करोना लॉकडाऊन मधील सायंकाळ
(१२ एप्रिल). सूर्यास्त होऊन गेलेला. पक्ष्यांच्या कर्कश्श कलकलाटाने लेखनातली तंद्री
भंगली. बाहेर पाहिलं तर जवळच्या चाफ्याच्या झाडावर शेजारचं मांजर चढलेलं. काळजाचा
ठोकाचं चुकला. ताड्कन खुर्चीतनं उठलो नि मांजराच्या दिशेने सरसावलो. मांजर काही
खाली उतरेना. मिजाशीत असलेलं. इच्छा नसताना काठीनं एक फटका दिल्यावर पळालं खरं !
पण तोवर खूप उशीर झालेला. रेड व्हेंटेड बुलबुलची (लाल बुडाचा बुलबुल) तीन अंडी त्याच्याकडून
फस्त झालेली. अतीव दु:ख झालं. लेखनातल्या तंद्रीनं पक्ष्यांचा कलकलाट समजायला मलाच उशीर झालेला. गेल्यावर्षी कावळ्याने आणि
यावर्षी मांजराने, हा डाव साधलेला...!
खूपसं उंचीवर गेलेलं म्हणून
गेल्या पावसाळ्यात पाच फुटांवर चाफा तोडलेला. तिथूनच लगेच तो चारही दिशांना फुटला.
नववर्षी चांगला वाढून एव्हाना हिरव्यागार पानांनी गच्च भरलेला. त्याच्या
बेचकीतल्या जागा बघून बुलबुलनं बहुदा याला निवडलेलं. न राहवून रात्री चाफ्याच्या
झाडाकडं पाहिलं. पाच फुटाचं ते झाडंही आता मेल्यागत झालेलं. पानंही स्तब्ध ! लालबुड्या बुलबुलच्या (याच्या शेपटीच्या
बुडाखाली लाल रंगाचा डाग असतो) वेदना त्यांनाही जाणवल्या असतील. लवकरच चाफ्याच्या
अंगाखांद्या-फांद्यांवरच्या घरट्यात छानसं बालपण नांदणार होतं. चाफ्यानंही
त्यांच्यासाठी म्हणून स्वप्न पहिली असतीलं. गेल्यावर्षी जास्वंदाची आणि यंदा
चाफ्याची सारी स्वप्न एका क्षणात मातीमोल झालेली. अंडी उबवायला लागणाऱ्या १४
दिवसांपैकी पहिल्या ४/५ दिवसातच सगळं संपलेलं. धावणाऱ्या जगासोबत धावताना
गेल्यावर्षी भावना शब्दबद्ध करायला उसंत नव्हती. यंदा नियतीनं ‘करोना’ नावानं ती
पदरात टाकलेली. म्हणून हे खरडायला झालं. साधारण तीन/चार वर्षांपूर्वी अश्याच
उन्हाळ्याच्या दिवसात रेड व्हेंटेड बुलबुलची नुकतीच घरट्या बाहेर आलेली इवलीशी
पिल्लं उंबराच्या फांद्यांवर बसलेली दिसलेली. त्यांचे आई-बाबा जवळपास वावरत होते
तेव्हा. ते दृश्य पाहून फार आनंद झालेला. खरतरं पिल्लांच्या जन्मानंतर
नर आणि मादी बुलबुलांचे हावभाव बदलतात. क्वचित चिंता, खाण्यासाठीची धावपळ आणि
आनंदाचा कल्लोळ दिसतो. बुलबुल, पिल्लांना चोचीतून चोचीत भरवतात. पिल्ले तेव्हा माना
उंच करतात. ते दृश्य पाहाणे अवर्णनीय सुखकारक असते. माता, पिता आणि पिल्लांच्या
ममतेचा झरा वाहत असतो तेव्हा घरट्य़ात. मादी बुलबुल रात्री पिल्लांना पंखांच्या उबेत घेऊन बसते. पिल्लांना
रात्री भूक लागली तर इकडेतिकडे फिरते. आठ / दहा दिवसांत पिल्लं बाळसं धरतात.
त्यांना पंख फुटू लागतात. निसर्गात भरारी घेण्याची त्यांची धडपड चालू होते हे सारं
नजरेला पुन्हा टिपायचं होतं. बुलबुल आपल्या पिल्लांसमोर स्वत:चे पंख फडफडवून, उडून
दाखवतात. मग पिल्लं त्यांचं अनुकरण करतात. मातापित्याच्या अनुकरणात पिल्लांचा उडायला
शिकतानाचा हा रोमांच पूर्वी पाहिलेला.
गेल्यावर्षी २०१९ला याच
मोसमात पाचचं फुट उंचीच्या जास्वंदावर रेड व्हेंटेड बुलबुलनं घरटं केलेलं. बुलबुल फिमेल
एकावेळी २ ते ५ अंडी देते. गेल्यावर्षीही तिनं तीन अंडी दिलेली. दुर्दैवाने कावळ्यानं
ते पाहिलं. त्याला बघवलं नसावं. सर्वपित्री आमावस्येला बोलवूनही न येणारा कावळा घरट्याच्या
वासानं मात्र न बोलविता आला. त्याचे प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्नही केलेला.
