मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६

पर्यावरणीय ह्रास, हानी, संवर्धन आणि विकास ; स्त्रीयांचे योगदान

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता, जननी आणि जन्मभूमी सर्वश्रेष्ठ मानणाऱ्या भारतात प्राचीनकाळी स्त्री-पुरुषांचे वास्तव्य पर्यावरणाच्या सान्निध्यात असे. त्यामुळे कंदमुळे आणि फळे यांवर त्यांची उपजीविका चाले. अन्नसाहित्य हे जमवून आणून एकत्रित खाल्ले जाई.  बिया खाण्यायोग्य नसल्याचे कळू लागल्यानंतर त्या फेकून दिल्या जात. कालांतराने त्या बियांतून नवीन झाड़े उगवून येत असल्याचे कळले आणि बीयांपासूनच्या शेतीस प्रारंभ झाला. पृथ्वीवर सजीवांना पोषक वातावरण फक्त वनस्पतीच देवू शकतात हे लक्षात आल्यानंतर सर्वप्रथम वनस्पतीचा सजीवांमध्ये समावेश झाला. त्यावर उपजीविका भागवणार्‍या प्राण्यांची निर्मिती नंतर झाली. यातूनच पुढे प्राचीन कृषीप्रधान भारतात स्त्रीला "जननी"चा दर्जा प्राप्त झाला होता. पर्यावरण संवर्धनातील स्त्रीयांच्या योगदानाला खर् या अर्थाने  तिथे प्रारंभ झाला.  या पार्श्वभूमीवर विचार करता पर्यावरण संवर्धन क्षेत्रात प्रत्यक्ष भटकंतीसाठी लागणारा वेळ देण्यात येणाऱ्या मर्यादांमुळे स्त्री-अभ्यासकांची संख्या आजही तुलनेनं कमी आहे. तरीही जगाच्या पाठीवर महिलांनी या विषयात दखलपात्र काम उभे केले आहे. अनेक संदर्भ अभ्यासून केलेल्या प्रस्तुत विवेचनात आपण कार्यप्रवण अशा स्त्रीयांच्या कार्याच्या मागोव्यातून पर्यावरणीय ह्रास, हानी, संवर्धन आणि विकास ; स्त्रीयांचे योगदान  पाहू या !

आपल्या भूमीची सुफलनक्षमता आणि स्त्रीची सर्जनशीलता यातील साध्यर्म भारतातील प्राचीन समूहांना जाणवले होते. आजमितीस स्त्रियांवर कितीही "अन्याय -अत्याचार" होत असले तरी प्राचीन काळापासून आपल्या कृषीप्रधान भारतीय संस्कृतीत मातृसत्ताक जीवन पध्द्तीचा गौरव होत आला आहे. आपल्या संस्कृतीला असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेमुळे संपूर्ण जगात भारताचे एक वेगळे स्थान आहे. त्या अगदी प्राचीन काळी उत्तरेकडील प्रदेशांत राजा दिलीप आणि त्याची राणी सुदक्षिणा राहत होते. राणी सुदक्षिणा हिला  वनस्पतींविषयी खूप प्रेम होते तिच्या आग्रहाखातर राजा दिलीप यांनी उत्तरेकडील परिसरातील जवळजवळ ४०० वनस्पतीची माहिती, गुणधर्मासह गोळा केली होती. या सर्व वनस्पतींचा आपल्या प्रजेलाही ओळख व उपयोग व्हावा म्हणून त्यांची लागवड करून तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करून संपूर्ण वनस्पतींना संरक्षण दिले होते. त्यात वनौषधी, सुगंधी वनस्पती आणि नयनरम्य फुलांच्या वनस्पती यांचा समावेश होता. मनुष्याने विषारी, बिनविषारी वनस्पती या निरीक्षणातूनच ओळखून त्यांची वर्गवारी करण्यास प्रारंभ केला. नंतरच्या काळात ऋषीमुनी आणि जाणकारांच्या अभ्यासातून आयुर्वेद, सुश्रृतसंहिता नावांचे मौलिक ग्रंथ निर्माण झाले. अनेक भारतीय सणांमधून आपल्याला संस्कृतीमध्ये असलेले पर्यावरण रक्षणाचे महत्त्व लक्षात येते. वटपौर्णिमेस आपण वड़ाच्या झाड़ाची पूजा करतो. वड़ाच्या झाड़ाला आपण पूजनीय मानतो पण त्याचे पूजनीय महत्व शतकानुशतके टिकवून ठेवण्याचे काम स्त्रियांनी केले आहे. वडाचे एक झाड एका लहानशा खेडयातील लोकांना अखंड प्राणवायू पुरवू शकते. वडाला शेकडो वर्षे आयुष्य लाभले आहे. कलकत्ता येथील वनस्पती उद्यानात ४५० वर्षांपूर्वीचा वड आहे, त्याचा विस्तार ४ एकर जमिनीवर पसरलेला आहे. याला जगातील सर्वात जुना वड मानले गेले आहे. ही वर्षानुवर्षे टिकवून ठेवण्याची परंपरा जोपासण्यात स्त्रियांची भूमिका महत्त्वाची राहीली आहे. आपल्याकडे भाद्रपद महिन्यात स्त्रीया हरितालिका व्रत करतात, गणेशोत्सवही याच वेळी येतो. या व्रतवैकल्यांत भगवान श्रीशंकर आणि श्रीगणेश यांच्या पूजनात 21 वनस्पतींची पाने वापरली जातात, पृथ्वीवरील अतिरिक्त झालेल्या वनस्पतींची संख्या आपोआपच कमी होते. श्रावण महिन्यात दर सोमवारी आपण श्रीशंकराला बेलाची १०८ पाने वाहतो. ह्या दिवसांमध्ये बेलाला खूप पाने आलेली असतात अतिरिक्त पानांमुळे बेल फळे दबून जाऊन फळांची वाढ न होण्याचा धोका असतो. पाने कमी केल्यामुळे बेल फळे लवकर वाढतात. इथेही स्त्रियांची भूमिका महत्त्वाची राहीली आहे. आपल्याकड़ील काही वनस्पतींची लागवड निव्वळ स्त्रीप्रेमामुळेच झालेली असल्याचे अनेक प्राचीन संदर्भ विविध ग्रंथात मिळतात. श्रीकृष्णाने सत्यभामेच्या प्रेमामुळे "पारिजातक" स्वर्गातून जमिनीवर आणला आणि त्या अशा सुगंधी पारिजातकाचे बहरणे आपल्याला गोकुळाष्टमीपर्यंत पाहावयांस मिळते.  झाडांच्या पूजनाची मुख्य कल्पना ही स्त्रियांचीच आहे. आपल्या देशातील काही भागात पूर्वी मुलीचा विवाह ठरविताना नवर्‍या मुलाच्या शेतात उंबराचे झाड आहे का ? काळापासून असल्यामुळे कोणी चिंचेचे झाड शक्यतो तोडत नसे. तुळस, आवळा यांचे पूजन आजही भारतात होते. आपल्याला मुल-बाळ व्हावे म्हणून पूर्व भारतात 'साल' वृक्षाचे पूजन होई. बोधीसत्त्व सिद्धार्थ गौतमाची जन्मभूमी लुम्बीनी गार्डन परिसरात साल, आंबा, पळस, सीतेचा अशोक, सातमळी ह्या वृक्षाची पूजा स्त्रिया करतात. मथुरा आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये वृक्षिकाहा  उत्सव साजरा होतो. उत्सवादरम्यान अशोका, कदंबा, केतकी, रूई ह्या झाडाचे पूजन सुंदर व तरूण स्त्रीकडून केले जाते. ह्या सुंदर तरूण स्त्रीला उत्सवादरम्यान वनदेवता / जलदेवता असे संबोधले जाते. पार्वतीने शिवप्राप्तीकरिता आंब्याच्या झाडाखाली एका पायावर उभी राहून आराधना केली होती म्हणून त्या त्या ठिकाणी आंब्याची पूजा केली  जाते. जैन धर्मामध्ये अंबिकादेवी ही छोट्या मुलांसह आंब्यांच्या झाडाखाली बसलेली असते, अशी मान्यता असून जैन समाज  आंब्यांची पूजा करतात. अर्थात आज आपण नक्की कोणते झाड़ तोड़ीत आहोत याचीच जाण नसल्यामुळे अवघड स्थिती आपणच निर्माण केली आहे. 

सन २००४ सालचा पर्यावरण विकास आणि शांतता या कार्याबद्दलचा नोबेल पारितोषिक प्राप्त पहिली आफ्रिकन स्त्री, केनियन पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्ती वंगारी मथाई यांनी पर्यावरण आणि वृक्ष संवर्धन  याबाबत आयुष्यभर ठामपणे भूमिका मांडली. सन 1970 च्या दशकात हरितपट्टा (ग्रीन बेल्ट) आंदोलनामुळे पाय रोवून त्यांनी पर्यावरण संरक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधले. आपल्या राहात्या घरामागील हिरवागार  डोंगर व्यापारी हेतूने झालेल्या जंगलतोडीमुळे ओसाड  डून जमिनीची धूप, पाण्याचे प्रदूषण निर्माण झाले. स्थानिक लोक  प्रचंड समस्यांनी घेरले गेले, जंगलापासून मिळणारे उत्पन्न थांबले, महिलांना जळणाच्या लाकडासाठी वणवण फिरावे लागू लागले, या समस्या पाहून प्रचंड अस्वस्थ झालेल्या मथाई यांनी या विषयावर सखोल अभ्यास केला आणि वृक्षतोडीवर वृक्षलागवड आणि संवर्धन  हा मार्ग अवलंबिला. तदनंतर तीन वर्षांतच त्यांनी तीन कोटीं हून अधिक झाडे लावली. गरीब महिलांमध्ये प्रबोधन घडवून आणून त्यांच्याकडून त्यांनी हे कार्य करवून घेतले. कमी शिकलेल्या गरीब जनतेत, आपण कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय अथवा भांडवलाशिवाय पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे काम करू शकतो, हा विश्वास निर्माण केला. पुढच्या पिढीसाठी एक भरगच्च सावली आणि पोटापाण्यासाठी अन्नाची सोय करण्यासाठी जनतेला प्रवृत्त केले. त्यातून ही चळवळ पुढे  लोकचळवळ म्हणून नावारूपाला आली. 1991 मध्ये केनिया सरकारला नैरोबी जंगल तोडणीला विरोध करताना त्यांना वारंवार जेलमध्ये जावे लागले. तर 1999 ला त्यांना जंगलतोड विरोधातील आंदोलनात डोक्याला मार सहन करावा लागला. पुढे 2002 मध्ये त्या संसद सदस्य म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांना सहायक पर्यावरण मंत्रिपद देण्यात आले होते. 2003 ते 2007 या कालावधीमध्ये त्या या पदावर होत्या. आपल्या कार्यक्षेत्रातील अनेक टप्पे गाठत त्या पर्यावरणमंत्री झाल्या. जनतेने वंगारी मथाई यांनामामामीटीअर्थात वृक्षमाता ही पदवी दिली. दिनांक २५  सप्टेंबर २०११  ला त्यांचे निधन झाले. त्यांचे कार्य पर्यावरणात काम करणाऱ्या सर्वांना आदर्शवत असे आहे.

वास्तविक स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक सबळ, स्थिरचित्त आहे. प्राचीन  भारतात शंकराचार्याना हरविणारी पंडिता भारती सारख्या  वा सरस्वती आणि ग्रीसमध्ये अनेक तत्त्वचिंतक स्त्रिया होऊन गेल्या. लोपामुद्रा, विश्ववरा, शाश्वती, गार्गी, मैत्रेयी, घोषा आणि आदिती या स्त्रिया देवराज इंद्राच्या गुरू होत्या. सांख्य दर्शनातील प्रकृति, ज्ञानदेवता सरस्वती स्त्रीरूपिणी आहेत. आजही आपल्या देशातील आदिवासी समाज वनदेवतेला सर्वात महत्वाचा दर्जा देतात. कोणतेही संकट आल्यास वनदेवतेला नवस बोलून वा तिची मनधरणी करतात. संपूर्ण जगामध्ये विविध ज्ञाती, धर्म आहेत. आजही प्रत्येक जाती / धर्मामध्ये विविध सण-संस्कार पारंपरिक पद्धतीनेच साजरे केले जातात आणि यात स्त्रियांचा सहभाग नेहमी अधिक असतो. जगात आज विकासाच्या संदर्भात, महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरु झाली आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनात आजची स्त्री ही वीज वाचवण्याचा प्रयत्न, पाण्याचा कमीतकमी वापर, जमेल त्याचा पुनर्वापर, कचरा योग्य त्या ठिकाणी जाईल ह्याची काळजी घेणे, झाडे लावणे, स्थानिक  पर्यावरण अनुकूल उत्पादनांचा वापर, सी.एफ.एल. आदि उर्जा संवर्धन उत्पादने यांचा वापर, सूर्यचूलीचा /  सोलर / बायोगॅस दिव्यांचा वापर, नेहमीचा स्वयंपाक करताना थोडी समज दाखवून आपण रोज ५-६ लिटर पाणीबचत, डाळ, तांदूळ आणि भाजीपाला धुतलेले पाणी आणि फरशी पुसलेले पाणी फेकून न देता त्यांचा घरातील झाडांना वापर, बाजारपेठेत भाजीसाठी कापडी पिशवी सोबत नेऊन प्लास्टिकसाठी नकार (प्लास्टिक १०० वर्षांपर्यंत जमिनीखाली राहिला तरी त्याचे विघटनहोता जमिनीला नापीक मात्र हे प्लास्टिक करते) दरवर्षी किमान १० झाडे लावणे, फटाके न फोडणे याद्वारे आपल्या जागेवरून विशेष कार्य करू शकते. आपल्या प्राचीन संस्कृतीत स्त्री आणि वनस्पती यांच्या संबंधांचे सुंदर वर्णन आहे त्यानुसार, “शालवृक्ष हा स्त्री नजरेने बहरतो, “अशोक स्त्रीच्या नाजूकश्या लत्ताप्रहाराने बहरतो, “कुंदनागकेशर स्त्रीने आलिंगन दिले तर अधिक बहरतो, “प्रियडगुलता  स्त्रीस्पर्शाने फुलते. आपल्याकडे मधुमालती, कुंती, माधवीलता, शमी, सामलता, दुधियालता, वर्षादोडी, सोनामुखी, कामिनी, केतकी, मालकांगुनी, जाई, जूई, चमेली, कमल, कुमकुम, कुंदा, संजीवनी, गोकर्णा आदि बर्‍याच वृक्षवेलींना स्त्रिलींगी नावाने ओळखले जाते. शास्त्रज्ञांनी, आधुनिक तांदुळ, गहू, कपाशी पिकांच्या जातींमध्येही पद्मरा, जया, लक्ष्मी, मनोरमा, राजहंस, वरलक्ष्मी, जयालक्ष्मी, कल्याणी, नर्मदा ही स्त्रीयांची नावे वापरून स्त्री जातीचा गौरव केला आहे. आजच्या आधुनिक काळात सौंदर्य प्रसाधनांकरिता वनस्पतीचा वापर होत असल्यामुळे गव्हाळा, वाळा, कचोरा, सिकेकाई, पिंपळी, हळद, मसुरदाळ, माधुरी कपुरी, कडूनिंब, तुळस, अश्वगंधा, नागकेशर, जायफळ, गुलाब, दवणा, चरनचुर, जवस आणि वेळरोडा इत्यादिंची लागवड होवू लागली आहे. पूर्वी कृषी विद्यापीठामध्ये मुलींची संख्या जवळपास नसायची, आज मुलीही कृषी विद्यापीठामध्ये प्रवेश घेवून आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय  करायला लागल्या आहेत. यातील काहींनी कृषीरत्न पुरस्कारही मिळवले आहेत.

वर्तमानात, शेतीचा शोध स्त्रीयांनी लावला हे भारतीयच नाही तर जगभरातील पुराणशास्त्रज्ञ मान्य करतात. आश्विन मासारंभापासून देशात सुरु होणारा नवरात्रोत्सव आपल्या राज्यात घटस्थापना आणि कृषीमायेचा उत्सव म्हणून साजरा करतातयावेळी माजघरात घट बसवितात. यात शेताच्या शेजारी असलेल्या वारुळाची, नदीच्या कडेची , अथवा शेताच्या बांधावरची माती आणून त्यात विविध प्रकारचे धान्य पेरले जाते. भूमातेतून उदरातून हळूहळू उगवणा-या धान्याची पूजा हीदेवी म्हणून केली जाते. विजयादशमीच्या दिवशी हे उगवलेले धान शेतात नेऊन टाकतात. यामुळे शेतीची भरभराट होते आणि पिक मोठया प्रमाणात येतात अशी धारणा आहे. या धान्याशेजारी तांब्याच्या घट बसून रोज वेगवेगळी फुले, आणि विशेषत: कवडय़ांची माळ दिवा लावून त्याची पुजा केली जाते. परडी (तांदूळ, दाळ, पीठ, मिरची, कांदे, डाळ, तेल आदी ठेवलेली एक टोपली) आणि कवडय़ांच्या माळेला त्यात खूप महत्व असते. घटाची पूजा स्त्रीयांकडून केली जाते. देवीच्या आराध्यांकडून रात्रीला गायन आणि नृत्याचे कार्यक्रम साजरे केले जातात. गुजरातमधील गरबा हा एक त्याचाच प्रकार आहे, येथील काही भागात आदिवासी महिला आजही कृषीमायेचे ऋण गाणारे गीत गातात या साऱ्यातून आजही निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाचे काम घडते आहे. आज जगात जैवविविधता टिकवणं, शेतकरी स्त्रीला प्रतिष्ठा मिळवून देणं, सेंद्रीय शेती करणं आणि सध्याच्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेला कृषी विकासातून पर्याय देणं, आवश्यक आहे. पर्यावरणाचा ह्रा, हवामानातले बदल या सर्वांना प्रथमतः स्त्रीयांना सामोरे जावे लागते. शेतीचा मुख्य आधार स्त्रीयाच आहेत. लाणीपासून ते काढणीपर्यंतची अनेक कामे स्त्रीया करतात. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय स्त्रीया शेतीत मोठ्या प्रमाणात काम करतात. पर्यावरण अभ्यासक नंदिनी चव्हाण यांचे या विचारांना अनुसरून लिहिलेले, मुंबईच्या विकास अध्ययन केंद्राने प्रकाशित केलेले पुस्तक "वातावरणातील बदल आणि शेती - शेतकरी महिलांनी अन्नसुरक्षेसाठी केलेले प्रयास' हे शाश्वत विकासाचा अट्टाहास धरणाऱ्या चळवळीच्या बाजूचे आहे. इतर कोणत्याही पर्यावरणाच्या पुस्तकात अशा सामाजिक दृष्टिकोनातून केलेली मांडणी वाचायला मिळणार नाही.

कोकणातील देवराया, खाजगी जमिनीवर असलेली जंगले वाचविण्यासाठी, नव्याने जंगलं वाढवणे आणि पर्यावरण रक्षणासाठी डॉ. अर्चना गोडबोले या अप्लाईड एन्व्ह्यायर्न्मेंटल रिसर्च फ़ाऊंडेशन” (AERF) या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. वास्तविक पाहाता सन १९७० च्या दशकात सर्वप्रथम प्रा. वा. . वर्तक, डॉ. माधवराव गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील देवरायांचा अभ्यास सुरु केला. ही परंपरा नंतर डॉ. कुंभोजकर, डॉ. संजय देशमुख, डॉ. मधुकर बाचूळकर, डॉ. उमेश मुंडले यांनी पुढे नेली. वनस्पती नामकरणशास्त्र आणि मानव वनस्पतीशास्त्र या विषयात विशेष अभ्यास असलेल्या डॉ. अर्चना गोडबोले हे याच पंक्तीतील एक महिला नाव आहे. महाराष्ट्रात साधारणतः ३ हजार पाचशे देवराया आणि सातशे हून अधिक वनस्पती असल्याची नोंद या सर्व अभ्यासकांनी केलेली दिसते. डॉ. अर्चना या याच प्रश्नासाठी कधी कोकणात तर कधी जगभरात-अमेरिकेतील, जाणीवा जागृत असलेल्या नागरिकांच्यात संवाद साधत असतात. कोकणातील देवराया ही मानवी जीवनाला आधार देणारी एक संपूर्ण पर्यावरण व्यवस्था आहे. तिला मूठभर लोभी लोकांपासून वाचविण्यासाठी हे काम सुरु केले गेले.

अलीकडच्या काळात नाशिकच्या पर्यावरण संशोधक जुई पेठे यांनी नष्ट होणाऱ्या वनस्पती, जैवसृष्टीचा अभ्यास आणि जैवसंवर्धन याकरिता आदिवासींच्या साथीनेच त्यांनी स्वत:ला कामात झोकून दिले. यांच्या कामामुळे पश्चिम घाटातील नष्ट होऊ पाहणाऱ्या वनस्पती व जैवविविधतेला नवी संजीवनी मिळते आहे. पेठे यांनी कळसुबाई, हरिश्चंद्रगड परिसरातील आदिवासी पाडय़ांत फिरून, राखणरानात वणवण करून जंगलातील नैसर्गिक संपदेचे जतन या परंपरेचा अभ्यास केला आणि खुद्द  आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी त्यांच्या कामावर शिक्कामोर्तब केले आहे.  “राखणरान ही टंचाईकाळात गुरांच्या चाऱ्याची समस्या सोडविण्याची आगळी योजना असू शकते, हे आता शासनालाही उमगू लागले आहे. इगतपुरी आणि आसपासच्या आदिवासी पट्टय़ांत डांग गुरांची स्थानिक प्रजाती आहे. येथे  लोकपंचायत सामाजिक संस्था या प्रजातीच्या संवर्धनार्थ काम करते. त्याचा अभ्यास करताना राखणरानाची माहिती जुई यांनी समोर आणली. राखणरानाची संकल्पना पश्चिम घाटात कुठेही अस्तित्वात नाही. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरी ह्या  प्रस्तावित संरक्षित वनक्षेत्रावर साडेतीनशेहून अधिक वनस्पती असल्याचे त्यांना अभ्यासात स्पष्ट झाले. त्यातील निम्म्या वनस्पती पश्चिम घाटात आणि देशभरात आढळतात. ‘सिरोपेजिया अंजनेरिकाही जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही आढळणारी दुर्मीळ वनस्पती येथे आढळते. नाशिक जिल्ह्यतील रानभाज्यांच्या अभ्यासासाठी जुई यांना विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची शिष्यवृत्ती मिळाली. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात आदिवासींच्या मदतीने केलेल्या या सर्वेक्षणात त्यांनी ४६ पालेभाज्या, १२ फुले, ५१ फळे, १५ कंदमुळे व चार डिंकांसह १२० प्रकारच्या खाद्य- वनस्पती नोंदवल्या. एक स्त्री म्हणून जुई पेठे यांनी केलेले हे काम पर्यावरण संवर्धनाच्या विषयात मोलाचे आहे.                             

आईप्रमाणेच लहानपणापासून कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील शिरनेर गावच्या सुशिलाबाई  विठ्ठल  साबळे  यांचे पर्यावरण संवर्धनातील काम स्त्रीयोगदान स्पष्ट करण्यास पुरेसे आहे. 1972 च्या दुष्काळात त्यांनी कुटुंबासह  मुंबईची वाट धरली. कचरा वेचता वेचताच 14 व्या वर्षी त्याचं लग्न झाले. नवरा-बायकोत सतत  भांडणं  होऊ लागल्यामुळे त्यांनी माहेरीच राहूपुन्हा  कचरा वेचण्याचे काम सुरु केले. नंतर 1998  साली त्यांचा घाटकोपरच्या स्त्री मुक्ती संघटनेशी (www.streemuktisanghatana.org) संबंध आला.  त्यांनी कचरा वेचक महिलांच्या बचतगटाची स्थापना केली. यामुळे महिलांची सावकारी पाशातून मुक्तता झाली. संघटनेने 2004 साली या महिलांची ''परिसर भगिनी विकास संस्था''  ही स्वतंत्र संघटना स्थापन केली. स्थापनेपासून सुशिलाबाई अध्यक्ष असलेल्या या संघटनेचे आज जवळपास 3 हजार सदस्य आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी प्रेरणा दिली जाते. एल अँड टी कंपनीने या महिलांसाठी सुरु केलेल्या  दवाखान्यामुळे  गोवंडी, चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी, पवई येथील कचरावेचक महिला त्यांच्या कुटुंबियांना फार मदत होते. संघटनेने या महिलांना खत तयार करण्याचे, झाडे लावण्याचे, बाग तयार करण्याचे शिक्षण दिले आहे. यामुळे या महिलांना विविध गृहनिर्माण संस्थांमध्ये, रुग्णालयांमध्ये बागांची, खते तयार करण्याची कामे मिळून रोजगाराचे नवीन साधन मिळाले आणि कचरा वेचण्याच्या कामातून त्यांची मुक्तता होऊन त्या सन्मानाचे जीवन जगू लागल्या आहेत. सुशिलाबाईंच्या कामाची दखल घेऊन त्यांनाआंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदकरिता  2009 साली डेन्मार्क मधील कोपनहेगन, 2011 साली चीन मध्ये बिजिंग, दक्षिण आफ्रिकेत दरबान,  2012 साली ब्राझिल येथील रियो, 2014 साली थायलंड मधील बँकॉक येथे निमंत्रित करण्यात आले होते. तेथे त्यांनी कचरा वेचक महिलांचे काम पर्यावरण संवर्धनात किती महत्वाचे आहे, हे ठासून सांगितले होते.

