मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

मरणावरीही कीर्ती राहील, या कलाकाराची !


       सध्याच्या विषाणू संक्रमणाच्या काळात बारा दिवसांच्या अविश्रांत धावपळीनंतर, सरळ रेषांचा हृदयविद्युत आलेख (
Electrocardiogram) दाखवत हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जीवलग बालमित्र गमावल्याची जाणीव करून दिली तो क्षण आजवरच्या आयुष्यातील सर्वाधिक वाईट आणि वेदनादायी होता. या अशा क्षणाची आम्ही कधीही कल्पना केलेली नव्हती. तत्क्षणी भावनेने तुडुंब भरलेला बांध फुटण्याआधी स्वतःला सावरत कसाबसा पहिला फोन केला तो दुसऱ्या बालमित्राला, डॉ. तेजानंद गणपत्ये याला ! तो तातडीने पोहोचल्यावर मात्र आम्ही एकमेकांना बिलगून हॉस्पिटलच्या गेटवरच रडू लागलो. गेले बारा दिवस चाललेले डॉक्टरांचे, कुटुंबियांचे आणि मित्रांचे सारेच प्रयत्न नियतीने एका क्षणात व्यर्थ ठरवले होते. काळाने आमच्या मैत्रीवर क्रूर आघात केला होता.

       चैत्र शुद्ध ११, कामदा एकादशीला (२३ एप्रिल २०२१) रात्री ८ वाजता आम्ही शंकर कृष्णा साळवी या अवघ्या ४२ वर्षांच्या बालमित्राला गमावलं. ३ जुलै १९७९ ला जन्मलेल्या शंकरच्या जन्मापूर्वी वर्षभर अगोदर १९ एप्रिल १९७८ ला त्याचे आजोबा पांडुरंग रावजी साळवी यांचेही चैत्र शुद्ध एकादशीलाच निधन झाले होते. मला चांगलं आठवतंय, शंकर हॉस्पिटलला अॅडमिट झाल्यानंतर त्याच्याशी झालेल्या संवादातून, आठवड्याभरातल्या हालचालींवरून त्याचं ‘खोकणं’ इतकं गंभीर वळण घेईल असं मला काय जवळच्या कोणाला वाटलं नव्हतं. पण पहिल्यापेक्षा अधिक वेगवान असलेल्या संसर्गित वातावरणाने ते घडवलं. चिपळूण तालुक्यातील नागावे गावचा हा सुपुत्र मंदिर निर्मिती क्षेत्रातील आरेखन तज्ज्ञ होता. तो महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पोफळी विभागात सेवेतही होता. वेगवेगळ्या पाळ्यांमधील नोकरी, बदली आणि साईट्ससाठीचा सततचा प्रवास, आर्किटेक्चर कामांच्या बैठका, त्याच्या चिपळूणच्या ऑफिसमधली गावावाल्यांची गर्दी, कामातल्या कल्पकतेतील सातत्यासाठी येणारा ताण सांभाळून साऱ्या कसरती सुरु असायच्या. जिल्ह्यासह कोकणातल्या विविध गावात गेल्या १२/१५ वर्षांत नव्याने जीर्णोद्धारीत झालेल्या मंदिर वास्तू, इमारती, बंगले, आणि मशीद त्याच्या उत्तुंग स्थापत्य आरेखन कौशल्याची साक्ष देत उभ्या आहेत. सुरुवातीला मेकॅनिकल आणि कालांतराने सिव्हिल ड्राफ्ट्समन क्षेत्रातील आय.टी.आय. पर्यंत शिक्षण घेतलेल्या या मित्राने निवळ जिद्दीनं आणि अविश्रांत कष्टानं आपल्या आणि जवळच्या असंख्यांच्या आयुष्यात नंदनवन फुलवलं होतं. शिक्षण कमी असलं तरी सच्चाईनं कार्यरत राहिल्यास मानवी जीवनात इतरांना आदर्शवत ठरावी अशी सामाजिक उंची गाठता येते, हे त्याने आपल्या २२/२५ वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीतून सत्य करून दाखविलं होतं. भारतीय संस्कृतीचा सच्चा आदर्श जपणारं, तो सातत्याने वृद्धींगत होत राहावा यासाठी स्वतःची आर्थिक पदरमोड करून धडपडणारं हे दिलदार व्यक्तिमत्त्व होतं. आमचं एकत्रित शालेय शिक्षण झालेल्या अलोरे गावातील मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालयाच्या पुढील वर्षी (२०२२) होऊ घातलेल्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमांसाठीच्या नियोजन-संयोजन समितीचा तो सन्माननीय सदस्य होता. खोखोखेळातील चॅम्पियनम्हणून ओळखला गेलेला शंकर शालेय टीमचा कप्तान होता. कमी उंची आणि वाऱ्याच्या वेगाने धावण्याची क्षमता असलेला, पाठीवर खेळण्याचं कसब, ३-६-९ रिंगच्या क्लुप्त्या टीममधल्या इतर सदस्यांना त्याने शिकवल्या. ‘एकदा तो मैदानात उतरला की पुढची ७ मिनिटं कोणी उतरायलाच नको’, असं डॉक्टर तेजानंदने म्हटलंय ते खरं आहे. इंटिरियर डिझाईन, कपड्यांची रंगसंगती, सुशोभीकरण हे या मित्राचे कायम आवडीचे विषय राहिले.

शंकर देवाघरी गेला त्या २३ तारखेच्या सायंकाळी साडेसहा वाजता डॉ. तेजानंदचा अनपेक्षित फोन आलेला. तो म्हणाला, ‘डॉक्टरांनी पेशंटच्या भावाला भेटायला बोलावलं आहे. मी नेमका आत्ताच घरी आलोय. तूही सोबत जा हॉस्पिटलला. डॉक्टर काय म्हणताहेत ते मला लगेच कळव !’ खरंतर दोन तासांपूर्वी डॉ. तेजानंदमार्फत हॉस्पिटलमधून आलेल्या डॉक्टरांच्या निरोपानुसार, शंकरची तब्बेत कालच्यापेक्षा आज बरी जाणवत होती. त्यामुळे पुढच्या दोन तासात काहीतरी बिघडेल असं वाटणं अस्वाभाविक ! पण सध्याच्या वातावरणाचं हेच सर्वाधिक भयानक वैशिष्ट्य असावं. साडेसहाच्या डॉ. तेजानंदच्या फोननुसार मी शंकरचा भाऊ संतोषला (नाना) फोन करून हॉस्पिटलला पोहोचायला सांगितलं. सोबत सुरेश नावाचा एक तरुण सहकारी होता. हॉस्पिटलला पोहोचलो तेव्हा शंकरची तब्बेत नाजूक बनल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आम्ही, डॉक्टरांना सर्वतोपरी प्रयत्न करायची विनंती केली. तोवर सायंकाळचे सात वाजून गेलेले. इतक्यात शंकरच्या पत्नीचा, अंजलीचा साडेसात वाजता फोन आला. तिला समजावण्याचा प्रयत्न केला. थोडं ऑक्सिजन सॅचुरेशन कमी झाल्याने चिंताजनक म्हणून डॉक्टरांनी भेटायला बोलावल्याच तिला सांगितलं. ‘मी काय सांगतोय’, हे ऐकण्याच्या ती फारश्या मन:स्थितीत नसावी. पण तिला कसंही समजावून शांत राहायला सांगणं भाग होतं. हॉस्पिटलच्या आवारात घुटमळत असताना रात्री आठ वाजता व्हेन्टीलेटर वॉर्डमधून तातडीचा निरोप आला म्हणून त्या दिशेला धावलो. कुटुंबियांना पुढे बोलावल्याने मी काहीसा मागे थांबलो. डॉक्टर शंकरचा हृदयविद्युत आलेख दाखवित होते. नानाला ते लक्षात येईना, म्हणून त्याने आम्हाला हाक मारली. डॉक्टरांनी ओळख विचारली. मानवी हृदय बंद पडल्यानंतर दिसणाऱ्या सरळ रेषा असलेला फाईलला जोडलेला आलेख डॉक्टरांनी दाखविला. आलेख बघून आमचे पाय थरथरायला लागले. क्षणभर डोळ्यांसमोर अंधार पसरला. डोळ्यांनी नक्की काय पाहतोय ? हेच आम्हाला  कळेना. डॉक्टरांना विनंती करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण... ‘ही इज नो मोअर’ इतकंच काय ते डॉक्टर म्हणाले. शरीरातला त्राण गळालेल्या अवस्थेत आम्ही वॉर्डच्या पायऱ्या उतरलो. बाहेर नानासह जवळच्या दोघा-तिघांचा आक्रोश सुरु झालेला. त्यांनी बोललेल्यापैकी, ‘दादा काय पण कर ! शंकरदादाला आपण घरी न्यायचं !’ एवढंच आम्हाला कळलं. डॉ. तेजानंद आल्यावर पुढची बरीचशी परिस्थिती त्याच्यासह सन्मित्र यश खेडेकर आणि वेळेत पोहोचलेल्या एम.एस.ई.बी.च्या मोजक्या कर्मचाऱ्यांनी सावरली. तिकडे शंकरच्या घरच्या आवारात माणसं जमू लागली होती. मोबाईलवर त्याच्या पत्नीचे फोनकॉल्स वाढू लागले. ‘तिचे हे फोन उचलणार कसे ? आणि कोणत्या तोंडाने तिला काय सांगणार ?’ उपस्थितांनीही, ‘तुम्ही तिला फोनवर काही बोलू नका’ असं बजावलेलं. त्या रात्री सव्वा आठ वाजल्यापासून पावणे अकरा वाजेपर्यंत अंजलीने वीसेक फोन केले. त्यानंतर तिचे फोन बंद झाले. काहीतरी दुर्घटना घडल्याचं तिला समजलं असावं. अकरा वाजता शंकरचा पार्थिव देह घेऊन अॅम्ब्युलन्स गावी रवाना झाली. या हॉस्पिटमध्ये शंकरला आणताना अॅम्ब्युलन्सच्या वाजणाऱ्या सायरनशी आमच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू स्पर्धा करत होते. मात्र आता अॅम्ब्युलन्सच्या मागे उभा राहून आम्ही तिच्याकडे बघत राहिलो. अस्वस्थतेमुळे पुढील बराच काळ छातीतून कळा येत राहिल्या. रात्री साडेबारा वाजता शंकरच्या मानवी देहाला अग्नी दिला गेला.

शाळेत इयत्ता वेगळ्या असल्या तरी आठवीनंतर बिल्डींग कन्स्ट्रक्शन आणि ५०/५० मार्कांच्या हिंदी संस्कृतच्या तासाला आम्ही एका बेंचवर असायचो. वर्गात शक्यतो मागच्या काही रांगावर बसण्याचा आनंद घेणारा शंकर या तासांना मात्र पुढच्या रांगात यायचा. दहावीनंतर आम्ही वेगळे झालो. शंकरने जवळच्या कॉलेजात बारावीसह ड्राफ्ट्समनचा आय.टी.आय. पूर्ण केला. शिक्षणाच्या फेऱ्यातून तो लवकर बाहेर पडला. आम्ही बाकीचे मित्र शिक्षण घेत असताना हा जवळच्या औद्योगिक वसाहतीत मिळेल त्या नोकरीस जुंपलेला. थोडेफार कमवू लागला. त्या कमवण्याला पॉकेटमनीपेक्षा वेगळा अर्थ नव्हता. आम्ही स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदविकेसाठी रत्नागिरीत गेलो. सुट्टीला यायचो तेव्हा गावाच्या यात्रांत फिरायला सोबतीला बाकी कोणी मित्र नसला तरी हा हमखास असायचा. खरंतर हा गाववाल्या मित्रांसोबत यात्रेत एकदा जाऊन आलेला असायचा. पण तरीही यायचा. २००१ला आम्ही कायमस्वरूपी अलोरे-चिपळूणला आलो. तेव्हाही हा एम.आय.डी.सी.त कामाला होता. हाताला काम हवं म्हणून आवडीनिवडीच्या पलिकडे जाऊन हा काम करायचा. आम्हाला ते खटकायचं. पण इलाज नसायचा. उपजत कलाकार असलेला शंकर तेव्हा स्क्रीन प्रिंटींगही करायचा. मेकॅनिकल ड्राफ्ट्समन कोर्स झालेल्या शंकरला ‘स्थापत्य’ शाखेची भलतीच आवड होती. यातच त्याने करिअर करावं असं वाटायचं. तेव्हा अलोरेतील पोलीस मैदानासमोरील नागावे रस्त्याशेजारी असलेल्या मोऱ्यांवर तासनतास बसून आम्ही भविष्याची स्वप्न रंगवायचो. हळूहळू आपण इथे राहायचं नाही, मुंबई-पुण्यात नोकरी धंद्याला जायचं असं आमच्या मनानं घेतलं. शंकरनेही तेच स्वीकारलं. यासाठी आम्ही गद्देपंचविशीत एकत्रित खूप प्रवास केला. ‘दोघांना एकाच वेळी एकाच शहरात नोकरी मिळाल्यासच आपण गाव सोडायचं’ या भूमिकेला नियतीने कधीही सहकार्य केलं नाही म्हणून आम्ही चिपळूणातच राहिलो.

आम्ही चिपळूणात एका बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स फर्ममध्ये नोकरीस लागल्यावर पुढच्या २/४ महिन्यात शंकरला सिव्हील ड्राफ्ट्समनची संधी चालून आली. ग्रामीण पत्रकारिता करताना वाचनात आलेली स्थानिक वर्तमानपत्रातील जाहिरात आम्ही याला दाखविली. टूडी अॅटोकॅडचे पक्के ज्ञान असलेल्या शंकरला आम्ही नागावेतल्या एस.टी.डी. बूथमध्ये बसून थ्री-डी अॅटोकॅडच्या काही कमांड सांगितलेल्या, बस्स ! सतत काहीतरी नवीन शिकण्याच्या उमेदीच्या बळावर शंकर जाहिरातीतील आर्किटेक्चरल फर्ममध्ये निवडला गेला. तेव्हा त्याच्या आयुष्याने पहिल्यांदा सर्वोत्तम निर्णायक वळण घेतलं. इथे दहाएक वर्षे काम करताना त्याने खूप काही चांगलं आत्मसात केलं. मंदिरवास्तू निर्मिती आरेखनतज्ज्ञ या त्याच्या ओळखीमागचा पाया इथे जठार नावाच्या आर्कीटेक्ट मार्गदर्शकांच्या हाताखाली सक्षम झाला. त्यानंतर कष्टयुक्त कर्तृत्वाच्या सुगंधाने बहरलेल्या या मित्राने आपल्या कर्तबगारीने ‘डिझाईन सूत्र’ आणि मागील ७/८ वर्षांपासून ‘अमृतवास्तू असोसिएट’ फर्म उभारून या पायावर कळस चढविला. एकदा, ‘नव्या फर्मला नाव काय द्यायचं ?’ असा विषय पुढे आल्यावर आम्हीच त्याला एका भेटीत त्याच्या वडिलांच्या मुखी आलेल्या ‘अमृत’ शब्दाचा आधार घेत ‘अमृतवास्तू’ नाव सुचविलं. जे त्याने आनंदाने स्वीकारून आपल्या कर्तबगारीने प्रसिद्धीस आणलं होतं. आपण उरले ते कर्तव्य करावे ! तेणे त्याचे नाव भूषवावे !! आपल्या कुळात गौरव पावोनि जावे ! तेणे भूषण वडिलांसि !!’ असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या "ग्रामगीता' ग्रंथातील २२व्या अध्यायात म्हटलंय. शंकर सर्वार्थाने ते आयुष्य जगला. त्याच्या जाण्याने त्याचे कुटुंबिय आणि समाजासह माझ्यासारख्या असंख्य अभागी मित्रांचं नुकसान झालं. पण अलोरे पंचक्रोशीतील ‘नागावे’ गावाचे भविष्यात न भरून येणारे नुकसान झाले आहे, हे नक्की !

कोकणात मंदिरं हा गावाच्या भावनिकतेचा, सार्वत्रिक श्रद्धेचा, जिव्हाळ्याचा, आत्मियतेचा आणि सामुदायिक निधी संकलन करून जीर्णोद्धारीत होणारा विषय आहे. शंकर हा कोकणातील कित्येक गावात आपल्या मंदिरशिल्प निर्मितीतील आरेखन कलाकारीमुळे घराघरात पोहोचला होता. राजापूर तालुक्यातील पेंडखळे, दत्त मंदिर राजापूर, संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर, सरंद, देवरुख, तुरळ, शिंदे आंबेरे, उक्षी, कुंभारखाणी, कळंबस्ते, चिपळूण तालुक्यातील शिरगाव, भराडे, कळवंडे, कात्रोळी, देवखेरकी, खडपोली, आंबेरे, आकले, मुंढे, बिवली, वहाळ, मांडकी, वालोपे, अनारी, मोरवणे, खेड तालुक्यातील लवेल, माणी, भेलसई, दाभीळ, धामणदेवी, दापोली तालुक्यातील मुरुड, आसूद, वणोशी, पालघर (बुद्धविहार), आडे, आंजर्ले, दाभोळ, मांदिवली (मशीद), गुहागर तालुक्यातील खोडदे, जामसूत, कुटगिरी, पोसरे, पडवे, भातगाव, झोंबडी, कुडली, उभळे, तवसाळ, काजुर्लीसह देवगडातील भवानी मंदिरापर्यंत कोकणातील अनेकविध गावात त्याच्या मंदिर कलेची अनुभूती पाहायला मिळते. त्याने एखाद्या मंदिराच्या जुन्या वास्तूची, जागेची आणि गावच्या अपेक्षांची नीट माहिती घेऊन तयार केलेल्या पहिल्याच डिझाईनला अनेकदा भर बैठकीत गावची संमती मिळायची. ग्रामदेवतेच्या साक्षीने भरलेल्या गावसयीत (ग्रामस्थ बैठक) आपल्या संबंधित गावच्या मंदिर निर्मितीबाबतच्या संकल्पना उपस्थित ग्रामस्थांना समजतील अशा सहज सोप्या शब्दात सांगण्याची शंकरची हातोटी अफलातून होती. मंदिर निर्मितीसारख्या क्षेत्रात देवाच्या दारात उभं राहून आपली सेवा देणाऱ्या, आपल्या नियोजित मानधनामधला काही प्रतिशत भाग कायम दैवी शक्तीसाठी आपणहून जबाबदारीने सोडून देणाऱ्या या सात्विक प्रवृत्तीच्या कलाकाराला निसर्गशक्तीने इतक्या लवकर आपल्याकडे बोलावून घेण्याची घाई का बरं केली असावी ? हे न उलगडणारे कोडे आहे.

शंकरचं दिलदार वागणं, मोकळं हसणं आणि मित्रांत आठवून-आठवून रंगतदार गप्पा मारणं अफलातून होतं. मी काय ? डॉ. तेजानंद काय ? किंवा शंकर काय ? खरतरं आम्ही बालपणीचे सर्वांसारखेच एकमेकांचे मित्र ! पण सध्याच्या स्पर्धेच्या युगात, यांत्रिक व्यस्ततेत इतके गुरफटलेलो की भेटणं सोडा, आमचं क्षणभराचं मैत्रीपूर्ण बोलणंही होणं अवघड झालेलं. पण मैत्रीचा धागा घट्ट होता. गाठीभेटी अभावाने व्हायच्या. यात गेल्या ५/६ वर्षांत बदल घडवला तो आमच्या अलोरेतील शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या पूर्वनियोजन उपक्रमांनी, बालमित्रांच्या गेटटुगेदर्सनी ! यासाठी आम्ही सारेच शाळेचे, बालमित्रांचे आजन्म ऋणी असू. गेल्यावर्षी कोरोना-१चा प्रभाव जरासा ओसरल्यावर, २ ऑगस्टला आम्ही डॉ. तेजानंदचा वाढदिवस शंकरच्या ऑफिसमध्ये साजरा केला होता. तत्पूर्वी माझाही ! पण याचा वाढदिवस साजरा करायला आम्ही विसरलो. चालू वर्षातल्या गेल्या काही महिन्यात संकल्पित व्यावसायिक कारणाने आम्ही पुन्हा जवळ आलो. कामासंदर्भात २/३ वेळा पुण्याला नि १/२दा रत्नागिरी प्रवास केला. खूप गप्पा केल्या. तेव्हा सुधाकर घोटगे सोबत होता. आज त्या प्रवासातील गमतीजमती आठवल्या की जी अस्वस्थता निर्माण होते ती शब्दात पकडणं कठीण आहे. सांगण्यासारखे अनेक प्रसंग आहेत, या मित्राचे ! पुण्याच्या प्रवासात खरेदी करताना यानं लहान लेकीला छानशी डॉल (बाहुली) खरेदी केलेली. आम्हालाही आवडली. पुढच्या प्रवासात पुन्हा काहीतरी खरेदी करू लागला. म्हणून याला सहज विचारलं तर म्हणाला, ‘अरे काय सांगू धीरज ! लेक म्हणाली, पप्पा ! या डॉलचे केस खूप वाढलेत. म्हणून मी कात्रीने कापतेय.’ लेकीचा बालवयातील हा अल्लडपणा ज्या सहज शब्दात तो सांगून गेला, त्याला तोड नाही. आता हे सारं आठवतंय ! काळ जसजसा पुढे सरकेल तसतसा शंकरच्या आठवणींचा पाऊस आमच्या डोळ्यांच्या पापण्या ओलावत राहील.

दुचाकी चालवायला हा शिकेल की नाही ? अशी स्थिती असणारा शंकर पुढे सराईतपणे चारचाकी चालवू लागला. त्याने स्वतःची कार घेतली. शहरात ऑफिस केलं. त्याच्या कारमधल्या गणपती बाप्पाला कायम छानसा हार अर्पण केलेला असायचा. शंकरने नवीन गाडी घेताच वेळ काढून आम्ही, तो आणि प्रशांत लाटकर असे तिघे बालमित्र ऑगस्ट २०१४ मध्ये गोवा आणि उत्तर कर्नाटक फिरायला गेलेलो. यावेळी दूधसागर धबधब्याकडे जाताना जंगलातून तुफानी पावसात सरकत्या मार्गावर दुचाकीवरून केलेला थरारक प्रवास आठवतो. त्यांनतर त्याचीच गाडी घेऊन ऑगस्ट २०१५ मध्ये कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो. जाताना हा नागावेतून आमच्याकडे चिपळूणला खेण्डीतल्या घरी आला. पहाटेच्या काळोखात गाडी रिव्हर्स घेताना याने रस्त्यावर तिरका मातीत गाडलेल्या एका पाण्याच्या निकामी पाईपमध्ये गाडीची पाठीमागची डावीकडील बाजू ठोकली. ऐकू येण्याइतपत आवाज झाला. दोन इंचाचे होल पडले. ‘असो साधु, भक्त विद्वान ! त्यांनीही न खावे कष्टाविण !! उलट आदर्श दावावा झटून ! सर्व लोकांसी !!’ या तत्वाने जगणाऱ्या, कष्टातून पै-पै जोडून गाडी खरेदी केलेल्या सज्जनमार्गी शंकरला पहाटेच्या समयी गाडीला पडलेला हा होल जिव्हारी लागला. याचा चेहरा पार उतरला. आम्हालाही वाईट वाटलं. पण गाडी नाशिकला न्यायची असल्याने आम्ही ते डोक्यातून काढलं. हा मात्र, ‘अरे माझी कष्टाने खरेदी केलेली गाडी आहे यार !’ असं सारखं म्हणत राहिला. पुढे कल्याणजवळ एका ‘टचअप’वाल्याला विचारलं. त्यानं आम्ही नाशिकला जातोय म्हटल्यावर तिथे हे काम होईल म्हणत पत्ताच हाती टेकवला. तेव्हा शंकरच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. नाशिकला पोहोचताच गाडीला पडलेलं ते होल आम्ही बुजवलं. दिसूनही न येणारं छानसं रंगकाम करून घेतलं तेव्हा याचा ‘कुंभमेळा’ आनंदी झाला. ५/६ वर्षांपूर्वी केलेल्या या दोन्ही प्रवासाचे छानसे फोटोज आम्ही त्याला भेट दिलेले. खूप कामाचा थकवा आल्यावर तो ते संगणकावर आवर्जून पाहायचा. पोटभर गप्पा करायचा.

मागील वीसेक वर्षांत आमच्या बहरलेल्या संपादकीय भूमिकेसाठी आवश्यक असलेल्या ‘पेज ले आऊट / डीटीपी डिझाईन’ आदी कौशल्याच्या मुळाशी स्क्रीन प्रिंटींगची कामं करणाऱ्या शंकरचं मार्गदर्शन होतं. स्वतःच्या कौतुकाबाबत विशेष काही आमच्याकडून लिहून न घेतलेल्या शंकरने त्याच्या निधनाची बातमी आणि हा श्रद्धांजलीपर ब्लॉगलेख लिहिण्याची वेळ आमच्यावर आणली. कमी वयात शब्दशः किरकोळ आणि तुटपुंज्या शिक्षणाच्या बळावर जिद्दीनं आणि अविश्रांत कष्टानं फुलवलेलं एक उमदं, कुटुंबियांचा आधार असलेलं व्यक्तिमत्त्व जीवनातील सर्वाधिक सुखद-दु:खद आठवणींचा ठेवा हवाली करून आणि आपली निर्णायक छाप समाजमनावर सोडून अनंतात विलीन झालं. खरंतर शंकरच्या तब्बेतीला आराम मिळावा म्हणून म्हणून त्याचा मोठा भाऊ, दुसऱ्या दिवशी शनिवारी कुटुंबियांचे आराध्यदैवत असलेल्या मारुतीरायाला अभिषेक करणार होता. त्या अभिषेकाआधीच शुक्रवारी रात्री शंकर देवाघरी गेला. शंकरच्या पत्नीला, गेले बारा दिवस तब्बेतीबाबत कायम सकारात्मक समजावणारे आम्ही शंकर गेल्याच्या रात्री तिचे तब्बल वीसेक मोबाईल कॉल येऊनही ते उचलण्यास अपात्र ठरलो.

२०/२५ वर्षांच्या अथक परिश्रमातून, कोणत्याही टेकूशिवाय निवळ स्वकर्तृत्वावर उभं राहिलेलं हे व्यक्तिमत्त्व इतक्या क्रूरपणे काही कळायच्या आत निसर्गशक्तीने आमच्यातून का हिरावून नेलं ? हा प्रश्न सतावतो आहे. ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्या हातात नसतात, ती काळावरच सोडायची असतात. ‘काळ’ हेच त्यांचे उत्तर असते. हे तत्त्वज्ञान कितीही घोकायचं म्हटलं तरीही भारतीय संस्कृतीच्या सच्च्या वारसदाराच्या बाबतीत नियती इतकी कठोर का बरं वागली ? ज्या निसर्गशक्तीला, आमच्या मित्राला आमच्यातून न्यायची इतक्या लवकर घाई झाली, तिच्याविषचीचा मानसिक उद्वेग आम्हाला असह्य करतो आहे. या जीवलग मित्राला श्रद्धांजली अर्पण करताना कुठेतरी वाचलेलं नि आठवलेलं ‘मरणावरीही किर्ती राहील, या कलाकाराची !’ म्हणावसं वाटतं. जाताजाता, हे मारुतीराया ! कलेवर निस्सीम प्रेम केलेल्या आमच्या या मित्राला, तुझ्या भक्ताला तुझ्याच पवित्रचरणी सद्गती लाभू देत !! ही प्रार्थना !!!

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८  

dheerajwatekar@gmail.com


विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री. अ. के. माने सरांचे आशीर्वाद घेताना 


कोकणातील एका जुन्या बांधणीच्या मंदिराची पाहणी करताना 


दहावी होऊन २० वर्षे पूर्ण झाल्यावर आमच्या १९९५ बॅचने 
आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी संमेलन आणि 
शिक्षक कृतज्ञता सोहळ्यात आम्ही संपादित केलेला 
हा विशेषांक बालमित्र शंकरसह प्रशांत लाटकर आणि 
डॉ. तेजानंद गणपत्ये या तीन मित्रांच्या 
विशेष सहकार्याने प्रकाशित झाला होता


गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधब्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या 
छायाचित्रात डावीकडून धीरज वाटेकर, शंकर साळवी आणि प्रशांत लाटकर


गतवर्षी कोरोना-१ काळात आम्ही २ ऑगस्टला 
बालमित्र डॉ. तेजानंदचा वाढदिवस साजरा केला होता


शरावती नदीवरील प्रसिद्ध जोग फॉल्सच्या पार्श्वभूमीवर 
२०१४ साली या बालमित्राची टिपलेली ही आनंददायी मुद्रा


शंकरच्या वास्तू संकल्पना


शाळेतील एका कार्यक्रमात माजी विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना


शंकरच्या वास्तू संकल्पना ( बुद्धविहार अलोरे)


शंकरच्या वास्तू संकल्पना ( जामा मस्जिद मांदिवली दापोली)


शंकरच्या वास्तू संकल्पना ( श्रीसोमजाई ग्राममंदिर तवसाळ गुहागर)

शनिवार, १७ एप्रिल, २०२१

आंबोलीत सुरु आहे स्वच्छतेचा 'अभिषेक'

    गेल्यावर्षी कोरोना विषाणूच्या संक्रमणापूर्वी महिनाभर अगोदर शेवटची जंगलमय आंबोली पाहिली होती. तेव्हा अनेक ठिकाणी नजरेला खटकलेल्या कचऱ्याने तीव्र दु:खही झालेलं. सोबत असलेले वन्यजीव अभ्यासक रोहन कोरगावकर मात्र प्रत्येक नेचरट्रेलमध्ये जंगलवाटांवर पडलेला कचरा गोळा करत होते. यंदाही कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात सक्रीय होण्यापूर्वी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आंबोलीला गेलेलो. तेव्हाही नेचरट्रेलमध्ये जंगलवाटांवर पडलेला कचरा गोळा करण्याचे काम चालू राहिले. दरम्यान ‘आंबोली’त स्वच्छतेचा ‘अभिषेक’ सुरु असल्याची माहिती मिळाली. काहीसं सुखावायला झालं. स्वच्छतेच्या या अभिषेकात आपणही सामील व्हावं असं बोलूनही दाखवलं. पण आम्ही आंबोलीत असताना नेमक्या कचरा भरण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या संपलेल्या होत्या. स्वच्छतेच्या या अभिषेकातून एक-दोन नव्हे तर तब्बल अडीचशे पिशव्यांतून साडेबाराशे किलोहून अधिक कचरा केवळ महादेवगड पॉईंट परिसरातून गोळा झाल्याचे आम्ही पाहिले. आम्ही आंबोलीत सुरु असलेला हा स्वच्छतेचा 'अभिषेक' समजून घेतला. चांगलं काहीतरी घडवू पाहणाऱ्या अशा सत्प्रवृत्त कामांना समाजाची खंबीर साथ मिळायला हवी, या हेतूने केलेलं हे विवेचन !

१०-१२ वर्षांपूर्वीपर्यंत अभिषेक नार्वेकर हा तरुण (मो. ०९४२३२१३१५३) इतर पर्यावरण प्रेमींप्रमाणे आंबोलीत संशोधनासाठी येणाऱ्या संशोधकांसोबत काम करत होता. अशा साऱ्या कामातून संशोधन पातळीवर ‘आंबोली’ खूप पुढे गेली. पण ‘संवर्धन’ विषय मागे पडला. यातला कचरा हा विषय अभिषेकला खटकत होता. तसे आंबोलीच्या स्वच्छतेचे प्रयत्न यापूर्वी ‘मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब’ने केलेले होते. पुन्हा त्याची गरज असल्याचे लक्षात आल्याने अभिषेकने एके दिवशी ठरवलं, ‘आंबोलीतील मुख्य रस्त्यावर असलेल्या पोलीस चौकीपासून महादेवगड पॉईंटच्या शेवटपर्यंत आणि रस्त्याच्या दुतर्फा दरीत पडलेलाही सारा कचरा स्वच्छ करायचा’. त्याने आपली ही भूमिका सोशल मिडीयावर, ‘PROJECT CLEAN AMBOLI’ पेजवर जाहीर केली. समाजाचा प्रतिसाद मिळू लागला. अभिषेकने आपले सहकारी चेतन नार्वेकर, राकेश देऊलकर, सुजन ओगले आणि कौमुदी नार्वेकर यांच्या सहकार्याने हा कचरा गोळा केला. यासाठी त्यांनी २५ किलो क्षमतेच्या सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या उपयोगात आणल्या. या टीमने मार्चच्या शेवटच्या आठवडयापर्यंत अडीचशेहून अधिक पिशव्या भरल्या होत्या. या पिशव्यातील कचरा सरासरी ५ किलो वजनाचा गृहित धरला तरी संपूर्ण कचरा साडेबाराशे किलो होत होता. आम्ही आंबोलीत होतो तेव्हा या अभियानाला तीनेक आठवडे झाले होते. आज ४५-५० दिवस होत आलेत. इथले स्थानिक सोशल मिडीयावर फारसे सक्रीय नसल्याने अभिषेकने तीनेक आठवडे कचरा गोळा केल्यावरही प्रशासनापर्यंत याची माहिती पोहोचली नव्हती. कचरा गोळा करायला सुरुवात केल्याच्या पहिल्या दिवशी अभिषेकने चार बॅग कचरा गोळा केला होता. यासाठीची वेळ त्याने सकाळ किंवा संध्याकाळची ठरवली होती. अशाच एके दिवशी त्याने तब्बल १६ बॅग कचरा गोळा केला.

महादेवगड पॉईंट परिसरात खूप कचरा होता. बराच कचरा वाऱ्याने उडून खोल दरीत गेला होता. अभिषेकने गोळा केलेल्या एकूण कचऱ्यापैकी रस्त्याशेजारी पडलेला मोजका कचरा वगळता ९५ टक्के कचरा हा जंगलात उताराच्या बाजूंवर दरीत मिळालेला आहे. माउंटनेरिंगचा कोर्स पूर्ण केलेल्या अभिषेकने गेल्या अनेक वर्षांपासून दरीत गेलेला, अडकून राहिलेला कचरा पहिल्यांदा दरीबाहेर आणला. दरीतून वरती जमिनीकडे पाहिले असता स्वच्छतेसाठी गेलेल्या व्यक्तीला बराच कचरा पानांखाली लपलेला दिसतो. मात्र हा कचरा जमिनीवरून दरीत खोलवर पाहिले असता दिसत नाही. यात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, मद्याच्या बाटल्या, वेफर्सटाईप कुरकुऱ्यांची पाकीटे पुष्कळ आहेत. आंबोलीसारख्या संरक्षित जंगलात कचरा स्वच्छतेची जबाबदारी प्रशासनाची  आहे. पण ती ‘माहितीचे फलक’ लावण्यापलिकडे किती काळजीपूर्वक तपासली जाते ? काय माहित. असो ! तर दरीतला हा कचरा जमिनीवर आणून पुन्हा महादेवगड पॉईंटच्या पार्किंगपर्यंत नेणे वाटते तितके सोपे नव्हते. ज्यांनी आंबोली आणि महादेवगड पॉईंट पाहिला आहे, त्यांना यातले किमान परिश्रम लक्षात यावेत. परिश्रम लक्षात आलेल्या पर्यटकांनी पर्यटनस्थळी कुठेही, कसाही कचरा फेकताना हे काम जरी लक्षात घेऊन जंगल क्षेत्रातील अस्वच्छता टाळली तरी त्यांना ‘कदाचित’ देशसेवा केल्याचं पुण्य पदरात पाडून घेता येईल. हा सारा कचरा तातडीने स्थानिक व्यवस्थेला देऊ केला तर आंबोलीतील कचऱ्याच्या समस्येकडे कोणाचे लक्ष जाणार नाही. म्हणून त्याला महादेवगड पॉईंटवर साठविण्यात आले. भविष्यात आंबोलीतील इतर ठिकाणीही स्वच्छतेचं काम करायचे आहे. महादेवगड पॉईंटवर कचरा ठेवायला पुरेसी जागा उपलब्ध होती. इतर ठिकाणी ती नाही ही अडचणही आहे. आंबोलीत कचऱ्यासाठी डम्पिंग यार्डची आवश्यकता आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे अभिषेकला वाटते. अभिषेकने या कामासाठी कोणालाही आग्रहपूर्वक बोलावले नाही. फक्त आवाहन केले. याचं महत्त्व आणि आवश्यकता माहित असलेले मोजके सहकारी त्याच्यासोबत जोडले गेले. यातले राकेश आणि सुजन हे दोघे स्वच्छतेचे काम आंबोली-चौकुळ मार्गावर नियमित करत असतात. सोशल मिडीयावर रोज सकाळी उठून शुभेच्छा देणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्यासारखे मेसेज करणारे पहाटे उठून अभिषेकसोबत कचरा गोळा करायला पोहोचले नाहीत.

सध्या आंबोलीतील महादेवगड पॉईंट स्वच्छतेचा श्वास घेत आहे. लवकरच तो ‘प्लास्टिक फ्री झोन’ बनेल. या जंगलात आतवर पुन्हा कचरा जायला ‘कुठेही कचरा फेको’ टाईप पर्यटकांना अजून दोनेक वर्ष मेहनत घ्यावी लागेल. पण हे चक्र असचं चालू ठेवू द्यायचं ? की यावर कडक उपाययोजना करायच्या ? हे स्थानिक प्रशासनाने ठरवायचं आहे. ...अन्यथा अभिषेकसारखे तरुण आपलं काम करत राहतील. मात्र अशा स्वच्छता अभियानातून पर्यटक आणि गावाच्या संपूर्ण सुधारणेची जबाबदारी वाहणारे ‘खांदे’ नक्की काय करणार ? हेही पाहाणं महत्वाचं आहे. गेली दहाएक वर्षे अभिषेक पुण्यात एका ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून देशभरात साहसी आणि वन्यजीव क्षेत्रातील अभ्यासपूर्ण सहलींचे नियोजन करू करत होता. याच कामातून त्याने अनेकदा ‘ट्रेक्स हिमालया’दरम्यान तेथील पर्वतांमध्ये कचरा स्वच्छतेचे प्रयोग केले. त्यावेळी आपण आपल्या, ‘आंबोलीत असे काहीही केलेले नाही’ याची त्याला प्रकर्षाने जाणीव व्हायची. साहसी पर्यटनासह वन्यजीव, सूक्ष्म वनस्पती आणि जीवजंतूचा अभ्यास असलेल्या अभिषेकने २०१२ मध्ये एकाच वर्षात १५० हून अधिक फोर्ट ट्रेक केलेत. २०१५ मध्ये त्याने मनाली ते लेह आणि श्रीनगर पर्यंतची उंच डोंगरावरील सर्वात पहिली एकल सायकलिंग मोहीम पूर्ण केली. २०१७ मध्ये त्याने देशातील नऊ किनारावर्ती राज्यातून ७२ दिवसात ६७८० किलोमीटर सायकलिंग करून केले. ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने असे हे पहिले भारतीय सायकलिंग असल्याचे मान्य केले होते. असा हा अभिषेक गेल्यावर्षी कोरोना संक्रमणात आंबोलीत परतला. गेली अनेक वर्षे मान्सून टुरिझम, वाईल्डलाईफ टुरिझम आदी प्रयोग आंबोलीत सुरु आहेत. हेच काम आंबोलीत सुरु करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अभिषेकच्या नजरेला इथला कचरा खटकू लागला. आपल्या सोबत फिरणाऱ्या साहसी आणि पर्यावरणप्रेमी पर्यटकांना आपण हाच कचरा दाखवायचा का ? या विचारातून स्वच्छतेचं हे काम उभं राहिलं. गप्पांच्या ओघात बोलता बोलता अभिषेक ‘बारा महिने, डेस्टिनेशन आंबोली’ यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याच्याकडून समजल्यावर आम्हाला खूप आनंद झाला. कारण गेले वर्षभर नेमक्या याच विषयावर आम्ही आणि वन्यजीव अभ्यासक रोहन कोरगावकर विचार करत होतो. वन्यजीव अभ्यासक मल्हार इंदुलकर, सर्पमित्र अनिकेत चोपडे, निसर्गप्रेमी विलास महाडिक ही मंडळी सोबत होती. तीच संकल्पना अधिक विस्तृत आणि खात्रीशीर स्वरुपात अभिषेक ऐकवत राहिला. कोकणातल्या आंबोलीत, थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक बारमाही वावरावा यासाठीच्या प्रयत्नात आता अभिषेकही असणार आहे.

जमलेल्या कचऱ्यातील प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या, काचा घेऊ शकणाऱ्या मंडळींची अभिषेकला माहिती मिळाली आहे. एकूणपैकी याचाच कचरा ६० टक्क्याहून अधिक आहे. उर्वरित कचरा हा प्लास्टिक वेस्ट आहे. यासाठीची व्यवस्था लावण्यात आणि भविष्यातील स्वच्छता नियोजनात सध्या अभिषेक आणि सहकारी गुंतलेत. त्यांच्या या खऱ्याखुऱ्या सेवाभावी प्रयत्नांना मनापासून शुभेच्छा द्यायला हव्यात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कृत्रिम ऑक्सिजनसाठी वणवण भटकणाऱ्या आपण समाजाने, शासकीय यंत्रणेने अशा पर्यावरणपूरक कार्य साधणाऱ्या प्रयत्नरतांकडे ‘वेडे’ म्हणून बघण्याचे सोडून विशेष सहकार्य भावना दाखवावी. वेळोवेळी आपणहून एक पाऊल पुढे टाकावे, अशी अपेक्षा आहे.

धीरज वाटेकर

dheerajwatekar@gmail.com


ऑनलाईन लोकमत न्यूजपेपर लिंक :  https://www.lokmat.com/ratnagiri/amboli-begins-anointing-cleanliness-a703/?utm_source=Lokmat.com&utm_medium=InfiniteArticle-Desktop


वरील लेखाचा हिंदी अनुवाद प्रसिद्ध @

https://kendriyamanavadhikar.in/727/fbclid=IwAR07SHVzpxnAG1pcphZUj69sXHLLTBb5Lp44xMkeSBCIyvmzdkEJvhs0tTQ

अभिषेक नार्वेकर का स्वछता मे सहरानीय कार्य

पिछले साल ने कोरोना वायरस के संक्रमण से एक महीने पहले आखिरी जंगली अंबोली को देखा था। उस समय, कई जगहों पर जो कचरा दिखाई देता था, उससे मैं बहुत दुखी था। हालांकि, वन्यजीव शोधकर्ता रोहन कोरगांवकर, प्रत्येक प्रकृति की पगडंडी में जंगल के रास्तों पर पड़ा कचरा इकट्ठा कर रहे थे। इस वर्ष भी, कोरोना की दूसरी लहर महाराष्ट्र में सक्रिय होने से पहले मार्च के अंतिम सप्ताह में अंबोली गई थी। फिर भी, नेचर ट्रेल में जंगल के रास्तों पर पड़े कचरे को इकट्ठा करने का काम जारी रहा। इस बीच, यह पता चला कि स्वच्छता का ‘अभिषेक’ ‘अंबोली’ में शुरू हो गया है। कुछ गलत हो गया। उन्होंने यह भी कहा कि हमें स्वच्छता के इस अभिषेक में शामिल होना चाहिए। लेकिन जब तक हम अंबोली गए, तब तक हम बैग से बाहर निकल चुके थे। स्वच्छता के इस अभिषेक से, हमने देखा कि अकेले महादेवगढ़ प्वाइंट क्षेत्र से एक या दो नहीं बल्कि दो सौ से अधिक बैग कचरा इकट्ठा किया गया था। हमने अंबोली में शुरू होने वाली स्वच्छता के इस ‘अभिषेक’ को समझा। इस तरह का जानबूझकर किया गया काम जो कुछ अच्छा करना चाहता है उसे समाज का मजबूत समर्थन मिलना चाहिए।

10-12 साल पहले तक, अभिषेक नार्वेकर, एक युवा (मो. 09423213153) अन्य शोधकर्ताओं के साथ काम कर रहे थे, जो अन्य पर्यावरणविदों की तरह अनुसंधान के लिए अम्बोली आते हैं। इन सभी कार्यों में से, अंबोली ने अनुसंधान स्तर पर एक लंबा सफर तय किया है। लेकिन the संरक्षण ’का विषय पीछे छूट गया। कचरे का मुद्दा अभिषेक को परेशान कर रहा था। इसी प्रकार, मालाबार नेचर कंज़र्वेशन क्लब द्वारा अम्बोली को साफ़ करने के प्रयास किए गए। फिर से इसकी आवश्यकता को महसूस करते हुए, अभिषेक ने एक दिन, clean अंबोली में मुख्य सड़क पर पुलिस स्टेशन से महादेवगढ़ प्वाइंट के अंत तक और सड़क के दोनों ओर घाटी में सफाई करने का फैसला किया ’। उन्होंने C PROJECT CLEAN AMBOLI ’पेज पर सोशल मीडिया पर अपनी भूमिका की घोषणा की। समुदाय से प्रतिक्रिया शुरू हुई। अभिषेक ने अपने सहयोगियों चेतन नार्वेकर, राकेश देउलकर, सुजन ओगल और कौमुदी नार्वेकर की मदद से कचरे को एकत्र किया। इसके लिए, उन्होंने 25 किलो की क्षमता वाले खाली सीमेंट बैग का इस्तेमाल किया। मार्च के अंतिम सप्ताह तक टीम ने दो सौ से अधिक बैग पैक कर लिए थे। इस थैले में कचरे का औसत भार 5 किग्रा माना गया, कुल अपशिष्ट डेढ़ सौ किग्रा था। अभियान में तीन सप्ताह हो चुके थे जब हम अंबोली में थे। आज 45-50 दिन है। अभिषेक तीन हफ्तों तक कचरा इकट्ठा करने के बाद भी प्रशासन तक नहीं पहुंचा क्योंकि वह स्थानीय सोशल मीडिया पर बहुत सक्रिय नहीं था। अभिषेक ने कचरा इकट्ठा करने के पहले दिन चार बैग इकट्ठा किए थे। उसने आज सुबह या शाम के लिए समय निर्धारित किया था। उसी दिन, उन्होंने 16 बैग कचरा एकत्र किया।

महादेवगढ़ प्वाइंट इलाके में काफी कचरा था। गहरी घाटी में बहुत सारा कचरा हवा में उड़ गया था। अभिषेक द्वारा एकत्र किए गए कुल कचरे में से, 95 प्रतिशत घाटी में जंगल के ढलानों पर पाया गया, सिवाय मुट्ठी भर सड़क के किनारे। पर्वतारोहण का कोर्स पूरा करने वाले अभिषेक, पिछले कई वर्षों से घाटी में फंसे मलबे को बाहर निकालने वाले पहले व्यक्ति हैं। घाटी से ज़मीन की ओर देखने पर, सफाई के लिए गया एक व्यक्ति पत्तियों के नीचे छिपा हुआ ढेर सारा कचरा देखता है। हालाँकि, यह कचरा घाटी में नीचे जमीन से दिखाई नहीं देता है। बहुत सारी प्लास्टिक की पानी की बोतलें, शराब की बोतलें, वेफरस्टाइप कुरकुरे बैग हैं। अम्बोली जैसे संरक्षित जंगलों में, कचरे को साफ करना प्रशासन की जिम्मेदारी है। लेकिन panel सूचना पैनल ’से परे इसे कितनी सावधानी से जांचा जाता है? क्या आपको पता है। वैसे भी! इसलिए यह उतना आसान नहीं था जितना कि घाटी से कूड़े को जमीन पर लाना और वापस महादेवगढ़ प्वाइंट पर पार्किंग स्थल तक लाना प्रतीत होता है। जिन लोगों ने अंबोली और महादेवगढ़ के अंक देखे हैं, उन्हें कम से कम कड़ी मेहनत पर ध्यान देना चाहिए। यहां तक ​​कि अगर परिश्रमी पर्यटक, पर्यटक स्थल में कहीं भी कचरा फेंकते हैं, तो वन क्षेत्र में विषम परिस्थितियों से बचें, उन्हें देश की सेवा के लिए ’शायद’ पुरस्कृत किया जा सकता है। यदि यह सारा कचरा तुरंत स्थानीय प्रणाली को सौंप दिया जाता है, तो कोई भी अम्बोली में कचरे की समस्या पर ध्यान नहीं देगा। इसलिए इसे महादेवगढ़ बिंदु पर संग्रहीत किया गया था। अम्बोली के अन्य स्थानों को भी भविष्य में साफ करने की आवश्यकता है। कचरा रखने के लिए महादेवगढ़ बिंदु पर पर्याप्त जगह थी। कहीं और, यह कहना मुश्किल है। अंबोली में कचरे के लिए डंपिंग यार्ड की आवश्यकता होती है। अभिषेक को लगता है कि स्थानीय प्रशासन को इस पर ध्यान देने की आवश्यकता है। अभिषेक ने इस काम के लिए किसी को नहीं बुलाया। बस अपील की गई। कुछ सहयोगियों को पता था कि इसके महत्व और आवश्यकता को इसके साथ जोड़ा गया था। राकेश और सुजान दोनों अंबोली-चाकुल सड़क पर नियमित सफाई का काम कर रहे हैं। जो लोग सोशल मीडिया पर संदेश देते हैं कि हर सुबह उठना और अलविदा कहना अभिषेक के साथ कचरा इकट्ठा करने के लिए सुबह उठना उनकी नैतिक जिम्मेदारी नहीं है।

वर्तमान में, अंबोली में महादेवगढ़ प्वाइंट स्वच्छता की सांस ले रहा है। यह जल्द ही ‘प्लास्टिक फ्री जोन’ बन जाएगा। जंगल में कचरा वापस लाने के लिए पर्यटकों को दो साल तक कड़ी मेहनत करनी होगी। लेकिन यह सिलसिला चलता रहे? या हमें इसके खिलाफ सख्त कदम उठाने चाहिए? यह स्थानीय प्रशासन को तय करना है। … अन्यथा अभिषेक जैसे युवा अपना काम करते रहेंगे। लेकिन पर्यटक और गाँव के समग्र सुधार के लिए ज़िम्मेदार ‘कंधों’ का इस तरह के स्वच्छता अभियान के साथ क्या होगा? यह भी देखना महत्वपूर्ण है। पिछले दस वर्षों से, अभिषेक पुणे में एक ट्रैवल कंपनी के माध्यम से देश भर में साहसिक और वन्यजीव यात्राओं की योजना बना रहा है। यह इस काम से था कि वह अक्सर ट्रेक्स हिमालय के दौरान पहाड़ों में अपशिष्ट सफाई के साथ प्रयोग करते थे। उस समय, वह बहुत जागरूक था कि हमने अंबोली में ऐसा कुछ नहीं किया था। एडवेंचर टूरिज्म के साथ-साथ वाइल्ड लाइफ, माइक्रो-फ्लोरा और जीव-जंतुओं का अध्ययन करने वाले अभिषेक ने 2012 में एक ही साल में 150 से अधिक किलों की ट्रैकिंग की। 2015 में, उन्होंने मनाली से लेह और श्रीनगर तक अपना पहला एकल साइकिल अभियान अभियान पूरा किया। 2017 में, उन्होंने देश के नौ तटीय राज्यों में 72 दिनों में 6780 किमी साइकिल चलाई। इंडियन बुक ऑफ रिकॉर्ड ने स्वीकार किया कि यह पहली भारतीय साइकिलिंग थी। कोरोना संक्रमण के साथ अभिषेक पिछले साल अंबोली लौट आया। अम्बोली में पिछले कई वर्षों से मानसून पर्यटन, वन्यजीव पर्यटन आदि जैसे प्रयोग शुरू किए गए हैं। अभिषेक, जो अंबोली में उसी काम को शुरू करने की कोशिश कर रहा था, ने यहाँ कचरा देखा। क्या आप अपने साथ यात्रा करने वाले साहसिक और पर्यावरण के अनुकूल पर्यटकों को इस कचरे को दिखाना चाहते हैं? इसे ध्यान में रखते हुए, सफाई का काम बाहर खड़ा था। अभिषेक से यह जानकर हमें बहुत खुशी हुई कि वह 12 महीने तक ‘डेस्टिनेशन अम्बोली’ में काम करेगा। क्योंकि पिछले साल हम और वन्यजीव शोधकर्ता रोहन कोरगांवकर इसी विषय पर सोच रहे थे। वन्यजीव शोधकर्ता मल्हार इंडुलकर, स्नेक मित्र अनिकेत चोपड़े, प्रकृति प्रेमी विलास महादिक समूह के साथ थे। अभिषेक उसी अवधारणा को अधिक विस्तृत और ठोस रूप में सुनते रहे। अंबोली, कोंकण में, अभिषेक भी पर्यटकों को शांत हवा के स्थान पर आकर्षित करने के प्रयास में मौजूद होगा।

अभिषेक को उन सभाओं के बारे में बताया गया है जो एकत्र किए गए कचरे से प्लास्टिक और कांच की बोतलें और गिलास ले सकते हैं। इसमें से 60 फीसदी से ज्यादा बेकार है। बाकी कचरा प्लास्टिक कचरा है। अभिषेक और सहकर्मी वर्तमान में इसके लिए व्यवस्था करने और भविष्य की सफाई के लिए योजना बनाने में शामिल हैं। हम वास्तव में उनके वास्तविक सेवा उन्मुख प्रयासों की सराहना करते हैं। कोरोना की दूसरी लहर में, हम, कृत्रिम ऑक्सीजन के लिए भटक रहे समाज को सरकार द्वारा पर्यावरण के अनुकूल प्रयासों को ‘पागल’ के रूप में देखने के बजाय विशेष सहयोग दिखाना चाहिए। हम आपसे समय-समय पर एक कदम आगे बढ़ने की उम्मीद करते हैं। 

सिंधुदुर्ग प्रतिनिधी - धीरज वाटेकर 

सम्पर्कसूत्र - 9860360948

शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

‘आंबोली’ला हवीय, जंगल’गस्त’ !





कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या लाटेच्या उद्रेकापूर्वी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ‘आंबोली’ला पोहोचलो. सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेले आंबोली हे कोकणातील थंड हवेचे ठिकाण. जागतिक हवामान दिवसानंतर आलेला हा आठवडा उष्णतेची लाट घेऊन आलेला. २/३ दिवसांच्या या भेटीत आजूबाजूला उष्ण लहरींचे प्रमाण वाढलेले असताना आंबोलीच्या निसर्गाची विविध रूपे अनुभवता आली. भटकलेल्या एका जंगल नेचर ट्रेलच्या मार्गावर पट्टेरी वाघाने गव्याची शिकार केल्याचे उघड झाले. गेल्यावर्षीही कोरोना लॉकडाऊन काळात दोडामार्ग-तळकट-खडपडे-कुंभवडे-चौकुळ-आंबोली मार्गावर हिंस्र जंगली प्राण्याने गव्याची शिकार केल्याचे आढळले होते. दरम्यान मागील आठवड्यातही सह्याद्रीतील एका संवर्धन राखीव वनक्षेत्रात पट्टेरी वाघ शिकारीसह कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपला गेला आहे. आंबोलीसह संपूर्ण सह्याद्रीच्या जंगलात पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याचे पुरावे गेली काही वर्षे मिळत आहेत. अलिकडे तिलारी पाठोपाठ आंबोली ते दोडामार्ग पट्ट्याला संवर्धन राखीव क्षेत्र दर्जा मिळाला आहे. या आणि अशा संवर्धन राखीव क्षेत्र दर्जा असलेल्या जंगलांना मिळालेले हे संरक्षण तातडीने प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवे आहे. यासाठी ‘आंबोली’ला नियमित देखरेख आणि जंगल’गस्त’ हवी आहे.

महाराष्ट्रातल्या जंगलात आणि डोंगरपट्ट्यात कोरोना लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात प्राण्यांच्या शिकारीच्या घटनांची चर्चा सुरु झाल्यावर वनविभागाने शिकार्‍यांना पकडण्यासाठी रात्रीची गस्त आणि देखरेख वाढविली होती. मुंबईच्या आसपास असलेल्या जंगलावर ड्रोनच्या साहाय्याने गस्त घालण्याचे नियोजन केले होते. जंगल संवर्धन आणि वन कर्मचाऱ्यांची सुविधा यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा काळानुरूप वापर आवश्यक आहे. ‘संरक्षित वन आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जंगल क्षेत्र याचे संवर्धन झाले पाहिजे. तेथे प्राण्यांचे मुक्त वास्तव्य राहिले पाहिजे. प्राण्यांची शिकार सहन केली जाणार नाही.’ अशी भूमिका वनखात्याकडून मांडली जात असतानाही वन्यजीवांच्या हत्या आणि तस्करीचे गुन्हे घडतात. जंगलगस्तीसाठी स्थानिक मजुरांची उपलब्धी महत्त्वाची आहे. जंगलगस्त घालताना अवैध वृक्षतोड लक्षात येते. वनतस्करांना जंगलात अवैध वृक्षतोड करताना रंगेहाथ पकडताना घनदाट जंगल आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार होत असतात. कधीकधी रात्री-अपरात्री जंगल हद्दीत बेकायदा तस्करी किंवा शिकार करणाऱ्या टोळीला अडवण्याचा प्रयत्न केल्यास गस्त घालणाऱ्या वनरक्षकांवर, मजुरांवर हल्ले होतात. मूळात रात्रीच्या अंधारात गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याची प्रवृत्ती आपल्याकडे बळावली कशी ? याचा विचार व्हायला हवा. नियमित जंगलगस्त घालण्याने हल्ल्याला आळा बसू शकतो. अशा जोखमीच्या कामात योगदान देणाऱ्या, रोजंदारीवर काम करणार्‍या किनवट जंगल क्षेत्रातील पाच मजुरांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला होता. पर्यावरणाचा समतोल साधण्यासोबत लाकूडचोरी, वन जमिनीवरील अतिक्रमणे, वणव्यांमुळे जंगल संपत्तीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी जंगलगस्तीचा उपयोग आंबोलीत करून घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात पाचेक वर्षांपूर्वी जंगलामधील पदभ्रमंतीला (ट्रेकिंग) प्रोत्साहन, गावकऱ्यांना रोजगार, वनक्षेत्रात नियमित गस्त, अवैध वृक्षतोड, अवैध चराई आणि वन्य प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी पुणे आणि कोल्हापूर वन विभागाने गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमींची मदत घेण्याचा निर्णय घेतला होता. जंगलातील गैरप्रकार शोधून काढत त्याला आळा घालण्यासाठी निसर्गप्रेमींचा पुढाकार असतो. जंगलातील भटकंती दरम्यान ही मंडळी सतर्क असल्याने वनाधिकाऱ्यांना सतत वन्यजीवांशी निगडीत घडामोडी कळत असतात. असे प्रयत्न आंबोलीत अधिक सक्रीय करता येतील. कोकणातील डोंगररांगांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची एक बाजू व्यापलेली आहे. या भागात काही ठिकाणी परंपरागत शिकारी करणाऱ्या समूहाचे वास्तव्य आहे. तसेच येथे बेकायदा वृक्षतोड करणाऱ्या टोळ्याही सक्रीय आहेत. दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या या वनक्षेत्रात आणि सह्याद्रीतील कोकणात उतरणाऱ्या मार्गांवर वन्यप्राण्यांच्या शिकारी होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. तस्करांपासून जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी वनक्षेत्रात निसर्गप्रेमी, अभ्यासक आणि गिर्यारोहकांचा वावर वाढल्यास चोरांवर नियंत्रण आणता येईल. मजूर आणि वनरक्षकांसोबत जंगलातील भटकंती दरम्यान खूप काही नव्याने शिकायला मिळेल. निसर्गाचे आकर्षण वाढेल. जंगलाचे व्यवस्थापन कळण्यास मदत होईल.

आंबोली-दोडामार्ग कॉन्झर्वेशन रिझर्व्ह या ५६९२ हेक्टर जंगलक्षेत्रात पट्टेरी नर वाघाचे अस्तित्व स्पष्ट झाले आहे. कॉन्झर्वेशन रिझर्व्ह कायद्यांतर्गत लोकांच्या सहभागातून, त्यांचे अधिकार कायम राखून वन्यक्षेत्राचे संवर्धन करणे अभिप्रेत आहे. अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान संवर्धनाचे कडक पाहाता संवर्धन राखीवमध्ये स्थानिकांना सोबत घेणे सोयीचे होते. पूर्वी पश्चिम घाट अभ्यासासाठी नियुक्त डॉ. माधव गाडगीळ समितीनेही हे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र निश्चित करण्याची शिफारस केलेली होती. आंबोली ते दोडामार्ग पट्टा व्याघ्र कॉरिडॉरसंरक्षित व्हावा म्हणून वनशक्तीसंस्थेने न्यायालयात प्रयत्न केले होते. या जंगलात गेल्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पट्टेरी वाघाने मारलेल्या गव्याचे कुजलेले शरीर आढळून आले होते. वाघाच्या पावलांच्या ठशावरून हा पूर्ण वाढीचा नर वाघ असल्याची शक्यता वन विभागाने वर्तवली होती. फेब्रुवारी २०१८ मध्येही वसमंदिर-आंबोली-चौकुळ भागात स्थानिकांना पट्टेरी वाघाचे दर्शन झालेले होते. या घटनेच्या तीन वर्ष अगोदर आंबोलीत पट्टेरी वाघ दिसला होता. नोव्हेंबर २०१९ मध्ये शेवटच्या आठवड्यात आंबोलीला लागून असलेल्या कोल्हापूर हद्दीत वाघाचे दर्शन झाले होते. गेल्यावर्षी (२०२०) जून महिन्यात आंबोली जंगलात वाघाने एका दुभत्या म्हशीची शिकार आणि दोन म्हशींना तोंडावर पंजा मारून जखमी केल्याचे समोर आले होते. पावसामुळे शिकारी प्राण्याच्या कोणत्याही खुणा शिल्लक न राहिल्याने वन विभागाने वाघाने शिकार केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. स्थानिकांना मात्र वाघाच्या वावराच्या खुणा आढळल्या होत्या. या भागात एकदा जंगल मार्गावर स्क्रेप (रस्त्यावरती मार्किंग करिता केलेली उकरण) आढळून आली होती. नुकतेच एका संवर्धन राखीव वनक्षेत्रात पट्टेरी वाघाने गाईला गळा फोडून ठार मारल्याचे काही धनगर बांधवांनी पाहिले होते. घटनास्थळी इतर कोणतेही पुरावे आढळून आलेले नसले तरी भक्ष्य ओढून नेण्याची आणि खाण्याची पद्धत ही पट्टेरी वाघाच्या सवयीशी जुळते आहे. दरम्यान या ठिकाणी वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये नर वाघाचे दर्शन घडले आहे. शेतकऱ्यांना अशा हल्याच्या घटनांनंतर नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने अशा घटनांची नोंद होणे आवश्यक आहे.

आंबोली-दोडामार्ग हे जंगलक्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अतिशय महत्वाचे आहे. गोव्यातील म्हादई आणि कर्नाटकातील भीमगड अभयारण्य क्षेत्र याला जोडलेले असल्याने वन्यजीवांच्या आणि वाघांच्या भ्रमणमार्ग आणि प्रजननाकरिता हा सलग पट्टा उपयुक्त आहे. भविष्यात वन्यजीवांच्या हालचाली आंबोली, दोडामार्ग, तिलारी, चंदगड, आजरा, राधानगरी, चांदोलीपर्यंत आढळू शकतात. वाघ आणि इतर मोठ्या सस्तन प्राण्यांसाठी कॉरीडोर कनेक्टिव्हिटी (भ्रमणमार्गाची जोडणी) महत्त्वपूर्ण असते. हा भ्रमणमार्ग अखंड ठेवल्याने प्रजनन क्षेत्रातील वाघ हे त्या क्षेत्राला जोडणाऱ्या इतर जंगलात आणि संरक्षित वन क्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र अधिवास निर्माण करु शकतात. राधानगरीपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली अभयारण्यापर्यंतचे अंतर पूर्ण करणे वाघांसाठी सहजसाध्य आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मानवी वसाहत आहे. येथे सततची देखरेख आणि गस्त आवश्यक आहे. आंबोली जंगल परिसराचा पट्टा नर वाघाच्या भ्रमंतीचा परिसर असल्याचे वाघांवर संशोधन करणारे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांनी यापूर्वीच शासनाच्या निदर्शनास आणले आहे. त्यांनी २०१४-१५ साली वनविभागाच्या मदतीने तिलारी परिसरात कॅमेरा ट्रॅपलावले होते. पहिल्यांदा तेव्हा या जंगलपट्ट्यात तीन वाघांची नोंद झाली होती. तसेच सह्याद्री निसर्ग मित्र आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने राबविलेल्या ‘ई-मॅमल’ प्रकल्पांतर्गत आंबोली-तिलारी पट्यात कॅमेरा ट्रॅपमध्ये पट्टेरी वाघाचे छायाचित्र कैद झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हा मानद वन्यजीव रक्षक काका भिसे, वन्यजीव अभ्यासक रोहन कोरगावकर यांनाही आंबोली जंगलात वाघाच्या पावलांचे ठसे, विष्ठा आढळली होती.

सह्याद्रीत संरक्षित नसलेल्या वनक्षेत्रात गेली अनेक दशके वृक्षतोड सुरू आहे. यामुळे जैवविविधतेतील घटकांचा संपूर्ण अधिवास नष्ट होत आहे. तरीही आंबोली ‘शिस्टुरा हिरण्यकेशी’ मासा, टॅरॅन्टुलाची (कोळी) ‘थ्रिगमोपीयस इग्निसिस’ प्रजाती आदी प्रदेशनिष्ठ जैवविविधता जोपासून आहे. २०१३ साली दिवाळीत आंबोली भ्रमंती करताना आम्हाला मोठ्या केसाळ कोळ्याची हॅप्लॉक्लास्ट्स (Haploclastus) प्रजाती पाहायला मिळालेली होती. आपल्या जवळचे मध्यप्रदेश राज्य आज ‘टायगर स्टेट ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते. तेथे वन्यजीवांचे संरक्षण, त्यांच्या अधिवासाचे व्यवस्थापन, लोकसहभाग, मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापन उत्तम आहे. आपल्याकडे यासाठी अधिकाऱ्यांनी कडक उपाययोजना अंमलात आणल्या पाहिजेत. सह्याद्रीत स्थानिकांना मध्यभागी ठेवून वनक्षेत्र संरक्षण आणि संवर्धनाच्या संकल्पना झोकून देऊन राबवायला हव्या आहेत. वाघाचे जंगल हे आपल्या भूमीचे वैभव आहे. ते जपायला हवे. इथल्या झाडांचे, प्राण्यांचे, पक्ष्यांचे, संवर्धन व्हायला हवे. अशी जंगले आपल्या भूमीची फुफ्फुसे असतात. ती आपल्याला शुद्ध हवा देतात. सह्याद्रीत वनक्षेत्राचा प्रदेश कमी आहे. असलेले वनक्षेत्र लहान तुकड्यांमध्ये विभागलेले असल्याने ते राखण्याची जबाबदारी अधिक आहे. आंबोलीला सध्या रेंजर असलेले दिगंबर जाधव फिल्डवर सक्रीय असलेले अधिकारी आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी जंगल गस्त वाढविल्याचे म्हटले आहे.

आंबोली परिसरातील जंगल भागात मागील काही वर्षांपासून जाणवणारे पट्टेरी वाघाचे अस्तित्व जंगलप्रेमींना सुखावणारे आहे. आंबोलीसारख्या कोणत्याही जंगलात जंगलाचा श्वास असलेल्या वाघाची (रॉयल बेंगॉल टायगर) निर्मिती आपल्याला शक्य नाही. म्हणून त्याच्या अधिवासांचे संवर्धन आणि संरक्षण आवश्यक आहे. यासाठी पट्टेरी वाघाचे अस्तित्व आढळून आलेल्या आंबोली जंगलात नियमित कडक ‘देखरेख आणि गस्त’ घातली जायला हवी आहे. आपल्या दुर्लक्षामुळे वाघ भरकटला, इतरत्र गेला किंवा गायब झाला तर कोणाला जबाबदार धरायचे ? सह्याद्रीत शिकारीचे धोके आहेत. अशा शिकारींच्या समोर वाघ आला तर काय होईल ? यासाठी आंबोली सारख्या जंगलांना मिळालेले संरक्षण तातडीने जमिनीवर दिसायला हवे आहे. यंत्रणा अधिक सक्षमतेने कार्यरत व्हायला हवी आहे. गार्ड्सकडे वायरलेस कनेक्टीव्हिटी असायला हवी आहे. हे काम राज्यात नव्याने संरक्षित झालेल्या सगळ्या जंगलक्षेत्रात आणि विशेषत: वाघाची सक्रीयता असलेल्या आंबोलीच्या जंगलात व्हायला हवे आहे.

धीरज वाटेकर

dheerajwatekar@gmail.com


आंबोली जंगलात सप्टेंबर २०१९ मध्ये 
आढळलेला वाघाच्या पायाचा ठसा

मार्च २०२० मध्ये आंबोली जंगलात 
गव्याची शिकार केलेल्या वाघाच्या पावलाचे ठसे

मार्च २०२० मध्ये महिन्यात आंबोली जंगलात 
वाघाने केलेली गव्याची शिकार 

मार्च २०२० मध्ये महिन्यात आंबोली जंगलात 
वाघाने केलेली गव्याची शिकार 

मार्च २०२० मध्ये महिन्यात आंबोली जंगलात 
वाघाने केलेली गव्याची शिकार 

मार्च २०२० मध्ये महिन्यात आंबोली जंगलात 
वाघाने केलेली गव्याची शिकार 

शुक्रवार, १९ मार्च, २०२१

कोकण पर्यटन विकासावर भरीव आर्थिक तरतूद हवी !

जागतिक महिला दिनी महाराष्ट्र सरकारने रु. ५,०६, २३६ कोटींचा अर्थसंकल्प मांडला गेल्यावर, 'कोकणच्या पदरात काय पडले ?' याची स्वाभाविक चर्चा सुरू झाली. 'समर्थन' संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, दरडोई उत्पन्नात देशात गोवा, ५ लाख २० हजार ३१ रुपयांसह अग्रेसर आहे. महाराष्ट्र राज्य २ लाख २ हजार १३० रुपयांसह दहाव्या क्रमांकावर आहे. आपल्या शेजारच्या गोवा राज्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गरम्य कोकणच्या शाश्वत पर्यटनावर भरीव आर्थिक तरतूद केल्यास त्यातून राज्याच्या आणि कोकणच्या प्रगतीचा महामार्ग निर्माण करता येणे शक्य आहे. याचा विचार कोकणातले लोकप्रतिनिधी आणि त्यांना निवडून देणाऱ्या आपण सर्व मतदारांनी करायला हवा.

कोकणच्या स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळाचा प्रश्न गेली तीसहून अधिक वर्षे चर्चेत आहे. यापूर्वी १३ मार्च १९८९ रोजी विधीमंडळाच्या दोनही सभागृहांनी कोकणसाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ असावे, असा ठराव मंजूर केला होता. आजही प्रलंबित असलेला हा प्रश्न म्हणजे, 'कोकणावरील अन्यायाचा संतापजनक इतिहास आहे' अशी लिखित नोंद यापूर्वी माजी आमदार आणि विचारवंत स्व. नानासाहेब जोशी यांनी केली होती. राज्याचा प्रादेशिक असमतोल शोधण्यासाठी अर्थशास्त्रज्ञ डॉ. वि. म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने १९८४ साली आपला अहवाल सादर केला होता. या समितीने कोकणचा अनुशेष मान्य केला होता. आजचा विचार करता विकासाच्या बदललेल्या संकल्पना, संदर्भ, महागाई, पावसाळा विचारात घेता इथे कामाला मिळणारा वेळ पाहाता हा अनुशेष हजारो कोटी होईल. तीसेक वर्षांपूर्वी कोकणला स्वतंत्र महामंडळ न देता उर्वरित संबोधून आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या सबळ असलेल्या पश्चिम महाराष्ट्राशी जोडले गेले, जे आजही कायम आहे. कोकणातील मानवी विकासाचा संदर्भ देऊन कोकणला सातत्याने महामंडळ  नाकारले गेले आहे. हे वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात आले तर कोकणसाठी काही शे कोटींची तरतूद दरवर्षी करता येईल आणि तिचा उपयोग पर्यटनादी कामांसाठी होऊ शकेल. कोकणच्या अनुशेषाकडे प्रमाणिकपणे पहिल्यास आणि तशा तरतुदी अर्थसंकल्पात झाल्यास पुढच्या दहाएक वर्षात कोकण संपन्न होईल.

 एकूण अर्थसंकल्पात पूरक मागण्यांचे प्रमाण १०% पेक्षा जास्त असू नये असा अर्थसंकल्पीय दंडक असताना वर्षभरातल्या पूरक मागण्या मूळ अर्थसंकल्पाच्या तुलनेत १७.८८% इतक्या करण्यात आल्या आहेत. आपल्या बजेटच्या एकूण उत्पन्नापैकी पगार, पेन्शन, व्याज आणि मुद्दल फेड यावर ६३% खर्च होतो. विकासाला मिळतात, केवळ ३७ टक्के ! यंदा कोरोनाने उत्पन्न घटले आहे. त्यामुळे किती लोकसंख्येसाठी किती टक्के खर्च हा विचार करायला हवा.

कोकणचा विचार करता रायगड, सिंधुदुर्गला मेडिकल कॉलेज मिळाले आहे. सिंधुरत्न योजना, रायगड जिल्ह्यातील जांभूळपाडा येथे कातकरी एकात्मिक वसाहत प्रकल्प, रत्नागिरी येथे भगवती बंदर क्रुज टर्मिनल, बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी निधी मिळणार आहे. प्रेरणा देणारी अशी किती स्मारकं कोकणात होऊ शकतात याचा अभ्यास करण्यासाठी एकदा तरी चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने उभारलेला 'कलादालन' प्रकल्प पाहायला हवा. कोकणाला स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ हवे ही मागणी जुनी आहे आणि ते नसणे ही शोकांतिका आहे. सावंतवाडीतील हस्तकला, पालघरमधील वारली कला यांवर खर्च करून स्वयंरोगाजर वाढविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याचे मूल्यमापन आवश्यक आहे. कोकणात निसर्ग पर्यटन योजना, महाड येथे निसर्ग आपत्ती  निवारणासाठी विशेष यंत्रणा शासन उभारणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यावर अशी यंत्रणा आणखी काही ठिकाणी उभारावी लागेल. ठाणे पालघर मधील बोईसर, दहिसर नद्यांचे संवर्धन करण्याचा मुद्दा अर्थसंकल्पात आहे. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत क्रोकोडाईल टुरिझम वाढावे, पर्यटन नकाशावर चिपळूणला डेस्टिनेशनचा दर्जा मिळावा  म्हणून गेली आठेक वर्षे ग्लोबल चिपळूण टुरिझम ही संस्था आपल्या खिशातील पैसे खर्च करते आहे. अशा प्रयत्नांकडे संबंधित यंत्रणांकडून ममत्व भावनेने पाहिले जायला हवे.

जव्हार गिरीस्थान विकास, संत स्मारके आणि धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी शासनाने निधी दिला आहे. प्राचीन मंदिरे यांच्या जतन आणि संवर्धन अंतर्गत यात कोकणातल्या धूतपापेश्वरचा स्वागतार्ह समावेश झाला आहे. एकूण ८ मंदिरांसाठी शासनाने १०१ कोटींची तरतूद केली आहे. कोकणातील आडवाटेवरच्या अनेक मंदिराकडे पाहायला हवे. कोकण पर्यटन म्हणून गावोगावी दरवर्षी विविध जल्लोष, फेस्टिव्हल होत असतात. त्याचे एका मंचावर नियोजन करून त्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी शासनाने सलग काही वर्षांसाठी आर्थिक तरतूद करायला हवी. रेवस ते रेड्डी ह्या ५४० किमीचा सागरी महामार्गासाठी निधी मंजूर झाला आहे. गेल्या अनेक दशकांपासून ग्रामीण कोकण जोडले जाईल या भावनेने हे काम सुरू आहे. देशातील इतर किनारवर्ति  राज्यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जो उत्साह दाखविला तो महाराष्ट्रात दिसला नाही. म्हणून सध्याच्या निधीचे स्वागत करायला हवे.

समृद्धी महामार्गांच्या दुतर्फा हवाई बीज पेरणी करण्याचे शासनाने ठरविले असल्याचे वाचनात आले. हा विषय राज्यातील सर्व जंगलात व्हायला हवा. वृक्षारोपण हे जंगलात व्हायला हवे. तसेच जंगलतोडीला परवानगी मिळू नये. हापूस आंबा, मच्छिमार, सिंचन, पायाभूत सुविधा आदी सर्व क्षेत्रात सातत्याने कोकण प्रदेशावर अन्याय केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ताज्या अर्थसंकल्पात मांडलेले कोकण विकासाचे विषय कसे अंमलात येतात, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८ 











वरील कार्यक्रमाची फेसबुक लाईव्ह लिंक :

https://www.facebook.com/1419427465034610/videos/524578555597420

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...