सोमवार, २ जानेवारी, २०२३

कोकण पर्यटनाच्या नव्या वाटा

   


     सातत्याने वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर, जगातील अधिकाधिक लोकसंख्या शहरात वास्तव्याला असली तरी ती वेळ मिळताच कोकणासारख्या निसर्गरम्य ग्रामीण भागात अधिकाधिक संख्येने पर्यटक बनून ये-जा करत असते ही बाब पर्यटन हंगामातील आकडेवारीतून सिद्ध झालेली आहे. कोकणचा विचार करता स्थानिक जनमानसही पर्यटकांचे आदरातिथ्य करायला उत्सुक असल्याचे चित्र आहे. असे असूनही महाराष्ट्र राज्य निर्मितीला ६२ वर्ष पूर्ण होऊनही आम्ही नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यात कमी पडत असू, नुसत्या घोषणा करण्यात समाधान मानणार असू तर कोकणसारख्या भागातील प्रयत्नरत हातांनी पर्यटनात बहरणाऱ्या नव्या वाटा धुंडाळायच्या कशा? असा प्रश्न पडतो. कालानुरूप बदल स्वीकारीत बारा महिन्यांच्या कोकण पर्यटन व्यवसायात जीवंतपणा आणण्यासाठी आवश्यक असलेलं वैविध्य जपण्याचं कौशल्य कोकणातील पर्यटन व्यावसायिकात आपल्याला दिसते. या कौशल्याला मुलभूत सेवा-सुधारणांची शासकीय-प्रशासकीय साथ मिळायला हवी. ती मिळाल्यास कोकणात पर्यटनाच्या नव्या ‘बारमाही’ वाटा विकसित होऊन बारा महिन्यांच्या कोकण पर्यटनातून आर्थिक समृद्धी येणे शक्य आहे.

पर्यटन ही सर्वसमावेशक संकल्पना आहे. त्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. एकेकाळी मंडणगडची ओळख ‘कोकणातलं अंदमान’ अशी होती. आता त्या भागातील केळशीसह वेळासच्या किनाऱ्यावर कासव महोत्सवासाठी अलोट गर्दी होते. पंधरा-वीस वर्षांपूर्वी आंजर्ले, हेदवी, गुहागर, मुरूड, हर्णे, दाभोळ, जयगड, नांदिवडे, दाभोळ, कर्दे, मुरूड, लाडघर, कोळथरे, भंडारपुळे, देवगड, वेंगुर्ला, जयगड, कुणकेश्वर, तारकर्ली, साखरी-नाटे, पावस, पूर्णगड, वेत्ये, गावखडी आदी अनेक समुद्र किनाऱ्यावर फारसे पर्यटक येत नसत. तेव्हा कोकणात जाणं म्हणजे कुलदेवतेच्या दर्शनाला किंवा मे महिन्यात नातेवाइकांकडे आंबे-काजू खायला जाणं असं स्वरूप तेव्हा होतं. अपवाद गणपतीपुळे, मालवण, तारकर्लीचा होता. कारण तेथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची कॉटेज उपलब्ध झाली होती. २० जानेवारी १९७५ रोजी 'पर्यटन विकास महामंडळ' स्थापन होऊनही कोकणात विशेष पर्यटन गांभीर्य नव्हते. गणपतीपुळेत साधारणत: १९८१च्या सुमारास एमटीडीसी सुरू झालं. १९९१ गणपतीपुळे विकास आराखडा तयार झाला असावा. तसेच पुढे तारकर्ली व मालवणमध्येही झाले. नंतर कोकण रेल्वे कार्यरत झाली. किमान काही ठिकाणी सागरी महामार्ग अस्तित्वात आला. सागरी गावं सागरी महामार्गाला जोडली गेली. ज्या गावांमध्ये फक्त होडीनं जावं लागत होतं तिथे पूल झाले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची चर्चा झडू लागली. येत्या काही वर्षात तो पूर्णही होईल. यास्तव कोकणात पर्यटक येऊ लागले. ‘कोकणात पर्यटकांचे बुकिंग होतंय!’ हे लक्षात आल्यानंतर मोठ्या उद्योजकांसह कोकणातील युवा वर्गाने घरची आंबा बागायत सांभाळून लहानसं रिसॉर्ट सुरू करण्याकडे लक्ष केंद्रित केले. काहींनी शासकीय परवानगीने ‘होम स्टे’ सुरू केले. कोकणात 'होम स्टे' साकारणाऱ्या कुटुंबातील महिला या आलेल्या पर्यटकांना अत्यंत रुचकर कोकणी जेवण देतात. पण हे सारं कोकणी पदार्थ व्यंजन कोकणातील हॉटेलात मिळत नाही. असं का व्हावं? 'होम स्टे'ची सोशल मीडियावर प्रभावी जाहिरात झाल्याने कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली. कोकणातल्या अगदी कोपऱ्यातल्या किनाऱ्यावरच्या गावांकडेही पर्यटकांचे पाय वळायला लागले. झपाट्याने पूर्वीपेक्षा कोकणात पर्यटन वाढलं, हे सत्य आहे. त्याचं पहिलं श्रेय स्वर्गीय कोकणच्या निसर्गरम्य पर्यटन विकासासाठी गेली काही दशके सातत्याने धडपडणाऱ्यांना द्यायला हवं. दुसरं त्यानुसार पाऊलं उचलणाऱ्या व्यावसायिक आणि प्रशासनाला द्यायला हवं.

कोकणात दरवर्षी होणाऱ्या विविध सांस्कृतिक उत्सवांच्या तारखा ‘पंचांग संस्कृती’मुळे आपल्याला वेळेपूर्वी माहिती असतात. त्याचा उपयोग करून कोकणच्या प्रथा-परंपरा-सांस्कृतिक उत्सव-जत्रा-यात्रा- आदींचे वार्षिक पूर्वनियोजित कॅलेंडर प्रकाशित करणे आपल्याला शक्य आहे. ज्याचा सर्वाधिक उपयोग पर्यटन हंगामात कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आपल्या आवडीनिवडीनुसार नियोजन करायला होऊ शकेल. केरळमधील नौकानयन शर्यतीप्रमाणे कोकणात गौरी-गणपती, शिमगा खूप मोठे पर्यटन वैशिष्ट्य आहे. त्याचे मार्केटिंग व्हायला हवे आहे.

समुद्राची ओढ नसलेला माणूस विरळच! समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, फेसाळते निळेशार पाणी, किनाऱ्यावरील पांढरी-सोनेरी वाळू, काळ्या समुद्राची नवलाई, समुद्रकिनाऱ्यावरील दगडी रांजणखळगे (अनारसे), समुद्रातील साहसी खेळ, बोटिंग परंपरा जपणारी मंदिरे, गडकिल्ले, जुनी घरे, कोकणी संस्कृती, उत्सव, मासेमारी, कोकणी मेवा, खाण्यापिण्याची चंगळ आदींमुळे कोकणात उंची विदेशी पर्यटनाचा फील घेता येतो. त्यात कोकणला लागून असलेल्या सह्याद्रीतील वळणावळणाचे रस्ते, उंच डोंगर, वृक्षराजी आणि मुंबईपासून ते वेंगुर्ल्यापर्यंतच्या भागात पर्यटकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असलेले रम्य ठिकाणे यामुळे पर्यटकांना ‘कोकण’ हवाहवासा वाटत असतो. तो ‘कॅश’ करण्याची जबाबदारी कोकणी माणसाची आहे.

मुंबई-गोवा-मुंबई जलमार्गावर सुरु झालेली ‘क्रूझ’सेवा कोकणातही बहरायला हवी आहे. क्रूझसेवेतूनही पर्यटनक्रांती आणि रोजगार निर्मिती शक्य आहे. पर्यटन क्षेत्राला नवी दिशा मिळणे शक्य आहे. केरळने ‘बॅकवॉटर’ संकल्पनेच्या आधारे जगाच्या पर्यटन नकाशावर आपले स्थान निश्चित केले आहे. कोकणातील नद्या-खाड्यांमध्ये भुरळ घालणारे नैसर्गिक सौंदर्य असूनही आपल्याला बॅकवॉटर संकल्पना नीटशी राबविता आलेली नाही.

कोकण किनारपट्टीच्या भरती-ओहोटी क्षेत्रामध्ये असलेल्या खडकाळ भागांमध्ये विपुल प्रमाणात जैवविविधता (समुद्रशैवाल, अल्गी आदी समुद्रीजीव) असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबळडेग, कुणकेश्वर, भोगवे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काटघर, हेदवी, खारवीवाडा, वेळास आणि वेळणेश्वर या पाच ठिकाणी खडकाळ भागांतील पर्यटन क्षेत्र विकसित होऊ शकेल करण्याची संधी आहे. कोकणात निसर्ग जपत शाश्वत विकासासाठी धोरणात्मक पाऊले उचलली जायला हवी आहेत. कोकणातील जैवपरिसंस्था जपण्याची गरज आहे. सध्याच्या प्रदूषणाच्या दुनियेत निसर्गपूरक जीवनशैलीचे महत्त्व खूप आहे. कोकणात पोर्ट विकसित व्हायला हवी आहेत. तसेच कोकणातील मोकळ्या जागांचा सेंद्रिय पद्धतीने विकास शक्य आहे का? याचा विचार व्हायला हवा आहे. रत्नागिरीत नुकतेच देशातील पाचवे थ्री-डी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणसुरु झाले आहे. अंतराळाचा वेध घेण्याची आवड अनेकांना असते. यामुळे ‘तारांगण’ तोंडओळख होण्यास मदत होईल. अशा प्रकल्पांमुळे पर्यटक कोकणात अधिक वेळ गुंतण्याची प्रक्रिया वेग घेईल, ज्यामुळे त्याचा कोकणातील मुक्काम आणि पर्यटन वृद्धी आकार घेईल.

आपली भारतीय संस्कृती 'अतिथी देवो भव' असे म्हणते. अपवाद वगळला तर आम्ही कोकणात येणाऱ्या पर्यटकांना अवाच्यासव्वा किंमती सांगून भांबावून सोडत असतो. होया तर घेवा, नाय तर जावाअसली वाक्य आपल्या संवादातून हद्दपार झाली पाहिजेत. भरपूर नफा कमावण्याच्या नादात लुटारूपद्धती बदलली गेली पाहिजे. अलिकडे सोशल मिडिया कमालीचा सक्रीय असल्याने पर्यटन हंगामात याची हमखास चर्चा होते. हे थांबायला हवे.

सध्याचा काळ हा कोकणातील पर्यटन व्यवसायाला नवनवीन संधी देणारा आहे. आरोग्य पर्यटनात भारतात केरळ आणि तामिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत. नैसर्गिक संधी उपलब्ध असतानाही कोकण यात पुढे दिसत नाही. यासाठी पुन्हा पायाभूत सुविधांचा मुद्दाच ऐरणीवर यावा. पर्यटन हंगामात ‘कोकण हाऊसफुल्ल’ म्हणत आम्ही कितीही ओरडलो तरी आजही भारतातील अनेक नामांकित पर्यटन कंपन्यांच्या 'टूरलिस्ट'मध्ये कोकण नाही. याच्या कारणांच्या मुळाशी आम्ही जायला तयार नाही किंवा व्यवस्थेला शक्य तितका उशीर करण्यात अधिक स्वारस्य असावे, अशी स्थिती आहे. अपवादात्मक मोजक्या कंपन्यांच्या 'टूरलिस्ट'मध्ये तारकर्ली (स्नॉर्केलिंग) आणि गणपतीपुळे दिसू लागले आहे. या ठिकाणांचाही पर्यटन व्यवसाय हंगाम ६ ते ८ महिन्यांपेक्षा अधिक नसावा.

‘बारा महिने कोकण’ ही संकल्पना आपल्याकडे विकसित व्हायला हवी त्यासाठी ती इथल्या जनमानसात रुजायला हवी. कोकणात ठिकठिकाणी पर्यटन संस्था आणि संघ कार्यरत आहेत. मुळची कोकणातील परंतु नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असलेली तरुणाई कोकणात काहीतरी करायला हवं असा सकारात्मक विचार करू लागली आहे. याच्या मुळाशी मागील किमान पंचवीसेक वर्षांची या क्षेत्रात काम करणाऱ्यांची मेहनत आणि सातत्य कारणीभूत आहे. त्यामुळे कोकणाचा सकारात्मक विचार करणाऱ्या या तरुणाईला सरकार-प्रशासनाने विश्वासात घ्यायला हवे आहे. दुर्दैवाने कोकणातील प्रशासनात कोकणाबाहेरील अधिकाऱ्यांचा-कर्मचाऱ्यांचा टक्का अधिक आहे. त्यांना या भूमीची विशेष काही पडलेली नाही अशी स्थिती आहे. दर आठवड्याच्या शुक्रवारी गावी निघायचं आणि सोमवारी दुपारी किंवा थेट मंगळवारी कामावर रुजू व्हायचं असा कार्यभार सांभाळणारे कोकणात कितीतरी सापडतील. त्यातच एकाच कर्मचाऱ्यावर असलेला अधिकच्या कामाचा ताण, कोकणची भौगोलिक स्थिती अशा अनेक कारणांमुळे इथल्या मुलभूत विकासात सतत अडचणी निर्माण होत राहातात. पर्यायाने कोकणात अध्येमध्ये ‘स्वतंत्र कोकण राज्य’ची मागणी जोर धरताना दिसते. भावनिकदृष्ट्या दृष्ट्या ही मागणी स्वीकारणे अवघड असले तरी तिच्यामागाचे मूळ समजून घेण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही हे सत्य आहे. त्यामुळे अशा मागण्या येणार नाहीत या दृष्टीने विचार व्हायला हवा आहे.

कोकणात येणाऱ्या पर्यटकाने आयुष्यातील काही दिवस कोकणातच वास्तव्य करावे, पर्यटनाचा निवांत आनंद घ्यावा यासाठी शासन आणि प्रशासनाने नेमके काय प्रयत्न केलेत? कोकणातील पारंपरिक, शेतकरी, कातकरी, आदिवासी, कोळी आदी विविध समाजाच्या सोबतची जगण्यातील निवासी अनुभूती आपण पर्यटनात आणायला हवी आहे. कोकणात स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘निवास व न्याहरी’ योजनेला प्रोत्साहन दिलेलं दिसतं. पण त्यातील कागदपत्रीय क्लिष्टता कमी व्हायला हवी आहे.

कोकणातील किल्ल्यांची चांगल्या प्रकारे देखभाल झालेली नाही. त्यांची पर्यटकांना पुरेशी माहिती नाही. यामुळे समुद्रातील, समुद्राचे सान्निध्य लाभलेल्या, जमिनीवरील आणि जंगलातील किल्ल्यांचे वैश्विक वैभव पर्यटकांविना आहे. कोकणी माणूस प्रामाणिक आहे. त्याच्याकडे चिकाटीही आहे. त्याला शासकीय सहकार्याची आणि पायाभूत गरज आहे. कोकण पर्यटनाची नवी दिशा ठरवण्यात ‘जागतिक वारसास्थान कातळशिल्पे’ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यांना धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. तसे प्रयत्न सुरूही आहेत, त्यांना संपूर्ण प्रशासकीय पाठबळ मिळायला हवं. कोकणात सह्याद्रीच्या पर्वतरांगा, धबधबे, तलाव, सागरकिनारा, नद्या, खाड्या, जंगलवैविध्य, प्राचीन वास्तू, तीर्थक्षेत्रे, किल्ले, थंड हवेची ठिकाणे आदी पर्यटन वैभव असूनही इथलं पर्यटन दुबळं असल्याचं दिसतं. कोकणाचे सौंदर्य टिपण्यासाठी अनेक चित्रपट निर्माते येतात. या साऱ्यांच्या नोंदी (डॉक्युमेंटेशन) व्हावे. मुळात कमी बजेट असणाऱ्या फिल्म्स करणे, ही मोठी कसरत आहे. देशात आणि जगात जिथे सर्वाधिक पर्यटक जातो तिथे 'प्लॅन्ड टुरिझम' असतो. दुबईसारखे वाळवंट आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनते. कारण तिथे 'थीम्स' दिसतात. कोकणात असे निसर्ग आणि समुद्राशी निगडित थीमबेस्ड काम व्हायला हवे.

कोकणात मनुष्यबळ, व्यवस्थापन, जेवणखाणे, निवास या गोष्टी परवडणाऱ्या बजेटमध्ये एकाच ठिकाणी मिळण्याची स्थिती आजही नाही. कोकणात मसाल्याचे बेट का होत नाही? आपल्या आंबोली-दोडामार्ग वगळता कर्नाळा, फणसाड जंगलांची उत्कृष्ट अशी ओळख का होत नाही? अॅडव्हेंचर सायकलिंग, बायकिंग, ट्रेकिंग इव्हेंटन्स, प्रायव्हेट जंगले वापरून जंगल ट्रेक, बर्ड वॉचिंग असे काही जोरदार सुरू झाले, पायाभूत सुविधा दर्जेदार मिळाल्या आणि यांचे मार्केटिंग झाले तर कोकणात देशी-परदेशी पर्यटक नक्कीच येईल. तशी विशेष उभारी कोकणात मागील दहाएक वर्षांत पर्यटन व्यवसायाने घेतलेली दिसते आहे. ‘सी-वर्ल्ड’सारखा प्रकल्प कोकणात व्हायला हवा आहे. जागतिक वारसास्थळांचा विचार करता सह्याद्रीतील किल्ल्यांसह जलदुर्ग ही कोकणची खूप मोठी श्रीमंती आहे. या जलदुर्गांभोवती वेगवेगळी 'थीम्स' तयार होऊ शकतात. विजयदुर्गाची प्रसिद्ध पाण्याखालची भिंत, हेलियम पॉईंट पर्यटकांना पाहायला आवडतील. कोकणात मोठ्या संख्येने पर्यटक येण्यासाठी कोकणात काही प्रकल्प उभे राहायला हवे आहेत. यात पुढाकार कोण घेत आहे? यापेक्षा प्रकल्प उभे राहाणे महत्त्वाचे आहे. असा सकारात्मक विचार व्हायला हवा आहे.

कोकणातील ‘रेवस ते रेड्डी’ या ४९८ किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्गावर भरपूर पर्यटनस्थळं आहेत. ती विकसित करून पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यास कोकण पर्यटन आपसूक आणखी वाढेल. सागरी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी या मार्गावर खाद्य-पेयाचे स्टॉल, पेट्रोलपंप आदी आनुषंगिक सुविधा आवश्यक आहेत. कोकणात किनाऱ्यांवर सार्वजनिक चौपाटी केंद्र उभारली जायला हवीत. त्याच प्रमाणे कोकणातील साऱ्या पर्यटन मार्गांवर हिरव्यागार वनराईच्या सान्निध्यात किंवा नदी किनारी पर्यटकांना काही काळ विसावा घेता येईल अशी ‘क्षणभर विसावा केंद्र’ उभारली जायला हवी आहेत.

पर्यटन हंगामात आजही कोकण हाऊसफुल्ल असतं. मात्र कोकणात पर्यटनासाठी मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणारे पर्यटक आपणहून आपली टूर प्लॅन करत असतात. अंतराचा विचार करता ते योग्यही आहे. असे पर्यटक स्वतःच्या गाड्या काढतात किंवा एखादे वाहन ठरवतात. समुद्रकिनाऱ्याचे हॉटेल बघतात. दिवसभर भ्रमंती करतात. कोकणच्या दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे अनेक नामवंत आणि नवोदित टूर कंपन्या, टूर मॅनेजर्स हे हॉटेल बुकिंगसह प्रेक्षणीय स्थळांचे नियोजन पर्यटकांना देत असतात. त्या त्या ठिकाणचे वाहनचालक पर्यटकांना नियोजनानुसार पर्यटन दर्शन घडवत असतात. हे असे कोकणात का होत नाही? आम्ही कोकण पर्यटनाचे मार्केटिंग कधी करणार? यासाठी आम्हाला कोकण पर्यटनाचे मार्केटिंग देशभर करावे लागेल. पर्यटनाचा ८० टक्के व्यवसाय हा जाहिरातीवर अवलंबून असतो. एकूण पर्यटन व्यवसायातील २० टक्के खर्च जाहिरातींवर होतो. आमच्या व्यावसायिकांकडून हे होत असेल का? कोकणात राहण्याच्या चांगल्या व्यवस्था आहेत. सर्व आर्थिक पातळीतला पर्यटक आला तरी त्याला सेवा मिळू शकते.

युती शासनाच्या काळात सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा घोषित झाला होता. त्याचा पर्यटन विकास गतीने होण्यासाठी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ‘सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास महामंडळ’ स्थापन केले होते. छगन भुजबळ पर्यटनमंत्री असताना रत्नागिरी येथे झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत कोकणसाठी स्वतंत्र सागरी पर्यटन महामंडळ स्थापन होणार होते. एप्रिल २०१६ मध्ये विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विकासाच्या घोषणा केल्या होत्या. त्यांनीही स्वतंत्र ‘पर्यटन विकास महामंडळ’ बाबत सुतोवाच केले होते. या पार्श्वभूमीवर अगदी अलिकडे (१६ डिसेंबर) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या रत्नागिरी दौऱ्यात कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर ‘कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा प्रत्यक्षात कार्यान्वित झाली तर त्यातून कोकणातील जिल्ह्यांचा विकासाचा अनुशेष भरून निघण्याची शक्यता वाढेल. आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळानंतर बऱ्याच वर्षांनी कोकणचा ठोस विचार करणारे राज्यकर्ते महाराष्ट्राला लाभलेत असा संदेश सर्वत्र जाईल. कारण अपवाद वगळता राज्य व केंद्र सरकारने कोकणच्या पर्यटन विकासासाठी किरकोळ स्वरूपाचा निधी देऊन अल्पसल्प कामे केली आहेत. तीही कामे आपल्याला ‘गणपतीपुळे-तारकर्ली’ अशाच मोजक्या ठिकाणी दिसतील. कोकणच्या सर्वंकश पर्यटन विकासासाठी दृश्य स्वरुपात भरीव असे काहीही झालेले नाही. कोकणात अशा पायाभूत आणि नैसर्गिक विकासाकडे सरकारचे, प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. अगदी अलिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण दौऱ्यावरून परतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‘कोकण महामार्गाचं काम अर्धवट असून ते वेगानं झालं पाहिजे’ अशी चर्चा केली होती. यावरून पायाभूत सुविधांची कल्पना यावी. पर्यटन हा जगात सर्वाधिक रोजगार आणि परकीय चलन मिळवून देणारा उद्योग असताना जागतिक पर्यटनात आपल्या देशाचा वाटाही नगण्य आहे. अलिकडे देशात चांगले प्रकल्प आणि प्रयत्न होत आहेत. तसे ते कोकणातही व्हायला हवेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या ‘कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण’ संस्थेला केरळच्या ‘पर्यटन विकास प्राधिकरण’प्रमाणे आर्थिक स्वायतत्ता मिळणे आवश्यक आहे.

खरंतर कोकणसह आपल्या महाराष्ट्राला पर्यटन विषयाची ‘व्यावसायिक दृष्टी’ किती आहे? असा प्रश्न पडावा अशी आपली स्थिती आहे. प्रदूषण विरहित वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या कोकण भूमीत येत असल्याने पर्यटनाच्या बारमाही नव्या वाटा धुंडाळताना आपल्याला कचऱ्याच्या समस्येकडे गांभीर्याने पाहावे लागणार आहे. इतिहासात डोकावता, गणपतीपुळ्यात १९८१मध्ये समुद्रकिनाऱ्यावर ‘एमटीडीसी’ने कॉटेज बांधल्यावर पर्यटक येथे दाखल होऊ लागले होते. त्यानंतर १९९१दरम्यान गणपतीपुळे विकास आराखडा, रस्ते आणि मंदिर नव्यानं बांधलं गेलं. नजीकच्या मालगुंडला केशवसुत स्मारक आणि ‘प्राचीन कोकण म्युझियम’ झालं. अनुकूल शासकीय धोरणं आणि दळणवळाच्या सोयींनी गणपतीपुळे भागात २०००नंतर पर्यटनाचा वेग कमालीचा वाढला. एका उपलब्ध अंदाजानुसार गणपतीपपुळ्याला वर्षभरात २० ते २२ लाख पर्यटक येत असावेत. त्यात सुमारे पाचेक हजार शाळांच्या सहली संभवतात. अर्थात गणपतीपुळेतील पायाभूत सुविधांवर ताण येणे स्वाभाविक आहे. याच प्रकारे मालवण, तारकर्ली, आंबोली, कर्दे-मुरुड, काशीद, किहीम, अलिबाग आदी ठिकाणांचा विचार करता आज आणि उद्या कोकणात सर्वत्र कचऱ्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करणार आहे. त्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

साहसवीरांसाठी मालवण-रत्नागिरीच्या समुद्रकिनारी वॉटर स्पोर्टस् उपलब्ध आहेत. मोटरबोटिंग, स्कुबा डायव्हिंग यासह पॅराशूटचीही मजा येथे घेता येते. खोल पाण्यात जाऊन समुद्रातील जलचर पाहता येतात. मालवणपासून तारकर्ली-देवबागपर्यंतचा सुमारे १२ किलोमीटर अंतराचा समुद्रकिनारा साहसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे. या आकर्षक किनारपट्टीवर तंबुनिवासाची सोयही आहे. कोकणातील रस्ते कसे का असेनात, येथे सुट्यांच्या हंगामात येथे तुडुंब गर्दी असते. मात्र काहीवेळा ‘स्कूबा डायव्हिंग’ला 'फार कमी वेळ मिळतो. समुद्र अस्वच्छ आहे' अशा तक्रारी ऐकू येतात तेव्हा यावर उपाय शोधण्याची आवश्यकता जाणवते. कोकणातील मोजक्या ठिकाणचे अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, डॉल्फिन दर्शन, उंटगाडी, घोडागाडी पुरेसे पडणारे नाही आहे. अर्थात पर्यटकांच्या गर्दीचा विचार करून मागील दहा वर्षात कोकण पर्यटन व्यवसाय संकल्पना विस्तारत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ती  मार्केटिंगच्या बळावर केरळ, राजस्थानसारखी विकसित व्हायला हवी आहे. कारण सध्या जेवढे पर्यटक येऊन कोकण पाहतात त्यापेक्षा प्रचंड मोठे कोकण हे प्रचंड मोठ्या पर्यटकांची पर्यटनासाठी वाट पाहते आहे.

दरवर्षी राज्यात दहावी-बारावीच्या निकालात कोकणी टक्का अग्रेसर असतो. तरीही पुढे तो कोकण विकासाच्या चक्रात, शासकीय-निमशासकीय कार्यभारात कुठेही दिसून येत नाही. याचे कारण काय असावे? याच्या मुळाशी आम्ही जायला तयार होत नाही. कोकणच्या खऱ्याखुऱ्या विकासाचे असे विषय घेऊन आम्हाला दीर्घकाळ काम करावे लागणार आहे. त्यातून बदल शक्य आहे. ‘पद्मश्री’ परशुराम गंगावणे, डॉ. प्रसाद देवधर, ‘मरिनर’ दिलीप भाटकर, डॉ. अर्चना गोडबोले, माधव महाजन, दिलीप कुलकर्णी, चंद्रकांत मोकल, डॉ. सारंग कुलकर्णी, अलिकडच्या काळातील वैभव सरदेसाई, निशिकांत तांबे, सचिन कारेकर, प्रसाद गावडे अशा कितीतरी जणांनी कोकणात विषय घेऊन पाय रोवून उभे राहाण्याचे यशस्वी प्रयत्न केलेत. दुर्दैवाने ही उदाहरणे कोकण बोर्डात ‘टक्का’ गाजवणाऱ्या आमच्या हुशार तरुणाईपर्यंत योग्य वयात आणि योग्य वेळेत पोहोचत नाहीत. त्यामुळे आळवावरच्या पाण्याप्रमाणे सोशल मिडीयाच्या मृगजळावर दिसणारं सारं सत्य मानून ही तरुणाई कोकणाबाहेर जाण्यासाठीसज्ज होते परिणामी कोकण वर्षानुवर्षे जिथल्या तिथेच राहिल्याचे दिसते. हे बदलण्याची ताकद कोकणी माणसात आहे. त्यासाठी कोकणात विषय घेऊन काम करणाऱ्या सृजनकर्मींची संख्या वाढायला हवी आहे. 'कोकण पर्यटन' म्हणून विविध जबाबदाऱ्या आपल्या अंगावर घेत आपणहून पुढे येऊन काम करणारी मंडळी हवीत. अशांची टीम एकदा का ‘पर्यटन साक्षर’ झाली तर कोकणातील गावेच्या गावे पर्यटनाच्या नकाशावर येतील. परिणामी कोकणाला बारमाही पर्यटनाच्या नव्या वाटा नक्की गवसतील.

-धीरज वाटेकर, चिपळूण

मो. ९८६०३६०९४८

(धीरज वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील ‘पर्यटन-पर्यावरण’ विषयातील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व चरित्र लेखनया विषयावरील आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते ‘पत्रकार’ म्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत आहेत.)

 

1 टिप्पणी:

Radhika Kulkarni म्हणाले...

धीरज, उपायांसह लिहिलेला लेख आवडला. परंतु, पर्यटन वाढताना कोकणात येणाऱ्या गाड्यांची संख्या जशी वाढेल तसतसा निसर्गावर कार्बन उत्सर्जनाचा परिणामही वाढेल हे लक्षात घ्यायला हवे. पब्लिक ट्रान्सपोर्टचाच वापर करण्याचा नियम त्यासाठी पर्यावरणानुकुल बसेसची व्यवस्था आणि ठराविक ठिकाणी फक्त पायी वावरण्याचा नियम असे काही उपाय योजता आले तर बरे. - राधिका कुलकर्णी, मस्त पत्रकार व क्लायमेट रियालिटी लीडर - मेंटॉर

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...