घरट्याला नारळाच्या झावळ्यांचा आडोसाही करून पाहिला. पण उपयोगशून्य. घरट्यात अंडी आहेत
की पिल्लं ? हेही नीटसं माहित नसलेल्या कावळ्यानं, मी घरात नसतानाची वेळ साधली.
आपल्या चोचीनं रागारागानं प्रहार करून सारं घरटंचं उद्ध्वस्थ केलं. घरी आल्यावर
सायंकाळी पाहिलं तेव्हा अंड्यांची फिकट गुलाबी आणि त्यावर जांभळट रंगाचे ठिपके असलेली कवचं फुटून खाली पडलेली. काय
मिळालं असेलं कावळ्याला असं वागून ? खूप राग आलेला तेव्हा मला त्याचा. यंदा पुन्हा
बुलबुलनं घरच्या ऑफिसच्या दारापासून पाच/सात फुटांवरच्या चाफ्यावर घरटं करायला
घेतलेलं. चिरंजीवानं ते पहिल्यांदा पाहिलं. मला दाखवलं. परसदारी त्याचं लक्ष छान
असल्याचा हेवा वाटलेला. बघताबघता कुठल्याश्या गवताच्या छोट्या डहाळ्या, पानं आणि वाळलेल्या काड्या एकात एक गुंफून वाटग्याच्या क्वचित द्रोण आकाराचं घरटं साकारलेलं. सहसा न दिसणाऱ्या दाट झुडपांत साधारणत १ ते ३ मी. उंचीवर हे घरटं असतं, तसंच
होतं. पण तरीही मनात धाकधूक होतीच. तेव्हापासून रेड व्हेंटेड बुलबुलच्या घरट्यावर दुरून नजर ठेवून
होतो. आपण जवळ जावं तर शत्रूंना कळण्याचा धोका. अशातच गेल्या आठवड्यात सायंकाळी शेजारच्या
या मांजराला झाडाजवळ घुटमळताना पाहिलेलं. मी समोरचं उभा असल्यानं जवळ यायची त्याची
हिंमत झाली नव्हती. माझ्या मनात शंकेची पाल तेव्हाचं चुकचुकलेली. सायंकाळी वाईट का
चिंतावं ? म्हणून विचार सोडून दिलेला. नि आज सायंकाळी हे घडलं. बुलबुल सारख्या छोट्या
पक्षांच्या अंड्यांवर कावळा, भारद्वाज यांच्यासह उंदीर, मांजर, साप, पाल हे
शत्रू नजर ठेवून असतात. परसदारी या सर्वांचीच उपस्थिती असलेली.
आदल्या दिवशी सायंकाळी (११
एप्रिल) चिपळूणात पाऊस शिंतडलेला. इवल्याश्या घरट्यात आपल्या तीन अंड्यांसह रेड
व्हेंटेड बुलबुल सावरून बसलेली. घरट्यात अंडी घातल्यापासून जवळपास वावरणारी रेड
व्हेंटेड बुलबुलची फिमेल आता गायब झालेली. मांजरानं हल्ला चढविल्यावर मदतीसाठी रेड
व्हेंटेड बुलबुलनं आक्रोश केला असेलं. नवागतांचा जन्मोत्सव साजरा करण्याची इच्छा
बाळगणारा मी अभागी, लेखनात बुडालेला ! पत्नी आणि चिरंजीव अन्यत्र बॅडमिन्टन खेळत असलेले. बुलबुलला काय
वाटलं असेलं ? विचार करत असतानाच डोळ्यांसमोर अंधार पसरला. रेड व्हेंटेड बुलबुलला मी
वेड्यासारखा शोधत राहिलो...!
धीरज वाटेकर
चिपळूण.
मो. ९८६०३६०९४८
ई-मेल : dheerajwatekar@gmail.com
ई-मेल : dheerajwatekar@gmail.com
दैनिक सकाळ रत्नागिरी २० एप्रिल २०२० |
साप्ताहिक कोकण मिडिया रत्नागिरी १७ एप्रिल २०२० |
दैनिक महासत्ता इचलकरंजी/कोल्हापूर/सांगली/बेळगाव १७ एप्रिल २०२० |
दैनिक प्रहार रत्नागिरी १७ एप्रिल २०२० |
दैनिक उद्याचा मराठवाडा नांदेड १६ एप्रिल २०२० |
दैनिक जनमाध्यम अमरावती २० एप्रिल २०२० |
पवना समाचार पुणे १६ एप्रिल २०२० |
दैनिक रत्नागिरी एक्सप्रेस १६०४२०२० |
दैनिक लोकमत (रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आवृत्ती) लोकमंच पुरवणी ११ जून २०२० |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा