शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

 जागतिक नदी दिन विशेष



यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वाशिष्ठी नदीचे पूजन आणि नदीच्या २९० मीटर रुंद पात्रातील दोन्ही तीरांना विधीवत ६५ साड्या नेसवण्याचा उपक्रम संपन्न झाला होता. यावेळी बोलताना, ‘नदीबरोबरचे नाते अधिक घट्ट करावे लागेल’ अशी भूमिका आम्ही मांडली होती. तेव्हा या उपक्रमावर काहींनी टीका केली होती. २१-२३ जूनला चिपळूणला भारताचे जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर परिषद स्तरावरील महाराष्ट्रातील पहिली ‘नदी की पाठशाला’ संपन्न झाली. डॉ. राणा यांनीही, ‘नद्या जोडून देश पूरमुक्त होणार नाही तर माणसाला नदीशी जोडल्यास देश पूर आणि दुष्काळमुक्त होईल.’ अशा आशयाची मांडणी केली होती. संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून २००५ पासून दरवर्षी सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी (आज, २२ सप्टेंबर) जागतिक नदी दिन उत्सव संपन्न होतो. व्यक्तिनिष्ठ विकासाच्या गर्तेत मानवी मनाची समूह भावना गळून पडत चाललेली असताना नदीसोबतचे नाते घट्ट करू पाहाणाऱ्या साडी नेसवण्यासारख्या उपक्रमांकडे चांगली घटना म्हणून पाहायला हवे!

मानवी जीवनात नदीचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. नद्यांनी आपल्या जीवनात समृद्धी आणली आहे, आपला देश उत्सवप्रिय आहे. त्याचे नद्यांवर प्रचंड दुष्परिणाम झालेत. आज आपण नदीवर नदीसाठी किती वेळा जातो? आपण केवळ नदीला प्रदूषित करण्यासाठी तिच्याकडे जातो. कारण आपल्याला नदी कळलेली नाही. पूर्वी आपण दैनंदिन गरजांसाठी नदीवर जात होतो. नदीचे पाणी नळाद्वारे यायला लागल्यावर आपण नदी अस्वच्छ केली आहे. शहरांचा विकास, उद्योग, ऊर्जानिर्मिती आदी विषय पुढे नेताना नदी परिसंस्था प्रदूषित करायला हवी असे नाही. कोणत्याही नदीवरील बांध किंवा धरण हे नदी प्रवाहाच्या वरील किंवा खालील नैसर्गिक व्यवस्था आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करतात असे अभ्यासकांचे मत आहे. नदीविषयी आजचा स्थानिक शेतकरी, कष्टकरी, बुद्धिजीवी, लोकप्रतिनिधी आणि पाण्याचा वापर दैनंदिन करणारा वर्ग फारसा जागरूक नाही. निसर्गसौंदर्याने समृद्ध असलेल्या कोकणची अर्थव्यवस्था खरंतर शेती, बागायती, मासेमारी, ग्रामीण पर्यटन यावर आधारित होती. पण औद्योगिकीकरण, खाणी, रासायनिक प्रकल्प, मोठ्या गृहबांधणी योजना, श्रीमंत लोकांनी घेतलेल्या जमिनी व त्यातील उद्योग यामुळे नद्यांचे प्रदूषण वाढले आहे. मानवी जीवनात एकवेळ समुद्र सान्निध्य नसलं तरी काही अडत नाही, पण नदी किंवा ओढ्याचाही सहवास नसेल तर जीवन रुक्ष बनते. ऑन फेल्डहाऊस पंचेचाळीस वर्षे महाराष्ट्रातील नद्या, धार्मिक परंपरा, लोकजीवन यांचा अभ्यास करून नद्यांचे काठ फिरून लिहिलेले ‘नदी आणि स्त्रीत्व’ हे पुस्तक विलक्षण आहे. नदी संस्कृतीचा मानवी जीवनावर प्रचंड प्रभाव राहिला आहे. फारपूर्वी आपल्याकडे मुलींना  नद्यांची नावे आणि मुलांना पर्वतांची नावे न ठेवण्याचा प्रघात होता. नदीची चंचलता आणि पर्वताची स्थिरता यामागे असल्याची नोंद यात भेटते. नदीची खणा-नारळाने ओटी भरणे, नदीला साडी नेसवणे असे अनेक विधी देशभर होतात. नदीला माणूसपण, स्वीपण बहाल केलेले दिसते. नद्या या मानवाच्या उद्धारकर्त्या, पालनकर्त्या असल्याने त्यांना मातृत्व दिलेले आहे. मूर्तीशास्त्रानुसारही नदीचे गोमुखातून अवतरण होत असते. अध्यात्मिक पातळीवर नदीचे सारे माहात्म्य उचित असले तरी वर्तमानात नदीचे पावित्र्य हे तिच्या खळाळण्यात किंवा वाहत्या पाण्यात आहे हे जाणून होणाऱ्या कृतींकडे सजगतेने पाहाण्याची आवश्यकता आहे. वाशिष्ठी नदीला साडी नेसवण्याच्या उपक्रमाकडे ज्या सजगतेने आम्ही पाहिले तिच सजगता आम्हाला तीन दिवसीय ‘नदी की पाठशाला’ उपक्रमात अनुभवायला मिळाली. त्यातही  डॉ. राजेंद्र सिंह राणा, भूजलशास्त्र तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, जीवित नदी पुणेच्या संस्थापक शैलजा देशपांडे, भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. अजित गोखले यांनी मांडलेल्या भूमिका तर कोकणातील नद्यांच्या तीरावर राहणाऱ्या समस्याग्रस्त समूहाने काळजीपूर्वक समजून घ्याव्यात इतक्या महत्त्वाच्या होत्या. मात्र गाळ काढण्यासाठी प्रसंगी उपोषणाचे हत्यार उपसलेल्या संवेदनशील चिपळूणकरांनी दुर्दैवाने या साऱ्याकडे दुर्लक्ष केले.

‘नीर-नारी-नदी-नारायण’ - डॉ. राजेंद्रसिंह यांची घोषणा


‘नदी की पाठशाला’ कार्यक्रमात डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी आपली भूमिका मांडली. नद्या जोडून देश पूरमुक्त होणार नाही. माणसाला नदीशी जोडल्यास देश पूर आणि दुष्काळमुक्त होईल. चिपळूण शहराच्या पूरमुक्तीसाठी सह्याद्री पर्वतरांगा हिरव्यागार व्हायला हव्यात. धरणे बांधून समृद्ध होता येणार नाही. देशातील ४२ टक्के धरणे महाराष्ट्रात आहेत. तरीही शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्यात. पाणी आणि नदीसोबत आपण जोडले गेलेलो नाही. ‘नदी की पाठशाला’ उपक्रम नदीला माणसे जोडणारा आहे. कोयनेचे अतिरीक्त अवजल कृष्णा खोऱ्यात सोडून महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र याठिकाणी ते वापरात आणावे असा मुद्दा चर्चेत असल्याचेही डॉ. राणा यांनी नमूद केले. प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार ‘पंचमहाभूते’ ही आपली दैवते होती. आपण त्यांचा सन्मान करत होतो तेव्हा अख्खं जग भारताकडून शिकण्याची इच्छा व्यक्त करत होता. भारत विश्वगुरु होता. आज आपण ही ओळख गमावली आहे. कार्बन शोषण करण्याची सर्वाधिक ताकद कोकणात आहे. म्हणून लोकं कोकणात यायला इच्छुक आहेत. कोकण हे भारतातील सर्वात पाणीदार क्षेत्र आहे. येथे साडेतीन ते चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो. कोकणात स्वतःच्या जलस्त्रोतांचा अभाव आहे. पाऊस संपल्यावर कोकणातील नद्या कोरड्या पडतात. कोकणने समुद्राला जाऊन मिळणाऱ्या पाण्यातून स्वतःची वॉटरबक तयार करायला हवी अशी भूमिका त्यांनी मांडली. पावसाचे आणि कोयनेच्या वीज निर्मितीनंतर नदीमार्गे समुद्राला मिळणारे पाणी साठवून आपली नदी ही जमिनीखालूनही वाहात राहिल असे पाहायला हवे. नदी जमिनीखालून वाहते तेव्हा बाष्पीभवन होत नाही. पाण्याचा नाश होत नाही. आपली वॉटरबक कायम राहते. नद्यांच्या विकासासाठी लोकांनी पुढाकार घेतल्यास सामान्य माणूस नदीशी जोडला जाईल. अभियान अधिक यशस्वी होईल. भारतीय लोकं हे पाणी, स्त्री आणि नदी यांचा खूप आदर करतात, म्हणून त्यांना नारायण म्हणतात. नदी सभ्यतेला जन्म देते. ही संकल्पना मांडून मार्च २०२३मध्ये न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात संपन्न झालेल्या पहिल्या जागतिक जल परिषदेत  दिलेल्या ‘नीर-नारी-नदी-नारायण’ या घोषणेचा पुनरुच्चार डॉ. राणा यांनी केला तेव्हा डी.बी.जे. महाविद्यालयाचा सेमिनार हॉल दुमदुमून गेला.

 

‘डोह’ हे कोकणी नद्यांचे वैशिष्ट्य - भूजलशास्त्र तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास वडगबाळकर

भौगोलिकदृष्ट्या संपूर्ण कोकणचे वर्गीकरण तीन टप्प्यात करता येईल. मध्य कोकणात सह्याद्रीची उंची सर्वाधिक आहे. खडा सह्याद्री आहे. दक्षिण-उत्तर कोकणात सह्याद्रीची उंची कमी आहे. जिथे सह्याद्रीची उंची जास्त आहे तिथे पाऊस जास्त आहे. म्हणून दक्षिण-उत्तर कोकणच्या तुलनेत मध्य कोकणात सर्वाधिक पाऊस पडतो. उत्तर कोकणात उत्तम सखल किनारपट्टी आहे. म्हणून तो भाग अधिक वेगाने विकसित झालेला दिसतो. दक्षिण कोकणात किनारपट्टीपासून आत सखल भाग आहे. शेतीचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. मध्य कोकणात मात्र किनारपट्टी ते सह्याद्री या दरम्यान डोंगररांगा आहेत. सखलभूमीचे प्रमाण कमी असलेला डोंगराळ-खडकाळ भाग म्हणजे मध्य कोकण होय. मध्य कोकणात जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यातून नद्या, ओढे-नाले वाहतात. कोकणातील जवळपास प्रत्येक नदी ही भेगांमधून वाहाते आहे. उत्तरेतून निघून दक्षिणेला मिळणारी एकही नदी कोकणात नाही. निसर्ग आणि खडकांची अनुकूलता नसल्याने कोकणातील सगळ्या नद्या ह्या पूर्व-पश्चिम आहेत. कमी अंतरात वाहणाऱ्या नद्यांनी जमिनीला ठिकठिकाणी खोलवर खणून डोह निर्माण केले आहेत. कोकणातील नद्यांत ठिकठिकाणी आढळणारे असे डोह देशावरील नद्यांत फारसे पाहायला मिळत नाहीत. कोकणातील नद्यांचे कॅरक्टर डोह आहे. या नद्यांतील उथळ डोह स्वच्छ होतात, खोल डोह स्वच्छ होत नाहीत. आज कोकणातील हे मोठे डोह गाळाने भरलेले आहेत. धरणे होण्यापूर्वीपर्यंत कोकणात बंदरे कार्यरत होती. मात्र धरणे झाल्यावर नद्यांना अडथळे निर्माण झाले. गाळ पुढे ढकलण्याची नदीची शक्ती कमी होऊन बंदरे ओव्हरण्याचे प्रमाण वाढले. कालपरत्वे बंदरे ओव्हरली गेलीत. २०२१च्या महापुराने हा गाळ थोडा पुढे सरकलेला आहे. २००५ ते २०२१ दरम्यान गाळाचे प्रमाण वाढून अधिक उंचीचा पूर आला. कोकणातील वाशिष्टी, काजळी, सावित्री, शास्त्री आदी सर्व नद्यांना हे लागू होतं. म्हणून नुसता धरणांनाही दोष देण्यात अर्थ नाही. धरणे ही आपलीच तहान भागवण्यासाठी आहेत. कारण उल्हास वगळता कोकणातील बहुतेक नद्या पूर्वांपार हंगामी पावसाळी वाहाणाऱ्या आहेत. जांभा खडक मध्य व दक्षिण कोकण वगळता अन्यत्र नाही. जांभा खडक कठीण झाला की त्याचा कातळ बनतो. कोकणात दोन किमी. जाडीत लाव्हाचे किमान ४६ थर आहेत. हे थर आपल्याला मोजता येतात. यातील सुटलेलं मटेरियल मोठाले दगड आदी शेवटी नदीत पोहोचतं. कोकणातील डोंगर गोलाकार आहेत. त्यात विशेष पाणी साठत नाही. सपाटी असलेल्या ठिकाणी काही प्रमाणात पाणी जिरत असतं. कारण तिथे पाणी मुरायला वेळ मिळतो, झरेही फुटतात. जिथे झरे तिथे जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत नदीला पाणी असते. अन्यथा नदी कोरडी पडलेली दिसते. कोकणात अजूनही काही ठिकाणी उंच डोंगरावर, मध्यम भागात आणि समुद्रसपाटीलगत  पाणी मिळते. मात्र या प्रत्येक ठिकाणाच्या पाण्याचा मूळ स्त्रोत वेगळा आहे. आज कोकणातील नद्या धरणापर्यंत येऊन थांबल्यासारखे झाले आहे. सर्व नद्या गाळांनी भरलेल्या आहेत. जंगलतोडीमुळे गाळ वाढतो आहे. जगबुडी, शिवनदी, वाशिष्ठी सगळ्या नदी भरून वाहात असताना मोठा पाऊस आणि जर भरतीची वेळ असेल तर महापुराची शक्यता बळावते आहे. आपल्या देशातील भूजल साठ्याची परिस्थिती गंभीर आहे. कोकणात पावसाचे पाणी मुबलक आहे. परंतु व्यवस्थापनात आपण कमी पडतो. पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. यासाठी पहिल्यांदा आपण प्रत्येकाने पाण्याचा आदर करायला शिकण्याची गरज आहे. आजही गड-किल्ल्यावर किंवा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पाण्याचे साठवण तलाव पहायला मिळतात. प्रत्येक सजीवाच्या चाऱ्यापाण्याची सोय निसगनि केलेली आहे. परंतु भौगोलिक संरचनेत विविधता असल्यामुळे कोकणातील यशस्वी प्रयोग विदर्भात यशस्वी होईल याची खात्री नाही. म्हणून विभागनिहाय कोकणच्या भौगोलिकतेचा विचार करून इथला विकास करायला हवा आहे.

उत्सव हे नदी समजून घेण्याचे मार्ग - शैलजा देशपांडे

नदी एक जग दुसऱ्याला नेऊन जोडण्याचे काम करते. जी नाद करते, जी प्रवाही आहे ती नदी आहे. नदी विषयक काम करण्यासाठी नदीची नाडी ओळखता आली पाहिजे. नदीला नक्की हवंय काय? हे समजून घ्यायला हवं आहे. लोकसहभागातून नदीचे पुनरुज्जीवन व्हायला हवे आहे. नुसते रुंदीकरण आणि खोलीकरण म्हणजे नदीचे पुनरुज्जीवन नाही. नद्या स्वच्छ व्हायला हव्यात. प्रत्येक नदीचा उगम वेगळ्या पद्धतीने असतो. उगम क्षेत्रात नदी बाल्यावस्थेत खेळकर असते. तिथली जैवविविधता वेगळी असते. पुढे नदीचा खळाळता स्वभाव दिसतो. नदी आपल्या सोबत येताना गोडं पाणी आणते. ती सागराचे खारे पाणी स्वतःत घेते. नदीचे गोडे पाणी जिथे समुद्राच्या खाऱ्या पाण्याला मिळते तापमानात व्हेरिएशन असते. नदी आणि समुद्राच्या या मनोमिलनाच्या ठिकाणी जगातील सर्वोत्तम जैवविविधता असते. नदीचे प्रवाहही अनेक आहेत. पात्रामधील प्रवाह, पावसाच्या पाण्याचा प्रवाह, जमिनीत मुरणारा प्रवाह, पाझरणारा प्रवाह, भूजल यात कोठेही बाधा आली तर नदीच्या परीसंस्थेला अडचण होते. नदीतील प्रत्येक जीवाची आपली जागा असते. त्या साऱ्या जागा पुनरुज्जीवित करणं म्हणजे नदी पुनरुज्जीवित करणे होय. नदीची ही रचना महोत्सवांसारख्या जनजागरणातून सर्वांपर्यंत पोहोचवता येईल. अशी मांडणी जीवित नदी पुणेच्या संस्थापक देशपांडे यांनी केली. 

थेट पाणी पिता येईल अशा विहिरी ही श्रीमंती - डॉ. अजित गोखले

अन्न पाण्याशिवाय आपण काही दिवस तग धरू शकतो पण श्वास ही अशी गोष्ट आहे जिच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आपली जमीन जेव्हा अशक्त होते किंवा बेशुद्ध होते तेव्हा पावसाची अडचण होते. आजकाल मराठवाडा सारख्या भागात पाऊस पडल्यापडल्या पूर येत असेल तर त्याची कारणे नैसर्गिक असू शकत नाही. ग्लोबल वार्मिंग ला दोष दिला की आपण दोषमुक्त होतो ते चुकीचं आहे. नदीत मासे असतात पाऊस सुरु झाल्यावर ते समुद्राकडून खाडीकडे खाडीकडून नदीकडे नदीकडून डोंगराकडे प्रवास करतात. हे जगभर घडतं. म्हणून पावसाळ्यात नदीला कोणताही अडथळा नसावा. चुकीच्या पद्धतीने नदीला अडवल्यावर अडचणी निर्माण होतात. बंधाऱ्यातून येणाऱ्या पाण्यामुळे माशांना पुढे सरकण्यात अडथळा येतो. कोकणातील नद्या दगड फोडतील अशा क्षमतेच्या आहेत. त्या समृद्ध करण्यासाठी आम्हाला मोठी शहरे मोडावी लागतील, जाणीवपूर्वक छोट्या शहरात, गावाकडे वळावे लागेल. गावागावातील सांडपाणी जमिनीवर जाईल हे पाहायला हवे आहे. जगातील सर्वात मोठी आर्थिक सत्ता अमेरिका, कृषीदृष्ट्या भारतातील सर्वात श्रीमत राज्य पंजाब, पंजाब मधील कृषी दृष्ट्या सर्वात श्रीमंत जिल्हा भटिंडा, महाराष्ट्रातील कृषी दृष्ट्या सर्वात श्रीमंत जिल्हा कोल्हापूर, कोल्हापूर मधील कृषी दृष्ट्या सर्वात श्रीमंत तालुका शिरोळ या साऱ्यात पाण्याची कमतरता, शेतकऱ्यांची कष्ट करायची तयारी, रासायनिक खतांचा वापर यांसोबत कॅन्सरचे सर्वाधिक प्रमाण हे भयावह साम्य आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात दर चाळीस किमीवर मेगा प्रोजेक्ट्स आणण्याचे जे विचार सुरु आहेत त्याकडे पाहायला हवे आहे. कोकणात अलीकडे खूप सेप्टिक टँक बांधले गेलेत. ते तळाशी खुले आहेत. आपले त्याकडे लक्ष नाही. त्याच्या शेजारी झाडे हवी आहेत. झाडे नसल्याने ते शुध्द पाणी प्रदूषित करत आहेत. थेट पाणी पिता येईल अशा विहिरी आज कोकणातही फार कमी शिल्लक राहिल्या आहेत. ती लोकं नशीबवान आहेत. त्यांनी ही श्रीमंती जपावी असे गोखले म्हणाले.


‘नदी की पाठशाला’च्या पार्श्वभूमीवर ‘नदी महोत्सव’, नदी वारसा फेरी, नदी संस्कृती, नदी जनजागरण असे उपक्रम सर्वत्र होऊ लागलेत. स्त्रीरूपी नद्या हे कोकणसह महाराष्ट्राचे स्वाभाविक वास्तव आहे. ब्रह्मपुत्र आणि सिंधू या भारतातल्या प्रमुख पुल्लिंगी मानल्या जाणाऱ्या नद्या आहेत. काही तुरळक अपवादांमध्ये पुरुषांचे रूपांतर नद्यांमध्ये झालेल्या कहाण्या आहेत. महाबळेश्वरच्या पंचगंगेच्या देवळात पाच नद्यांचा उगम आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा निवास होऊ लागल्यावर ब्रह्मदेवाने यज्ञ करण्याचे मनात आणून, ब्रह्मारण्यात उत्तम रत्नखचित मंडप घातला. यज्ञसामुग्री जमा करून, देव, ऋषि, गंधर्व आदींना निमंत्रण केले. वेदी सिद्ध होऊन, यज्ञाच्या मुहूर्ताची घटिका भरत आली. तथापि मुख्य यजमान ब्रह्मदेव यांच्या पत्नी सावित्री वस्त्रभूषणे परिधान करण्यात निमग्न असल्यामुळे त्यांना मुहूर्ताच्या समयाचे भान राहिले नाही. विष्णुप्रभृति देवांची अनुमति घेऊन ब्रह्मदेवाने आपली द्वितीय पत्नी गायत्रीचे समागमे यज्ञदीक्षा घेतली. कर्मास आरंभ केला. नंतर मंगलवाद्यांचा गजर व वेदघोष झाला तो ऐकून सावित्री लगबगीने यज्ञमंडपांत येऊन पाहते तो गायत्रीसमागमे यजमान यज्ञ करीत आहेत. कोपायमान होऊन ब्रह्मा, विष्णु, महेश व गायत्री या चौघांस सावित्रीने शाप दिला, ‘तुम्ही गायत्रीचा पक्षपात केलात त्या अर्थी जलरूप होऊन स्त्रीनावाने जगात प्रसिद्ध व्हाल. गायत्रीही नदी होईल. तिच्याकडे लोक दुर्लक्ष करतील. हे ऐकून विष्णूंनाही क्रोध आला. त्यांनी सावित्रीला तसाच शाप दिला. या परस्पर शापांमुळे भगवान विष्णु हे कृष्णानदीरूप झाले. शिव वेण्णारूप, ब्रह्मदेव कुकुद्मतीरूप झाले. गायत्री व सावित्री यांची नावे तीच राहिली. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पोफळी पॉवर हाऊसमध्ये वार्षिक पूजेच्या प्रसंगी जलप्रपाताची अर्थात नदीची ओटी भरली जाते. पंढरपूरच्या पुढे भीमा नदीकिनारी माचणूर गाव आहे. तिथे भीमेला साक्षात श्रीसिद्धेश्वराची बहीण मानतात. माचणूरच्या सिद्धेश्वराच्या महाशिवरात्री उत्सवात नदीला साडी-चोळी वाहतात. माणसाची उन्नती ही निसर्गाशी जवळीक साधल्याने होते हे आजचं जग विसरू लागलं आहे. संदीप सावंत यांनी निर्माण केलेला ‘नदी वाहते’ हा माणसाच्या भूमिनिष्ठ जाणिवांची पाठराखण करणारा कलात्मक चित्रपट आहे. त्यातून मांडण्यात आलेला विचार प्रात्यक्षिक आहे. हा सिनेमा नदीच्या काठावरील माणसांना वाचवा असाही संदेश देतोय. खरंतर या साऱ्या पार्श्वभूमीवर कुठंतरी वाचलेल्याप्रमाणे, ‘दहा दिशातून सृष्टीवरती जे जे सुंदर येते, स्वागत करूया त्या सगळ्याचे सारून सर्व मते’ अशा मोकळ्या विचाराने वाशिष्टीला साडी नेसवण्याच्या उपक्रमाकडे पाहाण्याची आवश्यकता होती.

वाशिष्टीला साडी नेसवण्याचा उपक्रम


तर मागच्या जागतिक जलदिनी, परचुरीतील कृषी पर्यटन व्यावसायिक सत्यवान देर्देकर, त्यांच्या पत्नी डॉ. समिधा देर्देकर, समर्थ देर्देकर यांनी वाशिष्टी नदीला साडी नेसवण्याचा कार्यक्रम केला. या निमित्ताने त्यांच्या हाऊस बोटीवर चार दिवस श्रीमद्भागवत आणि मत्स्यपुराणाचे पारायण करण्यात आले. जलदिनी नदीचे पूजन होऊन २९० मीटर रुंदीच्या पात्राला एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत नेसवण्यासाठी ६५ साड्या एकमेकांना बांधून लांब पट्टा तयार करण्यात आला होता. साड्यांचा हा पट्टा एका किनाऱ्यावरून बोटीदवारे दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत नेण्यात आला होता. नदीच्या मध्यभागी काही वेळ थांबून वशिष्टी नदीची खणा-नारळाने ओटी भरण्यात आली होती. उपस्थितांना नदी स्वच्छता, प्रदूषणमुक्ती बाबत शपथ देण्यात आली. साडी नेसवण्याच्या कार्यक्रमानंतर नदीला नेसवलेल्या ६५ साड्या प्रसाद म्हणून उपस्थित महिलांना भेट देण्यात आल्या होत्या. अर्थात आपल्या संस्कृतीने नदीचे उगमस्थान हे मस्तक आणि नदी जिथे समुद्राला मिळते ते चरण मानले आहे. त्यामुळे नदीला लांबीप्रमाणे साडी नेसवणे शक्य नाही. हा विलोभनीय उपक्रम पाहाण्यासाठी गुहागरसह कराड, नाशिक, पुणे आदी दूरदूरच्या पर्यटकांनी गर्दी केली होती. याच कार्यक्रमात आम्ही वाशिष्टी नदीबाबत विवेचन केले होते. वाशिष्टी नदीचा उगमापासून ते संगमापर्यंतचा प्रवास जैवविविधतेने नटलेला आहे. या जादूई प्रदेशाचे संवर्धन करण्यासाठी जल पर्यटन, जलमार्ग वाहतूक असे विषय जोडले पाहिजेत. यातून नदीच्या तीरांवरील गावे समृद्ध करता येतील. वाशिष्टी नदीच्या तीरावर अठरापगड जातींची संस्कृती विकसित झाली आहे. डच लोकांनी १६३७मध्ये आणि स्वातंत्र्यानंतर १९७१मध्ये प्रख्यात इंजिनीयर बी. एन्. गोरे यांनी वाशिष्टीचा अभ्यास केला होता. येथे देशातील मोठे बंदर विकसित करता येईल, असा त्यांचा निष्कर्ष होता. खासदार (कै.) बापूसाहेब परुळेकर यांनीही वाशिष्ठी नदीच्या विकासाचा मुद्दा लोकसभेत मांडला होता. वाशिष्टी नदीपात्रात, समुद्राजवळ असलेल्या दाभोळची भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील शक्तिशाली बंदर अशी ओळख राहिली आहे. भारतातील बहुतांश नद्या आज प्रदूषित झाल्या आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. करोना काळात लॉकडाऊनमध्ये वशिष्टी नदीला मोकळा श्वास घ्यायची संधी मिळाली होती. तेव्हा आजवर न दिसलेले अनेक जलचर वाशिष्टीत दिसून आले होते. पाण्याची गुणवत्ता सुधारली होती. अनेकांना नदीचे सौंदर्य पाहाता आले होते. नदीचे सौंदर्य अबाधित ठेवायचे असेल तर नदीपात्र स्वच्छ राहील ते गाळाने भरणार नाही हे पाहावे लागेल. यासाठी आपल्याला अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून नदीबरोबरचे आपले नाते अधिक घट्ट करावे लागेल. आपलं जग हे भावनेवर चालतं. नदी, भूमी या सृजनाच्या, निर्मितीच्या शक्ती आहेत. या स्त्री रूपांची पूजा करणे आणि त्यांना साडी नेसवणे हे सौभाग्याचे आणि मांगल्याचे प्रतिक आहे. अशा उपक्रमातून संदर्भीय विषयाच्या भावना पवित्र व्हायला मदत होते. कोणत्याही नदीला साडी नेसवून नदीचे संवर्धन होऊ शकत नाही किंवा तिचा विकासही होऊ शकत नाही. परंतु नदीला नेसवलेली साडी पवित्र प्रसाद म्हणून नेसणाऱ्या स्त्रीच्या मनात नदी संवर्धनाची भावना नक्की दृढ करू शकते. पुढे जाऊन तीच स्त्री नदीत कचरा टाकणाऱ्या कृतीही रोखून परिवर्तन करू शकते. भारतीय समाजमनही भक्तीमार्गी आहे. ‘देखे मनुष्यजात सकळ, स्वभावतः भजनशील’ असं संत श्रीज्ञानेश्र्वर महाराजांनी म्हटलं आहे. दारुचे दुष्परिणाम माहित असूनही लोकं ती सोडत नाहीत. मात्र त्याच व्यक्तीने एखाद्या अध्यात्मिक ठिकाणी जाऊन माळ गळ्यात धारण केली की निर्धाराने दारू सुटते. नदी स्वच्छतेचेही तसेच आहे. पूर्वी त्यातले पाणी आपल्यालाच उद्या प्यायचे आहे, याची जाणीव असल्याने नदीत कोणी कचरा टाकत नव्हते. आज चित्र बदलले आहे. ते पूर्वपदावर आणण्यासाठी भक्तिमार्गाचा उपयोग केला तर बिघडलं कुठे? दुसरं एक कारण असं की आपल्या समाजाला भव्यता आणि वेगळेपणा आवडतो. अर्थात म्हणून आपण काहीही वेगळं करायला लागलो तर ते समाज स्वीकारतोच असंही नाही. पण नदीला साडी नेसवण्याचा प्रघात देशभर स्वीकारला गेला आहे. प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आपण तो कोकणात आणलाय, इतकंच! तो स्वीकारायचा की नाकारायचा हे समाज ठरवेल. मानवी समूहाच्या मनावर कोणत्याही गोष्टीचा सकारात्मक प्रभाव पडतो तेव्हा तो एका पिढीपुरता मर्यादित नसतो. तो काळानुरूप बदल स्वीकारित दीर्घकाळ टिकून राहातो. परंतु तोवर वाट न बघता ‘उचलली जीभ...’ पद्धतीने उपक्रमालाच मूर्खपणाचा प्रकार म्हणणे किंवा वाशिष्टीला साडी मग महामार्गाला सदरा असं काहीतरी उपरोधिक लिहिणे, त्याची ‘री’ ओढणे आणि असं टोकाचं हिणकस बोलणाऱ्यांना संबंधित विषयातील जागतिक तज्ज्ञ अशी ओळख असलेल्यांनी पाठिंबा देणे हे उचित नव्हे! वाशिष्टीला साडी नेसवण्याच्या उपक्रमाबाबत यानिमित्ताने इतकंच!

वाशिष्टी नदीविषयी मनोगत व्यक्त करताना धीरज वाटेकर

वाशिष्टी ही कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची नदी आहे. इतिहासात डोकावले असता, सातवाहनकालीन राजा पुलुमावि हा गौतमी अथवा वाशिष्टी पुत्र असल्याचा संदर्भ भेटतो. आमचेही बालपण वाशिष्टी नदीकाठी कोयना जलविद्युत प्रकल्प वसाहतीत व्यतित झाले आहे. सोबत येतील त्यांना पुढे घेऊन जाण्याचे जणू व्रत आचरल्याप्रमाणे नदीचे कार्य सुरु असल्याचे आम्ही बालपणी अनुभवले आहे. नकोशा गोष्टी हळुवारपणे बाजूला सारत कसलीही खंत न करता मार्गक्रमण करत नितळ, स्वच्छ, खळखळून हसणारी नदी आज मात्र आमच्या अति हव्यासामुळे गुदमरलेली दिसते. तिला पूर्वपदावर आणण्यासाठी मानवी पाऊले सजगतेने तिच्याकडे वळायला हवीत. त्यासाठी केल्या जाणाऱ्या उपक्रमाचे स्वागत करणे, सक्रीय पाठबळ देणे हे आपले ‘समाजभान’ उत्तम असल्याचे लक्षण म्हणता येईल.

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...