बुधवार, २२ जून, २०१६

कोकणातील अष्टविनायक

गेल्या काही वर्षापासून कोकणात पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. कोकणातील धार्मिक वातावरण जवळून अभ्यासले असता आपणास आजही तुलनेने फारशी व्यापारी मानसिकता जाणवत नाही. कोकणातील एकूणच सर्व धार्मिक परंपरा आपले अस्तित्व आजही संभाळून आहेत. जगभरातील धर्मप्रेमि म्हणूनच आजही कोकणात दर्शनाला येतातच... कोकणातील गणेश मंदिरे अतिशय स्वच्छ, सुंदर निटनेटकी आहेत. आजूबाजूचा परिसर न्याहळताना कधी एकदा आपण गणपती मंदिराकडे पोहोचतो हे कळतच नाही. या सार्‍या पार्श्वभूमीवर कोकणातील महत्वपूर्ण आठ श्री गणेश स्थानाना अष्टविनायक स्वरुपात भाविक्ांसमोर ठेवीत आहोत. प्रस्तुत लेखनातील स्थान निवडित काही वेगळे विचार असु शकतात, परंतु अशा स्वरुपातील मांडणी कोकण पर्यटन विकासास पूरक ठरू शकते. म्हणूनचा हा प्राथमिक   प्रामाणिक लेखन प्रपंच !

श्री क्षेत्र गणपतीपुळे ( रत्नागिरी )

मुंबईपासुन साधारण ३७० किमी अंतरावर समुद्रकिनारी वसलेले अत्यंत सुंदर असे श्रीगणेशाचे स्वयंभू स्थान श्री क्षेत्र गणपतीपुळे होय. हे गणेश मंदिर एका डोंगराच्या पश्चिम बाजूस पायथ्याशी असुन संपूर्ण डोंगरालाच श्रीगणेशाचे स्वरूप मानण्यात येते. हिंदुस्थानच्या आठ दिशांनी आठ द्वारदेवता आहेत. त्यापैकी श्री क्षेत्र गणपतीपुळे ही पश्र्चिमद्वार देवता होय. समुद्रकिनारी असल्याने भरती-ओहोटीच्या रुपात पुळणीने तयार झाल्यामुळेच याला "पुळ्याचा गणपती" असेही म्हणतात. येथील ४०० वर्षांची गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. सह्याद्री पर्वतातील नैसर्गिक मूर्ती , त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र  ह्यामुळे हे देऊळ आगळे आहे.  समोर पसरलेला निळाशार समुद्र आणि त्याच्या पार्श्वभूमीवर असलेले हे सुंदर गुलाबी मंदिर पर्यटनाबरोबर तीर्थाटनाचाही आनंद देते. रत्नागिरीहून साधारण २५ किमी अंतरावर असणारेगणेशगुळेहे स्थान फारच कमी लोकांना माहित आहे. अगदी साधे गाव, साधे मंदिर आणि बहुतालचा सुंदर, परिसर बघण्यासारखा आहे. ज्यांना वेगळ्या ठिकाणांना भेट द्यायला आवडते, अशा लोकांना गणेशगुळे येथे जायलाच हवे.

कड्यावरचा गणपती मंदिर, आंजर्ले  ( रत्नागिरी )
एका बाजूला अथांग समुद्र, एका बाजूला जोग नदी व खाडी असलेले हे कोकणातील खूप निसर्गरम्य, शांत गाव. कड्यावरचा गणपती हे एक रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आंजर्ले ह्या गावाचे प्रसिद्ध व पुरातन सिद्धिविनायक मंदिर आहे. हे गणपती मंदिर समुद्रालगतच्या टेकडीवर आहे. दाट हिरवाळीत हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. गाभा-यातील गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. ती उजव्या सोंडेची असून ५ फूट सिंहासनाधिष्ठीत आहे. मूर्ती बेसॉल्ट रॉकपासून बनविलेली आहे. ही मूर्ती तैलरंगाने रंगविलेली आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धिसिद्धिच्या सुमारे एक फूट उंचीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारातच काळ्या पाषाणाचे शिवमंदिर आणि अष्टकोनी तळे आहे. मंदिराच्या चारही कोप-यावर पुरातन बकुळ वृक्ष असून वनस्पती शास्त्रांच्या म्हणण्यानुसार ते सहाशे वर्षांपूर्वीचे आहेत. येथे माघी उत्सव जोरात होतो.
दशभुजा गणेश हेदवी ( रत्नागिरी )

निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या गुहागर तालुक्यातेल हेदवी गावच्या कुशीत डोंगराच्या मध्यभागी किल्लेवजा तटबंदीने वेढलेली पेशवेकालीन मंदिर टेकडीवर वसले आहे. गुहागर तालुक्यापासून अंदाजे २०-२१ किमी अंतरावर हेदवी गाव वसले आहे ह. दहा हात असलेली सुंदर व दुर्मिळ अशी संगमरवरी मूर्ती व नवसाला पावणाऱ्या या गणेशाच्या दर्शनासाठी येणारे गणेशभक्त आणि पर्यटक यांच्यामुळे हा परिसर आता गजबजू लागला आहे. मंदिरातील मूर्ती हि काश्मीरमधील पांढऱ्या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीला दहा हात असून उजव्या बाजुला पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशुळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग नावाचे फळ आहे. डाव्या बाजुच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात निलकमळ, चौथ्या हातात दात व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धीपैकी एक सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. या गणेशमूर्तीची उंची साडेतीन फूट आहे व ती एका मोठ्या आसनावर विराजमान झालेली आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता ती आपल्याकडेच पाहत आहे असे भासते. गळ्यात नागाचे जानवे परिधान केलेली अशी हि दशभुजा गणेश मूर्ती फक्त नेपाळ मध्येच पाहावयास मिळते, असे म्हटले जाते.

जय गणेश मंदिर, मालवण  (सिंधुदुर्ग)
मूळचे मालवणचे कालनिर्णयकर्ते ज्योतिभास्कर जयंतराव साळंगावकर त्यांनी आपल्या राहत्या घराच्या जागी लाखो रुपये खर्चून सर्वांगसुंदर असे गणेश मंदिर उभारले आहे. शास्त्रोक्त पद्घतीने बांधलेले हे मंदिर पाहताचक्षणीच मन प्रसन्न होते. उत्तम शिल्पकला आणि भडक ऑइलपेंट टाळून केलेली सुखद रंगसंगती आणि कमालीची स्वच्छता आहे. गाभार्‍यामधली सुवर्णगणेश मूर्ती अतिशय चित्ताकर्षक आहे. मंद तेवणार्‍या नंददीपांच्या प्रकाशात सुवर्ण चौरंगावर विराजमान झालेले श्री गजानन, दोन्ही बाजूस ऋध्दी-सिध्दी आणि चवर्‍या ढाळणारे मूषक डोळे भरुन पाहताना दर्शनमात्रे मनः कामनापूर्तीअसा अनुभव येतो. आदिदेवता श्री गणेशाच्या भक्तांना त्याच्या कृपेने सर्व क्षेत्रात जय मिळावा म्हणून या मंदिराचे नाव जय गणेशमंदिर ठेवण्यात आले आहे. मंदिर सभामंडपात मध्यभागी एक वैशिष्ट्यपूर्ण अष्टकोनी नक्षी आहे. त्यामध्ये प्रत्येक नक्षीचा मोजून आठवेळा वापर करण्यात आला आहे. या जागी उभे राहून श्रध्देने केलेली मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रध्दा आहे.

रेडीचा  श्रीगणेश  मंदिर (सिंधुदुर्ग)

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील रेडी बंदर किनार्याजवळच लोह खनिजाच्या खाणीच्या परिसरात १८ एप्रिल १९७६ रोजी स्वयंभू श्री गणेशाची द्विभुजा मुर्ती दृष्टांत प्रकट झाली. या ठिकाणी श्रीगणेशाचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. दर संकष्ठीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमते. ही मूर्ती जांभ्या दगडाच्या गुंफेमध्ये कोरलेली होती मूर्ती जांभ्या दगडाचीच होती. सुमारे सव्वा महिन्यांनी बंदराजवळ गणपतीचे वाहन असलेला दगडात कोरलेला मोठा उंदीर सापडला. श्रीगणपतीच्या त्या मुर्तीला प्लास्टरिंग रंगरंगोटी करुन सजविण्यात आले. श्रीगणेशाची ती द्विभुजा भव्य मूर्ती अतिशय देखणी सुबक दिसते. नवसाला पावणारा हा रेडीचा श्रीगणेश भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी गणेशाचे सुबक मंदिर बांधण्यात आले. प्रत्येक संकष्टीस श्रीगणेशाच्या प्रगटदिनी अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने या परिसरास जत्रेचेच स्वरुप असते. जलमार्गातील बंदर म्हणून रेडी सर्वज्ञात आहे. या गावाची महती द्विभुज गणेशामुळे सातासमुद्रपार पोहोचली. रेडीत दोन ठिकाणी द्विभुज गणेश आहेत. एक समुद्रकिनारी आणि दुसरा यशवंत गड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ! रेडी हे ठिकाण वेंगुल्र्यापासून ३० कि.मी. अंतरावर आहे.

दिवेआगर गणेश (रायगड)

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक छोटसे गाव आहे. निळाशार अथांग समुद्र , गर्द माडाची बने आणि नारळ सुपारीच्या झावळ्यात लपलेली ती सुंदर कौलारू घरे, निसर्गाने दिलखुलासपणे दान दिलेल्या दिवेआगराला परमेश्वराचाही वरदहस्त लाभला आहे. येथील द्रौपदी पाटिल या महिलेच्या बागेत जमीन खोदण्याचे काम सुरु असताना एक लोखंडी पेटीत गणपतीची सुमारे १००० वर्षापूर्वीची सोन्याची .३२ कि वजनाची सोन्याची मूर्ती सापडली होती. आजमितीस सोन्याच्या गणपतीचे दिवेआगर ही ओळख मुर्तीच्या चोरीमूळे मागे पडली असली तरी मूळ मंदिरास भेट देणार्या पर्यटकांत दिवेआगरचे महत्व कायम आहे. या निसर्गरम्य गावाला अरबी सागाराचा किमि. चा अतिशय सुंदर, स्वच्छ आंणि सुरक्षित किनारा लाभला आहे. या किनार्यावर केवड्याची बने आहेत. या गावात एकुण पाच ताम्रपट एक शिलालेख सापडला आहे. गावाचे प्रथम दैवत म्हणून श्री सिद्धिविनायक मंदिर महत्त्वाचे आहे. शिलाहारांचे ते दैवत होते असे संदर्भ सापडतात. येथे श्री गजाननाची पाषाणमूर्ती आहे. शेजारी अन्नपूर्णा देवीची पितळी मूर्ती आहे. मराठी भाषेतील अतिशय प्राचीन असा (भाषेच्या अगदी सुरूवातीच्या अवस्थेतला) ताम्रपट येथे सापडला. हा .. १०६० मधील ताम्रपट असल्याने मराठी भाषेच्या दृष्टीनेही दिवेआगर हे महत्त्वाचे स्थान आहे. येथील सुपारी सर्वोत्तम सुपारी मानली जाते . येथे विविध प्रकाराची फुलझाडे आहेत. अनेक रंगांच्या जास्वंदीची फूले पपनसाची फळे पहावयास मिळतात. श्रीवर्धनमार्गे पुणे ते दिवेआगर हे अंतर १७१ कि. मी. आहे, म्हसळामार्गे ते १५६ कि. मी. आहे.

नांदगाव सिध्दिविनायकाचे मंदिर   (रायगड)

अलिबागहून मुरुडकडं जाताना अवघ्या सात किलोमीटरवर नांदगाव सिध्दिविनायकाचे मंदिर आहे. मुरुड-जंजिरा तसंच श्रीवर्धन, हरिहरेश्वरला अलिबागहून जाणारा पर्यटक किंवा स्थानिकही या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जात नाही. नारळी पोफळीच्या बागा आणि नक्षीकामाचा उत्कृष्ट नमूना असलेल्या या मंदिरातील गणपतीचं दर्शन घेतलेल्या भाविक या मार्गावरून पुन्हा जाताना आपोआपच मंदिराकडं वळतो, असा अनुभव आहे. माघ शुद्ध चतुथीर्ला इथं सिद्धीविनायकाची मोठी यात्रा भरते. साळाव-मुरुड मार्गावर मुरुड गावाच्या आधी नांदगाव आहे. अलिबाग-मुरुड रस्त्यावर रेवदंडा गावापुढील असणार्या खाडीवरील पूल ओलांडल्यावर डावीकडे साळाव गाव आहे. या ठिकाणी संपूर्ण संगमरवरावर वापरून बांधलेले अतिशय सुंदरबिर्ला गणेशमंदिर आहे. येथील गणपतीची मूर्ती देखील संगमरवरी असून त्याला विविध प्रकारचे दागदाि गने घातले आहेत. या मंदिराच्या परिसरात मोठा बगीचा देखील आहे.

सिद्धिविनायक महागणपती मंदिर, टिटवाळा ( ठाणे )

महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातलं टिटवाळा हे श्रीगणपती क्षेत्रही प्रसिद्ध आहे. कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. याच परिसरात पूर्वी कण्व ऋषींचा आश्रम होता. शकुंतला इथेच वाढली. त्यामुळे या ठिकाणाला  प्राचीन महत्त्व आहे. टिटवाळा मुंबईपासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे. गणपतीचे मंदिर तसे साधेच आहे. शेंदरी रंगाची रेखीव मूर्ती मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेते. रेखीव चेहरा, पुढे आलेली सोंड यामुळे मूर्तीला एक ठसठसीतपणा आला आहे. सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील ह्या मूर्तीच्या चार हातात आयुधे आहेत. मूर्तीला रोज नेटकेपणाने पितांबर नेसवला जातो. डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. मुर्तीवर चांदीचेच छत्र आहे. इथे फुलांची सुरेख आरस केलेली असते. जेथे गणपतीची मूर्ती आहे तो संपूर्ण देवारा चांदीचा बारीक कलाकुसर केलेला आहे. चांदीच्या देवार्‍यात असलेली केशरी मूर्ती आणि हिरव्या दुर्वा, पांढरी मोगर्‍याची व जास्वंदाची फुले यामुळे सुरेख रंगसंगती साधली जाते आणि बघणार्‍याची नजर फिरवून ठेवते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभार्‍यात प्रवेश केल्यापासून ते सभा मंडपातून बाहेर पडेपर्यंत मूर्तीचे सतत दर्शन आपल्याला होत राहते. मंदिराच्या आवारात एक छोटी दिपमाळ आहे. या मंदिरापासून काही अंतरावर एक तलाव आहे. हा एकंदर परिसरच खूप रमणीय आहे.

वास्तविकत: भारतात सर्वत्रच गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा उत्सव होतात. माघ शुक्ल चतुर्थी भाद्रपद शुक्ल चतुर्थी असा दोनदा जन्म झाल्याने द्वैमातुर नावानेही गणेश ही देवता ओळखली जाते. भाद्रपद माघ महिन्याची शुक्ल चतुर्थीस गणेश चतुर्थी हा गणपतीचा जन्म दिन होय. या देवतेस हिंदू धर्म शास्त्रात अग्रपूजेचा मान आहे. हिंदू धर्मग्रंथात या देवतेची वर्णने स्थलपरत्वे बदलत असली तरी हत्तीचे मुख आणि मनुष्याचे शरीर असलेली देवता हे वर्णन समान आहे. या देवतेचे वाहन काही ठिकाणी उंदीर तर काही ठिकाणी सिंह सांगितले आहे. अशा या गणेशाची कोकणातील काही स्थानांची भटकंती आपणाला नक्कीच आनंद देईल.

धीरज वाटेकर

पर्यटन अभ्यासक, मो. 9860360948

तरूणहो, गंजण्यापेक्षा झिजणे श्रेयस्कर मानू या !

सुखाचा उपभोग तर नियती सार् यांच्याच पदरात टाकते. कुणाला रांजणभर, कुणाला घड़ाभर, कुणाला पोटभर तर कुणाला जन्मभर हा उपभोग घेता येतो. परंतू या सार् यातून मिळणारा अनामिक-आत्मिक आनंद ज्याला नीटसा जगता येतो, त्यांच्याच जीवनाचे सार्थक घड़ते. आजच्या तरूणाईने हे  लक्षात घेऊन "गंजण्यापेक्षा झिजणे श्रेयस्कर" मानून सदैव कार्यरत होण्याची गरज निर्माण झाली आहे.

शैक्षणिक स्तरावर विशेष प्राविण्यासह आपली गुणवत्ता सिद्ध करून वास्तविक यशस्वी जीवन जगणार् या, नुकतीच पस्तीशी ओलांडून चाळीशीकड़े झुकू पाहणार् या / झुकलेल्या आमच्या अनेक सहकारी मित्रांना सध्या "आपण तर काहीच करत नाही आहोत, काहीतरी करायलाच हवयं" असं वाटू लागलंय. विशेषतः मोठाल्या विविध कंपन्यात, आय. टी. क्षेत्रात, असमाधानी वातावरणात कार्यरत असणार् यांची यात खूप मोठी संख्या आहे. कालपरवापर्यंत आम्हीही याबाबत खूपसे ऐकून यथातथ्य होतो. परंतू मागिल शनिवार-रविवारच्या (12 जून) अनुभवातून आम्हाला आमच्या उपरोक्त यथातथ्य  ज्ञानाबाबतचा एक धक्कादायक संदर्भ जवळून अभ्यासायला मिळाला, आणि मेंदूत काहूर माजलं. "गुणवत्ता" या शाळेत शिकवलेल्या, हवाहवासा वाटणार् या शब्दाचे समानार्थी शब्द चक्क विरुद्धार्थी भासू लागले. "स्पर्धात्मक जीवघेणी जीवनशैली" मानवी जीवन जगण्याच्याच मुळावर उठल्याची आमची पक्की खात्री बनली.

सह्याद्री वाहिनीने मागिल आठवड्यात रविवार-सोमवारी (12 जून) आपल्या सलग चार बातमीपत्रात दखल घेतलेल्या आमच्या, चंदन लागवड कार्यशाळा अभियानाला विविध ठिकाणाहून चांगला प्रतिसाद मिळाला, अनेकांनी फोन करून माहिती घेत चंदन रोपांची मागणीही नोंदवली. रविवारच्या या  कार्यशाळेला शनिवारी रात्रीच पूर्वसूचना देऊन, दापोलीत काही एकर मालकी जमीन असलेला, एक पुण्यातील 38 वर्षीय तरूण पोहोचला. चौकशी करता अगदी सुरूवातीला, "उद्या पोहोचायला उशीर झाला तर ? म्हणून आजच आलो !" असा आपल्या येण्याबाबतचा खुलासाही त्याने केला. या कार्यशाळेसाठी आलेले चंदनतज्ज्ञ महेन्द्र घागरे, आमचे सहकारी विलास महाडीक आणि आम्ही एकत्र जेवण घेत असतानाच या तरूणाचे येणे झाल्याने त्यालाही आम्ही जेवायला सोबत बोलावले. त्याच्याशी गप्पा सुरू केल्या तेव्हा पुण्याच्या आय.टी. क्षेत्रात वर्षाला ड़ोळे दिपवून टाकणारा काही लाखांचा वार्षिक पगार नाकारून त्याने "गंजत चाललेली बुद्धी झिजवण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले" असल्याबाबत कळले. गेली अनेक वर्षे आमच्या मनात घर करून राहिलेले हे वाक्य त्याच्या तोंडून ऐकल्यावर आम्हाला धक्काच बसला. पुढे जावून त्याने बड़्या कंपन्यात निव्वळ आणि निखळ गुणवत्ता कशी गंजते ? सततचा ताणतणाव, मनासारखे काम न करता आल्याने येणारा मानसिक थकवा आणि या सार् याचा संपूर्ण जीवनशैलीवर झालेला, होते असलेला विपरित परिणाम असह्य होऊन त्याने विचारपूर्वक धाड़साने हे पाऊल उचलल्याची माहिती दिली. "नोकरी सोबत पगारही बंद", म्हणून घरची कौटुंबिक गरज पूर्ण करण्यासाठी तूर्तास त्याने आपले शैक्षणिक ज्ञान पणास लावले. गलेलठ्ठ पगार नाकारून जीवन जगण्यापुरता पैसा उपलब्धीचे नियोजन करून हा तरूण कोकणातल्या आपल्या जमिनीत काही शाश्वत प्रयोग करण्यासाठी सज्ज झाला. या प्रयोग अन् प्रयत्नरूपी धड़पड़ीत तो आमच्यापर्यंत पोहोचला. त्याचे हे धाड़स, त्यामागील अभ्यास, नियोजन, प्रयत्नातील सातत्य, यशासाठी आवश्यक अधिकचा वेळ देण्याची तयारी, संयम या सार् या गुणांनी प्रभावित होवून आम्हीही मनोमनी, "देवा, परमेश्वरा ! याला यश दे रे बाबा" पुटपुटलो.

मित्रहो, कोणतीही वस्तू असो वा "बुद्धी" असो प्रत्येकाचा शेवट हा ठरलेलाच आहे. परंतू ती आयुष्यभर वापरलीच नाही तर ती गंजणार हे नक्की आहे आणि सतत वापरत राहिलो तर सरतेशेवटी ती झिजणार हेही नक्की आहे. ती समाजासाठी, स्वतःसाठी सातत्याने वापरून अखेरपर्यंत झिजविल्यास आपण आयुष्यभर सदैव आत्मिक समाधानाचा आनंद उपभोगू शकतो. यासाठी आपण आपल्या अंतरंगात, स्वतःत थोडेसे झाकून पहा, अर्थार्जन वगळता आपल्याला सर्वाधिक आनंद कोणत्या कामातून मिळतो ? आपला अर्थार्जन मार्ग आणि आपली आवड़ यांची सांगड़ घालता येईल का ? याद्वारे आपला जन्म नक्की कोणत्या कार्याकरिता झालेला आहे ? हे शोधून त्या मार्गावर कार्यरत होण्याचा प्रयत्न करा...आपले आयुष्य आपणास झिजण्यातून आत्मिक समाधानाचा आनंद प्रदान करेल !

धीरज वाटेकर

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...