बुधवार, २२ एप्रिल, २०२०

अण्णा शिरगावकर यांच्या ‘शेवचिवडा’ आणि ‘व्रतस्थ’ विषयी...!


तब्बल नऊ ताम्रपटांचे संशोधन करून कोकणच्या इतिहासाला प्राचीनतेचे संदर्भ बहाल करणारे दाभोळचे नामवंत इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णा शिरगावकर यांनी वयाच्या ८ व्या वर्षी आपल्या अनुभवसमृद्ध लेखणीतून ‘वाशिष्ठीच्या तीरावरून या संग्राह्यमूल्य असलेल्या अभ्यासपूर्ण ग्रंथाच्या लेखनानंतर ते अवघ्या आठ महिन्यात ‘शेवचिवडा आणि व्रतस्थ’ या दोन पुस्तकांसह वाचकांच्या भेटीस आले आहेत. यातील शेवचिवडा हे शिरगावकर यांनी आपल्या विनोदी आणि मिश्किल शैलीत लिहिलेले पुस्तक असून दुसरे 'व्रतस्थ' पुस्तक त्यांच्याच कार्याचा आढावा घेणारे, विविध मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे.

आयुष्याच्या अगदी सुरूवातीला आपल्याला नक्की काय हवंय ? याचं मर्म उमजलेल्या अण्णा शिरगावकर यांनी आपल्या आयुष्याचा प्राधान्यक्रम निश्चित करून टाकीत जगाने ठरवून दिलेल्या चाकोरीबद्ध मार्गावरून मार्गक्रमण करण्यापेक्षा स्वतःला आनंद देणार्या निरूपद्रवी छंदांसोबत आयुष्य जगण्याचं ठरवित, ‘आपल्या आयुष्याला वैशिष्ट्यपूर्ण आकार कसा  दिला ? याची मांडणी करणाऱ्या, गो. नी. दांडेकर, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, निशिकांत जोशी, भालचंद्र दिवाडकर, कुमार कदम, गोपाल अवटी, माधव गवाणकर, अंजली बर्वे, उषा धुरंदर, प्रा. रेणू दांडेकर, प्रा. सुहास बारटक्के, सुधांशु नाईक, यशवंत पाध्ये, डॉ. वि. म. शिंदे आदि मान्यवरांनी लिहिलेल्या ४२ लेखांचे संकलन यात आहे. विशेष म्हणजे दैनिक सागरचे संस्थापक-संपादक स्वर्गीय निशिकांत जोशी यांनी अण्णांवर दोनदा लिहीलेले ‘प्रवाह’ या त्यांच्या गाजलेल्या सदरातील लेखही यात समाविष्ट आहेत. आयुष्याच्या पन्नाशीत जिल्हा परिषदेच्या सभापती पदावरून पाय उतार झाल्यानंतर अण्णांनी अवघ्या वर्षभरातच पक्षीय राजकारणातून निवृत्ती स्वीकारत स्वतःला पूर्णवेळ समाजसेवी उपक्रमांमध्ये झोकून दिले होते. आपल्या कामाला योग्य दिशा मिळावी म्हणून सन १९८३ मध्ये त्यांनीसागरपुत्र विद्या विकास संस्थास्थापन केली, या साऱ्यांचा उल्लेख वजा इतिहास विविध मान्यवरांनी मांडला आहे. वाचन आणि लेखनाचे प्रचंड वेड असलेल्या अण्णांचा लोकसंग्रह फार मोठा राहिला आहे. जबरदस्त निष्ठा आणि हातात घेतलेले काम होणारच असा समोरच्यांच्या मनात भरावसा निर्माण करणारी त्यांची कार्यतत्परता यामुळे ख्रिश्चन, मुस्लिम आदिसंह सर्वधर्मीय त्यांचेवर शतप्रतिशत विश्वासून असतात. निव्वळ लोकसंग्रहाच्या बळावर सुमारे दहा-वीस मानाची पदे अण्णांकडे चालून आली होती असा इतिहास आहे.

वास्तविकत: कुठेही सापडणार नाही इतका हास्याचा साठा आपणा सर्वांच्या जीवनात असतो, परंतु त्याकडे  पाहाण्याची वैशिष्ट्यपूर्ण दृष्टी असावी लागते. त्या असलेल्या दृष्टीला शब्दात पकडण्याचे सामर्थ्य जर आपण जमवू शकलो तर आपले लेखन आणि भाषणही रक्त न सांडता परिणामकारक शस्त्रक्रिया करण्यात यशस्वी ठरते. कोकणचे नामवंत इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णा शिरगावकर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या, गुढार्थाने भारलेल्या परिणामकारक विनोदी ‘शेवचिवडा’ या लेखसंग्रहाबाबत आपण असे निश्चित म्हणू शकतो. मानवी जीवन सदा सुखी आणि आनंदी असावे असे सर्वांनाच वाटते, परंतु वास्तव जीवन काही प्रमाणात का होईना सुसह्य करण्याचे काम ‘विनोद’च करू शकतो. हसल्याने निर्भेळ आनंद मिळतो. आपले आरोग्य उत्तम राहाते. हे मर्म पटलेल्या ८८ वर्ष वयाच्या शिरगावकर यांनी, वर्तमान ताणतणावग्रस्त जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर  आपल्या जीवनाचे ‘हसा आणि हसवा’ हेच तत्व असल्याचे पुस्तकाच्या अगदी प्रारंभी सांगून टाकले आहे. त्यांचे मनोगतही इतके प्रभावी आहे की हे लेखन हास्यप्रधान आहे की हास्यास्पद आहे हे वाचकांनीच ठरवावे, असे सांगताना, सध्याच्या काळातील हास्यक्लबपासून आचार्य अत्रे यांच्या काळातील भाषणे आणि आजच्या काळातील ‘विदुषकी’ भाषणे अशी मांडणी करायला ते विसरत नाहीत. 

शिरगावकर यांचे हे प्रकाशित तेरावे पुस्तक आहे. लेखन विषयाचे व्यापक वाचन, पक्की तत्वज्ञानाची बैठक, सखोल चिंतन, सूक्ष्म विश्लेषण आणि अचूक टायमींग साधणाऱ्या सहजस्फूर्त मर्मविनोदाची जाण असणाऱ्या शैलीचे पुरावे पुस्तकात जागोजागी आढळतात. शिरगावकर हे पुराणवस्तू संग्राहक आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे सतत काहीनाकाही ‘दर्शनीय’ असतेच ! यातून मग पुढे येतो एक प्रश्न, ‘एवढ्या पुराणवस्तू मिळाल्या कशा ?’ या प्रश्नांचे उत्तर देणाऱ्या ‘दोन लाखाचा ताम्रपट मला मोफत मिळाला’ या लेखाने हा शेवचिवडा सुरु होतो. ग्रामीण भागात सहज संवादातून घडणारे विनोद, मैलोनमैल करावी लागणारी पायपीट, तिच्यातील गमतीजमती आणि मुख्यत: त्या काळातील कोकणच्या ग्रामीण भागातील वातावरणात वाचकाला रममाण होता येते. आयुष्यातील काही काळ रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात घालविलेले शिरगावकर आपल्या एका लेखात आजकाल सारखे पक्ष बदलणाऱ्या प्रवृत्तींवर बोट ठेवताना ‘लाकडे मसणात गेली आता पक्ष कसले बदलता ?’ अशी बोची टीका करतात. ‘राजकारण्यांची कॉमेडी एक्सप्रेस’ या आपल्या आणखी एका लेखात कालपरवापर्यंत एकमेकांना ‘लाखोली’ वाहणारे अचानक गळाभेटीत कसे रममाण होतात ? या वर बोट ठेवताना कोणत्याही कार्यक्रमाला राजकारण्यांसोबत येणारा आणि ‘टाळकुटी’चे काम करणाऱ्या पन्नास जणांच्या जमावावरही ते तिरकस शेरा मारतात. ‘माझ्या मरणाची कथा...!’ हा त्यांचा या लेखसंग्रहातील आणखी एक खुमासदार विनोदी लेख आहे. आपल्याच मरणाकडे तटस्थ पद्धतीने पाहात आपण मेल्यानंतर घडणाऱ्या घटना ते मांडतात. बायकोने फोडलेला हंबरडा, संसारातील वेचलेल्या लहानसहान घटनांचे, मेल्यानंतरच्या विविध सभांतील भाषणाबाबत लिहिताना समाजाच्या ‘ओठात एक आणि पोटात एक’ या वृत्तींवर सहज बोट ठेवण्याची किमया, लोकांच्या विनोदी अंगाने केलेले अचूक विश्लेषण यामुळे भरपूर हसविणाऱ्या या लेखात स्वतःचे मरणही जगण्याचा जबरदस्त प्रयत्न दिसतो. ‘इतिश्री गदर्भ पुराण आणि गाढवही गेले आणि ब्रम्हचर्यही गेले’ हे विनोदी कल्पनाविलास लेख मुळातून वाचण्यासारखे आहेत. चिपळूणच्या गोवळकोट धक्यांवरील तोफांचे विषयी लिहितानाही त्या तोफांसोबत फोटो काढून उगाचच पेपरात मिरवणाऱ्यांना ते खडे बोल सुनावतात. हे करताना अगदी सहजतेने संपूर्ण कोकणात कुठे किती तोफा आजही पडलेल्या आहेत याबाबतही भाष्य करतात. ‘जि.प. प्रशासनाची दहा वर्षे विकास कि भकास ?’ या अन्य एका लेखात तर ते तिथल्या संपूर्ण कामाचा उताराच काढतात. माजी आमदार स्वर्गीय डॉ. श्रीधर नातू यांच्यावरील ‘तात्यांचे स्वर्गारोहण’ हा सुद्धा त्यांचा असाच एक अप्रतिम विनोदी लेख आहे. ‘एखादा मृत्यू लेखही किती विनोदी असू शकतो ? त्याचा हा लेख उत्तम नमुना आहे. ‘गोपाळगडचा वारस अमेरिकेहून येत आहे’ हा लेख लेखकाच्या समाजातील सजग वावराचे जीवंत दर्शन घडवतो.   
   
नामवंत लेखक प्रा. सुहास बारटक्के यांची अभ्यासपूर्ण, बोलकी आणि समर्पक प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. ‘चव पाहू या !’ म्हणत वाचायला घेतलेला आणि सहज फस्त झालेला, ‘विनोदाची शेव मारलेला टेस्टी चिवडा’ अशा शब्दात बारटक्के यांनी लेखकाच्या लेखन कौशल्याचे कौतुक केले आहे. शेवचिवड्याची ही प्रस्तावना-लेखकाच्या मनोगताची डिश, त्यातील संकीर्ण लेखांचे भाजलेले पोहे, व्यक्तीविशेषाचे खोबरे-लसूण-तेल, निवडक कवितांएवढे मीठ, महत्वाच्या भाषणांचा मसाला, ‘चंपूबाई’ कथेची फोडणी आणि विनोदी लेखांची शेव मारलेला हा चिवडा वाचकाला पुरेपूर आनंद देऊन जातो.        

व्रतस्थ (अण्णा शिरगावकर लेखसंग्रह)
संपादन : धीरज वाटेकर  
प्रकाशक : निसर्ग प्रकाशन (पेढे-चिपळूण)
पृष्ठ : १६४  किंमत : १७५.००
संपर्क :  ९४२२३७६४३५, ९९७५१६६८६५

शेवचिवडा (लेखसंग्रह)
लेखक : अण्णा शिरगावकर
प्रकाशक : निसर्ग प्रकाशन (पेढे-चिपळूण)
पृष्ठ : २००  किंमत : २००.००
संपर्क :  ९४२२३७६४३५, ९९७५१६६८६५



धीरज वाटेकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...