सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

'पर्यावरणप्रेमी' सैनिकी शाळेचे व प्रमुखांचे दर्शन

एका शैक्षणिक संस्थेने प्रयत्नपूर्वक साकारलेली रोपवाटिका पाहाण्याच्या उद्देशाने अचानक योगावर नुकताच आम्हाला हरित मित्र परिवार पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. महेंद्र घागरे यांच्या आग्रहास्तव, लोकसेवा प्रतिष्ठान संचलित फुलगाव (तालुका हवेली, जि. पुणे) येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेला भेट देण्याचा योग आला. अत्यंत संवेदनक्षम बोलक्या भिंतींच्या या शाळेत सुरू असलेले रोपवाटिकेसहचे संगीत, चित्रकला, घोडा चालविणे, तिरंदाजी, ढोल व ताशा पथक आदी विविध उपक्रम पाहिले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार दीपकजी पायगुडे यांनी शाळेचा संपूर्ण परिसर फिरवून दाखवत माहिती दिली.

आम्ही भेट दिली तेव्हा, संस्थेचे विद्यार्थी आणि प्राध्यापक ढोल-ताशा पथक सराव शुभारंभ कार्यक्रमाची तयारी करत होते. या कार्यक्रमाच्या शुभारंभाचे श्रीफळ वाढवण्याचा मान हा पायगुडे साहेब आणि डॉ. महेंद्र घागरे यांचा असताना तो अनपेक्षित आग्रहामुळे आमच्याकडे आला. उत्साही विद्यार्थ्यांच्या सान्निध्यात आमचे दोन तास अतिशय छान गेले. सक्रीय राजकारणापासून बाजूला होऊन वेगळी वाट चोखाळत अविश्रांत परिश्रम करून यशाला गवसणी घालणारा आणि तरुणांना योग्य मार्ग दाखवणारा मार्गदर्शक अशी पायगुडे यांची ओळख आहे. त्यांच्या संस्थेतील 'ध्येयपूर्ती दत्तक योजना' ही हुशार, होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी जणू संजीवनी ठरते आहे. 'वृक्ष आमचे संगोपन तुमचे' अंतर्गत ही संस्था मोफत रोपवाटप उपक्रम राबवित असते. नेटक्या नियोजनातून साकारलेले या संस्थेचे समर्पित काम पाहून आपल्याला थक्क व्हायला होतं. या विद्यानगरीत १४००+ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थाध्यक्ष पायगुडे साहेब हे जणू स्वतः विद्यार्थी बनून इथल्या साऱ्या उपक्रमात रमलेत. शाश्वत काम उभं करण्यासाठी त्यांचं स्वतःला वाहून घेणं खूप काही सांगून जातं. 

त्यांच्यासोबतच्या दोनेक तासात आम्हाला कुठेही संस्था चालकाचा रुबाब दिसला नाही. नवीनतम शिकण्याचा, काही करण्याचा त्यांचा उत्साह, साधी राहणी आणि स्पष्ट विचारांचं कौतुक वाटलं. मनमोकळेपणाने संवाद साधणाऱ्या पायगुडे साहेबांसोबत वावरताना आम्हाला, संस्थेतील विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात त्यांच्याविषयी खोलवर रुजलेला आदर क्षणोक्षणी दिसून आला.

धीरज वाटेकर चिपळूण

अगम्य-अतर्क्य कोकण

कोकण हा अगम्य आणि अतर्कनीय वाटणाऱ्या गुढरम्य घटनांनी भरलेला प्रदेश आहे. कोकण भूमीचा हा नैसर्गिक अनुभव मानवी जीवन समृद्ध बनवतो असा आमचा अनुभव...