शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

कोयनेच्या अभियंत्यांची मांदियाळी ('स्मृतिशलाका' लोकार्पण)


कोयना प्रकल्पातील निवृत्त मुख्य अभियंत्यांच्या उपस्थितीत

अलोरे शाळेच्या ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचे लोकार्पण

चिपळूण :: महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पात, आपल्या कार्यकाळात अधिकारी अभियंता म्हणून कोयना प्रकल्पाच्या मुख्य अभियंतापदासह महत्त्वाच्या विविध पदांवर सेवा बजावलेल्या मान्यवर निवृत्त अभियंत्यांच्या उपस्थितीत पुण्यातील कोथरूड येथे चिपळूण तालुक्यातील अलोरे शाळेच्या ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचे नुकतेच लोकार्पण संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलोरे-कोयनानगर भागात १९६४ ते १९७१मध्ये कार्यकारी अभियंता त्यानंतर कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता (स्थापत्य) आणि शेवटी महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याचे सचिव म्हणून सेवानिवृत्त झालेले श्रीधर ए. भेलके (साहेब) होते. 

मान्यवरांच्या लेखनासह आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक यांच्या लेखनाने समृद्ध असलेली अलोरे शाळेची ही स्मरणिका ग्रामीण शालेय स्मरणिकांच्या आजवरच्या इतिहासात वेगळी वाट शोधू पाहाते आहे. या कार्यक्रमाला कोयनेसह महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पांचे माजी मुख्य अभियंता (स्थापत्य) दीपक एन. मोडक, प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात कार्यकारी अभियंता, चौथ्या टप्प्यात पुणे येथे कोयना संकल्पचित्र मंडळाचे अधीक्षक अभियंता आणि शेवटी शासनाचे पाटबंधारे सचिव म्हणून सेवानिवृत्त झालेले अशोक पी. भावे, १९५८पासून कोयना धरण आणि टप्पा तीनच्या कामात उप अभियंता त्यानंतर पदोन्नतीवर फ्रेंच जलविद्युत प्रकल्पात कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहिलेले बालाजी एस. निकम, प्रकल्पात टप्पा चार मध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) म्हणून कार्यभार पाहिलेले संजय. के. घाणेकर, प्रकल्पाच्या अलोरे भागात कार्यकारी अभियंता (विद्युत) म्हणून काम पाहिलेले रविंद्र व्ही. भाटे, त्यांच्या पत्नी आणि शाळेशी १९७३पासून शिक्षिका म्हणून परिचित सुनंदा र. भाटे, अलोरे गावात शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी सतिश ई. शेंडे, भाग्यश्री एस. मांडके, शाळेचे मुख्याध्यापक आणि प्रकाशक विभाकर वि. वाचासिद्ध, स्मरणिकेची निर्मिर्ती करणारे ‘विद्यार्थीप्रिय शिक्षक’ अरुण के. माने, ‘तंत्रशिक्षक’ शशिकांत शं. वहाळकर आणि स्मरणिकेचे संपादक-लेखक धीरज म. वाटेकर उपस्थित होते.

श्रीधर ए. भेलके (साहेब) म्हणाले, १९६७च्या भूकंपात कोयना धरणाला विशेष धोका न निर्माण होण्यामागे गुणवत्ता सनियंत्रण आणि संशोधन विभागाचे परिश्रम आहेत. सिमेंट हे एक केमिकल आहे. त्यात पाणी किती मिक्स करायचे याचे प्रमाण ठरलेले आहे. सिमेंट कॉंक्रीटमधील आकुंचन (तडे जाणे) आणि प्रसरण पावण्याच्या प्रक्रियेमुळे भविष्यात अडचण येऊ नये म्हणून कोयना प्रकल्पात सिमेंट कॉंक्रीटचे ग्रेडेशन/मिक्स डिझाईन स्वतंत्र अभ्यास करून ठरविण्यात आले होते. प्रत्यक्ष कॉंक्रीट काम करताना तापमानवाढ होऊ नये म्हणून बर्फ वापरला गेला होता. त्यासाठी बॅचींग प्लांटची व्यवस्था करण्यात आली होती. म्हणून भूकंपात कोयना धरणाला धोका निर्माण झाला नसल्याची आठवण भेलके यांनी सांगितली. कोयना प्रकल्पाच्या पहिल्या दोन टप्प्यांचे काम पूर्ण होत आलेले असताना अलोरेत तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु करायला हवे असा विचार पुढे आला होता. पहिल्या दोन टप्प्यातील वीजनिर्मितीचे पाणी समुद्राला मिळत होते. हा परिसर समुद्रसपाटीपासून उंच होता. त्या उंचीचा उपयोग करून विद्युतगृह उभारल्यास अधिकची वीज निर्मिती शक्य असल्याचे लक्षात आले होते. हे काम सुरु झाल्यावर सुरुवातीला कोयनेतून नियमित अलोरे भागात खोलवर उतरायचे आणि पुन्हा कोयनेत परत यायचे असा दिनक्रम सुरु होता. यात प्रवासात बराच वेळ जात होता. म्हणून अलोरे वसाहत उभारली गेली. त्यामुळे कामाला अधिक वेळ देता आला. अलोरे वसाहत उभारणीची मूळकथा अशी असल्याचे त्यांनी नमूद केले. अलोरे शाळेने हा उपक्रम इथे केला त्यामुळे आम्हाला सर्वाना एकत्रित येता आलं, जुन्या आठवणींना उजाळा मिळाळा. याबद्दल भेलके यांनी शाळेचे आभार मानले.

दीपक एन. मोडक म्हणाले, वडिलांच्या बदलीमुळे १९६५ साली बालपणी कोयना प्रकल्पाचा भूभाग पहिल्यांदा पाहिला होता. कोयनेच्या शाळेत शिक्षण झाले. एक वर्ष चिपळूणला राहिलो तेव्हा इयत्ता आठवीचे शिक्षण युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये झाले होते. कोयना प्रकल्पाशी अधिकारी-अभियंता म्हणून १३ वर्षे संबंधित राहिलो. पण बालपणीचा काळ वगळता प्रकल्पाच्या वसाहतीत राहायचा योग आला नसल्याचे मोडक यांनी सांगितले. माझा एक कथासंग्रह प्रकाशित झाला असून कोयना प्रकल्पातील आठवणींबद्दल मी लिहितो आहे. यावेळी त्यांनी कोयनेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. मोडक यांनी पूर्वी प्रकल्पासाठी केलेल्या ‘महाराष्ट्राचे शक्तीपीठ : कोयना प्रकल्प’ या शासकीय कॉफीटेबल बुकविषयी आवर्जून माहिती दिली.

१९७२ पासून कोयना जलविद्युत प्रकल्पाशी अधिकारी अभियंता म्हणून संबंधित राहिलेले अशोक पी. भावे म्हणाले, आपण कार्यरत झालो तेव्हा अलोरे शाळेचे प्रपोजल शासनाकडे मंजुरीसाठी जाऊन मंजूर होऊन आले होते. शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होतो असे आठवते. शाळेच्या तुकड्या वाढवण्याची शासकीय मंजुरी आणण्यासाठी आमदार आणि शाळेचे चेअरमन डॉ. श्रीधर नातू आणि द. पा. साने (वकील) यांच्या मुंबईतील शासकीय अधिकाऱ्यांच्या भेटीप्रसंगी आपण उपस्थित होतो. अलोरे शाळा सुरु होण्यापूर्वीची स्थितीही भावे यांनी सांगितली. मुलांना दुसऱ्या गावात जाऊन शिक्षण घ्यायला लागू नये म्हणून शाळा अलोरेत आणण्यात आली. शासनाचा प्रकल्प जिथेजिथे कार्यान्वित होतो तिथे तिथे वसाहत/नगर स्थापन केली जाते. त्याप्रमाणे अलोरे गाव आणि पंचक्रोशी मिळून कार्यरत असलेल्या कोयना प्रकल्पाच्या वसाहतीला ‘वाशिष्ठीनगर’ असे नाव देण्यात आले होते. ही वसाहत अनेक गावांत पसरलेली होती. भावे यांनी शाळेच्या स्मरणिका उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. अलोरे-पेढांबे येथील स्वीचयार्डचे काम आपल्या कार्यकाळात झाल्याचे भावे यांनी नमूद केले. अलोरे विश्वकर्मा चौक ते कोळकेवाडी धरण रस्त्याला ‘पद्मभूषण एन.जी. के. मूर्ती मार्ग’ असे नामकरण माधव चितळे यांच्यानंतरचे अधीक्षक अभियंता व्ही. एम. भिडे यांनी आपल्या कार्यकाळात (१९७२) दिले होते. त्यांनी याची माहिती ‘एन.जी. के. मूर्ती’ यांनाही कळविली होती. कोयना प्रकल्प हे एक कुटुंब होते. सर्वत्र सलोख्याचे वातावरण असल्याची आठवण भावे यांनी सांगितली.

बालाजी एस. निकम म्हणाले, मी १९५८ ते १९७७ पर्यंत सुमारे १९ वर्षे कोयना प्रकल्पात काम केले. कोयनेत प्रत्येक कामात कॉंक्रीट स्ट्रेन्थ डिझाईन केली गेली होती. रबल कॉंक्रीट पद्धत पहिल्यांदा कोयना धरणासाठी वापरले गेले. कॉंक्रीट स्ट्रेन्थ डिझाईन या संशोधान संदर्भातील एक रिसर्च पेपर बी. एस. कापरे, भेलके साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिघांनी तयार केला होता. मी तेव्हा डेप्युटी इंजिनिअर होतो. हा रिसर्च पेपर देशातील विविध राज्यातील तज्ज्ञ अभियंत्यांसमोर सादर केला गेला. या पेपरला केंद्र शासनाचे राष्ट्रपतींच्या हस्ते मेरिट प्रमाणपत्र मिळाल्याची आठवण निकम यांनी सांगितली.

संजय. के. घाणेकर म्हणाले, भेलके साहेबांच्या सुरुवातीच्या कार्यकाळापासून अलोरेशी दीर्घकाळ संबंध राहिला आहे. कोणत्याही पाटबंधारे प्रकल्पाचे नियोजित लाईफसायकल असते. प्रकल्प सुरु होतो. हळूहळू कर्मचाऱ्यांची संख्या वाढते. निवासी कॉलनी नांदती होते. सर्व प्रकारचे उपक्रम सुरु होतात. प्रकल्प संपत आला आणि कालांतराने संपला की हळूहळू कर्मचाऱ्यांची संख्या कमी होते. ऑफिसेस कमी होतात. पूर्वीचं वातावरण कमी कमी होत जाऊन संपतं. हे सगळे टप्पे अलोरेच्या बाबतीत आपण अनुभवलेले आहेत. १९९९-२००० साली कोयनेचा चौथा टप्पा पूर्ण झाला. आपण चौथ्या टप्प्याच्या विद्युत गृहातील स्थापत्य कामांशी संबंधित राहिल्याचे त्यांनी नमूद केले. कोयना प्रकल्पाच्या इतिहासाचा मागील शंभर वर्षांचा पट स्मरणिकेच्या निमित्ताने एका शाळेने पुढाकार घेऊन उलगडावा हे अधिक कौतुकास्पद असल्याचे घाणेकर यांनी आवर्जून नमूद केले.

सुनंदा र. भाटे यांनी स्मृतिशलाका लोकार्पण कार्यक्रमाच्या प्रसंगी आवर्जून ‘वंदन हे शारदे’ हे गीत स्वागतगीत म्हटले. अलोरेत बदली झाल्यावर सुरुवातीच्या काळात सादर स्वप्न नाटकात केलेल्या भेलेके वहिनी यांनी मुख्य भूमिका केल्याची आठवणही भाटे यांनी सांगितली.

स्मृतिशलाका स्मरणिकेचे संपादक धीरज वाटेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेच्या निमित्ताने गावाच्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे डॉक्युमेंटेशन व्हायला हवे म्हणून हा प्रयत्न केला आहे. ब्रिटीशांच्या काळातील दुष्काळ, त्या पार्श्वभूमीवरील जलसिंचन प्रकल्प आणि मुंबई प्रांताचे अधीक्षक अभियंता एच. एफ. बील यांनी १९०१ पासून केलेले कोयनेतील सर्वेक्षण आदी भविष्यात दंतकथा वाटू शकणाऱ्या परंतु स्मरणिकेत नोंद असलेल्या अनुषंगिक मुद्द्यांचा उहापोह केला.

समारोप प्रसंगी मुख्याध्यापक विभाकर वाचासिध्द यांनी, कोयना प्रकल्पाबाबत पूर्ण जाणकार असलेल्या अधिकारी वर्गाचे एकत्रीकरण व्हावे ही इच्छा पूर्ण झाल्याचे म्हटले. कार्यरत व्यक्ती हयात असल्याने, कोणत्या शाळेच्या सुवर्णमहोत्सवावर मागील पन्नास वर्षांच्या इतिहासाच्या संकलनाची जबाबदारी येत असते. हे संकलन अमृत (७५) आणि सुवर्ण (१००) महोत्सवासाठी पुढील पिढीच्या हातात सोपवायचे असते. या अनुषंगाने झालेलं स्मरणिकेचं काम शाळेने आमच्याकडून करून घेतलं आहे. विद्यार्थ्यांच्या आठवणी जीवंत करण्याची क्षमता या स्मरणिकेत असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले. यावेळी उपस्थित मान्यवर निवृत्त अभियंत्यांना अलोरे शाळेची ‘स्मृतिशलाका’ स्मरणिका भेट देण्यात आली.

 

धीरज वाटेकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...