहिला. तो मात्र ७ सप्टेंबर १९९८ ला छापला गेला. त्यावेळी झालेला आनंद पहिल्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर कसा होता ? ते शब्दात सांगता येणार नाही. दिवाडकर साहेबांसोबतची ‘ती’ पहिली भेट आम्हाला ‘बाळकडू’ देणारी ठरली. तो ‘हा प्रवास पुण्याचा की पुण्याचा !’ हा अप्रकाशित लेख आजही आमच्या संग्रही आहे.
बाळकडू (शास्त्रीय नाव हेलेबोरस नायगर) हे एक बहुवर्षायू, सदाहरित सपुष्प विषारी झुडूप आहे. दक्षिण व मध्य यूरोप, पश्चिम आशिया आणि भारतातील डोंगराळ भागात ते वाढते. लहान मुलांना ठराविक काळाने उद्‌भवणाऱ्या रोगलक्षणांचा (उदा. ताप) प्रतिबंध करण्यासाठी याचा रस योग्य प्रमाणात देतात. त्याची फुले कुळातील नसली तरी रानटी गुलाबाप्रमाणे दिसतात. दिवाडकरांचा आमचा वरील अनुभव हा वरून अत्यंत काटेरी वाटला तरीही तो टवटवीत गुलाबासारखा, प्रसन्न मनाने आम्ही स्वीकारला होता. असे नक्की का घडले असेलं ? अशा स्वाभाविक प्रतिक्रियेमागची दिवाडकर साहेबांची नेमकी भुमिका काय असेल ? या वागण्यातून त्यांना नक्की काय सुचवायचे असेल ? असे प्रश्न स्वतःला विचारून घेत, अनेक अंगांनी आम्ही त्या घटनेचा विचार केला. त्यानंतर पुढच्याच महिन्यात वरती म्हटल्याप्रमाणे आम्हाला पहिली वृत्तपत्रीय प्रसिद्धी दैनिक सागरने दिली. अलिकडच्या काही वर्षांत एखाद्या छानश्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित असल्याबाबतची माहिती मिळाल्यावर फोन करून वृत्तांत मागवून घेणारे, चिपळूणात संपन्न झालेल्या जलसाहित्य आणि बोलीभाषा संमेलनांचे महत्त्व एका वेगळ्या पद्धतीने समजावून सांगत, विस्तृत वृत्तांत लिहायला लावून ‘रसिक’ पुरवणीत पानभर छापणारे, याच संमेलनात राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांचे झालेले अभ्यासपूर्ण भाषण शक्य तेवढे विस्तृत मागवून छापणारे दिवाडकर साहेब अलिकडच्या प्रत्येक भेटीत नानांप्रमाणे काहीतरी नवीन, सकस, दर्जेदार देऊन जायचे. आमचा तो काही मिनिटांचा वेळ सत्कारणी कसा लागेल ? याचीच जणू ते काळजी घ्यायचे. दैनिक सागरचा वेब माध्यमात तितका जम बसला नाही. याची खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवायची. म्हणूनच की काय दिवाडकर साहेबांनी ‘कोकण अॅलर्ट’ नावाचे संकेतस्थळ स्वत: सुरु केले होते. त्यावर आमचे काही लेखही, त्यांच्या मेलवर पोहोचल्यानंतर काही तासात प्रसिद्ध झाले होते. मागाहून ते लेख सागरमध्ये प्रसिद्ध झाले. हे सारे पाहिल्यावर आम्हाला, वयाच्या अठराव्या वर्षी पचवलेल्या त्या एकवीस वर्षांपूर्वीच्या ‘बाळकडू’ प्रसंगाची आठवण व्हायची. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्या घटनेनंतर ज्या ‘स्थितप्रज्ञ’ वृत्तीने आम्ही लिहित राहिलो त्याबाबत आमचे आम्हालाच आश्चर्य वाटायचे. दिवाडकर साहेबांना नंतर तो प्रसंग लक्षातही राहिला नसावा !
दुर्दैवाने नानांप्रमाणेच दिवाडकर साहेबांचेही अनेक संकल्पित पुस्तकांचे लेखन राहिले. दैनिक सागर हे नुसते वृत्तपत्र नसून ते कोकणचे सांस्कृतिक प्रतिबिंब आहे. कोकणातील अगण्य लिहित्या हातांचे, ‘सागर’ विद्यापीठ राहिले आहे. अनेकांप्रमाणे स्वर्गीय नाना आणि दिवाडकर साहेबांच्या सावलीत आम्ही लिहिते झालो हे आमचे भाग्य ! पण हा सागर नावाचा संस्कार आमच्या पुढच्या पिढीवर त्याच ताकदीने व्हायला हवायं. नाना गेल्यानंतरच्या पहिल्या भेटीत सागरसाठी साप्ताहिक स्तंभलेखन सुरु करण्याबाबतची सूचना दिवाडकर साहेबांनी केली होती. पण ते जमले नाही. अगदी हल्ली-हल्ली आदरणीय शुभदा जोशी मॅडम यांनीही सागरकरिता रोज एखादी ‘फोटोस्टोरी’ सुरु करण्याबाबत सुचविले होते, दुर्दैवाने तेही जमलेले नाही. लेखनाच्या प्रारंभिक दिवसातील सोबती म्हणूनही असेल कदाचित, पण आजही सागरसाठी आमचा जीव हळवा होतो. म्हणूनच नानांच्या, दिवाडकर साहेबांच्या आठवणी मनात जपत, सागरसाठी शक्य तेवढं लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो.

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८, ई-मेल : dheerajwatekar@gmail.com    

http://www.mulshidinank.com/2019/03/blog-post_4.html



सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९

नाथभूषण आर. आर. भंडारे : मनाला चटका लावणारी एक्झिट !


चालू महिन्याच्या पहिल्या रविवारी (३ फेब्रुवारी) अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाने ‘नाथभूषण’ या महासंघाच्या सर्वोच्च मानाच्या पुरस्काराने समारंभपूर्वक गौरविलेल्या खेड-भरणे येथील रामचंद्र रक्कमनाथ तथा आबा भंडारे यांचे अवघ्या आठच दिवसात गेल्या रविवारी (१० फेब्रुवारी) दु:खद निधन झाले. गेली अनेक वर्षे प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहात समाजाच्या विकासासाठी योगदान देणारे नाथपंथी समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या रामचंद्र रक्कमनाथ तथा आर. आर. भंडारे यांची ही अचानकची एक्झिट संवेदनशील मन असलेल्या अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे.

मृत्यूने चोरपावलांनी येवून आकस्मिकपणे माणसांचे जीवन संपवणे ही विसाव्या शतकातील आधुनिक वैद्यकशास्त्रापूर्वीची नेहमीचीच घटना होती. मात्र वैद्यकीय प्रगतीमुळे मानवी आयुष्य वधारले आहे. तरीसुद्धा मानवाला कुठे ? कधी ? कसे ? मरण येणार ? हे सांगणे कठीण आहे. गेल्या शंभर वर्षात मृत्यूची गणिते पूर्णपणे बदललेली आहेत. या साऱ्या कागदी अभ्यासाच्या पलिकडचा विचार करायला भाग पाडणारे असे आबांचे जाणे घडले आहे. आबांसारखी, जीवनातील प्रत्येक पायरीवर आपली कर्तव्ये पार पाडत, जीवनाचा उद्देश समजून घेत थोडेसे अंतर्मुख होऊन जगणारी माणसे आपल्यातून निघून गेल्यानंतर त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण होत असली तरी त्यांच्या स्मृती अनेकांच्या हृदयांतरी कायम राहतील असेच त्यांचे जगणे होते. जन्माला आलेला प्रत्येक जीव तसा हळूहळू आपल्या शेवटाकडे प्रयाण करीत असतो. हा प्रवास अखंड सुरु असतो. त्याचा शेवट शांत आणि समाधानाने व्हावा असे आपल्याला कितीही वाटत असले तरीही प्रत्येकाच्या बाबतीत तसे घडतेच असे नाही, या मागची कारणमीमांसा हजारो वर्षांपूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीने केलेली आहे. परवाच्या रविवारी (१० फेब्रुवारी) चिपळूण-नवीमुंबई-चिपळूण प्रवासात, दिवसभर ड्रायव्हिंग करत असताना सायंकाळी चारसव्वाचारच्या सुमारास एका निवांत क्षणी वॉट्सअप पाहताना अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या ‘प्रवक्ता’ ग्रुपवर प्रवक्ते विश्वनाथ डवरी यांनी दुपारी २.२५ वाजता टाकलेली पोस्ट वाचून मन कातरले. ती पोस्ट आबांची प्रकृती बिघडल्याची जाणीव करून देण्याबाबतची होती. गेल्याच रविवारी (३ फेब्रुवारी) बरोबर याचवेळी आबा, ‘नाथभूषण’ हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आ. संजय कदम आणि नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत सत्काराला उत्तर देत होते. ‘या पुरस्कारामुळे आपण कृतार्थ झालो आहोत. ज्या समाजासाठी झटलो. त्यांनी आपले प्रेम या पुरस्काराच्या रूपाने परत दिले त्यामुळे आता कोणतीही इच्छा शिल्लक राहिलेली नाही’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. या कार्यक्रमानंतर आबांचे ज्येष्ठ चिरंजीव संदीप यांच्या आग्रहाखातर घरी आम्ही जाऊन चहापान घेतले होते. आबांची तेव्हाही भेट झाली होती. तशी तब्बेत ठीक नव्हती. आबा झोपूनच होते. हे सारे आठवले. तातडीने चार वाजून एकोणीस मिनिटांनी संदीपना फोन लावला. फोनवर ‘आबा गेले !’ एवढंच काय ते ऐकू आलं. बाकी संदीप यांच्या रडण्याचा आवाज कानात येत राहिला. २७ सेकंदांनी फोन बंद झाला. क्षणभर काय करावे ? हेच समजेना. विज्ञानयुगातील हा ‘भ्रमणध्वनी’ आपल्याला कोणत्या क्षणांना सामोरे जायला लावेल याची जाणीव करून देणारा तो क्षण होता. माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. संदीपचे शब्द पुनःपुन्हा कानात आठवून चार वाजून अडतीस मिनिटांनी आम्ही वॉट्सअपवरून घडलेली घटना इतरांना कळविली, इतक्या लवकर कळवणे योग्य होते की अयोग्य ? याबाबतही नंतर आमच्या मनात द्वंद्व राहिले. नंतरच्या वृत्तात आबांच्या जाण्याची वेळ सायंकाळी ४.२० अशी नोंदवलेली होती.  

समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी, विधानभवनात साप आणि माकड सोडणारे नेते अशीही त्यांची ओळख होती. भंडारे, यांना अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाने राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयाजी नाथ यांच्या सहीने दिलेले प्रवक्ता विश्वनाथ भंडारी यांनी लिहिलेले मानपत्र त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आजच्या पिढीस ओळख करून देण्यास पुरेसे आहे. त्यातील वर्णनानुसार, नाथ संप्रदायासारख्या महत्त्वपूर्ण पवित्र अशा समाजात आपला जन्म दिनांक ऑगस्ट १९४६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रामचंद्र रक्कमनाथ भंडारे असे नाव आपण धारण केले. परिस्थितीशी टक्कर देत आपले बालपण गेले. मंत्रालयासारख्या मोठ्या ठिकाणी आपण शासनाची सेवा केलीत. ही सेवा प्रामाणिकपणे करत असतानाच आपला नाथ समाज सुद्धा आपण विसरला नाहीत. मंत्रालयात डेस्क ऑफिसर, रेकॉर्ड इन्चार्ज आपण होता आणि इंडस्ट्री हे खाते आपणाकडे होते. मंत्रालयात संपूर्ण राज्यातून लोक येत असतात; त्या दृष्टीने आपण येणाऱ्या समाजाच्या लोकांना भेटून त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात. एक नव्हे- दोन नव्हे -तर तब्बल पंचवीस वर्षे महाराष्ट्र नाथजोगी सेवा समाज मुंबई, या संस्थेचे आपण सचिव म्हणून काम केले आहे. विमुक्त भटक्या जमातीचे आपण सन्माननीय सदस्य सुद्धा होता. लक्ष्मण माने, मच्छिंद्र भोसले, बाबुराव चव्हाण आदी मान्यवरांच्या बरोबर आपण समाज एक करण्याचा प्रयत्न केला. अनेक मेळावे घेतलेत. त्यापैकी १९८७ ला अखिल महाराष्ट्र नाथजोगी समाजाचा महामेळावा आपण खेड या ठिकाणी घेतला होतात. मंत्रालयामध्ये आपण समाज कल्याण सल्लागार बोर्डावर सुद्धा होता. ज्येष्ठ नेते डॉक्टर जयाजी नाथ व डॉक्टर गोरखनाथ चव्हाण यांना आपण स्वतः संस्थेमध्ये घेतले होते व त्यांना मार्गदर्शनही केले होते. यावेळी संस्थेच्या इतर काही लोकांनी 'हे आपल्या जातीचे नाहीत' अशा प्रकारे विरोध केला होता; परंतु अशा प्रकारच्या बारीक-सारीक अडथळ्यांना लिलया पार करण्याचे कसब तुमच्याकडे होते. आपण अनेक वधू-वर मेळावे सुद्धा घेतले. अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. आपण अनेक मोर्चे घेतले, त्यामध्ये पुंगीवाले, सापवाले, नंदीबैलवाले, माकडवाले यांना घेऊनही आपण मोर्चे काढलेले आहेत. आपण विधान भवनावर काढलेल्या मोर्चाला मंत्री भेटायला येत नाहीत या रागातून आपण विधानभवनामध्ये साप आणि माकडे सोडली होती !! त्यामुळे गहजब झाला होता !! भारताची राजधानी दिल्ली येथे सुद्धा आपण एन. डी. सोनवणे संरक्षक यांच्या बरोबर मोर्चा काढून धडक दिली होती. नागपूर येथे काढलेल्या मोर्चा मध्ये सुद्धा आपले नेतृत्व सिद्ध झाले होते. वयाची कोणतीही तमा न बाळगता व शरीर प्रकृतीकडे लक्ष न देता आपण आज सुद्धा कोकणामधील गोरगरीब नाथ जोगी समाजाचे काम करीत आहात. आपण वयाने सुद्धा आता ज्येष्ठ असून, अनुभवाने परिपक्व आहात. या वयातही आपण मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहात, ही कौतुकाची व अभिमानाची अशी बाब आहे. नाथ जोगी समाजाचे चरित्रकार म्हणून इतिहास तुमच्याकडे पाहिल आणि संघटनेचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा इतिहास तुम्हाला टाळून पुढे जाऊ शकणार नाही !! पुढील आयुष्यात तुमची तब्येत चांगली राहावी व तुमची शंभरी पूर्ण व्हावी, अशी परमेश्वराकडे या सन्मानपत्राच्या निमित्ताने प्रार्थना करुन आपण केलेल्या कार्याचा गौरव म्हणून, आपला अधिकार मान्य करून अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या हातात असलेला सर्वोच्च  "नाथ भूषण" हा पुरस्कार आपणाला सन्मानपूर्वक व कृतज्ञतापूर्वक अर्पण करण्यात येत आहे !! या मानपत्रासहच्या सत्कारानंतर अवघ्या आठच दिवसात आबांची प्राणज्योत मालवली.

आत्तापर्यंत जगलेल्या एकोणचाळीस वर्षांपैकी तेवीस वर्षांच्या सक्रीय सामाजिक आयुष्यात, स्वतःच्या समाजात वावरण्याचा अत्यंत कमी संबंध आलेल्या माझ्यासारख्याला अखिल भारतीय नाथपंथी महासंघाने गेल्या रविवारी (३ फेब्रुवारी २०१९) नाथभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने 'कोकण आणि नाथपंथ' या विषयावर बोलण्यासाठी निमंत्रित केले होते. याच कार्यक्रमात आबांशी झालेली माझी ती पहिली भेट दुर्दैवाने शेवटची ठरली. जन्म आणि मृत्यू या आपल्या नियंत्रणापलिकडील मानवी जीवनातील अटळ घटना आहेत. दरम्यानच्या आयुष्याची समीकरणेही इतकी साधी नसतात. आयुष्यातील शेवट गोड व्हावाही इच्छाही प्रत्येकाच्या अंतरी असते. पण तसे भाग्य सर्वांनाच लाभते असे नाही. असे विलक्षण भाग्य लाभलेले, आम्ही पाहिलेले व्यक्तिमत्त्व म्हणून आमच्या मनात आर. आर. भंडारे यांची सदैव नोंद राहील.

धीरज वाटेकर

दैनिक उद्याचा मराठवाडा (नांदेड) दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ 

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...