गुरुवार, १४ सप्टेंबर, २०२३

नवभारताचा निर्माता :: भारतरत्न डॉ. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या

भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे एक असाधारण दूरदर्शी अभियंता होते. विसाव्या शतकात, ते त्यांच्या हयातीत जणू आख्यायिका बनलेले अतुलनीय अभियांत्रिकी कामगिरीने भरलेले जीवन जगले. औद्योगिक विकासाच्या भव्य दृष्टीने त्यांना अद्वितीय व्यक्ती बनवले. पिण्याचे सुरक्षित पाणी आणि योग्य सिंचनासाठी जलस्रोतांचा प्रभावी वापर हा त्यांच्या जीवनाचा ध्यास राहिला. तंत्रशुद्ध आर्थिक व्यवहार्यता, गुंतवणुकीवर पुरेसा परतावा आणि सामाजिक उद्देशाची पूर्तता होण्याची खात्री असल्याशिवाय त्यांनी मोठे अभियांत्रिकी प्रकल्प हाती घेतले नाहीत.

विश्वेश्वरय्या हे गणितज्ज्ञ आणि इंग्रजीचे उत्तम अभ्यासक होते. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी झाला. आज हा दिवस देशात सर्वत्र अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. विश्वेश्वरय्या यांनी भारतात अभियांत्रिकीचा पाया घातला. जागतिक कीर्तीचे अभियंता आणि नवभारताचे एक निर्माते म्हणून त्यांचा गौरव केला जातो. आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम हे त्यांच्या पूर्वजांचे गाव. दक्षिण भारतात आपल्या मूळ गावाच्या नावाचा स्वत:च्या नावाच्या आधी उल्लेख करण्याची पद्धत आहे. त्यानुसार ‘मोक्षगुंडम’ गावाचे नाव विश्वेश्वरय्या यांच्या नावाच्या आधी आलेले आहे. त्यांचे वडील पंडित श्रीनिवास शास्त्री हे दशग्रंथी विद्वान ब्राह्मण होते. पूजा-अर्चा, धार्मिक कार्ये (लग्न-मुंजी, सत्यनारायण वगैरे) यांमधून मिळणार्‍या दक्षिणेतून त्यांचा घरखर्च कसाबसा चालवत. घरच्या गरिबीमुळे शिक्षणासाठी पैसा नव्हता. तेव्हा त्यांनी विद्यार्थिदशेत शिकवण्या करून शाळेच्या फीसाठी कष्टाने पैसा जमा केला होता. १८८०मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठातून प्रथम क्रमांकासह बीए केले. यामुळे पुणे कॉलेज ऑफ सायन्समध्ये (भारतातील सर्वात जुने आजचे कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग पुणे) त्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. येथील तीन वर्षांचा अभ्यासक्रम अडीच वर्षांत पूर्ण करून नोव्हेंबर १८८३ मध्ये ते एल.सी.ई. (लायसेन्सिएट सिव्हिल इंजीनिअरिंग) आजची बी. ई. सिव्हिल पदवी वयाच्या बावीसाव्या वर्षी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पुढे त्यांना बर्कले पदकाने सन्मानित करण्यात आले. मार्च १८८४मध्ये पूर्वीच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी सरकारमधून त्यांनी सार्वजनिक बांधकाम अभियंता म्हणून आपल्या दीर्घ आणि महत्त्वपूर्ण कारकीर्दीची सुरुवात केली होती.

नद्यांच्या जलस्रोतांचा योग्य उपयोग करणे ही त्यांची आवड होती. बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या सेवेत त्यांनी महाराष्ट्र राज्यातील खानदेशातील धुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वेक्षण व नियोजन केले. त्याची अंमलबजावणी केली. पाणीपुरवठा योजनांची त्यांची कल्पना आणि यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याची क्षमता ओळखून सरकारने त्यांना सिंध प्रांतातील सुक्कूर शहराच्या पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्थेचे स्वतंत्रपणे नियोजन, आराखडा आणि अंमलबजावणी करण्याचे काम सोपवले होते. तुलनेने हे कठीण काम होते. त्यांनी तेही यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर त्यांना सुरत पाणीपुरवठा योजना पुरविण्याचे काम देण्यात आले. यातून एक प्रतिभावान आणि सक्षम जलसंपदा अभियंता म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली. हळूहळू त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील बेळगाव, धारवार, विजापूर, अहमदाबाद, पुणे आणि भारताबाहेरील एडन बंदरासाठी ब्रिटिश लष्करी वसाहत आदी ठिकाणी काम केले. पुणेजवळील खडकवासला जलाशयाची साठवण क्षमता वाढवणे आवश्यक असताना धरणाची उंची न वाढवता त्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण क्षमतेचे प्रदर्शन घडवले. १९०३मध्ये विश्वेश्वरय्या यांनी आठ फूट उंच स्वयंचलित गेट्सची प्रणाली शोधून काढली. जेव्हा पाणी पूर्ण पूर पातळीपर्यंत वाढते तेव्हा हे दरवाजे उघडायचे आणि पूर ओसरल्यावर बंद व्हायचे. त्यामुळे धरणाची पूर्ण क्षमता नेहमीच वापरली जायची. त्यांचे हे ‘पेटंट’ डिझाईन नंतर ग्वाल्हेरमधील तिगारा धरण आणि म्हैसूर राज्यातील कावेरी ओलांडून कृष्णराजसागर धरणासह भारतातील इतर अनेक धरणांमध्ये वापरले गेले. त्यांचा आणखी एक अभियांत्रिकी चमत्कार म्हणजे ब्लॉक सिस्टीम ऑफ इरिगेशन (BSI) ही पद्धत होय. ज्यात कालव्यांद्वारे पाणी पुरवठा रोटेशन आणि पुरवठ्याचे समान वाटप समाविष्ट होते. ज्यामुळे पाण्याचा गैरवापर टाळता येणे शक्य झाले होते. या कल्पनेचा डेक्कनच्या कालवा प्रणालीत उपयोग झाला.

वसाहतवादी ब्रिटीश प्रशासनात कार्यरत अस्वस्थ विश्वेश्वरयांनी १९०८मध्ये ४८व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि फ्रीलान्स सल्लागार अभियंता म्हणून काम सुरु केले. दरम्यान आपला दृष्टीकोन विस्तृत करण्यासाठी त्यांनी युरोप प्रवास केला. युरोपहून परतल्यावर हैदराबाद सरकारने त्यांना सल्लागार अभियंता बनण्याची विनंती केली. हैदराबाद शहराला मुसी नदीच्या विनाशकारी पुरापासून वाचवण्यासाठी आणि चांगला पाणीपुरवठा होण्यासाठी सिकंदराबाद-हैदराबाद या जुळ्या शहरांतील प्रसिद्ध टँक बंडची योजना तसेच परिसरातील इतर नाल्यांमध्ये वाहणारे पाणी साठवण्यासाठी त्यांनी योजना आखल्या. दरम्यान त्यांना पूर्वीच्या म्हैसूर राज्याचे मुख्य अभियंता म्हणून आमंत्रण मिळाले. १५ नोव्हेंबर १९०९रोजी विश्वेश्वरय्या म्हैसूर राज्य सरकारच्या सेवेत रुजू झाले. म्हैसूरमधील कार्यकाळात त्यांनी त्यांची दूरदृष्टी आणि अष्टपैलुत्व दाखवून दिले. म्हैसूर राज्याच्या विकासासाठी त्यांनी हाती घेतलेले अनेक प्रकल्प महाराज सर जयचमराजेंद्र वोडेयार यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे यशस्वी झाले. त्यांनी म्हैसूर आर्थिक परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. त्यांनी कावेरी खोऱ्याचे सर्वेक्षण केले. म्हैसूरमधील उद्योगांसाठी पुरेशी वीज निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कृष्णराजसागर धरणाची रचना करताना विश्वेश्वरय्या यांनी त्यांच्या स्वयंचलित स्लुइस गेट्सची नवकल्पना वापरली. दिवाण म्हणून विश्वेश्वरय्या हे राज्याचे जलद औद्योगिकीकरण करण्यात आणि तेथील नागरिकांसाठी शैक्षणिक संधींचा विस्तार करण्यात यशस्वी ठरले. नीटनेटके, स्वच्छ, कुठेही एकसुद्धा सुरकुती नसलेले धोतर किंवा सूट आणि डोक्यावर म्हैसुरी फेटा (पगडी) घालणे हे विश्वेश्वरय्यांचे खास वैशिष्ट्य होते. ते शिस्तीचे भोक्ते होते. ऑफिसमध्ये कामासंबंधीची गोष्ट आखीव, घाई न करता, व्यवस्थित करणे ही त्यांची काम करण्याची पद्धत होती. स्थापत्यशास्त्रज्ञ विश्वेश्वरय्या हे जन्माने मोठे नव्हते ते प्रयत्नाने श्रेष्ठ झाले. प्रखर बुद्धिमत्ता, अखंड वाचन, चिंतन, संशोधन, उत्साह आणि तत्त्वनिष्ठा हे त्यांची गुणवैशिष्ट्ये होती. 

पंडित जवाहरलाल नेहरू डॉ. विश्वेश्वरय्यांबद्दल म्हणत, ‘He is an engineer of Integrity, Character and Broad National Outlook.’ १ सप्टेंबर १९६१ रोजी त्यांच्या जन्मशताब्दी उत्सवात पंडित नेहरूंनी आपल्या भरगच्च कार्यक्रमातून वेळ काढून दिल्लीहून बंगलोरला जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे त्यांना आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्रांवर त्यांच्याच छापाची पोस्टाची तिकिटे चिकटवलेली होती. त्यांनी युवा पिढीला दिलेला संदेश - It is better to worn out than rust out – अर्थात झिजलात तरी चालेल, पण गंजू नका. गंज चढलेले आयुष्य काय कामाचे? त्यांच्या हयातीत त्यांना अनेक सन्मान मिळाले. १९११मध्ये कमांडर ऑफ द इंडियन एम्पायर (CIE), १९१५मध्ये नाइट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (KCIE), स्वतंत्र भारताने १९५५मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. विश्वेश्वरय्या हे १०१ वर्षे ६ महिन्यांचे वृध्दापकाळ होईपर्यंतचे शिस्तबद्ध जीवन जगले. १२ एप्रिल १९६३रोजी त्यांचे निधन झाले.
भारतरत्न डॉ. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांना मानाचा मुजरा...

धीरज वाटेकर
स्थापत्य अभियंता चिपळूण


‘अभियंता दिन’ पुरवणीची सुरुवात रत्नागिरीतून!

स्थापत्य अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘खाजगी अभियंता’ म्हणून जबाबदारी सांभाळून आवड जोपासण्यासाठी आम्ही पत्रकारितेकडे वळलो. २००२साली वार्तांकनासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पातील पोफळी वीज मंडळात साजरा होणाऱ्या अभियंता दिन कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. तेव्हा कोकणात फारसा कुठे अभियंता दिन साजरा होत नव्हता. असल्यास तो अभियांत्रिकी कार्यालयातील भारतरत्न डॉ. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्याच्या पलिकडे जात नव्हता. पोफळीतील कार्यक्रमाने आमच्या मनात ‘टयॅब्युलर’ आकाराच्या ‘अभियंता दिन’ पुरवणीची बीजे पेरली. तेव्हा कोणत्याही वर्तमानपत्रात एखाद्या विषयावर ‘टयॅब्युलर’ आकाराची किमान आठ किंवा सोळा पानी पुरवणी करणे हे आव्हानात्मक होते. आमचे तत्कालिन सहकारी ज्येष्ठ पत्रकार स्व. प्रमोद पेडणेकर यांच्या सहकार्याने आजपासून वीस वर्षांपूर्वी २००३साली १६ पानी ‘अभियंता दिन’ पुरवणी प्रसिद्ध झाली. तेव्हापासून आजतागायत रत्नागिरीसह राज्यातील विविध दैनिकात ‘अभियंता दिन’ पुरवणी प्रसिद्ध होत असते. मात्र २००३पूर्वी ‘टयॅब्युलर’ आकाराची पुरवणी प्रसिद्ध झाल्याचे आम्ही पाहिलेले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...