कोकणातील एका शाळेने वसुबारस पूर्वदिनी (३१ ऑक्टोबर २०२१) ‘आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग’ करत आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ शाळेच्या विद्यार्थ्यांचे वास्तव्य असलेल्या पंचक्रोशीतील वाड्या-वस्त्यांवरील पन्नास गोपालकांच्या घरी जाऊन गोवत्सपूजनाने केला. ‘गौ विश्वस्य मातरम्’ म्हणणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीचे सादरीकरण या निमित्ताने घडले. एखाद्या शाळेने आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभासाठी गो संस्कृती संवर्धनासारख्या संकल्पनेचा आधार घेणे आणि त्यातून विद्यार्थ्यांसह लोकशिक्षण घडविणे ही गोष्ट अनेक अर्थाने महत्वाची आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासात आपली स्वतंत्र ओळख निर्माण
केलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्प परिसरातील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या
मोरेश्वर आत्माराम आगवेकर विद्यालय (पूर्वीचे अलोरे हायस्कूल अलोरे) आणि सीए.
वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालयात संस्थाध्यक्ष आणि निवृत्त एअर मार्शल हेमंत
भागवत आणि कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागाचे उपविभागीय अभियंता दीपक गायकवाड
यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जलपूजन, दीपप्रज्ज्वलन, भगवान श्रीपरशुराम पूजन, गो-पूजन आणि
शाळेचा सुवर्णमहोत्सवी वर्षारंभ म्हणून घंटेचे ५० टोल देऊन मानवी मनाला भारावून
टाकणाऱ्या वातावरणात मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर पन्नास ठिकाणी गोवत्स
पूजनाचे कार्यक्रम पार पडले. या शाळेची स्थापना १९७२ साली झाली. मोरेश्वर आत्माराम
आगवेकर हे या शाळेला प्रदीर्घकाळ लाभलेले पहिले मुख्याध्यापक. त्यांच्याच काळात
शाळेने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. त्यावर यशाचा कळस चढविण्याचे काम
वर्तमान पिढी करते आहे.
प्रत्यक्ष कार्यक्रम पंचक्रोशीतील अलोरे, कुंभार्ली, खडपोली, शिरगाव,
नागावे, पेढांबे, कोळकेवाडी आदी गावांतील वाड्या-वस्त्यांवर संपन्न झाला. प्रत्येक
गोपालकाला साखर, तांदुळ, हरभरा, मुगडाळ, गजराज पेंड, जलसंजिवनी पाकीट आदी शिधा
साहित्य तसेच सन्मानार्थ चादर, टॉवेल / पंचा, टोपी, खण, सुपारी, ग्रीन टीशर्ट,
शाळेची नामकरण सोहोळा स्मरणिका, सुवर्णमहोत्सवी ‘नंदादीप’ आवाहनपत्रक आदी साहित्य
शाळेचा सुवर्णमहोत्सवी लोगो असलेल्या कापडी पिशवीतून भेट देण्यात आले. शाळेचे
शिक्षक विविध पन्नास स्थानांवर पोहोचले तेव्हाचा स्थानिकांचा प्रतिसाद आणि
त्यांच्या भावना विलक्षण समाधानकारक होत्या. आयुष्याची नव्वदी पार केलेल्यांचा
उत्साह दखलपात्र होता. प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी आणि आजूबाजूला गोवत्सपूजनाची
आतुरता आणि उत्साह दिसून येत होता. आपली शाळा आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची
सुरुवात आपल्या दारातून करतेय याचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
गोपालकांनी आपले गाय आणि वासरु स्वच्छ धुऊन घराच्या पडवीत बांधले होते. गाईसाठी
नैवेद्य तयार केलेला होता. वाडी-वस्त्यांवर गेलेल्या शिक्षकांनी त्या-त्या ठिकाणी
गोवत्सपूजन केले. शाळेच्या प्रतिनिधींनी वाडी-वस्तीवार आजी माजी विद्यार्थी,
ग्रामस्थ आदी समुदायाला एकत्रित करून आपल्या जीवनातील गाईचे महत्व, वैज्ञानिक
दृष्टिकोन, तिच्या पंचतत्वांचा आरोग्याला
आणि शेतीला होणारा फायदा याची माहिती दिली.
दोन वर्षांपूर्वी
शाळेने आपल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बीज संकलनाची मोहिम हाती घेतली होती.
तेव्हा शाळेला ‘हरिक’ नावाच्या भाताच्या एका जातीचं बीज गवसलं होतं. शाळेने ते
बीयाणे जाणीवपूर्वक भातांच्या विविध जातींचे संकलन करणाऱ्या पालघर येथील संस्थेत
पाठविले होते. या कार्यक्रमानंतर शाळेच्या कोणत्याही उपक्रमाला लागेल ती मदत करण्यासाठी सदैव तत्पर असल्याची
ग्रामस्थांनी दिलेली ग्वाही या उपक्रमाची यशस्विता सांगून गेली. शाळेचे ‘कल्पक’
मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे या
कार्यक्रमाच्या काटेकोर नियोजनातील परिश्रम कौतुकास्पद होते.
धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८.