देशभरातील श्रीशिव मंदिरात नुकत्याच (दिनांक २१
फेब्रुवारी २०२०) संपन्न झालेल्या महाशिवरात्रोत्सवाच्या
निमित्ताने यंदा अचानक योगावर सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील श्रीक्षेत्र
माचणूरला पोहोचलो. पूर्वी कधीतरी महाराष्ट्राचा शिवकालीन इतिहास वाचताना माचणूर भेटलेलं
! ते मनात घर करून होतचं. महाशिवरात्रोत्सवाच्या निमित्ताने माचणूर जायचं निश्चित
झाल्यावर गाव नीटसं समजून घेतलं. दरवर्षी माघ महिन्यात चंद्र मावळण्याच्या
टप्प्यावर (कृष्णपक्ष त्रयोदशी) महाशिवरात्रीपासून पाच दिवस येथे हेमाडपंती
श्रीसिद्धेश्वर मंदिरात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोव्यातून आलेल्या जवळपास
लाख-दीड भाविकांच्या उपस्थितीत भव्य यात्रोत्सवात अध्यात्मिकता आणि निसर्गाचा संगम
अनुभवता येतो. उत्सवादरम्यान दृष्टीस पडलेलं संस्मरणीय माचणूर गाव अनेक अर्थांनी
मुद्दामहून पाहण्यासारखं असल्याचं जाणवलं. त्याचा आढावा...!
नुकतीच शिवजयंती संपन्न झालेली. सोलापूर जिल्ह्यात
प्रवेश होताच रस्त्यात
ठिकठिकाणी दिसणारे भगवे झेंडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजलेल्या मूर्ती, पळस फुलवून निसर्गाने केलेली केशरी रंगाची अधिकची उधळण मनाचा ठाव घेऊ लागली. दूरवर पसरलेली काळी जमीन
हे या मंगळवेढा भागाचे वैशिष्ट्य. महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध
असलेलं मंगळवेढा ! माचणूर गाव सोलापूरपासून ४३ कि.मी. तर मंगळवेढापासून १४ कि.मी.,
पंढरपूरपासून २१ कि.मी. अंतरावर आहे. प्रवासात ठिकठिकाणी रस्त्याच्या शेजारी असलेले बैल-म्हशींचे गोठे, सरळ छप्पराची घरं, चिंचेच्या
झाडांच्या सावल्या, ज्वारीची शेतं, शुगर मिल, धुरळा उडवणाऱ्या रस्त्यांवरची रताळ्यांची दुकानं बघतबघत सकाळी ११च्या सुमारास माचणूरला पोहोचलो.
पंढरपूर-मंगळवेढा-सोलापूर मार्गावर असलेल्या माचणूरात पोहोचल्यावर मुख्य
रस्त्याच्या उजव्या दिशेस असलेल्या रस्त्यावरील स्वागताच्या कमानीने लक्ष वेधून
घेतलं. गावात पोहोचलो तेव्हा यात्रोत्सवाचं वातावरण हळूहळू आकार घेत होतं.
उत्सवातील जबाबदार घटक, तरुण, बायाबापड्यांच्या रस्त्यावरच्या हालचाली, स्वतःहून
पुढे होऊन अधिकची माहिती देण्याची सहकार्य भावना त्यांच्यातला उत्साह दर्शवित
होती. नेहमीप्रमाणे इथल्याही रस्त्याची दुरवस्था जाणवली. रस्त्यावर खडी आणि धुळीचे
साम्राज्य दिसले. शासकीय नियमानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद
बांधकाम विभाग या दोन व्यवस्थांनी हा रस्ता आपल्या कक्षेत येत नसल्याचे सांगून हात
झटकल्याची वृत्तपत्रीय बातमी वाचनात आली. गंमत वाटली. अशा या कामसू कर्मचाऱ्यांवरील
कामाचा बोजा कमी व्हावा म्हणून महाराष्ट्रात ५ दिवसांचा आठवडा होऊ घातला असावा.
असो !
मुख्य रस्ता सोडून थोडं पुढं गेल्यावर काही
मिनिटातच रस्त्यावरच्या आडव्या बॅरिकेट्सनी आम्हाला थांबवलं. अगदी उजव्या बाजूला
असलेल्या शेतात, यात्रेत आलेल्या दुकानांची गर्दी दिसली. सुरक्षा आणि पार्किंगच्या
कारणास्तव पोलिसांच्या सूचनेनुसार गाडी पार्क केली. परिसरात पोहोचलो असलो तरी मंदिर
अजूनही किंचित दूर होतं. इतक्यात जवळच्या मोठाल्या जंगली वृक्षांकडे लक्ष वेधलं.
या जुन्या वृक्षांवर वाटवाघळांची वसाहत मुक्कामाला असल्याचे दिसले. वटवाघूळ !
उडणारा सस्तन प्राणी. अतिदुर्लक्षित जीव. सकाळची वेळ असल्याने आळसावलेली वाघळं
आरडाओरड करीत जागी होत होती. एखादं-दुसरं वयस्कर वाघूळ थोडंफार उडून परत जागेवर
बसताना दिसलं. या नववर्षारंभी आमच्या घराच्या टेरेसवरही दोन-तीन लहानशी वाटवाघळं
काही दिवस मुक्कामाला होती, त्यांची आठवण झाली. झाडाच्या फांद्यांना एखादे काळसर
फळ लटकावे तशी वाघळं दिसत होती. न चुकता ही वाघळं रात्रभर निसर्गात बिया लावण्याचे
काम करीत असतात. पिकलेली फळं यांनाच पहिल्यांदा कळतात. आपल्यासारखी चुकीची विदेशी
झाडं ही वाघळं लावत नाहीत, की सेल्फी घेत नाहीत. कॅमेऱ्यात त्यांचे फोटो घेतले.
यात्रोत्सवानजीक पोहोचलेलो. बाहेरच्या रिकाम्या
शेतात जागा मिळेल तिथे अनेकांनी विविधांगी दुकानं थाटलेली. मेवा, मिठाई, हॉटेल, जनरल स्टोअर्स, नारळ, रसपानगृहे, खेळण्यांची
दुकाने, आकाशपाळणे आदिंनी यात्रा परिसर फुलून गेलेला.
यात्रोत्सव पाच दिवसांचा असल्याने इथे मला साबण, टूथपेस्ट आणि किरकोळ
डाळ-भात-भाकरीसाठी लागणाऱ्या किरणा मालाचं दुकानही भेटलं. साबण नि टूथपेस्ट तशी
मला नवीन होती. त्या दुकानदाराजवळ थोडं बोललोही. कोकणातून आलोय म्हटल्यावर
त्याच्या चेहऱ्यावर कमालीची उत्सुकता जाणवली. होणारी गर्दी ओळखून मंगळवेढा,
सोलापूर, सांगोला एस.टी. आगाराने जादा बसेस सोडलेल्या. दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी
स्वतंत्र वाहनतळ व्यवस्था. जोडीला पोलीस आणि कमांडो यांचा बंदोबस्त. मंदिराच्या
दिशेने जाणाऱ्या सरळ रस्त्यावर उजव्या हाताला आणखी एका स्वागत कमानीच्या बाहेर
श्रीसिद्धेश्वर अन्नछत्र चॅरिटेबल ट्रस्ट यांचा स्टॉल दिसला. स्टॉलची जागा मला
आवडली. तिथे थोडी माहिती घेतली. कमानीतून आत गेलो तर समोरच्या दुकानात बेकरीत
मिळणाऱ्या तयार फरसाणमधील सारे घटक पदार्थ वेगवेगळे बसलेले दिसले. यात्रेकरूंच्या मागणीप्रमाणे
ते तागडीत काय ते एकत्र येतजात होते. कायम तयार फरसाण घेणारा मी एकत्र येतानाचे हे
दृश्य पाहात राहिलो. इतक्यात कुठूनतरी कानावर आवाज आला, ‘यात्रेमध्ये आम्ही प्रथमच घेऊन येत आहोत, एटीएम कार्डाचं लेदर पाकीट’ आयडियाच्या कल्पनेनं
दूरवर कोणीतरी पाकिटं विकत होता. आता नजरेसमोर मंदिराचे पहिले प्रवेशद्वार स्पष्ट
दिसत होते. एरव्ही शांत असलेला हा सारा रमणीय आणि पवित्र मंदिर समूह परिसर आज कमालीचा
गजबजलेला होता. पुढचे पाच दिवस असाच राहणार होता. यावर्षी आलेल्या सलग
सुट्ट्यांमुळे अधिक गर्दी जाणवत होती. मंदिरावरील विद्युत रोषणाई नजरेत भरणारी. पहाटे
लवकर आलेली यात्रेकरू, भक्तमंडळी, दुकानदार लोकं, त्यांची लेकरं दर्शन आटोपून जवळच्या
झाडांच्या सावलीला गोल करून न्याहारीला
बसलेली. बहुतेकांच्या ताटात उपवासाचं काहीतरी होतंच.
नाथपंथी श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर यांच्या साधक निवास
इमारतीवर भगवा झेंडा फडकताना दिसला. प्रथमत: नकळत, जवळच
असलेल्या त्यांच्या समाधी मंदिरात पोहोचलो. तिथे उजव्या कोपऱ्यात समईची वात मंद प्रकाश देत जळत होती. भक्तांची येजा सुरू होती. भक्तच असले तरी प्रत्येकाच्या नतमस्तक होण्यात
वेगळेपणा होता. भींतीवर लावलेल्या महितीफलकावर काहींची नजर स्थिरावायची. काही आपले असेच होते. असंख्य महात्म्यांच्या वास्तव्यामुळे
आध्यात्मिकतेने स्पंदित असलेले हे श्रीक्षेत्र माचणूर सर्व पंथाच्या साधकांसाठी
उत्तम साधनाक्षेत्र असल्याचं पूर्वी वाचलेलं होतंच, ते जाणवलं. स्वतःसोबत असलेला दिवा, अगरबत्ती प्रज्ज्वलित
केली. काही काळाकरिता ध्यानाला बसलो. ‘श्रीक्षेत्रमाचणूर’ येथून वाहणारी भीमा
नदी ही तिच्या प्रवाहाच्या चंद्रकोराकृति दर्शनामुळे चंद्रभागा नावाने ओळखली जाते.
या चंद्रभागेच्या नाभीमध्यावर व भूगर्भरेषेवर श्रीक्षेत्र माचणूर आहे. त्याच
कारणाने तपस्येसाठी हे स्थान फार दुर्मीळ ! परमेश्वर, साधुसंत
आदिंचे क्षणभर वास्तव्य लाभलेल्या भूमी ह्या तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जातात.
माचणूराला अशा महासिद्धांचे दीर्घकाळ वास्तव्य लाभलेले तपस्याक्षेत्र आहे.
नीरा-नरसिंहपूरपासून पुढे पंढरपूर, माचणूरपर्यंत पसरलेला भीमाकाठचा परिसर प्राचीन
हरिक्षेत्र म्हणून ओळखला जातो. जगद्गुरू श्रीरेवणसिद्धांशी माचणूरचा संदर्भ जोडला
जातो. यक्षमिथुनांचा उद्धार, विक्रमादित्याला खड्ग प्रदान, बारा हजार कन्यांचे बंध
विमोचन या त्यांच्या लीला माचणूर संदर्भीय असाव्यात. इथल्या ‘सिद्धेश्वर’ नावाचा
आणि त्यांच्या संचाराचा संबंध असल्याने हे देवालय जगद्गुरू श्रीरेवणसिद्धकालीन
असावे. ही भूमी नाथपंथी सिद्धांचे ठाणे म्हणूनही ओळखली जाते. महायोगी
श्रीगोरक्षनाथ, श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ, श्रीकाशिनाथ
महाराज, श्रीशंकर महाराज, श्री बाबामहाराज आर्वीकर यांचे वास्तव्य या भूमीत होते.
हा भाग पूर्वी जंगलमय असावा. श्रीशंकर महाराजांच्या बालपणीच्या श्री स्वामी
समर्थांसोबतच्या कथांत इथल्या जंगलाचा उल्लेख येतो.
श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर यांनाही दीर्घ
तपस्येअंती अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थांनी, ‘माचणूर येथे श्रीसिद्धेश्वर
मंदिराजवळ तुझी कर्मभूमी आहे तेथे जा व कार्य सुरु कर’ असा आदेश दिला होता. सन १९५५
पासून ते माचणूर येथे वास्तव्यास आले. या क्षेत्रात श्रीगोरक्षनाथ यांनी एकवीस
दिवसांचे तपानुष्ठान करून एका गुप्तलिंगाची स्थापना केली होती, असे श्रीबाबामहाराज
सांगत. अधर्माचा नाशकरून धर्मस्थापना करण्यास्तव या ठिकाणी श्रीसिद्धरामांचे आगमन
झाल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या, ‘भूमीभार सारुनी ज्ञानदीप्ती पाजळी| धर्मवीर प्रसवले सिद्धराम ये स्थळी॥’ या काव्यात केला आहे. चंद्राकोराकृती
चंद्रभागेचे विस्तीर्ण वाळवंट असलेल्या माचणूरला पुन:र्प्रकाशात आणून श्रीबाबामहाराज
सन १९७१ साली वयाच्या ४७ व्या वर्षी अनंतात विलीन झाले. शिर्डी संस्थानचे अधिकृत
मासिक ‘श्रीसाईलीला’ च्या एप्रिल १९७२ ला प्रसिद्ध झालेल्या रामनवमी व
सुवर्णमहोत्सव विशेषांकाचे (संपादक : का. सी. पाठक) संपादकीय आर्वीकर
महाराजांच्यावर लिहिलेले आहे. त्यानुसार आर्वी (जि. वर्धा) येथील मोरेश्वर प्रभाकर
जोशी हे बालपणापासून परमार्थाकडे ओढा, लहानपणी गृहत्याग, अज्ञातस्थळी तपाचरण,
देशभ्रमण, स्थितीचे निरीक्षण, लोकसंग्रह, लोकोपादेश, लोकोद्धार या द्वारे जीवनात
तत्कालिन सर्वश्रेष्ठ प्रवचनकार म्हणून गणले गेलेत. हरिहरांच्या मंगल मिलनाचे
वरदान लाभलेल्या माचणूरबाबत श्रीगुरुचरित्र ग्रंथात श्रीनृसिंहसरस्वती यांनी
आपल्या शिष्यांस तीर्थयात्रेस जाण्याची आज्ञा करून विविध तीर्थक्षेत्रांची माहिती
दिली आहे. त्यात माचणूरचा (अध्याय १५. ओवी ५१. हरिहरक्षेत्र महाख्याती |
समस्त दोष परिहरती | तैसीच असे भीमरथी |
दहा गावे तटाकयात्रा ॥५१॥) उल्लेख आहे.
समाधी मंदिरातून मागे वळलो. मुख्य भव्य दगडी प्रवेशद्वारापाशी
आलो. श्रीसिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या स्त्रीया हातात हळद, कुंकू, फुलं घेऊन चाललेल्या. कुणाजवळ एखादी पिशवी, कुणाजवळ लहान मुलं होतं. गर्दी वाढतच होती. माणसं आमंत्रणांनी बोलवावी लागत नव्हती. ती आपोआप येत होती. स्वयंभूपणा म्हणतात तो बहुदा हाच असावा ! खरंतर मला
गर्दीत फारसं भटकायला आवडत नाही। पण आज नियतीने तसाच योग जुळवलेला. पहिल्या
प्रवेशद्वारातून आत येताच मंदिराच्या भव्यतेने लक्ष वेधून घेतलं. पहारेकऱ्यांच्या
दोन देवड्यांनी स्वागत केलं. मंदिराचे प्रवेशद्वार उंचीवर आहे. आत देवड्यांपासून
पायऱ्या उतरून आपल्याला दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचावे लागते. जवळच्या भिंतीत
वीरगळ दिसले. दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी ओवऱ्यांच्या पुढे उतरत्या पायऱ्यांची रचना. डावीकडे हेमाडपंती बांधणीचे श्रीमल्लिकार्जुनाचं मंदिर. उतरत्या
पायऱ्यांशेजारील रचना अशी की आपण सहज ओवाऱ्यांच्या छतावर पोहोचून सारा परिसर
न्याहाळू शकू. छानसे क्लिक
मिळणार या हेतूने पहिल्यांदा उंचीवरून मंदिर आणि भीमा नदीचा परिसर न्याहाळला. संपूर्ण बांधकामात मोठमोठया दगडांचा वापर केलेला आहे. तटबंदी, तटबंदीतील ओवऱ्या आजही ठीकठाक
आहेत. अजूनही मी बाहेरच होतो. पण आतल्या गर्दीची जाणीव उंचावरून झाली. आत स्त्री-पुरुषांच्या
स्वतंत्र रांगा दिसल्या. पोलीस आणि कमांडो अशी चोख व्यवस्था इथेही होतीच. भाविकांच्या रांगा दिवसभर टिकून असतात. नवसापोटी काही भाविक देवाला
लोटांगण घालताना दिसले. यात्रेत चोरी होऊ नये म्हणून साध्या गणवेशातील पुरूष व
महिला पोलीस, हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठीही वेगळा पोलीस कक्ष कार्यरत होता.
दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत आलो. प्रवेशद्वाराजवळ उभे राहिल्यानंतर मंदिराचा संपूर्ण परिसर दिसतो. मंदिराच्या आवारात दिवे, पाने, सुगंधी
फुले आदिंची सजावट केली होती. अन्नदान सुरु होते. या मंदिराच्या आणि तुळजापूर
मंदिराच्या रचनेत साम्य आहे. सोबतच्या सहकाऱ्यांना शोधलं आणि हळूच त्यांच्या कळपात
शिरलो. एव्हाना परिसरात येऊन आम्हाला दीड तास उलटलेला. स्त्रीयांची रांग पुढे सरकू
लागली की पुरुषांची रांग थांबे. पुरुषांची रांग पुढे सरकू लागली की स्त्रीयांची
थांबे. हे नजरेनं हेरलं. अजूनही मंदिरापासून खूप बाहेर असल्याने काय ते कळेना.
त्यात पहिल्यांदाच आलेला. रांगेत चालत राहिलो. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ चार
दीपमाळा दृष्टीस पडल्या. एक दीपमाळ डाव्या बाजूस आणि बाकीच्या तीन उजव्या बाजूस.
सभामंडपाला अठरा स्तंभ असून बरेचसे भिंतीत उभे आहेत. सभामंडपातून थोडेसे आत
गेल्यानंतर गाभाऱ्यात श्रीसिद्धेश्वर महादेवांचे भव्य शिवलिंग आहे. चांदीचा
मुखवटाही आहे. (आम्ही स्वयंभू लिंगाचे दर्शन घेतले.) मंदिर आवारात उजवीकडे
श्रीस्वामी समर्थांनी स्थापन केलेल्या पाषाण दत्तपादुका दिसल्या. मुख्य मंदिराबाहेर पुराण पिंपळ वृक्ष असून भोवताली दगडीपार बांधलेला आहे. तेथे पिंपळपाराच्या सावलीत गायक मस्तान मुल्ला यांच्या भजन, कीर्तन आणि
गौळणीचा संगीतमय कार्यक्रम रंगलेला होता. त्याला टाळसाथ करणाऱ्या सोबतीच्या
हालचाली इतक्या लाजवाब होत्या की अनेक भाविक आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेत होते. पुराणपिंपळाच्या
जवळ असलेल्या मुख्य हेमाडपंती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताच तीन फूट उंचीच्या
रेखीव नंदी, कोनाड्यांची रचना दृष्टीस पडली. मंदिराचं तोंड गंगेकडे (चंद्रभागा-भीमा) आहे. मंदिराची रचना गर्भगृह, सभामंडप, मुखमंडप अशी आहे. आतल्या गणपती बाप्पाच्या रेखीव मूर्तीकडे
पाहून भगवान शिवशंभोसमोर नतमस्तक व्हायची इच्छा अधिक तीव्र झाली. तीव्र झालेली ही
इच्छा अचानक औत्युक्यात बदलली जेव्हा मंदिराच्या गाभाऱ्याचे प्रवेशद्वार दृष्टीस
पडले. गाभाऱ्याचा पहिला दरवाजा साधारण पाच फूट उंचीचा. तर त्यातून आत गेल्यानंतर
भेटणारा दुसरा मुख्य दरवाजा अगदी अडीच फूट उंचीचा. त्यामुळे एकावेळी एकच भाविक
दर्शनाला गाभाऱ्यात जाऊ शकतो. मनुष्य कंबरेत वाकून नव्हे तर नम्र होऊनच श्रीसिद्धेश्वर चरणी जावा अशी व्यवस्था ! मीही तसाच प्रवेश केला. एका अद्भुत शिवलिंगाचे दर्शन घेतले. जवळपास
अडीच तासांच्या रांगानंतर गाभाऱ्यात पोहोचलेलो. स्कंधपुराणानुसार हे दत्तपद
क्षेत्रातील साक्षात भगवान श्रीशंकराचे ह्रदयस्थान आहे. गाभाऱ्यात प्रसन्न
आध्यात्मिक लहरी जाणवल्या. एरव्ही अत्यंत शांत असलेल्या या परिसराच्या स्थितीच्या
विचारानेच मनात प्रसन्नता उतरली. दर्शनाला इतका उशीर का होतो ? नि रांगा मध्येच
शांत का होतात ? याचं उत्तर दरवाजाने दिलं होतं. दर्शन आटोपून बाहेर आलो तेव्हा
दुपारचा दीड वाजलेला.
शिवलिंगाचे दर्शन होऊन बाहेर आल्यावर डाव्या बाजूस
मंदिराच्या तटबंदीला लागून असलेल्या दरवाजातून बाहेर आलो. पन्नासएक प्रशस्त
पायऱ्या उतरून भीमा नदीच्या छान बांधीव दगडी घाटावर पोहोचलो. भाविक दिवा
प्रज्ज्वलित करताना दिसले. घाटाच्या कठड्यावर काही ठिकाणी व्याघ्र प्रतिमा कोरलेल्या आहेत. हा घाट दानशूर राणी अहिल्यादेवी
होळकर यांनी बांधलेला. अर्थात तेव्हापासून हे तीर्थक्षेत्र
निश्चित प्रसिद्ध असणार. समोर नदीपात्रात मध्यभागी श्रीजटाशंकराचे मंदिर दिसले. तसे
ते समाधी मंदिराजवळून आणि छतावरून पहिले होते. इथून अधिक जवळून पहिले. या पात्रात
फारपूर्वी देवमाशाचे दर्शन व्हायचे, म्हणतात. श्रीजटाशंकराचे मंदिर छोटेसे, सुबक व
देखणे आहे. नदीच्या पाण्याची पातळी कमी असल्यास मंदिरापर्यंत चालत अन्यथा बोटीने
जाता येते. आज आम्ही पोहोचण्यापूर्वी काही काळ बोटिंग सुरु होते. श्रीजटाशंकराचे
गाभार्यात ध्यानास बसल्यास एक गूढ अन विलक्षण शांतीचा अनुभव येतो. तो घेता आला
नाही. सन १९५६ मध्ये भीमानदीला आलेल्या महापूरात श्रीजटाशंकर मंदिराचा कळस वाहून गेला. तेव्हा पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले होते.
