रविवार, ९ जुलै, २०२३

आयर्नमॅन 'तेजानंद'

आपला शालेय बालमित्र, जगातील अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक मानली जाणारी कझाकस्तानमधील फुल ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा (२ जुलै) ‘शब्दशः’ प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत, पूर्ण करून कोकणातील पहिला ‘आयर्नमॅन’ ठरला हे मनाला अतीव आनंद आणि समाधान देणारे आहे. चिपळूण सायकलिंग क्लब आणि आरोग्यम् लॅब यांनी आज (९ जुलै) वाजत-गाजत ‘आयर्नमॅन’ डॉ. तेजानंद अनिल गणपत्ये यांची मिरवणूक काढली. त्याचे खडतर परिश्रम ‘याचि देही...’ पाहाताना आमच्या अंतर्मनात अनेकदा काळजी दाटून आल्याच्या पार्श्वभूमीवरचं आजचं यश डॉ. ‘तेजानंद’ला asset बनवून गेलं आहे.


फुल ‘आयर्नमॅन’ होण्याकरिता पोहणे, सायकलिंग आणि धावणे या तिन्ही कृती एका पाठोपाठ करायच्या असतात. डॉ. तेजानंद १५ तास १७ मिनीटे ४२ सेकंद वेळात ३.९ किलोमीटर पोहला, त्याने १८० किलोमीटर सायकलिंग केले आणि ४२ किलोमीटर धावलाही. ‘आयर्नमॅन’ होण्यासाठीची ही सारी कसरत १६ तास ३० मिनिटात पूर्ण करायची असते. यावरुन या स्पर्धेचे काठिण्य लक्षात यावे. जगभरातील स्पर्धक ही स्पर्धा पूर्ण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतात. डॉ. तेजानंदनेही हे स्वप्न पाहिलेले. सलग पोहणे, धावणे आणि सायकल चालविण्याची ही स्पर्धा शारीरिक क्षमतेची कसोटी पाहाणारी होती. यापूर्वीही त्याने कागल येथे ऑलिंपिक डिस्टन्स, अहमदनगर येथे २१ किलोमीटर रनिंग हाफ मॅरेथॉन, ऑलिंपिक डिस्टन्स ट्रायथलोन (बेळगाव) आणि पुणे, कोल्हापूर, सातारा येथे ३ हाफ मॅरेथॉन, कोल्हापूर येथे हाफ आयर्नमॅन डिस्टन्स ट्रायथलोन आदी विविध स्पर्धा यशस्वी केल्या होत्या. या स्पर्धेसाठी त्याला कोल्हापूरचे ‘आयर्नमॅन’ पंकज रावळू यांचे मार्गदर्शन लाभले होते. मागील चार वर्षात कर्करोगावर मात करत कठोर परिश्रम करून तेजानंदने मिळवलेल्या या यशात त्याच्याइतकाच, पत्नी डॉ. अश्विनी (वहिनी) आणि कुटुंबियांची खंबीर साथ मौलिक आहे.


आपण अनेकवेळा ऐकतो की लोकं ही आपली सर्वात मोठी सामाजिक संपत्ती आहे. हे विधान तितकेसे खरे नाही. फक्त ‘चांगली’ माणसे ही सामाजिक ‘मालमत्ता’ असते. बाकी सर्व दायित्वे असतात. म्हणून नेहमी चांगुलपणा जोपासता आला पाहिजे. एखादी चांगली बाग करण्यासाठी जाणीवपूर्वक चांगल्या फुलांच्या आणि फळांच्या बिया लावाव्या लागतात. तण तर आपोआप उगवतात. चांगुलपणाचेही असेच आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. डॉ. तेजानंदच्या व्यक्तिमत्त्वात हा चांगुलपणा ठासून भरलेला आहे. उत्तम चारित्र्य, विश्वासार्हतेसह स्वतःच्या क्षमतेची अफाट वाढ, निष्पक्षता, खंबीरपणा आदी शब्द उच्चारायला सोपे वाटतात. तेजानंदच्या व्यक्तिमत्त्वात ते सारे परिश्रमपूर्वक विराजमान झालेले आहेत. अनुभवाच्या चार शब्दांमध्ये ‘साम्राज्य बनवण्याची, व्यक्तीचे चारित्र्य घडवण्याची शक्ती असते’. तेजानंदच्या अनुभवातून उद्याची ‘तरुणाई’ घडावी, या शुभेच्छा!

 

धीरज वाटेकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...