शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

अपरान्त साहित्य संमेलनाने घडविला बोलीभाषांचा जागर !

अपरान्त साहित्य संमेलनात
ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा
सत्कार करताना, बोलीभाषांचे अभ्यासक माधव भंड़ारी,
संमेलनाध्यक्ष प्रा. मिलींद जोशी,  संयोजक प्रकाश देशपांडे आदि.
कोणतीही भाषा ही मानवी समूहाच्या जगण्याचं चालीरिती-रूढींचंप्रथा-परंपरांचंश्रद्धांचं प्रतिबिंब वागवित असते. यातून त्या-त्या समाजाची संस्कृती प्रतिबिंबीत होत असते. या बाबी बदलल्यालोप पावल्या की संस्कृती बदलते. संस्कृती बदलली की भाषा बदलते अर्थात ती एकदम बदलत नाही, हळूहळू नकळत बदलते. याच नियमानुसारबोलीभाषा ही दर १२ कोसांगणिक उच्चारांतशब्दसंग्रहांतआघातांत व वाक्प्रचारांत बदलत राहाते. भाषेसोबत स्थानिक दगड, डोंगर,  माळ,  जमीन,  पाणी,  पिके,  अन्न व धान्याच्या चवी या सगळ्यात काही वेगळेपण दिसत असते. आणि त्याचा पुन्हा परिणाम भाषेवर नकळत होत असतो. या सर्व मुद्द्यांचा जिज्ञासू, अभ्यासक आणि जाणकार श्रोत्यांना विचार करायला लावणारे, जाणीवा समृद्ध करणारे, सर्वार्थाने आगळेवेगळे असे कोकणातील विविध बोलींवरील पहिले संमेलन नुकतेच ११ आणि १२ फेब्रुवारी २०१७ रोजी, प्रमाणभाषा बोलणाऱ्या चिपळूणात, येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या सयुंक्त विद्यमाने वक्ता दशसहस्त्रेषु प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. संमेलनात कोकणी मुस्लीम, आगरी, कादोडी-सामवेदी, मालवणी, कातकरी, चित्पावनी, दालदी, तिल्लोरी-संगमेश्वरी, खारवी, वारली या कोकण प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या, प्रमाणभाषेच्या गंगोत्रीतील दहा बोलीभाषांचा जागर झाला. मराठी प्रमाणभाषेचं मूळ उगमस्थान असलेल्या कोकणात, कोकणच्या सांस्कृतिक राजधानीत, ‘संमेलनांचे शहर’ म्हणून आपली राज्यभर आपली ओळख प्रस्थापित करणाऱ्या चिपळूणात पार पडलेल्या या संमेलनाचा आढावा...!

सन १८३१ साली, पुणे संस्कृत महाविद्यालयाचे मुख्याध्यापक मेजर थॉमस कँडी आणि जेम्स थॉमस मोल्जवर्थ यांनी पहिला मराठी-इंग्रजी शब्दकोश प्रकाशित केला. पुण्यातल्या सदाशिवपेठेत बोलली जाणारी भाषा ही  प्रमाणभाषा म्हणून त्यावेळी पुढे आली. महाराष्ट्रात या भाषेतून सर्व व्यवहार होत असले तरीही ठिकठिकाणी आजही मोठ्या प्रमाणात बोलीभाषा बोलली जाते, कोकणातही तिचे प्रमाण लक्षणीय आहे, आणि हे सारे आपल्या संस्कृतीचे संचित आहे. कारण भाषा आणि संस्कृती सतत हातात हात घालून नांदतातबदलतात. कोंकणी ही भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरीलकोकण पट्ट्यात बोलली जाणारी भाषा आहे. महाराष्ट्र, कर्नाटकाचा किनारपट्टीचा भाग आणि गोवा येथे ती प्रामुख्याने बोलली जाते. कोकणी लिहिण्यासाठी, कर्नाटकातकानडी तर गोवा आणि महाराष्ट्रात देवनागरी लिपीचा वापर होतो. गोव्यात रोमन लिपीसुद्धा वापरतात. केरळातील कोकणी लोक हे मल्याळी लिपी वापरतातकोकणी मुसलमान अरबी लिपी वापरतात. गोव्यात कोकणी आणि मराठी या भाषांना राज्यभाषा म्हणून मान्यता आहे. कोकणी ही एकसंध बोलीभाषा नसून तिच्यात एकूण आठ प्रकार गणले जातात. गोव्यात बोलली जाणारी गोव्याची कोंकणीही त्यांपैकी एक असून तिच्यातही ख्रिश्चनांची कोंकणी व हिंदूंची कोंकणी असे दोन प्रकार आहेत. ख्रिश्चनांच्या कोंकणीवर पोर्तुगीज भाषेचा असर आहे. महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्रात बोलली जाणारी कोकणीही वेगळी आहे. याशिवाय मालवणी, चित्पावनी, वारली, काणकोणी,डांगी आदि अन्य बोलीभाषा या  कोंकणीच्या बोली उपभाषा आहेत. तर काही बोली भाषिकदृष्टीने एकमेकींपासून इतक्या भिन्न आहेतकी त्यांचा एकाच समूहात अंतर्भाव करणेही चुकीचे ठरते. यातील दहा बोलीभाषेतील वेगळेपणा जाणून घेण्याचा प्रयत्न या संमेलनातून झाला.
संमेलनाचा प्रकट उद्घाटन सोहळा, कालभैरव मंदिर प्रांगणात ख्यातकीर्द विधिज्ञ मा. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते, संमेलनाध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, स्वागताध्यक्ष आणि विविध कोकणी बोलीभाषांचे जाणकार अभ्यासक माधव भंडारी, बूकगंगा डॉट कॉम संचालक मंदार जोगळेकर (अमेरिका), नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, लोकमान्य टिळक स्मारक मंदिराचे अध्यक्ष अरविंद जाधव, उपाध्यक्ष प्रकाश काणे, कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. संमेलन संयोजक प्रकाश देशपांडे यांनी, अपरान्त साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बोलीभाषांच्या सहकार्याने मराठी भाषा सर्वार्थाने समृद्ध करण्याचे काम केले जात आहे जात असल्याची भूमिका मांडली. उद्घाटन समारंभापूर्वी सकाळच्या सत्रात कोकणी बोलीभाषा या विषयावरील चर्चासत्र, कवीसंमेलन, कथाकथन संपन्न झाले.

खटला चालवताना बोलीभाषेचा उपयोग - उद्घाटक मा. उज्ज्वल निकम

आज लेखककवीसाहित्यिकांना बोलीभाषेतील शब्दांचे सामर्थ्य कळले आहे. बोलीभाषेतील संवादामुळे माणूस जाणून घेण्याची ताकद निर्माण होते. आम्ही कायद्याची माणसे आहोतकायद्याची भाषा बोलतो. मात्रसाहित्यिकाला काळजाची भाषा कळते. वकिली हा जादूचा खेळ नाही. कायद्याने कसे जगावे ? याचा अर्थ आम्ही जगाला सांगतो. मात्रसुंदर जगण्यासाठी कायदा लागत नसूनते साहित्य शिकवते.सृष्टीतलावरील सर्वात मोठी निर्मिती म्हणजे माणूस ! त्याला लाभलेली वाणी आणि शब्द हे वरदान आहे. बोलीभाषा हा व्यक्त होण्याचा एक मार्ग असून त्यामुळे आपल्या मनातील विचार स्पष्टपणे प्रकाशित होतात. बोलीभाषेची शैलीत्यातील हुंकार जीवनाला वेगळा आनंद देणारा आहे. यास्तव अशा बोलीभाषांचे जतन होणे काळाची गरज आहे. आपण भाषा व बोलीभाषेविषयी शुद्धअशुद्ध असा गैरसमज करून बसलो आहोत. आपण म्होरं जा म्हटलं तर अशुद्ध मानतो आणि मात्र म्होरक्या हा शब्द शुद्ध मानतो. कोकणातील माणूस स्वतःला कोकणी म्हणवतो आणि बाहेरच्याना घाटीम्हणतो. या पार्श्वभूमीवर, बोलीभाषेचे संवर्धन हा विचार मनात आल्यानंतर त्यासाठी साहित्य संमेलन भरवणे महत्वपूर्ण आहे. प्रमाणभाषा शुद्ध आणि बोलीभाषा अशुद्ध असा भेदभाव अनेकदा साधला जातो. परंतु प्रमाणभाषेइतकेच बोलीभाषेला महत्त्व असून ते मराठी भाषेला राज्यातील विविध बोलीभाषांनीच मिळवून दिले आहे. वकिली क्षेत्रात काम करताना या गोष्टींचा नेहमीच बारकाइने विचार करावा लागतो. अनेकदा खटला चालवताना बोलीभाषेचा उपयोग होतो.

भाषा टिकविण्यासाठी प्रयत्न हवेत ! – स्वागताध्यक्ष माधव भंडारी

अपरान्त म्हणजे पश्चिमेकडचा प्रदेश. हा प्रदेश गोदावरीपासून सुरू होतो आणि केरळजवळ संपतो. पुराणानुसार अपरान्ताची निर्मिती भगवान परशुरामाने केली. चिपळूण ही आता संमेलन नगरी झाली असून यंदाच्या डोंबिवलीतील अखिल भारतीय संमेलनानेही चिपळूणच्या संमेलनाच्या आठवणी पुसल्या गेल्या नाहीत, असे भंडारी म्हणाले. एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे जातानाही बोलीभाषेत बदल घडतो. कोकणात हा फरक प्रकर्षाने जाणवतो. भाषा बदलण्याचा वेग फार कमी असतो, भाषा स्थिर असते. बोलीभाषा बदलण्याचा वेग मात्र मोठा असतो. पूर्वी गावदेवाला गाऱ्हाणे घालताना बोलीभाषेतील विविधता जाणवत असे, आजही जाणवते. बोलीभाषेतील सवयी आणि विविधता समजून घेणे आवश्यक आहे. अशा भाषांची नोंदही आवश्यक आहे. अलीकडे मूळ मराठी भाषेलाही धक्का पोहचू लागला आहे. आपल्या मुलांना मराठीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने महिलावर्गही यास तितकाच जबाबदार आहे. ३५० वर्षांपूर्वीच्या इंग्रजीमुळे 800 वर्षांपेक्षा अधिक इतिहास असलेली आपली मराठी भाषा पुढील दीडशे वर्षे टिकवणेही कठीण बनले आहे. बोलीभाषा ही काही कोसांवर बदलत असते. तसेच ती पुढील पिढीतही बदलते. ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे.

कोकणातील मुस्लीम बोली - खासदार हुसेन दलवाई
बोलीभाषेमुळे प्रमाणभाषा अधिक समृद्ध होते. समाजाची संस्कृती रेखाटण्यासाठी बोलीभाषांचे जतन आवश्‍यक आहे. बोलीभाषेवर अधिक अभ्यास आणि संशोधन होण्याची आवश्‍यकता आहे. बोलीभाषेत अनेक लेखकांनी कादंबऱ्या लिहिल्या. मराठी किती प्रगल्भ आहे याची संवेदना लक्ष्मण माने यांच्या कैकाडी बोलीभाषा असलेल्या ‘उपराकादंबरीत दिसते. आपल्याकडे महिलांनी विविध बोलीभाषा जतन करण्याचा अधिक प्रयत्न केला आहे. पूर्वी सुफी लोक बरेच समान धार्मिक कार्यक्रम करायचे. आपल्याकडील सारे पीर सुफी आहेत. समाजात आजही बोलीभाषा स्त्रिया बोलतात. मुस्लीम बोलीत ‘ड,र,ल,व,श’ हे शब्द वापरत नाहीत. कोकणी मुस्लीम पूर्वांपार नाविक होता, आजही आहे. 
 कादोडी-सामवेदी - इग्नेशिअस डायस वसई
वसईतील लोकांवर अनेकदा मराठीचे दडपण आले तरी त्यांनी कादोडी-सामवेदी बोलीचे अस्तित्व जपण्याचा प्रयत्न केला. येथील अनेक लेखकांनी कादोडी बोलीभाषेतून लिखाण केले. आजचे तरुण फेसबुकवरून कादोडीत लिखाण करुन ती समृद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. वसई भागातील १२ गावात ही बोली आजही बोलली जाते.
कुडाळी-मालवणी बोली - प्रा. पंढरीनाथ रेडकर
कुडाळी-मालवणी बोलीला विशेष गोडवा आहे. मच्छिंद्र कांबळीश्री. ना. पेंडसे आदींनी मालवणी बोलीला अधिक समृद्ध होण्यासाठी योगदान दिले. ‘‘आपला ठेवा झाकान आणि दुस-याचा बघा वाकान’’‘‘ज्येच्या मनात पाप तेका पोरा होतत आपोआप’’, ‘‘रोग रेडय़ाक आणि औषध घोडय़ाक’’ किंवा ‘‘जेचा जळतातेका कळता’’ अशा इथल्या विविध म्हणींचा बोलीत पुरेपूर वापर आपल्याला आढळून येतो. मालवणीत विहिरीला ‘बाव किंवा बावडी’ म्हणतात,असे अनेक शब्द आहेत. या मालवणी बोलीभाषिक माणसाशी गप्पा मारणे हा विलक्षण अनुभव असतो. आपली रोखठोख मतं आपल्या बोलीत स्पष्टपणे मांडताना मालवणी माणूस आपल्याला दिसतो. विनोद, खवचटपणा, तिरकसपणा, फिरकी आदि सारेकाही असलेल्या मालवणीची गम्मत यावेळी सर्वांना अनुभवता आली.
आगरी बोली - प्रा. एल. बी. पाटील
आगरी बोलीमुळे आपल्याला आयुष्याची खोली कळली म्हणणाऱ्या पाटील यांनी, वर्तमान काळात आगरी लोकांमध्ये झालेला बदलत्यांचे राहणीमानशेतीकामातील गाणीटोमणे मारण्याच्या पद्धतीपोवाडे आदि आगरी बोलीत सादर करीत चर्चासत्रात रंगत आणली. बोलीभाषेतील गीतांतून कोणताही विषय सहज मनाला भिडतो.


कातकरी बोली - किर्ती हिलम

कातकरी समाज ही आपल्या समाजाचा घटक आहे. उद्याचा विचार करण्याची मानसिकता नसल्याने त्यांचे आणि त्यांच्या पुढच्या पिढीचे मोठे नुकसान होत आहे. समाजात शिक्षणाचे प्रमाण अवघे ३ टक्के आहे. जंगलात राहून सतत भटकणाऱ्या कातकरी समाजाचे चित्र हिलम यांनी सर्वांसमोर उभे केले. हा समाज संरक्षणासाठी जंगलात राहायचा. तिरंदाजी आणि नेमबाजीत यांचे प्राबल्य असल्याने यांना पूर्वीपासून बागेत कामाला ठेवले जाई. अस्वच्छ असल्याने यांना वानर प्राणीही घाबरतात, निसर्गालाच हा समाज देव मानतो. पूर्वीच्या समाजात पान-सुपारी खाण्याचे प्रमाण खूप होते. यासाठी लागणारा कात निर्माण करण्याची भट्टीतील कष्टप्रद प्रक्रिया लीलया पार पाडणारा तो ‘कातकरी’. आजही हा समाज भित्रा आहे. तो पोटाची भूक भागविण्यासाठी दारूकडे वळला. समारंभात आजही पुरुष दारू आणि स्त्रिया मादी पितात. लग्न आणि बारसे हे या समाजातील मोठे सण असून यावेळी केल्या जाणाऱ्या ‘बांगडी’ नाचातील गीते यावेळी सादर करण्यात आली.      

मालवणी बोली - प्रा. पंढरीनाथ रेडकर

मालवणी ही दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. हेल काढून आलेले अनुनासिक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. सुप्रसिद्ध दशावतार या नाट्याचे सादरीकरण या भाषेतच केले जाते. कै. मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी नाटकांमुळे ही भाषा जगभर प्रसिद्धी पावली. झिल (मुलगा)चेडू (मुलगी)घोव (नवरा) आदि भरपूर बोली शब्द सामर्थ्य मालवणी बोलीत आहे.


गोव्याच्या गझलकार राधा भावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बोलीभाषा कवीसंमेलनात सेलिब्स डिसुझाराजेंद्र बर्वे, रंजना केणीदादा मडकईकरअरुण इंगवले,महंमद झारेसुनील कदमकैसर देसाई, प्रा. एल. बी. पाटील, प्रा. पंढरीनाथ रेडकर, मिलिंद डिसुझा यांनी विविध बोलीत कविता सादर केल्या, सूत्रसंचालन प्रा. कैलास गांधी यांनी केले. तर प्रा. पंढरीनाथ रेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथनात राजेंद्र बर्वे यांनी चित्पावनी बोलीतसॅबी परेरा यांनी सामवेदी बोलीत,संतोष गोणबरे यांनी तिल्लोरी बोलीतमनाली बावधनकर यांनी खारवीबोलीत कथा सदर केल्या. सूत्रसंचालन प्रसिद्ध कथालेखक श्रीराम दुर्गे यांनी केले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी बोलीभाषांवर चर्चासत्र संपन्न झाले.

चित्पावनी बोली - प्रा. विनय बापट गोवा

चित्पावनी ही चिपळूणातील बोली आहे, आज ती इथे कमी बोलली जाते. परंतु चित्पावनी ब्राम्हण येथून जिथे जिथे गेले तिथे ही भाषा गेली, तशी ती कोकणात, सिंधुदुर्गात, गोव्यात, उत्तर कर्नाटकात (उडपी कारवार) दरम्यान पसरली. चिपळूण प्रमुख घटक असलेली प्राचीन मराठीशी जवळीक साधणारी भाषा आहे. पुराणातील भगवान परशुरामाने १४ व्यक्तींना कोकणात आणून वसविले या कथेचा संदर्भ या समाजाला आहे. या समाजाचा बोलीनुरूप आज शोध घेणे म्हणजे विहिरीत सुई शोधण्यासारखे आहे. ही भाषा टिकवून ठेवणे आपल्याच हाती आहे. या बोलीत गोव्यातील कोकणी, प्रमाणमराठीतील शब्द आहेत. जात-स्वभावाशी निगडीत ही बोली आहे. प्राची ण मराठी भाषा आणि आपल्या बोलीभाषा यांत साम्य आहे. सांस्कृतिकदृष्ट्या विचार करता गोवा कोकणपासून वेगळा करता येणार नाही, असे आग्रही प्रतिपादन बापट यांनी केले.     


दालदी बोली - डॉ.  निधी पटवर्धन रत्नागिरी

दादली अथवा दाल्दी ही मुस्लीम समाजातील एक जात आहे. इ.स. ७-८ व्या शतकात जे अरब लोक भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थायिक झाले, त्यांचे हे वंशज शाफी पंथाचे सुन्नी मुस्लीम आहेत. या समाजात रत्नागिरी शहराच्या खाडीपट्ट्यात (मिरकरवाडा, भाटकरवाडा, राजीवडा, कर्ला ते सोमेश्वर, भाट्ये, जुना फणसोप, गोळप, पावस, पूर्णगड, गावखडी) दालदी बोली बोलली जाते. हे लोक मात्र या बोलीलाकोकणी बोली” म्हणून संबोधतात. मराठी, उर्दू, हिंदी, कोकणी, अरबी-फार्सी या भाषांतील शब्द मिश्रणाने ही बोली बनलेली आहे. लहान वा तरुण मुला-मुलींना हाक मारताना यावसमवयस्क स्त्रीयांना गेगो’, वयाने-मानाने मोठ्या व्यक्तीस ‘ओ’ अशी संबोधणे वापरतात. एखाद्याची प्रसंशा करताना ‘लय चुकट’ हा विशेष शब्द वापरतात. प्रमाण मराठीत आपण ‘छे छे’ असे बोलतो तर यासाठी दालदीत ‘श्या श्या’ म्हणतात. निश्चय करणे-कानाला खरो लावणे, गावभर फिरत राहाणे-गाव पालवने, खूप बडबड करणे-चामारयाचा तोंड असने, मस्ती करणे-ताल करत रवने, फुटके नशीब असणे-नशीबाची हाडा होणे, उर्मटपणा करणे-टकल्यावर चरने, काहीही काम नसणे-मासक्या मारत रवने असे शब्द प्रयोग केले जातात. आपल्या फायद्याच्यावेळी बरोबर हजर असणे यासाठी ‘काय नाय खबर, वाटनीला बराबर’ किंवा वाजवीपेक्षा खर्च जास्त करणे या करिता ‘खातय दानो करतंय उदानो’ असे दालदी भाषेत बोलतात. थोडेबहुत सानुनासिक उच्च्चारही बोलतात. हिकरे (इकडे), झार (झाड), वाटानो, कानपो, चिमचो, टिपको आदि. आश्चर्य म्हणजे रत्नागिरी शहरातच राजिवडा आणि कर्ला या जेमतेम कोसभर अंतरात याच बोलीतील काही शब्द ‘करुचा-केरूचा’, ‘खालू-खलय’ असे बदलतात.                 

तिल्लोरी संगमेश्वरी बोली - अरुण इंगवले

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधक बोलीभाषा म्हणून 'संगमेश्वरी बोली'चा उल्लेख केला जातो. या बोलीभाषेचा वापर कोकणचा सांस्कृतिक ठेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नमनखेळे आणि जाखडी नृत्यात पूर्णतः केलेला आहे. ‘गावंडी’बोली असे हिणकस बोलले गेल्याने या बोलीचे प्रचंड नुकसान झाले. परंतु इंगवले यांनी या बोलीतील सुमारे ७ हजार शब्दांचे संकलन करून या भाषेची ताकद अभ्यासकांसमोर आणली. या बोलीचा उद्भव हा द्रविडीयन आहे, या बोलीवर संस्कृत प्रभाव नसावा. ही बोली म्हणजे कुणबी समाजाचा जमिनीखाली दडविलेला खजिनाच आहे. तो पुढे यायला हवा. आज इंग्रजीतील शब्द या बोलीत समाविष्ट जाले आहेत, ते सहजरीत्या बोलले जातात. जुन्या पिढीला शब्द माहित असून ते सांगितले जात नाहीत. ही बोली बोलताना एखाद्याच्या आदर सन्मान करताना ‘नु’ प्रत्यय जोडला जातो, उदा. तात्यानु, दादानु. कोड्यात बोलणे हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. एखाद्याच्या प्रश्नाला प्रति प्रश्नाने उत्तर देणे ही या बोलीची खासियत होय. याची काही नमुनेदार उदाहरणे यावेळी सदर करण्यात आली.


खारवी बोली - प्रा. मनाली बावधनकर

खारवी ही कोळी समाजातील एक पोटजात आहे. हा समाज फारसा पुढारलेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावरील २६ गावांत ही बोली बोलली जाते. सतत गुहागरनजिक असगोली गावात ७० टक्के समाज आहे. आजच्या पिढीत भाषा बोलण्यात भयगंड आहे. ‘मासळीबाजार भरलाय’ यातील मतितार्थ आपल्याला या समाजाच्या मासळी विक्री भागात गेल्यावर कळतो. आजही हा समाज जेवणासाठी मातीच्या भांड्याचा वापर करतो. यांचे पुरुष बराचसा वेळ बोटीत असल्याने फारसा सामाजिक संबंध नाही, स्त्रियांचा सामाजिक संबंध मासेविक्रीच्या माध्यमातून भरपूर आहे. बोलीतील बोलण्यात माधुर्य आणि गोडवा असलेल्या या बोलीत मोठ्या प्रमाणात म्हणींचा वापर केला जातो. प्रमाण भाषेचा जराही सूर हा समाज आपल्या बोलीत मिसळताना दिसत नाही. गोव्यात खारवी क्षत्रिय मराठा म्हणून यास ओळखले जाते.   

वारली बोली – हरेश्वर वनगा

४७ अनुसूचित जातीतील वारली ही एक जात आहे. त्यांची बोली ती ‘वारली बोली’ होय. आजही हा समाज वनात राहतो. दगडाला ‘धोंड’ तसेच पोयरा-पोयरी, बाबाला ‘बाप्पा’, विळ्याला ‘कोयती’ असे म्हणणारा हा समाज आहे. या समाजात पुरुषांऐवजी आजही स्त्रिया लग्न लावतात, प्रसंगी विधवा स्त्रिया चालतात. असे सांगून वनगा यांनी व्यासपीठावरून सर्वांसमोर वारली मंगलाष्टक म्हटले, ज्यातून सर्वानाच त्या बोलीचा गोडवा जाणता आला. समाजाची तीर्थस्थाने आजही भूयारे आणि वनस्पतीत सापडतात. हिमादेव, भीमदेव अशी यांच्या देवतांची नावे होत. हा समाज आजही अंधश्रद्ध आहे. शिक्षित अधिकाऱ्यांना घाबरून हा समाज आजही लांब पळतो. अडीच हजाराहून अधिक शब्द या बोलीच्या आज संग्रही आहेत. बोलीतील पूर्वीचा गोडवा आज नाही या स्पष्टीकरणार्थ त्यांनी दोन पिढ्या पूर्व आणि वर्तमानात एकच गीत गाऊन दाखविले. पूर्वी हेल काढून बोलली जाणारी वारली बोली आज कालौघात एका पट्टीत बोलली जात आहे.     
      

या चर्चासत्रानंतर ऋजुता खरे यांच्या संकल्पनेतून गो. नि. दांडेकर जन्मशताब्दी वर्ष२०१६विशेष ‘साहित्य अभिवाचन कार्यक्रम’ संपन्न झाला. गोनिदांच्या लेखणीतून साकारलेल्या रानभुलीतील ‘मनी’, जैत रे जैत मधील ‘नाग्या आणि चिंधी’, माचीवरचा बुधा, शितू आणि मृण्मयी आदि विविध कादंबऱ्यामधून रेखाटलेल्या   विविध मानवी व्यक्तिरेखांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम झाला. कोकणातील बोलीभाषांचा बाज पकडणाऱ्या या कादंबऱ्यांच्या वाचनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. अभिवाचनात श्रीकांत कानिटकरस्नेहल जोशीसंगिता जोशीश्रीकांत करमरकरअंजली बर्वेसुमंत केळकर यांनी सहभाग घेतला. संमेलनाचा समारोप प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला.

वाड्मयीन संस्कृतीची जोपासना गरजेची : संमेलनाध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी
 पूर्वीच्या संस्कारांच्या वातावरणावर आज मॉल, मुव्ही, मोबाईल संस्कृतीने आक्रमण केले आहे. आपल्या सभोवताली काय चालले आहे ते समजून घेण्यासाठी इतरांचे साहित्य वाचेले पाहिजे. परंपरा समजून घेतल्या जायला हव्यात. चिंतन करायला हवे. यातून लोकांच्या मनात भाषाविषयक आकर्षण निर्माण होऊन  वाड्मयीन संस्कृतीची जोपासना होईल. या सम्मेलनांसारख्या छोट्या-छोट्या संमेलनांना राज्यभर राजाश्रय मिळाला तर नव्या पिढीत शब्दांचे आकर्षण निर्माण होईल. साहित्य ही शब्दांची आतषबाजी नसून ती मानवी जीवनाची उपासना आहे. प्रतिभेच्या नव्या कवडश्यांना व्यासपीठ देण्याचे काम चिपळूणात होत आहे. दर्दी रसिकही चिपळूणात आहे. प्रस्थापितांना शेंदूर लावण्याच्या दुनियेत, नवीन कसदार निर्माण होत नाही ही ओरड चुकीची असून माणस घडविण्यासाठी नव्या जुन्याचा संगम घडायला हवा. समाजासाठी आणि साहित्यासाठी वेळ दिला तरच सर्जनशील कामे घडतात. पूर्वी कुटुंबातला एकतरी माणूस वाचनालयाचा सदस्य असायचा, घराघरात वाड्मयीन संवाद साधला जायचा, आज परिस्थिती बदलली आहे. शालेय मुलांची जीवनशैली इतकी व्यग्र बनवून टाकली आहे की त्यांना अवांतर वेळच मिळत नाही. माध्यमांनीही समाजाला जे हवय ते देण सुरु केल्याने, कृत्रिमता वाढली आहे. तंत्रज्ञानाचा वेग वाढला तरी सर्जनशीलता-नवनिर्मिती यातून घडत नाही, त्यासाठी अनुभवाचे विश्व व्यापक असावे लागते. आपण ज्या ठिकाण-कालखंडातील लेखन करतो आहोत, तेथील जुने संदर्भ नव्याने तपासायला हवेत तरच कसदार लेखन शक्य आहे. दुभंगलेली मन आणि विस्कटलेली नाती सांधण्याचे काम साहित्य करू शकेल, त्यासाठी भाषा पोटातून यायला हवी. आज आपल्याकडे माहितीपर साहित्याचे वाचन वाढले आहे. वृत्तपत्रांतून पुस्तक परिचय लिहिणाऱ्यांना आज समीक्षक मानले जाते आहे. हे कुठेतरी थांबवायला हवे, यातून समीक्षेचेच नुकसान होते आहे, असे जोशी म्हणाले. सर्वोत्कृष्ट समिक्षाणासाठीचा ‘लोटिस्मा’चा यावर्षीचा पुरस्कार यावेळी अध्यक्ष अरविंद जाधव यांच्या हस्ते प्रा. मिलिंद जोशी यांना प्रदान करण्यात आला. ‘लोटिस्मा’चे उपाध्यक्ष प्रकाश काणे यांनी यावेळी पुढील वर्षी कृतज्ञता संमेलन घेण्याचे जाहीर केले. 

मध्यंतरी पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियातर्फे (पीएलएसआय) भाषा सर्वेक्षण प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पातून हाती आलेल्या निष्कर्षांवर आधारित भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण हा डॉ. गणेश देवी संपादित खंड २०१३ मध्ये प्रकाशित झाला. यात बोलीऐवजी रूपे हा शब्द जाणीवपूर्वक वापरला गेला. भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण करताना महाराष्ट्रामध्ये एकूण ५६ भाषा आणि बोलीभाषा बोलल्या जातात,असं या पाहणीत आढळलं. आपल्या कोकणातील फक्त एका गावात तर नोलिंगनावाची भाषा बोलली जाते, हे सत्य याच सर्वेक्षणाने पुढे आणले. जगातील बोली-भाषावैभवाने समृद्ध असलेल्यांत, ७८० बोली-भाषांसह आपण अग्रणी आहोत. परंतु तरीही आपल्याकडील बोलीभाषा झपाटय़ाने नष्ट होत आहेतहे वास्तवही  यातूनच पुढे आलेलं आहे. वास्तविक पाहाता बोलीभाषेतील ग्रामीणपणा मराठी भाषेची प्रतिष्ठा, प्रमाण आणि ताकद वाढवितो. हा सारा पसारा हे आपले खरेखुरे वैभव आहे. त्याच्या संवर्धनासाठी प्रमाण भाषा बोलणाऱ्या कोकणच्या सांस्कृतिक राजधानीत, चिपळूणात लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने यशस्वी केलेल्या  अपरान्त साहित्य संमेलनाने बोलीभाषांच्या संवर्धनाला बळ प्राप्त झाले हे नक्की !

धीरज वाटेकर

http://www.konkanalerts.com/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8/

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

दिव्यांगांच्या समस्यांबाबत अधिक संशोधनाची गरज

गावकुसाबाहेर...धीरज वाटेकर...१

आपल्याला जन्मतःच शारीरिक दिव्यांग समस्या असली तरी तिच्यावर धैर्याने मात करू पाहणाऱ्या जिद्दी दिव्यांगांच्या नशिबी कितीही प्रयत्न केले तरी हालअपेष्टा, आणि भयानक कष्टप्रद जीणे नशिबी येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या समस्यांबाबत आजही शासनस्तरावर कितीही दर्जेदार योजना राबविल्या जात असल्या तरी त्याच्या अंमलबजावणीतील अडचणी, अनास्था पाहाता शारीरिक विकलंगत्वाबरोबर मानसिक विकलंगत्वही येत असते यास्तव आजही या विषयात अधिक संशोधनाची गरज जाणवते आहे.

कोकणात, चिपळूणात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कनिष्ठ दिव्यांग राज्यस्तरीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. या निमित्ताने दिव्यांगांच्या सामुहिक समस्या पुन्हा सामोऱ्या आल्या, त्याचे चित्र फारसे आशादायी नाही. शिवछत्रपती पुरस्कार विजेते, महाराष्ट्र परा अथलेटिक्स असोसिएशनचे सचिव प्रवीण उघडे आणि रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश करा यांनी उघड खंत व्यक्त केली. रिओ ऑलिम्पिकमध्ये सदृढ स्पर्धकांच्या तुलनेत अधिक पदक मिळवून देणाऱ्या या समूहाकडे पाहण्याचा समाजाचा उदासीन दृष्टीकोन आणि राजकारण आजही त्यांना उपेक्षेचे जीणे जगायला भाग पाडतो आहे. गल्लीतील उपक्रमांना भारीय सहकार्य करणारा आपला समाज या समूहाच्या अशा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांना मात्र प्रायोजकत्व देताना त्यांचे दातृत्वच गायब होत असल्याचा अनुभव आहे. हा प्रकार खेळाडूंच्या बाबतीत असेल तर सर्वसामान्य दिव्यांगाना कोणत्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतं असतील ? कल्पना करवत नाही.                  

आजही देशात अजुनही विविध प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये अंध, अपंग तसेच मतीमंदांना निकषानुसार सामावून घेतले जात नाही. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे  दिलेल्या  आदेशानुसार सर्व सरकारी कार्यालयांमध्ये दिव्यांग व्यक्तिंना तीन टक्के आरक्षण देणे केंद्र सरकारला बंधनकारक आहे. पदभरतीच्या सर्व प्रक्रियांमध्ये हे आरक्षण लागू राहील, असंही यात सांगण्यात आलं आहे. मात्र या आदेशाची कशा पध्दतीने अंमलबजावणी होते, हे अधिक महत्त्वाचं आहे. या समूहाकडे मानवतेच्या दृष्टीकोनातून पाहण्याची नसणारी मानसिकता हे सर्वात मोठे कारण आहे. अपंग, मतीमंदांना समाजाकडून सतत उपेक्षेची वागणूक मिळते आहे. वास्तविकत: अशा व्यक्तिंना समान संधी तसंच त्यांच्या हक्कांचं संरक्षण या संदर्भात कायदा अंमलात येऊन अनेक वर्षे लोटली आहेत. तरीही परिस्थितीत फरक पडलेला नाही. मध्यंतरी तर कार्मिक मंत्रालयाने सन 1997 आणि 1995 मध्ये काढलेल्या दोन परिपत्रकांनुसार, वर्ग अ आणि वर्ग ब अंतर्गत येणाऱ्या जागांवर दिव्यांग व्यक्तिंना तीन टक्के आरक्षणाचा फायदा देण्यास नकार दिला होता, नंतर हे अवैध असल्याचं न्यायालयाला स्पष्ट करावं लागलं होत. अनेक ठिकाणी कोणतंही व्यंग नसणाऱ्या इतर व्यक्तींप्रमाणेच अपंग, मतीमंद व्यक्ती काम करू शकतात. परंतु यावर समाजाकडून विश्वास ठेवला जात नाही. अपंग, मतीमंद व्यक्तिंना आपली क्षमता सिध्द करण्याची संधीही दिली जात नाही. त्यामुळे हा समाज आजही वंचित आहे. आपल्या पश्चात आपल्या मुलाचं काय होणार ? ही चिंता दिव्यांगांच्या आई-वडिलांना सतत भेडसावत असते. नोकरी हा यावर उत्तम पर्याय आहे. सर्वसाधारण वर्गातील कामगारांकडून होणाऱ्या कामचुकारपणाच्या तक्रारी आपण ऐकतो. तुलनेने अपंग, मतीमंदांचा कामातील प्रामाणिकपणा, मेहनत या बाबी उल्लेखनीय आहेत. देशातील प्रत्येक उद्योगात अंध, अपंग, मतीमंद आदि दिव्यांग वर्गातील किमान दोन व्यक्तिंना नोकरी मिळाली तरी या वर्गातील हजारो व्यक्ती स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. सिंगापूर सारख्या देशात आई-वडीलांच्या मृत्यूनंतर अशा व्यक्तींच्या पालनपोषणाची जबाबदारी सरकार घेते आपल्याकडे हे घडण्यास लोकसंख्येचा मोठा अडसर आहे. अशा व्यक्तिंना जुजबी अथवा तात्पुरती मदत देण्यासाठी हक्काचं काम देणं, स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या संधी देणं हे सरकारचं, उद्योजकांचं समाजाचं कर्तव्य आहे. परंतु त्याकडे सामाजिक समस्या म्हणूनच पाहिलं न जात असल्याने आजही कितीही शासकीय योजना केल्या तरी या वर्गाची उपेक्षा कायम आहे.
आज सामान्य मुलांच्या शाळेत २ ते ५ टक्के अपंग मुलांना शाळेत प्रवेश दिला जातो हे प्रमाण वाढायला हवे ज्यातून मुलांना दर्जेदार शिक्षण तर मिळेलच परतू त्यांच्या मानसिकतेवरही चांगला परिणाम होऊ शकतो. सन २०११ च्या जनगणनेनुसार भारतात दिव्यांगांची संख्या एकूण लोकसंख्येच्या २.२१ टक्के आहे. यात पुरुष २. ४१ टक्के, महिला २.०१ टक्के आहेत. जम्मू-काश्मीर, सिक्कीम, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या राज्यांत दिव्यांगांची संख्या अधिक आहे. देशाचा अलीकडचा इतिहास पाहता दिव्यांगांकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. सन १८७२ ते १९३१ या काळात जनगणनेत दिव्यांगांची गणना होत असे. सन १९४१ ते १९७१ या काळात झालेल्या जनगणनांमध्ये दिव्यांगांची गणनाच झाली नाही. सन १९८१ मध्ये दिव्यांगांच्या बाबतीत काही प्रश्न विचारले गेले. सन १९९१ मध्ये वगळण्यात आले. अलीकडे  सन २००१ व २०११ मध्ये त्यांची गणना झाली. जगात एकूण लोकसंख्येच्या पंधरा टक्के लोकसंख्या कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाने बाधित आहे. या दिव्यांगांच्या अधिकारांबाबत संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर भारताने सन २००७ मध्ये स्वाक्षरी केली आहे. केरळने  सन २०१४-१५ मध्ये दिव्यांगांची स्वतंत्र जनगणना केली. केवळ दिव्यांगांची स्वतंत्र जनगणना करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले. यात त्यांनी अतिशय व्यापक स्वरूपात २२ प्रकारचे अपंगत्व तपासले. या प्रकारे दिव्यांगांची दखल सरकारी आणि सामाजिक पातळीवर घेतली गेल्यास आपल्यातील हा ३ टक्के उपेक्षित समाज सार्वत्रिक जीवन जगू शकतो !

















मंगळवार, २४ जानेवारी, २०१७

जलसाहित्य संमेलनातून जलप्रबोधनास चालना !


जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ,
स्टॉकहोम वॉटर प्राईज विजेते
डॉ. माधवराव चितळे 
कोकणच्या सांस्कृतिक राजधानीत, चिपळूणात, स्व. भवरलालजी जैन नगरीत, कृषिभूषण स्व. रणजित खानविलकर व्यासपीठावर, भारतीय जलसंस्कृती मंडळाचे दहावे जलसाहित्य संमेलन नुकतेच दिनांक १३, १४ आणि १५ जानेवारीला संपन्न झाले. येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे नेटके आयोजन, त्याला जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ, स्टॉकहोम वॉटर प्राईज विजेते डॉ. माधवराव चितळे यांच्यासह महाराष्ट्रभरातील अभ्यासू तज्ञांची मार्गदर्शक साथ आणि जिज्ञासू श्रोते यांच्या उपस्थितीपूर्ण त्रिवेणी संगमाने, जलसमस्या, जलसंवर्धन व जलसाक्षरता या संबंधातील जलप्रबोधनास चालना मिळाली. जलदुर्भिक्ष्य्यावर कोकणातही जलशिक्षणाच्या माध्यमातून कायमस्वरूपी जलजागृती चळवळ उभारण्याची आवश्यकता या संमेलनातील विचार मंथनातून-चिंतनातून पुढे आली, त्या आश्वासक संमेलनाचा धावता आढावा...!     

हवामानखात्याच्या मान्सूनबद्दलच्या अंदाजाकडे बघण्याचा सामान्यांचा वर्तमान सकारात्मक दृष्टीकोन हा आज परिस्थितीत झालेला स्वागतार्ह बदल असला तरी वाढत्या प्रदूषित वातावरणात दरवर्षीच्या पर्जन्यमानाचा नेमका व अचूक अंदाज बांधणे हे दिवसेंदिवस कठीण बनले आहे. आजही उन्हाळा सुरू झाला की राज्यभरातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरून तीव्र पाणीटंचाईच्या बातम्या आपले लक्ष वेधून घेतात. दरवर्षी उन्हाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रात पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवतात. पूर्वी हे भयाण संकट ग्रामीण भागापुरते मर्यादित असे परंतु अलीकडे हे लोण शहरी भागातही फार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. बिकट पाणी परिस्थितीने राज्याला ग्रासले असताना जेथे धुंवाधार पाऊस कोसळतो अशा कोकण प्रदेशातही पाणीपुरवठ्यासाठी सर्वाधिक टँकर्सचा वापर करण्याची वेळ शासनावर आल्याने आगामी गांभीर्य आणि  विसंगती याबाबत अंतर्मुख होवून परिणामकारक योजना राबविण्याची गरज ओळखून येथेही पाणी या विषयावर चिंतन करण्याच्या दृष्टीने हे संमेलन झाले. पाण्याच्या बाबतीत केवळ शासनावर १०० टक्के विसंबून राहून चालणार नाही. जनसामान्य म्हणून आपलेही काही प्राथमिक कर्तव्य असते. मोठ्या प्रमाणात विविध क्षमतेची धरणे बांधून जलसंचयाची जबाबदारी शासनाची असली तरी छोटी शेततळी, विहीरी बांधून जलसंचय करणे व वाढविणे, पर्जन्यसंचयासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या वैयक्तिक स्तरावरील योजना राबवून भूजलपातळीत वाढ करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी ठरते आहे. पाऊस मुबलक असताना त्याचे यथायोग्य जलव्यवस्थापन आणि तो नसताना उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने योग्य वापर ही काळाची गरज आहे. निसर्गातील वेगवेगळ्या घटकांची काळजी घेत पर्यावरणासाठी वेगवेगळी माणसं जगभर लढत आहेत. जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ, स्टॉकहोम वॉटर प्राईज विजेते डॉ. माधवराव चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या निवृत्तीच्या कालखंडात भारतीय जलसंस्कृती मंडळ, सिंचन सहयोग व सरोवर संवर्धिनी या तीन संस्था स्थापन झाल्या. पैकी भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी हे जलसाहित्य संमेलन होते. पाण्याला केंद्रित करून भारतीय जलसंस्कृती मंडळ कार्यरत आहे. पाणीटंचाई गंभीर झाल्यानंतर उपाययोजनांसाठी अरूण्यरूदन करण्यापेक्षा टंचाईच निर्माण होऊ नये यासाठी लोकसहभागाच्या योजनांची खरी आवश्यकता ओळखून संमेलनात मार्गदर्शन करण्यात आले.

जलसाहित्य संमेलनाला जलदिंडीने प्रारंभ झाला. दिंडीत भारताच्या विविध खंडातील नद्यांच्या पाण्याचे २५ जलकुंभ सहभागी झाले होते, तर जलदिंडीच्या पालखीत सिंधू व वाशिष्ठी नदीचे पाण्याचे कुंभ ठेवण्यात आले होते. झांज पथकातील ढोलताशाचा जागर, पालखी, मराठमोळे पेहराव, सहभागी झालेले जलसाहित्यप्रेमी, पाणी बचतीचा संदेश देणारे विद्यार्थी अशा प्रसन्न वातावरणात दिंडी यशस्वी झाली. दिंडीत पाणी म्हणजे जीवन हेच आपले स्पंदन, आस धरा कास धरा पाणी बचतीचा ध्यास धरा, नवीन पिढीचा नवा मंत्र कमी पाण्यात ज्यादा सिंचन क्षेत्र, स्वच्छ गाव शुध्द पाणी आनंदाची खरी पर्वणी, उपयोगात आणू सांडपाणी परसबाग फुलवू अंगणी, थोडे सहकार्य थोडे नियोजन पाणी फुलवी आपले जीवनआदि घोषवाक्यातून जलजागृतीचा संदेश देण्यात आला.

लातुरातील भीषण पाणीटंचाईमागे मानवाच्या चुका आहे. तेथे एक दिवसाआड पाणी दिले जाते. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी मांजरेचे पात्र १६ कि.मी. मोकळे केले गेले. मोठी यंत्रणा त्यासाठी कार्यरत झाली. अवघ्या आठ कोटींमध्ये हे काम झाले. ३० बुलडोझर रात्रंदिवस काम करीत होते. आम्ही काम केले, पण कुणी पावत्या मागितल्या नाहीत. पारदर्शकपणे काम केले. रोजच्या कामाचे हिशेब व्हॉट्सअपवर प्रसारित केला जाई. यास्तव चांगले काम शक्य झाले, लोकसहभाग वाढला, असे संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अशोक कुकडे यांनी नमूद केले. राज्यात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. कोकणात जोरदार पाऊस असतो पण पाण्याचे दुर्भिक्ष्यही  असते. कोकणातील जमीन पाण्याचा निचरा करणारी आहे. धो धो पडणार्‍या पावसाचे पाणी अडविता आले तर उन्हाळ्यातील पाणीटंचाईची समस्या दूर होईल. ही समस्या थांबवायची असेल तर उच्च तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल, असे मत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री ना. अनंत गीते यांनी या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. उद्घाटन समारोहास रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, संमेलनाध्यक्ष डॉ. अशोक कुकडे, जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.दत्ता देशकर, आमदार सदानंद चव्हाण, जैन इरिगेशनचे विपणन प्रमुख अभय जैन उपस्थित होते.

कोकणातील शेतकऱयांपुढे खाडीलगत असणाऱया शेतजमिनीत खारे पाणी जावून शेती नापिक झाली आहे. या समस्याग्रस्त शेतकऱयांसाठी नाम आता कोकणावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे मत नाम संस्थेचे प्रतिनिधी राजाभाऊ शेळके, गणेश थोरात व समीर जानवलकर यांनी नोंदवले. इतरांना सल्ला देण्यापेक्षा आपणहून स्वत: पुढाकार घेऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबाला मदतीचा हात देत त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना स्वहक्काचे जीवन जगता यावे आणि त्यांचे खचलेले त्यांचे आयुष्य पुन्हा उभे रहावे या सामाजिक जाणिवेतून चाललेल्या नामच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला.

कोकणात पाऊस भरपूर पडत असून कोकणात दुष्काळ पडण्याची शक्यता नाही. एप्रिल-मे महिन्यात कोकणातील काही भागात पाण्याचा तुटवडा जाणवतो मात्र संपूर्ण महाराष्ट्राशी तुलना करता त्याची तीव्रता कमी आहे, अशी भूमिका महाराष्ट्र सिंचन परिषदेचे अध्यक्ष डॉ. दि. बा. मोरे  यांनी मांडली. राज्याच्या एकूण सरासरीच्या ४६ टक्के पाऊस कोकणात पडतो. आणि कोकणाचे राज्याच्या तुलनेत एकूण क्षेत्रफळ १० टक्के आहे. कोकणाची पाणी साठवणूक क्षमता ६-७ टक्के आहे. ती वाढविल्यास कोकणाचा पाणी प्रश्न आणि इतर अनेक विकासाचे प्रश्न सुटतील. कोकणाची भौगोलिक स्थिती कोकणातही एक सारखी नाही. त्यामुळे त्यामुळे कोकणात भौगोलिक स्थितीनुसार विचार करून लहान, मोठे, मध्यम आणि साखळी पद्धतीचे बंधारे बांधून पाणी अडवावे लागेल, असे मोरे म्हणाले. कोकणातील डोंगरात बांधबंधिस्तीद्वारे जलसाठवणूक यशस्वी करणारे विनय महाजन म्हणाले, पावसाचे एक इंच कोकणातील पाणी डोंगरावरून वाहून जायला जितका वेळ लागतो, त्याच्या ५० पट अधिक वेळ तेच पाणी डोंगरात झिरपून वाहायला लागतो. आपण कोकणात उघड्यावर कोकणात पाणी साठवले तर ३० टक्के पाण्याची वाफ होते. कोकणात बंधारे बांधताना ब्लास्टिंग करणे कसे योग्य नाही हे त्यांनी मांडले. पूर्वी आपल्याला कोकणात पाणी पुरायचे आज ते पुरत नसल्यामागे आपण जलसाक्षर नाही हे कारण असल्याचे महाजन म्हणाले. जलतज्ज्ञ विजय जोगळेकर यांनी सांगितले की, कोकणातल्या जमिनीखाली भरपूर कातळ आहे. महाराष्ट्राच्या इतर भागातील पद्धतीनुसार येथील प्रश्न सुटणार नाहीत. नाला रुंदीकरण-खोलीकरण येथे चालणार नाही. कोकणात एकूण २२ प्रमुख डोंगररांगा आहेत, त्या कळल्या म्हणजे कोकणाचे प्रश्न समजून घेता येतील. कोकणातील सहा हजार गावे डोंगरालगत आहेत. येथे ६५ हजार वाड्या–वस्त्या आहेत, वाडीश: वस्ती आहे. फारसे डोंगर एकमेकांना जोडलेले नाहीत. सन १९६५ पूर्वीपर्यंत चिपळूणला कापसाळच्या धरणाने पाणी पुरविले. त्यानंतर कोयना प्रकल्प झाला. कोकणातील ज्या भागात आज पावसाचे पाणी भरते ती सगळी पूर्वी बंदरे होती. गाळाने भरल्याने येथील खाड्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी पडते. यास्तव कोकणात गरजेनुसार पाणी अडविण्याच्या पद्धतीत बदल करून त्या वापराव्या लागतील. कोकणात पाणी मुबलक आहे पण साठवणूक नाही. बरोबर कोकणात यशस्वी शेती पद्धतीचीही वानवा असून ती विकसित करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. पाणी वापर तंत्रज्ञान वापरून आपण यशस्वी शेती करू शकतो, असेही यावेळी जोगळेकर म्हणाले. चेतन गोगावले-उल्हास पवार यांनी कायम दुष्काळी तालुका असलेल्या पुरंदर तालुक्‍यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या पिंगोरी गावातील तलावाच्या यशस्वी पुनर्भरण होण्यामागील वापरलेल्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.

आपण पित असलेल्या शुद्ध पाण्याच्या तपासणीची ४० शास्त्रीय परिणामे आहेत. सर्वसाधारण स्तरावर जल शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या तुरटी, क्लोरीन आदि घटकांच्या निर्मितीतही खूप प्रदूषण होते. त्यामुळे सरसकट साऱ्या पाण्याचे शुद्धीकरण न करता पिण्यासाठी आवश्यक पाण्याचे शुद्धीकरण तर इतर पाणी तसेच वापरुन मोठा खर्च आणि प्रदूषण आपण वाचवू शकतो अशी भूमिका निसर्गस्नेही जीवनपद्धती या विषयावरील परिसंवादात संशोधक डॉ. प्रमोद मोघे यांनी मांडली. पिण्याच्या पाण्यात अति तुरटी वापरल्यास साधारणतः १० वर्षांनंतर स्मृतीभंश आजार बळावतो. ८० टक्के शारीरिक रोग पाण्यामुळे होतात. आपण दैनंदिन ज्या जीवनशैलीचा वापर करीत आहोत त्यामुळे त्यामुळे शहरात माणशी ४० आणि गवत २०-२५ ग्राम प्रतिदिन केमिकल पाण्यात मिसळले जाते, हा सारा प्रकार निसर्गस्नेही जीवनपद्धतीच्या नेमका उलटा सुरु आहे, असेही ते म्हणाले. पुण्याच्या जीवित नदी संस्थेच्या मंजुषा ओक यांनी यावेळी घातक-रसायन-विरहित जीवनशैली या बाबत मार्गदर्शन केले. आपल्याकडे आज नदी ही फार मोठी समस्या बनली आहे. नदीतील ७०% पेक्षा जास्त प्रदूषणाचा वाटा घरातून जाणार्‍या सांडपाण्याचा आहे. घरातून जाणारे सांडपाणी दैनंदिन घरगुती उत्पादनातील घातक रसायनांमुळे प्रदूषीत होते. टूथपेस्ट, साबण, शैंपू, डिटरजंट, सौंदर्य प्रसाधने इ. सारख्या दैनंदिन घरगुती उत्पादनांमध्ये विविध घातक रसायने तसेच वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी द्रव्ये आणि नाशके असतात. ही घातक रसायने / विषद्रव्य आपण रोज सांडपाण्यातून नाल्यांमध्ये आणि पर्यायाने नदीत व इतर जलस्त्र्तोतांमध्ये तसेच जमीनीत सोडतो. नदीचे पाणी निसर्गचक्रात सतत शुद्ध होत असते. पण मानव निर्मित अश्या या विषद्रव्यांचे नदीत शुद्धीकरण/विघटन होत नाही. ती कायमस्वरूपी नदीत राहातात असे ओक म्हणाल्या. या प्रदूषित पाण्याचा उपसा शेती साठी केला जातो. या पाण्यातील घातक रसायने पीकांमाध्ये शोषली जातात आणि अशा प्रकारे ती अन्न साखळीत प्रवेश करतात. याने सगळ्या जीव सृष्टीला हानी पोहोचते. हेच पीक धान्य, फळे आणि भाज्या आपण अन्नाद्वारे ग्रहण करतो. या घातक रसायनांमुळे कँसर सारखे रोग, पोटाचे विकार, त्वचेचे विकार, श्वसनाचे विकार, वंध्यत्व इ. होऊ शकतात. यामुळे आपण जीवनशैलीत बदल करून निसर्गस्नेही जीवनपद्धतीकडे वळण्याची गरज असल्याचे ओक यांनी सांगितले.  कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी गाव परिसरात निसर्गाच्या साथीने यशस्वी विकास साधणारे ज्येष्ठ पत्रकार कामत यांनी मनुष्याच्या दैनंदिन अगदी साध्यासाध्या निसर्गविषयक वागण्यातील मुद्यांवर बोट ठेवून आपली भूमिका स्पष्ट केली. नैसर्गिक आणि अनैसर्गिक जीवनपद्धती हा भेद गेल्या २५ वर्षांत आपणच निर्माण केला असल्याचे ते म्हणाले. प्लास्टिक पिशवीचा अनिर्बंध वापर, वीज वापर, सोलर एनर्जीचा वापर, सायकलचा वापर, अपार्टमेंट शेजारी किमान झाडे, पार्किंगला सोलर दिवे अशा अगदी छोट्या-छोट्या मुद्यांतून त्यांनी आपली भूमिका मांडली. कोकणातील नद्यांच्या शेजारी जमिनी असलेल्यांना काही करायला नको आणि यास्तव इतरांनाही पाण्याशिवाय काही करता येत नाही अशी स्थिती आहे. डोंगरावर शेतातली उभारणे गरजेचे असून सरकारी योजनेवर अवलंबून राहून नियोजन करणे योग्य नसल्याचे कामत म्हणाले. कोकणात झाराप येथे बायोगसच्या माध्यमातून ग्रामविकासाची यशस्वी चळवळ उभारणारे डॉ. प्रसाद देवधर यांची धनंजय चितळे यांनी घेतलेली मुलाखत प्रत्यक्षदर्शींना अंतर्मुख करून गेली. जलविषयक काव्यसंमेलनाने वातावरण भारले गेले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी रात्री डॉ. वीरा राठोड यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. त्याचे सूत्रसंचलन कवी अरुण इंगवले यांनी केले.

संमेलनाच्या अखेरच्या दिवशी सकाळी उल्हास परांजपे यांनी फेरो सिमेंट टाकीचे बांधकाम याचे प्रात्यक्षिक दाखविले. कोकणातील पाणी आणि पर्यटन विकास या विषयावर डॉ. चंद्रकांत मोकल, मरिनर दिलीप भाटकर, गजानन देशपांडे यांनी मते मांडली. भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांनी, विकासाला उद्यमशिलतेची गरज आहे. मात्र, ही उद्यमशिलता कोकणात अभावानेच दिसते. कोकणात मुबलक संसाधन संपत्ती असूनही उद्यमशीलतेचा अभाव असल्याने कोकणचा विकास रखडल्याचे मत कोकणातील पाणी आणि औद्योगिकीकरणचर्चासत्रात नोंदवले. जल अभ्यासक विनोद रापतवार म्हणाले, कोकणला निसर्गसंपन्‍नतेचे वैभव आहे. ब्रिटीश काळात रेल्वेमुळे कोकणच्या विकासाचा टप्पा सुरू झाला. कोकण रेल्वेची सर्वप्रथम संकल्पना व आराखडा ब्रिटीशांनी 1888 मध्ये तयार केला होता. मात्र, टप्प्याटप्प्याने  कोकण विकासाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले. जगदाळे यांनी म्हणाले, कोकणात पायाभूत सुविधा व औद्योगिक विकास अन्य भागांच्या तुलनेने कमी आहे. कोकणातील माणूस नोकरीसाठी मुंबई गाठतो. मात्र, आता कोकणी माणूस उद्योग-व्यवसायाकडे वळू लागला आहे. जिथे पाणी तिथे समृद्धी असे मुबलक पाणी कोकणात आहे. त्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. संजय यादवराव यांनी कोकण विकासाची वाटचाल येथे आलेल्या रासायनिक उद्योगातून झाल्याचे मत नोंदवून यामुळे कोकणाची उद्योगाकडे बघण्याची मानसिकता नकारार्थी बनल्याचे मत नोंदवले. जलसाक्षरता प्रचार आणि प्रसार या चर्चासत्रात डॉ. विश्वास येवले, सतीश खाडे आदींनी आपली भूमिका मांडली. डॉ. उमेश मुंडल्ये म्हणाले, डोंगरावर शेती करून पाणी मुरवले जाते.आपल्या देवरायांत पाण्याचा उत्तम स्त्रोत आहे. त्याचा उपयोग करायला हवा असे सांगून त्यांनी आपले म्हणणे पटवून देण्याकरिता उपस्थितांना काही अभ्यासपूर्ण उदाहरणे दिली. भवतालचे संपादक अभिजित घोरपडे यांनी जलसाक्षरतेच्या मुद्द्यावर भर दिला.   

जगाच्या नकाशावर देशाला उंचीवर न्यायचे असेल तर पाणी नियोजन अतिशय महत्त्वाचे आहे. जलसाहित्य  संमेलनाबरोबरच कायमस्वरूपी जलसंवर्धनाबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचे आग्रही प्रतिपादन डॉ. माधवराव चितळे समारोपप्रसंगी केले. निसर्ग आपल्याला किती पाणी देतो आणि आपण त्याला परत किती करतो, हा देशाच्या दृष्टीने संशोधनाचा भाग आहे. सिंगापूरला मलेशियातून पाणीपुरवठा होतो. मात्र तेथे पाणी वाया जाऊ न देता त्यावर प्रक्रिया करून नवीन पाणी म्हणून वापरात आणले जाते, असे अनेक देश प्रक्रिया करून पाणी वापरात आणतात. मात्र आपल्या देशात हे होताना दिसत नाही. त्यामुळे आमची उंची जगाच्या नकाशावर फारच कमी आहे. हे दहावे संमेलन आहे. आपले ध्येय गाठण्यासाठीचा रस्ता खूप लांबचा आहे. त्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे असून तसे झाले तरच निर्मळ, समृद्ध, बलशाली भारताचे चित्र उदयास येईल. भारतीय जलसंस्कृती मंडळ हे चित्र हस्तगस्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांना मदत करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. देशात सर्वच ठिकाणी नागरिकीकरण वाढते आहे, हे नाकारता येणार नाही. मात्र तेवढय़ा सुविधा आम्ही नागरिकांना देऊ शकतो का, याचा विचार करण्याची गरज आहे. चिपळूण शहराचा विचार केला तर घनकचरा, मलप्रवाह याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे अशा शहरातूनच त्यावर उपाययोजना झाल्या नाही तर आमच्या देशाची जागतिक उंची कशी वाढेल, असा प्रश्नही चितळे यांनी  उपस्थित केला. संमेलनात जलनियोजनासाठी प्रयत्न करणाऱया सहय़ाद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, नागपूरचे विनोद हंडे, धुळेचे संजय झेंडे, विजय जोगळेकर, डॉ. अनिल जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या स्थापनेपासून या संस्थेचे अध्यक्षपद प्रसिद्ध साहित्यिक, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी भूषविले. सध्या जलसाक्षरतेचे पुरस्कर्ते डॉ. दत्ता देशकर हे अध्यक्ष आहेत. पाणीप्रश्नावरील विविध पैलूंचे समाजाला आकलन व्हावे, नद्यांचे बारमाहीकरण, पाण्यासंबंधातील विविध कायद्यातील सुसूत्रता, ज्येष्ठ नागरिक व जलसाक्षरता, पाणी आणि पर्यावरण आदि विशानुरूप मार्गदर्शन आणि पाणीप्रश्नाला वाहिलेले महाराष्ट्रातील एकमेव मासिक जलसंवाद असे या मंडळाचे भरगच्च काम आहे. आपल्या डिफ्युजर तंत्रप्रणालीने संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित असणारे चिपळूणचे जल तज्ञ विजय जोगळेकर यांच्या सहकार्याने या मंडळाची चिपळूणात शाखा स्थापन करून अध्यक्ष प्रकाश उर्फ बापू काणे आणि लोटिस्माचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या पाठबळावर हे संमेलन यशस्वी केले. आगामी काळात जलजागृती संदर्भात ठोस कार्यक्रम राबविण्याचेही त्यांनी जाहीर केले, जलजागृतीच्या या प्रयत्नारूपी कार्यास आगामी काळात चिपळूनसह  कोकणात मोठे यश मिळो, ही ईश्वरीय प्रार्थना !


धीरज वाटेकर 





आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...