उत्तरेकडे उत्तुंग बर्फाच्छादित हिमालय, दक्षिणेकडे शेवटचे टोक असलेल्या कन्याकुमारीपर्यंतचा विशाल सागरी किनारा, पूर्वेकडील अतिपावसाचा भाग, पश्‍चिमेकडील वालुकामय प्रदेश, मध्य भारतातील पठारे, डोंगर-दर्‍या, गंगा-ब्रह्मपुत्रेचे खोरे, पश्‍चिम घाट, विविध वनस्पती आणि जंगलांनी समृद्ध अशा या भूभागाचे देशाअंतर्गत आणि जगातील देशांना अगदी अतिप्राचीन काळापासून आकर्षण होते. पूर्वी भारताचा अनेक देशांशी वनांवर आधारित व्यापार होता. अरब, तुर्की, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि ब्रिटिश व्यापारी वनांवर आधारित पदार्थांच्या व्यापारासाठी भारतात येत होते. जगात विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आज पहिली कुर्‍हाड वन्यजीवांवर आणि वृक्षांवर पडते. वन्यजीवांची हत्या व तस्करी हा एक जगापुढे भीषण प्रश्‍न उभा आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे, निसर्गाचे भक्षण करण्यात सत्ताकारणी अग्रेसर आहेत. भोपाळ वायुगळती दुर्घटना 3 डिसेंबर 1984 रोजी पहाटे घडली आणि जगात सर्वत्र पर्यावरण जागृतीची  चर्चा घडू लागली. त्यानंतर चेनोर्बिल अणुभट्टी अपघात, एक्सॉन व्हॅलडेझ तेल गळती, ओझोन वायुकवचाला खिंडार, अ‍ॅसिड रेन, जागतिक उष्णतावाढ व एकंदरच औद्योगिक प्रदूषणात मोठी वाढ, लोकसंख्या विस्फोट, युद्धांनी जगभर केलेली माणसांची व निसर्गाची कत्तल हे प्रश्न पुढे आले होते. आज दारिद्य्ररेषेच्या थोडेबहुत वर असलेले समाज फार भयानक वेगाने दारिद्य्ररेषेच्या खाली लोटले जाणे हे नव्या सहस्रकातील सर्वात चिंताजनक आव्हान मानले गेले आहे. भाकरी महत्त्वाची की, आकाशातला चंद्र ? भुकेलेल्या गरिबाने फांदीवरचे फूल व फुलपाखरू जपावे की, स्वत:साठी चुलीचे सरपण मिळवावे ? हा सर्वात भयानक प्रश्न आहे. दुसरीकडे आपल्याकडे  मुळात पृथ्वी गरम होते आहे की गार होते आहे, ह्याच्यावरच दोन मते आहेत. प्रत्येक राष्ट्राने आपण पर्यावरणाचा विनाश किती जास्त करणार, ह्यावर मर्यादा घालून घ्यायची आहे. पर्यावरण दूषित झाल्यामुळे स्वयंपाकघरातल्या धूरामुळे (डोमेस्टिक स्मोक) आपल्याकडे ग्रामीण भागातल्या १० लाख बायका मृत्युमुखी पडतात असे आकडेवारी सांगते. राज्यापुरता विचार करता, महाराष्ट्राला टॅंकरमुक्त करण्यापूर्वी हंडामुक्त करण्याची गरज आहे. आज महाराष्ट्रात  ६७.% घरांना नळानं पाणीपुरवठा होतो. ११.% नागरिक पाणी शुद्ध करता पितात. १३.% लोकांना लांबून पाणी आणावं लागतं, ते प्रमाण मुंबईत .% तर वाशिममध्ये ३२.% आहे. राज्यात दोन­-दोन तीन-­तीन किलोमीटरवरून महिलांना पाणी आणावं लागतं. पाणी पुरवठा योजनांच्या नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण मूल्यमापन या महत्वाच्या टप्प्यांमध्ये स्थानिक जनतेच्या सहभागाचा अभाव हे मुख्य कारण आहे. याकरिता पाणीपुरवठा करणार्‍या पाणलोट क्षेत्रात पर्यावरण संवर्धनाची, वृक्षलागवडीची कामे हाती घेण्याची गरज आहे.

अनेकांपैकी एक, पुण्याच्या वसुधा सरदार गेली अनेक वर्षे सेंद्रिय शेती  या विषयात कार्यरत आहेत. आज सांगूनही खरे वाटणार नाही पण सन १९६० पूर्वी मुंबईत लोकं शेती करत असतं. त्यानंतर भारतात हरित क्रांती सुरू झाली आणि अधिक उत्पादन देणारी संकरित बियाणी, रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या वापरातून अन्नधान्य उत्पादन वाढण्याच्या नादात आपण जमिनीचा पोत बिघडवून बसलो. अर्थात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातल्या साऱ्या जनतेला खायला लागणारे पुरेसे अन्न आपणास आयात करावं लागत होतं. आंतरराष्ट्रीय राजकारणात लाचार बनवणार्‍या या स्थितीतून बाहेर येण्यासाठी हे तंत्र तेव्हा वरदान वाटलं. मात्र कालांतराने रासायनिक खते घालूनही उत्पादन कमी मिळू लागल्याच्या नोंदी होऊ लागल्या आणि यातील अभ्यासू मने विचारमग्न झाली. मनुष्यमात्राच्या जन्माच्याही कितीतरी काळपूर्वी  पृथ्वीतलावर वनस्पतीसृष्टी निर्माण झाली. विविधतेने बहरली. विविध जीव उत्क्रांत झाले. काही नष्ट झाले. नवे निर्माण झाले. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतामार्फत चालवल्या जाणार्‍या या जीवनचक्राची परिपूर्ण, स्वयंचलित, गोळीबंद, अशी एक यंत्रणा कार्यरत  होती. या निसर्गचक्राचा एक भाग असलेल्या मानवाने ती बदलली. कालातीत निसर्गचक्रात सर्व सजीवांचं अन्न तयार करण्याची जबाबदारी वनस्पतींवर होती व आहे. गेली हजारो-लाखो वर्षं ती निरंतर चालत राहिली. १८४० च्या सुमाराला जस्टस लायबिग या जर्मन शास्त्रज्ञाने वनस्पतींचं रासायनिक विश्‍लेषण करून त्यातील नत्र, स्फुरद, पालाश हे मुख्य आणि काही सूक्ष्म द्रव्यघटक शोधून काढले, हे घटक आपण बाहेरून पुरवले तर पिकांची जोरात वाढ होईल हा सिद्धांत मांडला आणि शेतीत रासायनिक युगसुरू झालं. ज्यातून नैसर्गिक प्रकियांत ढवळाढवळ आणि शेतकर्‍याचं शोषक बाजारव्यवस्थेवरचं वाढतं अवलंबन या दोन दुर्दैवी घटनांना प्रारंभ झाला. शेतीतून पिकलेल्या अन्नाचा अंगभूत दर्जा म्हणजे सकसता धोक्यात आली.

अभ्यासू वनसंरक्षक, पिता लाभलेल्या दिल्लीस्थित डॉ. वंदना शिवा या प्रसिद्ध भारतीय पर्यावरणवादी आणि जागतिकीकरण विरोधी, वीसहून अधिक पुस्तके, तीनशे हून अधिक लेख लिहिलेल्या लेखिका आहेत. आंतरराष्ट्रीय जागतिकीकरण फोरम फांऊडेशन (आयडीयास) स्पेन, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर पार्टीसीपेटरी सोसायटी आदींच्या त्या सदस्य असून देश विदेशातील विविध सरकारी-निमसरकारी संस्थांवर सल्लागार म्हणून त्यांनी लक्षणीय कार्य केले आहे. सन १९७० च्या जगप्रसिद्ध चिपको आंदोलनात त्यांचा सहभाग होता.जैवविविधता ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. प्रगत देशांनी १९९२ मध्ये स्वतःवर काही बंधने लादून घेण्याबरोबरच विकसनशील देशांना मदत करण्याचे मान्य केले होते. कार्बन उत्सर्जन पाच टक्क्यांनी कमी करण्याचे ध्येय त्या वेळी निश्चित करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात गेल्या वीस वर्षात अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये पंधरा टक्क्यांनी उत्सर्जनामध्ये वाढ झाली आहे. या देशांनी गुंतवणूक आणि आर्थिक प्रगतीचे प्रलोभन दाखवून कार्बन उत्सर्जन वाढविण्याच्या प्रक्रियेत भारतासह इतर देशांना ओढून घेतले आहे. विकसित देशात हरित अर्थव्यवस्थेला महत्त्व दिले जात असताना भारताने आपल्या परिसंस्थेकडे, जैवविविधतेकडे, लक्ष देण्याची गरज आहे, अशी भूमिका डॉ. वंदना शिवा यांनी सन २०१५ च्या पॅरिस मधील जागतिक पर्यावरण परिषदेच्या नंतर अलीकडेच पुण्यात एका कार्यक्रमात मांडली होती. पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी सन २००५ साली पद्मश्री पुरस्कार प्राप्त सेंटर फॉर सायन्स आणि एन्व्हायरनमेंट (सीएसई) या पर्यावरणविषयक काम करणा-या संस्थेच्या महिला महासंचालक सुनीता नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध केलेल्या कृत्रिम खनिजयुक्त पाणी (मिनरल वॉटर) आणि कार्बनयुक्त शीतपेयांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त कीटकनाशके वापरली जात असल्याच्या अहवालाचे पडसाद थेट संसदेतही उमटले होते. याच संस्थेच्याडाउन टू अर्थया पाक्षिकाच्या माध्यमातून पर्यावरणाशी संबंधित सगळय़ाच विषयांवर त्या पोटतिडिकीने चर्चा करत असतात. विविध विषयांवर लिखाण, व्याख्याने चर्चासत्रांतूनही पर्यावरण जागरूकतेसाठी त्या प्रयत्नशील असतात. प्रदूषकांविरोधात त्यांची लढाई सुरू असतानाच वर्षा जलसंचयनाचे (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रयोग त्यांनी देशभर राबवले आहेत. त्यांनी पाण्यावर लिहिलेल्यामेकिंग वॉटर एव्हरीबडीज बिझनेसया पुस्तकाला  पाण्यासंबंधी काम करण्यासाठीचे अत्यंत महत्त्वाचे असेस्टॉकहोम वॉटर प्राइजमिळाले आहे. मुंबई येथे जन्मलेल्या, पालकांच्या विचारांचा जडणघडणीवर खोल परिणाम झालेल्या पर्यावरणवादी जेष्ठ महिला  सामाजिक  कार्यकर्त्यां, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनीही पर्यावरण वाचविणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती संविधानानुसार देशातल्या प्रत्येक नागरिकाची, सामाजिक चळवळींची, जनआंदोलनांची आणि प्रसारमाध्यमांचीही जबाबदारी असल्याची आपली आग्रही भूमिका कायम मांडली आहे.

पर्यावरणवाद आणि स्त्रीवाद यातील संबंध अधोरेखित करणाऱ्या चळवळीला इकोफेमिनिझम म्हटले जाते. या अनुषंगाने आज आपल्याकडेही अनेक महिला कार्यरत आहेत. मुंबईतील राणीच्या बागेच्या वारशाला योग्य तो सन्मान मिळावा म्हणून शुभदा निखागेर, हुतोक्षी रुस्तमफ्राय, डॉ. शीला तन्ना, केटी बगली, हुतोक्षी आर्थना, रेनी व्यास यांनी सन २००७ साली लढा दिला होता. सन १९८६ पासून कार्यरत, झाडवाली बाई म्हणून संपूर्ण साताऱ्यात प्रसिद्ध असलेल्या संध्या चौगुले यांनी आजवर लावलेली तीस हजाराहून अधिक झाडे जगवली आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांना वनश्री पुरस्कार देऊन गौरविले आहे. बी.एच.एन.एस.च्या माध्यमातून कोकणात आणि पश्चिम घाट जैवविविधता संवर्धनात डॉ. संध्या प्रभू कार्यरत आहेत. तत्पूर्वी त्यांनी अरुणाचल प्रदेश आणि म्यानमार सीमेवरील दुर्गम मोन जिल्ह्यात त्यांनी तीन वर्षे जैवविविधता संवर्धनाचे काम केले आहे. उपरोक्त या महिलांच्या कार्यावर २०११ साली जागतिक पर्यावरण दिनी ‘महाराष्ट्र टाईम्स’ने प्रकाश टाकला होता. अडचणी कितीही आल्या तरीही चिपको आंदोलनापासून अगदी गावागावातील विविध पर्यावरणीय आंदोलनात स्त्रीयांचा लक्षणीय सहभाग राहिला आहे.

आपली जीवनदृष्टी ही पुरुष प्रधानतेतून स्त्रीचे स्वातंत्र्य संकुचित करणारी, स्त्रीवर अन्याय करणारी, स्त्रीपुरुष समानता मानणारी आहे, असा एक आक्षेप सातत्याने होत असतो. भोगवादी, आक्रमक पुरुषी अहंकार, जुळवून घेण्याची, नमते घेण्याची स्त्रीची स्वाभाविक प्रवृत्ती, शारीरिक  मर्यादा ही त्यामागील मुख्य कारणे आहेत. गत हजार वर्षांमध्ये अनेक कारणांनी स्त्रीला अवनत, गौण स्थान प्राप्त झाले आजही ती गोष्ट कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अनेक संदर्भांतून दिसते. त्यामुळे अनेक क्षेत्रात स्त्रीयांना आपला कार्यकारणभाव दर्शविण्यात मर्यादा येतात.  या मर्यादेवर मात करत पर्यावरण संवर्धन क्षेत्रात जगातील महिलांनी केलेले दखलपात्र कार्य संपूर्ण स्त्री-जातीसह मानवी समुदायास अनुकरणीय आहे, यातून आपण काही बोध घेतल्यास पर्यावरण संवर्धनात काही सकारात्मक केल्याचे समाधान आपल्यालाही प्राप्त करून घेता येईल.  


धीरज वाटेकर, चिपळूण.                                                                                                          

dheerajwatekar@gmail.com

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६

शतकपूर्व सुसंस्कृत कोकणचे वर्तमान आणि भविष्य


सातासमुद्रापार कोठेही न आढळणारी आपली संस्कृती, पारंपारिक वैशिष्ट्ये सांभाळणारे, मनुष्य जीवनाप्रती ओतप्रोत भरलेल्या कृतज्ञतेचे तत्त्वज्ञान जपणारे कोकण जसजसे जागतिक नकाशावर ‘अग्रेसर’ होऊ पाहते आहे तसतसे कोकणाकडे पाहाण्याचा अनेकांचा दृष्टीकोन बदलतो आहे. अगदी काल-परवापर्यंत कोकण सोडून पोटार्थ मुंबईसह जगभर गेलेल्या, कोकणाच्या नावाने नाके मुरडणाऱ्या तरुण मंडळींच्या मनातही आज जागतिक नकाशावर दिमाखात मिरवणारे कोकणघर करून बसू लागले आहे. कोकणी माणसे कोकणचा प्राधान्याने विचार करू लागली आहेत, त्यात तरुणांची संख्या उल्लेखनीयरित्या वाढते आहे. हजारो वर्षांची संस्कृती-परंपरा नांदलेल्या, आपल्या शतकपूर्व सुसंस्कृत कोकणचे वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल ठरणार असल्याची ही नांदी आहे.         

कोकण किनारपट्टीला पाच हजार वर्षापूर्वीपासूनचा इतिहास असल्याचे संदर्भ अनेक ठिकाणी आढळतात. प्राचीन ग्रंथामध्ये कुंकण, कुंकुण, कोनिय-कोई, तर काही ठिकणी केरळ, सौराष्ट्र, कोकण, करनाट, करनन, बर्बर असा सप्तकोकणचा उल्लेख आढळतो. रामायण, महाभारत आदी सुप्रसिद्ध ग्रंथामध्ये या प्रदेशाचा अपरान्त असा उल्लेख आढळतो. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात अपरान्ताचे वर्णन असून या प्रदेशात विपुल प्रमाणात पाऊस पडतो, असे म्हटले आहे. तापी, वैतरणेच्या सीमेपासून तर कधी भृगु-कच्छपासून कन्याकुमारीच्या टोकापर्यंत या प्राचीन अष्टागर भूमीची व्याप्ती आहे. बृहत्कथेत व कथा सरितत्सागरातील काही श्लोकांमध्ये कोकण, अपरान्त व चिंचणी (पालघर) बंदराचे उल्लेख आढळतात. सरित्सागरनुसार चिंचणी हे गाव उत्तरेतील पाटलीपुत्र हे राजधानीचे नगर वसण्यापूर्वीचे असले पाहिजे. म्हणजेच चिचणी बंदर हे पाच हजार वर्षापूर्वीपासूनच अस्तित्वात असले पाहिजे असे कोशकार डॉ. केतकर यांनी म्हटले आहे. कोकणातील बंदरांचा इतिहास अभ्यासल्यास मोर्य काळापासून ठळकपणे या परिसराचे उल्लेख लिखित स्वरूपात आढळतात. या बंदरांच्या सोबतच येथील बाजारपेठाही विकसित झाल्या, भरभराटीला आल्या. कोकणातील अनेक बंदरांचे व बाजारपेठांमधील वैभवाचे वर्णन त्या काळातील परकीय प्रवाशांच्या प्रवास वर्णनात विपुल आढळतात. बोरिवली येथील कान्हेरीच्या लेण्यामध्ये जलवाहतुकीची व नौकांची अनेक शिल्पे आढळतात. बोरिवलीच्या एक्सर गावातील विरंगळावर आरमारी जलयुद्धाची दृश्ये कोरलेली आहेत. काही प्राचीन नाण्यांवरही एक शिडाच्या, दोन शिडाच्या जहाजांच्या प्रतिमा आढळतात. आपल्या किनारपट्टीवर आढळणा-या प्राचीन बंदरांच्या परिसरातील बाजारपेठांमध्ये निरनिराळय़ा मालाची देवाणघेवाण करणारे व्यापारी कोकणातून अनेक मार्गानी घाट चढून देशावर जात असत व नाशिक, पैठण, कोल्हापूर यासारख्या ठिकठिकाणच्या प्रसिद्ध नगरातील बाजारपेठांमध्ये व्यापार करीत असत. कोकणात सातत्याने अनेक परकीय व्यापारी व भटक्या वाटसरूंनी भेटी दिल्या होत्या. त्यांनी या देशातील पर्यटनात आलेले अद्भुत वर्णन आपापल्या प्रवास वर्णनांमध्ये विपुल प्रमाणात केलेले आढळते. या परकीय प्रवाशांच्या वर्णनात कोकणातील अनेक बंदरांची माहिती आढळते. तोगरूम (देवगड), रेडी, वेंगुर्ले, मालवण, विजयदुर्ग, जयगड, चौल, दाभोळपासून चिंचणीपर्यंतच्या अनेक कोकणातील बंदरांचा उल्लेख या परकीय प्रवासवर्णनपर ग्रंथांमधून आढळतो. प्राचीन काळी वाहतुकीच्या साधनांमध्ये जलवाहतूक हीच सर्वात प्रभावी व जलद प्रवासाची सोय होती. शुर्पारक ऊर्फ सोपारा बंदराचा इ. स. पूर्व २५०० ते इ. स. पूर्व ५०० कालखंडात इजिप्त बाबिलोन देशांबरोबर व्यापारी संबंध होता.

कोकणी माणसाचा इतिहास आणि संस्कृती तपासण्यासाठी लोकसाहित्य, साहित्य, लोकगीते, लोककला हे सर्वात मोठे माध्यम आहे. ही अभिजात कलावंतांची रंगभूमी आहे. येथील माणसांनी दशावतार, भजन, संगीत, नाटय़, बाल्या डान्स, नमन, कलगीतुरा आदि अनेक लोककला-परंपरा पूर्वांपार जपल्या आहेत. सातासमुद्रापार पोहोचविल्या आहेत. आपल्याकडे दूरचित्रवाणी वरील मालिकांत जे तंत्रज्ञ (पडद्यामागचे कलाकार) आहेत, त्यातील बहुतांशी कोकणातील आहेत. मूळ कर्नाटकातला असलेला दशावतार हा नंतर कोकणात विस्तारला, त्याचा उदोउदो झाला. दशावतारला आजही चांगला दर्जा आहे. भजन संस्कृतीतही सिंगलबारी, डबलबारी ट्वेंटी-ट्वेंटी अशा अनेक प्रकारात भजने सादर होत आहेत. केवळ मनोरंजन म्हणून न पाहाता कलाक्षेत्राची आवड जोपासणारा तरुण वर्ग कोकणातला जास्त  आहे. सिंधुदुर्ग-पिंगुळीतील ‘ठाकर कला आंगण’ हे पर्यटक-प्रेक्षकांचे आवडते ठिकाण आहे. येथील कळसूत्री बाहुल्यांचे खेळ प्रसिद्ध आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शक्तिवाले, तुरेवाले, नमन, जाखडी नृत्य  ह्या कला मोठय़ा प्रमाणात आहेत. मुंबईसह बड्या शहरात यांचेही प्रयोग होतात. ह्या सर्व कला शतकानुशतके कोकणी माणसाने घराघरात जपल्या आहेत. मोबदल्याच्या विचार ना करता, कलेला दैवत मानणाऱ्या कोकणी माणसाने ह्या कला, हा वारसा जपलाय. कमी मानधनात काम करणारे कलावंत दुनियेत फक्त कोकणात सापडतात आणि संपूर्ण कोकण विकासाची ‘दिवास्वप्न’ दाखवणाऱ्या आमच्या लोकप्रतिनिधी-समाज प्रतिनिधींना मात्र यांचे दु:ख समजत नाही ही शोकांतिका आहे. साहित्याची जाण असलेली जागतिक कीर्तीची अनेक रत्ने याच कोकणाच्या मातीत जन्माला आली, त्यांनी जगाला आपल्या लेखनातून वैचारिक सकस खाद्य पुरविले. वि. स. खांडेकर, मंगेश पाडगावकर, विं. दा. करंदीकर, आरती प्रभू, कविवर्य वसंत सावंत यांसारख्या साहित्यिक मंडळींनी कोकणची शान वाढविली आहे.

कोकणातील माणसांची श्रद्धा डोळस आहे, तेवढीच जाज्ज्वल्यही आहे. या मातीतील ग्रामीण जीवनाचा गावपाडा हा आजही न्याय, नीती, धर्म अनुष्ठान लाभलेल्या गावह्राटीला अधीन राहून चालत आहे. गावह्राटीचे शतकपूर्व मूळ स्वरूप हे सात्त्विक व सोज्वळ होते. आज कालानुरूप यात बदल घडले आहेत, तरीही अनेक गावांनी आपली पारंपारिक वैशिष्ट्ये जपलीत. कोकण प्रांत मूळ द्रविड संस्कृतीचा प्रभाग असल्याने येथे विविध देवदेवता, पूजाविधी, प्रतिके यांचा प्रभाव दिसून येतो. विविध देवता, संप्रदाय, उपासना पद्धती, श्रद्धा यातून येथील सांस्कृतिक जीवनाची जडणघडण झालेली आहे. समाजातून संस्कृती आणि संस्कृतीतून परंपरेचा उगम होत असतो. या परंपरा आजही मनुष्य जीवनाला जगण्याचा भावनिक आधार प्राप्त करून देत आहेत. दैवी कुलाचार व कुलधर्म पाळण्यासोबत कोणत्याही कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी देवाचा कौल (गावपळण, यात्रोत्सव, देवतांचे उत्सव, गावाच्या चतु:सीमेतील विशेष कार्य) घेण्याच्या प्रथेतील ‘बारा-पाचाची देवस्की’ हे इथल्या गावह्राटीचे एक खास वैशिष्टय असून, कोणी काहीही म्हटले तरी ते आजही अनेक गावांनी सांभाळले आहे. बारा इंद्रिये व पाच पंचमहाभूते  म्हणजेच बारा-पाच अशी संज्ञा आहे. ‘कौलप्रसाद’ म्हणजे देवाचे न्यायालय होय. गावाच्या चतु:सीमेत राहणारे ग्रामस्थ, प्राणीमात्र, जीवजंतू यांचे परस्पर संबंधित व्यवहार-नाते सांगणारी ‘गावह्राटी’ अतिशय व्यापक, सर्वहितकर, विविध सूक्ष्मशक्तींना कार्यरत करणारी अतिशय  प्राचीन संकल्पना आहे. तळकोकणात हिचे आजही अभिमानास्पद प्राबल्य आहे. भौतिक सुखाची अति ओढ, संकुचित वृत्ती, वैयक्तिक लालसा, प्राचीन देवस्थानांची दुरवस्था, गावातील हेवेदावे, देवस्थान इनाम जमिनींचे न्यायालयीन प्रलंबित दावे आदी कारणांमुळे परंपरा अडचणीत आहेत, अशा काहीश्या सूर्यास्ती वातावरणात अनेक गावांत पणती प्रकाशते आहे, हे विशेष !   

जमीन-अंगण सारवणे आजच्या पिढीला कदाचित माहिती नसेल पण कोकणातील अनेक कृषी पर्यटन केंद्रात हे काम ‘उपक्रम’ म्हणून राबविले जाते. गायीच्या शेणाने केलेल्या सारवणाला पुराणात मोठे स्थान आहे. कणकवलीनजिक नागवे गावातील नागेश्वराच्या मंदिरात, नागरायासमोर दरवर्षी पौष महिन्यातील प्रत्येक सोमवारी माता-भगिनी जेव्हा पोहोचतात तेव्हा तेथे सारवण करण्याच्या वैविध्यपूर्ण परंपरा पाहता येतात. येथील मंदिरात नागेश्वरासमोर सारवण करून नवस फेडण्याची परंपरा केव्हापासून सुरू झाली असावी, याची मात्र निश्चित माहिती उपलब्ध नाही. शिमगा कोकणी माणसांना अधिक जवळचा सण ! शिमग्यात गावागावात सकाळी दारात सारवण पडले, सनई, पेपेटी, बासरीचा गजर झाला की दिवसभर खेळे, सोंग, निशाणं, पालखी,  संकासुर, गोमू, नमन, राधा यांचे आगमनाची सुरु ! रांगडा कोकणी माणूस शिमग्यात निशाण घेत पालखीचा भोई झाला की, अनवाणी, शाकाहारी, निर्व्यसनी राहत भक्तिपरंपरेचा पाईक बनतो. आमच्या दारात  निशाण किंवा पालखी आली की आमचं घरदार भाविकतेने तल्लीन होऊन जातं. निसर्गाची मुक्तहस्त उधळण, सागरकिनारे, बंदरे, किल्ले, लेणी, ऐतिहासिक ठिकाणे, गरम पाण्याची कुंडे, धबधबे, मंदिरे, जत्रा, देवतांचे उत्सव, विविध जाती-प्रजातींचे पशु-पक्षी, वैविध्यतेने नटलेला हिरवागार निसर्ग असूनही  येथील लोकांची कस्तुरीमृगासारखी झालेली अवस्था आता थोडी बदलते आहे. शहरी बकालपणाला कंटाळलेला, घडयाळयाच्या काटयावर धावून दमलेला-थकलेला, शरीरावरचा, मनावरचा ताण हलका करण्यासाठी आलेल्या प्रत्येक पर्यटकाला आज कोकणातील वेगळेपणा भावतो आहे. कोकणचा कोकणीपणा, इथली संस्कृती ही कोकणची खरी पर्यटन श्रीमंती आहे. मूळपणाला धक्का न लावता ती पर्यटकांसमोर आणणे गरजेचे आहे.

चैत्राची पालवी आणि वसंत ऋतूचे आगमन सुरु होताच निसर्ग रंगपंचमी खेळायला सुरुवात करतो. गावोगावी जत्रा-उत्सव सुरु होतात. कोकणात या जत्रा आणि त्यातील प्रथा खूप प्रसिद्ध आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील सुप्रसिद्ध म्हसाची जत्रा शाकंभरी पौर्णिमेपासून पुढे सात दिवस चालते. ऐतिहासिक काळात खुष्कीच्या मार्गाने अपरांत (कोकणप्रांत) ते घाटवाटेने देशावर जाण्यासाठी जे मार्ग होते, त्यापैकी सातवाहन काळातील एक प्रमुख राजमार्ग नाणेघाट हा येथून जवळ आहे. त्या काळी दळणवळणाच्या साधनात बैलांचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असे. त्यामुळे म्हसा गाव जत्रेत बैल खरेदी-विक्रीचे अथवा घाट चढून जाणाऱ्या नव्या दमाच्या बैलांच्या अदलाबदलीचे व्यवहार होत, आजही यात्रेनिमित्त जुन्नरपासून ते मुरबाडच्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी हे जपले आहे. शाकंभरी पौर्णिमेच्या चांद्रप्रकाशात अन्न शिजवले की त्यात औषधी गुण उतरतात, असे येथे म्हटले जाते. ठाणे हा आदिवासी जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. महानगरपालिकेत समावेश झालेल्या अनेक गावपाडय़ांतून बहुसंख्य आदिवासी राहतात. आदिवासी संस्कृतीत माता किंवा शक्तीची पूजा अतिशय महत्त्वाची आहे. वणीची सप्तशृंगी’, डहाणूची महालक्ष्मी’, माहुरची रेणुका’, यवतमाळची अंबा’, चंद्रपूरची भवानी’, भिल्लांची महाभोगीकिंवा मोगरादेवी’, महादेव कोळ्यांची वरसूबाई’, इत्यादी आदिमायेची स्थाने आदिवासी भागातच असून, आदिवासी जमातीची ती आराध्यदैवते आहेत. ठाण्यातील ओवळा गावात येऊरच्या डोंगरालगत असलेल्या आदिवासी पाडय़ातील चांमुडादेवीला शक्तिदेवता महाकाली किंवा पार्वतीचे रूप मानतात. वैशाखात तिची यात्रा भरते. आदिवासी आपले घर-अंगण सारवून त्रिकोण, चौकोन, वर्तुळातील उभ्या-आडव्या रेषा काढून स्त्री-पुरुष, पशु-पक्षी, डोंगर, नदी, झाडे, पाने, फुले, चंद्र-सूर्य यातून सृष्टीदेवतेचे चित्र रेखाटतात. या चित्रातून आदिशक्ती चामुंडादेवी प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते, ही कला पाहावी अशी आहे. कोदवली-राजापूरचे ग्रामदैवत श्रीदेव शंकरेश्वरचा कावडखेळ वैशिष्टयपूर्ण परंपरा आहे. हा खेळ अवघ्या महाराष्ट्रात दुसरीकडे पहाण्यास मिळत नाही. पुराणातील श्रावणबाळाच्या कावडीचा आणि या परंपरेचा संबंध नाही. पूर्वी कावडीचा उपयोग पाणी भरण्याचं साधन म्हणून केला जात असे. सुमारे पाचशे वर्षापूर्वी सिध्देश्वर बाबा गोसावी नामक सिध्दपुरूष या कावडीचा उपयोग श्रीदेव शंकरेश्वराच्या अभिषेकाला पाणी आणण्यासाठी करत असत. पुढे ही परंपरा ग्रामस्थांच्या श्रध्देचा आणि परंपरेचा भाग बनली. शिमगोत्सवात सजवलेली कावड आणि ढोलताशाच्या तालावर नाचवत सादर केले जाणारे नृत्य विशेष असते. मातृत्वाने भारलेल्या आपल्या संस्कृतीत काही गावात आजही संक्रांतीला, कुंभार बांधवांनी बनविलेल्या सुगडाची पूजा होते. सुगड म्हणजे सुद्धा छोटा घट. सूर्य एका राशीतून दुसऱ्या  राशीत जाणे म्हणजे संक्रमण, आणि सूर्य मकर राशीमध्ये जाणे म्हणजे मकर संक्रमण ! या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत महिला वर्ग एकमेकिंन सौभाग्याचे हळदीकुंकू लावून भेटवस्तू देण्याची परंपरा सांभाळून आहेत. ही परंपरा कोकणात शाळां-शाळांमध्येही मोठय़ा उत्साहात जपली जाते आहे.


कोकणावर इसवीसनपूर्व नंदघराणे, मौर्य, कलचुरी, आंध्रभृत्य, सातवाहन, त्रकुटक, वाकाटक, चालुक्य, कदंब, शिलाहार, यादव, सावंत-भोसले, छत्रपती श्रीशिवाजी महाराज, पोर्तुगीज, डच, पेशवे, इंग्रज यांनी राज्य केले आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि भटकळ ते भडोचपर्यंत प्रचंड उलाढालीच्या बंदरातून चालणारा व्यापार, परकीयांचा राबता या सर्वामुळ कोकणला प्राचीन इतिहास आहे. कोकणच्या संस्कृतीने निसर्ग व मानव यांचे नाते जपले आहे. निसर्गाशी असलेले नाते वृक्षदेवता, जलदेवता, वरुणदेवता, नागदेवता यांच्या रूपात पूजिले आहे. यक्ष आणि नाग या आपल्या पुरातन संस्कृती व मूर्तिकलेच्या विश्वात आजही महत्त्वाचे स्थान मिळवून आहेत. कोकण संस्कृतीच्या अभ्यासार्थ अनेक नामवंत इतिहास तज्ज्ञांनी संशोधन व भटकंती करूनही या संस्कृतीचे संपूर्ण गूढ आजही उलगडलेले नाही. कोकणात दगडी बांधकामे, शिखराची मंदिरे जवळपास नाहीत. तर मग श्रीक्षेत्र कुणकेश्वर, अंबरनाथचे शिवमंदिर, कसबा-संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिर ही अतिशय देखणी कोरीव, उंच शिखरे असलेली मंदिरे कशी आली ? अर्थात याची उत्तरेही त्या-त्या राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीत मिळतात. काळाच्या ओघात नष्ट होत गेलेले लिखित वाङ्मय, कागद, काष्ठ, मृदा माध्यम, पाषाण शिल्पे, शीलालेख, वीरगळ, ताम्रपट यातून संशोधक-अभ्यासकांचे श्रम काही प्रमाणात सार्थकी लागले आहेत. पण एकूणच हा सारा विषय आजही अभ्यासाचा आहे. भूतज्ज्ञांच्या मते, पृथ्वीच्या हजारो वर्षापूर्वीच्या ज्वालामुखीतून झालेला सह्याद्री आणि त्याच्या पठारावर ऐसपैस जांभा दगड पसरलेला आहे. कोकणच्या आजच्या वास्तू संस्कृतीत जांभ्या दगडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चि-याच्या भिंती म्हणजे कोकण, अशी ओळखच आज  बनली आहे. कोकणात पूर्वी दिसणारी नळ्याची कौले युक्त घरे गायब झाली, कौलारू घरे आली. मातीच्या भिंती इतिहास जमा झाल्या, आजतर कौलारू घरे दुर्मीळ होऊ लागलीत. ८०० वर्षापूर्वीची बांधकामे असोत किंवा अलीकडच्या वास्तूत चि-याच्या पाऊलखुणा मिळतात. विजयदुर्ग किल्ला याच दगडातून साकारला गेला आहे. कोकणातल्या अनेक ऐतिहासिक वास्तू आणि मंदिराना चि-यानेच आधार दिला आहे. आजच्या काँकीटच्या जंगलातही चि-यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोकणातल्या लालमातीतील अंगण जपणा-या वास्तुसंस्कृतीत आदरातिथ्यासाठी म्हणून विशेष जागा ‘परसदार’ पहावयास मिळते. या परसदाराच्या भिंतींना पूर्वी अडुळसा, करवंद, एरंड आदि वनौषधी लगडलेल्या असायच्या. हिरवळीची भिंत आणि वनौषधीची खाण असा तो साज असायचा.

कोकणातील पूर्वीच्या ‘ठाणेजिल्ह्याचे ठाणे आणि पालघर असे ऑगस्ट २०१४ साली विभाजन झाले. मुंबईला लागून असल्यामुळे आज या भागात प्रचंड आर्थिक विषमता आहे. संपूर्ण भागालाही स्वतःचा इतिहास आणि संस्कृती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जव्हार तालुक्यात मुकणे संस्थानाने विकास घडविला. वास्तविक पालघर पेक्षा जव्हार जिल्हा करणे अधिक सयुंक्तिक झाले असते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, रामभाऊ म्हाळगी, राम नाईक यांचीही तशीच भूमिका होती. पण राजकारण केवळ बुद्धिमत्तेवर चालत नाही, कालाय तस्मै नम:! श्रीमंत युवराज गणपतराव मल्हारराव मुकणे यांनी २७ जानेवारी १९०५ पासून जव्हारचा राज्यकारभार पहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात या परिसरात आदिवासी विकास, रस्त्यावरील धूळ घालवून पक्के रस्ते, विजेची समस्या, पाण्याची तहान भागवण्यासाठी बंधारे आदि विकास कामे मार्गी लावली गेली होती. जनताभिमुख सेवेसाठी इंग्रज सरकारने त्यांना किरोनेशन मेडलदेऊन गौरविले होते. 632 वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जव्हार मधील जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीच्या आठवणी जागविणारे शिरपामाळसनसेट पॉईंट, येथील आदिवासींची संस्कृती पाहाण्यासारखे आहे. इतिहासाचे साक्षीदार असलेले अनेक प्राचीन वाडे कोकणात आहेत, हे वाडे आजच्या पिढीला प्रेरणा देत असतात. ४०० वर्षापूर्वीचा २५०० चौ. फुटांवर उभा असलेला तीन मजली २७ खोल्यांचा रहस्यमय मांडणीचा प्रशस्त, प्रसन्नता, व शीतलता देणारा सिंधुदुर्ग किल्ल्यासारखा मालवणातील  भक्कम कुशेवाडा, मालदोलीतील मराठे यांचे वास्तुवैभव, ‘रात्रीस खेळ चाले’मधील वास्तू, नेरुरच्या चौपाटीवरचा वाडा अशा अनेक वास्तू सांगता येतील. या वास्तूंचा अभ्यास आपल्याला संस्क्रृती आणि परंपरा उलगडवून सांगतो.

कोकण गूढरम्य गोष्टींचे भांडार असून हा प्रदेश भुताखेतांचा म्हणूनही विशेष प्रसिद्ध आहे. भूतही संकल्पना खरी की खोटी ? हा वेगळा विषय आहे. अनेक वैज्ञानिकांनी या प्रकारांची मानसशास्त्रीय चिकित्सा केली आहे. धर्मकल्पनेच्या उदयाबरोबर या कल्पनेचा उदय झाला असावा, असे एक मत आहे. पण तरीही त्यातील रंजकतेचा कोकणातील लोकजीवनावर पगडा आहे, हे नक्की ! हजारो वर्षापासून भुतांच्या अस्तित्वासंबंधी खात्रीची भावना पिढय़ान्-पिढय़ा येथील समुदायाने बाळगली आहे. त्यांचा उद्भव, स्वभाव, संचार, इच्छेनुरूप विविध रूपे धारण करण्याची शक्ती, पीडा देण्याचे किंवा भले करण्याचे सामर्थ्य, निवासस्थाने, शक्ती मर्यादा, प्रसन्न करून घेण्याचे; हुकमतीत ठेवण्याचे उपाय, प्रतिबंध करण्याचे उपाय, त्यांच्यावरील नियंत्रण शक्ती या साऱ्याबाबतचे समज, रूढी व परंपरा यांचे फार मोठे विश्व आजही कोकणात आहे. असे विश्व जगातील अनेक पुढारलेल्या देशात आहे, तेथील प्राचीन दन्तकथात डोकावल्यावर आपल्याला हे सहज जाणवते. बुद्धिवंतांच्या मते,  कोकणातील भूतपिशाच्च एक ऐतिहासिक वास्तव आहे. याचे संशोधन व्हायला पाहिजे, ज्यातून अंधश्रद्धेस आळा बसून मोठय़ा सामाजिक समस्येवर उपाय देता येईल.

कोकणाने अनेक राजवटी पहिल्या. तरीही येथील स्थानिक जनजीवन गावह्राटीशी सुसंगत राहिले आहे. काळाच्या आक्रमणानंतरही अखंड टिकणारी संस्कृती-परंपरा ही त्या भूमीची गरज असते. तळकोकणात एक असे गाव नाही ज्या गावात शिवभक्त नाही, शिवलिंगाचे मंदिर नाही. पूजा-अर्चा करण्याच्या परंपरा वेगळय़ा आहेत. परंतु या मुलुखाने सर्वच देवस्थानांमध्ये आजही कडवे पावित्र्य जपले आहे. आपल्या कोकणी संस्कृतीच्या प्राचीन पाऊलखुणा अवतीभवती नांदत आहेत. त्या शोधून अभ्यासायला हव्यात, जुने संदर्भ नव्याने तपासायला हवेत. त्यातून अजून बराच प्राचीन वारसा पुढे येईल, आपल्या मातीचा आपल्याला वाटणारा हेवा अधिक सुगंध पसरवेल, कोकणी मनांना प्रसन्न बनवेल, जगण्याचे नवे तत्वज्ञान सांगेल.

धीरज वाटेकर (पर्यटन अभ्यासक)

dheerajwatekar.blogspot..com

पूर्वप्रसिद्धी  :  "कोकण मिडिया"  दिवाळी  अंक   २०१६   

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...