घाटाच्या पायऱ्या चढून श्रीसिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात सहा फूट उंचीपर्यंत पाणी आले
होते. आजही पावसाळ्यात भीमा नदीला पूर आला की या सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात
शिवपिंडीच्या बाजूने पाणी जमा होतं.
यात्रोत्सवात पाच दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं
आयोजन केलेलं असतं. पहिल्या दिवशी उपवास असतो. आम्ही असताना उपवासाची खिचडी,
शेंगदाण्याचे लाडू असं वाटप सुरु होतं. पहिल्या सायंकाळी माचणूरमधून ग्रामदेवतेची
सवाद्य पालखी मंदिरात येते. तिचं औक्षण केलं जातं. दुसऱ्या दिवशी पारणं असतं. त्या
रात्री नामांकित शाहीरांचा पारंपरिक भेदिक गाण्यांचा (कलगीतुरा) कार्यक्रम रंगतो.
तिसऱ्या दिवशी आमावस्या, कुस्तीच्या स्पर्धा होतात. कधीकधी पारणा आणि आमावस्या
एकाच दिवशी येते. यातला चौथा दिवस हा विसाव्याचा असतो. चौथ्या आणि पाचव्या दिवशी देवाची
पालखी सवाद्य परत नेण्यात येऊन यात्रेची सांगता होते. हे प्राचीन सिद्धेश्वराचं श्रीक्षेत्र माचणूर श्रावण महिन्यातही भाविकांनी फुलून जातं. ग्रामस्थ
आपल्या जवळच्यांना श्रावणात आवर्जून माचणूरला बोलवितात. सोलापूर
जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ब्रम्हपुरी, माचणूर, बेगमपूर या
एकमेकांपासून जवळ असलेल्या गावांत कधीतरी जायला हवं, असं मनात होतंच ! यावर्षीच्या
महाशिवरात्रोत्सवाला ते प्रत्यक्षात आलं.
शिवछत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या
निर्वाणानंतर स्वराज्य काबीज करण्यासाठी स्वतः औरंगजेब महाराष्ट्रात आला. पण
त्याचा मनसुबा छत्रपती श्रीसंभाजी महाराजांनी उधळून लावला. त्यांनाही दुर्दैवी
होऊन कैद होऊन अत्यंत क्रूरपणे मृत्यूला सामोरे जावे लागल्याने महाराष्ट्रावर
कब्जा मिळविण्याच्या औरंगजेबच्या आशा पुन्हा पल्लवित झालेल्या. मात्र औरंगजेब
मराठ्य़ांच्या हल्ल्यांनी पुरता त्रस्त झाला. वारंवार तो आपल्या छावण्या बदलू
लागला. मराठ्यांची राजधानी सातारा आणि आदिलशाही राजधानी विजापूरच्या दरम्यानच्या
मार्गावरून जाताना छावणीच्या थांब्याच्या दृष्टीने ठिकाणाचा शोध घेण्याची जबाबदारी
सरदार गाझीऊद्दीन खानवर होती. त्यास छावणीसाठी पूरक ठिकाणाचा शोध ब्रह्मपुरीच्या
माध्यमातून लागला. त्यावेळच्या पत्रव्यवहारानुसार गाझीऊद्दीन खानने ब्रह्मपुरीस
छावणीच्या निवारणासाठी एक तात्पुरत्या स्वरूपाचा किल्ला बांधण्याची परवानगी
मागितली होती. बादशाहने ती परवानगी दिली. सन १६९४-९५ ला ब्रम्हपुरी गावाजवळ संथ
वाहणाऱ्या भीमा नदीकाठच्या प्रदेशात तात्पुरत्या वास्तव्यासाठी कच्च्या स्वरूपात किल्ला
बांधण्यात आला. तो माचणूर किल्ला गावात सिध्देश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर
शेवटला आहे. सन १७०१ पर्यंत औरंगजेब येथे मुक्कामी होता. माचणूर गडाच्या प्रवेशव्दारावर शत्रूला थेट मारा करता येऊ नये यासाठी गडाच्या
प्रवेशव्दारासमोर भव्य तटबंदी आणि दोन बुरुजांचा आडोसा निर्माण केलेला आहे. गडाचे
प्रवेशव्दार, तटबंदी व बुरुज अजून शाबूत आहेत. प्रवेशव्दारातून गडात प्रवेश
केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दाराच्या विरुध्द
टोकाला मशिद आहे. मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. मशीदीच्या मागील
बाजूस खोलवर भीमा नदीचे पात्र आहे. नदीच्या बाजूची तटबंदी पूरांमुळे नष्ट झालेली
आहे. या किल्ल्यात मोघल सैन्याची मोठी छावणी होती. स्वतः औरंगजेब किल्ल्यात बसून
न्यायदान करी. छत्रपती श्रीसंभाजी महाराजांच्या पश्चात महाराणी येसुबाई, छत्रपती
श्रीशाहू महाराज (सातारा) हे औरंगजेबच्या नजरकैदेत २९ वर्षे आणि त्यातील १७ वर्षे
महाराष्ट्रात छावणीत असताना ब्रह्मपुरी (सोलापूर) मुक्कामातील अखेरच्या दिवसात त्यांचे
धर्मांतरण होण्याची वार्ता बादशाहाने पसरवली होती. तेव्हापासून प्रयत्नरत राहून बाळाजी
विश्वनाथ (पहिले पेशवे) यांनी औरंगजेबच्या मोठ्या मुलीला विश्वासात घेऊन बादशाहाची
ही चाल उध्वस्त केली. ह्या प्रसंगाची सुरुवात झाली होती ती ब्रह्मपुरीत आणि शेवट घडला
होता दिल्लीत.
माचणूरच्या पूर्वेकडे एक मैलावर चंद्रभागेच्या
पलीकडील किनार्यावर बेगमपूरमध्ये औरंगजेबच्या बेगमची कबर आहे. आपल्या काळात
सिद्धेश्वर मंदिर नष्ट करण्याचे हर तऱ्हेचे प्रयत्न औरंगजेबने केले. मंदिरे
फोडण्यासाठी त्याने स्वतंत्र तुकडीची नेमणूक केली होती. त्याची झळ पंढरीच्या
पांडुरंगालाही बसली. भीमेच्या पाण्यातलं हे सिद्धेश्वर मंदिर वाहून जावं यासाठी
मोठा चर खोदण्याची व्यवस्था त्याने केली होती. पण ती यशस्वी झाली नाही. प्रचलित
मौखिक कथेनुसार काहीसे स्थिरावल्यावर औरंगजेबने आपल्या सैनिकांना थेट श्रीसिध्देश्वराचे
प्राचीन शिवलींग फोडण्याचे, उध्वस्थ करण्याचे आदेश दिले. मात्र या कामगिरीवर
आलेल्या सैनिकांवर तेव्हा भुंग्यांच्या थव्याने हल्ला चढविला. नाईलाजाने जीव
वाचविण्यासाठी सैनिकांना परतावे लागले. घडल्याप्रकारने औरंगजेब चांगलाच संतापला.
त्या संतापातच भगवान श्रीशंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याने नैवेद्य म्हणून एका
थाळीत गोमांस पाठवले. तेव्हा मात्र अतर्क्य घडले. सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात
औरंगजेबने पाठविलेल्या थाळीवरील वस्त्र बाजूला होताच गोमांसाच्या जागी पांढरी फुले
अवतरली. एका अर्थाने औरंगजेबने संतापात पाठविलेल्या मांसाचा नूर पालटला. म्हणून
मासनूर पुढे याचाच अपभ्रंश माचणूर नाव प्रचलित झाले. अर्थात नंतर खजिललेल्या
औरंगजेबाने या प्राचीन श्रीसिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये आणि ६ रुपये अशी दोन
वर्षासने चालू केली. आजही महाराष्ट्र सरकारकडून या मंदिराला ४८० रुपये वर्षासन
मिळते. इथल्या उत्सवादरम्यान शासकीय पूजा प्रथम होते. आजच्या महाशिवरात्रीसही
पहाटे ५ वाजता मंगळवेढा तहसिलदारांच्या शुभहस्ते ती संपन्न झाली. पहाटे ४
वाजल्यापासूनच भक्तांनी दर्शनाला रांगा लावलेल्या. गेल्यावर्षी नदीपात्रात पाणी
अभावाने होते, यंदा भीमेचे पात्र तुडुंब भरलेले. पात्रात डुबकी मारून पहाटे ओलेते
भाविक दर्शन घेऊन गेलेले.
वर्तमान माचणूर विलोभनीय आणि नयनरम्य भीमा
नदीच्या तीरावरील पुरातन श्रीसिद्धेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. सातवाहन
काळापासून चिपळूण-कराड-मंगळवेढा-तेर हा व्यापारी मार्ग अस्तित्वात आहे. हा परिसर हजार
वर्षांपूर्वी बिज्जल राजवटीच्या राजधानीचा भाग होता. डोळस पर्यटकांसह प्राचीन स्थापत्य,
कला, संस्कृती आणि इतिहासाच्या अभ्यासकाला या परिसरात वावरण्याचा मोह आवरणे कठीण.
फारपूर्वी या सिद्धेश्वराच्या तटबंदीला लागून लोकवस्ती असावी असं इतिहास
अभ्यासकांचं निरीक्षण आहे. यापूर्वी इथे खोदकामात, जमीन नांगरताना जमीनदोस्त
झालेल्या घरांच्या पक्क्या भाजलेल्या वीटा, विविध मातीच्या वस्तू, सोने,
सोन्या-चांदीच्या मोहरा, देवदेवता, जुनी नाणी, निरनिराळ्या
आकाराचे व रंगाचे मणी, अंगठीतील रंगीबेरंगी खडे अनेकांना मिळालेले आहेत. औरंगजेबच्या
काळात इथल्या लोकांनी जमिनीत पुरुन ठेवलेली संपती तशीच राहून गेली असावी. याशिवाय
देवदेवतांच्या निरनिराळ्या अवयवांचे घडविलेले अवशेष, शाळीग्रामच्या भग्नशिळा येथे सापडतात.
औरंगजेबचा इथला प्रदीर्घ मुक्काम पाहाता त्याने मंदिरांच्या देवतांची तोडफोड केली असावी.
या परिसरात तपश्चर्या केलेल्या साधू, संन्याशांच्या मते,
सिध्दरायाच्या आसपास जगदंबा पार्वती मातेचे भव्य मंदिर, गणपती आणि विष्णुचे मंदिर
होते. इथल्या बांधकामातील अनेक मोठमोठ्या शिळा किल्यातील इतर बांधकामात वापरल्या
गेल्यात. अर्थात सध्याच्या मल्लिकार्जुन मंदिराची जागा, इतर रचना आणि संदर्भ पाहाता
पूर्वी येथे अजून काही मंदिरे असावीत, या मताला
दुजोरा द्यावासा वाटतो. श्रीक्षेत्र सिद्धेश्वर मंदिराचा प्राचीन बाज आजही टिकून
आहे. त्याला रंगरंगोटी, सुशोभीकरण करण्याची मागणी होते. ती चुकीची आहे.
पुरातत्त्वीय निकषांच्या आधारेच वास्तूची आहे त्या स्थितीत कोणताही फेरफार न करता
किमान स्वच्छता ठेवायला हवी.
मानवी समाजाचे भविष्य आणि वर्तमान इतिहासातील
प्रेरणांच्या अन्वयार्थ आधारे उभे राहात असते. ‘मनुष्यामध्ये असलेल्या शक्तींचा
विकास व्हावा अशी कल्पना साधनेच्या पोटी असते. माचणूर या कल्पनेचा पुरस्कार करत
नाही. शक्तींवर आलेली आवरणे दूर सारावी लागतात. म्हणजे त्या शक्तीचे शुद्ध स्वरूप
प्रकाशात येते. मनुष्य आपल्यामधील जेवढ्या शक्तींचा आपणास परिचय असेल तेवढीच शक्ती
आपण वापरीत असतो. साधक म्हणून, उपासक म्हणून मनुष्याने निष्ठापूर्वक जीवनव्यवहार सुरू केला की, त्याचे जीवनातील प्रत्येक कर्म साधना होत असते. अशा कर्मांनी आपल्यातील
उत्तमोत्तम शक्तींचा परिचय आपणास होऊ लागतो. या आत्मिक शक्तीचा उपयोग, दिव्यातिदिव्य कर्मासाठी आपण करू शकतो’, अशी भूमिका श्रीसंत बाबामहाराज
आर्वीकर यांनी ‘माचणूरचे हृद्गत’ या आपल्या प्रवचनातून मांडलेली आहे. मानवी
शक्तींचा परिचय होण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे याची जाणीव स्वतःला करून देण्यासाठी
एकदातरी ‘माचणूर’ला भेट द्यायला हवी.
धीरज वाटेकर
पत्ता : ‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.
मो. ९८६०३६०९४८,
(धीरज वाटेकर हे ‘पर्यटन आणि
चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे
लेखक असून कोकण इतिहास, पर्यटन, पर्यावरणविषयक, सामाजिक
जागृतीपर विषयात गेली २० वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा