केळशी (दापोली) :: येथील आतगाव वरची भाट भागातील वाटेकर परिवाराच्या वतीने पारंपरिक गणेशोत्सवाच्या 'अंगारक योग' पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या 'प्रदक्षिणा संकल्पेश' आरती संग्रह पुस्तिकेचे प्रकाशन, भजनातून समाज प्रबोधनाची चळवळ राबविणारे आणि आपल्या भजन मंडळाच्या माध्यमातून गेली २१ वर्षे 'प्रदक्षिणा संकल्पेश' गणेशासमोर भजन सेवा सादर करणाऱ्या 'बुवा' जहांगीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. अंगावर योगावर स्थापन झालेल्या 'प्रदक्षिणा संकल्पेश' गणेशोत्सवाचे हे एकविसावे वर्ष आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केळशीच्या विकासाचा ध्यास घेतलेले उपसरपंच केदार पतंगे, गोसावी ग्रामस्थ मंडळ आणि गोसावी भजन मंडळाचे अध्यक्ष विलास कुवेसकर, अरविंद जाधव, 'प्रदक्षिणा संकल्पेश' मूर्तीकार शेखर केळसकर, 'प्रदक्षिणा संकल्पेश' आरत्यांचे लेखक मच्छिन्द्रनाथ तुकाराम वाटेकर, गोसावी महिला मंडळाच्या प्रतिनिधी सौ. शुभांगी बाईत, श्रीमती विजया बन्सीधर वाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तांबड्या
जास्वंद फुलाची प्रभावळ पाठीशी घेऊन स्थानापन्न झालेली मस्तकापासून लांबसडक
निमुळती पायापर्यंत रूळणारी सरळ सोंड, तिच्या मुख अग्रावर पांढरा शुभ्र एकवीस कळ्यांचा दाणेदार मोदक धरलेल्या
अवस्थेतील ‘प्रदक्षिणा संकल्पेश’ गणेशाची
शाडूच्या मातीतील मूर्ती पाहाता क्षणी नजरेत भरावी अशी आहे. त्याच्या लंब उदरावर
नाभी कमळातून नुकताच जन्म घेतल्यासारखे भासवणारी नागपाशकटी, मागच्या
डाव्या हातात आपलाच अर्धा दात, मागच्या उजव्या हातात परशू,
नेहमीप्रमाणेच पुढच्या उजव्या हाताने वरदान प्रदान करणारा ‘वरदहस्त’ आणि पुढच्या डाव्यात हातात इक्षुदंड
(गणेशवेल) गुंडाळलेल्या या बाप्पाच्या साथीला मूषकराज विराजित आहेत. बाप्पाचे
मस्तकावरचे सुपाएवढे कान म्हणजे जणू भक्तांचे गाऱ्हाणे मनापासून ऐकून घेण्याची
खात्री पटविणारे, दीड दिवसीय पूजेसाठी दोन्ही पाय जवळ घेऊन
स्थानापन्न झालेल्या प्रदक्षिणा संकल्पेशाच्या चेहऱ्यावरील कोवळे नाजूक हास्य
समाधान देणारे आहे.
पूर्वी पार्थिव
श्रीगणेशाची स्थापना करण्यासाठी घरोघरी लागणार्या आवश्यक वस्तूंमध्ये ‘आरती’चे एखादे पुस्तक हमखास
असायचे. या पुस्तकांचे जतनही व्हायचे. सध्या ऑनलाईन आरत्या उपलब्ध झाल्याने अशा
छापील पुस्तिकांची गरज कमी झाली आहे. अर्थात आरत्या सगळ्यांनाच तोंडपाठ नसल्यामुळे
पुस्तिका आवश्यकही आहेत. श्रीगणेशाच्या नियमित आरत्यांसह डॉक्युमेंटेशन म्हणूनही ‘प्रदक्षिणा संकल्पेश’ आरती संग्रहाकडे पाहण्यात
आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
स्वर्गीय
निसर्गसौंदर्य आणि परंपरा जपलेल्या ग्रामीण कोकणातील दापोली तालुक्यातील केळशी
येथील पर्यटन वैशिष्ट्ये यात अंतर्भूत आहेत. गणेशोत्सवात म्हटल्या जाणाऱ्या नियमित
आरत्यांसह, भाषाशास्त्राचे अभ्यासक
मच्छिन्द्रनाथ वाटेकर यांनी लिहिलेल्या ‘प्रदक्षिणा संकल्पेश’
या अंगारक गणपतीचे स्वरूप, सौंदर्य, वैशिष्ट्य विशद करणाऱ्या आरत्या यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
प्रदक्षिणा संकल्पेशाच्या मागील एकविस वर्षांच्या उत्सवातील चित्रमय ‘रंजक’ आठवणी या आरती संग्रहात सामावलेल्या आहेत.
निरूपणासाठी
प्रसिद्ध असलेले येथील कै. तुकाराम (बुवा) सुभाननाथ वाटेकर यांनी सांगितलेल्या 'घरात गणपती आणायचा असेल तर तो अंगारक योगावर आणायचा
आणि घरीच विसर्जन करायचे तर ते बुधवारच्या गणेश चतुर्थीचे' या
संकेतानुसार हा अंगारक योग प्रदक्षिणा संकल्पेश गणेशोत्सव सुरू आहे.
यावेळी जहांगिर शेख, केदार पतंगे यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या आठवणी सांगून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. वाटेकर परिवाराच्या वतीने गोसावी भजन मंडळाच्या सर्व प्रतिनिधींना चिपळूणच्या मनोदय एंटरप्रायझेसचे दीपक वाटेकर यांच्या हस्ते लेंगा-कुर्ता-टोपी पारंपरिक पेहेराव भेट देण्यात आला. यावेळी दापोलीतील पायल मोटर्सचे प्रविण वाटेकर, राजेश भिसे, नरेश भिसे, संतोष मांडवकर, प्रदीप शिर्के, संतोष पाटील, सौ. उर्मिला पाटील, सौ. वैशाली जाधव, सौ. रिना भिसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक धीरज वाटेकर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा