आज २२ मे ! जागतिक जैवविविधता दिन ! सध्याच्या ‘कोरोना’स्थितीत अनेकांना
जैवविविधतेचे विविध नजारे पाहायला, कॅमेऱ्यात टिपायला, शब्दबद्ध करायला मिळत आहेत.
असाच एक नजारा
लॉकडाऊन एकमधील चैत्र पौर्णिमेच्या (७ एप्रिल) पूर्वसंध्येला अनुभवलेला ! सन १९९३ पासून जगभर जैवविविधतेचा प्रचार आणि प्रसार व्हावा
यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. ज्या भूप्रदेशाची जैवविविधता जास्त, तिथले लोक
जगात सर्वात जास्त आनंदी आणि समाधानी असतात. हे जगाने मान्य केलेलं तत्त्व, मागे
२०१८ च्या दीपावली सुट्टीत ‘भूतान’मध्ये आंतरराष्ट्रीय निसर्ग आणि पर्यावरण अभ्यास
दौऱ्यादरम्यान अनुभवलेलं. आर्थिकदृष्ट्या गरीब आणि जैवविविधतेच्या दृष्टीने
श्रीमंत असणारं भूतानी जगणं ‘कोरोना’मय जगाला स्वीकारावं लागणार आहे. हे अनेकांना
कळलंय ! आजच्या दिनी आपण निसर्गातल्या एका जैवविविधतेची सफर करू यात !
...तर
लॉकडाऊन एकमधील चैत्र पौर्णिमेची पूर्वसंध्या ! सायंकाळचे सात वाजून गेलेले. ठिकाण
कोकणातल्या खेड तालुक्यातील सोनगाव भोईवाडी धक्का (बंदर) ! ‘अत्यावश्यक सेवा’
कारणांन्वये अचानक जाणं झालेलं. गेल्या १२/१५ वर्षांत खाडी किनाऱ्यावरच्या लोकांच्या
हाताला फारशी न लागलेली शिवलं (तिसऱ्या / शिंपले) तुलनेने मोठ्या प्रमाणावर मिळू
लागलेली. ‘कोरोना’ संचारबंदीत त्या शिवल्यांच दर्शन घेऊन निघालेलो. सायंकाळच्या
प्रवासात वाशिष्ठी खाडी किनाऱ्यावरून, ५/६ किलोमीटरची पैदल झालेली. चैत्र
पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चंद्राच्या शीतल छायेतील पदभ्रमणाने, शिवल्यांच्या ताज्या
दर्शनाने माझ्यातल्या ‘शाकाहारी’ अंतर्मनालाही नैसर्गिक उभारी मिळाली.
सकाळी
पावणेअकरा वाजता शहरातील ग्लोबल चिपळूण टुरिझम पर्यटन संस्थेचे चेअरमन आणि एसआर.
रेडिज पेट्रोल पंपाचे मालक श्रीरामशेठ रेडिज यांचा फोन आलेला. बरचसं बोलणं
व्हाट्सअपवर किंवा व्हाया होत असल्यानं रामशेठ यांचा थेट फोन महत्वाच्या कामाशिवाय
येत नाही. भेटी नियमित असूनही त्यांचा शेवटचा फोन मागच्यावर्षी ६ नोव्हेंबरला
आलेला. फोनवर ३/४ मिनिटं बोलणं झालं. म्हणाले, ‘अरे धीरज ! पंपावर माणसं कमी
झालीत. अत्यावश्यक सेवेचा पास आहे माझ्याकडे. काही मुलांना भेटायला धामणदेवी,
सोनगाव भागात जाऊ यात. विलास महाडिक गुरुजींना बोललोय. बरेच दिवस चालणंही झालेलं
नाही. खायला चटणी-भाकरी नेऊ. कामही होईल. तू सायंकाळी ४ वाजता तयार राहा.’ फोन कट
झाला. त्यानंतर अवघ्या ७/८ मिनिटात, घरगुती गरजेपोटी दुचाकी घेऊन बाजारात आलेल्या
मला ‘कोरोना निमित्त पोलिसी दंड प्रसाद’ मिळालेला. घरी आलो तर चिरंजीवाचं अंग
किंचित गरम जाणवू लागलेलं. ताप व्हायरल असला तरी जाहीर ‘शिंकणं’ धोकादायक असल्याच्या
काळात तोही भितीदायकच ! जाव की नको ? असं झालेलं. सायंकाळी रामशेठ आणि विलास
महाडिक गुरुजींचे फोन यायला लागले. ३/४ वेळा फोन येऊन गेल्यावर गुरुजींशी बोललो.
म्हणाले, ‘तू फोन उचलला नाहीस. शेठ घरी यायला निघालेत. तयार राहा.’ इतक्यात शेठ
दारात ! आता निघायलाच हवं. हावऱ्यासारखी कॅमेऱ्याची बॅग सोबत घेतलेली. पण उगाच
अडचण नको म्हणत शेठनी ठेवायला सांगितली. खेंडीतल्या घरातून गुहागर बायपासमार्गे
कोल्हेखाजण लेणी, लाईफकेअर हॉस्पिटलमार्गे फरशीवर आलो. वाटेत बायपास, उक्ताड,
गोवळकोट सीमा कमान आणि फरशी तिठ्यावर पोलिसी पहारा. रस्त्यावर वर्दळीचा पूर्ण
अभाव. शेठच्या दुचाकीवर पुढे ‘अत्यावश्यक सेवा’ असं ठळक शब्दात लिहिलेला कागद
चिकटवलेला. मी त्यांच्या सोबत आल्यानं प्रवास जमून आलेला. पेढ्यात श्रीपरशुराम
सानिद्ध्य निसर्ग पर्यटन केंद्रात महाडिक गुरुजींकडे पोहोचलो. पाणी-पोटपूजेसाठी काही
साहित्य पिशवीत घेतलं. पुढे निघालो. वाटेतल्या पिंपळपार दत्तमंदिराजवळ मदतीचा पहिला
थांबा घेतला. पुढे निघालो.
वाशिष्ठीच्या
किनारवर्ती भागात असलेल्या पेढे-धामणदेवी-सोनगावच्या ‘सीमा’ खरंतर समजून न याव्यात
इतक्या एकमेकांत मिसळलेल्या. पण आज रस्त्यात काठ्या आडव्या टाकून बंद करण्यात
आलेल्या. आपण निसर्गाचे हाल-हाल केले, म्हणून हे असलं ‘कोरोना’ जीणं आपल्या नशीबी
आलं असावं. निसर्गमार्गांवरून मुक्त विहरण्याची सवय असल्यानं काठ्यांनी बंद
केलेल्या रस्त्याकडे पाहावेना. त्यातून वाकून पुढे सरकलो. वाटेत दुतर्फा मोजके
‘गाववाले’ शेतीच्या, सुकलेला लाकूडफाटा गोळा करण्याच्या गडबडीत. काही उत्साही मंडळी
खेकड्यांच्या मागावर आलेले. सोनगाव हद्दीत आल्यावर एका पडक्या झोपडीजवळच्या
रिकाम्या जागेत दुचाकी पार्क केल्या. चालायला सुरुवात केली तेव्हा सायंकाळचे सव्वापाच
वाजून गेलेले. वाटेतल्या निरोपाची कामं पूर्ण करीत सव्वासहा वाजता सोनगाव भोईवाडी
धक्क्यावर पोहोचलो. आता खाडीपलिकडील समोरच्या डोंगरात भिले गावातील ब्राह्मणवाडी,
भुवडवाडी, सुतारवाडी दिसू लागलेली. शहरातल्या वातावरणात वीजेच्या तारेवर एका सरळ रेषेत
दिसणारी वेडाराघूची वसाहत पूर्वेकडच्या एका पर्णहीन झाडावर किलबिलाट करत होती. चालून
तासभर झाल्यानं पोटात किंचित भूक असलेली. तशी खाण्याची आवश्यकता नव्हती. पण...
कल्पना करा ! कोकणात खाडीकिनाऱ्यावरच्या धक्क्यावर तुम्ही उभे आहात. खाडीत दूरवर २/४
होड्या विहरताहेत. रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणाने बाधित झालेला हा परिसर असला
तरी कोरोना लॉकडाऊनमुळे हवा-पाण्यातल्या प्रदूषणाची पातळी कमालीची घसरलेय.
त्याच्या आनंदछटा निळ्याशार आकाशात पसरल्यात. पश्चिमेला सूर्यदेव अस्ताला निघालेत.
बरोबर विरुद्ध दिशेस चंद्रमा पूर्णांशाने भेटीस आलेला. किंचित दमलेल्या जीवाला
बसायला सांगणारी छानशी कॉक्रींटची दोन बाकडी वाट पाहताहेत. अगदीच नाही म्हणायला
४/२ तरुण मंडळी हातात मोबाईल घेऊन उगाचच इकडं-तिकडं करणारी. अशा वातावरणात जवळ
असलेली चटणी-भाकरी कुणाला गोड नाही लागणार ? शेठनी हाक मारून तिथल्या कुणा
ओळखीच्याला बोलावलंनी. निसर्गानं ओढल्यानं मी १५ मिनिटं मोबाईलचा कॅमेरा चालवत
राहिलेलो. पिशवीतनं या दोघांसाठी भाकरीसोबत अंडा-मसाला आणलेला आणि मला भेंडीची भाजी,
लसणीची चटणी. अर्थात अचानकच्या या अन्नाला यावी तशी उत्तम चवही आलेली.
झालं
! निरोपाची कामं, चालणं आणि आता रम्य ठिकाणी बसून खाणं उरकलेलं. पावणेसात वाजता
सूर्य अस्ताला गेला तशी चंद्राची माया अधिक जवळची वाटू लागलेली. आता परतीचं अंतर
कापताना तिचाच आधार असलेला ! जेमतेम सात वाजले असतील. मगाच दूरवर खाडीत विहरणाऱ्या
२/४ होड्या जवळ येऊ लागलेल्या. धक्क्यावरची लगबग वाढलेली. तिथल्या चर्चेचा कानोसा
घेतला तेव्हा कळलं या बोटी शिवलं पकडायला गेलेल्या. गेल्याप्रमाणे त्यांना शिवल्या
मिळालेल्या. माझी उत्सुकता पाहून कोणीतरी तरुण आपणहून सांगायला पुढं आला. म्हणाला,
‘पूर्वी १२/१५ वर्षांपूर्वी या खाडीत आम्हांला शिवल्या भरपूर मिळायच्या. नंतर बंद
झालेल्या. पण गेल्या दोन आठवड्यापासून पुन्हा मिळू लागल्यात.’ त्याचं हे वाक्य
ऐकून मी एकदम चमकलो. कोरोना लॉकडाऊनमुळे निसर्ग चक्रातील जैवविविधता सध्या आनंदली
आहे. निर्मनुष्य वातावरणात विहरते आहे. याची अनेक उदाहरणे ऑनलाईन/पीडीएफ
वर्तमानपत्रातून वाचनात, चॅनेल्सवर पाहाण्यात येताहेत. हे तश्यातलं ! या साऱ्या
घटनाक्रमात आवर्जून नोंदवून ठेवावं असं काहीसं उमगलेलं. मगं शिवाल्यांकडं थोडं
त्या दृष्टीनं पाहिलं. गावात, शिमग्याला आलेले चाकरमानी मुंबईला परतलेले. मात्र आज-उद्या
जाऊ म्हणणारे इथेच अडकलेले. अशांची संख्याही बरीच. समोरच्या बोटीत यांचीच उपस्थिती.
एव्हाना होड्या धक्याला लागल्या. प्रत्येक होडीतली ४/२ माणसं बाहेर येऊ लागली.
येताना त्यांच्या खांद्यावर शिवल्यानं भरलेली पोती होती. काहींच्या हातात शिवलं
पकडायला लागणारं गोलाकार जाळं होतं. पोतं / पिशवी कमी पडल्यानं कोणी बोटीतच
ठेवलेल्या शिवल्या घमेल्यातून धक्यावर आणण्यात व्यस्त. बाहेर आणलेल्या शिवल्या धक्क्यावर
पसरल्या गेल्या. यातल्या तुटलेल्या हुडकून बाजूला काढण्याचं काम सुरु झालेलं.
उरलेल्या किलोवर विकायच्या असलेल्या. किंवा घरात संपेपर्यंत खायच्या ! आमच्या ३
किलो हव्या असताना कुणाच्या खिशात सुट्टे पैसे नाहीत म्हणून १० किलो घेतलेल्या. त्यांचा
धंदा झाला. मला दृश्य न्याहाळण्यासाठी किंचित अधिक वेळ मिळाला.
...तर
या शिवल्या खाडीतल्या खोल पाण्यात किंवा किनाऱ्याला मिळतात. धक्क्यावर आणलेल्या किनाऱ्याला
मिळालेल्या. शिवल्या मातीत असतात. गोलाकार जाळ्यानं पाण्यातून मातीसकटं पाण्यावर आणायच्या.
माती चाळवून नेमक्या बाजूला गोळा करायच्या. शिवल्या सुरुवातीला पाण्यात उकळतात. त्यामुळे
त्या सुट्ट्या होतात, उघडल्या जातात. दोनपैकी एका बाजूला अधिक माष्ट (मांस) असते.
दुसऱ्या बाजूचे माष्ट खरवडून घेतले जाते. काही ठिकाणी जास्त माष्ट असलेल्या
शिवल्यांचं तसंच कालवण करतात. काही ठिकाणी त्यातलं फक्त मांस (फ्लेश) कालवणासाठी,
सुकं करण्यासाठी वापरतात. क्वचित वेळा शिवल्याच्या आत छोटे खेकडेही मिळतात. पाण्यात
उकडल्यानं शिवल्यांमधील प्रोटीन वाया जातात. पण तशाच कापणं जिकिरीचं काम. काही लोक
त्यांना स्वच्छ धुवून अर्धा तास पॅक डब्यात घालून डीप फ्रिझरमध्ये ठेवतात.
अर्ध्यातासाने त्यांची तोंडे आपोआप उघडतात. ज्या शिवल्यात माती असते त्यांचे तोंड
उघडले जात नाही म्हणे. या शिवल्या बाहेरून जितक्या ओबडधोबड तितक्या आतून सुरेख निळसर,
गुलाबी, पांढरी झाक असलेल्या असतात. शिवल्यांचा हंगाम तसा बारमाही. पण कधीकधी
एप्रिल / मे महिन्यात किंवा ऑक्टोबरात इतक्या मिळतात की घरोघरी याच शिजाव्यात.
इथल्या भोईवाडीची सध्याची अवस्था तशी. शिवल्या पोत्यांनी आणून, उकडून, सुकवून
पावसाळ्याची बेगमी म्हणूनही ठेवल्या जातात. यांच सुकवलेलं माष्ट बाजारात विकत मिळतं.
शिवल्या शक्यतो वजनावर घेऊ नयेत म्हणतात. पण इथं तशाच विकल्या जात होत्या. २०
रुपये किलो दरानं ! शिवल्यातून कॅल्शिअम मिळत असलं तरी त्याला मांसाहारात मानाचं
पान मिळालेलं नाही. लोटे-परशुराम हे दाभोळच्या वाशिष्ठी खाडी किनाऱ्यावरचं कोकणातलं
रासायनिक औद्योगिकीकरण झालेलं महत्त्वाचं केंद्र. रासायनिक कंपन्यातून निर्माण
होणारं सांडपाणी याच खाडीत सोडलं जातं. किनाऱ्यावरच्या मच्छिमार समाजाचा मासेमारी
हाच मुख्य व्यवसाय. सध्या प्रदूषणाने ग्रासलेला. रसायन मिश्रित पाण्यामुळं
माशांच्या प्रजननशक्तीवर परिणाम होऊन आता खाडीत मासळी मिळेनाशी झालीय. औद्योगिकीकरण
यशस्वी करताना कंपन्यांनी प्रदूषित पाणी खाडीत सोडताना किमान मासे जीवंत राहातील
अशा स्थितीत सोडायला हवं. मच्छिमारांची ही अपेक्षा रास्तचं ! या पार्श्वभूमीवर हे
चित्र दिसलेलं.
पृथ्वीवरील थक्क करणाऱ्या जैवविविधतेच्या जनजागृतीसाठी जगभर हा दिवस
साजरा होतो. भारत सरकारने सन २००२ मध्ये याबाबत कायदा बनवला. महाराष्ट्रात सन २००८
पासून जैवविविधता नियम लागू झालेत. सन २०१२ मध्ये जैवविविधता मंडळ स्थापन झाले आहे.
सध्या
जैवविविधतेतील स्वच्छता वेगवेगळ्या रुपात मानवाला अनेक गोष्टींचे दर्शन घडवते आहे.
लॉकडाऊन ३ मध्ये दिनांक १० मेला चिपळूण तालुक्यातील रामपूर येथील ताम्हाणे-तांबी
तलावात मगरीच्या हल्ल्यात गाय मृत्युमुखी पडली. वाशिष्ठी खाडीतील ‘क्रोकोडाईल
टुरिझम’मध्ये आम्ही खाडीकिनारी विसावलेल्या मगरींच्या शेजारी ५/७ फुटांवर निवांत
चरणाऱ्या म्हशी पहिल्यात. त्यामुळे ही घटना अनेक अर्थाने विचार करायला लावणारी. याच काळात पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून ३८८ गावे
वगळण्याचा राज्यसरकारचा निर्णय समोर आला. कोरोना काळात आम्हाला असे निर्णय घ्यायला
सुचतात, हे अनाकलनीय आहे. खाडी किनाऱ्यावरची ही सफर आम्हांला शिवल्यांवर
लिहायला प्रवृत्त करून गेली. जैवविविधता संदर्भात
स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला तर अनेक अडचणी समजतील.
जैवविविधता साक्षर होणं ही ‘कोरोना’युक्त काळाची गरज बनणार आहे. असो ! जागतिक
जैवविविधता दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !
धीरज वाटेकर, चिपळूण.
मो. ९८६०३६०९४८.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा