रत्नागिरी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक हा त्यांचा प्रवास
त्यांच्यातील अभ्यासूवृत्ती सांगणारा राहिला. जीवनात ज्याज्या ठिकाणी त्या
वावरल्या, वास्तव्याला राहिल्या तिथे प्रसंगानुरूप धावून जाण्याच्या त्यांच्या ममत्व
आठवणी अनेकांपाशी हृदयस्थ आहेत. एका बाजूला कर्तव्यदक्ष अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला संवेदनशील
मनाचा उमदेपणा अशा दोन टोकाच्या भूमिकांमध्ये गुंफलेलं जीवन विलक्षण ताकदीनं
जगणारी कवयित्री, लेखिका असलेल्या अपर्णा बेलोसे कदम यांचे व्यक्तिमत्त्व
अलिकडच्या काळात ‘सांजसोबत’ संस्थेतील शीर्षकामामुळे समाजाभिमुख झाले होते. जबाबदारीची
नोकरी आणि कुटुंब सांभाळून त्यांनी साद कवितासंग्रह, संसार वारीचा कथासंग्रह
आदि तीन पुस्तकेही
लिहिली. आपल्यासोबत काम करणाऱ्या तरुण सहकाऱ्यांना, ‘कसे आहात रे
! निवांत झालात की भेटायला या’ असं सहज बोलून आपलसं करणारा त्यांचा आवाज आता
ऐकायला येणार नाही. शाळा-महाविद्यालयीन जीवनातील आपल्यातील लेखन, वकृत्व, संवाद
कौशल्य, काव्य, नाट्य आदि अंगभूत कलागुणांना पुढील आयुष्यात प्रापंचिक कसरतीत
सांभाळणं, यथायोग्य खतपाणी घालून त्यांची जोपासना करत सतत कार्यरत राहणं हे तसं
कठीण. पण मॅडमनी तर या साऱ्या क्षेत्रात ‘परीक्षक’ होण्यापर्यंतची उंची गाठली. अलिकडे
कोल्हापूरला झालेल्या महिला नाट्य महोत्सव स्पर्धेकरिता त्या निमंत्रित परिक्षक
होत्या. आयुष्य
रसरसून जगायचं कौशल्य त्यांनी प्रयत्नपूर्वक साधलं होतं.
सोशल मिडीयावर पोस्टद्वारे सहज व्यक्त होत
मतांशी ठाम राहात, संपर्कातील इतरांचे विचारस्वातंत्र्य जपत त्यांनी
साधलेली मैत्री त्यांच्यातल्या प्रभावी संवादकौशल्याची जाणीव करून द्यायची. श्यामच्या
आईच्या जन्मशताब्दीनिमित्ताने चतुरंग प्रतिष्ठानच्या परिसंवादात त्यांनी ‘आई’च्या
बाजूने मांडलेली मते आजच्या काळात विचार करायला लावणारी. सांजसोबतच्या माध्यमातून दुर्गम ग्रामीण
भागातील वृद्ध दाम्पत्यांना असलेली आधाराची गरज ओळखून सुरु झालेलं काम आज
अनेकांच्या कौतुकास पात्र ठरलं आहे. चिपळूणचे ग्रामदैवत श्रीदेव जुना कालभैरव
देवस्थानने हल्लीच कोरोनाकाळात ‘सांजसोबत’ संस्थेला मदत दिली. यात देवस्थानच्या साड्या
आणि धोतरांच्या जोड्या होत्या. यातली काही वस्त्र देवीला नेसवलेली असल्याचे
कळल्यावर, ‘किती भाग्यवंत आमचे आई बाबा !’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या
होत्या. तिवरे धरणफुटीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध दाम्पत्याचे
उत्तरकार्य केल्यावर, ‘या दोघांना आम्ही अजून पाच वर्षे तरी जगवले असते’ हे
त्यांचं बोलणं कामावरील श्रद्धा सांगणारं होतं. इतरांना काळजी घेण्याचा मायेचा
सल्ला देणाऱ्या मॅडम अशा अचानक कश्या काय जाऊ शकतात ? ह्या विचाराने म्हणूनच व्यथित
व्हायला होतं.
मुद्रित माध्यमांत संपादकांना हव्या
असलेल्या दृष्टीनं दिलेला विषय लिहिण्याचं कौशल्य कमी होतंय ! किंबहुना असंही असतं
याची जाणीव नसलेल्या पिढीची रुजवात पक्की होत असताना मॅडमचं नैमित्तिक लेखन संपादकीय
दृष्टीकोन सांभाळून होतं. स्थानिक कलाकारांसोबत ‘हमिदाबाईची कोठी’ साकारताना
एकत्रित लय जमवणं निश्चित सोपं नव्हतं. पण त्याहीपेक्षा मॅडमनी ती कलाकृती राज्य
नाट्य स्पर्धेसाठी करायला स्वीकारणं आणि त्यातही ‘हमिदाबाई’चं आव्हानात्मक
व्यक्तिमत्त्व स्वत: पेलणं हेच मोठं धाडस होतं. आम्ही ग्रामीण पत्रकारितेत वावरताना,
अठरा वर्षांपूर्वी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर ‘प्रसार माध्यमे आणि साहित्य’
या विषयावरील भूमिका मांडल्यावर त्यांनी केलेलं कौतुक, अगदी दोन वर्षांपूर्वी,
नामवंत कवी अरुण म्हात्रे एका साहित्यिक सहलीच्या निमित्ताने कवीवर्य अशोक
नायगावकरांसोबत चिपळूणला आले असताना आपल्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावना आणि
प्रकाशनासाठी त्यांना भेटायला आलेल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या
संवेदनशील तितक्याच बेधडक लेखनाद्वारे सोशल मिडीयावर नियमित सक्रीय असलेल्या मॅडम
आता कायमच्या स्मरणबद्ध झाल्यात.
‘कार्यरत’ माणसं काही कळायच्या आतच अशी एक्झिट घेतात तेव्हा माणूस संपत चालल्याची जाणीव होते. तिन्हीसांजेचं विदारक जीणं जगणाऱ्यांची सोबत निमाल्याचं सत्य स्वीकारणं अनेकांसाठी वाटतं तितकं सोपं नाही. स्पर्धेच्या जंजाळात स्वतःला हरवून कणाकणांनी मातीचं देणं विसरू पाहणाऱ्या दुनियेत फारशी कुणाची वाट न बघता आपल्या स्वयंप्रेरित सहकाऱ्यांच्या बळावर ‘अपर्णा बेलोसे कदम’ नावाचा झरा पूर्ण क्षमतेने वाहात होता. अशातच ‘अचानक निमाल्या अपर्णा, झाल्या निशब्द संवेदना !’ ही स्थिती उभी राहिली असली तरी त्यांनी ‘सांजसोबत’ मळलेली पाऊलवाट विस्तारायला हवी आहे. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८
दैनिक सागरने १० ऑगस्ट २०२० रोजी प्रकाशित केलेली श्रद्धांजली पुरवणी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा