निवृत्त
होऊन त्यांना तीनेक वर्ष झालेली. वेगवेगळ्या सामाजिक कामात स्वतःला गुंतवून घेतलेले
असल्याने कोरोना काळातही ते जन्मभूमी ते कर्मभूमी असा सतत प्रवास करत राहिले. निधनापूर्वी
१५
ऑगस्टला मूळगावी ध्वजवंदन करून ते महाळुंगेला-पडवळ (आंबेगाव) येथे हुतात्मा बाबू स्मारकामध्ये
बैठकीला आलेले होते. मागच्या मार्च
महिन्यापासून, ‘जनता कर्फ्यू काळात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या सर्वांचे आभार !
कोरोना हटाव ! कोरोना नसता तर आपण राळेगणसिद्धी येथे भेटलो असतो ! कोरोना
मुक्तीनंतर कोकणात येणार आहे !’ असा सततचा संवाद साधणाऱ्या सरांच्या पाठीमागून बहुदा
‘कोरोना’काळ धावत असावा. १६ ऑगस्टच्या दुपारी त्याने सरांना गाठलं. सरांना अस्वस्थ
वाटू लागलं. मुलगा अवधूत आणि छोटे बंधू नंदकुमार (मो. ०९२२६३५८८७६) यांनी त्यांना सुरुवातीला
पारनेर आणि नंतर अहमदनगर मधील हॉस्पिटलला दाखल केलं. दुर्दैवाने त्यांचा कोरोना
रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आणि पुढं सारं बिनसत गेलं. १७ ऑगस्टला सायंकाळी साडेसहा वाजता
सरांनी अखेरचा श्वास घेतला. राज्यव्यापी उपक्रमांच्या निमित्ताने मोजक्याच परंतु
प्रभावी गाठीभेटी घडत असल्याने ते महाराष्ट्रभर परिचित होते. भूतान आंतरराष्ट्रीय
अभ्यास दौऱ्यातील त्यांचे आपलेपणाचे वागणे आठवून आज अनेकजण व्याकूळ होतात. अर्थात
सरांच्या कुटुंबाशी सर्वांचा फारसा संबंध असण्याचं कारण नव्हतं. म्हणूनच हा माणूस
आम्हाला सातत्यानं ‘भीमाशंकर’ भेटीचं निमंत्रण देत राहिला असावा. ‘पर्यावरण’ धाग्याने
जोडलेल्या आमच्यासारख्या राज्यभरातील अनेक सहकाऱ्यांना ते गेल्याची घटना कळली तेव्हा
रात्रीचे १० वाजून गेलेले. जो तो झोपायच्या तयारीत असलेला. सध्या ‘कोरोना’मुळे अशावेळी
कोणाला फोन करताना वा आलेला उचलता मनात शंका येते. म्हणून एका सहकाऱ्याने वैयक्तिक
व्हॉट्सअप मेसेज केला. लिहिलं होतं, ‘भीमाशंकरच्या शिंदेसरांचे निधन !’ मेंदूला
काही कळायच्या आतच मेसेज करणाऱ्याला फोन लावला. बोलणं झालं. मेसेज खरा होता. एव्हाना
मंडळाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरही चर्चा सुरु झाली. कोरोना दिवसागणिक अस्वस्थता वाढवत
असल्याची जाणीव झाली.
अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा
आणि पारनेर सीमेवरच्या गावात प्रतिकूल परिस्थितीत बालपण गेल्याने त्यांना शालेय
आणि महाविद्यालयीन जीवनात भेटलेले मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेबांच्या
सहवासाने, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्यातल्या पर्यावरण
विषयक कल्पनांना राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले. मंडळाचे उपाध्यक्ष जयसिंगराव
जवक हेही त्यांचे बालपणीचे मित्र होत. आबासाहेबांचा आणि त्यांचा परिचय सन १९७२
पासूनचा. बी.एड. झाल्यावर १९७७ साली एम.ए.च्या नोट्स घेण्याकारणे ते आबासाहेबांच्या
अधिक जवळ आले. चिपळूणला, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे ‘चौथे राज्यस्तरीय
पर्यावरण संमेलन’ (नोव्हेंबर २०१९) घेतल्यानंतर कोरोना लॉकडाऊन संकल्पनेची भारतात
रुजवात होण्यापूर्वी जागतिक वन आणि जल दिनाचे (२१ आणि २२ मार्च) औचित्य साधून मंडळाने
राळेगणसिद्धी येथे ‘पाणी व्यवस्थापन कार्यशाळा’ घेण्याचे निश्चित केले होते. ‘कोरोना’ विषाणूच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर
खबरदारीचा उपाय म्हणून कार्यशाळा नियोजन रद्द करताना आपल्याला यात आपला सहकारीही
गमवावा लागू शकतो याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती. पण दुर्दैवानं तेच घडलं. चिपळूण
पर्यावरण संमेलनातील संमेलनाध्यक्ष डॉ. उमेश मुंडलेंपासून उद्घाटक भाऊ काटदरे
(खवले मांजर तज्ज्ञ कमिटी सदस्य, आय.यु.सी.एन. स्पेसीज
सर्व्हायव्हल कमिशन), स्वागताध्यक्ष श्रीराम रेडिज, निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष
प्रशांत परांजपे, नामवंत इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे, गेली २५ हून अधिक वर्षे
सह्याद्रीत डोळस भटकंती करणारे नामवंत वन्यजीव अभ्यासक निलेश बापट आदिंची
अभ्यासपूर्ण सत्रे ऐकून ‘चिपळूणनगरी बहुआयामी आहे’ असे त्यांनी म्हटले होते. पर्यावरणासह
सांस्कृतिक, सामाजिक, सामुदायिक हिताची जपणूक झाली पाहिजे या मतासाठी आग्रही
असलेले शिंदे सर जीवनभर हे तत्त्व जपताना, जगताना दिसले.
मागच्या १२ मार्चला कर्नाटक
प्रवासात, ‘मला पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. पण
मला खरोखर हा पुरस्कार काय असतो याची कल्पना नाही’, अशी पहिली प्रतिक्रिया
देणाऱ्या १०६ वर्षीय पद्मश्री सालू मरदा थिमक्का यांचे दर्शन त्यांनी घेतले होते. त्यांच्या
पी.ए. सोबत चर्चाही केली. तसं आम्हाला कळवलंही ! मागच्या जागतिक पर्यावरण
दिनानिमित्त जंगल संपत्तीचं संवर्धन करणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत
प्रतिनिधींचा सन्मान केला होता. सतत कार्यरत असलेल्या शिंदेसरांचा धडधाकट फिटनेस
पाहाता ते गेल्याच्या वृत्तावर कोणाचा विश्वास बसेना. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा
अहुपे, राजपूर आदि तीन ठिकाणी त्यांनी आपला सेवाकाळ पूर्ण केला. ‘आम्ही शिंदेसरांना
वर्गात कधीही बसून शिकविताना पाहिलेलं नसल्याची भावना त्यांच्यासोबत काम केलेले
शिक्षक भांगे यांनी बोलून दाखविली. आपल्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय, शैक्षणिक
आणि आर्थिक मदत करण्यात त्यांनी पुढाकार घेतल्याचीही उदाहरणे आहेत. सर्व
प्रकारच्या भ्रष्टाचाराला त्यांचा कायम विरोध राहिला. कदाचित यामुळे सेवाज्येष्ठता
असूनही मुख्याध्यापक पदाने त्यांना हुलकावणी दिली. सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींशी
त्यांचा चांगला संपर्क होता. आपल्या मोबाईलमध्ये विविध क्षेत्रातील सुमारे अडीच
हजाराचा जनसंपर्क घेऊन जगणारा हा सेवेशी एकरूप झालेला अवलिया होता. युगप्रवर्तक
प्रतिष्ठानचे मार्गदर्शक, आंबेगाव भूषण पुरस्कार समितीचे अध्यक्ष आणि श्रीशारदा
प्रबोधिनी पिंपळगाव (घोडे) संस्थेशी त्यांचे स्नेहबंध होते. अनेक ठिकाणी त्यांनी
सढळहस्ते देणग्याही दिलेल्या. डिंबे (आंबेगाव) धरणाजवळ असलेल्या महाळुंगे बुद्रुक
गावच्या जि. प. शाळेत त्यांच्या पत्नी श्रीमती चंद्रकला शिंदे शिक्षिका म्हणून
कार्यरत आहेत. मोठा मुलगा प्रतिक आय.टी. इंजिनियर असून बेंगलोरला असतो. दुसरा अवधूत
हा मुंबई एअरपोर्टला इमिग्रेशन ऑफिसर असून त्याचं मागच्या २६ जुलैला लग्न झालेलं
होतं. मूळगावी, रांजणगाव मशीद येथे वृद्ध आईवडील आणि भाऊ नंदकुमार शिंदे आणि
त्यांचे कुटुंब वास्तव्याला असते. तीन वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यावर शिंदेसर
दोन्ही भागाशी सततचा सामाजिक संपर्क ठेऊन होते. निधनानंतर दोन दिवसांनी मोबाईलवर जेव्हा
आमचं त्यांच्या धाकट्या बंधूंशी, नंदकुमार शिंदे यांच्याशी बोलणं झालं तेव्हा ते ‘अस्थी’
ताब्यात घ्यायला अहमदनगरला निघालेले. आम्हांला त्यांच्याशी काय बोलावं हेच कळेना. नंदकुमार
बोलले, ‘सर खूप मोठा धक्का बसला हो ! खूप मोठा धक्का बसला. आता त्यांच्या अस्थी
आणायला चाललोय !’ वृद्ध आईवडील आणि कुटुंबातील जबाबदार मोठा घटक म्हणून सांभाळलेल्या
साऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या शिंदेसर आपल्या धाकट्या भावाकडे देऊन निघून गेले. पुढचं
बोलणं आम्हाला नीटसं ऐकू आलं नाही. फक्त रडण्याचा आवाज ऐकू येत राहिला. काहीही
बोलायला सुचलं नाही. काही सेकंदानी फोन कट झाला.
वयात जवळपास वीस वर्षांचे अंतर असताना शिंदेसर आम्हाला ‘सर’
म्हणायचे तेव्हा अवघडायला व्हायचं. एकदोनदा त्यांना तसं सांगूनही पाहिलं, पण त्यांनी
ऐकलं नाही. आमच्या लेखनाला दाद देणाऱ्या मोजक्या प्रतिक्रियांमधली एक प्रतिक्रिया
त्यांची असायची. ‘असेच लेखन आपल्या हातून होवो’, म्हणत अनेकदा ते जबाबदारीची जाणीव
करून द्यायचे. आबासाहेबांनी २००४ साली नोंदणीकृत केलेल्या पर्यावरण मंडळाचे ते
विश्वस्त होते. त्याच नात्याने आबासाहेबांकडून एखादा मुद्दा मान्य करून घेण्यासाठीच्या
चर्चेतला हक्काचा मध्यस्थ आधार म्हणजे शिंदेसर होते. कोरोना काळात जून-जुलै
महिन्यात मंडळाने राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या.
त्यावेळेस विलास महाडिक, प्रमोद मोरे आदि आम्हा सहकाऱ्यांजवळ त्यांनी, ‘मंडळाचा
विस्तार होतो आहे. आपण सक्रियपणे आबासाहेबांना साथ देता आहात. याचा आनंद वाटतो
आहे.’ अशा भावना व्यक्त केलेल्या. नव्या दमाच्या कार्यकारिणीसोबत काम करण्याच्या
त्यांच्या आनंदाला ‘कोरोना’ने सुरुंग लावला. त्यांचे जाणे आम्हा निसर्ग व सामजिक
पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या टीमसाठी अत्यंत वेदनादायी आहे. गोरखनाथ शिंदेसरांना
भावपूर्ण श्रद्धांजली !
धीरज वाटेकर
‘विधीलिखित’, १२६३-ब,
कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण
४१५६०५, जि. रत्नागिरी.
मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा