रविवार, ३० जुलै, २०२३

शाळेची ‘गरज’ ओळखून कार्यरत शिक्षकाची स्वेच्छानिवृत्ती

आकांक्षांची रेलचेल अन
अध्यापनी सचैल उत्कंठा
दृढनिश्चयाने आम्हा शिकविता
अचंबित आपुली पाहूनि दृढनिष्ठा  

कोकणातील चिपळूण तालुक्यातील ‘सुशिक्षितांचे नगर’ म्हणून ओळखल्या गेलेल्या अलोरे गावच्या मो. आ. आगवेकर माध्यमिक आणि सीए. वसंतराव लाड उच्च माध्यमिक विद्यालयात ‘तंत्रशिक्षण निदेशक’ पदावर कार्यरत राहिलेले शशिकांत शंकर वहाळकर सर आज (३१ जुलै) स्वेच्छानिवृत्त होत आहेत.

कोणत्याही क्षेत्रात काम करताना आपल्या मर्यादा पुरेपूर ओळखून अमर्याद काम करण्याच्या ध्यासाने पछाडून जात नव्या आकाशाला गवसणी घालणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची नोंद इतिहासाला घ्यावीच लागते. वहाळकर सर हे शैक्षणिक क्षेत्रातील या रांगेतील नाव आहे. खरंतर ‘सेवानिवृत्ती किंवा स्वेच्छानिवृत्ती’ हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जीवनातील पूर्वनियोजित प्रसंग. सध्याच्या सोशल मिडीयाच्या धबधब्यात सगळ्याच ‘निवृत्ती’ मनसोक्त न्हाऊन निघताना दिसतात. त्यातल्या अगदी मोजक्या निवृत्ती ह्या नव्या ‘प्रकाशमान’ जीवनाचा प्रारंभ करणाऱ्या ठरतात. आपल्या शाळेची अचूक गरज ओळखून कार्यरत झालेल्या वहाळकर सरांची निवृत्ती याच अंगाने जात अनेकांना प्रेरणा देणारी ठरावी.

६ जुलै १९६७ला जन्मलेल्या सरांनी आपल्या जवळपास ३५वर्षांच्या सेवेनंतर वयोमानपरत्वे निवृत्ती कालखंडाच्या दोन वर्ष पूर्व स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. पुढील काळात स्वतःला सामाजिक कामात झोकून देण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या आजवरच्या कार्यपद्धतीला अनुकूल असाच आहे.

चिपळूण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डेच्या पश्चिमेला जेमतेम हजार-पंधराशे लोकवस्ती असलेलं वहाळ हे सरांचं मूळगाव. तसं त्यांचं मूळगाव गुहागर तालुक्यातील शीर आणि आडनाव ‘काटदरे.’ दीड-दोनशे वर्षापूर्वी ही मंडळी जवळच्या सात गावात विखुरली. वहाळसह आबिटगाव, खांडोत्री, केरं, कळंबट, मुर्तवडे, पातेपिलवली या गावांना ‘सात गाव काटदरे’ अशी संज्ञा आहे. सरांचं बालपण जून्या वाडा पध्दतीच्या घरात गेलंय. त्यामुळे त्यांच्यावर ‘जुनं ते सोनं’ सहज संस्कार झालेत.

व्हॉटसअप पासून अनभिज्ञ असलेले सर अँड्रॉइड मोबाईल घेतल्यानंतर त्याच्याशी जोडले गेले. सर स्वत:च्या लिखाणाला ‘वाचकसेवा’ म्हणतात. पण, शाळेच्या विविध विषयात त्यांनी केलेली ही ‘वाचकसेवा’ (पोस्ट) वाचताना त्या केवळ त्यांनीच लिहाव्यात असे वाटावे इतक्या मनाची पकड घेणाऱ्या असतात. ‘मी लेखक नाही’ असं सरळ सांगून टाकणाऱ्या सरांच्या पोस्ट भावनेचा ओलावा धरून असतात. या साऱ्याचा बारकाईने विचार करता सरांशी फक्त आणि फक्त शाळेप्रति असलेली एकरूपता जाणवते. ‘वर्तमानपत्र वाचून झालं की त्याची गणना रद्दीत होते त्याप्रमाणेच आमच्या पोस्टचा भाव २४तासांनी आपोआप पडतो. मात्र आम्ही वाचकांना सतत काहीतरी नवं द्यायच्या हेतूने थांबत नाही. फ्रेश काहीतरी बाजारात आणत असतो.’ आपल्या पोस्टबाबत असं उमदं मतप्रदर्शन सर करतात.

मागच्या उन्हाळी सुट्टीत, शेजारच्यांचे कुरियर त्यांच्या अनुपस्थित सरांच्या फ्लॅटमध्ये देण्यासाठी कुरियरवाल्याने सहजपणे डोकावलं. तर ‘आपण आपल्या सरांच्या दारात आहोत’ याची जाणीव होऊन त्या विद्यार्थ्याने सरांना ओळख सांगितली. सरांनी आपल्या माजी विद्यार्थ्याशी संवाद साधत त्याची उठबस केली. सरांनी नंतर सोशल मिडीयावर त्याच्याविषयी ज्या तळमळीनं लिहिलं ते आजच्या काळात शाळेत कार्यरत असलेल्या नव्या पिढीच्या प्रत्येक प्रतिनिधीने आवर्जून वाचावं असंच! भविष्यात अँड्रॉइड’ नावाच्या साधनाचा उपयोग सर जातील तेथे याच एकरूपतेने करतील यात शंका नाही.

वहाळकर सरांना सांगितिक मैफीलीसह गायनाची असलेली आवड सर्वश्रुत आहे. त्यांच्या कार्यकाळात तिचा उपयोग शाळेलाही झालेला आहे. चिपळूणातील स्वरदर्शन कलारत्नचे ते ज्येष्ठ सहकारी आहेत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनाला आनंद देणारं हे शास्त्रीय संगीत सरांना महत्त्वाचं वाटतं. ‘...शेवटी गाणं हेच गाण्याचं मोल असतं बाकी सगळं फोल असतं’ असं ठामपणे सांगू पाहाणाऱ्या वहाळकर सरांनी आपल्या अलोरे शाळेची सुवर्णमहोत्सवी पूर्वसंध्या-प्रारंभ एखाद्या माजी विद्यार्थी-विद्यार्थीनीच्या सुश्राव्य गायनाने व्हावी म्हणून जीवाचा किती आटापिटा केला होता, हे सांगण्यासाठी आम्हाला स्वतंत्र लेख लिहावा लागेल.

वहाळकर सरांच्या मनातलं संगीत १९९०च्या दशकात अलोरेतील बालकमंदिरात कै. सूर्यकांत सिनगारे आणि कै. गंगाराम बाणे यांच्या सानिद्धयात रुजलं. ‘स्वर अर्पिले तुला रसिका’ या ग्रुपच्या माध्यमातून त्यांचा शाळेसह, शिंदे कॅन्टीन, करमणूक केंद्र, पोफळी कामगार कल्याण केंद्रातील विविध कार्यक्रमांशी संपर्क आला. ही कला सरांनी इतकी आपलीशी केली की, गावात वहाळला गणेश विसर्जनानंतर करमणूक म्हणून सादर केलेल्या नमन लोकनृत्य कलेचा व्हीडीओ सोशल मिडीयावर पाहून गोव्यातील आप्तेष्टांनी एका पारिवारिक कार्यक्रमासाठी त्यांच्या ग्रुपला खास निमंत्रण दिलं होतं. नमनाचा हाच प्रयोग त्यांनी चिपळूणच्या लोककला महोत्सवातही सादर केला होता.

स्पर्धात्मक वापरल्या जाणाऱ्या विविध अॅपच्या अज्ञानातील सुख आणि दु:ख आपल्या खास खुमासदार शैलीत सांगावं ते वहाळकर सरांनीच! ‘ओलाअॅप चालवणं हे गाडी चालवण्यापेक्षा अवघड असावं असा समज करुन घेऊन आम्ही शेअर बाजाराप्रमाणेच यापासून चार हात लांब होतो. तसे आम्ही काळाच्या चार पावलं मागेच राहाणं पसंद करतो. कसं आहे, पुढच्यास ठेच मागचा शहाणा! आम्हाला कोणी वेडयात काढू नये इतकंच!’ त्यांच्या या वाक्यात सारं आलं.

सरांनी मागील तीनेक वर्षात आपल्या फेसबुकवर किमान दोनशे कव्हर इमेज पोस्ट केल्यात आणि महत्त्वाचं म्हणजे या साऱ्या इमेज त्यांच्याशी व्यक्तिगत संबंधित नसून त्या त्यांच्या शैक्षणिक कार्यक्षेत्रातील अनेकांशी जोडलेल्या आहेत. सरांच्या मनाचा हा मोकळेपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जणू आरसा आहे.

शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या नियोजनासाठी, माजी विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी माजी मुख्याध्यापक अरुण मानेसर, मुख्याध्यापक विभावर वाचासिद्ध सर यांच्यासोबत वहाळकर सर पूर्ण क्षमतेने कार्यरत राहिले. त्यांनी आपल्या या ज्येष्ठ सहकाऱ्यांसह शाळेच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने विविध माजी विद्यार्थ्यांना शाळेशी पुन्हा जोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबई, पुणे, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, बेळगाव आणि अशा असंख्य ठिकाणी केलेल्या अविश्रांत प्रवास-धावपळीची नोंद अलोरे शाळेचा इतिहास नक्की घेईल. विशेषतः २०१५नंतर त्यांनी आणि शाळेतील विद्यमान सहकाऱ्यांनी ज्या गतीने माजी विद्यार्थ्यांची मोट बांधली त्याच्याच मजबूत पायावर अत्यंत कुशलतेने ‘वाचासिद्ध आणि माने’ सरांनी शाळेचा ‘न भूतो...’ असा ‘सुवर्णमहोत्सवी डोलारा’ उभा करण्यात यश मिळवलं हे वास्तव आहे.

आपल्या व्यक्तिमत्त्वात मिश्किल, उत्साही, कलासक्त आणि अत्यंत दिलखुलासपणा जोपासलेल्या वहाळकर सरांची आजची स्वेछानिवृत्ती त्यांच्या जगभरातील असंख्य माजी विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक असेल.

शाळा मग ती कोणतीही असो, शिक्षक जेव्हा तिची अचूक गरज ओळखून आपल्यात आपणहून बदल घडवून पूर्ण क्षमतेने कार्यरत होतो तेव्हाच सर्वार्थाने शाळेचा उत्कर्ष होत असतो. वहाळकर सरांनी अलोरे शाळेच्या उत्कर्षात अमूल्य योगदान द्यावे यासाठी त्यांना नियतीने बहाल केलेल्या संधीचे शब्दशः सोने केले. शाळेच्या सुवर्णमहोत्सवी इतिहासात मैलाचा दगड ठरणारे काम उभे केलेल्या वहाळकर सरांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा देताना त्यांच्या वाटेवरील या मैलाच्या दगडाचे ‘उद्याचे’ प्रवासी होण्याचे भाग्यदायी दायित्व स्वीकारायला विद्यमान शिक्षकांनी ‘आजच’ पुढे यायला हवे!  

वहाळकर सरांचा संपर्क क्रमांक :: +91 94212 27852

 

धीरज वाटेकर, चिपळूण

माजी विद्यार्थी- बॅच १९९५

मो. ९८६०३६०९४८ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...