गुरुवार, ३० जुलै, २०२०

‘जलजल्लोष’धारा आठवताना...

पावसाचं येणं मोठं गमतीशीर असतं. ‘कोरोना’ वर्षातील जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात, काही दिवसांची विश्रांती घेऊन हा पाऊस जल’जल्लोष’धारा पुन्हा बरसवू लागला. त्यांच्या थंडगार शिडकाव्याने चित्त प्रफुल्लित झालं. धबधब्यांच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या. दुर्दैवाने त्या उत्साही धारा यंदा मानवी पाऊलखुणांच्या अभावी एकटेपणा अनुभवत आहेत. दरवर्षी ५/५० धबधब्यांचे नेत्रसुखद दर्शन आणि त्यातल्या काहींच्या ‘जलजल्लोष’धारांमध्ये मनसोक्त भिजण्यातला आनंद अंगवळणी पडलेल्यांना या आठवणी बैचैन करत असतील. काहीं मनात पाऊस म्हणजे तुंबणारी गटारं, बंद पडणारी वाहतूक व्यवस्था, रस्त्यातले खड्डे असंही असेल. तरीही पावसाळ्याला आपला आवडता ऋतू म्हणणारे कमी नाहीत. शहरांपासून दूर सह्याद्रीत, रानावनात, डोंगरदऱ्यांत, नव्याने उमललेल्या गवतांच्या जीवावर डोलणाऱ्या रानफुलांसोबत चालत जाऊन कोणा कातळकडय़ावरून कोसळणाऱ्या जलजल्लोषधारांच्या संगतीनं जगलेल्या या काही रोमांचक आठवणी...!

धबधबा हा वर्षाऋतूतील चैतन्याचा एक अविष्कार ! धकाधकीच्या जीवनात नियमित व्यापातून मोकळीक घेत आपण जेव्हा स्वतःला निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निसर्गही आपल्याला व्यापातून बाहेर काढण्यास मदत करतो. याची मनाला प्रसन्नता देणारी अनुभूती आल्यानं ‘शुद्धपणा’ म्हणतात तो जणू याच्याकडेच शिल्लक राहिलेला असावा, असं वाटतं. आपण निसर्गाशी एकरूप झालो की गर्द वनराईत, झाडांच्या सावल्यांत, मंद हलक्‍या वाऱ्यात शरीराला, मनाला आणि डोळ्यांना निखळ आनंद मिळतो. या निसर्गातल्या पावसाळी पर्यटनाला, तनामनाला चिंब करणारी धबधब्यांची किनार भेटते. कोणत्याही मुख्य रस्त्याला गाडी पार्क करून आपण धबधब्याच्या आवाजाच्या दिशेने कूच केल्यावर हिरव्यागार वनस्पतींची झूल पांघरलेले डोंगर, त्यावरून वाहणाऱ्या खळाळत्या पांढऱ्याशुभ्र जलरेषा, कधी आकाशातून डोंगरावर उतरणारे इंद्रधनुष्य, कधी काळे ढग तर कधी निरभ्र सूर्यप्रकाशमय आकाशाच्या होणाऱ्या दर्शनानं आपलं मन प्रसन्न बनत जातं. हिरवाईत हरवलेल्या या रानवाटा चालताना जेव्हा पाऊस अंगावर जलधारा ओतत असतो तेव्हा आपण स्वत:च्या मालकीचा खाजगी पाऊस अनुभवत असल्याचा फील येतो. धबधबा जेव्हा नजरेच्या टप्प्यात येतो तेव्हा तर त्याचा धीरगंभीर आवाज, जलतुषारांनी कोंडलेला परिसर, पाण्याशी हितगुज साधण्याचा जमून आलेला निसर्गाचा मूड आपल्याला साद घालतो. आपला उत्साह वाढवतो. धबधब्याच्या अगदी जवळ पोहोचल्यावर आपल्या कानात गुंजणारा ओंकाराच्या अनाहत नादाशी नातं सांगणारा आवाज वेडावतो. आपण एखाद्या आडवळणावरून निसरड्या पायवाटेने धबधब्याकडे सरकत जात असतो. नेमका तोच काळजाचा ठोका चुकतो. पाय घसरतो. कोणीतरी सोबतचा नाहीतर निसर्गातल्या जैवविविधतेच्या साखळीतील घटक असलेली एखादी झाडाची फांदी, दगड किंवा कदाचित फोटोत अडसर ठरू पाहणारी वेल आपल्याला वाचवायला पुढे येते. आपण निसर्गाच्या त्या सात्विक मायेत अलगत गुंतत जातो. घसरलेल्या पायाची अनुभूती जीवनभरासाठी संस्मरणीय ठरते. निसर्गासोबत बेधुंद आनंद जगणाऱ्यांच्या आठवणींचा सारांश साधारणत असा असावा.

शालेय जीवनातलं नीटसं आठवावं लागेलं पण कॉलेजयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचं काम करताना ‘वर्षासहल’ उपक्रमामुळे आम्हाला पावसाळ्यातील सृष्टीच्या विविध रुपांसोबतचं ‘चुंबकीय’ जगणं अनुभवता आलं. निसर्गनियमानुसार हळूहळू आम्ही त्यात ओढले गेलो. कॉलेजविश्व संपल्यावर पत्रकारिता जगताना लिहिण्याच्या निमित्तानं आमची पाऊलं धबधब्यांच्या नव्या वाटा मळू लागली. गेल्या २०/२२ वर्षांत कित्येक धबधब्यांसोबत निसर्गक्षण जगून झालेत. तरीही धबधब्यांची मोहक आस काही संपत नाही आहे. हे त्या निसर्गाचं देणं ! यातूनच मग आमची पाऊलं निसर्ग संवर्धनविषयक जनजागृतीच्या दिशेला वळली. पावसाळ्यातील निसर्गऊर्जा मानवाला जबरदस्त टॉनिक देत असते. तिचं देणं सारखंच असलं तरी आपलं घेणं हे आपल्या अनुभूतींवर अवलंबून असल्याची जाणीवही याच काळात विकसित होत गेली.

श्रीसमर्थ रामदासस्वामींच्या पदस्पर्शानी पावन झालेला काळ नदीप्रवाहानजीकचा  शिवथरघळीचा (रायगड) आवाजी उर्जेच्या जलप्रपाताचा अद्भुत परिसर तर आम्ही समविचारी मित्र मंडळीनी सरासरी वयाच्या पंचवीशीत पैदल अनुभवलेला. शिवथरघळीतून समोर दिसणाऱ्या जलधारांच्या पडद्याच्या साक्षीने साऱ्यांनी वयानुरूप भव्यदिव्य स्वप्न पाहिलेली ! स्वप्न पाहायची सुरुवात तशी आंबोलीला (सिंधुदुर्ग) झालेली, तीही धबधब्याच्याच साक्षीने ! आंबोलीच्या धबधब्याचे रस्त्यावरून वाहाणारे रौद्ररूप अनुभवणे जितके विलक्षण तितकेच धोकादायक ! आम्ही तिथे सन २००२ पासून जात आलोय ! आता तिथे सतत दरडी पडण्याच्या घटना घडत असल्यामुळे प्रवास करून जाऊन असा अनुभव पदरात पाडणं कदाचित कठीण ! अर्थात निसर्ग कधी ? कोणाच्या पदरात कोणता अनुभव टाकेल हे सांगणं कठीण. असो ! रामदासस्वामींचे निसर्गप्रेम सर्वश्रुत आहे. पर्यावरणरक्षणाची वर्तमान परिभाषा जन्माला आलेली नसल्याच्या काळात त्यांनी मांडलेली निरोगी निसर्गाची आवश्यकता किती मोलाची आहे हे आपल्याला आजवर निसर्गातल्या भटकंतीनं  सांगितलं. यंदा ते ‘कोरोना’ समजावून सांगतो आहे. शिवथरघळसंदर्भातील वाहत्या पाण्याची चंचल माया सांगणाऱ्या समर्थांच्या, गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनि चालली बळे || धबाबा लोटल्या धारा। धबाबा तोय आदळे।। या प्रसिद्ध ओळींची अनुभूती आम्ही पहिल्यांदा घेतलेला तो क्षण आनंदानुभूती देणारा ठरलेला. भर पावसात जावळीच्या निबिड खोऱ्यातून चालताना दुभंगलेल्या मारुतीच्या मूर्तीची झालेली भेट आम्हाला इतिहासाच्या वाटेवरून चालायची प्रेरणा देणारी ठरली. समर्थांची वसुंधरेवरील झाडेझुडपे, वृक्षवेलींना पाण्यामुळे गुणधर्म प्राप्त झाल्याची महती सांगणारी, नाना वल्लीमधें जीवन । नाना फळीं फुलीं जीवन ।। नाना कंदीं मुळीं जीवन । गुणकारकें।। ही ओळ तर पर्यावरणाच्या संवर्धनाची जाणीव करून देणारी ! समर्थांच्या अशा विलक्षण रचनांची उजळणी आम्ही सन २००६ साली शिवथरघळी सामाजिक संस्थेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात केलेली होती. सातारा जिल्ह्यातला पाटण तालुक्यातल्या पवनचक्क्यांच्या पठाराखाली असलेल्या श्रीक्षेत्र धारेश्वर गुंफा मंदिराची पर्यटन सहल ठरविण्यासाठी म्हणून केलेल्या दुचाकी प्रवासात भिरभिरणाऱ्या पवनचक्क्यांच्या सानिद्ध्यात अनुभवलेला आणि सर्वांगाला झोंबणारा सोसाट्याचा गार वारा, धुक्यात हरवलेले रस्ते, तिथला निसर्ग आठवला की आजही कोरोनाने मरगळलेल्या मनाला अचानक उभारी मिळते. या धारेश्वर गुंफा मंदिरासह राजाराणी (सावडाव-कणकवली), ठोसेघर (सातारा), कोंडाणे (कर्जत-रायगड), राऊतवाडी (राधानगरी) आदि गुहा-लेण्यांमधून धबधब्यांच्या मागे जाऊन पाहाता येणारी डोळ्यांचे पारणे फेडणारी अनुभूतीही विलक्षण आहे. उंचावरून कोसळणारं धबधब्यांचं फेसाळतं पाणी अंगावर घेण्यात जितकी मजा आहे तितकीच मजा या धबधब्यांच्या मागे उभारण्यात आहे.

१२/१३ वर्षांपूर्वी विळे-निजामपूर (रायगड) भागात, त्या सीझनमध्ये पहिल्यांदा येऊन भेटीसाठी खुणावणारा पाऊसही आठवतो. मे महिन्याच्या अखेरीला प्रवासात अचानक तो भेटीला आलेला. ग्रीष्माच्या कडकडीत उन्हाळ्याने सर्वांगी घामाच्या धारा वाहात असतानाच आकाश गडगडायला लागलं. क्षणार्धात काळे ढग दाटून आले. वळवाच्या पावसाचे ते थेंब जमिनीवर पडायला लागले आणि मातीच्या मोहक सुगंधाने मनातल्या अत्तरकुपीचा ठाव घेतला. बरं ! हा पाऊस तेव्हा टपोऱ्या ‘गारा’ घेऊन अवतरलेला. गारा अंगाखांद्यावरून सांडू लागल्यावर त्यांना हातात पकडण्यासाठी केलेले प्रयत्न आठवतात. याच जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यातील मोरझोत धबधब्याशी आमचा वेगळा जिव्हाळा आहे. मे महिन्यात जन्मलेल्या (२०१०) अडीच महिन्यांच्या चिरंजीवाला घेऊन जुलैमध्ये आम्ही सपत्नीक मोरझोतच्या दर्शनाला गेलेलो. लग्नानंतर या धबधब्याशी संपर्क आला. नरवीर तानाजी मालुसरेंच्या उमरठजवळच्या चांदके आणि खोपड गावच्या मध्यभागी असलेला हा धबधबा. अर्थात उमरठ समाधी दर्शन ओघाने आलंच ! याच भागात पाहण्यासारखं आणखी एक नवल भेटलं. ते म्हणजे गोपाळवाडीत असलेला महाराष्ट्रातील पहिला झुलता पूल ! ६० फूट लांब आणि ३ फूट रुंदीच्या लोखंडी कमानींनी जोडलेल्या या पुलावरून चालत जात उत्तरवाहिनी सावित्रीच्या प्रवाहातील रांगण खळग्यांची रास पाहणे संस्मरणीय. तुफानी पावसात पूर्ण क्षमतेने कोसळताना रस्त्यापर्यंत भेटीस येणारं मोरझोतचं मोराच्या पिसाऱ्यासारखं फुललेलं रूप अनुभवणं आल्हाददायक !

मानवाला धबधब्यांचं असलेलं आकर्षण प्राचीन आहे. पर्यटनामुळे ते व्यापक झालंय. पावसाळ्यात आकाशातून कोसळणाऱ्या धारांइतक्याच डोंगर कड्यांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांच्या धारा मनाला आकर्षून घेतात. मनाला भुरळ घालणारा त्यांचा आवाज आपल्याला संगीताचा मूळस्रोत असल्याचे जणू सांगत राहातो. हवा, पक्ष्यांची किलबिल, नद्या आणि धबधब्यांचे आवाजी प्रवाह, समुद्राची गाज यात संगीत सामावलेले आहे. या निसर्ग संगीतानं भारावून गेल्यानंच आपली पाऊलं तिकडे वळतात. खरंतर प्रत्येक धबधब्याचे स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य असते. काही उंच ठिकाणावरून अरुंद प्रवाहाद्वारे कोसळतात तर  काहींची रुंदी विलक्षण असते. नदीच्या प्रवाहमार्गात असलेली निरनिराळ्या प्रकारची भूस्तररचनाच धबधब्यांच्या निर्मितीस कारणीभूत होते. एकतर नदीच्या पात्रात कडा तयार होतो किंवा उगम होऊन कड्यावरून नदी उडी घेते आणि धबधबा निर्माण होतो. धबधब्याचे पाणी उंचावरून खाली पडून तळाशी पाण्याच्या आघातक्रियेमुळे तयार झालेली विवरे पाहायलाही उन्हाळ्यात मुद्दाम जावं ! जवळपास धबधब्यात ही विवरे आढळतात. त्यांची रचना, रंगसंगती सारंच विलोभनीय ! २५३ मीटर उंचीच्या शरावती नदीवरील जोग फॉल्सच्या (गिरसप्पा-शिमोगा) तळाशी तर सुमारे ४० मीटर खोलीचे तळे तयार झाले आहे. पूर्वी कधीतरी आशियातला सर्वात उंच धबधबा असा गिरसप्पाचा उल्लेख वाचलेला. तो मनात घर करून राहिला. नंतर प्रत्येक कर्नाटक भेटीत मुद्दामहून आम्ही गिरसप्पा भेटीला जात राहिलो. पहिल्यांदा गेलेलो, त्यावेळी धबधब्याच्या एका कातळकड्याच्या टोकावर जाऊन निवांत बसलेलो ! हे जरा अतीच, पण गिरसप्पा भेटीत तेही करून झालं ! सुरक्षाकारणे आता तिथवर जाता येत नसावं.

सन २०१३-१४ मध्ये ‘ठोसेघर पर्यटन’ हे भारतातील सर्वात उंच धबधबा भटकंतीबाबतचे पुस्तक लिहिताना आलेले अनुभव हा स्वतंत्र लेखाचा विषय ! गिरसप्पाप्रमाणे ठोसेघर धबधब्याच्या माथ्यावरून खोल दरीत घोंगावणारा वारा अनुभवण्यात वेगळं थ्रील आहे. एकदा ठोसेघरहून मुद्दाम वाट वाकडी करून आम्ही कासपठार–बामणोली मार्गावरील भांबवली गावातला वजराई धबधबा बघायला गेलो. ठोसेघर लिहिताना याची ओळख झाली. तोवर हा भारतातला सर्वात उंच धबधबा असल्याचा उल्लेख साताऱ्यापुरता मर्यादित होता. भांबवली हा अठराशेचाळीस फुटावरून (५६० मीटर) कोसळणारा धबधबा ! त्यादिवशी अपुऱ्या वेळेअभावी धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचता आलं नाही. दुरून दर्शन घेऊन परतावं लागलं. काहीसा निराश झालो. अशाही आठवणी आपल्याजवळ असतातच. काहीवेळा प्रवासात धबधबे भेटत असताना नेमकी सोबत चुकीची ठरते आणि तिथवर जाणं टाळावं लागतं. हे अनुभव आपल्या पुढच्या प्रवासाची दिशा निश्चित करतात. प्रवासात नेहमी गाडीतली एक जागा रिकामी ठेवण्याची सवय आम्हाला अशातून लागली. खोपोलीतला (रायगड) प्रसिद्ध झेनिथ फॉल कोसळतो त्याच्या आजूबाजूच्या साऱ्या डोंगरकड्यावरच्या ‘होलसेल’ धबधब्यांचे दृश्य भर पावसात दुरून घाट रस्त्यावरून पाहाताना खोपोली जणू धबधब्यांची राणी असल्यासारखी भासते. कल्याणहून अहमदनगरकडे जाताना वाटेत भेटणारा माळशेज घाट आणि श्रीक्षेत्र मार्लेश्वरही काही प्रमाणात आपल्याला हेच विलोभनीय दृश्य दाखवतो. वर्षा ऋतूतील आणखी एक भन्नाट अनुभव घेण्यासाठी आपल्याला भर पावसात किंवा पावसाळी वातावरणात कोणताही ट्रेकिंग करायला हवं. अर्थात अनेकदा आडवाटेवरच्या  धबधब्यांपर्यंत पोहोचताना ही अनुभूती येतंच म्हणा ! ओझर्डे (कोयना), सवतसडा (चिपळूण), श्रीक्षेत्र धूतपापेश्वर (राजापूर), नापणे (वैभववाडी), चोरला अशी सह्याद्रीतील आठवणीतल्या जलजल्लोषधारांची यादी न संपणारी आहे.

वर्तमानात बऱ्याच धबधब्यांनी पर्यटनाची मखमली चादर ओढलेय ! त्यामुळे धबधब्यांकडे जाताना वाटेत मनसोक्त खाजवत बसलेली माकडं आणि त्यांना ‘खाऊ घालू नका’ सांगणारे बोर्ड्स आपल्या नजरेस पडतात. खबरदारीचे बोर्ड वाचत धबधब्यांशेजारी उभारून गरमागरम कांदाभजी आणि आलं घातलेला चहा किंवा मक्याचं कणीस न खाणं म्हणजे मानवी जीवन व्यर्थ घालवणं ! नाही म्हणायला धबधब्यास्थळी चालणारा निसर्गाची लय बिघडवणारा विकृत गोंगाट, अंगविक्षेपी सेल्फी आणि मानवी पाऊलखुणांची साक्ष मागे सोडणारा खाद्य पदार्थांचा कचरा कोणाही निसर्गाप्रेमीला व्यथित करणारा ठरतो. तेव्हा आम्हाला चिपळूण जवळच्या वाशिष्ठी उगमाच्या शोधात सन २०१५ साली कुंभार्ली घाटातल्या खोल दरीत भटकतानाचे कचरामुक्त निसर्गदर्शन आठवते. गेल्यावर्षी भेट दिलेलं सोनवडे (गारगोटी) - शिवडाव (कुडाळ) जोडणाऱ्या नियोजित घाटमार्गावरील नाईकवाडीजवळचं ‘वाघवरंडा’ हे स्वर्गीय माळरानही कचरामुक्त दिसलेलं. पावसाळा सरताना बहरलेल्या या माळरानांच्या सौंदर्याचा पोत वेगळाच असतो. कचऱ्यापासून दूर असलेली रानफुलांनी सजलेली, सर्वत्र हिरवळ दाटलेली ही माळराने पाऊस संपताना आणि उन्हाळा सुरु होतानाच्या टप्यावर पाहिली तरच मज्जा ! यंदाच्या ‘कोरोना’ वर्षाऋतूत हे सारं आठवतंय ! ऋतूभान न बाळगता सतत बारमाही फिरणाऱ्या आमच्यासारख्यांच्या मनाची अवस्था काय वर्णावी ?

पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणाऱ्या कोणत्याही घाटातून किंवा उंचीवरल्या गावातून तुफानी पावसात प्रत्येक नागमोडी वळणानजीक डोंगरकड्यावरच्या जलधारा थेट कारच्या टपावर कोसळत असतानाच समोर दरीतून अचानक वरती आलेल्या धुक्याच्या लोटात जेव्हा समोरचा रस्ता हरवून जातो तेव्हा कार ड्राईव्ह करण्याची अनुभूती काय वर्णावी ? अशा अनुभूतींनंतर कदाचित ‘अघोरी’ इच्छेपोटी आम्ही भर पावसात अनेकदा मध्यरात्री महाबळेश्वरहून पोलादपूरमार्गे चिपळूणला उतरलोय ! काळोख्या रात्रीतला धडकी भरवणारा तुफानी पाऊस, गाडी चालवताना आंबेनळी घाटाच्या वळणावळणावर अंगावर येणारा निसर्ग, कानठळ्या बसवणारे, क्वचित कारच्या टपावर कोसळणारे धबधबे आणि आपण ! अहाहा !! क्या बात है !!! जन्माला आलोयच तर एकदा तरी जगायला हवेत असे हे भन्नाट अनुभव ! असे आणखीही अनुभव आहेत.

यातला एक अनुभव आहे गोव्यातील मांडवी नदीवरील प्रसिद्ध दूधसागर धबधब्याच्या भेटीचा ! हा धबधबा पश्चिम घाटातील भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. घनदाट जंगलांनी वेढलेल्या या धबधब्याचे भर पावसाळ्यातील विलोभनीय दृष्य आम्हांला ‘याचि देहि’ पाहायचं होतं. एके श्रावण सोमवारी गोकर्णमहाबळेश्वरी अभिषेक करायचा ठरवून निघालेलो. तेव्हा प्रवासात काहीतरी भन्नाट साधलं जावं म्हणून दूधसागरकडे वळलो. भेट दिली तेव्हा जवळच्या कुळे गावातून बायकिंगद्वारे अभयारण्य उद्यानाच्या प्रवेशद्वारापर्यंत पर्यटकांना सोडलं जायचं. तिथून पुढं ट्रेकिंगच ! आता हा साधारण १०/१२ कि.मी.चा प्रवास बायकिंग ऐवजी जीपगाड्यांतून प्रवास होतोय. बायकिंगच्या प्रवासातील हे थ्रील ज्यांनी अनुभवलंय त्यांना आम्ही याला ‘भन्नाट’ का म्हटलंय, ते चटकन समजेल. तुफानी पावसात फुटभर रुंदीच्या निसरड्या चिखलयुक्त वाटांवरून वेगाने बाईक दौडत असायच्या. वाटेत नदीचे पात्र ओलांडावे लागते. ह्या बाईक काही अंतर तर अगदी रेल्वेरुळाच्या बाजूने अरुंद वाटेने चालायच्या. गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर असलेला हा धबधबा हजारेक (३१० मीटर) फुटांवरून दुधासारख्या पांढऱ्याशुभ्र धारांचा अखंड जलाभिषेक काळाकभिन्न डोंगरावर करतानाचे दृश्य रेल्वेच्या रुळांच्या शेजारी सुरक्षित उभे राहून पाहात राहावे ! इथून जाणाऱ्या ट्रेन दूधसागरात न्हाऊन निघतात. दूधसागराचे तुषार अनुभवणे हा स्वर्गीय अनुभव ! या धबधब्यापसून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कॅसलरॉक आहे. येथपर्यंत रस्त्याने पोहोचता येते. तेथून धबधब्यापर्यंत अंदाजे २१ कि.मी.चे ट्रेकिंगही केले जाते. आम्ही मात्र धबधब्याच्या तळाशी असलेल्या उद्यान-जंगलात बाईक सोडून ट्रेकिंग करत रेल्वे ट्रॅकपर्यत पोहोचलेलो. रस्त्यात पुन्हा नदीच्या प्रवाहाला सामोरं जावं लागलंच. तिथलं ते उंच झाडीचं घनदाट जंगल, अंधुकसाही न पोहोचणारा सूर्यप्रकाश, अधुनमधून दणका द्यायला येणारी तुफानी पावसाची सर, ती गेल्यावर झाडांच्या पानांवरून टपकणाऱ्या थेंबांची टीपटीप आणि निर्झरांचा खळखळाट ! व्वा ! जंगलातला पाऊस किती आल्हाददायक असू शकतो हे अशा ठिकाणी अनुभवावं. सततचा धुवांधार पाऊस, निसरड्या वाटा, दाट वृक्षवल्ली यामुळे कॅमेऱ्याचा म्हणावा तितका वापर करता येत नव्हता. मात्र त्याचंही वर्षास्नान चांगलं झालेलं. कदाचित म्हणूनच तेव्हा कंटाळून कॅमेऱ्याच्या लेन्सकॅपने दोनदा आमची साथ सोडलेली. नदीच्या प्रवाहातून ते चालू लागलेलं. पण पुन्हा निसर्गकृपा आमच्या बाजूने झुकली आणि ते सापडलं.

अलिकडचा आठवणारा एक अफलातून अनुभव, राधानगरीच्या राऊतवाडी धबधबा ते दाजीपूर जंगलातल्या प्रवासाचा. सन २०१८ सालच्या जुलै महिन्यातला ! खरंतर हा धबधबा पहिल्यांदा पाहिल्याला आता दहाएक वर्ष झालीत. मात्र दोन वर्षांपूर्वी कोकणात उतरणारे घाट क्षणाक्षणाला वाहतुकीसाठी बंद पडत असल्याच्या बातम्या सोशल मिडीयावर अवतरत असताना निवळ तुफानी पावसात एखाद्या घाटातून ड्राईव्ह करत कोकणात उतरण्याच्या मोहाने आम्ही चिपळूण कणकवली हा प्रवास सरळ मुंबई-गोवा हायवेने न करता व्हाया कोल्हापूर फोंडाघाटमार्गे करण्याचा विचित्र निर्णय घेतला होता. त्यादिवशी राधानगरी भागातल्या ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ मित्राची भेट आटोपून आम्ही काळम्मावाडी सोडले तेव्हाच सायंकाळचे साडेपाच वाजून गेलेले ! घड्याळाने आमच्या हृदयाचा ठोका वाढवला होता. डोळ्यासमोर फोंडा घाट दिसू लागला. दिवसभर धबधबे जगून झालेले. आता रात्रीचा सुरक्षित मुक्काम आणि उद्याची कामं यांनी मेंदूची पकड घ्यायला सुरुवात केली. गाडीने वेग पकडला. साधारण १४/१५ वर्षांपूर्वी याच घाटातून आम्ही मध्यरात्री बाईकने कुडाळ ते कोल्हापूर प्रवासही करून बघीतलेला. आता ते आठवलं. आजही रस्ता खराब होता. त्यात तो राधानगरीचा असल्याने गच्च धुक्यांनी भरलेला. मनात असंख्य प्रश्न ! लवकरात लवकर घाट उतरणं एवढंच काय ते ध्येय ! आजूबाजूने वाहाणारे खळाळते प्रवाह आता आम्हाला न थांबता पुढे निघून जायला सुचवू लागले. एव्हाना आम्ही न्यूकरंजे सोडून बरेच पुढे आलो. अजून दाजीपूर गेट आलेलं नव्हतं. रस्त्याला जवळपास वाहन नव्हतं. इतक्यात नको ते कानी आलं. एका बाईकवाल्यानं आम्हांला थांबवून पुढचा रस्ता बंद पडल्याचं कळतं केलं. मनात चिंतेचे ढग पूर्वीच जमा झालेले असल्याने चटकन काही सुचेना. तेवढ्यात मागून एक स्थानिक कारवाला आलेला दिसला. त्याने आम्हाला हा राऊतवाडी धबधबा ते दाजीपूर अभयारण्य गेट असा पर्यायी मार्ग सुचवला. आम्ही निर्णयापर्यंत येण्यापूर्वीच, ‘गाडी चालवताना काळजी घ्या !’ अशी आमच्या काळजीत अधिकची भर घालणारी सूचना देऊन तो कोल्हापूरच्या दिशेने धुक्यात गायब झाला. आम्ही युटर्न घेतला. गाडी धबधब्याच्या दिशेने हाकू लागलो. बऱ्याच वेळाने धबधब्याचे दर्शन झाले. आज राऊतवाडी धबधबा आमची जणू सत्वपरीक्षा घेत होता. थांबण्याची इच्छा अनावर होत होती. पण हाताशी अजिबात वेळ शिल्लक नव्हता. त्यात प्रवासाचा मूळ रस्ता बंद झाल्याने या मार्गाने आलेलो. या रस्त्याने आम्ही दाजीपूर गेटपर्यंतच पोहोचणार होतो. तिथून पुढे फोंडाघाटात काही अडचण उभी राहिली तर ? याचीही काळजी होती. पण आता तो विचार करायलाही वेळ नव्हता. सत्वपरीक्षा घेऊ पाहणाऱ्या धबधब्यासमोर नतमस्तक होऊन पुढे निघालो. एकपदरी घाटमार्ग लागला. पुन्हा चारही बाजूंनी सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगा, दाट जंगल, बेभान होऊन कोसळत असलेला धुवाँधार पाऊस, मार्गाला जोडणाऱ्या अरुंद रानवाटा आणि समोर दाट धुकं भेटलं. वेड्या-वाकड्या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना काळजीत भर घालायला कमी की काय म्हणून बोचरी थंडी येऊन सर्वांगाला बिलगली. या मार्गावरचा तो आमचा पहिला प्रवास. पावणेसातच्या सुमारास आम्हाला दाजीपूर अभयारण्याच्या गेटनं दर्शन दिलं. नियोजनात नसतानाही नियतीनं आज आम्हाला राऊतवाडीकडे नेलं. थोडंस सकारात्मक म्हणून मनाला समजावण्याचा प्रयत्न केला. थेट कणकवलीच्या दिशेला लागलो. अंधार पडल्यानं धबधबे पाहण्याचा प्रश्न नव्हता. आता त्यांचं खळाळत संगीत कानात गुंजी घालत होतं. आम्ही गाडी हाकत होतो. फोंडाघाट उतरून सुरक्षित अंतरावर पोहोचल्यावर क्षणभर थांबून त्या घाटाकडे मागे वळून पाहिलं. तेव्हा अनुभवास आला तो खरा मानसिक निवांतपणा !

वर्षाऋतूत सजीवांच्या स्वागतासाठी उत्सुकतेने धबधबे वाहू लागतात. मनातल्या भीतीवर मात करून तुफानी पावसात ड्राईव्ह करून धबधब्यांच्या ठिकाणी पोहोचताना ठिकठिकाणी वाटा अडवणारी निसर्गाची रूप, त्यातून निर्माण होऊ पाहणाऱ्या समस्या, धुक्यांनी वेढलेल्या घाट रस्त्यातील खड्ड्यांतून प्रवास करताना येणाऱ्या साऱ्या अनुभूती आपलं सर्वांचं जगणं संस्मरणीय करतात. ‘कोरोना’ने याला क्षणिक ब्रेक लावला आहे. जलजल्लोषधारांच्या आठवणी जगात आपण ‘कोरोना’सोबत नित्य दोन हात करतो आहोत. आपल्याला भविष्यात भरपूर जलप्रपातांसोबत जगायचंय. जगावया पुण्य पाहिजे आहे. निसर्गाचा हा ठेवा संपणारा नसला तरी गेल्या काही वर्षांपासून तो मानवी अरसिकतेचा विळख्यातही अडकल्याची धोकादायक बाजू आहे. सृष्टीत आजही काही धबधबे आहेत जिथे निसर्ग आपली ममत्वाने वाट पाहातो आहे. माणसाळलेला तोही यंदाच्या एकटेपणाला कंटाळलेला असेल. त्यालाही आपल्यासारख्यांची सात्विक सोबत हवी असेल. त्यासाठी आपल्याला तूर्तास ‘कोरोना’वर मात करायला हवी आहे. उद्याच्या आनंदासाठी धबधब्याच्या आठवणींना जपून ठेवत आपण ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील ही लढाई जिंकू यात !


धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-बकांगणेवाडी रोडखेंडचिपळूण ४१५६०५जि. रत्नागिरी.         

मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,

ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २३ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

जोग फॉल, शिमोगा  

अगुंबे घाट, कर्नाटक

आंबोली वर्षासहल २००२ 

आंबोली धबधबा 

चोरला घाट

कोटीतीर्थ धूतपापेश्वर राजापूर 

दूधसागर गोवा (गुगल चित्र)

घागरकोंड, गोपाळवाडी, पोलादपूर   

मार्लेश्वर 
मोरझोत, पोलादपूर
 
नापणे, वैभववाडी 

एन एच ६६ महाड 

ओझर्डे कोयना 

राऊतवाडी, राधानगरी

सवतसडा, चिपळूण 

एन.एच. १८३ केरळ

टपोऱ्या गारा

पत्नी आणि अडीच महिन्याच्या चिरंजीवासह ब्लॉगलेखक @ मोरझोत 

ठोसेघर पर्यटन पुस्तकाचे मुखपृष्ठ-मलपृष्ठ  

दैनिक कृषीवल (कलासक्त  पुरवणी) ८ ऑगस्ट २०२० 

दैनिक रत्नभूमी रत्नागिरी १ ऑगस्ट २०२०  
दैनिक रत्नभूमी रत्नागिरी २ आणि ३ ऑगस्ट २०२०  
साप्ताहिक अचूकवार्ता ऑगस्ट २०२०

साप्ताहिक अचूकवार्ता ऑगस्ट २०२०

साप्ताहिक वीर महाराष्ट्र ऑगस्ट २०२०

साप्ताहिक वीर महाराष्ट्र ऑगस्ट २०२०

लिंक 


दैनिक जनमाध्यम अमरावतीने हा ब्लॉग ५ भागात प्रसिद्ध केला.





नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...