गुढीपाडवा २०२० ! नववर्षाच्या
प्रारंभी असं ‘घरबैठी’ जगणं, इतिहासात कधी ? कुठे ? नोंदवलं गेलं असेलं ? माहित
नाही. यंदा मात्र ते अनुभवलं. ‘सोशल डिस्टन्सिंग’ वातावरणातला यंदाचा गुढीपाडवा अनोखा
ठरला. ‘कोरोना’ संसर्गजन्य विषाणूच्या जागतिक प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या
परिस्थितीत अनेक गोष्टी इतिहासात पहिल्यांदा घडल्यात. अजूनही घडताहेत. पुढेही
घडणार आहेत. पाडव्याच्या आदल्या दिवशी (२४ मार्च २०२०) सायंकाळपर्यंत, ‘उद्या गुढी
उभी करता येणार नाही !’ असं चित्र मनाच्या कॅनव्हासवर तयार होऊन पर्यायी शोध घेत असताना
नियतीनं अचानक गुढी उभारायची संधी देऊ केली. पाडव्याला गुढी उभारल्यावर थोडं मागं भूतकाळात
डोकावलं. वर्तमानात आलो. उद्याचा विचार करू लागलो. २१ दिवसीय ‘सोशल डिस्टन्सिंग’ वातावरणाबाबतची,
गुढीपाडव्यादिनी जाणवलेली विचारांची आवर्तनं नोंदवून ठेवावीशी वाटली.
आपल्या राज्यात पूर्वीच सर्वत्र
संचारबंदी सुरु झालेली. त्यामुळे नेहमीप्रमाणे ‘गुढीपाडवा’ साजरा करणं शक्य
नसल्याचं लक्षात आलेलं. ‘घरातच राहून सुरक्षित गुढीपूजन कसं करता येईल ?’ याबाबतची
तज्ज्ञांची मत २४ मार्चला सोशल मिडीयावरून मिळू लागलेली. त्यात पारंपारिक
पद्धतीऐवजी घरच्या देव्हाऱ्यात कागदावर किंवा रांगोळीने गुढी काढून पूजन करण्याचा
उत्तम सल्ला दिला गेलेला. त्याबाबत विचार करताना मन भूतकाळात गेलं. चिपळूणात, या वास्तूत
आल्यापासून गेली १०/१२ वर्षे मिरजोळीतील श्रीदेवी महालक्ष्मी साळूबाईची शिमगा पालखी
अंगणात येऊन गेली की लगोलग येणारा पाडवा खरतरं त्याचं आनंदात नि उत्साहात साजरा
होणारा. लहानपणी कळायला लागल्यापासून, कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या अलोरे (तालुका
चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) वसाहतीत आई-वडिलांना, आजूबाजूच्या शेजाऱ्यांना दारात
उंचचउंच गुढ्या उभारताना पाहिलेलं. जणू उंचीबाबत एकमेकांत स्पर्धा लागलेली असावी. थोडा
मोठा झाल्यावर तिथल्याचं देवरेमार्केट जवळच्या वाडीतून गुढीसाठी बांबूची काठी
आणायला आदला अर्धा दिवस स्वतः खर्चीही घातलेला. लांबच लांब काठी लांबून ओढत आणताना
मजा वाटायची. काठी आणायला लहान भावाचा खांदा मदतीला आल्यावर गुढीची उंची आणखी वाढत
नेलेली. तेव्हा ‘उंच’ गुढ्या पाहायला गंमत वाटायची. ती कॉलनी जलविद्युत प्रकल्पाची
असली तरी सारे सण-समारंभ दणक्यात साजरे व्हायचे. त्या प्रकल्पाच्या वसाहतीतील
चाळीतही आम्ही ग्रामदैवत श्रीदेव शंकर-महादेव आणि श्रीदेवी गंगादेवी यांची पालखी
घरात बसवायचो. बाकी काही नाही... वर्षभर जगायला लागणारं टॉनिक मिळायचं त्यातून, ही
श्रद्धा ! कालांतराने जगण्याच्या या सवयी चिपळूणातही कायम राहिलेल्या. खेन्डीत
वास्तव्याला आल्यावर सुरुवातीला काठी आणायला कुठं जावं लागायचं नाही. कोणीतरी आणून
द्यायचा. त्याचे पैसे दिले की झालं. काठीची उंची थोडी कमी असायची. पण तसंही दारात
४०/५० वर्ष जुनं कलमी आंब्याचं ‘सावली’ देणारं झाडं असल्यानं उंच गुढी दिसायला
कठीण. नंतर-नंतर काठी दारात येणंही बंद झालं. आता ‘काठी’ शहरातल्या गाढवतळ्याजवळ
विकत मिळू लागलेली. गेल्या ४/५ दिवसांपूर्वी त्या भागातून येतानाही काठ्या
पाहिलेल्या. पण तेव्हा ‘संचारबंदी’ नव्हती. आता काठीअभावी नेहमीप्रमाणे गुढी उभी
करणं अवघड बनलं !
मागच्या महिन्यातल्या शिवजयंती-महाशिवरात्रीला
तुळजापूरला जाताना वाटेत भरपूर भगवे झेंडे पाहायला मिळालेले. न राहावून
चिरंजीवाच्या आग्रहापोटी एक राजांचे चित्र असलेला नि एक पूर्ण भगवा झेंडा आणलेला.
शिमगा पालखीला, गेल्यावर्षीच्या काठीत, आंब्याच्या झाडाजवळ तो उभा केलेला. अजून
तसाच होता. ठरलं ! उद्या गुढीऐवजी हाच ‘ब्रम्हध्वज’ उभारायचा. परिसर
स्वच्छता करताना झेंड्याला उतरवलं. पत्नीला, झेंडा स्वच्छ धुवायला सांगितला, सकाळी
लागणार म्हणून ! पाडव्याच्या आदल्या दिवशी सायंकाळचे साडेसहा वाजून गेलेले.
‘संचारबंदी’ मनापासून पाळत असल्याने बाहेर जायचा प्रश्नच नव्हता. हे लिहीपर्यंतही
गेल्या अनेक दिवसांत आलेला नाही. माध्यमांच्या चॅनेल्सवरून देशभरातल्या वार्ता
समजत होत्याच. पण चिपळूणात गुढीची काठी मिळत असल्याचे कोण सांगणार ? सगळीकडे
‘कोरोना’ ! जीवनावश्यक वस्तूंच्या कारणाने छोटा भाऊ तोंडाला रूमाला बांधून घराबाहेर
पडला नि काही वेळात परतला तो ‘मी काठी घेऊन येतो !’ सांगायला. गावात अनेकांना काठी
मिळालेली. आता ‘काठी आल्यावर काय ?’ हा विचारही सुरु झालेला नव्हता तोवर काठी दारात
हजर झाली. काठीला पाहून पाडव्याचा उत्साह संचारला. चला ! काठी मिळाली म्हणजे गुढी
उभी करता येणार तर !
बाजारात फुलं मिळणार नव्हती.
घरच्या बागेतील घ्यावी लागणार, रोजच्या देवपूजेला पुरवून गुढीला वापरायची
म्हणजे..? म्हटलं बघू उद्या सकाळी ! पाडव्याचा सूर्योदय झाला तो कोकीळ गायनाने !
आम्हाला सकाळी लवकर गुढी उभारता येत नाही. पाणी सकाळी सात वाजता पाणी येतं. बरं अशा उत्सवी वातावरणात, पाणी
आलं की जी झाडं परसदारी आपल्याला फुलं देतात त्यांना पहिलं ते पाजावं लागतं. त्यातचं
गुढीपाडवा, मकरसंक्रांत, दीपावली, विजयादशमी, शिमगापालखी सोहोळ्यासारख्या उत्सवी
दिवसांत दारातल्या त्या जुन्या कलमी आंब्याच्या झाडाला अंघोळ घालायचा कार्यक्रम
असतो. घरच्या चोहोबाजूला उंबरांच्या झाडांची उपस्थिती. पण ती पूजनीय हवी, घेतलं
तेव्हा तशी दिसेना. त्यावर्षी, (सन २००९) पहिल्याचं पावसात उत्तरेकडच्या भागात आणखी
एक उंबर उमलला. मूळात मनातून हवा असलेला, त्यात स्वतःहून उमलून आलेला, वाढवला
त्याला. आता तोही इतका वाढलायं की दोन हातांच्या साधारण कवेत न यावा. तर सांगायचं
हे की त्यालाही अंघोळ घालतो. पाडव्याला घातली. केरकचरा, अंगणातील स्वच्छता करून
फुलांकडे वळण्यापूर्वी आम्हांला टेरेसवर घेऊन जाणारा घरचा जिना पाहायला गेलो.
कारणही तसंच होतं. या जिन्यात कालपर्यंत मागच्या सलग दोन रात्रीत दोन उंदरांच्या
विकेटी मांजरीनं पाडलेल्या. आज मांजर शांत झालेली. आज पाडवा म्हणून की तिकडे चीनमध्ये
‘हन्ता’ विषाणू आल्याचं तिलाही कळलेलं ते तिचं तिलाचं माहित.
आज तर कधी नव्हे ती दारातल्या
अनंतानं तीन फुलं दिलेली. त्याला पाणी घालताना चक्क चौथं दृष्टीस पडलं. खूप आवडते
म्हणून लावलेली डबल तगारीही नेहमीपेक्षा भरपूर फुललेली. दारातला बकुळ सारखा वीजेच्या
तारांना भेटायला जातो म्हणून त्यांच्यातल्याच कुणीतरी भयानक तोडलेला. तो जो घाबरला
तो आजही घाबरलेलाचं ! सणासुदीला घरात येणारे झेंडूच्या फुलांचे हार उगाचंच खतासाठी
झाडांत टाकलेले. तर कधी नव्हे ते दिवाळीत टाकलेल्यातून एक छानसं झेंडूचं रोपट
उमललेलं. आता उमललं आहेच तर त्याला जगवायला हवं म्हणून थोडं खत-पाणी घालून जगवलेलं
! परवाच्या पालखी सोहोळ्याला नि आजला आवर्जून छोटीशी का होईना, पण गोंड्याची
म्हणून सहा फुलं दिलनं त्या झाडांनं, तरीही तरीही शिल्लक ठेवली. अक्षय्यतृतीयेला
होतील म्हणून ! मोठी गंमत वाटली फुलझाडाची. कडूनिंबही लावलेला. पण उगाच वरवर जात
राहातो. अजिबात हाताला गावत नाही, अगदी पाडव्यालाही. म्हणून गेल्यावर्षी तोडलेला. तर
तोही रागावलेला, जीवंत असून नसल्यासारखा, पर्णहीन ! नाही म्हणायला सध्या दोन
प्रकारची कांचनाची फुलं उपयोगी येतात अधून मधून ! कवठी चाफा मागचे तीन दिवस एकेक
करून फुललेला पण नेमका आज नाही. मागं एकदा राळेगणसिद्धीहून पर्यावरण संमेलन आटोपून
अहमदनगरला जेष्ठ स्नेह्याकडे आग्रहापोटी गेलेलो. सूर्यास्तानंतर बंगल्याच्या
प्रवेशद्वारातून आत शिरलो तर रातराणीच्या सुगंधानं दिवानं केलनं. म्हणून देवखोली
बाहेरच्या खिडकीत बहरणारा कुंदा कमी करून म्हटलं रातराणीही लावूयात. म्हणून कुंदा
इतरत्रही लावला. पण झालं उलटं ! देवखोलीबाहेरच्या खिडकीत रातराणीसोबत कुंद्याचं
जमलं नाही. त्यानं आपलं अस्तित्वचं संपवलं. नशीबाने दुसरीकडे लावलेला जगला, पण
बहुदा तोही रागात असलेला. कालपरवाच्या शिमग्यात देवीच्या पालखीच्या स्वागताला पहिल्यांदा
प्रसादाएवढाचं फुलला. बहुतेक हजर असल्याचं देवीला दाखवायला. अर्थात सगळं कुठून
आलंय एकदम मिळायला. सोनचाफाही तसाचं ! सोनटक्का तर पावसाळी सोबती. नाही म्हणायला मागच्या
फेब्रुवारी अखेरीस आंबोली (सावंतवाडी) भेटीत तिथे छान ६/७ फुट वाढलेला, फुललेला बघीतला.
