महाराष्ट्रात लोककला महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी दुरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. कोकण प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड मार्ग आदी प्रकल्पांचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. उद्घाटनापूर्वी आयोजक संस्था असलेल्या ‘लोटिस्मा’ने उभारलेल्या कलादालनात ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्या तैलचित्राचे अनावरण उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सत्राला आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड, आमदार योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम लोककलावंत प्रभाकर मोरे, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक तथा संयोजन समितीचे संयोजन समितीचे अध्यक्ष ‘कृषिभूषण’ डॉ. तानाजीराव चोरगे आणि समन्वयक प्रकाश देशपांडे उपस्थित होते. चार दिवसांच्या लोककला महोत्सवाने चिपळूणच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचा नवा तुरा खोवला गेला असल्याची भावना समारोपप्रसंगी डॉ. चोरगे यांनी व्यक्त केली. खरंतर साहित्य संमेलने, नाट्य संमेलन आदी कार्यक्रम पाहण्याचा, त्यात सहभागी होण्याचा अनुभव असला तरी ‘लोककला’ हा पूर्णतः वेगळा विषय होता. त्याची नाळ कोकणातील ग्रामीण जीवनाशी जोडलेली आणि नागरी भागात त्याचे सादरीकरण होणार होते. डहाणूपासून सावंतवाडी पर्यंतच्या लोककला आणि कलावंतांना एकत्र आणून चार दिवस महोत्सव घेणे तसे सोपे नव्हते. महोत्सवाचा कालावधीही तसा विशेष अनुकूल नसावा. एकदा तारखांत बदलही करून झालेला. असं असतानाही रसिक प्रेक्षकांच्या अतिप्रचंड गर्दीमुळे कोकणातील लोककलांना आजही गर्दी करणारा प्रेक्षकवर्ग असल्याचे स्पष्ट झाले. या निमित्ताने वाचनालयाने आपल्या कार्यपद्धतीप्रमाणे नुसतेच रंगमंचावर प्रायोगिक सादरीकरण न करताना अनुषंगिक आणि कसदार परिसंवादही आयोजित केले होते. कोकणातील लोककलांची आवड असलेल्या अनेकांसाठी हा सारा खटाटोप जणू ‘वर्कशॉप’ ठरला. धनगर समाजाचे गजनृत्य या महोत्सवाने लोकांसमोर आणले. पूर्वी हा समाज जंगलात राहायचा. वाद्याच्या आवाजाने हिंस्र प्राणी दूर जायचे, म्हणून यांनी आपल्या लोककलांत जगण्यात वापर केला होता. कोकणातील कुंभार क्रिया ही आजवर कोणत्याही लोककला मंचावर सादर झालेली नव्हती. कुंभार क्रिया हा ‘विधी’ मनुष्याच्या मृत्युनंतर केला जातो. कुंभार क्रिया केल्याशिवाय मोक्ष नाही, अशी समाजभावना आहे. कुंभार समाजातील मंडळी ही क्रिया आजवर सांभाळून आहेत. ती या निमित्ताने रंगमंचावर आली. नमन, जात्यावरच्या ओव्या, पारंपारिक गाणी, बासरी वादन, प्रबोधन गीत, मालवणी गजाली, जाखडी, काटखेळ व संकासूर, गोंधळ, गज्जोनृत्य, देवाला नवस लावण्याच्या पध्दती, समरगीत, ऐतिहासिक पोवाडा, कोकणी गीत, भारुड, दशमुखी रावण नमन, म्हणी आणि शिव्या, पोवाडा, नकटा, कोळीनृत्य, डेरा, असे कितीतरी प्रकार महोत्सवात चार दिवसात सादर झाले. महोत्सवाच्या निमित्ताने रसिक खवय्यांनी खास कोकणी खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सनाही भरभरून प्रतिसाद दिला. यात संगमेश्वरी पद्धतीचे वडे-मटण, चिकन-वडे, आंबोळी, अळूवडी, थालीपीठ, घावणे, झुणका-भाकरी यासह कोकम, आंब्यावर प्रक्रिया केलेले पदार्थ उपलब्ध होते. रसिकांची खाऊगल्लीत मोठी गर्दी उसळली होती. महोत्सवाच्या प्रत्येक सायंकाळची सुरुवात कोकणी पद्धतीने गाऱ्हाणे घालून करण्यात आली होती. खरंतर अख्खा महोत्सव ‘लक्षवेधी’ ठरला असल्याने कोणत्या लोककला प्रकाराला अधिक ‘लेखन’न्याय द्यावा हा प्रश्न पडावा! शेवटच्या दिवशी मालवणी बोलीत गाऱ्हाणे घातले गेले. अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या रत्नसिंधू फाऊंडेशन (कणकवली) प्रस्तुत महिला दशावताराने महोत्सवाची सांगता झाली. महोत्सवात पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील आदिवासी बांधवांच्या तारपा नृत्याने सर्वांची मने जिंकली. इतकी की लोकनृत्य संपल्यावर खासबाब म्हणून रसिकांनी आणि आयोजकांनीही यात सहभाग घेत रंगमंचावर ठेका धरला. कोकणातील लोककलांना व्यासपीठ मिळावे. पालघर ते सिंधुदूर्गपर्यंतच्या लोककला एकाच व्यासपीठावर सादर व्हाव्यात. त्या जगासमोर याव्यात. लोककलांचे एकत्रित संकलन व्हावे हा आयोजकांचा उद्देश या निमित्ताने सर्वांसमोर आला.
‘लोकसंकृतीचे दर्शन घडविणाऱ्या स्त्रीगीतांचा अनमोल ठेवा जपायला हवा’ असा सूर ‘लोककला आणि स्त्री अभिव्यक्ती’ परिसंवादातून पुढे आला. स्त्रीगीतांमधील अभिव्यक्ती नैसर्गिक आहे. निसर्गाधिष्ट, श्रमाधिष्ट अभिव्यक्तीची रुपे आपल्याला या गीतांमधून दिसून येतात. वारली समाजातील महिला चित्रांतून आपले जीवन रेखाटतात. स्त्रीची प्रतिभा निसर्गाशी जोडली गेली आहे. आपण किती उच्च पातळीवरील अभिव्यक्ती निर्माण करीत आहोत? आपण उत्तम कलावंत आहोत? याची जाणीव स्त्रियांना नसते. ओव्या हा लोककलेचा सौंदर्यपूर्ण आविष्कार आहे. परमेश्वराला सर्व अर्पण करण्याची यात भावना आहे. भोग, निष्कर्ष आणि चिंतन याचे समग्र दर्शन ओवींमधून घडते. या महिला अशिक्षित असूनही त्यांच्याकडे सूज्ञता असते. असे मुद्दे यावेळी चर्चिले गेले. महत्त्वाचे म्हणजे लोककलेतील परंपरागत वाद्ये शिकायला गुरू लागत नाही. ती उपजत किंवा प्रयत्नांनी ती साध्य होते. म्हणून तिला ‘कला’ म्हणतात. मनोरंजनातून लोकप्रबोधन हा सर्वच लोककलांचा मूळ गाभा असल्यामुळे या लोककलांचे दस्तावेजीकरण होणे आवश्यक आहे, असे मत परिसंवादातून पुढे आले. व्ही. शांताराम यांनी १९६० साली भारतीय लोककलांचा माहितीपट तयार केला होता. पूर्वी देवगडमध्ये 'घुमट' वाद्य आणि खेळ होते. आता ते नष्ट झाले आहे. लोककला हे मनोरंजनापासून प्रबोधनापर्यंतचे माध्यम आहे. समाजातील अपवित्र नष्ट व्हावे, ही लोककलांची भूमिका आहे. कोकणातील मागील चार-पाचशे वर्षांच्या संघर्षात लोककलांचा मोठा वाटा मोठा आहे. श्रीरामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथात दशावताराचा उल्लेख आहे. अर्थात लोककलेचा प्रवास किमान पाचशे वर्षांचा नक्की असावा. कोकणातील जाखडी लोककलेमध्ये आधुनिकता आणि अश्लिलता आलेली आहे. अशात तरुणपिढीने मूळ परंपरा सोडू नये, पारंपारिक पध्दतीनेच जाखडीचे सादरीकरण व्हायला हवे. अश्लिलता टाळायला हवी असा सूर ‘जाकडी : काल, आज आणि उद्या’ परिसंवादातून उमटला होता. जाखडीमध्ये नृत्य, गायन आणि वादन असा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. जाखडीमध्ये प्रश्न विचारण्याची पध्दत आहे. यामुळे आपल्या पौराणिक ग्रंथांचा अभ्यास होत असतो. सर्वत्र नागर आणि अनागर ह्या समांतर जीवनशैली आहेत. त्या दोन्ही एकत्र चालणार आहेत. त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडत राहणार आहे. नागर कलांना साचेबद्धता असते. अनागर लोककलांमध्ये गतिमानता आणि लवचिकता असते. त्यामुळे काळानुरूप बदल स्वीकारू शकणाऱ्या लोककलांचे भवितव्य उज्ज्वल असा सूर नमनाचा अनुबंध परिसंवादात उमटला. लोककला समाजाचे अनुकरण करत असतात. प्रत्येक लोककलेला स्वतःचा आकृतिबंध असतो. लोककलांचा मूळ हेतू प्रबोधनाचा असला तरी दिवसभर श्रमणाऱ्यांना थोडा विसावा मिळावा हेही त्यामागचे एक कारण आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वी लोककलांचे स्वरूप धार्मिक होते. स्वातंत्र्यकाळात त्यात स्वातंत्र्याविषयीच्या जनजागृतीचा अंतर्भाव झाला. स्वातंत्र्यानंतर ते प्रबोधनाचे माध्यम बनून कार्यरत झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नमन ही प्राचीन आणि स्वतंत्र परंपरा कुणबी समाजाने जोपासली आहे. लोककलेचा समाजमनावर आणि समाजाचा कलेवर परिणाम होतो आहे. नव्यांना लोककलांशी जोडायचे असेल तर आपल्याला काही बदल स्वीकारावे लागतील. महोत्सवात ‘कोकणातील खाद्यसंस्कृती’ आणि ‘शाश्वत पर्यटन’ याही विषयावरील पार पडले.
खरंतर जगभर आणि देशभर पर्यटन करताना आपण तिथल्या लोकसंस्कृतीचा पोशाख आवडीने परिधान करून आपलीच छायाचित्रे पैसे देऊन मुद्दामहून काढून घेत असतो. भविष्यात कोकणातील विविध लोककलांच्या ड्रेसचे पर्यटन अंगाने असे व्यावसायिकीकरण होण्याची आवश्यकता आहे. संपूर्ण कोकणभूमी ही जशी स्वर्गीय निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तशी ती कलावंतांची भूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे. इथल्या कलाकारांची साहित्य, कला, रंगभूमीशी घट्ट नाळ जुळलेली आहे. चित्रपट अंगाने याचा मेळ साधला जायला हवा आहे. कोकणात रंगभूमी, लोककला आणि साहित्याशी निगडीत धडपड अलिकडे गांभीर्याने घेतली जाऊ लागली आहे. कोकणी माणसाचा मूळ पिंड कलेचा आहे. त्यातही हा माणूस नाटकवेडा आहे. कोकणात चित्रपटनिर्मितीला पोषक वातावरण आहे. कोकणात कलाकारांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. त्यांना चित्रपट अंगाने किमान जुजबी प्रशिक्षण मिळायला हवे आहे. ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटात कर्नाटकातील एका ग्रामदैवताची सेवा करणारा सेवेकरी गावकरी आणि जमीनदार यांच्यातील संघर्ष दाखवला आहे. विशेष म्हणजे यातून कर्नाटक राज्याच्या दक्षिण जिल्ह्यातील किनारपट्टीवरील ‘कोला’ उत्सवासह ‘भूता कोला’ प्रथा-परंपरा याचं अचूक चित्रण घडलं आहे. या प्रथेत भूताची म्हणजे ग्रामदेवाची पूजा केली जाते. हे दैवत गावाचं रक्षण करतं आणि त्यांच्या क्रोधामुळे काहीही अनर्थ होऊ शकतो अशी इथल्या गावकऱ्यांची मान्यता आहे. याबरोबरच ही कला सादर करणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून ती देवता ही गावकऱ्यांशी संवाद साधते असा तिथल्या लोकांचा विश्वास आहे. अशा लोककला कोकणातही खूप आहेत. उत्सवी वातावरणात, जनमानसाच्या पाठबळावर त्या तग धरून राहिल्या तर त्यांवरही भविष्यात प्रकाश पडू शकेल. पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणानंतर कोकणाचे सौंदर्य आणि चित्रपटसृष्टी हातात हात घालून चालू लागली तर इथल्या लोककलावंतांना चांगले दिवस येतील. तोवर ह्या मंडळींनी तग धरावा यासाठी हा ‘लोककला महोत्सव’ लोककलावंतांच्या जीवनातील ‘पथदीप’ ठरला आहे.
धीरज वाटेकर
लेखक, कोकण विकास, पर्यावरण-पर्यटन चळवळीतील
कार्यकर्ते
मो. ९८६०३६०९४८
(सर्व छायाचित्रे :: श्री.
संजय शिंदे, ‘चित्रम’ डिजिटल, चिपळूण)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा