शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

शिर्डीच्या पर्यावरण संमेलनातील ‘मनोमंथन’

पर्यावरण संवर्धनासाठी मानवी विचार आणि भावनेच्या प्रदूषणावर काम करण्याची आवश्यकता आहे. पर्यावरण संमेलनांसारख्या उपक्रमातून आपल्याला ‘मनोमंथन’ साधायचंय की ‘मनोरंजन’ हे ठरवण्याची उत्तम संधी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील २८ जिल्ह्यातून शिर्डी येथे आलेल्या पाचशेहून अधिक पर्यावरणप्रेमी संमेलनार्थीना नुकतीच मिळाली होती. निमित्त होते, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (एन.जी.ओ.) आणि श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी यांनी ‘आदर्श सरपंच’ भास्कर पेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली श्रीसाई आश्रम शताब्दी मंडप, साई आश्रम नंबर १ भक्तनिवास परिसरात २९-३० ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या सहाव्या पर्यावरण संमेलनाचे!

संमेलनाचे अध्यक्ष भास्करराव पेरे पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातीला पर्यावरण हा समाजाचा विषय असल्याचे म्हटले. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांनी दिलेल्या शपथेप्रमाणे आपण वागत असून जीवात जीव असेपर्यंत कार्यरत राहाणार आहोत. सध्याच्या तीव्र प्रदूषणाच्या काळात सुसह्य मानवी जीवन जगण्यासाठी स्वच्छ पाणी प्या, मुलांना शिक्षण चांगलं द्या, स्वच्छता राखा, वडीलधाऱ्या, म्हाताऱ्या माणसांना त्या-त्या गावांनी स्वीकारा, सेंद्रिय शेती करा, वृक्षारोपण करा आदी कानमंत्र पेरे पाटील यांनी दिले. १९९५ पासून पेरे पाटील यांनी पाटोदा या साडेतीन हजार वस्तीच्या गावात काम सुरू केले होते. शिक्षण सातवीपर्यंत झालेल्या त्यांच्या घरी वारकरी वातावरण होते. लोक आरोग्यपूर्ण आणि दीर्घायुष्य जगले पाहिजेत म्हणून त्यांनी काम केले.मूल जन्माला आले की, त्याला प्रथम ऑक्सिजन लागतो. झाडामुळे हे शक्य आहे. झाडे म्हणजे पावसाचे एटीएम आहे. प्रत्येक माणसामागे चार झाडे लावणे आवश्यक आहे.’ असा विचार त्यांनी मांडला. लग्नानंतर नवरीने माप ओलांडून येताना झाड लावले पाहिजे. झाड नाही तर लेकरं जगणार नाहीत हे सांगणे जरुरीचे आहे. पाटोद्यात माणशी चार झाडे लावली आहेत. पूर्वजांना नावे ठेवू नका, त्यांच्या काळात योग्य होते. आपण मोडतोड करून समस्या वाढविल्या. आज सर्वच प्रकारांत भेसळ वाढली आहे. समाजातील कर्त्या माणसांनी लक्ष दिले पाहिजे. समाज ऐकतो, सांगणारा योग्य दर्जाचा आणि प्रामाणिक पाहिजे. देशाचे राजकारण जातीपातीवर न करता विकासावर करायला हवे. प्रत्येक गावात विकासाच्या आड येणाऱ्या प्रवृत्ती दुर्लक्षित करूनच विकास साधला पाहिजे. कष्टाशिवाय पर्याय नाही. शिर्डी सारख्या देशातील धार्मिक संस्थाननी भाविकांना रोपं भेट द्यायला सुरुवात करायला हवी. रोपांची विक्रीही करता येईल. लोकं इच्छेने प्रसाद म्हणून ती सोबत नेतील लागवड करून संगोपन करतील असा विचार पेरे पाटील यांनी मांडला.

रघुनंदन रामकिशन लाहोटी यांनी ‘सर्वांगीण ग्रामीण विकास’बाबत बोलताना २०१२ साली दुष्काळ पाहिल्यावर एक गाव दत्तक घेतल्यापासून ची कहाणी सांगितली. जमिनीत पाणी मुरेल असं काम करायला पाहिजे असं ते म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी असंख्य प्रयत्नानंतर ‘गावात समृद्धी आली माणसं बदलली नाहीत’ अशी व्यथा बोलून दाखवत ‘काय चुकलं?’ असा प्रश्न उपस्थित केला. त्याच्या उत्तरादाखल ‘माणूस घडविण्याच्या कामात आम्ही कमी पडलो’ असंही ते बोलून गेले. लाहोटी हे अरुणिमा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ही संस्था मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात ग्राम जलसंधारण, वृक्षारोपण, शिक्षण, स्वच्छता, तरुणांमध्ये कौशल्य विकासवाढ, लहान बचत गटांद्वारे महिला सक्षमीकरण, भारतीय गायीवर आधारित सेंद्रिय शेती, सेंद्रिय शेतमालाचे थेट विपणन आदी विषयात काम करते. या संस्थेने जलसंधारण प्रकल्पांतर्गत लोकसहभागातून २५ हून अधिक वेगवेगळ्या गावांमध्ये २५० चेक dam बांधलेत. ही गावे पाणी टंचाईमुक्त झालीत. आगामी काळात असेच बंधारे आणखी १०० गावात उभारण्याचे संस्थेचे ध्येय आहे. यातून सध्या ५ हजार दशलक्ष लीटर पेक्षा जास्त पाण्याचे संवर्धन आणि जतन केले गेले आहे. ज्याचा १० हजारपेक्षा जास्त कुटुंबांना दीर्घकालीन लाभ होतो आहे. पाणी या विषयावर खूप काम केलं तर पण गावं पाणीदार होईल. सेंद्रिय शेती वाढवण्यासाठी येणारे उत्पन्न रासायनिक खताच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाइतके मिळेल याची काळजी घ्यायला हवी असंही लाहोटी यांनी नमूद केलं. ‘संत साहित्यातील पर्यावरण विचार’ या विषयावर प्रा. विशाल(महाराज) फलके यांनी मार्गदर्शन केले.



२०१९ च्या चिपळूण पर्यावरण संमेलनात शिवकालीन पर्यावरणीय विचारअसा विषय होता. शिवरायांनी हवामानाचा लहरीपणा लक्षात घेऊन जलव्यवस्थापन करण्यावर भर दिला. मानवाने निसर्गाला देवत्व दिलेले आहे. संतांच्या अभंगातून आपल्याला याची जाणीव होते. संत परंपरा मानणारा तिला प्रमाण मानून काम करणारा एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे. आपले सण, प्रार्थना निसर्गाशी निगडित! भारतीय संस्कृती, परंपरा आणि जीवनदृष्टी लक्षात घेता पुन्हा एकदा आपले भावनिक अंगाने आपले पर्यावरणाशी नाते प्रस्थापित होण्याची गरज आहे. माणसाचा निसर्गाशी असलेला संवाद बदलत्या जीवनशैलीत आज हरवलाय. निसर्ग दुखावला गेलाय. म्हणून शिर्डी सारख्या पवित्र ठिकाणी संत साहित्यातील पर्यावरणहा विषय निवडण्यात आला होता. यावेळी बोलताना ‘संत साहित्याचा विचार करा, अभ्यास करा’ अशी भूमिका फलके यांनी मांडली. विचार आणि भावनेचे प्रदूषण यावर काम व्हायला हवं आहे. आपल्याला मनोमंथन हवंय की मनोरंजन ते ठरवा असंही ते बोलले.

‘शिर्डीतील पर्यावरण’ हा विषय ग्रीन एन क्लीन शिर्डी फाऊंडेशन शिर्डीचे अध्यक्ष अजित पारक यांनी मांडला. ही संस्था शिर्डीमध्ये ताजी हवा आणि स्वच्छ वातावरण मिळावं यासाठी २०१२ पासून प्रयत्न करते आहे. संस्थेने आजवर ११ हजारहून अधिक झाडे लावलीत. तेवढ्याच स्थानिक जागरूकता मोहिमा राबविल्या आहेत. रक्षाबंधन निमित्ताने झाडाला राखी बांधणे (वृक्षबंधन), ‘एक सेल्फी झाडासोबत’, वृक्षपूजन, स्वच्छ शिर्डी हरित शिर्डी प्रकल्प उपक्रम राबवलेत. शिर्डीच्या सुशोभीकरणात ग्रीन एन क्लीन शिर्डी फाऊंडेशनचे योगदान आहे. पारख यांनी आपल्या भाषणात, अर्धवट तोडलेल्या झाडांना शेणाने ड्रेसिंग करावे आणि शालेय मुलांनी घरी परतताना पाण्याच्या बाटलीत शिल्लक राहिलेले पाणी झाडाला घालावं असा विचार मांडला. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. बी. जे. भोसले यांनी ‘जागतिक पर्यावरण, भारताची स्थिती आणि आपली जबाबदारी’ या विषयाची मांडणी केली. यावेळी बोलताना त्यांनी प्लॅस्टिकचे दुष्परिणाम, औद्योगिक क्रांती, आर्थिक विकास आदी मुद्यांचा उहापोह करत शाश्वत विकासासाठी काम न केल्याने आपण विनाशाच्या उंबरठ्यावर असल्याचे नमूद केले. चिरकाल ठरणारा विकास विचारात यायला हवा, असं ते म्हणाले. समारोपप्रसंगी वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित स्‍त्रीजन्माचे स्वागत कराचळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉ. सुधा कांकरिया यांनी बोलताना निसर्ग, सामाजिक आणि मानसिक पर्यावरण विषयक उहापोह केला. सकस विचारांचं बीज वाढायला हवं असं त्या म्हणाल्या. सामाजिक पर्यावरण असल्याचे नमूद करून त्यांनी अतिशय भावनिक ओलाव्यात सामाजिक पर्यावरणाचं वास्तव मांडलं. उपाय म्हणून त्यांनी उपस्थितांना ध्यानधारणा करावयाची सूचना केली. प्राथमिक शिक्षणचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी मोफत पुस्तक वाटप योजनाबाबत बोलताना विद्यार्थ्यांची पुस्तके वापरण्याबाबतची स्थिती वर्णिली.

संमेलनाला श्रीसाईबाबा देवस्थान संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत, चांगुलपणाची चळवळचे संस्थापक राज देशमुख, अहमदनगर जिल्हा उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने, डॉ. प्रकाश कांकरिया यांची उपस्थिती लाभली. संमेलनात विलास महाडिक, प्रमोद काकडे यांनी संपादित केलेल्या ‘वनश्री’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८


संपूर्ण संमेलन चित्रीकरण लिंक ::

https://www.youtube.com/channel/UCp-CZbY3RxW4mrWMp3-FOHg/streams

एक होते आबासाहेब मोरे

सुरेगाव ! श्रीक्षेत्र सुरेगाव ! श्रीगोंदा तालुक्यात वसलेलं अहमदनगर जिल्ह्यातील एक खेडेगाव. या गावाने स्वातंत्र्योत्तर काळात एक ‘वृक्षरत्न’ जन्माला घातलं. भारतीय स्वातंत्र्याला अमृतमहोत्सवी स्पर्श झाल्या नंतरच्या अवघ्या तीनेक महिन्यात गेल्यावर्षी, ६ नोव्हेंबर २०२१ रोजी ऐन दीपावलीत हे ‘वृक्षरत्न’ कुणाला काही कळायच्या आतच अनंतात विलीन झालं. ‘वृक्षसंवर्धनाचं आपलं काम जाणीव-जागृतीचं आहे. रेल्वेच्या एखाद्या डब्यासारखं लांबचलांब महाराष्ट्रभर पसरलेल्या या सामाजिक कामस्वरूप रेल्वेच्या डब्यात आजवर अनेक प्रवासी येऊन बसले. काही उतरले. पण ना हा डबा थांबला ना हे काम! काही प्रवासी पुन्हा नव्याने बसले. अजूनही काही नव्याने येतील.’ या दुर्दम्य आशावादाच्या बळावर सोबत आलेल्या, येणाऱ्या साऱ्यांना एका विचाराने बांधून राज्यभर ‘पर्यावरण चळवळ’ राबविणाऱ्या त्या वृक्षरत्नाचं नाव होतं ‘वृक्षमित्र’ आबासाहेब राजाराम मोरे.

विसाव्या शतकात जन्मलेल्या आबांसमोर, उमेदीच्या काळात येऊ घातलेल्या एकविसाव्या शतकाने अनेक सामाजिक प्रश्न निर्माण करायला सुरुवात केली होती. आबा यातल्या पर्यावरणाच्या प्रश्नाला सर्व शक्तीनिशी जाऊन भिडले. जनजागृतीसाठी त्यांनी राज्यव्यापी संघटन उभारलं. पर्यावरण संवर्धनाचा विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी हजारो किलोमीटरचा अखंड प्रवास केला. न थकता, न रुसता, समोरून मिळणाऱ्या प्रतिसादाचा फारसा विचार न करता आबा अनेकांशी सातत्याने पर्यावरण या एकाच विषयावर तासंतास बोलत राहिले. अलिकडच्या काळातील आबांचा ‘फॉलोअप’ हा व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा विषय ठरावा. आबांची हीच तळमळ पाहून अनेक माणसं त्यांनी उभारलेल्या पर्यावरण चळवळीशी आपणहून जोडली गेली. भारत सरकारच्या नद्या जोडणी प्रकल्पाचे सदस्य राहिलेले राज देशमुख हेही आबांची पर्यावरण विषयक तळमळ पाहून मंडळाच्या पाठीशी उभं झालेलं एक प्रमुख नाव. ‘कोरोना’ काळातही राज देशमुख हे गरजूंसाठी शिधावाटप करायला आबांच्या सूचनेवरून ‘सुरेगाव’सारख्या गावात पोहोचले होते. एकविसाव्या शतकाची स्वतःची अशी वैशिष्ट्ये होती. माहिती व तंत्रज्ञान युगाने संगणक, इंटरनेट, उपग्रह, मोबाईल आदी साधनांनी स्थळकाळाच्या सीमारेषा पुसट केल्या होत्या. जागतिक व्यापारास गती आली होती. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे नागरीकरण, मध्यमवर्गाचा कायाकल्प, संघटित क्षेत्रातील कामगार संघटनांचे दुर्बलीकरण अशातून विषमता वाढीस लागत होती. दुर्बल घटकांना आधाराची गरज भासणार होती. भौतिक विज्ञानाने निर्मिलेली नवसाधने श्रीमंत वर्गाच्या सुखासाठी असल्याचे आबंसारख्या पर्यावरणप्रेमींना लक्षात आले होते. मूल्यांपेक्षा किंमत, नात्यापेक्षा व्यवहार, शिक्षणापेक्षा शहाणपण आणि विचारापेक्षा कृती महत्त्वाची ठरल्याने व्यक्तींच्या धारणेत आमूलाग्र बदल होत होते. मनुष्य टोकाचा आत्मरत व आत्मकेंद्री बनू लागला होता. समाजकारणाची जागा राजकारणाने घेतली होती. सेलिब्रेटी व सत्ताधीश समाजाचे आयडॉल' बनत होते. त्यांचं ब्रँडिंग हा सार्वत्रिक आणि सार्वजनिक उद्योग बनत चालला होता. अशा काळात आपल्या विचार आणि आचारांमध्ये अंतर न पडू देता पर्यावरण चळवळ उभी करण्यासाठी आबासाहेब मोरे धडपडत राहिले.

५ जून (१९५५) हा आबासाहेबांचा वाढदिवस. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येत असल्याने गेली काही वर्षे आम्ही पर्यावरण मंडळातील सहकारी तो साजरा करायचो. निधनापूर्वीचा शेवटचा २०२१ चा वाढदिवसही राज्यव्यापी ‘आभासी’ झूम कॉन्फरन्ससह आम्ही साजरा केला होता. मंडळाच्या महिला सखी मंचच्या प्रतिनिधींचाही यावेळी उस्फूर्त सहभाग होता. कॉन्फरन्सच्या सुरुवातीला प्रसिद्ध चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा, मंडळाचे माजी कार्याध्यक्ष स्वर्गीय गोरखनाथ शिंदे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिकाजी तांबोटकर आणि कोरोनात निधन पावलेले जगभरातील समस्त पर्यावरणप्रेमी बंधू-भगिनी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. तेव्हा पुढील पाचेक महिन्यात असं काही अघटित घडेल असं वाटलंही नव्हतं. सौ. कावेरी मोरे (मॅडम) यांनी आबांचे औक्षण केले होते. सतत माणस जपणारे, जोपासणारे, जोडणारे, माणस घडविणारे, माणसांच्या मनाची मशागत करणारे असे आबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व असल्याचे अनेकांनी म्हटले होते. तर सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्यावर बोलताना आबासाहेबांनी राज्यभरातील पर्यावरणप्रेमी सहकारी, शिक्षक बंधू-भगिनी यांचं मिळालेलं प्रेम महत्त्वाचं असल्याचं नमूद केलं होतं. आबासाहेब हे सतत पर्यावरणाचा विचार करणारे एक अफलातून व्यक्तिमत्त्व होतं. निसर्ग आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या समूहाला वैचारिक स्तरावर अधिकाधिक सक्षम राहाण्यासाठी आबासाहेब सातत्याने प्रयत्नशील असत. आबासाहेबांनी सुरु केलेली पर्यावरण संमेलने आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरे पर्यावरणीय जनजागृतीच्या क्षेत्रात कार्यरत समूहाला वैचारिक पातळीवर ज्ञानार्जन देणारे उपक्रम म्हणून नोंदवले जावेत इतकी महत्त्वाची आहेत. १९८२ साली वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी वृक्षारोपण करून आबासाहेबांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा घेऊन पर्यावरण संवर्धनकामास प्रारंभ केला होता. तेव्हापासून त्यांनी शिक्षक आणि शेतकरी मेळावा’, ‘ना नफा-ना तोटातत्वावर १३ लाख रोपांची स्वत:ची रोपवाटिका, ‘एक मूल एक झाडमोहीम, ‘यशाची वनशेतीप्रयोग, ‘जिजाऊ वनज्योत चूलप्रकल्पाचा प्रचार आणि प्रसार, ‘वनश्री बंधारा योजनाप्रकल्प, वृत्तपत्रात हजारांवर लेख आणि साडे तीन हजाराहून अधिक व्याख्याने दिलेल्या आबासाहेबांनी महाराष्ट्रात आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने १९९८, २००२, २००४ साली राज्यस्तरीय रंगभरण आणि निबंध स्पर्धांचे आयोजन केले होते. वनश्रीनावाने विशेषांक काढून पर्यावरण संवर्धनाचे विचार जनमानसात पोहोचवायला सुरुवात केली होती. कामाला नोंदणीकृतवलय प्राप्त करून घेण्याची गरज लक्षात आल्यावर पर्यावरण संवर्धन विषयक प्रसार कार्यासाठी आबासाहेबांनी २००४ साली स्थापन केलेल्या, ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्रया मंडळाचं काम सुरु होतं.

सुरेगाव ही स्वर्गीय आबांप्रमाणे परिव्राजकाय प.पू. सद्गुरू श्रीआनंदाश्रम स्वामी महाराज उर्फ श्रीधरस्वामी (श्रीधर दिगंबर सातपुते) यांचीही जन्मभूमी. श्रीआनंदाश्रम स्वामी महाराजांनी दण्डी संन्यास घेऊन श्रीक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानदेवांच्या सेवेत आपले जीवन घालवले होते. आळंदी येथे निधन झाल्यावर श्रीआनंदाश्रम स्वामी महाराजांचा अंत्यविधी (ज्येष्ठ वद्य ११, २००२) सुरेगावला करण्यात आला होता. स्वामी महाराजांच्या समाधीस्थळाचा दर्जा मिळाल्यावर सुरेगाव ‘श्रीक्षेत्र सुरेगाव’ बनलं. सुरेगावला आनंदाश्रम स्वामी संस्थानच्या माध्यमातून देवस्थानची उभारणी करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात स्वामीजींचा प्रकटदिन (माघ वद्य ७, १९१२) सोहोळा संपन्न होतो. महिन्याच्या एकादशीला तिथे उत्सव असतो. दूरदूरून भाविक येतात. भाविकांना खिचडीचा प्रसाद वाटप केला जातो. ‘संकट आलं म्हणजे देवाचं नाव घ्यायचं हा परिपाठ बनलेला आहे. तळमळीचा परमार्थ काही निराळाच आहे. तळमळ ही काही और चीज आहे’ असं श्रीआनंदाश्रम स्वामी महाराज म्हणायचे. त्यांच्या शब्दातील ही पारमार्थिक तळमळ स्वर्गीय आबासाहेब ‘पर्यावरण’ विषयात जगले. विशेष म्हणजे देवस्थान परिसरातही आबांनी वृक्षारोपण चळवळ राबवली होती. सुरेगाव हे तसं तालुक्याच्या सीमेवरील दुष्काळी गाव. आज ते निसर्गरम्य शेतीसमृद्ध खेडेगाव बनलं आहे. गावात ‘पाणी अडवा पाणी जिरवा’चे चांगले प्रयोग तिथे झाले आहेत. गावात सामाजिक वनीकरणाचे खूप प्रयोग झाले आहेत. त्यामुळे झाडे दिसतात. अहमदनगर दौंड मार्गाने आलो तर चिखली घाट उतरून आपण गावात पोहोचतो. याच गावात प्रतिकूल परिस्थितीत आबांनी शिक्षण घेतलं. आबा शिक्षक बनल्यावर त्यांचं कुटुंब आनंदात रममाण झालं. श्रीगोंद्याच्या छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेत नोकरीस लागल्यावर आबा तालुक्याच्या डोंगरपट्ट्यात धडपडू लागले. सुरुवातीच्या काळात एकदा जिल्हा बँकेची निवडणूकही लढवून पाहिली. पण संधी मिळत नाही हे लक्षात आल्यावर आबांनी पुढारपणातून स्वतःला परिश्रमपूर्वक बाजूला काढलं. आपलं क्षेत्र बदललं. माणसात राहाणं हे पहिल्यापासून नक्की होतं. आबांनी वर्गात शिकवलेलं आजही अनेक विद्यार्थ्यांच्या लक्षात राहिलं आहे. इतिहास-भूगोल आणि नागरिकशास्त्राचे शिक्षक असलेले आबासाहेब आयुष्याच्या भावी इतिहासाला दिशा देण्यासाठी जणू पर्यावरणाकडे वळले. विविध कार्यक्रम-उपक्रमातून आबांमधील उत्तम संघटक आकार घेत गेला. डोळ्यासमोर अण्णा हजारे यांच्यासारखा दीपस्तंभ उभा होता. अण्णांनी आयुष्यभर आबांना आपल्या मायेचा आधार देऊ केला होता. आबांची ही जणू खूप मोठी मिळकतच होती. अनेक पेशंटला आजारपणातून बरे होण्यासाठी आपला वेळ आणि पैसा आबांनी खर्च केला. शिक्षक म्हणून आबांनी केलेल्या कामाचं चीज झालं. आबा मुख्याध्यापक झाले. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे (बापू) यांनी स्थापन केलेल्या श्रीछत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेत आबांनी १९८२ पासून २०१३ पर्यंत सलग ३२ वर्षे शिक्षक, पर्यवेक्षक, आणि सरते शेवटी मुख्याध्यापक म्हणून अत्यंत प्रामाणिक सेवा बजावली. विद्यार्थ्यांत ते कायम लोकप्रिय राहिले. ‘पर्यावरण आणि शिक्षण’ क्षेत्रातील कार्यासाठीचे भारत सरकारचे तब्बल दोन राष्ट्रीय पुरस्कार आबांना राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाले.

आबांचे तत्कालिन शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यापासून विविध लोकप्रतिनिधींशी जवळचे संबंध राहिले. जवळच्या असंख्य शिक्षकांच्या जीवनातील अडचणी आबांनी सोडवल्या होत्या. जीवनात अत्यंत शांतपणे वावरत माणसं जोडण्याची जादू आबांनी साधली होती. श्रीगोंदा कारखाना येथे शिक्षक म्हणून त्यांची तीन दशकांची कारकीर्द बहरली. आवडीनं झब्बा घालणाऱ्या आबांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत उत्साही होतं. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची उत्तम हातोटी होती. त्यांचं उमेदीचं आयुष्य सुरेगाव ऐवजी श्रीगोंदा फॅक्टरीच्या क्वार्टर्समध्ये गेलं. त्यांच्या पत्नीही जिल्हा परिषदेला कार्यरत होत्या. त्यांनी आबांना जीवनभर उत्तम साथ दिली. इतरांप्रमाणेच आबांनाही वैयक्तिक जीवनात समस्या होत्या. पण त्यात न अडकता आबासाहेब आपलं इप्सित कार्य करत राहिले. निवृत्तीनंतर आबांनी आपलं वास्तव्य अहमदनगरला हलवलं होतं. कोरोना कालखंडात दोन वर्षे ते सुरेगावला मुक्कामी होते. हृदयाची बायपास पूर्वीच झाली होती. पण जगण्याची आस आणि काम करण्याची तळमळ जागृत होती. आबांचं व्यक्तिमत्त्व अभ्यासू होतं. ‘चांगल्या कामाला कोणी आर्थिक मदत करत नाही.’ ही व्यथा आबांच्या मनात सदैव राहिली. तब्बल शंभर माणसं घेऊन भूतानचा आंतराष्ट्रीय अभ्यासदौरा आखणं तसं सोपं काम नव्हतं. पण आबांनी ते यशस्वी केलं. असाच अजून एक दौरा अमेरिकेला करावा असं हल्ली त्यांच्या डोक्यात सुरु होतं.

एकादशी, १५ नोव्हेंबर २०२१चा दिवस उजाडला. सुरेगावाच्या पवित्रभूमीत आज स्वर्गीय आबांचा दशक्रिया विधी होत होता. श्रीक्षेत्र देवगडचे तरुण कीर्तनकार ह.भ.प. अक्षय उगले महाराजांचं प्रवचन सुरु होतं. गावाला नदी नाही. गावातून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाणी अडवलेल्या कालव्याच्या तीरावर घातलेल्या मंडपात सकाळपासून लगबग सुरु होती. स्वर्गीय आबांना मानणारी सारी मंडळी एकवटली होती. सारं काही नीटसं पार पडावं म्हणून प्रत्येकजण धडपडत होता. आबांनी उभारलेल्या पर्यावरण चळवळीतील शिलेदारांनी सुरेगावच्या वैकुंठभूमीत स्वर्गीय आबांच्या वयाइतक्या वड, लिंब, करंज, आंबा, पिंपळ आदी ६७ वृक्षांचे रोपण करून आबांना अनोखी श्रद्धांजली वाहाण्याचा निर्णय घेतला होता. एकाबाजूला दशक्रियेचे विधी तर दुसऱ्या बाजूला प्रवचन सेवा सुरु होती. मंडपात येणारा प्रत्येकजण ‘ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही’ अशा खिन्न मनाने जणू विधात्याला शरण जात असावा असं दृश्य होतं ते! अशा दु:खदप्रसंगी, ‘बोलावं तरी काय?’ या विचारात असलेले काहीजण मंडपाबाहेर दूरवर नुसतेच कोपऱ्या-कोपऱ्यात बसून राहिले होते. दहाव्या दिवसाचे ‘काकस्पर्श’ महत्त्व उगले महाराज सांगत होते. पारनेर तालुक्यातील ३८ गावात काकस्पर्श होत नाही. श्रीगोंदा तालुक्यात १२ गावे, नेवासे तालुक्यात २३ गावे, अहमदनगर जिल्ह्यात १६८ गावात काकस्पर्श होत नसल्याचे सांगून उगले महाराजांनी ‘काकस्पर्श’चे शास्त्र विषद करत होते. कावळ्याच्या विष्ठेमधून वड, पिंपळ, लिंब यांच्या बिया जमिनीवर पडल्या तर त्या उगवून येतात मनुष्याने लावून किंवा इतर पक्ष्यांच्या विष्ठेमधून वड, पिंपळ, लिंब उगवून येण्याची शक्यता कमी असल्याचेही सांगताना महाराजांनी आबांच्या पर्यावरण विचाराचा गौरव केला. गोरगरिबांना, विद्यार्थ्यांना वेळोवेळी वस्तुस्वरूप/आर्थिक मदत करण्यात आबासाहेब आघाडीवर राहिले. पर्यावरण कामासाठी आबासाहेब राज्यभर फिरले. संवर्धनाचा विचार सर्वदूर पोहचविण्याचा प्रयत्न केला. आबांनी पर्यावरण चळवळीशी संबंधित शेवटचा फोन मंडळाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मारुती कदम यांना केला होता. त्याहीवेळी बोलताना आबांना दम लागत होता. मागील काही दिवसापासून ते आजारी होते. तब्बेत ठीक नसल्याचे ते फोनवर बोललेही होते. पण असं इतक्यात काही घडेल असं वाटलं नव्हतं.

त्यादिवशी ‘दशक्रिया विधी’ पूर्ण होऊनही ‘श्रद्धांजली सभा’ संपत नव्हती. आलेला प्रत्येकजण बराच वेळ आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत राहिला. स्मशानभूमीतील वृक्षारोपणानंतर उपस्थित साऱ्या पर्यावरणप्रेमींनी अत्यंत जड अंत:करणाने सुरेगाव सोडलं. ‘आता जायचं कुठं?’ हेही ठरलेलं होतं. पर्यावरण मंडळाचे सारे प्रतिनिधी स्वर्गीय आबांच्या जीवनात परिस बनून आलेल्या अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीला धावले. पर्यावरण प्रेमींच्या भावना समजून घेतल्यावर अण्णा म्हणाले होते, ‘आबासाहेब मोरे यांचे विचार पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवणे उत्तम आहे. आज पर्यावरणाच्या समस्येने जग चिंताग्रस्त झाले आहे. दिवसेंदिवस प्रकृती आणि मानवतेचे शोषण सुरु आहे. प्रदूषण, नवनवीन आजार वाढत आहेत. चांगलं काम उभं व्हायला कार्यकर्त्याला वेड लागावं लागतं. समाजाच्या भल्यासाठीच्या वेडात चांगली कामं होतात. स्वतःसाठी जगणारी माणसं कायमची मरतात. जी माणसं आपला गाव, समाज असा विचार करतात ती खऱ्या अर्थाने जगतात. म्हणून प्रपंच मोठा करा, मोठ्या प्रपंचात आनंद आहे. लहान प्रपंचात दु:ख आहे. सतत काम करत राहा. नैराश्य हा एक रोग आहे. जीवनात नैराश्य येऊ देऊ नका. याचा विचार करून आबासाहेबांनी वेड्यासारखं बेभान होऊन पर्यावरणाचं काम केलं होतं’, अण्णा हजारे बोलत होते. स्वर्गीय आबांनी उभ्या केलेल्या पर्यावरण चळवळीतील सारे सहकारी अण्णांचं बोलणं कान देऊन ऐकत होते.

 

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०२२

दोलायमानतेवर चिंतन हवे - डॉ. माधव चितळे (मुलाखत :: धीरज वाटेकर)

पाण्याचे ‘नोबेल’ पारितोषिक म्हणवल्या जाणाऱ्यास्टॉकहोम वॉटर प्राईझ’ (१९९३) ने सन्मानित डॉ. माधव चितळे सरांचं नाव टाळून महाराष्ट्राच्या-भारताच्या जलनीतीचा अभ्यास करता येणार नाही. केंद्रीय जल आयोगाचे माजी अध्यक्ष राहिलेले, जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ असलेल्या चितळे सरांचे ‘पाणी’ विषयातील योगदान अमूल्य आहे. चितळे सर हे जलक्षेत्राच्या भूतकाळाचे डोळस अभ्यासक, वर्तमानाचे सकल भान व समग्र जाण असणारे आणि भविष्यात पाण्याला नेमके कोणते वळण कसे व कधी मिळेल? याबद्दल वैचारिक स्पष्टता असणारे विचारवंत आहेत. आपल्या सेवानिवृत्तीनंतर तब्बल दोन अडीच दशके चितळे सरांनी जलक्षेत्राचे केलेले वैचारिक नेतृत्व ही दुर्मीळ आणि अचंबित करणारी बाब आहे.

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (एन.जी.ओ.) आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहावे पर्यावरण संमेलन २९-३० ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे आदर्श सरपंचभास्कर पेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असून संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आहेत.

या संमेलनात प्रसिद्ध होणाऱ्या ‘वनश्री’ विशेषांकासाठी पर्यावरण मंडळाचे सचिव आणि पत्रकार-लेखक धीरज वाटेकर यांनी ५ सप्टेंबर २०२२ रोजी डॉ. चितळे सरांची इंदोर (मध्यप्रदेश) येथे घेतलेली मुलाखत आवर्जून प्रसिद्ध करीत आहोत.


निसर्गाच्या अवकृपेमुळे, विकास क्रमातील कारणांमुळे काही प्रदेश मागास राहिलेत. त्यांना सुसह्यता उपलब्ध होण्यासाठी सर्व समाजाने कोणते प्रयत्न केले पाहिजेत. 

आपण मूलत: भूगोल हा विषय शिकवण्याची शाळेपासूनची आपली पद्धत बदलायला हवी आहे. आजही आपल्या शाळांत भूगोल विषय पारंपरिक पद्धतीने शिकवला जातो. आपलं भूगोलाचं शिक्षण अजूनही सगळं सरासरीवर चाललेलं आहे. जग हे सरासरीवर चालत नसतं. आपल्याकडे काही वर्ष खूप पाऊस पडतो. काही वर्ष अवर्षण येतं. वेगवेगळ्या क्षेत्रात त्याचा जो विस्तार (विचलनांक) होतो तो वेगवेगळा असतो. काही ठिकाणी तो तीन पट आहे. महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या खोऱ्यात तो फार मोठा म्हणजे सुमारे दहा पट आहे. आपल्याकडे नदी कधीतरी एकदम कोरडी पडते अन्यथा कधीतरी एकदम पूर किंवा महापूर येतो. हा ‘लहरीपणा आणि दोलायमानता’ हा आपल्या हवामानाचा एक घटक आहे. आपण तो शिकवत नाही. हवामान हे दोलायमान आहे, ते स्थिर नाही. आपण शाळेत कमी पावसाचा आणि जास्त पावसाचा, अवर्षणाचा प्रदेश शिकवतो. पण दोलायमान शिकवत नाही. भारताची सरासरी दोलायमानता ३२ टक्के आहे. तर सर्वाधिक दोलायमानता राजस्थानात ६० टक्के इतकी आहे. या दोलायमानेतेला पुरे पडेल असे पाण्याचे व्यवस्थापन वेगवेगळ्या क्षेत्रात वगवेगळ्या पद्धतीने आपल्याला उभे करावे लागेल. त्यात आपण कमी पडतो आहोत. ‘दोलायमानता’ ही संकल्पना आपल्या भूगोलाच्या शिक्षणात नाही आहे. आपली काही वर्ष चांगली राहाणार आहेत काही वर्ष वाईट राहाणार आहेत. ‘असे समजून या सगळ्या परिस्थितीत मी कसा वागणार?’ हे समजावून सांगणारी ‘दोलायमानता’ ही संकल्पना आपल्या चिंतनात यायला हवी आहे. ‘दोलायमानता’ हा भूगोलाचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या पुस्तकात जास्त पावसाचा आणि कमी पावसाचा प्रदेश अशी सरासरीवर आधारलेली जी वर्णनं भेटतात त्याला दोलायमानतेची जोड द्यायला हवी आहे.

सुदैवाने आपल्या भारतीय परंपरेमध्ये ६० संवत्सरांची संकल्पना आहे. संवत्सर (सन २०२२ - शुभकृत) हे निसर्गाचं चक्र आपण मानलं आहे. संवत्सर हा एक वर्षाचा किंवा बारा महिन्यांचा कालावधी असतो. संवत्सर म्हणजे साठ वर्षाचे कालचक्र असेही एक कालमापन आहे. त्यावर जगभर अभ्यास होतो आहे. १०२ संवत्सरे असावीत असंही एक मत जगातील हवामान शास्त्रातील जाणकारांत आहे. पण त्यातील काही वर्ष ही कमी पावसाची, काही वर्ष अवर्षणाची राहाणार हे सर्वांना मान्य आहे. आपल्या ६० संवत्सरांच्या नावावरून नजर फिरवली तरीही ती कधी ‘रौद्र’रूप कधी ‘सौम्य’ असतात सलग ६० वर्ष सारखी नसतात हे लक्षात होईल. या निकषात समाजाची जीवनघडी बसवणं हे कौशल्य आहे. जसजश्या समाजाच्या औद्योगिक गरजा, नागरी गरजा वाढत जातील तसतशी या कौशल्याची अधिकाधिक गरज भासेल. या दृष्टीने आपला भूगोल, आपल्या व्यवस्था शिकवल्या जायला हव्यात. त्यातून आपल्याला सुस्थिर समाज उभा करता येईल.

 

शासकीय समाज घटकांनी (शिक्षक आणि कर्मचारी) यांनी आपलं काम करत असताना कार्यरत परिसरातील ग्रामीण जनतेच्या विकासाचे प्रश्न काय आहेत? उपाययोजना कोणत्या दिशेने कराव्यात? याबाबत जनतेत मिसळून चर्चा करावी. शासनयंत्रणेचा दुवा बनावं अशी अपेक्षा असते. आज ती पूर्ण होताना दिसत नाही. असं का?

शासकीय समाज घटकांनी शासनयंत्रणेचा दुवा बनावं हे कमी झालेलं नाही. आपल्या शासनयंत्रणेकडील अपेक्षा खूप वाढल्या आहेत, ‘द्रुतगतीने’ पुढे चालल्या आहेत. त्याला प्रतिसाद देणारी शासकीय गती कमी आहे, हे खरं आहे. त्यामुळेच आपल्याला हे अंतर वाढलेलं दिसतं. समाजामध्ये या विषयाची सजगता खूप वाढली आहे. प्रतिप्रश्न खूप केले जातात. त्या प्रतिप्रश्नांना उत्तरे देण्याची नीट व्यवस्था बसवणे यासाठीची प्रशासकीय रचना अधिक प्रबळ असायला हवी आहे.

दुसरं असं की, आपल्याकडे अवर्षण आणि पुरांना मोठा इतिहास आहे. भारतातील पुरांचा इतिहास लिहायला हवा आहे. ते एक मोठे काम आहे. आपल्याकडील अनेक कथांचे जमिनीवर अवशेष मिळतात. त्या कथांचे जोडले न गेलेले दुवे अनेक आहेत. पण या दुव्यांची ऐतिहासिक निकषावर टिकेल अशी सुसंगत मांडणी करण्याची आवश्यकता आहे. महाविद्यालयांनी अशा विषयांवर काम करायला हवं आहे, पाठपुरावा करायला हवा. नव्या पिढीला आजच्या युगातील आश्चर्याचे, ‘अणुभट्टी’ सारख्या नवनव्या विषयांचे आकर्षण अधिक वाढले. अर्थात त्याही गोष्टी महत्त्वाच्याच आहेत. त्यामुळे सारी शैक्षणिक व्यवस्था त्या दिशेने आकर्षित झाल्याचे दिसते. ऐतिहासिक विषयांची जोडणी व्हायला हवी ते विषय आज महाविद्यालयांसाठी तेवढे आकर्षक राहिलेले नाहीत.

या विषयांवर काम करून व्यक्तीला काहीही मिळणार नाही. पण शाळा, महाविद्यालये, संस्था, सांस्कृतिक संघटना यांनी अशा विषयांवर काम करायला हवं आहे.


डॉ. माधव चितळे सरांच्या इंदोर येथे घेतलेल्या मुलाखत प्रसंगी
डावीकडून धीरज वाटेकर, रत्नागिरी जिल्ह्यातील
चिपळूण तालुक्यातील अलोरे हायस्कूलचे मुख्याध्यापक
विभाकर वाचासिद्ध आणि माजी मुख्याध्यापक अरुण माने.

जल आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना सामान्य जनतेच्या मनात पाण्याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून आपण जल दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. आजच्या जलदिनाकडे आपण कसे पाहाता?

‘जलदिन’ संकल्पनेला मिळालेला प्रतिसाद ‘अपेक्षेच्या पलिकडे’ आहे. ही संकल्पना संयुक्त राष्ट्र संघाने उचलणे ही खूप महत्त्वाची घटना होती. आपण सुरु केलेला ‘जलदिन’ आता जगभर साजरा होतो. ‘जलदिन’ म्हणून जनजागृतीचं काम सुरु करताना तो जगभर उचलला जाईल असं वाटलं नव्हतं. तो राष्ट्रीय उत्सव म्हणून आपण घडवून आणू इतपत तयारी होती. प्रत्यक्षात संयुक्त राष्ट्र संघाने ही संकल्पना उचलून धरली. ‘संयुक्त राष्ट्र संघ’ यात इतकं लक्ष घालेल असं सुरुवातीला वाटलं नव्हतं. ‘पाण्याच्या संदर्भातील वैशिष्ट्यांचा सामाजिक संवाद व्हावा’ हा याचा मुख्य उद्देश ठेवून हा दिवस सुरु झाला होता. पुढे तो जगभर पोहोचल्यानंतर त्यात ‘हवामान बदल’ आदी विषयही अंतर्भूत झाले. जलदिनाची व्याप्ती खूप वाढली.

(१९८७ मध्ये चितळे यांनी दरसाल राष्ट्रीय-जलसंसाधन-दिन साजरा करण्याची सुरुवात करून दिली होती. दरवर्षी एक निराळी संकल्पना त्यांनी यासाठी निवडली होती. अशा स्वरूपाच्या जलविषयक-माहिती-प्रसार-मोहिमांतून दक्षिण आशियातील शेजारी राष्ट्रेही प्रभावित झाली होती. १९९० मध्ये भारतात राष्ट्रीय जल महामंडळाची निर्मिती झाल्यावर ती संस्था आणि ती अंमलात आणणार असलेले राष्ट्रीय-जल-नियोजन यांना गती देणाऱ्यात चितळे प्रमुख होते. पुढे २२ मार्च १९९३ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय जलदिनसाजरा करण्यात आला होता.)

 

दुष्काळी वातावरणात पाण्याचे नियोजन करताना पहिला अग्रक्रम पिण्यासाठी पाणी पुरवण्याला दुसरा भांडवल व मेहनत गुंतलेल्या फळबागांना मिळावा. पण असं होत नाही, असं का?

जगभर वेगवेगळ्या कारणांमुळे अपवाद वगळता पाणी हा घटक अंगवळणी पडलेला, गृहित धरला गेलेला आहे. पाणी हा विषय जगभर उपेक्षित राहिला आहे. पाणी हा एक अभ्यासाचा, चिंतनाचा, विश्लेषणाचा, महत्वाचा विषय आहे असं मनुष्याला पटकन रुचत नाही. खरंतर यात आपल्याला न कळलेल्या खूप गोष्टी आहेत. ज्यात हवामान, पाण्याचे गुणधर्म, पाण्याचा जमिनीतील ओलावा आदी अनेक प्रकारचे तपशील येतात. आता हळूहळू ती परिस्थिती सुधारते आहे. त्यासाठी जागतिक जल दिवसाचा पुष्कळ उपयोग होतो आहे. समाजाला अनेक गोष्टी नव्याने समजू लागल्या आहेत. इजिप्त सारख्या देशात साजरा होणारा जलदिवस आपल्याला गुजरात-आसाममध्ये अपेक्षित नाही. कारण पाणी हा बराचसा क्षेत्रीय विषयही आहे. क्षेत्रीय पद्धतीने पाणी हा विषय हाताळण्यासाठी पाणी या विषयाभोवती काम करणाऱ्या संस्था, संघटना जगभर उभ्या राहायला हव्या आहेत. त्या तितक्या प्रमाणात राहिलेल्या नाहीत. लोकांनी पाणी हे गृहित धरलेलं आहे. त्यामुळे अग्रक्रमात गडबड होते. एखादा धक्का बसला की लोकं जागी होतात आणि चांगले दिवस आले की पुन्हा विसरून जातात. असं जगभर सगळीकडे झालेलं आहे.

 

फळबागात गुंतलेले भांडवल आणि श्रम वाया जाणे म्हणजे त्या व्यक्तीसह सर्व समाजाचे नुकसान !’ हे आम्हाला कळत का नाही?

कारखान्यातील किंवा फळबागेतील पाण्याची उत्पादकता, त्याचे सामाजिक वित्तीय मूल्य याची नीट बांधणी आणि मांडणी व्हायला हवी ती खूप कमी पडते. यासाठी अनेक संघटना काम करत आहेत. महाराष्ट्रात ‘पाणलोट विकास’ नावाची संकल्पना राबविण्यात आली आहे. या पाणलोटांना क्रमांक देण्यात आलेत. महाराष्ट्रात अठराशे पाणलोट क्षेत्रे आहेत. त्यामुळे त्यांना कायमचे स्थैर्य आलेले आहे.

आपल्याकडे या साऱ्या पाणलोटांची ऐतिहासिक मांडणी करणं आवश्यक आहे. शिवकाळातील पावसाच्या नोंदी कदाचित आज सापडणार नाहीत. पण अलिकडच्या काळातील किमान पन्नासेक वर्षांच्या नोंदी सलगपणे आपण करू त्यावेळी त्याच्या आधारावर आपल्याला पुढील शंभर वर्षांची मांडणी करता येईल. एखाद्या वर्षी कमी पाऊस झाल्यावर आज आपली जी स्थिती होते तसे होऊन चालणार नाही. कारण हवामानात चढउतार असतात. कमीतकमी पाऊस आणि जास्तीतजास्त पाऊस यातील गुणोत्तर चौपट आहे.

लोकांना घाबरवून टाकणारे आराखडे आजही प्रसारित होत असतात. पण एखाद्या ठिकाणचा अधिकचा पाऊस हा तिथला शीर्षस्थ बिंदू असतो. त्याच ठिकाणचा सरासरी पाऊस वेगळा असतो. हे सारं सांगणाऱ्या ‘पाणलोट विकास मंडळ’ सारख्या क्षेत्रीय संघटना भारतभर निर्माण व्हायला हव्यात. पाण्याची मोजणी, किती पाण्याचे बाष्पीभवन झालं, किती पाणी भूगर्भात गेलं, किती पाण्याचं नदीत रुपांतर झालं आदींची माहिती देण्यासाठी यंत्रणा विकसित व्हायला हव्यात. आपल्याला पैशाप्रमाणे पाण्याचा हिशोब लावता यायला हवा, अशी अपेक्षा आहे. हंगेरी देशात आपल्याला अशी व्यवस्था पाहायला मिळते. पाणी हा महत्त्वाचा घटक मानून त्याच्या भोवती समाजाची रचना, संस्था, व्यवस्था, व्यवहार करणं, नियम ठरवणं हे फ्रान्ससारख्या देशांनी घडवलं आहे. अशा देशांकडून आपण शिकण्यासारखं आहे.

दुर्दैवाने भारतीय समाज संघटित नसल्याने आपल्याकडे असं घडलेलं नाही. आपल्याकडे अशा क्रिया ह्या वित्तीय आणि राजकीय विचारात अधिक गुंतलेल्या दिसतात. अर्थात तोही आपल्या जीवनाचा एक भागच आहे.

आपल्याकडे हवामान, हवामानाचे चक्र, त्यात होणारे बदल, त्याचे अभ्यास हे ‘भूगोल’ संदर्भीय विषय उपेक्षित आहेत. कोणत्याही महाविद्यालयात जाऊन, ‘हा विषय घेणारे किती?’ हे तपासलं तर या विषयाची उपेक्षितता लक्षात येईल. भूगोलातील हवामान हा एक उपविषय आहे. भूजल हा त्यापुढील उपविषय आहे. आपल्याकडे हे विषय उपेक्षित राहिलेत, हे दुर्दैवी आहे. इतर देशात ज्या पद्धतीने यावर काम होतं त्या मानाने आपण मागे आहोत.

 

इतिहासात अहिल्याबाई होळकरांनी ‘फडपद्धती’ चालू केली होती. साक्री (जि. धुळे) आदी भागात ती चालू आहे. त्यात एका गावच्या जमिनीचे चार विभाग करायचे. दरवर्षी एका विभागात बारमाही, दुसऱ्याला आठमाही, तिसऱ्याला एका पिकापुरते व चौथ्याला पाणी मिळाले तर मिळाले. दरवर्षी हा क्रम फिरता ठेवायला म्हणजे पहिल्या गटाला पहिल्या वर्षी बारमाही, दुसऱ्या वर्षी आठमाही, तिसऱ्या वर्षी एकपिकी व चौथ्यावेळी संधी मिळाली तर मिळाली. यात दरवर्षी पंचवीस टक्के क्षेत्र निसर्गाच्या इच्छेवर सोडून दिले आहे. अशी प्रयत्नांची दिशा आपण मांडलेली आहे. सामाजिक न्यायाच्या जवळ जाणारी अशी एखादी ‘रोटेशन पद्धती’ स्वीकारण्याची वेळ येणं आपल्याकडे आता दूर नाही... असं वाटतं?

तत्कालिन ‘फडपद्धती’ स्वीकारण्याची वेळ आपल्यावर आत्ताच आलेली आहे. अहिल्याबाई यांच्या काळात कालव्यांच्या लाभ क्षेत्रांचा विस्तार सुमारे दीड हजार हेक्टर होता. काळानुरूप आवश्यकतेनुसार आजचे आपले उभारलेले प्रकल्प सुमारे दीड लाख हेक्टर क्षमतेचे आहेत. ‘सरदार सरोवर’ प्रकल्प तर दहा लाख हेक्टर क्षमतेचा आहे. ‘राजस्थान कालवा’ हा आठ लाख हेक्टर क्षमतेचा आहे.

काळानुरूप आज बँका मोठ्या झालेल्या दिसतात. पूर्वी सावकार घरी बसून पैसे देत असत आणि वसुलही करत असत. त्याची कार्यपद्धती आणि आजची बँकांची कार्यपद्धती यात जसा फरक पडलाय तसा तो सर्वत्र पडलेला आहे. प्रश्नांची व्याप्ती आणि त्याचा आकार वर्तमानकाळात काळात वाढलेले आहेत. त्यामुळे आपल्याला सिंचन क्षेत्रात प्रकल्पाचा आकार, विस्तार, त्याला लागणारे व्यवस्थापन कौशल्य आदींसह हवामान आणि पावसाचे बदल यांना स्वीकारून जगणारा, बदलांना तोंड देणारा समाज निर्माण करायला हवा आहे. मात्र हा विषय उपेक्षित राहिल्यामुळे या गोष्टी मागे पडल्यात. काहीजण सुखी काहीजण दु:खी असा असमतोल आपल्याला दिसतो. यावर मात करण्यासाठी आजच्या प्रकल्पांच्या आकारमानाची व्याप्ती वाढवताना त्याला लागणारे संघटन कौशल्य आपल्याला निर्माण करावे लागेल. समाजाला संघटित करून एका दिशेने चालायला शिकवण्याचं कौशल्य भविष्यात अधिकाधिक लागणार आहे.


आपल्याकडे अनेक नद्या दोन-तीन महिने वाहतात. बाकी काळ कोरड्या असतात. त्यांना बारमाही वाहते करायला काय करावे?

भारतात नद्या जोडणी प्रकल्पाचा अभ्यास झालेला आहे. नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी (एन.डब्ल्यू.डी.ए.) ही यंत्रणा यावर काम करते आहे. देशात आपण किमान तीसेक ठिकाणी नद्या जोडणार आहोत. त्याची प्राथमिक पाहाणी पूर्ण झालेली आहे. त्यातील पाहिल्या टप्प्याचे काम कर्णावती-बेतवा, दमणगंगा व पिंजळ, पार तापी-नर्मदा भागात सुरु झाले आहे. भविष्याच्या दृष्टीने हा प्रकल्प होणे आवश्यक आहे.

 

पाणी वापराबाबतची आपली प्रशासन यंत्रणा खोरेनिहाय आहे. ‘पाणीटंचाई’कडे आपण कसे पाहाता?

महाराष्ट्रातील आपले पाणी व्यवस्थापन खोरेनिहाय आहे. खोरेनिहाय मंडळे आहेत. महाराष्ट्रात सात खोरी आहेत. या सात खोऱ्यांची सरासरी आणि दोलायमानता वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक खोऱ्याचा वेगवेगळा भूगोल आपल्याला लोकांना समजावून सांगावा लागेल. सर्वांसाठी एकाच प्रकारचे जलव्यवस्थापन वापरता येणार नाही.

 

नद्या जोड प्रकल्पानंतर ‘पाणीटंचाई’ कमी होईल?

थोड्या प्रमाणात ‘पाणीटंचाई’ कमी होईल. आपल्याला आकाशातून मिळणारा पाऊस (पाणी) हा साधारणत ११० दिवसांचा आहे. आणि त्यातही खरा दहाच दिवसात पडणारा आहे. ते साठवण्यासाठी खूप मोठ्या आकाराची धरणे, जलाशय आवश्यक आहेत. मोठ्या जलाशयांना विविध कारणांमुळे विरोध होतो. विस्थापनाचे प्रश्न असतात. जमीन संपादनाचे प्रश्न आहेत. परंतु मोठे जलाशय हे ‘पाणीटंचाई’ प्रश्नावरील ‘तात्त्विक’ उत्तर आहे. ते व्यवहारात कसे आणायचे हे आपले कौशल्य आहे.

 

मोठी धरणे’ ही चांगल्या पर्यावरणाच्या व्याख्येत बसतात का?

होय. मोठी धरणेही चांगल्या पर्यावरणाच्या व्याख्येत उत्तम बसतात. पर्यावरण सुधारते. जो प्रदेश उष्ण आणि कोरड्या हवामानाचा आहे तिथे आपण पाणी साठवलं तर सुखावह वातावरण होणार आहे. हवेतील आर्द्रता वाढेल. जीवन सुसह्य होते. कोरडेपणा, रुक्षता कमी होते. युरोपियन इतिहास वाचून भारतीय धरणांबाबतच्या कल्पना मांडणाऱ्या लोकांना असं वाटू शकतं. भारताला लागू असलेला इतिहास हा भारतीय असला पाहिजे. मोठी धरणे आपल्याला आवश्यक आहेत. आकाशातून मिळणाऱ्या पाण्याचा अधिकाधिक संग्रह करून ठेवणे आपल्याला आवश्यक आहे.

 

पावसाचं सगळं पाणी आपण अडवायचं ठरवलं, समुद्रात जाऊ दिलं नाही तर काही अडचण होईल?

नाही. असं मानणाऱ्या लोकांना भूगोल नीट माहिती नाही. मुळात आपल्याकडे २/३ पाणी आणि १/३ जमीन आहे. हा सगळा विषय समाजाला नीट शिकवला गेला पाहिजे. औद्योगिक आणि नागरी जीवनाच्या प्रगतीमुळे पाण्यावर अवलंबून राहाण्याची मानवी गरज वाढणार आहे. निसर्गातील दोलायमानता नक्की काय आहे? हे समाजाला माहिती व्हायला हवे आहे. नद्यांचे सारे पाणी नद्यांना जाऊन मिळत असले तरी नदीतील एकूण पाण्याच्या सर्वाधिक पाण्याचे बाष्पीभवन होत असते. त्यामुळे ‘बाष्पीभवन’ नियंत्रण हा आपल्या पाणी व्यवस्थापनाचा पहिला गाभा असला पाहिजे. बाष्पीभवनावरील उपाय प्रदेशनिहाय वेगवेगळे आहेत. नदीच्या परिसरात जमीन आणि हवा यांचा संबंध तोडणारे ‘पर्णाच्छादन’ हा सर्वांसाठी समान उपाय आहे. त्यातही ‘पर्णाच्छादन’ कधी करायचं? किती दिवस करायचं? कधी काढायचं? हे स्थलनिहाय ठरवावं लागेल.

 

कोकणची पाणीटंचाई आणि कोयनेच्या अवजलाचे भविष्य..?

कोयनेचे अवजल वाहू दे. मुंबईतील लोकांना कोयनेचे अवजल हवंय. मुंबईच्या जवळ उल्हास नदीचं खोरं आहे. आणखीही पाण्याच्या नद्या आहेत. त्यामुळे इतक्या लांब पाणी नेण्याची गरज नाही. कोकणातील पाणीटंचाईचा विचार केला तर कोकणाला पाणी साठविण्याची अधिक गरज आहे. कोकणातील सगळं क्षेत्र सच्छिद्र नाही. १५ टक्के क्षेत्र सच्छिद्र असेल. कोकण पूर्वांपार तळ्यांच्या रचनांसाठी प्रसिद्ध आहे. तलाव बांधणं आपल्याकडे परंपरेने पुण्यकर्म मानलेलं आहे. त्यामुळे सच्छिद्र क्षेत्र वगळून इतर ठिकाणी कोकणात पाणी अडवायला हवं आहे. तलाव बांधण्याच्या परंपरेला हवामानाचा आधार आहे. आपल्या हवामानात एकूण १०० दिवसांपैकी १० दिवसात जो पाऊस पडतो त्यात येणारे पाणी हे ३६५ दिवस कसं वापरायचं याचा शास्त्रीय विचार करायला हवा आहे. कोकणात पूर्वी गावोगावी गावकीच्या मालकीचे तलाव होते. गावकीची मालकी ब्रिटिशांनी काढून घेतल्यावर पाणी समस्या अधिक तीव्र होत गेली. कोकणातील गावांची पाणी हाताळण्याची जुनी व्यवस्था पुन्हा आणायची गरज आहे.

 

पर्यावरणाच्या दृष्टीने भारताचे स्थान खालावलेले आहे. नद्या दूषित झाल्यात. पर्यावरणाकडे देशाच्या समृद्धीतील महत्वाचा घटक म्हणून आपण बघत का नाही?

नागरी जीवनाची नवीन रचना करताना त्या जीवनात वापरलेल्या पाण्याचं उत्सर्जन आणि हाताळणी यावर काम करायला हवं आहे. नागरी जीवनातून जो मलप्रवाह (दूषित पाणी) बाहेर पडतो तो स्वच्छ करूनच निसर्गाला परत द्यायला हवा आहे. तसे कायदे आहेत. पण हे होत नाही. पाणी स्वच्छ् करून निसर्गाला परत द्यायला हवं ही समज लोकांमध्ये कमी आहे. त्याची अंमलबजावणी नीट होण्यावर हे अवलंबून आहे.

 

निसर्गाला संस्कृतीशी जोडणारी काही उदाहरणं...?

जानेवारी महिन्यात मकरसंक्रांत साजरी करतो. मकरसंक्रमणाशी हवामान, पीकपद्धती आणि आपली अर्थव्यवस्था जोडलेली आहे. भारतात वर्षाकालीन आणि हेमंतकालीन अशी उत्पादने घेतली जातात. हेमंतकालीन उत्पादनात तीळ हे एक महत्त्वाचे पीक आहे. तीळ हे साठ दिवसांचे पीक आहे. मकरसंक्रांतीला तिळाचे पदार्थ वाटण्यामागे कमीतकमी पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांना आपण प्राधान्य द्यावे हा खरा वैज्ञानिक संदेश आहे.

‘कलश’ शब्द पाणी साठवण्याशी निगडित आहे. कलशाचं पोट मोठं असतं, मात्र तोंड लहान असतं. अक्षय्य तृतीयेला कलश वापरण्यामागेही कारण आहे. हा सण येतो तेव्हा आपल्याकडे उन्हाळा ऋतू असतो. या ऋतूत पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढलेले असते. अशा वेळी तोंडाकडे अरुंद होत जाणाऱ्या कळशीच्या आकाराच्या भांडयात पाणी साठवल्यामुळे या पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. बाष्पीभवन कमी होऊ देणे आणि पाणी साठवणे यांचे ‘कलश’ हे प्रतिक आहे. तेव्हा आपल्या पाण्याच्या व्यवस्थापनात विज्ञान आणणे आणि शेतकऱ्यांशी बोलून त्यांच्या चुकीच्या सवयी बदलणे आवश्यक आहे.


धीरज वाटेकर

विधीलिखित, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण, जि. रत्नागिरी. मो. ०९८६०३६०९४८

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ-साहित्य चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)  

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...