...शेवटी नेहमी उमलणारी जास्वंदी पूजेला नि उरलेली गुढीला असं नियोजन केलं.
त्यातही डबललेयर जास्वंदीचं एक फुलं गुढीला ! गावठी आंब्याची डहाळी लागते, म्हणून
तोही काही वर्षांपासून दारात हजर झालेला. या ‘संचारबंदी’च्या काळात घेवडीच्या
वेलीनं अर्धा किलोभर शेंगा दिलनं. खरतरं गुरुवारी काढायच्या त्या, पण आज गुढीसाठी नैवेद्याला
म्हणून काढलेल्या. प्रत्यक्ष गुढी उभी करायला, ‘ब्लॅक हूडेड ओरीयल’ जोडीनं कधी
नव्हे इतका जवळ आलेला. विशेषत त्याच्या आणि खारूताईंच्या आवाजी उपस्थितीत गुढी
उभारली. दरवर्षी पाडव्याला, पालखी घेऊन हजर होणारी परिसरातली चिमुकली मुलंही आज
घराघरात अडकून पडलेली. ‘काहीही दोष नसताना आपापल्या घरात बसून आज ती नक्की कोणता
विचार करत असतील !’ याचा विचार करताना अस्वस्थ व्हायला झालं. ‘कोरोना’ला
पर्यावरणीय समस्या मानावं तर त्यात या लहानग्यांचा दोष तो काय ? चुका कोणाच्या ?
फळं कोणाला ?
दारातली फुलं रोजचं मिळतात
! पण आज विकतची नसल्यानं त्यांच्याकडे जरा मायेनं बघणं झालं. मग लिहावं की नको या
विचारात दिवस गेला. म्हटलं, लिहू यातं ! गुढीपाडव्यापासून ‘सोशल डिस्टन्सिंग’ जगताना
भरपूर वेळ हाताशी आलायं. कोरोना हे आजवरचे, स्वातंत्र्योत्तर भारतावरचे सर्वात
मोठे, भीषण संकट आहे. ‘पावश्या’ जसं आपल्याला ‘पेरते व्हा !’ सांगतो तसं कॉलेजयीन मित्र-मैत्रीणींना
सोशल मिडीयाच्या धबडग्यात, संपूर्ण लॉकडाऊन परिस्थितीत घरात बसून ‘लिहिते व्हा’
असंही आवर्जून सांगावसं वाटतं. न जाणो, आपलं आजचं लिहिलेलं उद्याच्या काळात
संकटांवर मात करण्याची शिदोरी म्हणून आपल्यालाच उपयोगी पडेल !
‘सोशल डिस्टन्सिंग’
पाळू यात !
देशावरील ‘कोरोना’चे संकट
पळवू यात !!
सर्वांना निरोगी आयुष्य
लाभो अशी प्रार्थना करू यात !!!
धीरज वाटेकर
गुढीपाडवा सन २०१३ @ खेंड चिपळूण |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा