गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

जिद्द केवढी फुलण्याची !

गेल्या महिन्याभरापूर्वीपासून तीन कळ्या अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या या अकरा इंच उंचीच्या दुहेरी तगरीची जिद्द मागच्या (२२ एप्रिल) वसुंधरादिनी फळाला आलेली. तिची शेवटची, तिसरी कळी नेमकी आज, महाराष्ट्र दिनी फुलली. संपूर्ण विश्वात ‘करोना’चे ढग वास्तव्याला असताना तगरीतली फुलण्याची ही जिद्द आम्हाला विशेष भावली. साधीशी फांदी ती ही ! गेल्यावर्षी पावसाळ्यात लावलेली. कधी मोठी होणार ? कधी फुलणारं ? कुणास ठाऊक ? लावलेली तशी जगलेली. जगलेली म्हणून परसदारी असलेली. पण तिचं हे आजचं फुलणं मनाला केवढं तरी समाधान देणारं ! अंधाऱ्या वातावरणात एवढ्याच्या जीवानं उजेड दाखवण्यासारखं !
तिच्याकडे पाहून सहज वाटून गेलं,

जीव येवढा, जिद्द केवढी फुलण्याची !!
कठीण प्रयासातुनी, जगी समाधान देण्याची !!

गेल्यावर्षी, २/३ महिन्यातून एकदा परसदारी बागकामाला येणाऱ्या दत्तारामने हिला आणलेली. कुठे लावायची माहिती नसल्यानं त्यानं तशीचं ठेवलेली. पावसाळ्याचे दिवस, फांदी पडून राहिलेली. मी बाहेर प्रवासात असलेला. घरी आल्यावर तिची नीटशी छाटणी करून तिला परसदारी लावली. चित्रातली सध्याचं आकर्षण ठरलेली छोटीशी फांदी, मुख्य फांदीला पर्याय म्हणून नेहमीच्या सवयीने लावलेली. सवयीने लावलेली म्हणून तिच्याकडून फारशी अपेक्षाही नसलेली. सुदैवानं दोन्ही जगल्या. पहिल्या दोन-अडीच फुटाच्या फांदीनं दिवाळीतचं फुलायला सुरुवात केलेली. ही मात्र तशीच असलेली. तिनं सध्याच्या ऐन वातावरणात अशी कमाल साधलेली.

तगर, तगरी, तगारी, चांदणी (East Indian Rosebay) नावानं ओळखली जाणारी सुमारे अडीच/तीन मीटर उंच वाढणारी, अनेक फांद्या असलेली, सदापर्णी, काटक, बहुवर्षायू, झुडपवर्गीय, सुगंधी फुलं देणारी ही वनस्पती. समोरासमोर असलेली हिरवी, चकचकीत जणू भाल्यासारखी निमूळत्या टोकाची तिची पानं. पांढरी शुभ्र, एकेरी आणि दुहेरी (मोठी बहीण) पाकळ्यांनी युक्त असलेली तिची फुलं खाली नळीसारखी वरती पसरट छत्रीसारखी ! दिवसभर नाही पण रात्री, पहाटेस मंद सुगंध वाटणारी. आयुर्वेदासही उपयोगी पडणारी. तगर एकदा रुजली की तिच्याकडे फारसं बघावं लागत नाही अशातली. पहाटेच्या अंधारात फुललेल्या तगरीकडं पाहिलं तर जणू आकाशातून चांदण्या जमिनीवर अवतरल्याचा भास व्हावा, अशी शुभ्रता. लहानपणी, आमच्या अलोरे (तालुका चिपळूण) कोयना प्रकल्प कॉलनीतील घराच्या परसदारी मोठी फुललेली एकेरी आणि दुहेरी तगर होती. तिचे खोड चांगले मजबूत झालेले. आसपासच्या कोंबड्या पकडापकडीतून वाचण्यासाठी उडून तिच्यावर जाऊन बसलेल्या असायच्या. पतंगाची मादी (हॉकमॉथ) हिच्या पानांवर अंडी घालते. अळ्या तगरीची पाने खाऊन आपली उपजीविका करतात. हे चित्र इथेही असलेलं. अशीही तगर सर्वत्र वर्षभर फुलणारी. गजऱ्यांची शोभा वाढविणारी. अधिक काळ ताजी राहणारी. चाफा, गुलाबाच्या दुनियेत सोशल मिडीयावर दुर्लक्षिलेली. ‘कोणी माझ्याकडे पाहात नाही. कौतुकानं माझा शुभ्रधवल रंग डोळ्यांत साठवत नाही. माझा साधा फोटोही काढत नाही.’ असं सुचवू पाहणारी. याबद्दल खंत व्यक्त करणारी !

आज महाराष्ट्र दिन ! कामगार दिन ! परमेश्वर कृपेने आमच्या चिरंजीवाचा, तीर्थरूप आईचा वाढदिन ! ‘करोना’च्या प्रादुर्भावाने सारं विश्व काकुळतीला आलंय ! काय संदेश देत असेलं आजचा महाराष्ट्र दिन ! काय सांगू पाहात असेल वर्तमान निसर्ग आम्हाला ? अशा प्रश्नांच्या काहुरात अडकलेल्या आम्हाला मागच्या जागतिक वसुंधरा दिनी फुललेल्या या एवढ्याश्या ‘तगरी’नं स्तब्ध केलं. तिची तिसरी कळी नेमकी आज, महाराष्ट्र दिनी फुलली. फुलण्याची ही तगरीची जिद्द आम्हाला अत्यंत प्रेरणादायी वाटली. ‘सध्याच्या वातावरणात ह्याच जिद्दीनं, प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला ‘फिजिकल डिस्टंन्सिग’सह सांभाळा. आपल्यातली फुलण्याची जिद्द जीवंत ठेवा. हेही दिवस जातील.’ असं तर तिला सांगायचं नसेल ना ? तसचं असेलं कदाचित ! निसर्गालाही भावना असतातच ना ? ...अन्यथा बरोबर दिवस गाठून स्वतः फुलून आपल्या कृतीतून साऱ्या मानवजातीला ‘फुलण्याची जिद्द’ कायम ठेवायला कसं बर सांगितलं असेलं तिने ? 

धीरज वाटेकर
चिपळूण.
मो. ९८६०३६०९४८.
dheerajwatekar.blogsopt.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...