कोकणभूमीला र. वा. दिघे, गो. नी. दांडेकर, श्री. ना. पेंडसे, साने गुरुजी, कवी माधव, कवी आनंद, 'पद्मश्री' मधु मंगेश कर्णिक, श्रीपाद काळे आदी ग्रामीण भागातून पुढे आलेल्या असंख्य दमदार लेखकांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. लांजा तालुक्यातील हरचिरी या छोट्या गावात जन्मलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी याच संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना, ‘समाजात वावरताना डोळे उघडे ठेवून निरीक्षण केले, तर अनेक गोष्टी पाहता येतात. त्यात कथानके घडत असतात. लेखकाने ती टिपायची असतात. लेखन साच्यात बसवायची असतात. लेखकाने स्वतःला घडवायचे असते आणि कायम जमिनीवर राहायचे असते. वेगवेगळे अनुभव त्याला घडवत असतात. लेखकाने कंटाळा करून चालत नाही. त्याने समाजात जे काही वावगे घडते आहे, ते मांडण्यासाठी लिहायला हवे. पुस्तके तर वाचायला हवीतच, पण माणसेही वाचायला हवीत, अनुभवविश्व समृद्ध करायला हवे.’ असे सांगितले होते. असेच सकस मार्गदर्शन यापूर्वीच्या संमेलनात ‘पद्मश्री’ परशुराम गंगावणे, नाटककार गंगाराम गवाणकर आदींकडून झालेले आहे. खरंतर ग्रामीण भागातील माणसे कोणताही आडपडदा न ठेवता, भीडभाड न बाळगता वागतात, बोलतात. असे नमुने ग्रामीण जीवनात पाहायला मिळतात. एस.टी. बसच्या प्रवासात, ग्रामीण बसस्टँडवर हमखास भेटतात. कोकणातील अशा बदलत्या काळातील ग्रामीण चित्रण लोकांसमोर यायला हवे आहे. त्यासाठी हे व्यासपीठ उत्तम आहे. ‘खरी पुस्तकं खऱ्या भावबळानं वाचणं हा एक अति श्रेयस्कर व्यायाम आहे. दिवसभरात केलेल्या इतर कुठल्याही व्यायामापेक्षा तो आपल्याला अधिक दमवेल असा आहे. जशी शिस्त आणि चिकाटी पैलवानाला लागते तशीच वाचनासाठी लागते. साऱ्या जिंदगीच्या अपेक्षा निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट असतं’ असं अमेरिकेतील विचारवंत ‘हेन्री डेव्हिड थोरो’ने सांगितल्याचं नमूद करून व्यंकटेश माडगूळकर आपल्या ‘सरवा’ पुस्तकात म्हणतात, ‘भावबळानं वाचन होतं ते विशी-पंचविशीपर्यंत. पुढं माणूस काही कारणाने वाचतो. काही अपेक्षा ठेवून वाचतो. त्यातही सुरुवातीला साहित्यप्रकार, नंतर प्रवासवर्णन आणि शेवटी अध्यात्म असं आपलं वाचन गडगडत. काही वाचकांच्या बाबतीत ते वृत्तपत्र वाचनापलिकडे ते जात नाही.’ यातला भावबळानं होणाऱ्या वाचनाचा वयाशी जोडलेला दाखला महत्त्वाचा आहे. त्यासाठी ग्रामीण साहित्य चळवळी आवश्यक आहेत. या साहित्य चळवळीची दखल राज्यस्तरावर घेतली जायला हवी आहे. त्यासाठी संयोजकांनी आपल्या प्रत्येक कार्यक्रमात राज्यभराच्या साहित्यिक वर्तुळात प्रभाव असलेल्या कोकणाबाहेरील साहित्यिकाला, वाड्मयीन नियतकालिकाच्या संपादकाला आवर्जून पाचारण करण्यास सुरुवात करायला हवी. त्यामुळे ही चळवळ सर्वदूर पोहोचायला अधिक मदत होईल. वाचकांच्या दृष्टीने ग्रामीण भागातील प्रथा, परंपरा, निसर्ग, समाज व्यवस्था, वैशिष्ट्ये, नवले, असह्यता मांडणारे ग्रामीण मराठी साहित्य हा कायम आत्मीय विषय राहिला आहे. शोषित, पिडीत, असह्य अगतिक माणसांविषयी कणव हा ग्रामीण साहित्य चळवळीचा मुख्य हेतू राहिला आहे. दुर्दैवाने आज कोकणातील खेडेगावातील लोकसंख्या कमी होताना दिसते आहे. अशा वातावरणात कोकणातील जवळच्या दोन तालुक्यातील साहित्य आणि संस्कृतीप्रेमी मंडळी एकत्र येऊन सामाजिक चैतन्याचा शब्दजागर करत असतील, तर तिथे आपण सर्वांनी सक्रिय सहभागी व्हायला हवं आहे, असं व्यक्तिश: आम्हाला या चळवळीचे विविध वृत्तांत वाचताना नेहमी वाटत आलं आहे. कौतुक म्हणून चळवळीच्या दिवाळी अंकात सहभागही नोंदवला आहे. आयोजकांनी यावर्षी ठरवून निमंत्रित केल्याने आणि संमेलनाच्या अध्यक्षीय यजमानपदाचा सन्मान चिपळूणला दिल्याने आम्हाला प्रत्यक्ष सहभाग नोंदवता आल्याचं विशेष समाधान आहे. ग्रामीण मराठी साहित्य हे समाज उभारणीचे मोठे शस्त्र आहे, ही बाब आपल्या समाजसुधारक पूर्वसुरींनी सिद्ध केली आहे. अशा कोणत्याही चळवळीच्या प्रारंभी ‘ती चळवळ कशी चुकीची आहे’ हेही सांगायला कोणीनाकोणी सुरुवात केलेली असते. थोड्याफार फरकाने हे सर्वत्र घडते. आज महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण साहित्याची निर्मिती आणि जागरणाची प्रक्रिया घडत असताना या चळवळीबद्दल आणि तिच्या सक्रियतेसाठी ग्रामीण भागात विशेष उपक्रम होत नाहीत, हे सत्य आहे. दुर्दैवाने ग्रामीण साहित्य लेखनातून नावारुपास आलेल्या प्रस्थापित मंडळींनाही ग्रामीण भागात साहित्यिक उपक्रम राबवण्यात रुची वाटत नाही. अशा काळात कोणतेही विशेष शासकीय अनुदान नसताना राज्याच्या कोकणभूमीत दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेली एक संस्था ग्रामीण साहित्य आणि संस्कृतीच्या जागर गेली आठ वर्षे सुरु ठेवते, हे कौतुकास्पद तितकेच अभिमानास्पद आहे.
पूर्वी ‘लेखक-साहित्य-वाचक’ असा साहित्य व्यवहार
होता. एकविसाव्या शतकात तसा तो राहिलेला नाही. साहित्याच्या प्रभावाला नियंत्रित,
नियमित आणि निश्चित करणाऱ्या साऱ्या प्रक्रियांनी आजचा साहित्य व्यवहार बनतो. हे
सारं व्यापक आहे. तरीही त्यात अस्सल ग्रामीण भागातील कार्याचा अपवाद कायम होता. तो
‘खळगा’ आपल्या परीने भरण्याचा प्रयत्न राजापूर लांजा तालुका नागरिक संघ करतो आहे. स्वातंत्र्यानंतर
देशात औद्योगिकीकरणाने वेग घेतला आणि शहरी आणि ग्रामीण वास्तवाची दृश्यमानता वाढत
गेली. सामाजिक स्तर, विषमता जन्माला आली. महात्मा गांधींची हत्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी घेतलेली बौद्धधर्माची दीक्षा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अशा कारणांनी समाज
व्यवस्थेत स्थित्यंतर येत गेले. त्याचे प्रतिबिंब साहित्यात-लेखनात उमटले. स्वातंत्र्यानंतरच्या
पहिल्या अर्धशतकात दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी, देशावादी आदी साहित्य प्रवाहांचा
पाया घातला गेला. बहुजन लेखक वर्ग उदयाला आला. त्यांचं अनुभवविश्व शब्दबद्ध झालं. अनियतकालिकांची
चळवळ बहरली. तरीही स्वातंत्र्यानंतरच्या अर्धशतकीय उत्तरार्धात ‘प्रभावी’ लेखक
अपवादानेही दिसला नाही. कारण लेखकांच्या क्षमतांसोबत इथली वाङ्मयीन संस्कृतीही काहीशी धंदेवाईक बनत गेली. प्रसिद्धीची सहज साधने उपलब्ध
झाल्याने लेखक बहुत झाले. प्रसिद्धी माध्यमात सातत्याने मिळालेली जागा, चिल्लर
पुरस्कार यामुळे लेखक म्हणून आपली एक सांस्कृतिक जबाबदारी आहे याचे भान हरपले,
प्रतिभा ‘जणू’ तात्कालिक झाली. २०१४ सालच्या ‘ज्ञानपीठ’ विजेत्या भालचंद्र नेमाडे
यांनी १९६८ साली आपल्या ‘वाचा’ या लघुपत्रिकेत ‘हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो का?’ असा समीक्षालेख लिहून मराठीतील लहानमोठ्या सर्वच
लेखकांच्या नैतिक वाङ्मयीन व्यवहारांवर परखड टीका केली होती. अनेकांना ती झोंबली
होती. व्यंकटेश माडगूळकरांनीही
आपल्या ‘सरवा’ पुस्तकात ‘कोणत्या वनस्पतींची पानं खावी आणि कोणती खाऊ नयेत हे
सशांच्या पिल्लांना त्यांच्या आया शिकवतात. माणसाच्या आयांनी पुस्तकांच्या
पानाबद्दल अशी जागरुकता दाखवल्याचं माझ्या पाहाण्यात नाही.’ असं म्हटलं होतं. या भूमिकांवरील ‘उतारा’ शोधताना
आपल्याला ग्रामीण साहित्य चळवळीचा आधार घ्यावा लागेल इतक्या त्या महत्त्वाच्या आहेत.
राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या यंदाच्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य
संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी, ग्रामीण भागात राहण्याचा आनंद, बैलगाडीतून अध्यक्षांची
मिरवणूक आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या कोट गावातून क्रांतीज्योत आणून होणार आहे.
विशेष म्हणजे अर्जुना नदीकाठावर नदीपूजन करून नदीपात्रात प्रज्वलित दिवे सोडण्यात
येणार आहेत. नदी प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. हे सारे
जनजागरण आवश्यक आहे. पुस्तक प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, चित्र प्रदर्शनासह महिला बचत गटांचे खाद्य पदार्थांचे
विक्री कक्ष हे सारे ग्रामीण संस्कृतीला पोषक असेच आहे. संस्थेच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात
पुरस्कार दिले जातात. यातले संघर्षातून संसार करणाऱ्या स्त्रिया, शेतकरी, वारकरी
आदी आम्हाला विशेष महत्त्वाचे वाटतात. कोरोना अनलॉक वातावरणात २३
नोव्हेंबर २०२० रोजी राळेगणसिद्धी मुक्कामी असताना बोलण्याच्या ओघात ज्येष्ठ
समाजसेवक अण्णा हजारे यांनी आम्हाला ‘गावाचा वाढदिवस’ संकल्पना विशद करून सांगितली होती. यशस्वी ग्रामविकासासाठी
नशाबंदी, नसबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी आणि श्रमदान या पंचसूत्रांची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी आहे. दरवर्षी
२ ऑक्टोबर रोजी गावाचा वाढदिवस साजरा करणे, त्या अंतर्गत जन्माला येऊन एक वर्ष
पूर्ण झालेल्या मुलांना गावाने झबलं-टोपरं (अंगडं) घेणे, लग्न होऊन एक वर्ष
झालेल्या गावातल्या सुनांचा खण, नारळ, साडी-चोळी देऊन सन्मान करणे, गावातील वयोवृद्ध स्त्री-पुरुषांचं
वंदन-पूजन करणे, सायंकाळी सर्वांनी एकत्रित भोजन करणे, गावाच्या विकासाचं काम करणाऱ्या
तरुण, शाळेतील यशस्वी विद्यार्थी आदींना सन्मानित करणे आदी उपक्रमातून सामाजिक
प्रदूषण दूर होऊन गावात पारिवारिक, एकोप्याची भावना वाढीस लागेल, अशी भूमिका होती. हाच विचार थोडा वेगळ्या पद्धतीने इथे जपलेला
दिसतो आहे. आजच्या स्त्रिया जेवण बनवायचं सोडून ‘पार्सल’संस्कृतीच्या मागे
लागल्यावरून खूप बोललं-लिहिलं जातं. मात्र पूर्वीच्या काळी ‘चाकरमानी’ जीवनपद्धतीत
आपलं कोकण याच स्त्रियांनी सांभाळलं होतं. त्यांचा सन्मान करायला आपण कदाचित विसरलो.
आजची ‘पार्सल’ किचन संस्कृती हा त्याचा परिणाम तर नसेल ना? म्हणून संघर्षातून
संसार करणाऱ्या स्त्रियांना दिला जाणारा पुरस्कार आम्हाला विशेष महत्वाचा वाटतो.
महाराष्ट्रात ग्रामीण साहित्य चळवळीची पहिल्यांदा निर्मिती होत असताना तिच्यासमोर दलित साहित्य
चळवळीचा आदर्श होता, हे नाकारता येत नाही. ग्रामीण साहित्य चळवळीच्या मुळाशी सामाजिक अस्वस्थता, असंतोष आणि
शोषणग्रस्तता होती. आजही ती पूर्णत्वाने संपलेली नाही. ग्रामीण साहित्य चळवळीला पुढे नेताना भविष्यात तिच्या ठाम वैचारिक अधिष्ठानाची मांडणी
व्हायला हवी आहे. मेळावे, संमेलने, शिबिरे, कार्यशाळा, चर्चासत्रे ही या चळवळीची अंग आहेत. मात्र चळवळीचे खरे
सामर्थ्य हे तिच्या तात्त्विक बैठकीत आणि वैचारिक मांडणीत
असते. ते काम सुरुवातीच्या काळात
आनंद यादव, पाठोपाठ रा. रं. बोराडे, चंद्रकुमार नलगे, द. ता. भोसले, नागनाथ
कोत्तापल्ले आदींनी
केल्याचे दिसते. आज राज्यातील ग्रामीण साहित्य चळवळीत शिथिलता आलेली आहे. नव्या पिढीला लिहिते करण्यासाठी, दिशा देण्यासाठी ठोस उपक्रम नाहीत, हे खरे आहे.
बदलत्या जीवनातील ग्रामीण प्रश्न मांडण्याची व त्यासाठी नवनवीन नेतृत्व करणारे
कार्यकर्ते निर्माण होणे गरजेचे आहे. राज्यातील ग्रामीण साहित्याची समीक्षा वाचली
तर कोकण म्हणून फक्त श्री. ना. पेंडसे आणि गो. नी. दांडेकर यांच्या लेखनाचे दाखले सापडतात. कोकणातील
ग्रामीण साहित्य विचार त्यापुढे जाण्यासाठीची विचारपेरणी कोकणात या चळवळीच्या माध्यमातून करण्याचा
प्रयत्न संघाने करावा. त्यातून कोकणातील ग्रामीण साहित्य चळवळीला नव संजीवनी प्राप्त होईल. बळीराजाचे मंदिर
असलेल्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील गोदावरी तीरावर वसलेल्या ‘बरबडा’ येथे
जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय गेली पाच वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवते आहे. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ गेली आठ वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उपक्रम घेत आहे. १९५३ साली स्थापन झालेली ही संस्था सत्तर वर्षे पूर्ण करते आहे. मुंबईतील चाकरमानी लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संघटना आहे. ग्रामीण भागाचा विकास, ग्रामीण तसेच
शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या समजून घेऊन सहकार्याचा हात देत संस्था कार्यरत राहिली आहे.
आज बदलत्या काळानुरूप संस्था कार्यरत आहे. संघाने २०१७ साली झाशींच्या
राणीच्या ‘कोट’गावी 'ग्रामीण मराठी साहित्य संमेलन' भरवून हा परिसर नव्याने पुढे आणला. राणींचे वंशज सातारा मुक्कामी दत्तात्रय
नेवाळकर यांच्याशी
संघाने सकारात्मक चर्चा केली. नेवाळकरांनी नुकतीच कोट येथील आपली ८१ गुंठे जमीन रणरागिणी स्मारक ट्रस्टला देणगी दिली. ही बाब ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
फलस्वरूप महत्त्वाची आहे. आजच्या पिढीचं शहरी जगणं स्मार्ट होत चाललंय. वेगाबरोबर धावणं
सर्वांना अनिवार्य आहे. बदलत्या जीवनाशी जुळवून घेताना मागच्या पिढीचा हात ताणला जातोय अशी स्थिती आहे. यावर जुळवून घेण्याची भावना वाढीस लावण्याचे औषध देण्याचे काम हा चळवळीतून होऊ शकेल. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची दोन दशके आपली
जगून झालीत. यातला आपल्या जगण्याचा आणि समग्र भौतिक पर्यावरणाचा वेग अतिप्रचंड राहिला आहे. मोबाईल आणि इंटरनेट या दोन
साधनांनी संपूर्ण मानव जातीला व्यापून टाकले आहे. यामुळे मानवी संस्कृतीत आणि जीवनशैलीत बदल झाले आहेत. विशेषतः १९८०च्या पूर्वी किंवा दरम्यान जन्मलेल्या पिढीला हे बदल आश्चर्यजनक
वाटतात. १९९५ नंतर जन्माला आलेल्या पिढीला या नव्या जगाची चाहूल
लागलेली होती. आज माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रोनिक माध्यमे, आणि समाज माध्यमांनी आपल्या अधिसत्तेने सर्वसामान्यांचे जगण्याचे, अभिव्यक्तीचे, सांस्कृतिक, राजकीय आदी संदर्भ बदलून टाकलेत. विविध माध्यमाच्या या सार्वत्रिक अधिसत्तेचा थोपवणे सोपे नाही. प्रत्येक काळाचा एक स्वभाव असतो. आजच्या काळाने वेगाने सामाजिक, धार्मिक, जातिय वितुष्ट
वाढवलेले आपण पाहिले आहे. संभ्रम, संशय, भिती, विद्वेष आणि आत्मकेंद्रितता या नव्या माध्यमामुळे अधिकाधिक पसरताहेत. झुंडीने ट्रोलिंग करणे, कोणत्याही गोष्टीवर तात्काळ प्रतिक्रिया देणे, स्वत:विषयी वारंवार सांगत (सेल्फी, स्टेटस्) राहाणे, आपल्या सुरक्षित कवचात जगणे, इतरांविषयी
आस्था नसणे अशी मानसिकता घडत आहे. एकाकीपणा, वार्धक्य हेही प्रश्न तीव्र झालेत. पण अशा प्रश्नांकडे बघायला वेळ कोणाला आहे? आपले भावविश्व, पारंपरिक मूल्यव्यवस्था, सांस्कृतिक संवेदना, जगण्या-वागण्याचे सौंदर्यशास्त्र, नैतिक–अनैतिकतेच्या संकल्पना, जाणीवांचे, चिंतनाचे क्षेत्र सारं बदललेलं आहे.
स्त्रियांच्या देदीप्यमान इतिहासाची उजळणी करताना त्यांच्यावर
आजही होणारा अन्याय विसरता येत नाही. शेती, दुष्काळ, कौटुंबिक
ताणतणाव, अस्मिता, विध्वंसक राजकारण, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या
आत्महत्या, वाढते घटस्फोट, नव्या पिढीवर याचा होणारा
मानसिक आणि भावनिक परिणाम हे सारं चिंताक्रांत करणारं आहे.
आजच्या समाजाची बदललेली वैचारिक अभिरुची नव्याने लिहिताना ध्यानात घ्यावी लागेल. महानगर आणि खेडे हे अंतर वाढले आहे. प्रादेशिक भाषा आणि बोली भाषेतील साहित्याला प्रतिष्ठा देणे आजची सांस्कृतिक गरज बनली आहे. नव्या साधनांनी आपल्याला मूळ भाषेपासून फारकत घ्यायला भाग पाडले आहे. संवादासाठी आम्ही चिन्हांची भाषा (इमोजी) वापरू लागलो आहोत. चिन्हांच्या भाषेचा अधिकाधिक प्रसार होणं म्हणजे परस्परातला संवाद कमी होणं ठरू शकतं. संवादहीन संस्कृती अविश्वासाकडे झुकल्यास घातक ठरू शकते. याचे भान लेखकाला असायला हवे आहे. आजच्या सामाजिक जीवनात मोठा अंतर्विरोध भरलेला जाणवतो आहे. अशा काळात कोकणातल्या दोन तालुक्यात सुरु असलेली ग्रामीण मराठी साहित्याची चळवळ आशेचा ‘नंदादीप’ गेली आठ वर्षे उजळते आहे, हे महत्त्वाचे आहे. हा नंदादीप आपल्याला आपल्या मातृभाषेशी, संस्कृतीशी, मानवी समूहाशी प्रामाणिक राहायला सांगतो आहे. आपल्या परंपरांचे भान राखायला, परंपरांचा नव्या काळाशी अन्वयार्थ जोडायला, समाजजीवनाच्या नकारात्मक बाजूंवर बोलायला, विविध स्थितीगतीचे प्रवाह समजून घ्यायला प्रोत्साहित करतो आहे. हे सारं नीट समजून घेतलं तर राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या साहित्य चळवळीतून काळावर मुद्रा उमटवणारं, दखलपात्र आणि परिणामक्षम लेखन जन्माला येईल, असा विश्वास वाटतो.
- धीरज वाटेकर, चिपळूण (मो. ९८६०३६०९४८)
(धीरज वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील ‘पर्यटन-पर्यावरण’ विषयातील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व
चरित्र लेखन’ या विषयावरील आठ पुस्तके
प्रकाशित झाली आहेत. ते ‘पत्रकार’ म्हणून कोकण इतिहास व
संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर
विषयात गेली २५ वर्षे कार्यरत आहेत.)