बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

अण्णा, ‘शतायुषी’ व्हा !

कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक, अचूक टायमिंग साधणाऱ्या सहजस्फूर्त नर्मविनोदी शैलीतील लेखन-संवादासाठी प्रसिद्ध असलेले अण्णा शिरगावकर ९१व्या वर्षात (५ सप्टेंबर २०२०) पदार्पण करीत आहेत. कोरोना संक्रमण काळात बोलताना अनेकदा अण्णा व्यथित झालेले जाणवले. सतत माणसांत वावरलेल्या अण्णांना ‘लॉकडाऊन’ मधला एकटेपणा असह्य करून गेला. दोन दिवसांपूर्वी बोलताना म्हणाले, ‘काल ... हे गेले. ...तेही गेले. आमच्या वयाची बरीच माणसं जात आहेत. वाईट वाटतं. आता शुभेच्छानी काय करायचं आहे ?’ आपल्या या बोलण्याला मध्येच ब्रेक देऊन अचानक त्यांनी ‘कोरोनामुळे वेळ वाया जातो आहे’, या पूर्वीच्या अनेक संवादातील विधानाला पूरक असलेलं, ‘कामे पडली अनंत | वेळ मात्र मर्यादित || म्हणुनी व्यर्थ गप्पात | कालक्षेप न की जे ||’ हे वचन ऐकवलं. तेव्हा त्यांच्या याही वयातील वैचारिक सक्रीयतेचा हेवा वाटला. त्याच जाणीवेतून लिहिलेलं अण्णांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारं हे ‘शब्दपूजन’ !

दोन वर्षांपूर्वी, अण्णांनी प्रकृती अस्वास्थ्याने जगप्रसिद्ध दाभोळमधील आपल्या 60 वर्षांच्या वास्तव्याला पूर्णविराम दिला. त्यांनी आपला मुक्काम नोव्हेंबर २०१८ पासून चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे आपल्या कन्येकडे हलविला. १९६० मध्ये ते दाभोळला वास्तव्यास आलेले. दाभोळमधील सहा दशकात त्यांनी कोकणच्या इतिहासाला अनेक नवे संदर्भ उपलब्ध करून दिले. एखाद्या छोट्याशा ओव्हळामधील माशाला नदीचा पत्ता गवसावा तसे काहीसे विसापूरहून दाभोळला आलेल्या अण्णांचे त्याकाळी झाले. कारण दाभोळ ही प्राचीन नगरी ‘दालभ्यपूरीहोती. दाभोळच्या डोंगरावरून दिसणारा बंदराचा नजराणा, धक्क्यावरील आदिलशहाच्या बीबीची अर्थात मॉंसाहेबांची मशीद, अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला, तांबड्या रंगाच्या मंगलोरी कौलांची घरं, खाडीपासून समुद्रापर्यंत पसरलेले माडांचे बन हा सारा नजराणा आणि त्यातच दाभोळ बंदरातून पैलतीरी वेलदूरला जाणारे मचवे, लॉंचेस होड्या आणि डुगडुग्या या सार्‍यांचे नजरेत सामावणारे चित्र पाहाण्याचा योग दाभोळच्या डोंगरावर जुळायचा. याच वातावरणात अण्णांच्या संशोधन आणि संग्राहकवृत्तीला खतपाणी मिळाले. दाभोळच्या खाडीला येऊन मिळालेल्या वाशिष्ठीच्या दोनही तीरावरील सांस्कृतिक, सार्वजनिक आयुष्यात अण्णा आयुष्यभर वावरले. गेली ७५ हून अधिक वर्षे डायरी लेखन करीत राहिले. बेताची आर्थिक परिस्थिती असूनही त्यांनी आयुष्यात असंख्य छंद जोपासले. अपरान्ताच्या साधनांसाठी ५० हून अधिक वर्षे डहाणूपासून कारवारपर्यंत धावपळ केली. दुर्मीळ वस्तूंचा संग्रह केला. वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन, वागण्यातील वक्तशीरपणा हे त्यांच्या कार्यपद्धतीतील आवर्जून दखल घेण्याजोगे गुण ! छंदी व्हा !हा विषय घेऊन लायन आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध शाळा, महाविद्यालयातून अण्णा महाराष्ट्रभर फिरले. ज्यातून असंख्य संग्राहक, अभ्यासकांनी प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्याला छंदांची सुगंधी किनार प्राप्त करून दिली.

एकविसाव्या शतकात, कोकणला आठ हजार वर्षापूर्वीचा प्राचीन इतिहास असल्याचे पुरावे उपलब्ध होत असताना काही दशकांपूर्वी, ‘कोकणला प्राचीन इतिहास नाहीहे शासकीय तज्ज्ञांचे म्हणणे ९ ताम्रपटांचा शोध घेणाऱ्या अण्णांनी आपल्या मेहनतीने खोडून काढले. कोकणचा स्वाभिमान जागवत, इतिहासाला कलाटणी देण्याचे काम केले. सतत धडपडणार्या माणसाचे आयुष्य जगत शिक्षणाचा अगर वडिलोपार्जित कर्तृत्वाचा वारसा नसताना आपल्या अभ्यासूवृत्तीने ते कोकण इतिहास संशोधनाच्या माध्यमातून जगभर पोहोचले. आजही कै. सौ. नंदिनी काकींच्या पश्चात वयोमानानुसार थकलेले अण्णा उपलब्ध वेळेत समाजालाअधिकचे काही देता येईल का?’ याच्याच विचारात असलेले अनेकांनी पाहिलेत. खरंतर सच्च्या इतिहासकाराबरोबर गप्पा मारण्याचा आनंद काही वेगळाच असतो. हे इतिहासकार फक्त अस्सल पुराव्यांच्या आधाराने बोलतात. मूळ नकाशे, आकडेवारी यांची सोबत आपल्या बोलण्यात घेतात. विषयाच्या अभ्यासातील अपुर्या जागा वास्तववादी तर्क लावून भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. कधी-कधी बखरीचाही आधार घेतात. भूतकाळाचे आकर्षक किंवा भावनोत्कट चित्र रंगवत नाहीत. अशा संवादातून माणसाची भूतकाळाबाबतची जाण वाढते. भूतकाळ साक्षात जीवंत करून त्याची वर्तमानाशी सांगड घालीत भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न असे इतिहासकार करतात. आदरणीय अण्णा आम्हाला अशा पठडीतील वरच्या श्रेणीचे वाटतात. अण्णांनी आपल्या आयुष्यात शिक्षण, सहकार, कामगार, ग्रामीण विकास, वाचन संस्कृती, अपंग संस्था, पंचायतराज, संग्रहालयशास्त्र आणि कोकणच्या प्राचीन इतिहासाचा शोध या विषयात मैलाचा दगड ठरणारे कार्य उभे करून ठेवले. राजकारणासारख्या विषयात माणूस एकदा अडकला की प्रसिद्धीचे वलय, कार्यकर्त्यांचा गोतावळा या सार्यातून दूर जाणे अवघड असते. अण्णांनी वयाच्या पन्नाशीनंतर जाणीवपूर्वक राजकारणातून समाजकारणात स्वतःला वाहून घेतले. आपल्या कामाला योग्य दिशा मिळावी म्हणून सन १९८३ मध्ये त्यांनी सागरपुत्र विद्या विकास संस्थास्थापन केली. सारा अपरान्त पायी तुडवून इतिहासाची अनेक साधने गोळा केली. ताम्रपट, लहान-मोठ्या तोफा, जुनी कागदपत्रे, पोथ्या, शिलालेख, तलवारी, बंदुका, खंजीर, जुनी नाणी, अनेक लहान-मोठ्या मूर्ती, सनदा, जुनी नक्षीदार भांडी आदि वस्तूंचा या साधनांमध्ये समावेश होता.  त्याकाळी दाभोळसारख्या फारशा सोयीसुविधा नसलेल्या गावातून एखाद्या छंदामागे बेभान धावत आपले कार्य सिद्धीस नेणे ही मोठी गोष्ट आहे. इतिहास हा कधीच कल्पित नसतो. तो कागदपत्रांवर आणि पुराव्यांवर आधारित असतो, हे अण्णांनी खूप अगोदरच निश्चित केल्याचे त्यांचा संग्रह अभ्यासल्यावर लक्षात येते. म्हणूनच अनेक अभ्यासकांना हृदयाला जागे करणारा स्वच्छ प्रकाश त्यांच्या मार्गदर्शनातून प्राप्त झाला आहे.

अण्णांच्या संशोधन कार्याने प्रेरित होऊन इतिहासाचे अनेक अभ्यासक दुरदूरहून आज शिरगावलाही येतात. अण्णा कोणालाही इतिहासात रमून जायला सांगत नाहीत. ‘इतिहासातून शिकण्यासारखे बरेच काही आहे’, हे त्यांचे सांगणे असते. गेल्यावर्षी त्यांनी, ‘एखाद्या गावाकडे पाहाण्याची संशोधकदृष्टी किती चिकित्सक असू शकते याचा आदर्श वस्तूपाठ घालून देणारा दाभोळमधील ६० वर्षांच्या वास्तव्याचा आलेख प्रकाशित केला. एखाद्या गावाची तटस्थपणे चिकित्सा करताना किती संदर्भ विचारात घेता येतात याचीही जाणीव व्हावी. आयुष्याच्या अगदी सुरूवातीला आपल्याला नक्की काय हवंय ? याचं मर्म उमजल्याने आयुष्याचा प्राधान्यक्रम निश्चित करून टाकीत जगाने ठरवून दिलेल्या चाकोरीबद्ध मार्गावरून मार्गक्रमण करण्यापेक्षा स्वतःला आनंद देणार्‍या निरूपद्रवी छंदांसोबत आयुष्य जगलेल्या अण्णांनी १४ पुस्तकांचे लेखनही केले आहे. पायाच इतिहासाचा असल्याने त्यांच्या लेखनात व्यापक संदर्भ, तत्वज्ञान, सखोल चिंतन, सूक्ष्म विश्लेषण भेटते. ९१ व्या अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने अण्णांमधील अद्वितीय छंदवेड्या संशोधकाला मनःपूर्वक दंडवत !

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

अण्णा शिरगावकर यांच्या छंदांविषयी आणि शेवचिवडा/व्रतस्थ या दोन पुस्तकांची ओळख करून देणारा लिहिलेला लेख वाचण्यासाठी खालील लिंक पाहा !

https://dheerajwatekar.blogspot.com/2017/04/blog-post.html

https://dheerajwatekar.blogspot.com/2020/04/blog-post_86.html

(अण्णा शिरगावकर यांचा पत्ता  आणि  संपर्क क्रमांक: c/o सौ. रिना रविंद्र लब्धे, नूतन बंगला, शिगवण महाराज मठाजवळ, मु.पो. शिरगाव, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी . ९५५२३३४४६५, ९९७५१६६८६५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...