सन १९८० च्या दशकात, पेढांब्याच्या ‘परशुराम सहकारी साखर कारखान्यात तयार झालेल्या ‘खांडसरी’ साखरेच्या पहिल्या पोत्याला लिलावात खरेदी करून प्रेमराज मित्तल यांनी हे पोतं पेढांबे साखर कारखान्यातून मिरवणुकीने वाजतगाजत अलोरेतील आपल्या ‘दिल्ली स्टोअर्स’ या दुकानात आणलं होतं.
विद्यार्थ्यांमध्ये
संशोधनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी, या उद्देशाने
केंद्र सरकारच्या नीती आयोगातर्फे ‘अटल इनोव्हेशन मिशन’ अंतर्गत देशभरात निवडक
शाळांमध्ये सुरु होत असलेली ‘अटल टिकरिंग लॅब’ आजपासून अलोरे (ता. चिपळूण) येथील
मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला व वाणिज्य
कनिष्ठ महाविद्यालय अलोरे येथे सुरु होते आहे. शाळेच्या इतिहासातील या एका
महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी सन १९८४ बॅचचे माजी विद्यार्थी आणि नवी
दिल्ली येथील ‘भारत पॉलिमर्स’ कारखान्याचे डायरेक्टर संजयकुमार प्रेमराज मित्तल आज
(१० फेब्रुवारी) अलोरेत येत आहेत. सन १९६९ ते २००० पर्यंत अलोरेतील कोयना
प्रकल्पीय जडणघडणीचे साक्षीदार राहिलेल्या प्रेमराज मित्तल यांच्या ‘दिल्ली
स्टोअर्स’च्या पन्नास वर्षपूर्व आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळणार आहे.
संजयकुमार यांचे
वडील, प्रेमराज चंदनालाल मित्तल यांचे मूळगाव हरयाणा राज्यातील सोनीपथ जिल्ह्यातील रथधाना ! सन १९६४ च्या दरम्यान
उद्योग-व्यापाराच्या निमित्ताने प्रेमराज हे देहूगाव (पुणे) येथे आले. महाराष्ट्रातील
कोयना जलविद्युत प्रकल्प तेव्हा आकाराला येत होता. सन १९६८ साली ते पोफळीला आले.
तिथे त्यांनी काही काळ किराणा दुकान चालविले. तेव्हा अलोरे, कोळकेवाडी परिसरात
प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु झालेले होते. सन १९६९ साली त्यांनी कोयना
जलविद्युत प्रकल्पातील अलोरे, भराडे येथे दुकाने सुरु केली. त्यांचे दुकान म्हणजे किराणा,
हार्डवेअर, स्टेशनरी, कटलरी, मेडिसिन, फर्निचर आदि प्रकारच्या एकत्रित वस्तू
मिळण्याचे आजच्या काळातील ‘मॉल’ होते. अर्थात ते अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर
पोहोचले. कालांतराने कोयना प्रकल्पाचा तिसरा टप्पा संपला आणि अलोरे पंचक्रोशीत शुकशुकाट
पसरला. अशा परिस्थितीत फारसे विचलित न होता स्थिरावलेल्या प्रेमराज यांनी अलोरेत
आपला व्यवसाय सुरु ठेवला. पुढे कोयना प्रकल्पात चौथ्या टप्प्याचे काम सुरु झाले.
अलोरे, कोळकेवाडी येथे अधिकारी, कर्मचारी, कामगार वर्ग वाढू लागला. त्यामुळे वसाहत
वाढली. व्यापार वधारला. ‘दिल्ली स्टोअर्स’ पुन्हा एकदा झळाळून निघाले. त्या काळात अलोरेत
वावरलेल्या अनेकांच्या हृदयात ‘दिल्ली स्टोअर्स’च्या आठवणींचा एक कप्पा नक्की आहे.
पन्नास वर्षांपूर्वी बाहेरून इथे आलेल्या अशा व्यापाऱ्यांना, स्थानिक व्यापारी कै.
नारायणशेठ खेतले, कै. अरविंदशेठ कोलगे, कै. शंकरराव पालांडे, श्री. राजाराम
पालांडे आदिंनी सहकार्याचा हात देऊ केला होता. मित्तल परिवारात आजही ही नावे
आदराने घेतली जातात ती त्याचमुळे. अलोरेत त्याकाळी सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या
प्रमाणावर साजरा व्हायचा. इथल्या शाळेचे मुख्याध्यापक आगवेकर सर स्वतः वर्गणी गोळा
करण्यासाठी मार्केटमध्ये फिरायचे. प्रेमराजशेठ यांच्यासारखी असंख्य दानशूर मंडळी
सढळ हस्ते मदत करायची.
पेढांब्याच्या
उजाड माळरानावर सन १९८० च्या दशकात, राजाराम शिंदे यांच्या प्रयत्नाने ‘परशुराम
सहकारी साखर कारखाना’ सुरु झाला. कारखान्यात तयार झालेल्या ‘खांडसरी’ साखरेच्या
पहिल्या पोत्याला लिलावात ४ रुपये ७० पैसे असा भाव मिळाला. लिलाव बोली करून प्रेमराज
मित्तल यांनी हे पोतं साखर कारखान्यातून मिरवणुकीने वाजतगाजत आपल्या दुकानात आणलं
होतं. तिथे एक किलो साखरेची विधिवत पूजा करून विक्रीचा शुभारंभ केला होता.
अलोरे
पंचक्रोशीतील कोणीही कितीही वाजता मदतीसाठी या परिवाराला हाक मारली तर ती तत्काळ
मिळायची. सचोटीनं व्यापार करणं, समाजाच्या हितासाठी सदैव तत्पर असणं, दानशूरता,
सहृदयता या गुणांमुळे चौथ्या टप्प्यातील अधिकारी यांचंही मन या मंडळीनी जिंकलं
होतं. सन २००० नंतर चौथ्या टप्यातील काम संपल्यानंतर अलोरेतील वर्दळ पुन्हा कमी
होऊ लागली. सन १९८७ ला संजय यांनी पुण्याला फार्मसीची डिप्लोमा पूर्ण केला. सन
१९९० ला संजय दिल्लीला स्थलांतरित झाले. पाठोपाठ सन २००० साली संपूर्ण मित्तल
परिवार आपल्या मूळगावी परतला. संजय यांच्यासह देवकीनंदन, डॉ. धनराज, मीरा, प्रदीप,
बीना या त्यांच्या सर्व भावंडांचे शिक्षण अलोरेच्या शाळेत झाले आहे. त्यांचे
शाळेशी आणि गावाशी विशेष ऋणानुबंध आहेत. अलोरेतील प्रसिद्ध श्रीशंकर मंदिरावरील
श्रद्धेपोटी कुटुंबातील सदस्य श्रावण महिन्यात अलोरेत येत असतात. गतकाळात अलोरेत
उभारी घेतलेला हा परिवार आज देशाच्या राजधानीत स्थिरस्थावर झाला आहे. संजयकुमार हे
परिवारातील उद्योगांची धुरा समर्थपणे सांभाळून आहेत. ‘भारत पॉलिमर्स’ मधून ते
प्रिंटेड पॅकिंग मटेरियल आणि प्रिंटेड पेपर बॅग यांची निर्मिती करतात. गतवर्षी (२४
जानेवारी २०१९) या परिवाराचे आधारवड आणि ‘दिल्ली स्टोअर्स’ची उभारणी करून ती
वाढविणाऱ्या प्रेमजीभाई यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या
मार्गदर्शनानुसार त्यांचे कार्य पुढे सुरु ठेवणाऱ्या पिढीचे प्रतिनिधी संजय हे शाळेच्या
‘अटल टिकरिंग लॅब’च्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज अलोरेत येत आहेत. ही स्वागतार्ह
बाब आहे.
विद्यार्थ्यांनी
आपल्या आवडीच्या क्षेत्रात कल्पकता वापरून नवीन संशोधन करावे यासाठी ‘अटल टिकरिंग
लॅब’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच नवनिर्मिती करण्याची संधी
मिळणार आहे. विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला चालना व प्रोत्साहन मिळाले तर भविष्यात
उद्योजक, शास्त्रज्ञ तसेच नवनिर्मिती करणारे चांगले व्यावसायिक घडू शकतात. यावर विश्वास
असल्याने हा प्रकल्प सुरु होत आहे. आजच्या कार्यक्रमातील संजयकुमार प्रेमराज
मित्तल यांच्या उपस्थितीने अलोरेतील कोयना प्रकल्पीय जडणघडणीचे साक्षीदार
राहिलेल्या ‘दिल्ली स्टोअर्स’ या प्रसिद्ध दुकानाच्या आठवणींना उजाळा मिळणार
आहे.
धीरज वाटेकर
संजयकुमार मित्तल |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा