सोमवार, ३० डिसेंबर, २०२४

आठवे पर्यावरण संमेलन आळंदी (देवाची) वृत्तांत

आठवे पर्यावरण संमेलन आळंदी (देवाची) वृत्तांत

 

पृथ्वीतलावर पर्यावरणीय ‘आणीबाणी’ची स्थिती


- संमेलनाध्यक्ष प्रा. श्री. द. महाजन



आळंदी (देवाची) :: आपल्याकडे वृक्षलागवड खूप आवश्यक आहे. मात्र फॉरेस्ट आणि प्लांटेशन यात फरक आहे. वृक्षलागवडीमुळे जंगलं तयार होऊ शकत नाहीत. ती वनशेती असते. जंगल हे हजारो वर्षांच्या एकत्रित पर्यावरणाच्या परिणामांचा भाग असते. ते वर्षभरात तोडून टाकता येत, पण निर्माण करता येत नाही. म्हणून मूळचे शिल्लक जंगल तुटू नये यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सातत्याने वृक्षलागवड करण्याची आवश्यकता आहे. जुन्या जंगलातून जेवढा ऑक्सिजन निर्माण होऊ शकतो तेवढा वन लागवडीतून निर्माण होऊ शकत नाही. आज मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीतलावर पर्यावरणाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. पर्यावरणीय आणीबाणी निर्माण झालेली आहे. असे मत भारतीय वनस्पतींचा चालताबोलता माहितीकोश अशी ओळख असलेले ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे व्यक्त केले.

 

https://youtu.be/dld-WQcDo28 (प्रा. श्री. द. महाजन यांच्या भाषणाची लिंक)

 

महाजन पुढे म्हणाले, पर्यावरण बदल आणि जागतिक तापमानवाढ यांचे गांभीर्य कोणाच्याच लक्षात येत नाही आहे. माझ्या एका लेखक मित्राने आपल्या पुस्तकात ‘मनुष्य जातीची सामुहिक आत्महत्येकडे वाटचाल सुरु आहे’ असे म्हटले आहे. यावर युद्धपातळीवर काम होण्याची आवश्यकता आहे. १९९१ साली एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जर्मनीतील काही संशोधक पुण्याला आले होते. ‘जर्मनीमध्ये आज जंगल किती आहे?’ हा प्रश्न मी त्यांना विचारला होता. कारण स्वातंत्र्यपूर्व काळात आम्हाला युरोपचा भूगोल अभ्यासाला होता. तेव्हा विषय शिक्षकांनी ‘ज’ लक्षात ठेवायला सांगितला होता. आम्हीही ‘ज’ म्हणजे जर्मनी-जंगल-जोगळेकर सर असं मनात पक्कं झालेलं समीकरण आजही विसरू शकलेलो नाही. आम्ही शालेय शिक्षण घेत होतो तेव्हा जर्मनीत चाळीस टक्केहून अधिक जंगल असल्यास क्रमिक पुस्तकात नमूद होतं. बऱ्याच वेळानंतर एका शास्त्रज्ञाने मला सांगितलं, ‘sorry to say you sir, there is no forest in Germany today’ आज जर्मनीत जंगल नाही. जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्ट पूर्वी खूप प्रसिद्ध होतं. तेही सगळं प्लांटेशन आहे. निसर्ग आणि पर्यावरण हे परवलीचे शब्द झालेले आहेत. नुसतं पर्यावरण प्रेम पुरेसं नाही. त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचा अभ्यास केल्यास आपण संवर्धन आणि संरक्षण करू शकू. निसर्ग आणि पर्यावरणाचा शाळेत अभ्यास सुरु झालेला आहे. न्यायालयांच्या सूचनेनुसार शासनाने देशभर पर्यावरणाचा अभ्यास सुरु केला. मात्र हा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना या विषयाचे तितकेचे ज्ञान नाही. भारतीय संस्कृती मानवाला प्राणी म्हणून संबोधते. पाश्चात्य राष्ट्रांत मानवाला परमेश्वराचे लाडके अपत्य संबोधतात. त्याच्यासाठी परमेश्वराने इतर वनस्पती आणि प्राण्यांची निर्मिती केल्याचे सांगतात. यामुळे पाश्चात्य राष्ट्रांची विकासनीती आणि निसर्गनिती याच विचारावर आधारित आहे. पाश्चात्य राष्ट्रांत पर्यावरणाचे नुकसान होण्याला हा विचार कारणीभूत आहे.  

 


पृथ्वीवर सूक्ष्म जीव, वनस्पती, प्राणी हे तीन प्रकारचे सजीव आहेत. वनस्पती आपले अन्न आपण निर्माण करतात. ही कला फक्त वनस्पतींनाच अवगत आहे. वनस्पती या कार्बनडाय ऑक्साइड आणि पाण्यापासून गुल्कोजची साखर तयार करते. आपण आपले अन्न तयार करत नाही. आपण तयार केलेलं अन्न फक्त शिजवते. प्राणी हे वनस्पतींनी निर्माण केलेलं अन्न वापरतात. सूक्ष्म जीव हे मृत वनस्पती आणि प्राणी यांचं रुपांतर खतांमध्ये करतात. म्हणून जमिनीत सूक्ष्म जीव आवश्यक आहेत. पाश्चात्य राष्ट्रात वनस्पतींना सजीव मानत नसत. आपले शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी जगाला हे पटवून दिलं. वनस्पती निर्माण होतात, त्यांची वाढ होते, त्या मरतातहि. अर्थात त्या सजीव आहेत. भारतातील सहन करू शकणाऱ्या किमान निम्या लोकांनी किमान उन्हाळ्यात दोन दिवसातून एकदा अंघोळ केली तर कितीतरी वीज वाचेल आणि कितीतरी कार्बनडाय ऑक्साइड वायू थांबेल. पर्यावरण संसाधने कमीतकमी वापरायला हवीत. शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणशास्त्र आणि नागरिकशास्त्र हे दोन विषय महत्त्वाचे आहेत. कित्येक सपुष्प वनस्पतींना आकर्षक, सुंदर आणि सुवासिक फुले येतात. ही फुले देवाला वाहाण्यासाठी किंवा मानवी नेत्रसुखासाठी आहेत असं आपल्याला वाटतं. ही फुले म्हणजे वनस्पतींचे पुनरुत्पादनाचे अवयव आहेत. फुलांपासून फळे, फळांमध्ये बिया आणि त्यातून पुन्हा वृक्ष तयार होणार आहेत. कीटकांना आकर्षक करून घेण्यासाठी फुलांना रूप, रंग आणि वास आहे. म्हणून आपण झाडावरील फुले तोडताना काळजी घ्यायला हवी आहे. असे महाजन म्हणाले.

 

माणूस रोज ४० ग्रॅम केमिकल पाण्यात टाकतो आहे – शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे


राष्ट्रीय केमिकल लॅबोरेटरीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ (नि.), पर्यावरण सल्लागार डॉ. प्रमोद मोघे यांचे संमेलनात प्रमुख बीजभाषण झाले. त्यांनी ‘एक कप चहाचे प्रदूषण’ या विषयाद्वारे आपले विवेचन सादर केले. चहाचे पिक घेताना चहात लोहाचा अंश येतो. चहात टॅनिन, पॉलिथिनॉल चे अंश असतात. चहाचा डाग जात नाही. साखर बनवताना उसावर सोळा रसायने वापरली जातात. एक किलो साखर निर्मिती ही सोळा लिटर पाणी अशुद्ध करते. आजच्या पाण्यातही खूप रसायने असतात. मानवी जीवनपद्धती अडचण निर्माण करते आहे. माणूस रोज ४० ग्रॅम केमिकल पाण्यात टाकतो आहे. पाण्यात क्लोरिन किती वापरावे? याची मर्यादा ठरलेली आहे. ती न पाळल्याने स्त्रियांमध्ये थायरॉईड आणि सर्वसामान्यांमध्ये कन्सर वाढलेला आहे. आजच्या साखर आणि दुधात भेसळ आहे. गाळणे प्लॅस्टिक वापरल्याने पुन्हा चहाचे प्रदूषण होते. दैनंदिन टूथपेस्टमध्ये आठ केमिकल आहेत. आपण सारे पाश्चात्य संस्कृतीचे गुलाम झालो आहोत. जलाशयात जलपर्णी का होते? तर ती साबणामुळे तयार होते आहे. अगदीच चहा प्यायचा असेल तर तो पाण्यासारखा प्यावा, साखरेचे प्रदूषण कमी करावे असे आवाहन त्यांनी केले.

 

पर्यावरण कामात तरुणांचा सहभाग वाढायला हवा – प्रमोद मोरे




मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी बोलताना, पर्यावरण कामात तरुणांचा सहभाग वाढायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली. पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने आणि वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी स्थापन केलेल्या या पर्यावरण मंडळाचे कार्य राज्यभर सुरू आहे. या कार्यात तरुणांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा निसर्ग व पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी व्यक्त केली. संमेलनाचे उद्घाटक आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी (देवाची)चे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र बाबुराव उमाप यांनी बोलताना, पर्यावरण काम केल्याने आरोग्य चांगले राहाते असे नमूद केले. पर्यावरण हा विषय घेऊन शिक्षकांच्या माध्यमातून ही मोठी चळवळ चालते आहे असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. देविदास धर्मशाळा आळंदी (देवाची)चे अध्यक्ष ह. भ.प. निरंजनशास्त्री कोठेकर यांनी, दर महिन्याला पर्यावरण व्याख्यान करा, धर्मशाळा सोबत असेल असे जाहीर केले.

 

पर्यावरण संवर्धन वर्तन हा मानवी स्वभाव-संस्कार बनावा - धीरज वाटेकर


सातशे वर्षापूर्वी ‘पर्यावरण’ या विषयाकडे आपले संत सूक्ष्मपणे पाहत होते. संत ज्ञानेश्वरांनी, एका ठिकाणी ‘नरगेचि रचावी, जळाशये निर्मावी महावने लावावी, नानाविधे।‘ असे म्हटलेले आहे. यातील 'नानाविध' हा शब्द माऊलीनी पर्यावरणाचा विचार करता अतिशय सूचक वापरला आहे. एकाच प्रकारच्या झाडांच्या बागा लावल्या आणि ती झाडे संभाव्य रोगाला प्रतिकार करणारी नसली तर ती सर्वच्या सर्व कीडग्रस्त होतात. वेगवगळ्या प्रकारच्या झाडांमधील अशी प्रतिकार शक्ती ही वेगवेगळी असते. तेंव्हा कीड किंवा रोग पडला तरी सगळी झाडे नष्ट पाहू नयेत, या मागील माऊलीच्या दृष्टीकोन संभवतो. कोणत्याही सामाजिक क्षेत्रात वावरण्यासाठी मनुष्यामध्ये एक विशिष्ठ स्वभाव असावा लागतो. सध्याच्या जगासमोरील पर्यावरणीय संकट दूर सारण्यासाठी पर्यावरण जनजागरण-संवर्धन वर्तन हाही मानवी स्वभाव आणि संस्कार बनायला हवा आहे असे मत लेखक-पत्रकार आणि पर्यावरण-पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले.


वाटेकर पुढे म्हणाले, माऊलींच्या पर्यावरणीय चिंतनाला पारमार्थिक तत्त्वज्ञानाची बैठक आहे. पर्यावरणीय समस्या तेव्हा नव्हत्या, आज प्रचंड आहेत. म्हणून पर्यावरण संवर्धन वर्तन हा मानवी स्वभाव-संस्कार बनण्याची गरज आहे. हाच विचार करून अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वृक्षमित्र’ स्व. आबासाहेब मोरे यांनी १९८२ साली पर्यावरण जनजागरणाचं काम सुरु केलं होतं. आजचं पर्यावरण संमेलन हे त्याचंच रूप आहे. खरंतर निसर्गाचं स्वयंव्यवस्थापन हे व्यवस्थापनशास्त्राचं सर्वोत्तम उदाहरण आहे. मनुष्याच्या लुडबुडीमुळे पर्यावरणाचं व्यवस्थापन बिघडलं आहे. माणसांनी पर्यावरणाच्या शिस्तबद्ध चाकोरीमध्ये लुडबुड करून निर्माण केलेल्या अडथळ्यांची दुरुस्ती करायला हवी आहे. ही दुरुस्ती करण्याचे काम अनेक मंडळी आपल्यापरीने करत आहेत. अशा तज्ज्ञांचे विचार उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यात एक व्यवस्था उभी करायला हवी याची जाणीव सुमारे ३० वर्षांपूर्वी आबासाहेबांना झाली होती. त्यातून मंडळाचे काम उभे राहिल्याचे वाटेकर यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी वृक्षाला स्थितप्रज्ञ म्हणून गौरविले आहे. सर्वांभूती समदृष्टी ठेवणारी व्यक्ती आणि वृक्ष एक समान आहेत असे त्यांनी म्हटले आहे. 'जो या खांडवया घावो घाली का लावणी जायचे केले दोघन एकीच साऊली वृक्षू दे जैसा. वृक्ष जो त्याला तोडण्याच्या हेतूने त्याच्यावर घाव घालतो आणि जो पाणी घालून त्याला वाढवतो त्या दोघाना समान सावली देतो. मित्र आणि शत्रू असा भेदभाव न करता सर्वाविषयी समभाव ठेवणे हे वृक्षाचे लक्षण आहे. तसेच ते स्थितप्रज्ञ व्यक्तीचे अर्थात संताचे लक्षण आहे. ज्ञानेश्वरीत विविध वृक्षांची नावे, पशुपक्ष्यांची नावे, धातूंची नावे प्रसंगपरत्वे ज्ञानेश्वरांनी दृष्टांत, रूपक, उपमा यांच्याद्वारे समर्पकपणे उल्लेखले आहेत. अरण्यांना 'निकुंज' म्हटले आहे. ज्ञानेश्वरीत निसर्ग, पर्यावरण हे शब्द आढळत नाही. त्यांनी 'जीवसृष्टी' आणि 'भूतसृष्टी' ह्या संकल्पनांचा उपयोग पर्यावरण अर्थी घेतलेला आहे. निसर्गातील विविध घटकांचे दाखले दिले आहेत, असे वाटेकर म्हणाले.


आज समाजात काम करणारे हात कमी आहेत. म्हणून पर्यावरण विषयात काहीतरी करू पाहणाऱ्या हातांना प्रोत्साहन द्यायला हवं. ही मंडळाची भूमिका आहे. आपलं काम हे जाणीव जागृतीचं काम आहे. कार्य करत राहाणे आवश्यक आहे. यातून आदर्श स्थिती आणि वस्तुस्थिती यातलं अंतर कमी करता येईल. आळंदीतील पर्यावरण संमेलनाला रत्नागिरी जिल्ह्यातून राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, जिल्हाध्यक्ष सतीश मुणगेकर, संतोष सुर्वे, गजानन बाड, ओंकार शिपटे, सौ. मायावती शिपटे, श्रुतिका आखाडे, शैलेजा आखाडे यांच्यासह राज्याच्या पुणे, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर, ठाणे, सातारा, जळगाव, सांगली, यवतमाळ, रायगड, छत्रपती संभाजीनगर, बीड, नंदुरबार, धुळे, लातूर, मुंबई, नांदेड, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, हिंगोली, वाशिम, गोंदिया, नागपूर, कोल्हापूर, धाराशिव आदी २१ जिल्ह्यातील २०० पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

 


भारतीय वनस्पतींचा चालताबोलता माहितीकोश अशी ओळख असलेले ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (एन.जी.ओ.) आयोजित आठवे पर्यावरण संमेलन रविवार दि. २९ डिसेंबर रोजी आळंदी (देवाची) येथील देविदास आश्रमशाळा तथा मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिरात संपन्न झाले. आयोजक संस्था ही प्रमुख ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. आळंदी देवस्थानचे विश्वस्त ॲ. राजेंद्र उमाप यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रमोद मोघे, पुणे मनपाचे माजी सहाय्यक आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, देविदास आश्रम शाळेचे प्रमुख ह. भ. प. निरंजनशास्त्री कोठेकर, मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, इंद्रायणी बचाव समितीचे विठ्ठल शिंदे, . लक्ष्मण येळे, छायाताई राजपूत, विलास महाडिक, प्रभाकर म्हस्के, उपस्थित होते. संमेलनाचे प्रास्ताविक व स्वागत धीरज वाटेकर यांनी केले. यावेळी पर्यावरण पुस्तकभेट, शाल व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. पर्यावरणाचे उत्कृष्ट कार्य करणारा सातारा जिल्हा गट, अबितखिंड व आंबीखालसा ग्रामस्थ, व्ही. व्ही. पोपरे, पर्यवेक्षक माळी, पर्यावरणावर पीएच.डी करणारे आवटी दांपत्य आणि स्थानिक संयोजन समितीचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.



दुपारनंतरच्या सत्रात आळंदी येथील सिद्धबेट येथे पर्यावरणप्रेमींची क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. इंद्रायणी सेवा फौंडेशनचे विठ्ठल शिंदे आणि प्रभाकर तावरे यांनी इंद्रायणी नदीची भीषण अवस्था सर्वांच्या लक्षात आणून दिली. 

भयंकर प्रदूषणाची शिकार झालेली इंद्रायणी नदी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी आरोग्य अधिकारी अॅड. प्रभाकर तावरे यांनी, आळंदीत पर्यावरण ज्ञानयज्ञ नियमित व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. मंडळाचे सहसचिव संजय गायकवाड यांनी आभार मानले.

 



शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

 जागतिक नदी दिन विशेष



यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वाशिष्ठी नदीचे पूजन आणि नदीच्या २९० मीटर रुंद पात्रातील दोन्ही तीरांना विधीवत ६५ साड्या नेसवण्याचा उपक्रम संपन्न झाला होता. यावेळी बोलताना, ‘नदीबरोबरचे नाते अधिक घट्ट करावे लागेल’ अशी भूमिका आम्ही मांडली होती. तेव्हा या उपक्रमावर काहींनी टीका केली होती. २१-२३ जूनला चिपळूणला भारताचे जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर परिषद स्तरावरील महाराष्ट्रातील पहिली ‘नदी की पाठशाला’ संपन्न झाली. डॉ. राणा यांनीही, ‘नद्या जोडून देश पूरमुक्त होणार नाही तर माणसाला नदीशी जोडल्यास देश पूर आणि दुष्काळमुक्त होईल.’ अशा आशयाची मांडणी केली होती. संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून २००५ पासून दरवर्षी सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी (आज, २२ सप्टेंबर) जागतिक नदी दिन उत्सव संपन्न होतो. व्यक्तिनिष्ठ विकासाच्या गर्तेत मानवी मनाची समूह भावना गळून पडत चाललेली असताना नदीसोबतचे नाते घट्ट करू पाहाणाऱ्या साडी नेसवण्यासारख्या उपक्रमांकडे चांगली घटना म्हणून पाहायला हवे!

मानवी जीवनात नदीचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. नद्यांनी आपल्या जीवनात समृद्धी आणली आहे, आपला देश उत्सवप्रिय आहे. त्याचे नद्यांवर प्रचंड दुष्परिणाम झालेत. आज आपण नदीवर नदीसाठी किती वेळा जातो? आपण केवळ नदीला प्रदूषित करण्यासाठी तिच्याकडे जातो. कारण आपल्याला नदी कळलेली नाही. पूर्वी आपण दैनंदिन गरजांसाठी नदीवर जात होतो. नदीचे पाणी नळाद्वारे यायला लागल्यावर आपण नदी अस्वच्छ केली आहे. शहरांचा विकास, उद्योग, ऊर्जानिर्मिती आदी विषय पुढे नेताना नदी परिसंस्था प्रदूषित करायला हवी असे नाही. कोणत्याही नदीवरील बांध किंवा धरण हे नदी प्रवाहाच्या वरील किंवा खालील नैसर्गिक व्यवस्था आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करतात असे अभ्यासकांचे मत आहे. नदीविषयी आजचा स्थानिक शेतकरी, कष्टकरी, बुद्धिजीवी, लोकप्रतिनिधी आणि पाण्याचा वापर दैनंदिन करणारा वर्ग फारसा जागरूक नाही. निसर्गसौंदर्याने समृद्ध असलेल्या कोकणची अर्थव्यवस्था खरंतर शेती, बागायती, मासेमारी, ग्रामीण पर्यटन यावर आधारित होती. पण औद्योगिकीकरण, खाणी, रासायनिक प्रकल्प, मोठ्या गृहबांधणी योजना, श्रीमंत लोकांनी घेतलेल्या जमिनी व त्यातील उद्योग यामुळे नद्यांचे प्रदूषण वाढले आहे. मानवी जीवनात एकवेळ समुद्र सान्निध्य नसलं तरी काही अडत नाही, पण नदी किंवा ओढ्याचाही सहवास नसेल तर जीवन रुक्ष बनते. ऑन फेल्डहाऊस पंचेचाळीस वर्षे महाराष्ट्रातील नद्या, धार्मिक परंपरा, लोकजीवन यांचा अभ्यास करून नद्यांचे काठ फिरून लिहिलेले ‘नदी आणि स्त्रीत्व’ हे पुस्तक विलक्षण आहे. नदी संस्कृतीचा मानवी जीवनावर प्रचंड प्रभाव राहिला आहे. फारपूर्वी आपल्याकडे मुलींना  नद्यांची नावे आणि मुलांना पर्वतांची नावे न ठेवण्याचा प्रघात होता. नदीची चंचलता आणि पर्वताची स्थिरता यामागे असल्याची नोंद यात भेटते. नदीची खणा-नारळाने ओटी भरणे, नदीला साडी नेसवणे असे अनेक विधी देशभर होतात. नदीला माणूसपण, स्वीपण बहाल केलेले दिसते. नद्या या मानवाच्या उद्धारकर्त्या, पालनकर्त्या असल्याने त्यांना मातृत्व दिलेले आहे. मूर्तीशास्त्रानुसारही नदीचे गोमुखातून अवतरण होत असते. अध्यात्मिक पातळीवर नदीचे सारे माहात्म्य उचित असले तरी वर्तमानात नदीचे पावित्र्य हे तिच्या खळाळण्यात किंवा वाहत्या पाण्यात आहे हे जाणून होणाऱ्या कृतींकडे सजगतेने पाहाण्याची आवश्यकता आहे. वाशिष्ठी नदीला साडी नेसवण्याच्या उपक्रमाकडे ज्या सजगतेने आम्ही पाहिले तिच सजगता आम्हाला तीन दिवसीय ‘नदी की पाठशाला’ उपक्रमात अनुभवायला मिळाली. त्यातही  डॉ. राजेंद्र सिंह राणा, भूजलशास्त्र तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, जीवित नदी पुणेच्या संस्थापक शैलजा देशपांडे, भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. अजित गोखले यांनी मांडलेल्या भूमिका तर कोकणातील नद्यांच्या तीरावर राहणाऱ्या समस्याग्रस्त समूहाने काळजीपूर्वक समजून घ्याव्यात इतक्या महत्त्वाच्या होत्या. मात्र गाळ काढण्यासाठी प्रसंगी उपोषणाचे हत्यार उपसलेल्या संवेदनशील चिपळूणकरांनी दुर्दैवाने या साऱ्याकडे दुर्लक्ष केले.

‘नीर-नारी-नदी-नारायण’ - डॉ. राजेंद्रसिंह यांची घोषणा


‘नदी की पाठशाला’ कार्यक्रमात डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी आपली भूमिका मांडली. नद्या जोडून देश पूरमुक्त होणार नाही. माणसाला नदीशी जोडल्यास देश पूर आणि दुष्काळमुक्त होईल. चिपळूण शहराच्या पूरमुक्तीसाठी सह्याद्री पर्वतरांगा हिरव्यागार व्हायला हव्यात. धरणे बांधून समृद्ध होता येणार नाही. देशातील ४२ टक्के धरणे महाराष्ट्रात आहेत. तरीही शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्यात. पाणी आणि नदीसोबत आपण जोडले गेलेलो नाही. ‘नदी की पाठशाला’ उपक्रम नदीला माणसे जोडणारा आहे. कोयनेचे अतिरीक्त अवजल कृष्णा खोऱ्यात सोडून महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र याठिकाणी ते वापरात आणावे असा मुद्दा चर्चेत असल्याचेही डॉ. राणा यांनी नमूद केले. प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार ‘पंचमहाभूते’ ही आपली दैवते होती. आपण त्यांचा सन्मान करत होतो तेव्हा अख्खं जग भारताकडून शिकण्याची इच्छा व्यक्त करत होता. भारत विश्वगुरु होता. आज आपण ही ओळख गमावली आहे. कार्बन शोषण करण्याची सर्वाधिक ताकद कोकणात आहे. म्हणून लोकं कोकणात यायला इच्छुक आहेत. कोकण हे भारतातील सर्वात पाणीदार क्षेत्र आहे. येथे साडेतीन ते चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो. कोकणात स्वतःच्या जलस्त्रोतांचा अभाव आहे. पाऊस संपल्यावर कोकणातील नद्या कोरड्या पडतात. कोकणने समुद्राला जाऊन मिळणाऱ्या पाण्यातून स्वतःची वॉटरबक तयार करायला हवी अशी भूमिका त्यांनी मांडली. पावसाचे आणि कोयनेच्या वीज निर्मितीनंतर नदीमार्गे समुद्राला मिळणारे पाणी साठवून आपली नदी ही जमिनीखालूनही वाहात राहिल असे पाहायला हवे. नदी जमिनीखालून वाहते तेव्हा बाष्पीभवन होत नाही. पाण्याचा नाश होत नाही. आपली वॉटरबक कायम राहते. नद्यांच्या विकासासाठी लोकांनी पुढाकार घेतल्यास सामान्य माणूस नदीशी जोडला जाईल. अभियान अधिक यशस्वी होईल. भारतीय लोकं हे पाणी, स्त्री आणि नदी यांचा खूप आदर करतात, म्हणून त्यांना नारायण म्हणतात. नदी सभ्यतेला जन्म देते. ही संकल्पना मांडून मार्च २०२३मध्ये न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात संपन्न झालेल्या पहिल्या जागतिक जल परिषदेत  दिलेल्या ‘नीर-नारी-नदी-नारायण’ या घोषणेचा पुनरुच्चार डॉ. राणा यांनी केला तेव्हा डी.बी.जे. महाविद्यालयाचा सेमिनार हॉल दुमदुमून गेला.

 

‘डोह’ हे कोकणी नद्यांचे वैशिष्ट्य - भूजलशास्त्र तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास वडगबाळकर

भौगोलिकदृष्ट्या संपूर्ण कोकणचे वर्गीकरण तीन टप्प्यात करता येईल. मध्य कोकणात सह्याद्रीची उंची सर्वाधिक आहे. खडा सह्याद्री आहे. दक्षिण-उत्तर कोकणात सह्याद्रीची उंची कमी आहे. जिथे सह्याद्रीची उंची जास्त आहे तिथे पाऊस जास्त आहे. म्हणून दक्षिण-उत्तर कोकणच्या तुलनेत मध्य कोकणात सर्वाधिक पाऊस पडतो. उत्तर कोकणात उत्तम सखल किनारपट्टी आहे. म्हणून तो भाग अधिक वेगाने विकसित झालेला दिसतो. दक्षिण कोकणात किनारपट्टीपासून आत सखल भाग आहे. शेतीचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. मध्य कोकणात मात्र किनारपट्टी ते सह्याद्री या दरम्यान डोंगररांगा आहेत. सखलभूमीचे प्रमाण कमी असलेला डोंगराळ-खडकाळ भाग म्हणजे मध्य कोकण होय. मध्य कोकणात जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यातून नद्या, ओढे-नाले वाहतात. कोकणातील जवळपास प्रत्येक नदी ही भेगांमधून वाहाते आहे. उत्तरेतून निघून दक्षिणेला मिळणारी एकही नदी कोकणात नाही. निसर्ग आणि खडकांची अनुकूलता नसल्याने कोकणातील सगळ्या नद्या ह्या पूर्व-पश्चिम आहेत. कमी अंतरात वाहणाऱ्या नद्यांनी जमिनीला ठिकठिकाणी खोलवर खणून डोह निर्माण केले आहेत. कोकणातील नद्यांत ठिकठिकाणी आढळणारे असे डोह देशावरील नद्यांत फारसे पाहायला मिळत नाहीत. कोकणातील नद्यांचे कॅरक्टर डोह आहे. या नद्यांतील उथळ डोह स्वच्छ होतात, खोल डोह स्वच्छ होत नाहीत. आज कोकणातील हे मोठे डोह गाळाने भरलेले आहेत. धरणे होण्यापूर्वीपर्यंत कोकणात बंदरे कार्यरत होती. मात्र धरणे झाल्यावर नद्यांना अडथळे निर्माण झाले. गाळ पुढे ढकलण्याची नदीची शक्ती कमी होऊन बंदरे ओव्हरण्याचे प्रमाण वाढले. कालपरत्वे बंदरे ओव्हरली गेलीत. २०२१च्या महापुराने हा गाळ थोडा पुढे सरकलेला आहे. २००५ ते २०२१ दरम्यान गाळाचे प्रमाण वाढून अधिक उंचीचा पूर आला. कोकणातील वाशिष्टी, काजळी, सावित्री, शास्त्री आदी सर्व नद्यांना हे लागू होतं. म्हणून नुसता धरणांनाही दोष देण्यात अर्थ नाही. धरणे ही आपलीच तहान भागवण्यासाठी आहेत. कारण उल्हास वगळता कोकणातील बहुतेक नद्या पूर्वांपार हंगामी पावसाळी वाहाणाऱ्या आहेत. जांभा खडक मध्य व दक्षिण कोकण वगळता अन्यत्र नाही. जांभा खडक कठीण झाला की त्याचा कातळ बनतो. कोकणात दोन किमी. जाडीत लाव्हाचे किमान ४६ थर आहेत. हे थर आपल्याला मोजता येतात. यातील सुटलेलं मटेरियल मोठाले दगड आदी शेवटी नदीत पोहोचतं. कोकणातील डोंगर गोलाकार आहेत. त्यात विशेष पाणी साठत नाही. सपाटी असलेल्या ठिकाणी काही प्रमाणात पाणी जिरत असतं. कारण तिथे पाणी मुरायला वेळ मिळतो, झरेही फुटतात. जिथे झरे तिथे जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत नदीला पाणी असते. अन्यथा नदी कोरडी पडलेली दिसते. कोकणात अजूनही काही ठिकाणी उंच डोंगरावर, मध्यम भागात आणि समुद्रसपाटीलगत  पाणी मिळते. मात्र या प्रत्येक ठिकाणाच्या पाण्याचा मूळ स्त्रोत वेगळा आहे. आज कोकणातील नद्या धरणापर्यंत येऊन थांबल्यासारखे झाले आहे. सर्व नद्या गाळांनी भरलेल्या आहेत. जंगलतोडीमुळे गाळ वाढतो आहे. जगबुडी, शिवनदी, वाशिष्ठी सगळ्या नदी भरून वाहात असताना मोठा पाऊस आणि जर भरतीची वेळ असेल तर महापुराची शक्यता बळावते आहे. आपल्या देशातील भूजल साठ्याची परिस्थिती गंभीर आहे. कोकणात पावसाचे पाणी मुबलक आहे. परंतु व्यवस्थापनात आपण कमी पडतो. पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. यासाठी पहिल्यांदा आपण प्रत्येकाने पाण्याचा आदर करायला शिकण्याची गरज आहे. आजही गड-किल्ल्यावर किंवा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पाण्याचे साठवण तलाव पहायला मिळतात. प्रत्येक सजीवाच्या चाऱ्यापाण्याची सोय निसगनि केलेली आहे. परंतु भौगोलिक संरचनेत विविधता असल्यामुळे कोकणातील यशस्वी प्रयोग विदर्भात यशस्वी होईल याची खात्री नाही. म्हणून विभागनिहाय कोकणच्या भौगोलिकतेचा विचार करून इथला विकास करायला हवा आहे.

उत्सव हे नदी समजून घेण्याचे मार्ग - शैलजा देशपांडे

नदी एक जग दुसऱ्याला नेऊन जोडण्याचे काम करते. जी नाद करते, जी प्रवाही आहे ती नदी आहे. नदी विषयक काम करण्यासाठी नदीची नाडी ओळखता आली पाहिजे. नदीला नक्की हवंय काय? हे समजून घ्यायला हवं आहे. लोकसहभागातून नदीचे पुनरुज्जीवन व्हायला हवे आहे. नुसते रुंदीकरण आणि खोलीकरण म्हणजे नदीचे पुनरुज्जीवन नाही. नद्या स्वच्छ व्हायला हव्यात. प्रत्येक नदीचा उगम वेगळ्या पद्धतीने असतो. उगम क्षेत्रात नदी बाल्यावस्थेत खेळकर असते. तिथली जैवविविधता वेगळी असते. पुढे नदीचा खळाळता स्वभाव दिसतो. नदी आपल्या सोबत येताना गोडं पाणी आणते. ती सागराचे खारे पाणी स्वतःत घेते. नदीचे गोडे पाणी जिथे समुद्राच्या खाऱ्या पाण्याला मिळते तापमानात व्हेरिएशन असते. नदी आणि समुद्राच्या या मनोमिलनाच्या ठिकाणी जगातील सर्वोत्तम जैवविविधता असते. नदीचे प्रवाहही अनेक आहेत. पात्रामधील प्रवाह, पावसाच्या पाण्याचा प्रवाह, जमिनीत मुरणारा प्रवाह, पाझरणारा प्रवाह, भूजल यात कोठेही बाधा आली तर नदीच्या परीसंस्थेला अडचण होते. नदीतील प्रत्येक जीवाची आपली जागा असते. त्या साऱ्या जागा पुनरुज्जीवित करणं म्हणजे नदी पुनरुज्जीवित करणे होय. नदीची ही रचना महोत्सवांसारख्या जनजागरणातून सर्वांपर्यंत पोहोचवता येईल. अशी मांडणी जीवित नदी पुणेच्या संस्थापक देशपांडे यांनी केली. 

थेट पाणी पिता येईल अशा विहिरी ही श्रीमंती - डॉ. अजित गोखले

अन्न पाण्याशिवाय आपण काही दिवस तग धरू शकतो पण श्वास ही अशी गोष्ट आहे जिच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आपली जमीन जेव्हा अशक्त होते किंवा बेशुद्ध होते तेव्हा पावसाची अडचण होते. आजकाल मराठवाडा सारख्या भागात पाऊस पडल्यापडल्या पूर येत असेल तर त्याची कारणे नैसर्गिक असू शकत नाही. ग्लोबल वार्मिंग ला दोष दिला की आपण दोषमुक्त होतो ते चुकीचं आहे. नदीत मासे असतात पाऊस सुरु झाल्यावर ते समुद्राकडून खाडीकडे खाडीकडून नदीकडे नदीकडून डोंगराकडे प्रवास करतात. हे जगभर घडतं. म्हणून पावसाळ्यात नदीला कोणताही अडथळा नसावा. चुकीच्या पद्धतीने नदीला अडवल्यावर अडचणी निर्माण होतात. बंधाऱ्यातून येणाऱ्या पाण्यामुळे माशांना पुढे सरकण्यात अडथळा येतो. कोकणातील नद्या दगड फोडतील अशा क्षमतेच्या आहेत. त्या समृद्ध करण्यासाठी आम्हाला मोठी शहरे मोडावी लागतील, जाणीवपूर्वक छोट्या शहरात, गावाकडे वळावे लागेल. गावागावातील सांडपाणी जमिनीवर जाईल हे पाहायला हवे आहे. जगातील सर्वात मोठी आर्थिक सत्ता अमेरिका, कृषीदृष्ट्या भारतातील सर्वात श्रीमत राज्य पंजाब, पंजाब मधील कृषी दृष्ट्या सर्वात श्रीमंत जिल्हा भटिंडा, महाराष्ट्रातील कृषी दृष्ट्या सर्वात श्रीमंत जिल्हा कोल्हापूर, कोल्हापूर मधील कृषी दृष्ट्या सर्वात श्रीमंत तालुका शिरोळ या साऱ्यात पाण्याची कमतरता, शेतकऱ्यांची कष्ट करायची तयारी, रासायनिक खतांचा वापर यांसोबत कॅन्सरचे सर्वाधिक प्रमाण हे भयावह साम्य आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात दर चाळीस किमीवर मेगा प्रोजेक्ट्स आणण्याचे जे विचार सुरु आहेत त्याकडे पाहायला हवे आहे. कोकणात अलीकडे खूप सेप्टिक टँक बांधले गेलेत. ते तळाशी खुले आहेत. आपले त्याकडे लक्ष नाही. त्याच्या शेजारी झाडे हवी आहेत. झाडे नसल्याने ते शुध्द पाणी प्रदूषित करत आहेत. थेट पाणी पिता येईल अशा विहिरी आज कोकणातही फार कमी शिल्लक राहिल्या आहेत. ती लोकं नशीबवान आहेत. त्यांनी ही श्रीमंती जपावी असे गोखले म्हणाले.


‘नदी की पाठशाला’च्या पार्श्वभूमीवर ‘नदी महोत्सव’, नदी वारसा फेरी, नदी संस्कृती, नदी जनजागरण असे उपक्रम सर्वत्र होऊ लागलेत. स्त्रीरूपी नद्या हे कोकणसह महाराष्ट्राचे स्वाभाविक वास्तव आहे. ब्रह्मपुत्र आणि सिंधू या भारतातल्या प्रमुख पुल्लिंगी मानल्या जाणाऱ्या नद्या आहेत. काही तुरळक अपवादांमध्ये पुरुषांचे रूपांतर नद्यांमध्ये झालेल्या कहाण्या आहेत. महाबळेश्वरच्या पंचगंगेच्या देवळात पाच नद्यांचा उगम आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा निवास होऊ लागल्यावर ब्रह्मदेवाने यज्ञ करण्याचे मनात आणून, ब्रह्मारण्यात उत्तम रत्नखचित मंडप घातला. यज्ञसामुग्री जमा करून, देव, ऋषि, गंधर्व आदींना निमंत्रण केले. वेदी सिद्ध होऊन, यज्ञाच्या मुहूर्ताची घटिका भरत आली. तथापि मुख्य यजमान ब्रह्मदेव यांच्या पत्नी सावित्री वस्त्रभूषणे परिधान करण्यात निमग्न असल्यामुळे त्यांना मुहूर्ताच्या समयाचे भान राहिले नाही. विष्णुप्रभृति देवांची अनुमति घेऊन ब्रह्मदेवाने आपली द्वितीय पत्नी गायत्रीचे समागमे यज्ञदीक्षा घेतली. कर्मास आरंभ केला. नंतर मंगलवाद्यांचा गजर व वेदघोष झाला तो ऐकून सावित्री लगबगीने यज्ञमंडपांत येऊन पाहते तो गायत्रीसमागमे यजमान यज्ञ करीत आहेत. कोपायमान होऊन ब्रह्मा, विष्णु, महेश व गायत्री या चौघांस सावित्रीने शाप दिला, ‘तुम्ही गायत्रीचा पक्षपात केलात त्या अर्थी जलरूप होऊन स्त्रीनावाने जगात प्रसिद्ध व्हाल. गायत्रीही नदी होईल. तिच्याकडे लोक दुर्लक्ष करतील. हे ऐकून विष्णूंनाही क्रोध आला. त्यांनी सावित्रीला तसाच शाप दिला. या परस्पर शापांमुळे भगवान विष्णु हे कृष्णानदीरूप झाले. शिव वेण्णारूप, ब्रह्मदेव कुकुद्मतीरूप झाले. गायत्री व सावित्री यांची नावे तीच राहिली. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पोफळी पॉवर हाऊसमध्ये वार्षिक पूजेच्या प्रसंगी जलप्रपाताची अर्थात नदीची ओटी भरली जाते. पंढरपूरच्या पुढे भीमा नदीकिनारी माचणूर गाव आहे. तिथे भीमेला साक्षात श्रीसिद्धेश्वराची बहीण मानतात. माचणूरच्या सिद्धेश्वराच्या महाशिवरात्री उत्सवात नदीला साडी-चोळी वाहतात. माणसाची उन्नती ही निसर्गाशी जवळीक साधल्याने होते हे आजचं जग विसरू लागलं आहे. संदीप सावंत यांनी निर्माण केलेला ‘नदी वाहते’ हा माणसाच्या भूमिनिष्ठ जाणिवांची पाठराखण करणारा कलात्मक चित्रपट आहे. त्यातून मांडण्यात आलेला विचार प्रात्यक्षिक आहे. हा सिनेमा नदीच्या काठावरील माणसांना वाचवा असाही संदेश देतोय. खरंतर या साऱ्या पार्श्वभूमीवर कुठंतरी वाचलेल्याप्रमाणे, ‘दहा दिशातून सृष्टीवरती जे जे सुंदर येते, स्वागत करूया त्या सगळ्याचे सारून सर्व मते’ अशा मोकळ्या विचाराने वाशिष्टीला साडी नेसवण्याच्या उपक्रमाकडे पाहाण्याची आवश्यकता होती.

वाशिष्टीला साडी नेसवण्याचा उपक्रम


तर मागच्या जागतिक जलदिनी, परचुरीतील कृषी पर्यटन व्यावसायिक सत्यवान देर्देकर, त्यांच्या पत्नी डॉ. समिधा देर्देकर, समर्थ देर्देकर यांनी वाशिष्टी नदीला साडी नेसवण्याचा कार्यक्रम केला. या निमित्ताने त्यांच्या हाऊस बोटीवर चार दिवस श्रीमद्भागवत आणि मत्स्यपुराणाचे पारायण करण्यात आले. जलदिनी नदीचे पूजन होऊन २९० मीटर रुंदीच्या पात्राला एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत नेसवण्यासाठी ६५ साड्या एकमेकांना बांधून लांब पट्टा तयार करण्यात आला होता. साड्यांचा हा पट्टा एका किनाऱ्यावरून बोटीदवारे दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत नेण्यात आला होता. नदीच्या मध्यभागी काही वेळ थांबून वशिष्टी नदीची खणा-नारळाने ओटी भरण्यात आली होती. उपस्थितांना नदी स्वच्छता, प्रदूषणमुक्ती बाबत शपथ देण्यात आली. साडी नेसवण्याच्या कार्यक्रमानंतर नदीला नेसवलेल्या ६५ साड्या प्रसाद म्हणून उपस्थित महिलांना भेट देण्यात आल्या होत्या. अर्थात आपल्या संस्कृतीने नदीचे उगमस्थान हे मस्तक आणि नदी जिथे समुद्राला मिळते ते चरण मानले आहे. त्यामुळे नदीला लांबीप्रमाणे साडी नेसवणे शक्य नाही. हा विलोभनीय उपक्रम पाहाण्यासाठी गुहागरसह कराड, नाशिक, पुणे आदी दूरदूरच्या पर्यटकांनी गर्दी केली होती. याच कार्यक्रमात आम्ही वाशिष्टी नदीबाबत विवेचन केले होते. वाशिष्टी नदीचा उगमापासून ते संगमापर्यंतचा प्रवास जैवविविधतेने नटलेला आहे. या जादूई प्रदेशाचे संवर्धन करण्यासाठी जल पर्यटन, जलमार्ग वाहतूक असे विषय जोडले पाहिजेत. यातून नदीच्या तीरांवरील गावे समृद्ध करता येतील. वाशिष्टी नदीच्या तीरावर अठरापगड जातींची संस्कृती विकसित झाली आहे. डच लोकांनी १६३७मध्ये आणि स्वातंत्र्यानंतर १९७१मध्ये प्रख्यात इंजिनीयर बी. एन्. गोरे यांनी वाशिष्टीचा अभ्यास केला होता. येथे देशातील मोठे बंदर विकसित करता येईल, असा त्यांचा निष्कर्ष होता. खासदार (कै.) बापूसाहेब परुळेकर यांनीही वाशिष्ठी नदीच्या विकासाचा मुद्दा लोकसभेत मांडला होता. वाशिष्टी नदीपात्रात, समुद्राजवळ असलेल्या दाभोळची भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील शक्तिशाली बंदर अशी ओळख राहिली आहे. भारतातील बहुतांश नद्या आज प्रदूषित झाल्या आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. करोना काळात लॉकडाऊनमध्ये वशिष्टी नदीला मोकळा श्वास घ्यायची संधी मिळाली होती. तेव्हा आजवर न दिसलेले अनेक जलचर वाशिष्टीत दिसून आले होते. पाण्याची गुणवत्ता सुधारली होती. अनेकांना नदीचे सौंदर्य पाहाता आले होते. नदीचे सौंदर्य अबाधित ठेवायचे असेल तर नदीपात्र स्वच्छ राहील ते गाळाने भरणार नाही हे पाहावे लागेल. यासाठी आपल्याला अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून नदीबरोबरचे आपले नाते अधिक घट्ट करावे लागेल. आपलं जग हे भावनेवर चालतं. नदी, भूमी या सृजनाच्या, निर्मितीच्या शक्ती आहेत. या स्त्री रूपांची पूजा करणे आणि त्यांना साडी नेसवणे हे सौभाग्याचे आणि मांगल्याचे प्रतिक आहे. अशा उपक्रमातून संदर्भीय विषयाच्या भावना पवित्र व्हायला मदत होते. कोणत्याही नदीला साडी नेसवून नदीचे संवर्धन होऊ शकत नाही किंवा तिचा विकासही होऊ शकत नाही. परंतु नदीला नेसवलेली साडी पवित्र प्रसाद म्हणून नेसणाऱ्या स्त्रीच्या मनात नदी संवर्धनाची भावना नक्की दृढ करू शकते. पुढे जाऊन तीच स्त्री नदीत कचरा टाकणाऱ्या कृतीही रोखून परिवर्तन करू शकते. भारतीय समाजमनही भक्तीमार्गी आहे. ‘देखे मनुष्यजात सकळ, स्वभावतः भजनशील’ असं संत श्रीज्ञानेश्र्वर महाराजांनी म्हटलं आहे. दारुचे दुष्परिणाम माहित असूनही लोकं ती सोडत नाहीत. मात्र त्याच व्यक्तीने एखाद्या अध्यात्मिक ठिकाणी जाऊन माळ गळ्यात धारण केली की निर्धाराने दारू सुटते. नदी स्वच्छतेचेही तसेच आहे. पूर्वी त्यातले पाणी आपल्यालाच उद्या प्यायचे आहे, याची जाणीव असल्याने नदीत कोणी कचरा टाकत नव्हते. आज चित्र बदलले आहे. ते पूर्वपदावर आणण्यासाठी भक्तिमार्गाचा उपयोग केला तर बिघडलं कुठे? दुसरं एक कारण असं की आपल्या समाजाला भव्यता आणि वेगळेपणा आवडतो. अर्थात म्हणून आपण काहीही वेगळं करायला लागलो तर ते समाज स्वीकारतोच असंही नाही. पण नदीला साडी नेसवण्याचा प्रघात देशभर स्वीकारला गेला आहे. प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आपण तो कोकणात आणलाय, इतकंच! तो स्वीकारायचा की नाकारायचा हे समाज ठरवेल. मानवी समूहाच्या मनावर कोणत्याही गोष्टीचा सकारात्मक प्रभाव पडतो तेव्हा तो एका पिढीपुरता मर्यादित नसतो. तो काळानुरूप बदल स्वीकारित दीर्घकाळ टिकून राहातो. परंतु तोवर वाट न बघता ‘उचलली जीभ...’ पद्धतीने उपक्रमालाच मूर्खपणाचा प्रकार म्हणणे किंवा वाशिष्टीला साडी मग महामार्गाला सदरा असं काहीतरी उपरोधिक लिहिणे, त्याची ‘री’ ओढणे आणि असं टोकाचं हिणकस बोलणाऱ्यांना संबंधित विषयातील जागतिक तज्ज्ञ अशी ओळख असलेल्यांनी पाठिंबा देणे हे उचित नव्हे! वाशिष्टीला साडी नेसवण्याच्या उपक्रमाबाबत यानिमित्ताने इतकंच!

वाशिष्टी नदीविषयी मनोगत व्यक्त करताना धीरज वाटेकर

वाशिष्टी ही कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी आहे. इतिहासात डोकावले असता, सातवाहनकालीन राजा पुलुमावि हा गौतमी अथवा वाशिष्टी पुत्र असल्याचा संदर्भ भेटतो. आमचेही बालपण वाशिष्टी नदीकाठी कोयना जलविद्युत प्रकल्प वसाहतीत व्यतित झाले आहे. सोबत येतील त्यांना पुढे घेऊन जाण्याचे जणू व्रत आचरल्याप्रमाणे नदीचे कार्य सुरु असल्याचे आम्ही बालपणी अनुभवले आहे. नकोशा गोष्टी हळुवारपणे बाजूला सारत कसलीही खंत न करता मार्गक्रमण करत नितळ, स्वच्छ, खळखळून हसणारी नदी आज मात्र आमच्या अति हव्यासामुळे गुदमरलेली दिसते. तिला पूर्वपदावर आणण्यासाठी मानवी पाऊले सजगतेने तिच्याकडे वळायला हवीत. त्यासाठी केल्या जाणाऱ्या उपक्रमाचे स्वागत करणे, सक्रीय पाठबळ देणे हे आपले ‘समाजभान’ उत्तम असल्याचे लक्षण म्हणता येईल.

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४

‘सह्याद्री’सख्याची अचानक इक्झिट

कोकणातल्या चिपळूण सारख्या छोट्याश्या शहरात सामान्य कुटुंबात जन्मलेला डिझेल गाड्यांची दुरुस्ती करणारा एक सर्वसाधारण मेकॅनिक जेव्हा आपल्या असाधारण बुद्धिमत्तेच्या बळावर जणू एखादं वर्तमानपत्र वाचावं तसा अवघा निसर्ग वाचू लागतो. बघताबघता भारतभरातील जंगलांसह संपूर्ण सह्याद्रीचा अभ्यासक बनतो तेव्हा त्याच्यातल्या वेगळेपणाची दखल घ्यावी लागते. अशा व्यक्तिमत्त्वांच्या प्रवासामागे खूप मोठा संघर्ष असतो. मानद वन्यजीव रक्षक-अभ्यासक, ज्ञानी मित्र, ‘सह्याद्रीसखा’ निलेश विलास बापट याला त्याच्याच निवासस्थानी कुटुंबियांच्या सानिध्यात मृत्यू भेटला तेव्हा आमच्यासारख्या अगणित मित्रांसह अवघा सह्याद्रीही कळवळला.

सह्याद्री टायगर रिझर्व्हबाबत निलेश भरभरून बोलायचा
छायाचित्रात खुर्चीवर बसलेला डावीकडून पहिला निलेश 

निलेशचे वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी, १४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. निलेश म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलेला, कोणतंही काम करायला कसलाही कमीपणा न बाळगणारा निसर्गसखा. कोकणी मातीत घडलेलं आणि माणसाळलेलं हे व्यक्तिमत्त्व. निसर्गवेडापायी त्यानं देशभरच्या जंगलातील किती माणसं जोडली असतील त्याची गणती नाही. ‘सह्याद्री टायगर रिझर्व्ह’च्या उभारणीतील योगदान हा त्याच्या जीवनाचा सर्वोच्च कार्यटप्पा ठरला. निलेश मागील तीन दशकांहून अधिक काळ जैवविविधता, वन्यजीवन, निसर्ग आणि पर्यावरण आदी संवर्धन क्षेत्रात कार्यरत राहिला. त्याने भारतातील ताडोबा, पेंच, बांधवगड, रणथंबोर, STR, नागझिरा, दांडेली, कान्हा आदी जंगलांमध्ये निसर्ग प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी केल्या होत्या. किमान हजारभर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नेचर एज्युकेशन, नेचर वॉक संस्थेमार्फत वाईल्ड इंडिया फिल्म फेस्टिव्हल आदींच्या माध्यमातून ‘गेस्ट लेक्चरर’ म्हणून निसर्ग विषयक ध्वनीचित्रफीती, चित्रप्रदर्शनांच्या माध्यमातून तरुणाईच्या निसर्गविषयक जाणीवा समृद्ध करण्यात त्याने योगदान दिले होते. पुण्याच्या नेचरवॉक संस्थेमार्फत राज्यातील विविध गावात ‘पक्षी महोत्सव’ सादरीकरण केले होते. चिपळूणातील आरोही, ग्लोबल चिपळूण टुरिझम, ‘वणवा मुक्त कोकण’सह वृक्ष लागवड मोहिमेतही त्याचा सहभाग राहिला. त्याने विविध ठिकाणी तीन हजाराहून अधिक वृक्षांची लागवड यशस्वी केली होती. 


वनविभागासोबत अनेक ‘वाईल्डलाईफ रेस्क्यू ऑपरेशन्स’ यशस्वी करणे, वाट चुकलेले असंख्य अजगर, बिबटे, मगरी यांना त्यांच्या अधिवासात नेऊन सोडणे, महापुराच्या संकटात अनेकांना मदत, नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठीचे कार्यक्रम, वन विभागाच्या वन्यजीव सप्ताहांतर्गत ऑनलाईन वेबिनार, क्षेत्रभ्रमंती, निसर्ग अभ्यास सहली, ग्रामस्थ समुपदेशन, औषधी वनस्पती लागवड, मानव-वन्यजीव संघर्ष, अन्न साखळीतील वन्यजीवांचे महत्त्व अशा कितीतरी विषयांवर निलेशने दिशादर्शक काम केले. कोयना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा, त्याने आणि त्याच्यासारख्या निसर्गरक्षकांनी मागील तीन दशकाहून अधिक काळ सह्याद्रीत निसर्ग संवर्धन विषयात केलेल्या कामाचा गौरव ठरला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प भागातील घनदाट जंगलात पाणवठे निर्मिती, पुरातन विहिरी आणि जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन, गाईड ट्रेनिंग प्रोग्रॅम त्याने परिणामकारकरीत्या यशस्वी केले. रत्नागिरी जिल्ह्यात पहिले वनवासी संमेलन आयोजित करण्यात त्याचा विशेष सहभाग राहिला होता. चिपळूणच्या जवळ असलेल्या धामणवणे डोंगरावर वृक्ष, पक्षी आणि प्राण्यांनी समृध्द वनीकरण प्रकल्प उभारण्यात त्याचे सक्रीय योगदान होते. अलिकडे त्याने रत्नागिरी जिल्हातील पक्ष्यांची सूची बनवण्याचे काम मनावर घेतले होते. गेल्यावर्षी, ८ एप्रिल २०२३ रोजी पुण्यातील ‘निसर्गसेवक’ संस्थेने वर्धापन दिनी पर्यावरण संरक्षण व त्याविषयी जनजागृती करणाऱ्या व्यक्तीला गेली १६ वर्षे दिला जाणारा ‘निसर्गसेवक’ पुरस्कार निलेशला जाहीर केला. संस्थेने निलेशकडे परिचय मागितल्यानंतर आम्ही त्याच्या सल्ल्याने उपरोक्त मजकूर तयार केला होता. तो तयार करताना, ‘रत्नागिरी जिल्हा मानद वन्यजीव रक्षक म्हणून काम करायची संधी निलेशला तशी खूप उशीरा मिळाली’ असं आम्हाला वाटलं. देशात आज विद्यार्थी जडणघडण दृष्टीने कौशल्य विकास संकल्पना विकसित होत असताना किमान शासन आणि समाज यांच्यात संवाद साधणाऱ्या निमशासकीय जबाबदाऱ्यांवर नियुक्ती करताना शासनाने कमी शिकलेल्या तरुणाईच्या अनुभवाचा विचार अधिक करायला हवा आहे.



डोंगर भटक्यांना मार्गदर्शन करताना निलेश... 

कोकणच्या सांस्कृतिक राजधानीत जंगलात काम करणारे अभ्यासक, जिज्ञासू, पर्यटक आल्यानंतर त्यांना सहज माहिती देण्यासाठी आवश्यक असलेली थिएटर सुविधा, बसायला जागा उपलब्ध नाही. ही खंत निलेश आयुष्यभर बोलून दाखवत राहिला. दुसरीकडे मात्र वैयक्तिक पदरमोड निलेशने हेच काम सुरु ठेवलं होतं. आपल्याकडे पर्यावरण कार्यक्रमांना ४०/५०वर्षे वयाच्या पुढची लोकं असतात. तरुण मुलं कमी असतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धन यशस्वी होत नाही. आजही पर्यावरणात काम करणाऱ्या मुलांची संख्या हजारी दहा आहे. अशी व्यथा निलेश बोलून दाखवायचा. मनुष्याला अरण्यवाचन आल्यास जंगले टिकतील. लोकांनी निसर्गातला चमत्कार बघावा, अशी जंगलात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. जंगल हे चालत चालत बघायचं नसतं तर जंगल बघत बघत चालायचं असतं आणि हे जंगलात सातत्याने चालायला लागल्यावर समजतं. झाडाच्या मुळापासून शेंड्यापर्यंत घडणाऱ्या हालचाली वर्तमानपत्रासारख्या वाचता यायला हव्यात. नुसता पेपर चाळलात तर जंगलं आणि त्यातल्या गमतीजमती समजणार नाहीत. जंगल वाचायचे, वाचवायचे असेल तर जंगलाच्या जवळ राहणाऱ्या लोकांच्या सानिध्यात जायला हवे. आपण माणसाने जंगलासाठी, बाहेर राहून काम केलं पाहिजे. उन्हाळ्यात पाणी खाली जातं, डोंगर रिकामे होतात. आपण शासनाच्या मदतीने पाणवठ्याचे काम सुरु केले. प्राणी अधिक खाली जाऊ शकत नाहीत. त्यांचे शत्रू वाढतात. निसर्गासाठी जर काही करायचे असेल तर ते मलाच केले पाहिजे’ अशी शपथ घ्यायला हवी आहे. अशी मांडणी प्रत्येक ठिकाणी निलेश करायचा. ‘सह्याद्रीत पूर्वी आम्ही डॉक्टरांची टीम नेऊन लोकांची तपासणी करायचो. कारण हेच की सह्याद्रीत माणसं राहायला हवीत. तेव्हा ती लोकं प्राणी मारून खायची. त्यांना जीवनसत्व कमी पडायची. आम्ही त्यांना बीयाणे दिली. त्यांनी त्याची लागवड झाली. आता लोकं यातून चांगुलपणाने बाहेर आलीत.’ 


निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे चिपळूणला २०१९ साली आम्ही आयोजित केलेल्या पर्यावरण संमेलनात ‘सह्याद्रीतील वैविध्यता’ या सत्रात हे त्याने आवर्जून सांगितलं होतं. प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या लिटमस पेपरच्या कार्याप्रमाणे पक्षांना निसर्गातील बदल लवकर कळतात. पक्षी बघणं आणि निरीक्षण करणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. पक्षी लिटमस पेपरसारखे अॅक्ट होतात. त्यांचा अधिवास गेल्याने अडचणी वाढतात. आपल्याकडे साफसफाई करणारे काही पक्षी आहेत. शक्यतो सुगरण पक्ष्याचे घरटे घरात ‘शो’साठी आणून लावू नका. एका पक्षाने सोडलेले घरट्याचे वेस्ट मटेरीअल हे दुसऱ्यासाठी बेस्ट मटेरीअल असते. जंगलातून फक्त आठवणी घेऊन बाहेर यायला हवे. वळचणीच्या जागा कमी झाल्या म्हणून चिमण्या कमी झाल्यात. आपण टाकलेल्या कचऱ्यामुळे पक्षांच्या पायांना रोग झालेत. पक्षांचा पंखावर विश्वास असतो. तो सकाळी पंख साफ करतो. ते दिवसातून तीन वेळा अंघोळ करतात. खेडेगावातील लोकं आपल्या ज्ञानाप्रमाणे पक्षांना नावे देतात. ‘भारद्वाज’ला विदर्भात ‘नपिता’ म्हणतात. आपण पक्ष्यांच्या नावासाठी शास्त्रीय आग्रह धरायला हवा आहे. पक्षी जीवनाबाबतचे हे त्याचे अनुभवाचे बोलं विचारप्रवण करायचे. इतके की कधीकधी गो. नी. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर यांच्यासारख्या अस्सल निसर्गसख्याने लिहिलेली जंगलची वर्णने वाचताना मिळणारा आनंद निलेशसोबत खुल्या जंगलात वावरताना मिळून जायचा. इतकी निलेशची जंगलविषयक मांडणी अस्सल असायची.

 






विविध व्यासपीठांवर निलेश सातत्याने जंगल विषयाची
काळजाला भिडणारी मुद्देसूद मांडणी करत राहिला
 

निलेशचा स्वभाव झुंजार, कृतीशील होता. आपल्याला जे पटत नाही त्याच्याशी त्याने कधीही तडजोड केली नाही. चुकून पाय खड्डयात पडला तरी नियतीच्या नाकावर टिच्चून, कष्ट करून पुन्हा उभं राहायची त्याची धमक प्रेरणादायी होती. जंगलात-निसर्गात चुकीला माफी नाही. तिथे खूप काळजीपूर्वक प्राण्यांचं, पक्ष्यांचं, जैववैविध्याचं निरीक्षण करावं लागतं. हे अत्यंत नाजूक काम असतं. आपण निसर्गाजवळ जाऊन थोड्याफार प्रमाणात का होईना, त्यांच्या दिनचर्येचा भंग करत असतो. त्यांच्या जीवनात ढवळाढवळ करत असतो. आपलं जंगलावर प्रेम असलं तरीही ते व्यक्त करताना निष्काळजीपणा उपयोगाचा नाही. याची जाणीव निलेश नेहमी करून द्यायचा. पावसाळ्याच्या दिवसात एकदा आम्ही भैरवगडला गेलेलो. पावसाळ्यातील भैरवगडाचे दृश्य पाहून आम्ही लिहिलं... ‘भर पावसात भैरवगड’! पहिला पॅरेग्राफ लिहून नेहमीप्रमाणे निलेशला वाचायला पाठवला. वाचल्यावर लगेच त्याचा फोन आला. म्हणाला, ‘हे वाचून लोकं पावसाळ्यातच भैरवगडला जातील. अपघातांना निमंत्रण मिळेल. त्यामुळे तू या नावाने लेख प्रसिद्ध करू नको.’ अर्थात लेखाला द्यायला दुसरं नाव आम्हाला सुचलं नाही, म्हणून तो लेख आम्ही प्रसिद्ध केला नाही. निसर्गाबाबतचा जो विचार निलेशने अंगिकारला त्याचा विशेष गवगवा न करता तो त्या विचाराशी प्रामाणिक राहिला. त्याने आपला वेगळा दृष्टीकोन जाणीवपूर्वक जपला होता. निलेश आम्हाला भेटल्यापासून लेखनकारणे त्याची दखल घेण्याचा प्रयत्न आम्हीही केला. अर्थात तो अपुरा पडला. आम्हाला निसर्ग आणि किल्ल्यांची आवड तशी लहानपणापासून लागलेली. कॉलेजयीन काळात तिचा अधिक विकास कायतो झालेला. पुढे ग्रामीण पत्रकारितेत वावरताना आपल्या लेखनात अधिकाधिक संदर्भ, माहितीबहुलता यावी यासाठी पायाला चक्र लावून फिरणं सुरु झालं आणि आपल्याला आयुष्यात नेमका कोणता आनंद हवा आहे? याचं जणू ठिकाण गवसल्यासारखं झालं. हळूहळू चिकित्सक वृत्ती वाढू लागली. निसर्गातील नोंदी टिपण्यात आनंद वाटू लागला. याच वळणावर केव्हातरी निलेश भेटलेला! नक्की कधी? ते आठवत नाही. आता मात्र निलेशची अकाली एक्झिट मनाला सतावते आहे. कोरोना पश्चात, चांगली माणसे रांगा मोडून अकाली जात असल्याची भावना अनेकांच्या मनात दिवसेंदिवस दृढ होत चालली असताना जगणं महाग होऊन मृत्यू स्वस्त झालाय की काय? असं वाटू लागलं आहे.

 




सह्याद्रीसखा निलेश 

एखादी व्यक्ती आपल्यातून निघून जाते तेव्हा मागे राहिलेल्या जीवंत माणसांकडे आपसूक व्यक्तता येते. आपण गेलेल्या व्यक्तीच्या जगण्याची उकल करू लागतो. अशा काळात नदीच्या काठावरती बसून कोरडा आस्वाद घेण्यात धन्यता न मानलेला निलेश सर्वार्थाने वेगळे जीवन जगला, याचं आता खूप अप्रुप वाटतंय. निलेशच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. कोणत्याही आईसाठी तिच्या कर्तृत्वान लेकाचा मृत्यू अत्यंत वेदनादायी असतो. ही वेदना उर्वरित आयुष्यभरासाठी असते. निलेश गेला त्या रात्री आई घरात नव्हत्या. आईंना घेऊन आलेली चारचाकी गाडी चिपळूणच्या चिंचनाक्यात घरासमोरील रस्त्यावर थांबली. तेव्हा गाडीतून अर्धवट उतरलेल्या अवस्थेत आईनं आपल्या लेकाला मारलेली, ‘निलेश! ये ना रे निलेश!’ ही आर्त हाक आठवली की कोरोनोत्तर काळात गोठत गेलेल्या डोळ्यांच्या पापण्या आजही अश्रूंच्या अभिषेकाकडे वळतात.

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८


चिपळूण पर्यटन वाढीसाठी कोल्हापूर पत्रकार परिषद

चिपळूण पर्यटन वाढीसाठी सांगली पत्रकार परिषद


सह्याद्रीत बीजपेरणी अभियान 

चिपळूण पर्यटन वाढीसाठी सातारा पत्रकार परिषद


निलेशने सातत्याने मांडलेली भूमिका

दु:खद 

निलेशच्या सहवासात...

९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली - परिसंवाद - राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब

          चिपळूण :: राजकीय घडामोडींचा परिणाम समाजावर होऊन साहित्य निर्माण होत असते. सध्याचे राजकारण बिकट आणि मूल्यविहीन झाले आहे. त्यास वाचा...